Skip to main content

टू डी वर्ल्डच्या अद्भुत दुनियेत!

आपल्यातील अगाध परंतु मर्यादित बुद्धीमत्तेच्या कुवतीनुसार आपण लांबी, रुंदी व उंची या त्रिमिती (व काळ ही चौथी मिती) विश्वात राहणारे प्राणी आहोत याची आपल्याला कल्पना आहे. परंतु विज्ञान कथालेखक मात्र अनेक वेळा बहुमिती विश्वात आपल्याला नेतात व तेथील चक्रावून सोडणाऱ्या गोष्टीतून आपले मनोरंजन करत असतात. त्यांच्या मते त्या बहुमिती विश्वातील माणसं आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतात. मेंदूला थोडे जास्त ताण दिल्यास विज्ञान कथालेखक वर्णन करत असलेल्या बहुमिती विश्वाची आपण कल्पना करू शकतो व त्यात राहणाऱ्या सूपरइंटेलिजेंट प्राण्यांच्या जीवनाचा वेध घेऊ शकतो. परंतु दोनच मिती असलेल्या विश्वाला कल्पनेच्या भरारीची गरज नाही असेच विज्ञान कथालेखकासकट आपल्याला वाटत आले आहे. द्विमिती असलेली प्राणीजातही नसावी असेही आपल्याला वाटत असावे. जर हे द्विमिती विश्व कुठेतरी अवकाशात असल्यास त्यात बुद्धीमत्ता असलेले मानवसदृश प्राणी नसणार याची आपल्याला खात्री आहे. परंतु आपल्या या समजुतीला छेद देणाऱ्या कथा - कादंबऱ्यांचा आढावा घेतल्यास 1884 सालची एड्विन अबॉट याची फ्लॅटलँड कादंबरी व 1984 साली प्रकाशित झालेली ए के ड्यूड्नी याची प्लेनिव्हर्स कादंबरी वाचताना द्विमिती जगाची कल्पना करणे वाटते तितके सोपे नाही हे लक्षात येईल.

अबॉट या शिक्षकाने लिहिलेल्या फ्लॅटलँड या कादंबरीत त्याकाळच्या समाजातील विषम व्यवस्थेबद्दल, वेगवेगळ्या थरातील समाज घटकांच्या स्वार्थीपणाबद्दल जास्त भर दिला असून द्विमितीच्या माध्यमातून टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरीतील निवेदक चौकोनाकृतीचा. सर्व स्त्रिया रेषा, वेगवेगळ्या थरातील पुरुष पंचकोन, षट्कोन, अष्टकोन..., सैनिक समद्विभुज त्रिकोनाकाराचे. इ.इ. सर्वात वरच्या वर्गातील अभिजनांना वर्तुळ अशी विभागणी यात आढळते. अशा प्रकारच्या पात्र रचनेतून हा समाज कसा राहतो, त्यांची घरं कशी असतील, तेथील हवामान कशी असेल, इत्यादी गोष्टींचे वर्णन लेखकानी केलेले आहे. लेखक हाडाचा गणित शिक्षक असल्यामुळे भूमितीचे सर्व नियम या फ्लॅटलॅंडच्या नागरिकांना लागू करतो. निवेदकाचे त्रिमितीतील गोलाकार चेंडूची कल्पना तेथील नागरिकांच्या आकलनाच्या पलिकडचे ठरते. (त्रिमितीत वाढलेल्या आपल्यालासुद्धा चार - पाच मितीच्या जगाची कल्पना अशक्यातली ठरते.)

लेखकाचा भर तेथील सामाजिक व्यवस्थेवर असल्यामुळे ही एक रूपक कथा झालेली आहे. कादंबरीचा शेवट चौकोनाकृतीचा निवेदक स्वत:च्या कुटुंबियांना त्रिमितीतील गोल दिल्यामुळे झालेल्या आश्चर्यचकित प्रसंगात होतो. द्विमिती जगात गोल हा वर्तुळासारखा दिसतो. त्यामुळे कुटुंबियांना ही भेटवस्तू काही तरी भयंकर गोष्ट वाटली असेल. परंतु निवेदकाची उत्सुकता व ज्ञान संपादनाची इच्छा यातून त्रिमितीचे अंधुकसे दर्शन होते.

