सरदारी बेगम - एक संगीतिक सुन्न अनुभव
सरदारी बेगम
बंगलोर मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझा मित्र , सतीश , राहत आहे. काल त्याला भेटायला गेलो होतो. बंगलोरचे भयाण ट्राफिकमुळे दोन तास लागले. सतीशला बराच वेळ रिसेप्शनमध्ये तातकळत बसावे लागले. वर्षभराने भेटत होतो त्यामुळे गप्पा लगेच रंगल्या. आमच्या अनेक आवडीनिवडी समान आहेत आणि म्हणून मैत्री २० वर्षे टिकून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मात्र त्याच्या (कु)चेष्टेचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंद संगीत सुरु होते. गिटार , सतार आणि तबला ह्यांचे फ्युजन ( बहुतेक प्रेम जोसुआचे) ऐकत त्याने आपल्या भारतीय संगीताची ( खरेतर माझी ) मापे काढायला सुरवात केली.
“ ही गिटार बघ कशी मस्त आहे , मी तुझी वाट पाहत हेच ऐकत होतो. एकदम फक्कड गिटार वाजवतो आहे हा कलाकार ! नाही तर ते तुमचे बडा आणि छोटा ख्याल ! लवकर सुरूही होत नाहीत आणि थांबत नाहीत.”
मला मनातल्या मनात हसू आले आणि त्याला विचारले – आवडले ना तुला हे संगीत? म्हणजे आवडण्यासारखेच आहे ते ! कारण हा जो राग वाजवतो आहे तो “नंद” आहे.
सतीश एकदम आश्चर्य चकित झाला.
त्याची खात्री पटवण्यासाठी सांगितले की एकदा मनात लाताबैंचे ‘तू जहा जहा चलेगा’ हे मेरा साया मधील गाणे आठव आणि पहा सूर ओळखीचे वाटतात का ते ?
ही टेस्ट लागू पडली आणि तो थोडा वरमाला.
खरे तर सतीशला गाणे चांगले समजते. उगाच आपल्या संगीताबद्दल त्याचे थोडे पूर्वग्रह आणि थोडे मला चिडवण्याचे समाधान !
तुला मी अजून एक गाणे पाठवतो. ‘कायप्पा’ वरून मी त्याला माझ्या खाजीन्यामधील अनमोल रत्न पाठवले. हे ऐक आणि ते ऐकलेस की तुझा नंद राग पक्का झाला समज ! ‘तू जहा जहा चलेगा’ इतकेच सुंदर असे नंद रागावर आधारित ते गाणे होते –
घर नाही हमरे श्याम |
वो जाके परदेस विराजे, सुना हमरा धाम ||
विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला हा नितांत सुंदर नंद त्याला अपेक्षेप्रमाणे आवडला.
“कोणता अल्बम आहे ? कुठे सापडले तुला हे गाणे?” सतीशचे कुतूहल.
“ अरे हा अल्बम नाही. सरदारी बेगम नावाच्या एका सुमारे २० वर्षापूर्वीच्या सिनेमातले हे गाणे आहे.
आज रात्री पहा जमले तर ! सगळी गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित आहे आणि तुला ती आवडणार नाहीतच पण सिनेमा नक्की आवडेल. कारण ‘सरदारी बेगमचा ‘डायरेक्टर’ तुझा आवडता श्याम बेनेगल आहे.
