पद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!


.
पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.
.
दिल्ली मेट्रोचे जणू बोधचिन्हच असलेल्या श्रीधरन यांचे व्यासपीठाच्या मंचावरले चित्र,
त्यांच्या अवकाशप्राप्तीनंतर, हात जोडून त्यांना अभिवादन करत असतांनाचे, हे प्रकाशचित्र,
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या, कॉर्पोरेट कार्यालयात, म्हणजेच मेट्रो भवन येथे ३१-१२-२०११ रोजी काढलेले आहे.
.
भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.
.
अशा व्यक्तींच्या कामांची नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करायला हवा. पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत. कालच त्यांनी आपल्या कार्यभाराची सूत्रे, आपल्या उत्तराधिकार्‍यास सुपूर्त केली. त्यानिमिताने, त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा एक आढावा.
.
कोकण रेल्वेचे दैदिप्यमान काम ज्यांनी संकल्पिले, नियोजले आणि नियत कालावधीत यशस्वीरीत्या करून दाखवले त्या श्रीधरन यांना माझा मानाचा मुजरा!
.

.
आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्‍या परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन आज कार्यनिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याच उत्तम कार्यांची ही उजळणी.
.
श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.
.
दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.
.

.
१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले. ते उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते.
.
ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते.
.
जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.
.

.
कोकण रेल्वे आणि मग दिल्ली मेट्रो यांच्या उभारणीत अथक परिश्रम करून भारतीय सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच त्यांनी बदलवून टाकले. त्यांच्या निष्ठापूर्वक केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा “पद्मश्री” देऊन सन्मान केला. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना २००२ साली मॅन ऑफ द ईयर म्हणून निवडले. २००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची आशियातील एक पुढारी म्हणून निवड केली. २००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.
.
२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पद्मविभूषण” देऊन गौरवले.
.
त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यनिवृत्तीच्या निमित्ताने मी उत्तम आयुरारोग्य प्रार्थितो आणि त्यांच्या उत्तर आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.
.
श्रेयनिर्देशः प्रकाशचित्रे व मजकूर यांखातर संबंधित खाली दिलेल्या संस्थळांचे मनःपूर्वक आभार.
.
संदर्भः
१. http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php?start=10
२. http://www.delhimetrorail.com/whatnew_details.aspx?id=NgRPa7TMhkQlld&rdct=d
३. http://en.wikipedia.org/wiki/E._Sreedharan
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

खरच ग्रेट माणुस आहे

ग्रेट माणुस आहे.
अशी माणसं दुर्मिळ झालेली आहेत.
अजुन वाचायला आवडल असतं,

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

भारतरत्न द्यायला पाहिजे

श्रीधरन यांनी देशासाठी खरंच खूप छान काम केलं आहे. एम.विश्वेश्वरय्या यांच्यासारखं त्यांना खरंतर भारतरत्न द्यायला पाहिजे.

मुलाखत

http://www.indianexpress.com/oldStory/35536/

इथे या माणसाची एक दिलखुलास मुलाखत आहे. वाचण्यासारखी आहे.

आरा, तुमच्याकडे श्रीधरन

आरा, तुमच्याकडे श्रीधरन यांच्याबद्दल अधिक माहिती असल्यास जरूर लिहा.

श्रीधरन यांच्या हाताखाली कोकण रेल्वेवर काम केलेल्या काही ज्यूनियर सिव्हील इंजिनियर लोकांकडून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. श्रीधरन यांना असणारी प्रकल्पाची माहिती, त्यांनी केलेला अभ्यास, कामावरची पकड आणि हाताखालच्या लोकांकडची स्किल्स पुरेपूर वापरून घेण्याच्या हातोटीबद्दल हे लोकं नेहेमीच आदराने बोलतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुवा इथे प्रस्तुत केल्याखातर ऋषिकेश यांस मनःपूर्वक धन्यवाद!

अतिशय समर्पक आणि समयोचित लेख लिहिला आहे श्री. प्रशांत दीक्षित यांनी. ह्या लेखाचा दुवा इथे प्रस्तुत केल्याखातर ऋषिकेश यांस मनःपूर्वक धन्यवाद!

पुरवणी

श्रीधरन यांच्या सकारात्मक सेवेची अण्णांशी व त्या निमित्ताने आंदोलनांमुळे होणार्‍या सेवेची तुलना करणारा लेख नुकताच वाचनात आला. लेख छान वाटला
तो इथे वाचता येईल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

जाई, आळशांचा राजा, व्हाईट बर्च, ऋषिकेश, अशोक पाटील सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!

मेट्रोमॅन

भारत सरकारतर्फे काही निवडक नागरिकांना "सेवेची नोंद" वा "समाजासाठी केलेल्या कामाबद्दल/योगदानाबद्दल देशवासियांतर्फे कृतज्ञतेची पोच" म्हणून "पद्म पुरस्कार" दिले जातात. यादीतील काही नावे पाहिल्यावर मनी संतापही उमटतो, तरीही अशावेळी चूप बसण्याशिवाय काहीच करणे शक्यही नसते.

पण काही व्यक्ती आणि त्यांचे कार्य असे काही डोळे दिपवून टाकणारे असते की, त्याना प्रदान झाले म्हणून सरकारच्या त्या पुरस्काराचीच शान वाढते. "श्रीधरन" हे नाव अशा मोजक्या व्यक्तीपैकी एक असेच सारा देश मानतो. लोकांनी त्याना "पद्मविभूषण श्रीधरन" पेक्षा "मेट्रोमॅन ऑफ इंडिया" असेच ओळखत राहावे असे वाटते.

"श्रीधरन यानी सेवानिवृत्त होऊ नये" यावर अनेकदा ऑनलाईन चर्चा झडल्याचे आढळते, यातच त्यांच्या कार्याला देशवासियांनी केलेला सलाम दिसतो.

अशोक पाटील

मानाचा मुजरा

श्रीईधरन म्हटलं की मेट्रोच्या आधी आठवते ती म्हणजे कोकण रेल्वे!
असा भलाथोरला प्रक्ल्प सिद्धीस नेणार्‍या या अवलियाला मानाचा मुजरा!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<< मेट्रोकार श्रीधरन यांची

<< मेट्रोकार श्रीधरन यांची माहितीपूर्ण ओळख आवडली>>

हेच आणि असेच म्हणते. त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचाली साठी कृतज्ञ भारतीय जनतेच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम असतिल.

+

केवळ रेल्वेच्याच इतिहासात नाही, तर एकूणच प्रशासकीय इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.

मेट्रोकार श्रीधरन यांची

मेट्रोकार श्रीधरन यांची माहितीपूर्ण ओळख आवडली
भारतीय रेल्वेच्या ईतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे

.