भा. रा. भागवत यांचे भाराभर आभार

भा. रा. भागवत यांचे भाराभर आभार

- जयंत नारळीकर

.
मला वाचनाची गोडी लागली लहानपणापासूनच. मी आणि माझा धाकटा भाऊ झोपायच्या मार्गावर असताना आमची आई (तिचे घरचे नाव 'ताई') आम्हांला गोष्टी वाचून दाखवीत असे. मूळ गोष्ट इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत असली तरी आमचे माध्यम होते 'मराठी'. अर्थात ताईचा स्वत:च्या गोष्टींचा साठा अफाट होता. त्यांत पौराणिक गोष्टी आणि परीकथा प्रामुख्याने असत. पण हा साठा संपल्यावर तिने पुस्तके वाचून दाखवण्याचा प्रघात चालू केला. इंग्रजीत वुडहाउस, कॉनन डॉएल, हिंदीत 'चंद्रकांता' आणि 'बेढब बनारसी', तर मराठीत चिमणराव, वीरधवल आदींचा खुराक आम्हांला पुष्कळ दिवस पुरेल असा होता.

पण ह्या गोष्टी एका रात्रीत संपणाऱ्या नसत. 'अरेबियन नाईट्स'मधल्या शाहजादीप्रमाणे ताई गोष्ट अर्धवट सांगून "आता उद्या पुरी करू, झोपा आता!" असे फर्मान सोडे. झोपेचा अंमल वाढत असताना ह्या फर्मानाला विरोध करण्याच्या स्थितीत आम्ही नसू. पण गोष्टीत पुढे काय झाले हे जाणून घ्यायची उत्सुकता तर असे. अखेर त्यावर मला तोडगा मिळाला!

तो तोडगा होता स्वावलंबनाचा. दिवसा शाळा, घरचा अभ्यास, खेळ यांतून वेळ काढत मी स्वत: गोष्टी वाचायला लागलो. आदल्या रात्री ताईने अर्धवट सोडलेली गोष्ट पुरी करण्यापासून ह्या वाचनाची सुरुवात झाली व क्रमशः मी स्वतः निवडलेली पुस्तके वाचू लागलो. त्यासाठी निवडलेली पुस्तके अर्थातच वाचायला सोपी असत.

अशा वेळी मला भा. रा. भागवतांची काही पुस्तके वाचायला मिळाली; ती खास शाळकरी मुलांसाठी लिहिलेली होती. अशा माध्यमाचा मला पुष्कळ फायदा झाला. उदाहरणार्थ इंग्रजीत व्हिक्टोरियन जमान्यात गाजलेले पुस्तक 'King Solomon's Mines' . ते मला त्या वयात वाचायला अवघड वाटले होते. पण भागवतांनी लिहिलेला त्याचा मराठी संक्षिप्त अवतार 'राजा सुलिमानचा खजिना' माझ्या आवाक्यातला होता!

अर्थात अशा एका यशस्वी उदहरणाने प्रश्न संपत नाही.मला भारांच्या इतर पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली. मी पहिल्यांदा वाचलेली पुस्तके ('८० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा', 'तीन शिलेदार', आदी) मला महाराष्ट्रातून आलेल्या पाहुण्यांकडून भेट म्हणून मिळाली होती. आम्ही राहत होतो बनारसमधे. तिथे मराठी पुस्तके मिळण्याचे ठिकाण नव्हते. अशा वेळी माझे वडील कामानिमित्त मुंबईला गेले, तर स्वतःकरिता पुस्तके घेताना (त्यांचे आवडते दुकान 'न्यू बुक कंपनी', हॉर्न्‌ बी रोड) माझी ऑर्डरपण लक्षात ठेवत. एरवी २/४ वर्षांतून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई - पुणेमार्गे आमची कोल्हापूरला भेट व्हायची. त्या वेळी विकत घेतलेल्या पुस्तकांत भारांचे वाङ्मय हटकून असे.

आज मागे वळून पाहताना 'क्लासिक' समजली जाणारी अनेक पुस्तके सोप्या मराठीत रूपांतरित करून भारांनी ६०-६५ वर्षांपूर्वी माझ्यासारख्या शाळकरी मुलावर जे उपकार केले, त्यासाठी आज त्यांचे भाराभर आभार मानीत आहे. इंग्रजीतील विख्यात वाङ्मय अशा तर्‍हेने माझ्या परिचयाचे झाले आणि पुष्कळ वर्षांनी ते मूळ इंग्रजीत वाचणे सोपे गेले.

वरील वर्णन लिहून झाल्यावर मला भारांचे आणखी लिखाण वाचायला मिळाले. निवडक विज्ञान कादंबऱ्यांचे मराठीत रूपांतर करून भागवतांनी शाळकरी मुलांपुढे ह्या वेगळ्या प्रकारच्या साहित्य मांडले. ही पुस्तके वाचताना मला स्वतःला आपण परत 'टीन एजर' झालो असे वाटले! कारण एच्. जी. वेल्स् आणि ज्यूल व्हर्न यांचे विज्ञानकथाविश्व मी मूळ इंग्रजीमधून अनुभवले असले, तरी भारांच्या खास शैलीतली रूपांतरे वाचताना मी सहजगत्या 'त्या' वयोगटात गेलो आणि तेही नकळत, स्वाभाविकपणे.