मेहमूद अब्बासी हे आग्र्या मधील प्रतिष्ठित वकील. त्यांना छोटा जब्बार आणि मोठी सरदारी ही मुलगी. सरदारीला गाण्याचे प्रचंड वेड. खानदानी मुस्लिम घरात मुलीने गाणे शिकणे आणि गाणे जवळ जवळ ‘नापाक’. त्यामुळे घरून तिच्या गाणे शिकण्याला तीव्र विरोध ! संगीताचे वेड लागलेली सरदारी बंड करते आणि घर सोडून जाते आणि इद्दनबाई ह्या गायिकेच्या आश्रयाला जाते. सरदारीची गाण्याची तयारी पाहून ती अचंबित होते पण तरीही तिला आश्रय देण्याचे नाकारते. ह्याच इद्दनबाई बाईकडे हेमराज ( अमरीश पुरी ) सरदारीला ऐकतो आणि तिच्या आवाजावर (आणि रूपावर) भाळतो. हेमराज विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचा विरोध पत्करून हेमराज सरदारीला आश्रय देतो. हेमराजच्या घरच्या मैफिलीमध्ये सरदारी ‘घर नाही हमरे श्याम ‘ हे गाणे गाते आणि सादिक, हेमराज चा दोस्त, सरदारीकडे आकृष्ठ होतो. दरम्यान हेमराज पासून तिला दिवस जातात आणि हेमराजच्या सरदारी वरच्या प्रमाला ओहोटी लागते. सादिक सरदारीला गरोदर असतानाही स्वीकारतो. पुढे सकीनाचा जन्म होतो आणि सरदारीच्या गाण्याची कीर्ती सर्वदूर पसरते.
सिनेमाला हिंदू-मुस्लीम धार्मिक तणावाचीही पार्श्वभूमी आहे आणि सिनेमाची सुरवात दंगलीने होते. सरदारी ला एक दगड लागतो आणि ती मरण पावते. ही बातमी कव्हर करायला तहजीब ही तरुण पत्रकार येते. सरदारीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिला समजते की सरदारी तिची सख्खी आत्त्या आहे. तिची तिच्या आत्याच्या विषयीची सहानुभूती जागी होते आणि ती तिच्या बॉस (आणि प्रियकरसुद्धा) असलेल्या एडिटर चा विरोध पत्करून सरदारी विषयीची अधिक माहिती मिळवत जाते. संपूर्ण सिनेमा हा तहजीबच्या ‘मुलाखतीमधून’ उलगडत जातो. सरदरीचे गाण्यावरचे प्रेम आणि माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादा कलेकलेने उलगडत जातात. श्याम बेनेगल सारखा प्रतिभावान दिग्दर्शक एका छोट्या कथाबीज असलेल्या विषयामध्ये अत्यंत समर्थपणे प्रत्येक नात्याचे पदर उलगडत नेतो.
जब्बार ( सरदारीचा भाऊ ) आणि सरदारी ह्याचे प्रेम आणि आर्थिक बाबी , जब्बार आणि तहजीबमधील बाप मुलीचे संबंध , सकीनाचे अस्फुट प्रेम , तहजीबचे बॉसशी संबध आणि बेबनाव आणि शेवटी सकीना आणि सरदारीचे - आई आणि मुलगी ह्यांच्यामधील सप्रेम खदखद ! बाप मुलगी , स्त्री –पुरुष आकर्षण ह्या विषयांनी सुरवात झालेला सिनेमा मानवीनाते संबंध ह्या गहन विषयाभोवती फिरत संपतो.
सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबी उत्तम आहेत. माझ्या दृष्टीने सिनेमामधली वनराज भाटीया यांचे संगीत आणि गाणी अप्रतिम !
ज्या गण्यामुळे हा सिनेमा वाचकांना पहावयास सुचवतो आहे ते ‘घर नाही हमरे श्याम’ ह्या राग नंद मधील गाण्याचे कौतुक झालेच एकदा आहे. ठुमरी अंगाने गायलेल्या ह्या गाण्यामध्ये समेवर येण्यासाठी जी अप्रतिम मिंड वापरली आहे हे एक सौंदर्यस्थळ आहे . परत परत ऐकावे असे .....
‘मोरे कान्हा जो आये पलटके’ हे आशा भोसले यांनी गायलेले , उत्तर भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीतावर आधारित दुसरे अप्रतिम गाणे. सिनेमा पुढे नेण्यासाठी ह्या गाण्याचा दिग्दर्शकाने मस्त वापर केला आहे.
‘सावरिया देख इस ओर’ हे मिश्रपिलू माधिक गाणे शुभा जोशी ह्यांनी छान गायले आहे.
