मेथड अ‍ॅक्ट - ४

मूळ कथा: Method Act, Splix
स्रोत: शरलॉक, बीबीसी
०१|०२|०३|०४|०५|०६|०७|०८|०९|१०|११|१२|१३|१४|१५|१६|१७|१८|१९|२०

गोष्ट आणि वास्तव यांच्यातली देवाणघेवाण, त्यांतल्या गंमती, गुंते, गोची रंगवणारी ही महत्त्वाकांक्षी गोष्ट मला अतिशय आवडते. भाषांतरातल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय मूळ लेखकाचं, चुकांच अपश्रेय माझं. दरेक प्रकरणाचं भाषांतर करायला निदान महिनाभर लागेल, याची कबुली आधीच देऊन ठेवते.
***
फ्रिक आणि फ्रॅन्क या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की एकाच व्यक्तीने घेतलेली दोन वेगवेगळी रूपे होती हे सांगता येणे अवघड आहे. काही जणांच्या मते त्या दोन निरनिराळ्या व्यक्ती होत्या हे निश्चित. एकाच वेळी त्या दोघांना निरनिराळ्या ठिकाणी पाहिल्याचे अनेक जण सांगत. पण त्यांच्या दिसण्यात लोकविलक्षण साम्य होते, हेही खरेच. काही जणांच्या मते हा जाणूनबुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार होता. वेष पालटून, केसांचा टोप लावून फ्रॅकचे रूप घेणार्‍या फ्रिकला त्यांनी पाहिलेही होते म्हणे. काय असायचे ते असो. जाणवत राहावे, पण बोट ठेवून सांगता येऊ नये असे काहीतरी विलक्षण साम्य फ्रिक आणि फ्रॅक यांच्यात होते, तसे ढळढळीत फरकही होते इतकेच मी ठामपणे सांगू शकेन.
- ऍन्थनी एव्हरेट, अगेन्स्ट फिक्शनल रिअलिझम

***

मागील भाग

प्रकरण चौथे

टॉमच्या हातात तीन स्क्रिप्ट्स, एक शर्टाचा खोका नि खचाखच भरलेली एक ’वॉटरस्टोन्स’ची पिशवी इतकं सगळं असूनही फोनवर टाईप करण्याचा त्याचा वेग जराही कमी झालेला नव्हता.

Hey-ho, hey nonny nonny, see you tonight? Am I at yours or are you at mine?

“टॉम. टॉम!”

थांबून त्यानं हॅमिल्टन हॉटेलच्या गुबगुबीत रिसेप्शनिस्टला स्माइल दिलं. “येस डार्लिंग! आज इतक्या उशिरा?”

“तुझीच कामं करतेय.” हातातला पत्रांचा गठ्ठा नाचवत लेशा ठसक्यात उत्तरली. “नि अजून आहेत असली. ती ठेवू का इथेच? तुला एकदम सगळं नेता नाही येणार.”

“अं, चालेल. ओझं आहे हातात. एखाद्या खोक्यात घालून ठेवशील?”

“चालेल की. घरी सोडायचंय तुला?”

“हो, स्टॅन आणतोय गाडी.” हातातल्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोरच्या कट्ट्यावर ठेवून टॉमनं पत्रांचा गठ्ठा हातात घेतला. पत्रं उघडून, आकारानुसार नीट लावून ठेवलेली होती. “तू बघितलीस का, मी म्हणालो होतो तशी आहेत?”

“हो. थोडी आहेत, पण तू म्हणाला होतास तशीच आहेत.”

“थॅंक्स लेशा! बाकी दिसत्येस मस्त आज तू.” बोलत बोलत त्यानं पत्रांचा गठ्ठा दोन स्क्रिप्ट्सच्या मधे घातला. “डेट वाटतं?”

“ह्हो!” मोरचुदी स्कर्टची प्लेट नीट करत लेशिया हसत उत्तरली. “तुला पिशवी हव्ये का अजून एखादी? पाडणारेस तू काहीतरी.”

“कित्ती चांगली आहेस गं तू! पण नको पिशवीबिशवी. गाडीत टाकतो सगळं. तेवढं जमेल बरं का मला! बाय.” असं म्हणत सगळं सामान गोळा करून तो मागच्या दाराकडे वळला.

“टॉम! टॉम!”

चाहते. फार गर्दी नव्हती. सहा? सात फार तर. टॉमनं एक गोड हसू चेहर्‍यावर आणलं. “मी आलोच हे गाडीत ठेवून. ओके? एकच मिनिट.” चार मुली. एक मुलगा. एक वयस्कर जोडपं. त्यांनी हसून टॉमला जाऊ दिलं.

निळी सेदॅन. स्टॅन गॉडविननं घाईघाईनं ब्रेक दाबत बाहेर येऊन टॉमच्या हातातलं सामान घेतलं. “द्या ते इकडे, मिस्टर हिडल्सन.” कंपनीच्या क्लाएण्ट्सना नावानं हाक मारणं स्टॅनला अगदी पटत नसे. टॉमला ते जरा परक्यासारखं वाटे. पण स्टॅनच्या एकूण अदबशीर व्यक्तिमत्त्वाला ते साजून दिसे. स्टॅनच्या गाडीतला पाहुणा आपलं सामान आपणच वाहून नेताना दिसला, तर तोही स्टॅनला स्वत:चाच अपमान वाटायचा. तो लग्गेच घाईनं पुढे होऊन हातातलं सामान काढून घेई. त्याच्या वागण्यातली अदब बघून टॉमला जरा कानकोंड्यासारखंच होई. त्या मानानं आपणच जरा गबाळ्यासारखे कपडे घालतो की काय, अशीही शंका त्याला होती. स्टॅनला तेही खटकत असणार…

“थॅंक यू, स्टॅन. घे, आलोच मी.” असं म्हणत टॉम त्याच्या चाहत्यांकडे वळला. लोकांचे कॅमेरे नि पेनं तयारच होती. शांत हसू चेहर्‍यावर राखून त्यानं लोकांना हवे तितके फोटो काढू दिले. स्वाक्षर्‍या दिल्या. प्रश्नांची शक्य तितक्या शांतपणे उत्तरं दिली. लोकांनी दिलेली दाद नम्र हसून स्वीकारली.

“’थॉर’मधे किती मस्त काम केलंय तुम्ही!”

