कुटुंबातले भारा - भाग २

.भारांच्या कुटुंबीयांशी गप्पा, मागल्या पानावरून पुढे चालू...

***

चंदर भागवत, भारांचे धाकटे चिरंजीव. फास्टर फेणेचा जन्म ज्यांच्या उपद्व्यापांमुळे झाला, तेच हे गृहस्थ. यांच्या क्रिकेटवेडामुळेच 'भाग्यशाली सिक्सर' हे भारांचं पुस्तक त्यांना अर्पण केलेलं आहे.

मी फास्टर फेणेसारखाच तुडतुडीत, बारकुडा आणि उपद्व्यापी मुलगा होतो, म्हणूनच बहुतेक मला फास्टर फेणे अतिशय आवडतो. दादांनी अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे. विज्ञानकथांची भाषांतरं, साहसकथा, 'जाईची नवलकहाणी'सारखी फॅन्टसी, विनोदी लेखन... पण या सगळ्या लेखनामध्ये फास्टर फेणेचं स्थान अढळ आहे. कारण एका प्रकारे दादा आणि फास्टर फेणे अभिन्नजीव होते. नाहीतर मला उपद्व्यापांची आवड कुठून लागायला? त्याला कारणीभूत दादाच. ते स्वत: हौसेनं ट्रेकिंग करत असत. अगदी अलीकडे-अलीकडेपर्यंत. मला ट्रेकिंगला नेणारे तेच. त्यांच्याबरोबर मी भटकायला जायला सुरुवात केली, ती केलीच.

त्यांच्याकडे गोष्टी सांगायची वेगळीच शैली होती. रंगवून रंगवून गोष्टी सांगायचे. गोष्टीत असं असेल, 'त्यानं त्याला मारलं.'; तर ते तेवढ्यावरच थांबायचे नाहीत. त्यांचे स्वत:चे खास साउन्ड इफेक्ट्स असायचे. "त्यानं त्याला मारलं... ढिश्क्यांव! मग तो ओरडला, "आई गं!" असं. हे सगळं साभिनय. हातवारे वगैरे करून. ते एका प्रकारे नाट्यरूपांतरच असायचं.


नातू वरुणला गोष्ट सांगताना भारा

मी त्यांना नोकरी करताना कधीच पाहिलेलं नाही. आमच्याकडे आई नोकरी करायची नि दादा लिहायचे. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. सकाळी उठून, आंघोळ करून, दत्ताच्या तसबिरीला हार घालणे. पूजाअर्चा काही नाही. तसं धार्मिक वगैरे आमच्यापैकी कुणीच नाही. पण ते त्यांचं एक कर्मकांड असल्यासारखं होतं. ते झालं, की मग लिहायला बसायचे. कधी दिवस-दिवस लिहीत बसायचे, कधी रात्रभरही बसायचे. रिकामे असे ते कधी नसतच. पण कुठलीही बंधनं त्यांनी स्वत:वर कधी घालून घेतली नाहीत. तसं आम्हांलाही कधी 'अमुक कर' वा 'तमुक कर' अशा आज्ञा सोडल्या नाहीत. त्यांना वाचनाची इतकी आवड, पण - अमुक एक वाच - असं कधी त्यांनी सांगितलं नाही. कॉमिक्स आणून द्यायचे. अंकल स्क्रूज, मिकी माउस यांची कॉमिक्स तेव्हा चिकार मिळायची. ती मी आधी वाचायला लागलो. त्यांतली डिज्नीच्या कल्पनाशक्तीची झेप त्यांना अतिशय आवडत असे. त्यासाठी लायब्रऱ्या धुंडाळायचे. रस्त्यावरच्या रद्दीवाल्यांकडे दोन-दोन तास पुस्तकांत रमलेले असायचे. कधी दुकानात जाऊन महागडी पुस्तकं आणायचे नाहीत. पण रद्दीवाल्यांकडच्या पुस्तकांत रस मोठा. एकदा तर असेच भाजी आणायला म्हणून गेले. दोन तासांनी आले, नि मागून एक माणूस. डोक्यावर एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे २४ हेऽ एवढाले खंड. आई म्हणाली, "आता हे ठेवायचं कुठे?!" ते घरही अगदी लहान होतं. जेमतेम अडीच-तीनशे स्क्वेअर फुटांचं घर. त्या घरात जिकडे तिकडे पुस्तकंच पुस्तकं असायची. आमच्यासाठी ते तेव्हा चिकार कॉमिक्स आणत असत.