फ्लॅटलॅंडचे वर्णन करताना लेखकाने या जगातील नैसर्गिक नियमाबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही. परंतु 1978च्या सुमारास ए के ड्यूड्नी या वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातील संगणक शास्त्रज्ञाने द्विमिती विज्ञान व तंत्रज्ञान (Two Dimensional Science and Technology) या शीर्षकाचे 97 पानी प्रबंध लिहून खाजगीरीत्या वितरित केला. मुळात हा प्रबंध त्याच्या विद्यार्थ्यानी व त्यानी मिळून द्विमिती जगासंबंधी केलेल्या सदृशीकरणाच्या अभ्यासाचा गोषवारा होता. त्यात द्विमिती जगात जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकी, खगोल इत्यादी गोष्टी कसे काय असू शकतील याचा धावता आढावा घेतलेला होता. त्या संगणक प्रकल्पाचे नावच 2DWORLD असे होते. या सदृशीकरण प्रकल्पाविषयी लिहिलेल्या प्रबंधाला संगणक व गणितीय क्षेत्रात उदंड प्रतिसाद मिळाला. 1984 मध्ये ड्यूड्नीने याच प्रबंध लेखनात त्याला मनोरंजक बनविण्यासाठी थोडीशी भर घालून त्याभोवती कथानकाची चौकट उभी केली. व प्लेनिव्हर्स नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित केले.

प्रो. ड्यूड्नीचे विद्यार्थी जेव्हा 2DWORLD संबंधीच्या सदृशीकरणाची दृश्ये संगणकाच्या पडद्यावर बघत होते तेव्हा त्यांच्या कल्पनेपलीकडील एक प्रतिमा स्क्रीनवर घुसल्याचा त्यांना भास होतो. जेव्हा ती प्रतिमा अडखळत इंग्रजीत बोलू लागते तेव्हा ती प्रतिमा सदृशीकरणाचा भाग नसून द्विमिती जगातील एक प्राणी आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना सुखद धक्का बसतो. या प्राण्याला ते येंड्रेड या नावाने ओळखू लागतात. येंड्रेडने सांगितलेल्या द्विमिती जगातील वैशिष्ट्यपूर्ण व्यवहार व त्या जगातील घटना प्रसंग इत्यादींच्या मध्यवर्ती कल्पनेच्या आधारे प्लेनिव्हर्सचे कथानक विकसित करण्यात आले आहे.

या कादंबरीच्या कथानकात दोन मुख्य प्रवाह आहेत:

येंड्रेडचा त्या विश्वातील ड्राब्क (Drabk) या त्रिकालज्ञानीच्या शोधाच्या प्रवासातील हकीकत आणि
त्या अनुषंगाने येंड्रेडने केलेले द्विमिती जगातील वैज्ञानिक, तंत्रज्ञानविषयक व सामाजिक व्यवहारांचे उल्लेख

येंड्रेड्चे द्विमिती जगातील अनुभव केवळ मनोरंजक नव्हे तर आपल्या बुद्धीमत्तेला आव्हान देणारे आहेत. काही कारणाने कथानक म्हणून या पुस्तकाकडे न पाहण्याचे ठरविले तरी द्विमिती जगातील वैज्ञानिक स्पष्टीकरणसुद्धा भुरळ पाडणारे ठरतील. उदा:

  • द्विमिती जगातील उष्मगतिकीचे व वितळ बिंदूंच्या संबंधातील विवेचन
  • या जगातील क्षुब्धतेबद्दलची (turbulence) तांत्रिक माहिती
  • द्विमिती ग्रहावरील वातावरण व हवामान बदल
  • ऊर्जा व अंतर यांचा संबंध. आपल्या जगात अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ऊर्जा कमी कमी होत जाते. (E α1/d2) परंतु द्विमिती जगात अंतराच्या व्यस्त प्रमाणात ऊर्जा कमी होते. (E α1/d).
  • द्विमिती जगातील प्राणीवर्गाची शरीर रचना
  • द्विमिती जगातील रासायनिक प्रक्रिया व मर्यादित प्रमाणात असलेले मूलवस्तू