“तुमचं ट्विटर अकाउण्ट आहे का हो?”

“’वॉर हॉर्स’ कधी येणार हो? मी ते अगदी लहानपणी वाचलंय.”

“आम्ही तुझं ’ऑथेल्लो’मधलं काम पाहिलंय. पण बर्टी म्हणतो ’वॉलॅण्डर’मधे…”

“कधी एकदा ’ऍव्हेंजर्स’ बघतोसं झालंय. कधी येणार?”

“कॅप्टन निकोलसला किती सीन्स आहेत पडद्यावर? पुस्तकात खूप आहेत ना? सगळे कसे बसवणार सिनेमात?”

टॉमला मजा येत होती. त्यानं रंगवलेल्या ’लॉकी’चं गेल्या महिन्याभरात खूप कौतुक चाललं होतं. चाहते किती प्रेमानं वागतात… हे असंच चालत राहिलं, तर कौतुकाचं होईलही अजीर्ण. पण आत्ता तर बॉ मजा येतेय.

त्यातल्या एका मुलीनं त्याच्यासमोर एक डबा धरला. “मी तुमच्यासाठी चॉकलेट्स केल्येत…”

“ओह, सो स्वीट! थॅंक्स अ लॉट.” त्यानं एक चॉकलेट काढून तोंडात टाकलं. अहाहा! “मस्स्त झालीयेत.”

“फ्लोअर्‌ द सेल्‌ कारामेल्स…” मुलगी लाजत लाजत कसंबसं म्हणाली.

“वॉव. मस्स्तच. दुकान टाक तू. मी पहिला येईन खायला. बाकीच्यांना देऊ या का आपण?” त्यानं चॉकलेटं बाकीच्यांनाही देऊ केली नि तिला परत एक गोड ’थॅंक्स’ म्हणत हळूहळू गाडीच्या दिशेनं निघायला सुरुवात केली. “येऊ मी आता? उशीर होतोय.”

गाडीत शिरत त्यानं दार लावून घेतलं नि एक मोठ्ठा सुस्कारा सोडला. “हुह!”

“लोकांचा त्रास झाला, तर मला सांगत चला मिस्टर हिडल्सन. मी कशाला आहे?”

“नाही रे, इतकं काही नाही.” बोलता बोलता टॉमचं लक्ष हातातल्या चॉकलेटांकडेच होतं.

खाऊ का अजून एक? पाणी हवं पण. इतकं गोड खाऊन तहान लागते. खातोच… मरू दे.

त्यानं आणिक एक चॉकलेट तोंडात टाकलं.

आहाहा… सुरेख.

“घरीच जायचं ना, सर?”

“घरी जायचंय. पण तिकडून लगेच हॅम्पस्टडला. चालेल ना? नाहीतर असं करू…”

“चालेल, मिस्टर हिडल्सन. माझं कामच आहे ते.”

“’टॉम’ म्हणत जा रे, स्टॅन. प्लीज. कितींदा सांगायचं?”

स्टॅनशी त्याची आरशात नजरानजर झाली नि त्याचा अवघडलेपणा दिसून टॉमनं परत जीभ चावली.

“बरं, तुला हवं तसं. चॉकलेट खाणार का एक? मस्त आहे.”

“नको सर, थॅंक्स. अं… नाहीतर एक घेतो.”

“आता कसं!” आता टॉम आरामात सैलावून बसला. डबा बाजूला ठेवत त्यानं पत्रांचा गठ्ठा हातात घेतला. दोनेक डझन पत्रं असतील. सगळे लिफाफे. नीट उघडून, तपासून ठेवलेले. कोण काय पाठवेल नेम नसतो हल्ली. अस्वस्थ होऊन त्यानं ती पत्रं चाळून पाहिली. तो शोधत होता ते पत्र त्याला मिळेना. त्या पत्रात बोट ठेवण्यासारखं काही नसे. भाषाबिषा अगदी औपचारिक. पण वाचताना मनात कसलीशी अनामिक भीती दाटून येई. मानेवरचे केस उभे राहत. त्या चळतीत त्याला त्या प्रकारचं पत्र सापडेना. हस्ताक्षरातली पत्रं, टाईपरायटरवर लिहिलेली पत्रं, कॅलिग्राफी करून सजवलेली पत्रं, काळ्या शाईतली पत्रं, गुलाबी कागदावरची पत्रं, हृदयाचे स्टिकर्स डकवलेली पत्रं, त्याच्या फोटोंवर लिहिलेली पत्रं, ’लॉकी’ची रेखाटनं…. तेवढ्यात त्याला ते पत्र दिसलं.

पांढराशुभ्र लिफाफा आणि त्यावर एजन्सीचा पत्ता. पाठवणार्‍याचा पत्ता नाही.

उघडण्यापूर्वी त्याच्या छातीत धडधडायला लागलं. पण धीर करून त्यानं पाकीट उघडलं.\

*********************************

हाय टॉम,

गेल्या पत्रानंतर लिहायला उशीरच झाला. तू वाट पाहिली असशील, ना?
मी काल इंटरनेटवर तुझी एक मुलाखत वाचली.

किती खोटारडा आहेस तू!

खोटारडा.

खोटारडा.

खोटारडा.

मला खोटारडी माणसं अजिबात आवडत नाही. मी त्यांचं काय करतो ठाऊक आहे? मी-

*********************************

टॉमनं घाईघाईनं पत्राची घडी घालून ते परत लिफाफ्यात घुसडलं. मगाशी हौसेनं खाल्लेली चॉकलेट्स घशाशी आल्यासारखी वाटून त्याला कसंतरीच व्हायला लागलं.

असले चक्रम लोक असायचेच. ’सायलेन्स ऑफ दी लॅम्ब्स’नंतर ऍन्थनी हॉपकिन्सलाही असली चक्रम पत्रं येत म्हणे. त्याच्याकडूनच ऐकले होते की किस्से. पण ही पत्रं… यांचा कुठल्याच भूमिकेशी काही संबंध नसावा. लॉकी, मॅग्नस… चक्‌. हे पाचवं पत्र.

पत्रांत त्याच्या भूमिकांचा काहीच उल्लेख नसे. एखाद्या मित्रानं लिहावीत तशा सुरातली ती पत्रं असायची.

टॉमनं मोबाईल काढून पाहिला. उत्तर नाही. नवीन मेसेज खरडला.