'अमर चित्रकथा'साठी दादांनी खूप कॉमिक्स स्वत:ही केली आहेत. चित्रं दादांची नसत. मजकूर - संवाद दादांचे असत. अनंत पै दादांचे चांगले मित्र. ते दादांना वडिलांच्या ठिकाणीच मानत असत. 'अमर चित्रकथे'चे मीरचंदानीही दादांचे स्नेही. त्यांच्यासाठी दादांनी पुष्कळ काम केलं. मुद्दामहून 'आता बालसाहित्य लिहिलं गेलं पाहिजे, म्हणून मी बालसाहित्य लिहितो' अशी त्यांची भूमिका नव्हती. पण पिंडच मुळी तो. 'बालमित्र' हे मासिक सुरू केलं, तेही चक्क पदरचे पैसे घालून. ते ५-६ वर्षं चालवलं. तेव्हा आम्ही सोमण बिल्डिंगमध्ये राहत असू. आजूबाजूची मुलंही त्या कामात मदत करत असत. पॅकिंगपासून, गठ्ठ्यांवर पत्ते लिहिण्यापर्यंत आणि अंकाचे गठ्ठे पोस्ट करण्यापर्यंत सगळ्या कामांत मुलं सामील व्हायची. पण त्या अंकाची म्हणावी तितकी विक्री झाली नाही. तितकं मार्केटिंगही करता येत नसे. पण तोटा सोसूनही दादांनी आणि आईनी ते चालवलं. आईचे दागिने विकले. घरातली भांडीकुंडीही विकून त्यांनी 'बालमित्र' चालवायचा प्रयत्न केला. पण शेवटी कुठेतरी थांबणं भाग होतं. पैशाचं सोंग कुठून आणणार? आता आपल्याला हे जमत नाही, असं पैशाकडून नक्की झालं, तेव्हा 'बालमित्र' बंद करावं लागलं.


फाफेच्या एका चित्रकथेतला काही भाग

त्यांच्यापूर्वीचे श्री. बा. रानडे, ना. धों. ताम्हनकर हे त्यांचे आवडते बालसाहित्यकार. वाईरकरांची चित्रंही लाडकी. ते आमच्या घरचेच असल्यासारखे झाले होते. त्यातून फाफे आणि वाईरकरांच्या फाफेचं चित्र यांचं मेतकूट जमलं असावं. त्यांनी रेखाटलेला फास्टर फेणे अगदी सही सही उतरलेला आहे, तो त्यामुळेच. दादांना नेमकं काय अपेक्षित आहे ते वाईरकरांना बरोब्बर कळत असे.

अलीकडचा हॅरी पॉटर मात्र त्यांना आवडला नव्हता. त्यांच्या कुठल्याही गोष्टीतली साहसं मुलं सहज करू शकतील अशीच असत. वास्तवाच्या जवळचं, रोमांचक साहस त्यांना आवडे. एकदा जादू आणली की आव्हान संपलं, असं म्हणत.

