ब्रिटीश बुलडॉग ...

माझा परममित्र भाल्या एक दिवस अचानक साक्षात्कार झाल्यासारखा चेहेरा करून बसला होता तेव्हाच मी ओळखलं, की ह्या सहामाहीचं काही खरं नाही. धन आणि ॠण संख्या नुकत्याच शिकवल्या होत्या,त्यातल्या ॠण संख्या माझ्या बरोबर सलगीने वागणारं असं दिसत होतं. मागे जेव्हा जेव्हा भाल्याला साक्षात्कार झाला, तेव्हा दर वेळी असंच माझं प्रगतीपुस्तक बोंबललं होतं. त्याने प़क्षी पकडण्याचं ट्रेनिंग त्याच्या मामाकडून घेतलं तेव्हा म्हणा, किंवा भांडी घासायच्या साबणापासून क्षेपणास्त्र तयार करायची कला तो गावी शिकून आला होता तेव्हा घ्या - मी मात्र दोन्ही वेळा चिंबलो होतो.
पण ह्यावेळची गोष्ट वेगळी होती. भाल्या नुसताच सा़क्षात्कारी नव्हता, तर भारावला होता. त्याचे डोळे कुठेतरी लांब पहात होते.

"२६ माणसांना ठार मारलं. आता सांग, कोणी आहे असं अजून?" त्याने मला प्रश्न टाकला.
"आईल्ला! २६?"
"मग! शेवटच्याची तर कवटी फोडली. हातानेच."
"कुठे रे? कोणी? तुला कसं-" नो वंडर भाल्या भारावला होता. हाताने कवटी फोडली म्हंजे.. खतर्नाक प्रकार.
पण भाल्या आपल्याच नादात खुळावला होता.
"ब्रिटीश बुलडॉग. जब्राट आहे तो. आधी सगळ्यांना बोलावतो आणि वॉर्निंग देतो- की मी तुम्हाला मोस्टली मारीन. आणि तरी जर ते तयार झाले लढायला तर तो सोडत नाही."
".....!!"
"ब्रिटिश बुलडॉग.च्कॅ!", असं चत्कारून भाल्या पुन्हा सा़क्षात्कारी पोझमधे गेला.

मग सावकाश माहिती काढली तर मला बरंच काही समजलं. डबल्यू डबल्यू एफ असा एक सिक्रेट क्लब आहे म्हणे. त्यात लोक जब्राट मारामारी करतात. कुस्ती वगैरे प्रकार एकदम पकाव वाटतील, अशी मारामारी.
तिथे ते काहीही वापरू शकतात. खुर्च्या, टेबलं, लोखंडी सळ्या. आणि ते एवढे ताकदवान असतात की त्यांना काहीच होत नाही. अमेरिकेतले बॉडी बिल्डर्स खूप शक्तीशाली असतात.
एव्हाना आमच्या आजूबाजूला ह्या डबल्यू डबल्यू एफ बद्दल जाणकार असलेली बरीच पोरं जमा झाली होती. च्याय्ला, ह्यांना हे सगळं कळतं कुठून?

"योकोझुनाने परवा खुर्ची मारली रे कमालाच्या डोक्यात. बिचारा."
"पण कमालाकडे विडो पावर आहे. तो आधी ती टाकतो सगळीकडे आणि मगच लढायला येतो."
"विडो पावर नाही रे वूडू पावर. आणि ती पापाशँगोकडे पण आहे."
"हो,माहिते! पापाशँगो जादू करतो. तो अन्बीटेब्ल आहे ह्यावेळी. त्याला स्पेल येतात."
"काहीsss! अंडरटेकरपुढे पापाशँगो टिकणार पण नॅ. अंडरटेकर ७ फूट आहे."
"जँट गोन्सालेस ७ ११ आहे. तो बेश्ट आहे."
मग भाल्याने हुकूमी अस्त्रं काढलं-
"ब्रिटीश बुलडॉग. २६ लोकांना मारलंय." सगळे क्षणभर गप्प झाले.
"हॅ. फेकतो काय्पण."
"नाही तर जा मग. माझा दादा अमेरिकेत अस्तो. त्याने बघितलं. स्वतः". भाल्याने गौप्यस्फोट केला. मी आता निव्वळ थरारलो होतो. अमेरिकेतल्या दादाने सांगितलं म्हणजे ते ब्रह्मवाक्य. ह्यावर कोणीच काही बोलू शकलं नाही.