Thought you were done shooting? Call or text. I'm as free as a bird.

फोन खिशात टाकून त्यानं परत पत्राकडे लक्ष वळवलं.

पहिलं पत्र वाचून टॉमची चांगलीच फाटली होती. पण ’असतात असे विचित्र लोक...’ असं म्हणून त्यानं त्या पत्राला केराची टोपली दाखवली होती. दुसरं पत्रही फारसा विचार न करता फेकलं. पण तिसरं पत्र आल्यावर मात्र… त्याच्याही नकळत त्यानं ते जपून ठेवलं. मग चौथंही आलं. आणि आता हे पाचवं. दिवसेंदिवस धमक्या गंभीर होत चालल्या होत्या. तरी टॉम अजून ल्यूकला त्याबद्दल काही बोलला नव्हता. एजन्सीतही त्यानं कुणाला काही सांगितलं नव्हतं. पोलिसांचा तर प्रश्नच नव्हता.

आता पोलिसांना सांगावं की काय?

हं. उद्या.

पोलिसात जायच्या विचारानं त्याला जरा शांत वाटलं. मग बिनदिक्कत आणखी एक चॉकलेट तोंडात टाकून टॉम मागे रेलला. तर काय?! एका चॉकलेटानं काय होतंय?

***

काळी लॅण्ड रोऽवर दाराशी येईस्तोवर हॉस्पिटलातले लोक शरलॉकला व्हीलचेअरवरून उठूच देईनात. “झालंच आता. येईलच…” असं म्हणत कुणीतरी त्याचा खांदाही थोपटला चक्क.

हाताला सॅलड क्रीमचा वास येतोय… गचाळ लोक.

हात झटकून न टाकायला शरलॉकला विशेष कष्ट पडले.

इतक्यात गाडी आली नि आतून भुर्‍या केसांची बाई डोकावली. “झालं सगळं?”

“गॉड!” क्षणाचाही अवधी जाऊ न देता शरलॉकनं खुर्चीतून जवळजवळ उडी मारली. गाडीत घुसून मागच्या सीटवर बसून मागे रेलत त्यानं डोळे मिटून घेतलेसुद्धा.

“किती घाबरवलंस रे! बरा आहेस का आता?”

एक डोळा किलकिला करून शरलॉकनं आवाजाच्या स्रोताकडे रोखून बघितलं नि काही अद्वातद्वा बोलायचा विचार रहित केला. त्याऐवजी एक लांबलचक सुस्कारा सोडून तो गप्प बसला.

या बाईला बडबडायचंच असेल, तर निदान ऍक्सिडेंट सोडून इतर कशावर तरी बडबड म्हणावं. मी जरा विचार करीन म्हणतो. तसंही तिच्या बडबडण्यातून हाती काही कामाचं लागायची शक्यता जवळजवळ शून्यच आहे…

“असो. बरा आहेस ना? मग झालं तर.”

“ते झालंच. शिवाय इन्शुरन्सची भानगडही वाचली.” शरलॉक कुठला गप्प बसायला?

“काय?” बाई जवळजवळ किंचाळल्या.

काय बरं बाईंचं नाव? वेर्ते. मिस वेर्ते.

बाई रागानं तांबड्याबुंद झाल्याचं गाडीतल्या अंधुक प्रकाशातही दिसत होतं. “इन्शुरन्सचा काय संबंध? प्लीज बेनेडिक्ट! तुझ्याहून पैसा जास्त झालाय का आम्हांला? असं काय बोलतोस?”

“असाच एक अंदाज.”

तुमच्या फोनवर टेक्स्ट दिसतंय अहो. वकिलाशीच बोलत होतात ना इन्शुरन्सबद्दल?

“बरोबर आहे ना पण?” शरलॉकनं सूर थोडा मवाळ केला. विकिपिडिया सोडून फार काही वाचायला मिळालं नव्हतं त्याला बेनेडिक्ट कंबरबॅचबद्दल. पण -

मगाशी भेटून अद्वातद्वा बडबड करत होता खरा तो. पण तो काही त्याचा नेहमीचा सूर नसावा. घाबरल्यावर लोक वागतात असे उद्धटासारखे… एरवी बेनेडिक्ट बराच मवाळ, गोग्गोड वागणारा असावा. मूर्ख म्हणावा इतका. त्याचा सूर पकडता आला पाहिजे. बाईंना संशय येेता कामा नये.

“काळजी करण्यासारख्याच रकमा असतात त्या, हो की नाही?”

“हो, पण ते तुझ्याहून महत्त्वाचं नाही, कळलं? आरामात बस बरं. हॉटेलवर जाऊ या.”

हॉटेल कुठून आलं मधेच? शरलॉक तटकन उठून बसला.

“हॉटेल?”

“हो, तिथे झोप होईल ना रे शांत...”

“छे छे! मला आधी सेटवर जावं लागेल. तुम्ही सेटवर चला हो.” शरलॉक ड्रायव्हरला सांगून मोकळा झालाही.

“अजिबात नाही.” वेर्तेबाईंनी ठणकावून सांगितलं. “शांत हो बरं बेन. आधीच संध्याकाळपासून एकेक भलभलतंच चाललंय. तू आधी काहीतरी खा. थोडी वाईन घे. आराम कर. झोप काढ. मग बघू.”

माय गॉड! तो कंबरबॅच इतका बावळट झाला आहे तो उगाच नव्हे. हे लोक असेच लाड करत असणार त्याचे बारा महिने चोवीस तास. काय देव्हारे माजवतात लोक नटांचे….

“मला आत्ताच्या आत्ता सेटवर जायचं आहे.” शरलॉक ऐकायला बसलाय.

शरलॉकला लवकरात लवकर परतायचं होतं. बेनेडिक्ट कंबरबॅचचं सोंग काढणं मोठं कठीण होतं असं नव्हे. या कानाचा त्या कानाला पत्ता लागला नसता, असं सोंग शरलॉकनं काढलं होतं. पण आता त्याला वैताग यायला लागला होता. शिवाय जॉन काही बोळ्यानं दूध पिणार्‍यांतला नव्हे. ही अदलाबदल - अदलाबदल झाली असेल तर - त्याच्या लक्षात यायला फार वेळ लागला नसता.

“मी विसरून आलो आहे सेटवर काहीतरी.”