त्यांना क्रिकेट मात्र प्रचंड आवडे. मधे एकदा आगरकरनं कुठल्याशा सामन्यात एकावर एक चिकार सिक्सर्स मारल्या होत्या, तर खूश होऊन त्यांनी आगरकरला स्वत: होऊन पत्र लिहिलं होतं! अगदी लहान मुलासारखं समरसून क्रिकेट बघायचे वरुणबरोबर. वरुण आणि चिनूच्यात – चिनू त्याची चुलत बहीण - १७ वर्षांचं अंतर आहे. चिनूनंतर १७ वर्षांनी आमच्या घरात वरुण आला. त्यालाही दादांनी खूप गोष्टी सांगितल्या. त्याच्याबरोबर क्रिकेट बघायचे. त्याच्या मित्रांशी गप्पा मारायचे. त्यांना गोष्टी सांगायचे. वरुणला बुद्धिबळ खेळायलाही त्यांनी शिकवलं. पण गंमत म्हणजे, एकदा वरुणनं त्यांना हरवलं होतं, तेव्हा केवढे चिडले होते!

दादांना स्वैपाक वगैरे करता येत नसे. पण प्रयोग करून बघायची हौस मात्र होती. "फक्त कांद्याबटाट्याचीच भजी काय म्हणून? आपण आंब्याची भजी करून बघू." असं म्हणून त्यांनी एकदा आंब्याची भजी करायचा प्रयत्न केला होता. त्या आंब्याचं जे काही झालं, ते झालं! पण हे आई घरात नसताना! एरवी आई घरात असेल, तेव्हा जेमतेम चहा करत. मात्र कितीही वेळा चहा देऊ केला, तरी त्यांना मनापासून आवडे. घरी आलेल्या कोणत्याही माणसाला, मग तो कुरियरवाला असेल, गॅस सिलिंडर घेऊन आलेला माणूस असेल, ते चहा विचारत. त्या प्रकारे आपण क्लास कॉन्शस न राहता माणसांशी जोडून घेऊ शकतो, असं काहीसं त्यांना वाटे.

त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन मिळत असे. पण सुरुवातीला तेही घ्यायला ते तयार नव्हते. स्वच्छ म्हणाले, "मी जे केलं ते मी माझ्या मर्जीनं माझ्या देशासाठी केलं. हे लोक कोण मला त्याबद्दल पेन्शन देणारे? मला गरज नाही." पूर्णविराम. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगून पाहिलं. तुम्ही नाही घेतलंत, म्हणून ते काही सरकारदरबारी जमा होणार नाही. कुणीतरी पुढे होऊन घेईलच. तुम्ही काही मागायला ते गेला नव्हतात. आता सरकारातून स्वत:हून विचारणा झालीय. मग मानधन म्हणून ते घ्यायला हरकत काय आहे? नाना प्रकारे सांगितलं, तेव्हा कुठे त्यांनी माघार घेतली.

त्यांची विनोदबुद्धी विलक्षण होती. अगदी शेवटपर्यंत. त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर त्यांना बाहेर आणलं तेव्हाची गोष्ट. त्यांचे केस तेव्हा पुरते पिकले होते. आईनस्टाईनसारखे होते त्यांचे केस. ते पांढरे केस तेवढे बघून एक वॉर्डबॉय त्यांना म्हणाला, "आता शांत झोपा बरं का आजीबाई. काळजी करू नका." तर त्याही अवस्थेत दादा तत्काळ म्हणाले, "अहो डॉक्टर, तुम्ही माझं नक्की कसलं ऑपरेशन केलंत?!"

***

रेवती भागवत, भारांच्या धाकट्या सूनबाई. त्या मात्र लहानपणापासूनच भारांच्या पुस्तकांच्या फॅन होत्या.


रेवती, भारा, लीलाताई आणि नातवंडे

माझ्यात नि दादांच्यात वयाचं अंतर खूप होतं. पण त्याचं दडपण तर येत नसेच, पण ते आपले सासरे आहेत असंही मला वाटत नसे. कारण त्यांचं प्रेमळ वागणं. वरुण होईपर्यंत मीच दादांच्या विठ्ठलवाडीच्या घरी अनेक वेळा जात असे. चंदर असतानाही आणि तो नसतानाही. मी माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन जात असे तिकडे. फार आवडायचं मला त्यांचं घर आणि तिथलं वातावरण.