‘हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था’ ही मांड रागावर आधारित अजून एक सुंदर रचना. सरदारीच्या कारकीर्दीच्या शेवटची सुरवात सुचवणारे हे गाणे.
‘चाहे मार डालो राजा’ हा राग मारुबिहाग वरील मुजरा आशाबाईने गायला आहे. आशा भोसले - सिर्फ नाम काफी है !
‘चली पिके नगर’ ह्या आरतीजींच्या आर्त भैरवीने ही सिनेमाची सुरेली मैफिल संपते आणि एक संगीतिक सुन्न अनुभव घेतल्याचे समाधान मिळते !!
समीक्षेचा विषय निवडा
‘चली पिके नगर’ ह्या
‘चली पिके नगर’ ह्या आरतीजींच्या आर्त भैरवीने ही सिनेमाची सुरेली मैफिल संपते आणि एक संगीतिक सुन्न अनुभव घेतल्याचे समाधान मिळते !!
कथा सुन्न करणारी असू शकेल, पण लेखात तो शब्द संगीताबद्दल वापरला आहे असे वाटले.
चित्रपटातील गीते खूप आवडली, सुन्न वगैरे वाटले नाही. कदाचित चित्रपटात बघितली असती तर वेगळे वाटू शकले असते.
Shot in the dark
हा चित्रपट नवा होता तेव्हा पाहिला होता आणि त्यातील किरण खेर आणि अमरीश पुरी ह्यांची कामेहि लक्षात राहिली होती. ह्या धाग्याच्या निमित्ताने तो पुनः पाहण्याची इच्छा झाली पण नेहमीची जागा यूट्यूबने ह्या बाबतीत निराशा केली.
काही आशा नव्हतीच पण shot in the dark म्हणून आमच्या पब्लिक लायब्ररीत जालावरून शोध घेतला आणि -अहो आश्चर्यम् -चित्रपटाच्या DVD च्या दोन प्रती उपलब्ध आहेत असे दिसले. आता लगेच नंबर लावला आहे. ५-६ दिवसांनी मिळेलसे दिसते.
लेख
लेख आवडला. शास्त्रीय संगीतावर टीका करण्याचे कारण समजले नाही. कुठले गाणे ऐकायचे त्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच की. माझ्या अनुभवाने, आधी रागावर आधारलेली गाणे ऐकून मग जर तो राग ऐकला तर लवकर आकलन होते. कानाला गोड लागण्यासाठी त्यामागचे शास्त्र समजावून घेण्याची आवश्यकता नाही. अर्थात, कानाला गोड न लागणारा एकाही राग, आज पर्यंत मी ऐकलेला नाही.(मूळ राग) बाकी मोडतोड, विसंवादी फ्युजन हे सगळे सोडून.
हुसैन जब के चले..
सरदारी जेव्हा इद्दनबाईकडे गाणे शिकायला येते त्यावेळी मीर अनीस यांचा एक कलाम गाते, जी रचना मला फार आवडते. आरती अंकलीकर-टिकेकरांनी गायली आहे.
.
तीच त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात अधिक खुलवून गायली होती. (८:४५ मि. पासून पुढे)
.
पारंपरिक पद्धतीच्या गाण्यात ती अधिकच गुंग करून टाकणारी आहे -
अवान्तर - किरण खेर - खामोश पानी
किरण खेर ह्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो.
त्यांनी काम केलेला 'खामोश पानी' नावाचा पाकिस्तानी सिनेमा यूटयूबवर येथे उपलब्ध आहे. फाळणीनंतर इच्छेविरुद्ध पाकिस्तानात अडकून पडलेल्या मूळच्या शीख पण आता मुस्लिम स्त्रीची झिया-उल-हकच्या जमान्यातील ही करुण कहाणी आहे.
अवश्य पहा.
लेख आवडला
सरदारी बेगम चित्रपटाची फक्त गाणीच ऐकली आहेत. लेख आवडला.
( तेवढा 'सुन्न' शब्द बदलायचे बघा ब्वॉ. सुन्नशी नकारात्मक संकेतच जास्त निगडित आहेत. )