“तुझं सगळं सामान गोळा करून आणलं मी. ते बघ.” एक मोठीशी पिशवी दाखवत वेर्तेबाई तत्परतेनं म्हणाल्या. “नि हा तुझा फोन.” पर्समधून फोन काढून त्यांनी शरलॉकच्या हवाली केला.

लूई विट्‌हान. बॉटल ग्रीन एपीचं लेदर. नशीब, मोनोग्राम्ड पीस नव्हता. काय एकेक भिकार फॅशन्स येतात!

शरलॉकनं आधी फोन ताब्यात घेतला. “हे बघा-” अशी सुरुवात करून तो बाईंना झापणार, इतक्यात त्याला जॉनच्या शांत सुरातले शब्द आठवले.

शरलॉक, शांत हो.

शट अप, जॉन.

पण मजा म्हणजे जॉनच्या नुसत्या आठवणीनंही त्याचं डोकं थोडं ठिकाणावर आलं. पण मग त्याला कंबरबॅचकडे रोखून बघणारा नि संशय आलेला जॉन डोळ्यासमोर दिसायला लागला नि परत अस्वस्थ वाटायला लागलं. शेवटी तो बाईंना म्हणाला, “हे बघा, त्रास होईल तुम्हांला थोडा. पण मला सेटवर जावं लागेल. फक्त १० मिनिटांचं काम आहे.”

“आता कसं जाणार राजा? सेट बंद केलाय. इलेक्ट्रिक सर्किटची तपासणी करायला इन्स्पेक्टर्स यायचेत उद्या. नशीब, आपलं काम झालंय बर्‍यापैकी. नाहीतर आपण उगाच लटकलो असतो. ते तपासण्या करून परत काम करू देईपर्यंत मधे वेळ जाईल ना? काय करणार?”

डॅम इट, डॅम इट!

घुसता येईल म्हणा चोरून… पण-

शरलॉक विचारात पडला.

हा घोटाळा शॉक बसल्यामुळे झाला, असं गृहित धरलं तरी परत अदलाबदल व्हायला हवी असेल तर तशीच्या तशी परिस्थिती निर्माण करायला हवी. नि तरी अदलाबदल होईल, याची खातरी नाहीच. तेव्हाच तिकडे कंबरबॅचला शॉक बसला, तरच ते जमेल. ते कसं जमायचं? … शिट! तो तिकडे लंडनभर सिगारेटी फुंकत फिरत असेल माझ्या इमेजची वाट लावत.

कसली इमेज नि कसलं काय. उरली तरी असेल का एव्हाना?

तसं कंबरबॅचबद्दल जे वाचलंय त्यावरून अगदीच मठ्ठ वाटत नाही म्हणा तो. थोडी खुजली आहे त्याच्या अंगात. हातही अगदीच बायकी नव्हते त्याचे. रॉक क्लाइंबिंगसारखा काहीतरी निरुपयोगी आचरटपणा नक्की करत असणार तो. त्याच्या हाताला घट्टे पडलेले होते. तसा लठ्ठही दिसला नाही. शरीर चांगलं राखलेलं आहे. शिवाय अगदीच रिकाम्या डोक्याचा नसावा. थोऽडी अक्कल असेल असं वाटलं. हां, आपल्याला बघितल्यावर अगदीच तोल सुटल्यासारखा बडबडत होता. भूत पाहिल्यासारखा. पण-

हे शॉक बसून अदलाबदल होण्याचं प्रकरण मात्र गंमतीदार दिसतंय. बर्‍याच अंधश्रद्धांच्या व्याख्या विज्ञानालाही बदलाव्या लागतील अशानं.

शरलॉकचं डोकं वेगानं चालत होतं. ’स्यूडो-सुपरनॅचरल’ अशा लेबलाखाली काही न सुटलेल्या केसेस्‌ त्याच्या माइंड पॅलेसमध्ये पडून होत्या. जॉनच्या लॅपटॉपवर तर न सुटलेल्या केसेस्‌ची एक फाइलच होती. शरलॉक विचारात पडला.

त्या सोडवता येतील या नव्या माहितीच्या मदतीनं...

शिट! जॉन. जॉनच्या लक्षात आला असेल का घोटाळा? काय करेल तो लक्षात आल्यावर?

अगदी प्रामाणिकपणे कबूल करायचं, तर जॉनच्या लक्षात लगेच येईल असं नव्हे. मंद नाही तो. पण निरीक्षण हे काही जॉनचं बलस्थान नव्हे… शिवाय आपण त्याला दर वेळी निरीक्षणं नि तर्कशास्त्र उकलून दाखवतोच असं नाही. मनाला आलं, सोईचं असलं, सांगितलं. एरवी उत्तर सांगून दिलं सोडून.

थोडक्यात सेटवर जाऊन हाती फार काही लागण्यातलं नव्हतं. ’जर...तर’चा मामला होता. आत्ता कंबरबॅच काय करत असेल, तेही कळायला मार्ग नव्हता.

अर्थात, म्हणून काय शरलॉक कार्डिफमधल्या हॉटेलात झोपा काढणार होता थोडाच?

कंबरबॅचचा दिनक्रम बघायला हवा. अजून काहीतरी माहिती मिळते का बघायला हवं. काहीतरी तर करायला हवंच.

“ट्रेन स्टेशन.” शरलॉक एकदम साक्षात्कार झाल्यासारखं म्हणाला.

“स्टेशन? स्टेशनचं काय?” वेर्तेबाई चमकून म्हणाल्या.

“माझं सामान आणलंत म्हणालात ना तुम्ही? द्या. मी घरी जातो.” ट्रेननं जाता येतं का कंबरबॅचच्या घरी? लॉस ऍंजेलिससारख्या हायफाय ठिकाणी राहत नसला बाळ्या म्हणजे मिळवलं.

“अरे! पण शेवटची ट्रेन सुटेल १५ मिनिटांत. त्यापेक्षा तू आराम कर की-”

ओके, म्हणजे लंडनपासून फार लांब नसावं.

“चक. शक्य नाही. मला घरी गेल्याशिवाय झोप लागणार नाही हो...” आवाजात थोडी काकुळती आणत शरलॉक म्हणाला.

माहिती मिळवल्याशिवाय कसं होणार? डेटा हवा. डेटा हवा.

मग त्यानं थोडं कसनुसं हसूनही दाखवलं. डोळ्यांखाली चिरम्या पाडणारं हसू.