मी नुसता वेडा झालो होतो. मला काय ऐकू आणि काय नाही असं होऊन गेलं. ह्यामागे दोन कारणं, खरं तर एकच- बाबा. बाबांच्या मते केबल टीव्ही आणल्याने मुलं बिघडतात. बाबा तर केबल नसूनही बिघडलेलेच होते.
दुसरं कारण म्हणजे टीव्ही बघायला लोकांकडे जाण्यावर बंदी. महाभारत/रामायण आणि बालचित्रवाणी बघण्याची परमिशन मी मोठ्या मिनतवारीने मिळवलेली. पण नंतर "झी टीव्ही" ह्या प्रकाराने तो परवाना हिसकावून लावला होता.
मग मी नुसत्या हकिगती ऐकण्यावर समाधान मानलं.
ल्यूक आणि बूच असे दोन भाऊ एकत्र लढतात. ते खूप विचित्र आहेत. हिटमॅन हार्ट नावाचा एक रेसलर एकदम हिरो दिसतो, त्याला फुल मुलींचा सपोर्ट वगैरे असतो. (आमच्या वर्गातली रश्मी म्हणे त्याची फॅन आहे. रश्मी? बघून वाटत नाही...तरीपण पहिल्या पाचांत नंबर अस्तो.) अजून एक हल्क हॉगन आहे, तो सगळ्यांचा बाप आहे म्हणे. दरवेळी शर्ट फाडून सुरवात करतो लढायला. मी हे सगळं भक्तीभावाने ऐकू लागलो.
मॅचो मॅनचे कारनामे एकाकडून ऐकून त्याला दुसरीकडून ऐकलेल्या अल्टीमेट वॉरियर नामक लढवय्याबद्दल माहिती देऊ लागलो. माझं डबल्यू डबल्यू एफचं सामान्यज्ञान चिक्कार वाढलं होतं.

पण भाल्या तो भाल्याच. च्कॅ!

"अंडरटेकरपेक्षा डेंजर कोणीच नाही." भाल्याने एक दिवशी गंभीर चेहेर्याने घोषणा केली.
"अरे पण बुलडॉग मारेल की त्याला. आर्रामातsss-" मी उत्साहाने माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन केलं.
"ह्म्म... बुलडॉग काहीच नॅ. अंडरटेकर भूत आहे बहुतेक. त्याच्यावर आधी एकदा ऑपरेशन झालंय कसलंतरी. त्यामुळे पॉवर येते त्याला."
मग मला ह्या नव्या माणसाबद्दल भाल्याने बरंच ज्ञान दिलं. अंडरटेकर म्हणे स्मशानातून येतो. त्याचा जीव दुसराच एक माणूस सांभाळतो. त्या दोघांचं खरं नाव, रहाण्याचं ठिकाण कोणालाच माहिती नाही. ते अचानक प्रकट होतात, लढतात आणि निघून जातात. हा खरंच डेंजर प्रकार होता.
"मग अंडरटेकरला हरवणार कसं?"
"नाहीच हरवू शकत. अजून तरी अजिंक्य आहे तो. पुढच्या रयवारी बुलडॉगचं कसं होणार काय माहीती." भाल्याने चिंताजनक मुद्रा केली. मीही केली.

पुढल्या रयवारी शिंपल्या आणि कोलंबी हादडतानाही मला मनात बुलडॉगविषयी थोडी काळजी वाटत होती. माणसांना मारणं तसं सोप्पं आहे. पण भुताशी मस्ती करायला कोणी सांगितलं होतं?
संध्याकाळी मैदानावर जाईपर्यंत मला धाकधुक होती. पण भाल्या एका कोपर्यात पेप्सीकोला चोखताना बघून मला थोडा आत्मविश्वास आला.

"काय झालं? कोण जिंकलं?"
"आपण. दोघांनी टॅग टीम केली. " भाल्या पुन्हा भारावलेल्या सुरात म्हणाला.
"म्हंजे?"
"एकत्र आले दोघं ऐनवेळी. आणि शत्रूंना सांगितलं की हिंमत असेल तर या लढायला. ४-५ जण आले, पण कोणीच वाचू शकलं नाही आपल्यापुढे. बुलडॉग आता ३० वर पोचलाय."

त्याने अंडरटेकर आणि ब्रिटिशबुलडॉगला आपलंसं केलेलं बघून मला आनंद झाला. समोरच्या ४-५ जणांबद्दल वाईटही वाटलं. मूर्ख लेकाचे! इथे एकटा ब्रिटिश बुलडॉग पेलवत नाही लोकांना आणि हे दोघांबरोबर लढायला निघालेत. नशीब त्यांचं! त्या विजयाच्या आनंदात मी रात्री पालकाची भाजीसुद्धा जोषात खाल्ली. आईला चक्कर आली असणार बहुतेक.

असाच महिनाभर गेला. डबल्यू डबल्यू एफच्या सुरस आणि चमत्कारिक कथांमध्ये बरीच भर पडली होती. सध्याचा नवा सम्राट होता अल्टीमेट वॉरियर! हा सद्गृहस्थ म्हणे ब्रिटिश बुलडॉग आणि अंडरटेकरलाही पुरून उरला होता! गेला महिनाभर तो अजिंक्य होता. मला आता ह्या माणसाची शक्ती अविश्वसनीय वाटत होती. ह्या सगळ्या लढवय्यांविषयी माझ्या मनात एकदम उच्च वगैरे आदर निर्माण झाला.
त्यानंतरच्या बुधवारची गोष्ट. भूगोलाचे संभाव्य मागायला म्हणून मी नाईलाजाने अजिंक्यकडे गेलो. तो तसा शिष्ट आणि पहिल्या वगैरे नंबरचा मुलगा असल्याने सहाजिकच माझा शत्रू होता. एरवी त्याच्या आजूबाजूलाही मी फिरकत नव्हतो, पण आता नाईलाज होता. सरांनी अजिंक्यलाच भूगोलाच्या पेपरचे १० संभाव्य प्रश्न सांगितले होते. वहीतून प्रश्न उतरवून घेतल्यावर मी परत निघत होतो.

"डबल्यू डबल्यू एफ बघणार?"
"मी?" माझा विश्वास बसेना.
"नाय्तर काय गवळी सर? " अजिंक्यने डोळे मिचकावले.
त्याने टी.व्ही लावला. एवढे दिवस नुसते ऐकलेले सगळे लोक मला आता दिसणार होते. अंडरटेकर, तो अल्टिमेट वॉरियर आणि मुख्य म्हणजे ब्रिटिश बुलडॉग. मी अक्षरशः प्राण डोळ्यात आणून टी.व्ही कडे बघितलं.
खूपशा लोकांमधे एक माणूस माईक घेऊन आला. भोवती प्रचंड गर्दी होती, वेगवेगळे दिवे चमकत होते.
आणि एका रिंगणामध्ये लालभडक चड्डी घातलेला एक उघडाबंब माणूस खुर्ची घेऊन फिरत होता. त्याने एक विचित्र वाटणारा मुखवटा घातलेला, आणि तो इंग्लिशीत काहीतरी बोलत होता.
"ब्रिटीश बुलडॉग." अजिंक्य टी.व्हीसमोरून मान न वळवता म्हणाला.

कुठेय? हा उघडाबंब पैलवानासारखा दिसणारा जोकर? असा? आणि तो खोटा मुखवटा- जेमतेम त्याच्या चेहेर्याला झाकत होता. माझ्या मनात मी ह्या लढवय्यांची जी काही चित्रं रंगवली होती त्याच्या १०%सुद्धा ताकद नव्हती ह्या माणसात. असं कसं? मला एकदम खूप राग आला. डबल्यू डबल्यू एफ चा, ब्रिटीश बुलडॉगचा, अजिंक्यचा, झी टी.व्ही चा आणि भाल्याचा. खोटारडे साले.

त्या रविवारी मी मैदानावर गेलो तेव्हा भाल्याने मला बघून लांबूनच आरोळी ठोकली - "ह्या आठवडयात ब्रिटीश बुलडॉगने काय केलं म्हायतीये का? इकडे ये मग सांगतो"
मी दोन मिंटं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि परत घरी आलो.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा, जमलंय! माझाही WWF-प्रेक्षकांशी असाच दुरून संबंध आला होता, त्यामुळे अधिकच आवडलं. (त्यातले काही जण वयाच्या तिशीतही WWF फॉलो करतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile लहान मुलाच्या दृष्टीकोनातून छान रंगवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. अगम्य काही बोलणार्‍या लोकांची गोष्ट 'नाॅस्टॅल्जिल' वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण डब्ल्यू डब्ल्यू एफ चे नाव डब्ल्यू डब्ल्यू ई झाले आहे, ते माहित आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडल्या गेले आहे. शाळेतले दिवस आठवले. आम्ही तेव्हा डब्ल्यू डब्ल्यू एफमधल्या पैलवानांचे स्टिकर/पोस्टकार्डं/ट्रंपकार्डं वगैरे जमवायचो. मग त्यातही एक्स्चेंज प्रोग्रॅम वगैरे चालायचे. मग कुठलं स्टिकर/पोस्टकार्ड दुर्मिळ आहे याबाबत चर्चा आणि ते असणार्‍या मुलाच्या 'एकदा तरी पोस्टकार्ड पाहू दे ना...' म्हणून केलेल्या मिनतवार्‍या आणि मग त्या मुलांचा शिष्टपणा हे सगळं आठवलं... मज्जा असायची राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लॉल Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतल्या दादाने सांगितलं म्हणजे ते ब्रह्मवाक्य.

फार फोफावलीय मानसिकता ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१९७०-१९८० दरम्यान भारतात दारासिंग या पैलवानाने अश्या कुस्त्या भारतात सुरु केल्या होत्या. त्यात दारासिंग हा विश्व चेम्पियन असायचा. काही काळ या कुस्त्या भारतात चालल्या. नंतर त्यांना प्रेक्षक मिळेनासे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेडीज़ & जंटलमन, द फॉलोविंग मॅच इज़ शेड्यूल्ड फॉर वन फॉल! इंट्रोड्यूसिंग फर्स्ट, वेइंग अ टू हंड्रेड & सेव्हंटी फाईव्ह पाउंड्स, फ्रॉम नॉर्थ कॅरोलायना, शॉऽन मायकल्स!

& हिज़ अपोनंट- वेइंग अ थ्री हंड्रेड पाउंड, फ्रॉम डेथ व्हॅली, द फीनाम. दीईईई अंडऽर्टेऽकर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

आ॓णि मग चर्चची घंटा वाजणार. टांग्ग्ग्ग्ग!!!!!!!!!!! आणि प्रचंड गूढ म्युझिकमध्ये तो अंडरटेकर अवतरणार. त्याची गोष्टच वेगळी.

जेरी द किंग लॉलर आणि जिम रॉस ऊर्फ जे आर हे आपल्या अतिशय एक्सायटेड आवाजात कमेंट्री सुरू करणार आणि आम्ही त्याचे भक्तिभावाने श्रवण करणार. १९९२-९३ पासून ते २००५ पर्यंत लै म्हणजे लैच पाहिले डब्ल्यू डब्ल्यू एफ. त्यानंतर त्याचे डब्ल्यू डब्ल्यू ई झाले तेव्हा तितका राम नाही राहिला.