द्विमिती जगातील तंत्रज्ञान रचनांसुद्धा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शरीर रचनेस अनुकूल वाटतील तसेच होत्या. इमारती उंच नसून पसरट होत्या. दरवाज्यांची रचना द्विमिती प्राण्यांना सुलभरीतीने आत बाहेर करण्यासारखी होती. सामानांची ने आण करण्यासाठी व प्रवासाचे साधन म्हणून द्विमितीय फुग्यांचा वापर केला जात होता. अभियांत्रिकी साधनांमध्ये द्विमिती गीअर्स, तरफा, levers इत्यादींचा मुबलकपणे वापर केला जात होता. ऍक्सल, चाकं येथे नव्हत्या. संगणक प्राथमिक अवस्थेत होता. संगणकासाठी लागणारे कांपोनेंट्स, लॉजिक गेट्स, NAND gates, सर्क्युट्स, इत्यादींची रचना द्विमितीत होती. किचकट व गुंतागुंतीच्या विद्युत तारांचे जंजाळ असलेल्या टर्बाइनवर आधारित वीज निर्मिती करण्याऐवजी य जगात पवनचक्यांचा वापर केला होता. अशाप्रकारे द्विमिती जगातील येंड्रेडसारखे प्राणी द्विमितीच्या मर्यादा ओळखून तंत्रज्ञानाचा विकास करत होत्या. ड्यूड्नीच्या या कादंबरीत भरपूर रेखाटने आहेत. त्यावरून लेखकाला नेमके काय सांगायचे आहे त्याची कल्पना वाचकांना येते.

कादंबरीतील काल्पनिक गोष्टीत चित्तथरारक व नाट्यमय प्रसंग आहेत. येंड्रेड व त्याचा मित्र फिरत असताना बलूनच्या सहाय्याने उडत असलेला प्राणी मित्राला हवेच्या दाबाने गुदमरून मारण्याच प्रयत्न करतो. परंतु येंड्रेड द्विमितीतील हिलियम वायूचा प्राण्याच्या पोटात स्फोट घडवून मारतो. या झटापटीत त्याला गंभीर इजा होते. तशाच अवस्थेत तो पुढे जात असताना 'न्साना' जमातीतील एक जोडपे उपचार करून त्याला बरे करते. येंड्रेडला त्रिकाल ज्ञानीच्या शोधात असल्यामुळे जड अंत:करणाने त्या जोडप्याचा निरोप घेवून पुढे निघून जातो.

टू डी वर्ल्डच्या विद्यार्थ्यांशी येंड्रेडचा संपर्क आल्यानंतर तो त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारतो. स्वत:बद्दल, स्वत:च्या कुटुंबाबद्दल सांगतो. त्याचे वडील मच्छीमारीचा धंदा करतात. विद्यार्थ्यांना त्यांची घरं कशी असतील, मासेमारीसाठी वापरलेली बोट कशी असेल, इत्यादींचे कुतूहल वाटत असते. येंड्रेड हळू हळू त्या जगाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतो. खरे पाहता येंड्रेड या सदृशीकरणाच्या स्क्रीनवर वेळ घालवण्यासाठी आलेला नसतो. त्याचा मूळ उद्देश ड्रेब्क या त्रिकालज्ञानीला भेटून त्याच्याकडून विद्या प्राप्त करून घ्यायची असते. ड्रेब्क त्याला भेटतो. परंतु तो काय सांगत असतो ते येंड्रेडला कळेनासे होते. ड्रेब्क बोलता बोलता अदृश्य होत असतो व परत प्रत्यक्ष होत काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ड्रेब्कचे अदृश्य होणे म्हणजे त्याचा त्रिमितीत प्रवेश हे येंड्रेडच्या लक्षात येते. येंड्रेडला हे सर्व त्याच्या आकलनापलिकडचे वाटू लागते. कदाचित ड्रेब्क चार - पाच मिती असलेल्या जगातही गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात येंड्रेडचा विद्यार्थ्यांशी संपर्क तुटतो व कादंबरी संपते.