घ्या म्हणावं. गोऽग्गोऽड. बास?

वेर्तेबाईंना ते पटेना. “पण उशीर बघ ना किती झालाय…”

“प्लीज?” शरलॉकनं वेर्तेबाईंचा हात हातात घेऊन गयावया करत म्हटलं.

काय काय करावं लागेल माणसाला….

“ओके. रीस, कार्डिफ सेंट्रलला घे.” सुस्कारत वेर्ते बाई म्हणाल्या. पण त्यांचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. “पण जाशील का एकटा नीट? की पाठवू कुणाला तरी सोबत?”

आता सोबत कुणाला पाठवताय? कुकुलं बाळ आहे का मी? दुदू पाजायला नि ढुंगण धुवायला? मंद बाई.

“छे छे! नीट जाईन मी. अऽगदी काळजी नका करू.” उघडपणे शरलॉक.

बाईंनी बॅग शरलॉकच्या ताब्यात दिली. “त्यातचं तुझं पाकीट आहे. रिटर्न तिकीट असेल ना तुझं?”

शरलॉकनं आधी पाकीट उचलून खिशात टाकलं. मग त्याच्या लक्षात आलं, मेकपही काढलेला नव्हता. नि अंगावर कपडेही सेटवरचेच होते.

मरो. आता ते करत बसलं तर गाडी जाईल.

मग आरामात मागे रेलत त्यानं कंबरबॅचचा फोन तपासायला घेतला. मेसेजेसना पासवर्ड नाही? किती मूर्ख असावं माणसानं? मंद लेकाचा.

C U next weekend for punishingly unhealthy food. James

येतोय, वाट बघ!

Emily had pertinent books couriered to your house. Read at leisure, but not too much leisure. P

जमणार नाही.

M&M and Neal's delivered. CHEESE PONGS OMG. Em

परमेश्वरा...

Berry Bros & Rudd also dl'vd. Did you want them to save you another Ch. Lynch Bages Pauillac they want to know. Em

ही नक्की पीए असणार. तिनंच लाडावून ठेवलेला असणार त्याला. बावळट.

Hey-ho, hey nonny nonny, see you tonight? Am I at yours or are you at mine?

आज रात्री? शरलॉकनं तारीख पुन्हा बघितली. हो, आजच की.

Sender: TWH

ओह! टॉम. तो बॉयफ्रेंड...

Thought you were done shooting? Call or text. I'm as free as a bird.

यालाच विचारावं का? गडबड होऊ शकते म्हणा. पण वर्थ इट. बॉयफ्रेंडकडून पक्की माहिती मिळण्याचा संभव जास्त. शरलॉकनं एक मेसेज खरडला.

Heading for CC to London. You're at mine. Wait up for me.

ताबडतोब उत्तर आलंपण.

Yes, sir!

बॉयफ्रेंडला दुसरा काही कामधंदा दिसत नाहीये. फोनवरच बसलेला दिसतोय.

शरलॉकनं बाकीचे मेसेज चाळले. फुटकळ माहिती मिळाली, पण फार महत्त्वाचं काही हाती लागलं नाही.

हं, दमानं घ्यावं लागेल...

***

ते स्टेशनात पोचले तेव्हा गाडी सुटायला जेमतेम काही मिनिटं उरली होती. शरलॉक उतरला. घाईघाईनं बॅग घेतली. वेर्तेबाईंना जेमतेम हात हलवून दाखवला, एक आडव्या केळ्यासारखं रबरी स्माइल दिलं - बाई रोखूनच बघत होत्या - नि पाठ फिरताक्षणी चेहर्‍यावरचं हसू फाटकन मिटून तो फलाटाकडे धावत सुटला. कंबरबॅचच्या पाकिटात त्याला बर्‍याच कामाच्या वस्तू मिळाल्या होत्या.

ड्रायव्हिंग लायसेन्स. नशीब.

एक कार्डिफ-लंडन रिटर्न तिकीट. हं. ठीक.

MBNAचं प्लॅटिनम कार्ड. वा. थोडीफार अक्कल आहे म्हणायची.

बाकीही बराच कचरा होता. पण हॅम्पस्टडचा पत्ता होता.

तिथे बसून बेकर स्ट्रीटला परतायचा विचार शांतपणे करता येईल.

थेट बेकर स्ट्रीटलाच गेलं तर? बघू.

“अरे हरामखोरा! तू इथे कसा?”

आवाज ऐकून शरलॉक अक्षरशः गारठला.

जॉन?

त्यानं गर्रकन वळून पाहिलं. समोर जॉन.

जॉन! कफलेस ट्राउजर्स. अंगासरशी बसणारं ब्लॅकवॉच-टार्टनचं ब्लेझर. नि हे काय? गळ्याभोवती चक्क - चक्क - रेशमी स्कार्फ? काय अवतार आहे, वा!

“जॉ-” शरलॉक बोलता बोलता गपकन थांबला. तोंडातून काही निसटू नये म्हणून त्यानं जोरात जीभ चावली.

हा जॉन कसा असेल? हे असे कपडे? जॉनच्या प्रेताला हे कपडे घातले तरी त्याचं प्रेतही भडकून उठून बसेल. पण तेवढंच नाही. हा माणूस जॉन नक्की नाही. हे ध्यान एखाद्या नटासारखं दिसतंय. जॉनचा तोतया असणार हा.

खांद्यावरची ती झंपक बॅग सावरत तो पुढे आलाच.

नि बॅगवर युनियन जॅक? बावळट लेकाचा.

“तू इथे काय करतो आहेस? सू म्हणाली, तुला हॉटेलवर सोडते, म्हणून. तुला इतक्यात सोडलं बरं त्यांनी? भोसडीच्या, अशी वायर हातात धरतात होय? मरशील की लेका एक दिवस.”

शिव्यांच्या बाबतीत जॉनला हार जायचा नाही हा गडी...

“अरे, चुकून लागला हात. मुद्दाम कसा लावीन?” शरलॉकनं चेहरा शक्य तितका कोरा ठेवायचा पुरेपूर प्रयत्न केला. पण अवघड होतं.

हुबेहूब जॉनचा चेहरा, जॉनचा आवाज. नि हे असले ध्यानचंद कपडे. तोतया साला!