दादांशी ओळख लग्नाच्या आधीचीच. ते माझे हीरो होते. मी खूप वाचत असे आणि स्पर्धाबिर्धांमध्येही भाग घेत असे. तर अशाच एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता मी. नि परीक्षक कोण असतील? भा. रा. भागवत! मला जो काही आनंद झालेला होता, की त्या आनंदात मी माझं भाषण विसरले! पण दादांनी नंतर मला थांबवून विचारलं, "तुला पुन्हा संधी हवी आहे का? मगाशी काहीतरी गडबड झाली. आता पुन्हा कर भाषण." मग मी पुन्हा भाषण केलं नि त्यांनी मला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं. मला इतकं कौतुक वाटलं होतं त्यांचं! भाषण विसरूनही मला बक्षीस! माझा दादांशी आलेला संपर्क इतकाच. पण पुढे चंदरशी लग्नाचं नक्की झाल्यावर मी चंदरला एकदा म्हटलं होतं, "तुला हो म्हणण्याचं कारण भा. रा. भागवत हेच आहे बरं का! उगाच हुरळून जाऊ नकोस! तू त्यांचा मुलगा नसतास तर मी अजून दहा वेळा विचार केला असता."

किती लाड करायचे ते, बाप रे! मी जाणार असले, की मुद्दामहून सायकलवरून जाऊन माझ्या आवडीचा काहीतरी खाऊ आणून ठेवायचे. बेकरी प्रॉडक्ट्स खूप मनापासून आवडायची त्यांना. दादांनाच नाही. या तिघाही जणांना. रवीदादा, चंदर आणि दादा, तिघांनाही. जे काही नवं बेकरीत येईल, ते प्रत्येक नवीन प्रॉडक्ट ते आणायचे. नानकटाई, खारी, बिस्किटं... घरात खाऊ कायम भरलेला.

त्यांच्याइतका साधा, ज्याला खऱ्या अर्थानं अजातशत्रू म्हणता येईल, असा दुसरा माणूस मी पाहिलेला नाही. त्यांच्या लोकप्रियतेची त्यांना गंधवार्ताही नसे; गर्व तर सोडाच. आपली सर्जनक्षमता काहीतरी विशेष आहे असं मिरवणं त्यांच्यात नावालाही नव्हतं. एकदा इकडे राहायला आले होते. त्या वेळी त्यांना तो रेल्वेचा पहिल्या वर्गाचा पास मिळत असे. त्याचं त्यांना अतिशय अप्रूप होतं. सरकारनं आपल्यासाठी किती केलं आहे, असं काहीतरी त्यांना वाटत असे! तर तेव्हा इकडून परतीचं रिजर्वेशन करायला जायचं होतं. त्यांचा हट्ट असा की ते इथून - माटुंगा रोडहून दादरला जाणार. तिथून गाडी बदलून व्हीटीला जाणार आणि मग तिकीट काढणार. तेव्हा त्यांचं वय किती असेल? पंच्याऐंशी वगैरे सहज. तरी आम्ही एजन्टला वगैरे तिकीट काढायला सांगितलेलं त्यांना अजिबात आवडायचं नाही. दुसरा छंद चालण्याचा. भरपूर चालायचे. इकडे आले की कायम हरिनिवासपासून राजा प्रकाशनपर्यंत, तिथून रानडे रस्ता, सेनाभवन... चालत. सगळीकडे चालत. एकदा सेनाभवनापाशी त्यांना एका अ‍ॅम्बेसेडर गाडीनं धक्का दिला. दोन्ही हात मोडले. त्या माणसानं दादांना उचलून गाडीत घातलं नि घराखाली आणून सोडलं. वर सोडायला काही तो आला नाही. "त्यानं वर तरी आणून सोडायला नको होतं का?" असं आम्ही विचारतो आहोत. पण दादांना काही त्या माणसाचा राग आला नाही. 'खालपर्यंत सोडून गेला' याचंच कौतुक.