ड्यूड्नीचे हे लेखन केवळ कल्पनाविलास, कुठेतरी भरकटत जाणारे, मन रिझविणारे, प्रसंगांची रेलचेल असलेले स्वप्नरंजन नव्हते. लेखक प्रामुख्याने येथे दोन गोष्टीवर भर देतो: द्विमिती जगाला त्रिमिती जगासारखे हुबेहूब ठेवण्याचा प्रयत्न आणि जेथे सुधारण्याची गरज भासते तेथे वैज्ञानिकरित्या केलेल्या सुधारणा. त्यामुळे त्रिमिती जगातील नैसर्गिक नियम व सिद्धांत यात थोडे फार बदल करून द्विमिती जग उभे केले आहे. सैद्धांतिक बदल करताना प्रथम भौतिकीतील, नंतर रसायनशास्त्रातील व त्यानंतर जीवशास्त्र.. असे क्रम लावलेला आहे. या द्विमितीच्या जगात वारा, पाऊस, पाणी, नद्या तलाव... हे सर्व काही आहेत. फक्त त्यांचे स्वरूप द्विमितीत असून त्यांना द्विमिती जगातील नियम व सिद्धांत लागू होतात. वस्तूंच्या रचनेसाठी आवश्यक असलेल्या अणूंची संख्या या जगात मर्यादित प्रमाणात आहे. येथेही अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात. आपल्या त्रिमिती जगातील रेणूंच्या विशिष्ट गुणधर्मामुळे 230 प्रकारचे स्फटिक तयार होऊ शकतात. परंतु द्विमितीत ही संख्या फक्त 17 असू शकते.

या जगातील सजीव प्राण्यांची रचना द्विमिती पेशीतून होते. या पेशीच शरीरातील हाडांसकट सर्व अवयवांची रचना करतात. यांच्यातूनच मज्जासंस्था तयार होते. मेंदू तयार होतो. द्विमितीतील पेशींची रचना व त्या पेशींपासून अवयवांची रचना आणि या रचनेतून प्राण्यांचे सरपटणे, पोहणे, उडणे, श्रम करणे, हत्यार व साधनं हाताळणे इत्यादी - आपल्या सर्वसामान्य वाटणाऱ्या -गोष्टी द्विमिती जगातील प्राण्यांना कसे काय जमू शकतात, यासाठी ड्यूड्नी व त्याच्या गटाला फार तर्क लढवावा लागला असेल. त्रिमितीतील दोन पायाच्या प्राण्यांना चालताना संतुलन संभाळण्यासाठी कष्ट पडतात. परंतु द्विमिती जगात ही समस्या नसेल. प्राण्यांना उडण्यासाठी पंखांची गरज भासणार नाही. त्यांची शरीर रचना वायुगतिकीला अनुकूल अशीच तयार झाली असेल. या जगातील सजीवांची चयापचय वा पचन संस्थेची रचना आपल्याइतकी गुंतागुंतीची नाही. रक्ताभिसरण क्रियासुद्धा फार गुंतागुंतीची नसावी. मुळातच शरीराभोवती नगण्य प्रमाणात उष्णता येथे उत्पन्न होत असल्यामुळे व त्यासाठी काही विशेष तरतूद करण्याची गरज नसल्यामुळे अवयवांची रचना सोपी झाली आहे. येथील सजीवांचे अस्थिपंजरही पातळ व लवचिक असावे. त्यामुळे प्राण्यांचे वजनही जास्त नसावीत. त्रिमितीतील प्राण्याप्रमाणे तोंडापासून गुदद्वारापर्यंत जाणारी पोकळ नळी द्विमितीत नसावी. तसे असल्यास हा प्राणी दोन तुकड्यात विभागला जाईल. मज्जासंस्थेच्या रचनेतील मर्यादेमुळे या जीवातील मेंदूची वाढ व त्या अनुषंगाने बुद्धीमत्ता यांना भरपूर मर्यादा असतील. सजीवांचे पुनरुत्पादन, लिंगभेद, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, मालवाहतूक, प्रवासाची साधनं, इमारती, खेळ व खेळणी, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, इत्यादीबद्दलही या पुस्तकात विचार मांडलेले आहेत.

ड्यूड्नीच्या मते आपण आपल्या विश्वाची रचना निरीक्षण व प्रयोग यातून साकार केलेली आहे. त्यामुळे या विश्वातील घटना - प्रसंगामागील नैसर्गिक नियम वा गृहितकं यांचा शोध घेणे तितके सोपे नव्हते. परंतु द्विमिती विश्वासाठी कुठल्याही प्रकारचे निरीक्षण शक्य नव्हते. त्यामुळे केवळ (विचार) प्रयोगातूनच हे विश्व उभे करावे लागले. त्यातूनच या विश्वाचे एकेक धागे सुटसुटीत होऊ लागले. व वैज्ञानिकांनी घेतलेल्या बौद्धिक श्रमातून या विश्वातील नियम व सिद्धांताचा शोध लागला.