समोरचा माणूस जॉन नाही, हे पटवून घेऊन कोर्‍या चेहर्‍यानं बोलताना शरलॉक कधी नव्हे इतका बावचळून गेला.

जॉनचा तोतया? म्हणजे...

या नव्या कल्पनेनं त्याचं डोकं भलत्याच वेगात चालायला लागलं.

म्हणजे... लेस्ट्राड, मॉली हूपर, मिसेस हडसन… आणि जिम मॉरिआर्टी… देवा! आणि मायक्रॉफ्ट. आणिक काय काय बघायला लागतं आहे कुणास ठाऊक…

“अरे ए! कसल्या तारेत आहेस? बरा आहेस का आता? येतोयस ना?” जॉनसारखा दिसणारा तो माणूस बोलतच होता. “मेकप तसाच आहे. कपडेपण. काय झालंय काय?”

“अं? हो… ट्रेन चुकली असती.” बॅग उचलत शरलॉक पुढे झाला. खरा म्हणजे त्याला गुंगारा देऊन तो नाहीसाच व्हायचा. पण का कुणास ठाऊक, त्याला सोडून त्याचा पाय निघेना.

डेटा. डेटासाठी फक्त.

गाडीत चढून दोघांनी बॅगा वर ठेवल्या. “शिट, कसला दमलोय मी आज! तुझी तर पारच लागलेली दिसतेय.” जॉनचा तोतया.

नाव काय असेल याचं?

“हो… फार झालं आज.”

“काढ की मग एक डुलकी. होईल आरामात…” एवढं म्हणून तोतया आडवा झालासुद्धा.

शरलॉक बघत राहिला. मग त्यानं कंबरबॅचचा फोन बाहेर काढला.

थोडं काम करू या.

बॅगेत सापडलेले कापसाचे बोळे कानात घालून त्यानं नेट चालू केलं.

डेटा, डेटा, डेटा.

---Benedict Cumberbatch, London Theatre Guide, Q&A.

पकाऊ. एका लहान मुलीला स्टेजवरून ढकललं. हं.

---Benedict Cumberbatch, USA Today, modernises Sherlock Holmes.

क्काय?

”कुणी, काय, कधी, का, कसं… असल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात होम्सचं आयुष्य गेलं. मलाही असल्या प्रश्नांशी खेळत बसायला आवडतं. उदाहरणार्थ, एखाद्याचे हात. तुम्ही ते नीट पाहिलेत, तर खरंच त्यातून बरंच काय काय कळतं. एखाद्या बिझनेसमनचा डावा हात घ्यावा नि त्यावर अंगठीच्या खुणा आहेत का ते तपासून बघावं असा मोह मला हल्ली होतो, तो त्यामुळेच. त्याचा हात काळवंडलेला असला नि फक्त अंगठीचा भाग तेवढा गोरा दिसला की डोकं लगेच निरनिराळ्या दिशांनी चालायला लागतं…” कंबरबॅच मुलाखतीत सांगत होता.

गॉश! कंबरबॅचला बरीच अक्कल आहे की!

”बाबांचं टोपणनाव काल्टन असं होतं. कसं विचित्र आहे ना? ओल्या टबात बसून कुणीतरी पादल्यासारखं वाटतं!” इति कंबरबॅच.

अरे वा! विनोदबुद्धीही आहे.

---Benedict Cumberbatch, Sunday Times, The Fabulous Baker Street Boy.

अरे ए! बास की.

अरे वा, गर्लफ्रेंड, अं?

वॉर हॉर्स. हं.

टॉम हिडल्सन. हं. TWH. ओह, म्हणजे सोबतच्या नटासोबत लफडं आहे साहेबांचं. गर्लफ्रेंडबद्दल हवा करून ठेवली ती उगाच नव्हे तर.

साउथ आफ्रिका. हं.

शरलॉक, शरलॉक, शरलॉक…. अरे ए! किती बोलशील माझ्याबद्दल? झपाटलंय का तुला शरलॉकनं? सोड की माझी पाठ.

शरलॉक चकित झाला.

पठ्ठ्यानं खरंच कष्ट घेतलेले दिसतात भूमिकेसाठी. आता हा आर्थर कॉनन डॉयल काय म्हणतो बघू...

तास उलटून गेला, तरी शरलॉक वाचतच होता. डॉयलच्या बर्‍याच गोष्टी त्यानं चाळून काढल्या. तुकड्यातुकड्यानं ओळखीची वाटणारी कथानकं.

अजबच प्रकार. याच जगातला व्हिक्टोरियन पूर्वावतार. तोही गोष्टीतला. गोष्ट. गोष्टीची गोष्ट. गोष्टीतल्या गोष्टीतला नट. चक्रावून टाकणारा गुंता.

शरलॉकनं फोन बाजूला ठेवून समोर झोपलेल्या त्या तोतया जॉनकडे नजर टाकली.

मार्टिन फ्रीमन नाही का याचं नाव? हं.

त्याला शांत झोप लागलेली होती. त्याचा झोपेतला शांत चेहरा बघून शरलॉकला एकदम पोटात तुटल्यासारखं झालं.

जॉन… आपला जॉन काय करत असेल आत्ता? हा कंबरबॅच वाटतो तितका अकलेचा असेल, तर जॉनसमोर सोंग वठवेलही कदाचित तो. फार काळ नाही. पण परत अदलाबदल होईपर्यंत…

कशी करायची अदलाबदल?

तेवढ्यात मार्टिनला जाग आली.

“अरे ए! बेन! दचकवून मारतोस का साल्या? काय बघतो आहेस टक लावून?” मार्टिन खेकसला.

शरलॉकला काही ऐकू आलं नाही. “काय?” कानातला कापूस काढत त्यानं विचारलं.

“काय बघतो आहेस टक लावून?”

“तुझा स्कार्फ.” ’किती बटबटीत आहे ते बघतोय’ हे तोंडावर आलेले शब्द शरलॉकनं कसेबसे गिळले.

“छान आहे ना? ऍमण्डानी दिला क्रिस्मसला. आयलंडला गेलो होतो तेव्हा. ग्रॅफ्टन स्ट्रीटवर बहुतेक.”

“सुरेख आहे.”