उदाहरणार्थ एच्. जी. वेल्सच्या 'अदृश्य माणसा'चे कथानक मूळ इंग्रजीत वाचताना मनोवेधक वाटते, तसेच विचारप्रवर्तकही. शाळकरी वाचकाला त्यातील बरेच भाग 'जड', म्हणजे कळायला - अनुभवायला अवघड, वाटतील. भारांच्या रूपांतरात कथानक सहजगत्या कळण्याजोगे आहे. आणि त्याच वेळी कादंबरीतला वैज्ञानिक पाया मूळ लेखकाला अपेक्षित असाच आहे. शिवाय हुशार, कल्पक वैज्ञानिक संशोधक नीतिमत्ता झुगारून वागायला लागला तर तो समाजकंटक होतो हा संदेश शाळकरी वाचकापर्यंत पोचवण्यात रूपांतरकार यशस्वी होतो.

वास्तविक, शालेय वाचकाना कथानकाशी खिळवून ठेवताना आणि संक्षिप्त आवृत्तीची बंधने पाळताना असे यशस्वी लेखन किती अवघड असते ते लेखकच जाणे.

विज्ञानकथांच्या विश्वात आदिपुरुषांत गणले जाणारे ज्यूल व्हर्न यांचे लेखन किशोरवाचकांपर्यंत मराठीतून पोचवण्यात भारांनी लक्ष घातले ही विज्ञानकथासाहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना होती. अमुक अमुक प्रकारच्या गोष्टीला विज्ञानकथा म्हणायचे हे पाठ्यपुस्तकीय रटाळ परिभाषेत न सांगता ज्यूल व्हर्नच्या लेखनाच्या रूपांतराद्वारे सहजगत्या सांगण्याचे काम भागवतांनी केले, त्याबद्दल मराठी साहित्य त्यांचे सदैव ऋणी राहील. विज्ञानकथा म्हणजे सदैव अंतराळयात्रा नसते हे भागवतांनी रूपांतरित केलेल्या व्हर्नच्या '८० दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा'मधून कळते. एरवी कथानक साहसकथेसारखे वाटले, तरी शेवट अनपेक्षित असून त्यामागे एक वैज्ञानिक तथ्य आहे. हे तथ्य पाठ्यपुस्तकातून सांगितले तर विद्यार्थ्यांना (सध्याच्या शिक्षणपद्धतीतल्या!) कळेल की नाही ही शंकाच आहे. पण ह्या विज्ञानकथेत ते कथानकातील उत्कर्षबिंदू म्हणून येते आणि वाचकांना विचार करायला लावते.

म्हणून गाजलेल्या विज्ञानकथा-कादंबऱ्या मराठीत रूपांतरित करायची किमया करून दाखवणाऱ्या भा. रा. भागवतांना अनेक धन्यवाद - माझ्यासारख्या वाचकाकडून...

***

टिपा:
भारांच्या विज्ञानाधारित लेखनात काही त्रुटी सापडल्या. त्यांची (उदाहरणार्थ) नोंद :-

१. पाताळलोकची अदभुत यात्रा : "अस्ति उत्तरस्यां दिशिदेवतात्मा..." हा श्लोक 'रघुवंशा'तला नाही. तो 'कुमारसंभवा'तला पहिला श्लोक आहे.
२. चंद्रावर स्वारी : गोळा 'दिसला पाहिजे' याकरिता त्याचा व्यास ६० फुटांपेक्षा कमी का चालणार नाही?
३. धूमकेतूच्या शेपटावर / शेंडे नक्षत्र / चंद्रावर स्वारी : यांत weightlessness चा उल्लेख का नाही?

***
चित्रः जालावरून साभार

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

संक्षिप्त पण छान! Smile

नारळीकर सर, नमस्कार. या निमित्ताने सांगू इच्छितो की तुमचे विज्ञानकथालेखन मला अतिशय सुपर्ब वाटते. विज्ञानाची गरुडझेप, विज्ञान आणि वैज्ञानिक हे लेखसंग्रह तसेच प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील भस्मासूर, इ. लेखनाचा मी जबरदस्त फॅन आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

इथे लिहिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!

>

कारण मूळात ज्यूल व्हर्नच्या लेखनात वेटलेसनेसचा उल्लेख नाही.

मला वाटतं असा उल्लेख नक्कीच आहे. अगदी सुरुवातच तशी आहे. अचानक हलके झाल्याचा फील येऊन कथेतली पात्रं लांबलांब उड्या मारत आणि जवळजवळ हवेत तरंगत कुठेतरी जातात असा उल्लेख आहे. पण आता पुन्हा पुस्तक काढून खात्री करायला हवी.