आपण जर एकच मिती असलेल्या विश्वात असल्यास आपल्याला फक्त लांबी असेल, रुंदी व उंची नसतील. या एकमिती विश्वातील प्रत्येक सजीव वा निर्जीव वस्तूंना वेगवेगळ्या आकारातील रेषेवरून ओळखावे लागेल. या जगात दिशा हा प्रकार नसणार. येथील सजीव प्राण्यांना मागे वा पुढे फक्त बिंदू दिसणार. हे विश्व फक्त रेषेच्या स्वरूपात असणार. जर द्विमिती जगात प्रवेश केल्यास या विश्वाच्या घनाकृतीचा पेटारा दोनच मिती असलेल्या जमिनीसदृश वा भिंतीसदृश चौकोनाकाराचा असणार. द्विमितीतील बुद्धीवंत प्राण्यांना एक मितीतील प्राण्यांचे खरे स्वरूप कळणार. द्विमिती विश्वाच्या या पेटाऱ्यात कागदावर काढता येण्यासारख्या आकारांच्या सजीव वा निर्जीव वस्तू असणार. चौकोन असतील, त्रिकोन असतील वा इतर कुठल्याही आकाराची. फक्त त्यांना लांबी व रुंदी असतील. उंची वा खोली कधीच नसतील. त्यामुळे आपण राहत असलेले त्रिमितीचे हे विश्व खरोखरच अद्भुत आहे. आपण एक मिती विश्वातील वा द्विमिती विश्वातील गोष्टींची कल्पना करू शकतो. कारण आपल्या जगात लांबी, रुंदी व उंची या तिन्ही गोष्टी आहेत. द्विमितीतील त्रिकोनही बघू शकतो व त्रिमितीतील प्रिझमसुद्धा. द्विमितीतल वर्तूळ व त्रिमितीतील गोलसुद्धा. या तुलनेने चार वा पाच वा बहुमिती विश्व आणखी अद्भुत असेल. कारण ते आपल्या आकलनाच्या पलिकडचे असेल.

परंतु आपण जे त्रिमितीचे विश्व म्हणून आपल्या विश्वाकडे बघत असतो ते खरोखरच तसे आहे का? अशा प्रकारे या विषयी अलिकडील काही वैज्ञानिक व मानसतज्ञ शंका उपस्थित करत आहेत. हे जे आपल्या भोवतीचे विश्व दिसत आहे ते निव्वळ दृष्टिभ्रम नसेल हे कशावरून? होलोग्राफीतील प्रतिमेप्रमाणे दोनपेक्षा किंचित जास्त असलेले हे विश्व आपल्या मेंदूला चकवत तर नसेल ना? कारण या विश्वाचे आकलन फक्त आपला मेंदूच करतो व मेंदूच्या न्यूरॉलॉजिकल प्रक्रियेतूनच आपली जाणीव विकसित होत असते. त्यामुळे आपल्याला जे दिसल्यासारखे वाटते ते मुळातच तसे नसेलही. कदाचित आपले हे विश्व आवकाशातील दुसऱ्या कुठल्यातरी विश्वाची सावली असू शकेल किंवा त्या विश्वातील सुपर इंटेलिजेंट माणसांनी या होलोग्राफिक विश्वाची निर्मिती केली असेल.या व अशा प्रकारच्या प्रश्नांचा तडा लावण्यासाठी फेर्मीलॅबच्या आवारात होलोमीटरसंबंधीचे काही प्रयोग वैज्ञानिक करत आहेत. निधीची अडचण असली तरी काही प्रमाणात प्रयोग केले जात आहेत.

या प्रयोगाचे निष्कर्ष काहीही असले तरी टू डी वर्ल्ड अद्भुत आहे हे मान्य करावे लागेल. कदाचित काहींना अशा अद्भुत जगाची कल्पना करणे वा कल्पनेचा विस्तार करणे पोरकटपणाचे वाटेल. परंतु आठवी वा नववीतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना अशा विचार प्रयोगाचा प्रकल्प दिल्यास व कुतूहल जागृत केल्यास या विश्वाच्या कल्पनारम्य जगात आणखी भर पडू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स