उद्धव शेळके, "धग"

उद्धव शेळक्यांची "धग" कादंबरी काल वाचून पूर्ण झाली. मराठी साहित्यातली एक क्लासिक असे मी ऐकले होते. क्लासिक म्हणून गाजावाजा झालेल्या कादंबर्‍या प्रकाशनकालाच्या खूप नंतर वाचल्या की बरेचदा विरस होतो; यात काय एवढ असं तरी वाटतं, किंवा अनेकांनी नंतर अनुकरण केले असल्यामुळे जुन्या कलाकृतीतही तोचतोचपणा जाणवतो. यात एखादी आवडली की सुखद धक्काच बसतो.

अमुक ने माझ्या खरडवहीत "धगे"चा चटका लागल्याबद्दल लिहीलं होतं. खरोखर सुखद धक्क्याऐवजी जोरदार चटका लावणारी कादंबरी आहे. १९६० साली लिहीलेली, पण आजही तिच्यातले वास्तव आपल्याला प्रखरपणे जाणवते. त्यात वर्णिलेले वास्तव फारसे बदललेले नाही म्हणूनच नव्हे, तर शेळक्यांनी उभ्या केलेल्या जिवंत, कालातीत व्यक्तिरेखांमुळे. कादंबरी अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी आहे. कौतिक, तिचा नवरा महादेव, त्यांची मुलं भीमा-नामा, आणि मग यसोदी. बाकीची अनेक छोटी पण ठळक पात्रं - सासरा रघुनाथ, शेजारणी सीता-सकीना आणि कासम, वगैरे. चार पाच वर्षं कष्टाने, स्वाभिमानाने जगायच्या त्यांच्या प्रयत्नांची शोकांतिका.

कौतिकची व्यक्तिरेखा कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. ती अभिमानी आणि हिंमती आहे, आणि अनेक कष्टांचा जीव तोडून सामना करते. पण हे सगळे "मदर इंडिया" छाप साचेबंद होत नाही. ती थोडी डॉमिनेटिंगही आहे. नवर्‍यावर प्रेम करून त्याच्या पाठीशी उभी राहते, पण तिच्या इच्छेप्रमाणे त्याने जगावं आणि राबावं असाही तिचा सुप्त आग्रह असतो. त्याखाली आधीच दबलेला तिचा नवरा महादेव अधिकच दबतो. शेवटी आपल्या जबाबदार्‍यांचा पूर्णपणे त्याग करतो. मुलांना जीवापाड जपूनही त्यांच्याकडून गोड-गोड, खोटे आमिष दाखवून ती वावरात तिच्याबरोबर कामं करून घेते. कादंबरी विदर्भातल्या दैनंदिन ग्रामीण जीवनाचे तपशील वाचकासमोर ठेवते, पण कौतिक शिंपिणीला यातील स्त्रीजीवनाचे फक्त एक प्रतीक मानने अन्यायाचे होईल असे वाटते. तिची व्यक्तिरेखा मान हिसडून बोलण्याच्या शैलीतून, तोंडातल्या शिव्या आणि प्रेमळ शब्दांतून, नवरा आणि मुलांबरोबरच्या नात्यातून इतक्या बारकाईने, सफाईने शेळक्यांनी टिपले आहे की ती हाडामासाची, अद्वितीय व्यक्ती म्हणून आधी आपल्यासमोर येते. म्हणून तिची शोकांतिका ही अगदीच अनपेक्षित नसूनही शेवटी वाचकाला धक्का देतेच. तिची दोन मुलं - भीमा आणि नामा - कादंबरीच्या सुरुवातीला लहान असतात. शेवट होईपर्यंत मोठी होऊन आपापल्या परीने "शहाणी" होतात. भीमा गुंड बनतो, जे काय हवं ते हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही हा धडा परिस्थिती त्याला शिकवते. नामाला काहीही असो, मनापासून शिकायची हौस असते; शेवटी परिस्थितीशी आपल्या आशांची तडजोड करायला तो शिकतो. शेळक्यांबद्दल मी फारसं वाचलं नाही, पण नामाच्या व्यक्तिरेखेत बरेचसे आत्मचरित्रावर बेतले असावे अशी शंका येते. कौतिक मुख्य पात्र असली तरी कादंबरीचे अंत:करण नामा आहे, हे हळूहळू उलगडत जातं. तृतीयपुरुषी निवेदन असूनही त्याच्या डोळ्यातून वाचक शेवटी वास्तवाकडे पाहते. जीवनाची जबाबदारी कौतिककडून त्याच्याकडे सोपवली जाते.