देवा! यांचे अश्लील जोडपीय चाळे नि भेटवस्तूंचे तपशील ऐकावे लागणार की काय आता? जॉनला असले गोग्गोड रॉमॅण्टिक चाळे फार आवडतात… अर्थात याचं जॉनसारखं दिसत नाहीय. दोन पोरं झाली, म्हणजे हा एकाच बाईसोबत बरीच वर्षं राहिलेला दिसतोय. तरी नशीब, लग्न नाही केलेलं. थोडी अक्कल आहे म्हणायची. पण दोन लोढणी गळ्यात, लग्न केलं काय नि न केलं काय… एकूण एकच. अर्धवट लेकाचा.

“तू तुझेच फोटो बघतोयस? स्साला नार्सिसिस्ट!”

शरलॉक चमकला. “रिसर्च.” त्यानं सराईतपणे उत्तर फेकून दिलं.

दिसतो तितका बावळट नाही हा. बरोबर लक्ष आहे की सगळीकडे...

“चालू द्या.” मार्टिन खवचटपणे म्हणाला नि परत कुशीवर वळला. “टम्बलरवर जाऊ नकोस मात्र मी उठेस्तोवर. घोळ घालून ठेवशील नाहीतर तिथे परत काहीतरी. निस्तरताना इथे माझी लागेल. उठव मला. मी झोपलो.”

शरलॉक बघत राहिला.

छे! हा अजिबात जॉनसारखा नाही. हे पाणी वेगळंच आहे.

त्या विचारासरशी त्याला एकदम उदास वाटायला लागलं.

काय झालंय काय आपल्याला? आपण तरी कुठे आहोत त्या कंबरबॅचसारखे, तर हा तोतया जॉनसारखा वागेल? छ्या, डोकं जागेवर नाही आज...

पण जॉन काय करत असेल? त्या पात्राला सांभाळायचं म्हणजे….

शरलॉकनं घाईघाईनं कानात परत कापसाचा बोळा खुपसला नि बेनेडिक्ट कंबरबॅचची यू ट्यूबवरची एक मुलाखत ऐकायला सुरुवात केली.

काय दिसतंय येडं… काय त्या मिशा, काय ते गुरगुरत बोलणं... हुह!

***

पुढे आणखी काही घोटाळे न होता ट्रेन लंडनला पोचली नि दोघं टॅक्सीच्या दिशेनं वळले.

“जाताना एकत्र जायचं झालं तर सांग रे. बाय.”

“चालेल.” एकाक्षरी उत्तरं देऊन तोंड बंद ठेवणं शरलॉकला जड जात होतं. पण दिवसभराच्या घडामोडींनी भांबावलेला अवतार राखणंच सर्वाधिक सोईचं, असं म्हणत त्यानं चेहरा शक्य तेवढा बथ्थड राखायची शिकस्त केली.

कंबरबॅच इतका अबोल नाही नक्की. किती बोलतो तो! तोंडाला तार जोडली, तर गावाला वीज पुरवेल. एक वाक्य कामाचं बोलेल तर शपथ. पत्रकारांनी लाडावून ठेवलेली नटाची अवलाद. बोलेल नाही तर काय? काहीही बरळा, छापायला तयार. बोला गोलगोलगोलगोल…

होती तितकी साम्यं पुरे होती. पण त्याच्यासारखी निरर्थक बडबड करण्यापूर्वी शरलॉकनं जीभ हासडून जीव दिला असता. त्यानं टॅक्सीकडे मोर्चा वळवला. दोन-तीन टॅक्सीवाले त्याच्या पुढ्यात न थांबता निघून गेले, तेव्हा संतापानं काय करावं ते त्याला सुचेना. तो भडकून भर रस्त्यात एका टॅक्सीच्या पुढ्यात जाऊन उभा राहायच्या बेतातच होता, तितक्यात एक टॅक्सी थांबली. त्यानं हॅम्पस्टडचा पत्ता दिला नि तो मागे टेकून बसला.

आराम करायला फार वेळ नाही. आता त्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे. तेपण पात्रच दिसतंय. ’येस, सर!’ म्हणे. गर्लफ्रेंडचं काय झालं कुणास ठाऊक. ओके, टॉम तर टॉम. बघतो तुझ्याकडे.

तेवढ्यात टॅक्सी थांबलीच.

हॅम्पस्टड. बरं दिसतंय की घर…

सराईतपणे खिशातून किल्ली काढत शरलॉकनं दार उघडलं. अलार्म सिस्टीम बसवलेली दिसत होती. व्हरांड्यात दिवा होता. दाराशीच पितळी पत्रपेटी होती. किल्लीच्या जुडग्यातल्याच एका बारक्या किल्लीनं ती पेटी उघडली. पत्रांची चळत ताब्यात घेऊन शरलॉक आत शिरला.

वा, लाकडी तक्तपोशी. आरामशीर आहे घर. सगळ्यांत वरचे दोन मजले… असं म्हटलं होतं नाही का लेखात?

ओकच्या कठड्यावरून अलगद हात फिरवत शरलॉक जिन्यानं वर गेला नि त्यानं
किल्ली कुलपात घालून दार उघडलं.

खोली अंधारी होती. पण महोगनी नि एबनी लाकडाचं फर्निचर. किरमिजी सोफे. वॉलपेपर मुद्दामहून करवून घेतलेला दिसत होता. जाड रेशमाचे पडदे. अस्ताव्यस्त पसरलेली नि तरी छान दिसणारी पुस्तकं नि मासिकं. सजावट कुणा जाणकारानं केलेली असावी.

कंबरबॅचनं इकाया सोडून पहिल्यांदाच सजावटीवर पैसे घातलेले दिसतात.

पण या घराला अजून त्याचं रुपडं आलेलं नसावं. अजून कोरेपणा टिकून होता. अजून कंबरबॅच घराला पुरता सरावलेला नसणार… भिऊन सजावटीला जपत जपत फिरल्यासारखा त्याचा वावर असावा. पुस्तकं इकडेतिकडे पसरलेली होती. पण या खोलीच्या बाहेर मात्र नेलेली दिसत नव्हती. किंवा नेली असतीलच, तर काळजीपूर्वक परत जागच्या जागी आणून तरी ठेवलेली दिसत होती. या खोलीत त्याची फारशी ऊठबस दिसत नव्हती. माणसाचा वावर नसल्यासारखी पुस्तकी खोली.