वर वर्णन केलेल्या अवस्थेत आम्ही कायम असायचो. ७ वेळा मरून जिवंत झालेला तो अंडरटेकर, टकल्या आणि सगळ्या जन्तेला स्टनर देणारा तो खळ्ळ फट्याक वाला स्टोन कोल्ड, आणि पीपल्स चॅम्प वाला भुवई उडवक चँपियन द रॉक हे आमचे सर्वोच्च फेव्हरीट्स. तदुपरि ब्रिटिश बुलडॉग, योकोझुना, ट्रिपल एच, हल्क होगन, रिक फ्लेअर, रिकिशी, गॉडफादर, रेझर रेमॉन, सैको सिड, मिस्टर पर्फेक्ट, केन शेमरॉक, ओवेन हार्ट, एडी गरेरो आणि चावो गरेरो, वायटूके क्रिस जेरिको, अंडरटेकरचा सावत्र भाऊ केन, पॉल वाईट अर्थात नंतरचा बिग शो, टायगर अली सिंग (हा लै कै टिकला नाही), मग सध्याचा ग्रेट खली, मार्क हेन्री, ए- ट्रेन, व्हिसेरा, हल्क होगन, अँड्रे द जायंट, रे मिस्टिरिओ, मिक फोली ऊर्फ मॅनकाईंड, गोल्डस्ट, गोल्डबर्ग, ब्रॉक लेस्नर, कर्ट अँगल, बम बम बिगेलो, किंग काँग बंडी, शेन व व्हिन्स मॅकमोहन (उच्चारी 'मिकमॅन'), स्टेफनी मिकमॅन व तिचे ट्रिपल एचबरोबरचे लफडे, शेन मिकमॅन आणि केन यांची मारामारी, ट्रिपल एच व त्याची डीप जनरेशन एक्स नामक संघटना, एक्स पॅक, रॉब व्हॅन डॅम, अंडरटेकरची ती मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस, आल्याआल्या कंबर लचकाके इ. 'हेलो लेडीज़' म्हणणारा जांभळ्या चड्डीवाला व्हॅल व्हीनस, मार्व्हलस मार्क मेरो, अल स्नो, जॅक द स्नेक रॉबर्ट्स, जॉन सेना व महिलांमध्ये ट्रिश स्ट्रॅटस, ती 'लाँग लव्हलि लेग्ज़' वाली स्टेसी कीब्लर, मॉली हॉली, लीटा, सेबल, चायना, इ. लोक आठवतात.

सर्वांत आवडणारी अन अतिशय खुन्नसवाली लढत म्हणजे रॉक व स्टोन कोल्डची. काही केल्या निर्णय लागायचाच नाही. कायम स्टोन कोल्डच जिंकायचा, त्याचं ते ऑस्टिन ३:१६, फॉक फिअर & ड्रिंक बीअर हे ब्रीदवाक्य आणि अ‍ॅटिट्यूड याचे जबरदस्त फॅन होतो. मग एकदा रॉकने स्पेशल दिमाग लावून स्टोन कोल्डला त्याचाच स्टनर दिला (आणि ऑस्टिननेही त्याअगोदर रॉकलाच त्याचा तो रॉक बॉटम दिला) तेव्हा तो जिंकला. त्याखालोखाल किंग ऑफ द रिंग, रेसलमेनिया, रॉयल रंबल, इ. इव्हेंट आवडायचे. हेल इन अ सेल, हार्डकोअर चँपियनशिप हेही खास बघण्यासारखे. रेफ्री अगोदर अनाउन्स कराय्चा- 'नो होल्ड्स बार्ड मॅच' आहे म्हणून. मग हाती लागेल त्याने बदडाबदडी सुरू! रिंग सोडून इतरत्रच फाईट चालायची. अशातच एकदा ब्रॉक लेस्नर व बिग शोची लढत सुरू असताना ब्रॉकने बिग शो ला जो सुप्लॅक्स दिला त्यात अख्खे रिंग खचून गेले. अंडरटेकरने मिक फोली ऊर्फ सॉको फेम मॅनकाईंडला त्या स्टील केजवरून खालती फेकले आणि बिचार्‍याची करिअर बरबाद झाली. ओवेन हार्ट, एडी गरेरो हे बिचारे हार्ट अ‍ॅटॅकने गेले तर क्रिपलर क्रॉस फेस वाला क्रिस बेनवा याने कुटुंबीयांची हत्या करून मग पुढे आत्महत्याही केली. तेव्हा लय वाईट इ. वाटलेलं.