कौतिकचा नवरा महादेव तिच्या मानाने सगळ्याच बाबतीत कमी उत्साही. तो प्रयत्न करत नाही असं नाही, पण निरुत्साह आणि अपयशामुळे ढेपाळतो. त्याच्या व्यक्तिरेखेतून बदलत्या काळाची जाणीव आणि शेळक्यांचे भाष्य अधिक जाणवते. त्याला शिवणकाम येत असतं पण त्यात मन रमत नाही. वावरात मोलमजूरी करण्याबाबत कंटाळा आणि कमीपणा वाटतो. एकूण महादेवाचे आपल्या शिंपीपणाशी नाते जातसंस्थेवर विचार करायला लावणारे आहेत. एकतर पारंपारिक अर्थाने रोजगार आणि सामाजिक आधार पुरवण्यात त्याचे शिंपीपण कमी पडते. पण त्याचे आधुनिकीकरण - बाजारात जाऊन तयार कपडे विकणे, व्यापार करणे - देखील त्याला झेपत नाही.

पारंपारिक विद्या जोपासायचं आणि वारसा चालवायचं उत्तम साधन म्हणून जातसंस्थेच्या अस्तित्वाचं होकारात्कमक कारण सांगितलं जातं. महादेवाला ती विद्या कमीजास्त प्रमाणात मिळते. पण त्याच्या पुढच्या पिढीतला नामा दोन्हीकडे फसतो: पारंपारिक जातीची विद्या जातसमूहातून तर त्याला मिळतच नाही, पण त्याला आधुनिक शाळेतील शिक्षणही गरिबीमुळे मिळत नाही. महादेवला जातीच्या प्रतिष्ठेची भावना असते, पण त्याचा उपयोग फारतर वर्तमान परिस्थितीत त्याच्या जखमेवर मलम म्हणून होतो. कथानकाच्या शेवटी गहाण ठेवलेलं मशीन परत आणताना त्याचं ओझं कौतिकला पेलवत नाही, आणि तिच्या पाठीला जखम होते - जणू काही त्या सर्व पारंपारिक साचेतल्या अपेक्षांखाली ती शेवटी कोसळते. पारंपारिक नात्यांचा आधार उरत नाही, आणि नवीन जगात फक्त परात्मता हाती लागतो. सगळ्यांची फारकत होते - भीमा आणि महादेव कुठेकुठे भटकतात, आणि नामा-कौतिक राहूनही खर्‍या अर्थाने एकत्र राहत नाहीत.

कादंबरीच्या कथानकाच्या संरचनेचे पुढे ७०च्या दशकात हिंदी सिनेमात "मेरे पास माँ है" च्या थीम मधे रूपांतर झालेले दिसते - गरीब, कष्टाळू माँ, दोन मुलं, एक प्रामाणिक पोलीसवाला, व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा, दुसरा चोर, लफंगा, वगैरे. "धगे"त मात्र या सिनेमांमधला "मॉं" चे भावविवश सिंबॉलिझम नाही, आणि लफंगा मुलाचे समाजात पुनर्वसन करणे (वा त्याचा मृत्यू दाखवून व्यवस्थेला कायम ठेवणे) वगैरे भानगडी नाहीत. दोन वेगळ्या मार्गांचे मूल्यमापनही ती करत नाही. व्यवस्था इथे कायमच राहते; प्रामाणिक, आशावादी मुलाला लाइनीत आणून ती कायम राहते, गुंड पोराचं पुढे काय होतं आपल्याला कळतच नाही. भूतकाळात लिहीलेली संपूर्ण कादंबरी शेवटी दिनक्रमाचं वर्णन करताना मात्र वर्तमानकालाचा वापर करून व्यवस्था कायम असल्याचे बिंबवते. त्या बदलाने कथानकाला एकदम ब्रेक लावल्यासारखा होतो, आणि कमालीचे अस्वस्थ व्हायला होते.

वर्‍हाडी भाषा प्रथमप्रथम थोडी कठीण वाटते, पण संदर्भातून सगळे स्पष्ट होत जाते. शेळक्यांच्या लेखनशैलीत कमालीचा संयम आहे. मला त्यांची तुटक तुटक निवेदनशैली छोट्या वाक्यांतून बारकाईने केलेले वर्णन आवडलं. कुठीही शब्दबंबाळ नाही. मराठी, वर्‍हाडी आणि दखनीची सहज सरमिसळ, खासकरून सकीना आणि कासमच्या बोलण्यात, दिसते. मारवाड्यानं फसवल्यावर कौतिक आणि महादेव सकीनाच्या ओसरीत रहायला येतात, तेव्हा तेथे राहत असलेल्या बकर्‍यांना ती दोरीने ओढत नेत दुसरीकडे बांधते, आणि तिथे त्या निमूटपणे उभ्या राहतात. महादेवच्या परिस्थितीची वाचकाला चांगली कल्पना येते. अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यामुळे कादंबरीला "प्रादेशिक", "ग्रामीण" "देशी" साहित्याचे लेबल्स लागू पडत नाहीत. तिचा परिघ यापेक्षा व्यापक आहे, इट इज अ‍ॅन अन-सेंटिमेंटल ऑब्जर्वेशन ऑफ द ह्युमन कंडिशन.

"धग" ही खरोखर क्लासिक आहे. पांडुरंग सांगवीकर इतकी कौतिक शिंपीण का फेमस नाही झाली हे कोडं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

यापुस्तकाबद्दल ऐकून आहेच.. वाचायच्या यादीतही केव्हाचं आहे.. बघु कधी योग येतो.