किती मनापासून, दिलखुलास, लहान मुलासारखं निर्व्याज हसत असत! पुढे दातांचं ऑपरेशन झाल्यावर त्यांचे सगळे दात काढावे लागले होते. पण त्यांना त्याची लाजबीज वाटत नसे. मजेत असायचे. कवळी नीट बसायची नाही. खालची कवळी बसे. पण वरची कवळी बसत नसे. मग म्हणायचे, "खालची कवळी आहे, पण वरची 'टवळी' आहे!" विनोदबुद्धी शेवटपर्यंत जागी होती. पण एक मात्र होतं. रोजच्या व्यवहारात त्यांना कुणी मदत केलेली आवडायची नाही. अगदी रस्ता ओलांडतानासुद्धा नाही! कधीही हात धरू द्यायचे नाहीत. मग मी म्हणायची, "दादा, तुम्हांला नाही, मला भीती वाटते म्हणून मी तुमचा हात धरते. प्लीज मला धरू द्या." तेव्हा कुठे त्यांना ते पटायचं. नाहीतर त्यांना ते अगदी अपमानास्पद वाटत असे.

ते लीलाताईंच्या इतके बोलघेवडे नव्हते, पण त्यांना माणसं अतिशय आवडत असत. त्यांनी आनंदनगरमधे मुलांसाठी पेटी ग्रंथालय सुरू केलं होतं. भरपूर पुस्तकं. आजूबाजूची मुलंच मिळून ती लायब्ररी चालवत असत. मागे एक लहान मैदान होतं. दोघांनी - लीलाताई नि दादा – भांडून-आटापिटा करून ती जागा मुलांसाठी मिळवली होती. त्या घराचं नावही 'बालमित्र' असं होतं. तिथे त्यांनी मुलांसाठी बरीच शिबिरं वगैरे घेतली. त्यांत लीलाताईंचा सहभाग जास्त असायचा. त्या आउटगोइंग होत्या स्वभावानं. नंतर वयोपरत्वे दादा दमत. त्यांना कलकलाटाचा त्रास होई. पण लिहिणं मात्र शेवटपर्यंत चालू होतं. ते गेल्यानंतर त्यांनी करून ठेवलेली गोष्टींची अनेक लहानमोठी टिपणं सापडत होती. एक पूर्ण कादंबरी लिहून ठेवलेली सापडली. त्यांनी करून ठेवलेलं अपुरं–पूर्ण लेखन नीटपणे आवरण्याचं कामच आम्हांला तीनेक वर्षं पुरलं.

स्ट्रक्चर्ड, प्लान्ड या शब्दांचा नि दादांचा दुरूनही संबंध नव्हता. खऱ्या अर्थानं मोकळंढाकळं, स्वत:च्या मनासारखं आयुष्य ते जगले. मुलांसाठी तरतुदी करणं, त्यासाठी तत्त्वांशी तडजोड करणं, चिंता करणं, टेन्शन घेणं.. या सगळ्या मटिरिअलिस्टिक गोष्टींपासून ते फार दूर असायचे. त्यामुळे ती जबाबदारी लीलाताईंवर पडली, हा त्यातला तोटा. पण त्या दोघांमधे मात्र त्यावरून कोणताही वाद झाल्याचं मी कधीही पाहिलेलं नाही. लीलाताईंबद्दलची आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे ही. किती नाही म्हटलं, तरी मूळचा स्वभाव म्हणा, घेतल्या - न घेतलेल्या जबाबदाऱ्या नि भूमिका म्हणा, दादा आमच्या कुटुंबात लीलाताईंपेक्षा जास्त लोकप्रिय होते. लीलाताई काही स्वभावानं वाईट होत्या अशातला भाग नाही. पण दादा जास्त पॉप्युलर होते खरे. पण त्या कधीही तसं बोलून दाखवत नसत. त्याची त्यांना खंतबिंत तर बिलकूलच नसे. त्या काळातल्या जोडप्यांमध्ये इतकं आधुनिक असलेलं हेच एक जोडपं मी बघितलं. चंदरला म्हणू दे असं, की त्याला आईचं नोकरी करणं नि वडलांचं नोकरी न करता लेखन करणं - यांत अजिबात वेगळं काही जाणवलेलं नाही. पण त्या काळात ते विलक्षण आधुनिक असंच होतं.