खूप छान लेख सर. तुमच्यामुळे आम्हाला विज्ञानात रस उत्पन्न झाला. तुमच्या कथामुले विज्ञान सहजसोपे झाले.

फार आनंद झाला आपला लेख वाचून सर.

"अस्ति उत्तरस्यां दिशिदेवतात्मा..." हा श्लोक 'रघुवंशा'तला नाही. तो 'कुमारसंभवा'तला पहिला श्लोक आहे.

तसेच "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" या पुस्तकात जुन्या तलवारीवर अर्धा श्लोक आणि म्यानावर अर्धा श्लोक असा कोरलेला असतो आणि पूर्ण श्लोकाची समस्यापूर्ती केल्यावर खजिन्याचा पत्ता सापडणार असतो. एका पार्टीकडे म्यान असतं (संजू राजू) आणि अन्य एका पार्टीकडे (बोटीवरची दुष्ट माणसे) तलवार असते.

पुस्तकात सुरुवातीला म्यानावरचा श्लोक वाचताना "आग्नयेस्तु प्रशान्तस्तु जलद्रव्याधिरक्षकः" अशी ओळ ते वाचतात.

नंतर कथेच्या मध्याजवळ साहसयात्रेदरम्यान धाडसाने त्या बोटीवर प्रवेश मिळवून संजू राजू जेव्हा तलवार हस्तगत करतात तेव्हा त्या तलवारीवरचा श्लोकाचा उरलेला अर्धा भाग वाचतानाही ते तीच ""आग्नयेस्तु प्रशान्तस्तु" ओळ वाचतात.

तशी छोटीशी बाब.. पण बारकाईने फारच इनव्हॉल्व होऊन कादंबरी वाचत असल्याने जाणवली होती.

जयंत नारळीकर हे सदस्यनाम वाचून खूप छान वाटले. जागतिक ख्यातिचे मराठी शास्त्रज्ञ म्हणून लहानपणापासून आपल्याबद्दल अत्यंत आदर राहिला आहे.
------------------------------------------------------
F = GMm/r^2 हे समीकरण मला सरांच्या कोणत्यातरी पुस्तकात प्रत्यक्ष सिलॅबसमधे यायच्या बरेच वर्षे अगोदर ठावे होते.
७-१० ते दहावी पर्यंत कोठेतरी त्यांचा एकदा एक मराठी धडा होता.
११ कि १२ वी ला आपली ट्रोजन हॉर्स म्हणून एक अत्यंत रोचक कथा इंग्रजी विषयाच्या पाठ्यक्रमात होती.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

छान!

चंद्रावर स्वारी मध्ये वजन नसल्याचा उल्लेख :
या पेरेलमान च्या पुस्तकातून एक आठवण... (व्हर्नचे मूळ पुस्तक वा कुठलेही भाषांतर मी वाचलेले नाही).
व्हर्नने असा उल्लेख केलेला आहे, पण गुरुत्वाकर्षण विज्ञानाच्या विपरीत केलेला आहे. चंद्रयान प्रवासात मध्ये अशा एका ठिकाणी पोचते, तिथे चंद्र आणि पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण ठीक विरुद्ध दिशेला आणि समसमान असते. त्या ठिकाणी थोड्या काळाकरिता प्रवासी वजनरहित स्थिती अनुभवतात.

व्हर्न बहुधा लाग्रांज बिंदूंबाबत विचार करत असावा. परंतु यान तोफेतून बाहेर पडताच प्रवाशांना वजनरहित स्थितीचा अनुभव झाला असता. आणि चंद्रावर उतरताना रेट्रोरॉकेटे वापरायला लागल्यावर पुन्हा वजनाचा अनुभव होऊ लागला असता. लाग्रांज बिंदूंचे या बाबतीत काही महत्त्व नाही.

ज्या मुलांनी या गोष्टी लहानपणीच वाचल्या अथवा मोठ्यांकडून ऐकल्या ते खरंच भाग्यवान.

आता मोठ्या फोन्सचा/टॅबचा प्रसार झाला आहे आणि इ-बुक्स डाइनलोड करून (pdf) प्रवासात वाचता येतात.इंग्रजीतली फ्री डाउन लोडस असंख्य आहेत.-१)ebooksgo dot org, २)project _Gutenberg. आणि ३) वर उल्लेख झालेली ज्युलस वर्न ची पुस्तके डाउनलोड केली आहेत.

लेख आवडला. काही दिवसांपूर्वी जेव्हा लेख प्रदर्शित झाला तेव्हा लाईक बटनवर क्लिक करणारा मी पहिला होतो. आणि कदाचित याच लेखामुळे ऐसीचं सदस्यत्व घ्यावसं वाटलं जेणे करून प्रतिक्रिया नोंदवता येईल.

अतिशय अप्रितम लेख.