पहिला परिच्छेद सोडल्यास वरचे लेखन कथावस्तु समजेल या भितीने वाचले नाही. त्यामुळे समीक्षेवर काहीच प्रतिक्रीया नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> पांडुरंग सांगवीकर इतकी कौतिक शिंपीण का फेमस नाही झाली हे कोडं आहे. <<

सांगवीकरचं छोट्या गावातून मोठ्या शहरात आल्यानंतर जे काही होतं (आणि तेदेखील अवघड विद्यार्थीदशेत असताना) त्याला मराठी वाचकवर्गात अधिक अपील आहे असं वाटतं. म्हणजे Bildungsroman किंवा Coming-of-age असल्याचा वैश्विक अपीलासाठी तिला फायदा मिळतो असं वाटतं. ह्याउलट 'धग' ही दलित / ग्रामीण साहित्यात मोडली जात असल्यामुळे आणि शिवाय त्यात स्त्री केंद्रस्थानी असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष होत असेल का? शिवाय, 'कोसला'तले भाषेचे प्रयोग, त्यातला वेगळ्या जातकुळीचा विनोद वगैरे प्रकारांमुळेही ती गाजली. अर्थात, साहित्यिक वर्तुळामध्ये 'धग'ही तितकीच फेमस आहे, पण सर्वसामान्य वाचकांचा विचार करता मात्र तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> क्लासिक म्हणून गाजावाजा झालेल्या कादंबर्‍या प्रकाशनकालाच्या खूप नंतर वाचल्या की बरेचदा विरस होतो <<

अगदी बरोबर बोललात. आणि धग त्याला अपवाद आहे हेही खरे.
यातला एक प्रसंग इयत्ता नववीला होता. तेव्हा वर्‍हाडीविषयी भावंडभाव तयार झालेला नसल्याने म्हणा दुर्लक्ष झाले होते. मराठी पाठ्यपुस्तकांचा साचा एकप्रकारे तेव्हाही लक्षात आलेला होता.
दलित साहित्याला, मर्‍हाठीच्या बोलीभाषांना प्रतिनिधित्व मिळेल हा त्या साच्याचा भाग आहे/असे. त्यामुळे एखाद्या कादंबरीतला अंश/प्रसंग कॉन्टेक्स्ट सोडून अंतर्भूत करणे हे महामंडळाच्या अंजेड्यावर असे.(गमंत म्हणजे कोसलामधला सगळा मालमसाला गाळून हेरलेला "बुद्धदर्शन" नावाचा पाठही दहावीला होता!) त्यामुळे कौतिक ही एक जस्ट अनादर, त्या साच्यातली व्यक्तिरेखा वाटत असे.
त्यामुळे मी अतिशय भीत भीतच धग वाचायला घेतली. ती ही असे पूर्वग्रह मवाळ होईपर्यंतच्या काळानंतर. आणि हाईप्ड कादंबर्‍यांना लय भारी म्हणायचा उत्साह मावळल्यानंतर.
शेवटी सारलेल्या पूर्वग्रहाच्या काड्या गळून पडल्या, आणि धग महत्त्वाची वाटली, आवडलीच.
तुम्ही नेमकं लिहलं आहे, हे अवश्य सांगतो. पुरेपूर सहमत.
आसपासच्या अनेक बायकांत कौतिकचे अंश दिसतात, हे माझ्यापुरतं त्या कादंबरीचं मोठं योगदान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

@जंतू:
हो, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराच्या धाग्यामुळे एकाहून अधिक पिढीतल्या युवकांना पांडुरंग जवळचा वाटला हे खरंय. आणि मला कोसलाच्या अपील बद्दल शंका नाहीच.
पण "धगे"ला दलित किंवा ग्रामीण, प्रादेशिक लेबलं लावून तिच्यातली वैश्विकता नजरेआड होते.
शांता गोखले यांनी कादंबरीचा इंग्रजि अनुवाद केलाय असं वाचलं. Embers (Macmillan, 2002). कोणी वाचलंय का?

@ नील:
थँक्स! Smile
पाठ्यपुस्तकांमधे कादंबर्‍यांचे असे संदर्भहीन तुकडे घालून त्यांच्या प्रती गोडी वाढवायची सोडून उलट परिणाम होतो असंच वाटतं. हे फक्त मराठीपुरतंच खरं नाही; इंग्रजी पुस्तकांत ही अशीच प्रथा होती.

शेळक्यांच्या अजून कुठल्या कादंबर्‍या चांगल्या आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशुतोष पोतदारच्या ब्लॉगवर धग वर एक इंग्रजी निबंध वाचला. शांता गोखल्यांनी कादंबरीचा अनुवाद केलाय म्हणे. ग्रामीण वर्‍हाडी भाषा कशी अनुवादित झालीय हे पहायला हवे, तेवढं सोपं काम नसावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्हाडी भाषा आवडली असल्यास व अशा वेगळ्या भाषांची आवड असल्यात मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे माधव कोंडविलकरांची तसेच आयदान ही ऊर्मिला पवारांची पुस्तकंही छान आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0