लीलाताई आणि भारा

त्यांच्या आधुनिकतेचा दुसरा पैलू म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षाही आपण दिलेल्या शब्दाला किंमत देणं. एक साधं उदाहरण. चंदरचा एक चिनी मित्र आहे - चॅंग. तो दादांच्या मुंबईच्या जागेत राहत होता. तेव्हाच चंदरची चुलत बहीण चिंगी फ्रान्सहून आली होती, तिलाही राहायला जागा हवी होती. बरं, त्या दोघांचीही चांगली मैत्री होती. पण त्यांनी एकत्र राहणं काही दादांना पटण्यासारखं नव्हतं! मग आता बाहेर कोण राहणार? सख्खं चुलत नातं; परत चिंगी पडली मुलगी. पण दादांची कमाल म्हणजे, त्यांनी चॅंगला बाहेर जाऊ दिलं नाही. एकदा एखाद्या माणसाला एक गोष्ट कबूल केली की केली. मग रक्ताची नाती, हितसंबंध, स्वार्थ जपायसाठी शब्द फिरवणं वगैरे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. चिंगीला इतकं सुंदर पत्र लिहिलं त्यांनी, की तिच्या मनातही याबद्दल काही कटुता आली नाही. हीदेखील एक प्रकारची आधुनिकताच म्हणायला हवी.

-----

मुलाखत: अमुक, मेघना भुस्कुटे.
शब्दांकन: मेघना भुस्कुटे
चित्रस्रोतः भागवत कुटुंबीय

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

मुलखतींचे दोन्ही भाग आणि सगळे फोटो अप्रतिम! धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तच मुलाखत! अप्रकाशित कादंबरी कुठे आहे सध्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

प्रकाशकांच्या ताब्यात. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे सगळं एखाद्या मासिकात किंवा पुस्तकात आलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बालसाहित्यातल्या अद्वितीय कामगिरीबद्दल मला भारांची तुलना नेहमी डॉ. स्यूससोबत कराविशी वाटते. इथे छायाचित्रात भारा त्यांच्या नातवाला डॉ. स्यूसचेच 'कॅट इन द हॅट' वाचून दाखवताना पाहून या विलक्षण योगायोगाची गंमत वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! काय उमदा माणूस होता!
असते तर भेटायला खूपच आवडलं असतं असं मुलाखती वाचताना राहून राहून वाटत रहातं!

छायाचित्रही नेमकी आणि बोलकी!

मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाह! काय उमदा माणूस होता!
असते तर भेटायला खूपच आवडलं असतं असं मुलाखती वाचताना राहून राहून वाटत रहातं!

+१ अगदी, अगदी!!!
भारांच्या उमद्या स्वभावाबद्द्ल आणि त्यांच्या आणि लीलाताईंच्या सहजीवनाबद्द्ल कुठेतरी ओझरते वाचले होते, पण त्यांच्या कुटुंबियांच्या ह्या मुलाखती खूपच आवडल्या.
मनापासून धन्यवाद! Smile

अवांतर - भारांचे चरित्र किंवा आत्मकथन उपलब्ध आहे का? वाचायला आवडेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमदा माणूस

एकदम बरोब्बर वर्णन.
आंब्याची भजी हा प्रसंग फार आवडला. नवनवीन प्रयोग करण्याचा स्वभाव अन काय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहान वयात भा.रांची पुस्तकं फार वाचली नाहीत याची आता खंत वाटते. आता मिळवून वाचायला हवीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.