ट्रंप कार्ड घेऊनही लय खेळायचो. तो क्रम अजूनही लक्षात आहे- वरून खाली: फाईट्स फॉट, रँक, चेस्ट, बायसेप्स, हाईट अन मग वेट. प्रत्येक कॅटॅगिरीतला भारी पत्ता अगोदरच हेरून ठेवायचा अन क्लॅश झाल्यावर तो वापरायचा इ.इ. लै मज्जा. भावाने एकदा जबरदस्ती करून ब्रेट हार्ट हिटमॅनचा रँक १ वाला पत्ता जबरदस्तीने काढून घेतल्यावर तो फाटल्यानंतर झालेले भांडण अजूनही आठवतेय. ROFL

चोकस्लॅम, सुप्लॅक्स, क्लोजलाईन, टोम्बस्टोन पाईल ड्रायव्हर, लो ब्लो, स्टनर, रॉक बॉटम, पॅडिग्री (ही ट्रिपल एचची सिग्नेचर मूव्ह होती), इ. अनेक टॅक्टिकल शब्दही तिथेच ऐकावयास मिळाले.

पुढे पुढे हे सगळे खोटे असते असे कळाल्यावरही रस तितका गेला नाही. आता नवीन पैलवानांच्या लढती फॉलो करत नाही, पण यूट्यूबवरती स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन, द रॉक आणि अंडरटेकर यांच्या जुन्या क्लिपा असतील तर अजूनही अधून मधून बघत असतो. परवा घरी गेलो असता 'श्रीसमर्थांच्या गोष्टी' नावाचे पुस्तक सापडले. त्याच्या मुखपृष्ठावर तेव्हा कोणे एके काळी बालवयात अंडरटेकर (आमचा उच्चार 'अमदाडेकर')चे स्टिकर लावलेले होते ते तसेच होते. लय जुन्या आठवणी....पुढे अकरावीत गेल्यावर स्पोकन इंग्लिश कळण्यास पहिला आधार या कमेंट्रीचा झाला हे बाकी कबूल केलेच पाहिजे.

अजूनही या तिघांपैकी कुणालाही जमल्यास प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. होपलेस फॅन म्हणा हवे तर. पण आहे बॉ. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाल्या असता तर म्हणाला असता .. "बस कर पगले.. अब रुलाएगा क्या?" Smile
पण ह्यातल्या बर्याच संज्ञा कानावरून गेल्या आहेत. शंका - रॉक, स्टोनकोल्ड, ट्रिपल एच हे लोक दुसर्या जनरेशनचे म्हणावेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

अम्म हो कदाचित. म्हणजे १९९५ च्या अगोदर रॉक आणि ट्रिपल एच हे बहुधा नसावेत इंडष्ट्रीत. ऑस्टिनही त्यानंतरच फॉर्मात आला. पैली जनरेशन म्हणजे योकोझुना, अंडरटेकर, हल्क होगन, ब्रिटिश बुलडॉग, ब्रेट हार्ट हिटमॅन, रेझर रेमॉन, जॅक द स्नेक रॉबर्ट्स, इ. साधारण १९८५-९५. १९९५ ते २०००-१ पर्यंतचा काळ लै चार्ज्ड होता. त्याला अ‍ॅटिट्यूड एरा असंही म्हटलं जातं. तर्‍हेतर्‍हेची रोचक स्क्रिप्टे या काळात लिहिली गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यावरुन आठवलेलं तेव्हाचं एक लिमरिक (प्रतिशब्द?):

....(आधीच्या ओळी लक्षात नाहीत)
अंडरटेकर, हॉटेलचा वेटर
योकोझुना, खातो चूना
हिटमॅन बोला, चल मेरी लूना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला लिमरिक म्हणत नाहीत.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आद्य रिअ‍ॅलिटी शोजचा बाप! असं वर्णन याचं करता यावं
लहानपणी खुळावलो होतो या प्रकारने! पोस्टकार्ड, त्याचं बार्गेन आणि बार्टर, स्टिकर्स, इतर अ‍ॅक्सेसररीज, ट्रम कार्ड नाहि म्हणजे काही सोडलं नाही.

पोस्टकार्डासाठी शनिवारच्या वडापावला दिलेल्या पैशांपैकी काही साठवल्याने, त्या बलदंडांच्या आकर्षणापायी आमच्या वजनात होणारी संभाव्य घट (शनिवारी डबा नखाण्याने होणारी) आम्हाला मंजूर होती Wink

छान लिहिलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!