अलगद दार लावून घेत शरलॉक बाहेर व्हरांड्यात आला. स्वैपाकघर सुसज्ज, चकचकीत. जिकडे तिकडे स्टीलचं फर्निचर आणि राखाडी रंगाच्या फरश्या. अगदी कोरडी सजावट.

पकाऊ.

न्हाणीघर अगदी लहानसं. लायब्ररी.

पुस्तकांनी खचाखच भरलेली खोली. कोरं करकरीत डेस्क. लॅपटॉप. वाटलं तर झोपता येईल असा लेदरचा सोफा.

इथे त्याची ऊठबस असावी. आरामशीर आहे खोली. पण इथेही कंबरबॅचच्या म्हणाव्यात अशा खुणा नाहीतच. दोन-चार फोटो तेवढे आहेत शेल्फावर. त्यातही गर्लफ्रेंडचा फोटो दिसत नाही. शेल्फ चकाचक आहे. पण मुद्दामहून काही लपवण्यासाठी पुसलेलं नसावं. पण - काहीतरी गडबड आहे. फोटो हलवल्यासारखे दिसतायत? सजावटीत थोडा दिसे न दिसेसा असमतोल? एक. एक तिथेही. तीन - एकूण तीन फोटो कुठेतरी हलवलेले आहेत.

कोपर्‍यातल्या शेल्फावर कंबरबॅचचा ग्रेट वॉर कॉश्चूममधला फोटो.

मिशा अगदीच भिकार. मिशा कधी बर्‍या दिसतात म्हणा...

तसल्याच एका पोशाखात TWHकडे बघून हसणारा फोटो.

जरा जास्तच खेटून उभे आहेत का दोघं? अं… चक. संशयास्पद नाही वाटायचं कुणाला.

“आलात का? या… राजे, या.”

शरलॉक आवाजाच्या रोखानं वळला. दारात एक उंच तरुण. अस्ताव्यस्त कुरळे केस.

तो पुढे आला.

TWH. अगदी तोकडी धावायची चड्डी. दाढीचे खुंट. बस. चेहर्‍यावर हे फताडं हसू.

“टॉम.”

क्रमश:

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अर्थात फ्यान फिक्शन म्हटले की असे होणारच. तरीही बघुया काय होते आहे ते. पूढिल भाग लवकर येउदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मजा आहे. लेखातलं पहिलं वाक्य काळजीपूर्वक वाचलं आणि आता हळूहळू प्रकाश पडू लागला आहे. मागचा भाग जबर्‍या होता आणि हा देखिल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

छान. उत्तम. हा भाग पुढिल नाट्याची पूर्वतयारी करण्यापुरता आहे. विशेष काही "घडत" नाही.
अर्थात एकुण कथेच्या आकारापुढे लहान नी कदाचित आवश्यकही!

ऍमण्डानी ऐवजी अमाण्डानी किंवा अमँडानी असे हवे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या कानाला अ‍ॅमण्डा असाच ऐकू येतो. जाणकार लोक्स?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अमॅन्डा असा उच्चार ऐकू येतो. यातला ड म्हणजे मराठी ड नव्हे हेवेसांनल.

ब्रिटिश असेल तर अमान्डा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हम्म... मी पुन्हा जाऊन ऐकते मार्टिनची मुलाखत.

बादवे ऋ, या भागात कमी 'घडतात' गोष्टी, खरंच आहे. पण मला या गोष्टीमधल्या 'घटना' आणि त्यांचं 'प्लेसिंग' (मराठी शब्द?) जितकं आवडतं, तितकेच हे बारीक तपशीलही आवडतात. टॉम हिडल्सनचे कपडे किंवा कंबरबॅचच्या स्वैपाकघरातली सजावट किंवा शरलॉकच्या बाथरुममधला धुरकटलेला आरसा... वगैरे. तपशिलात साली गंमत आहे! शिवाय पुढच्या गोष्टीची गंमत लुटायसाठी ते आवश्यकच. पण एक मात्र आहे, व्यक्तिशः मला शरलॉक नि जॉनच्या लंडनमधल्या घटना जास्त अपीलिंग वाटतात. त्या मानानं बेन आणि टॉमच्या लंडनमधल्या गोष्टी आल्या की मला गोष्ट कधी एकदा पुढे सरकतेसं होई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुंदर ! तुम्ही पोटापाण्यासाठी काय काम करता ते माहित नाही पण अनुवाद छान जमू शकतील तुम्हाला. एखादी छान कादंबरी निवडून मेहता ग्रंथजगत वाल्यांना भेटाच एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे हां! त्याचं काय आहे, मी पोटापाण्यासाठी अनुवादच करते. फक्त ते इतके दिलचस्प नसतात!

मेहतांबद्दलः मराठी प्रकाशनव्यवहारात अनुवादाला इतकी क्षुल्लक रक्कम देऊ केली जाते, की ती घेऊन प्रकाशकांना हवं ते आणि हव्या त्या वेळेत अनुवादित करून देण्यापेक्षा ज्या गोष्टी कधी मराठीत आल्या नाहीत नि आपल्याला याव्याश्या वाटतात त्या स्वान्तसुखाय नि तब्बेतीत वेळ घेऊन (!) करणं केव्हाही आनंदाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वॉव ! नाईस जॉब.

मराठी प्रकाशनव्यवहारात अनुवादाला इतकी क्षुल्लक रक्कम देऊ केली जाते,

बरोबर आहे त्यांचे. भरल्यापोटी उत्तम दर्जाची साहित्य निर्मिती होऊ शकत नाही यावर त्यांचा विश्वास असावा बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! अतिशय ओघवतं भाषांतर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅग्नाजी पुढील भाग कवा ?

अवांतरः- ज्यांना मॉडर्न शरलॉक बघायची खुमखुमी आहे त्यांनी एलेमेंटरी नामक सिरीअल आवश्य बघावी ती सुधा शेरलक होल्म चे मॉडर्न अ‍ॅडेपटेशन आहे. इतकं मॉदर्न की डॉ़टर वॉट्सन हा स्त्रि पात्र दावले आहे. एपिसोड अन प्रॉडक्शन वेलुज बीबीसी शरलॉ़कपेक्षा लहान आहेत तरीही... खुमखुमी बडी चिज है. (हे शौक बडी चिज हय च्या धरतीवर वाचावे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पुढचा भाग जूनमध्ये. (अगदीच धीर निघत नसेल, तर विंग्रजी वाचा. :प)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन