Skip to main content

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही. ती एकाच वेळी समाजातील वर्गघर्षणाची (संघर्ष हा शब्द जरा कठोर होईल) आणि पात्रांच्या वैयक्तिक संघर्षाचीही आहे.

जेव्हा मी चित्रपटाचं कथानक म्हणतो, तेव्हा प्रत्यक्षात पडद्यावर मात्र एकाच वेळी दोन कथानकं घडत असतात. एक आहे ते म्हणजे बनारससारख्या प्रातिनिधिक भारतीय शहरात एका निम्न मध्यमवर्गीय ब्राह्मण घरात आपल्या वडीलांसोबत (संजय मिश्रा) राहणार्‍या देवी पाठक (रिचा चड्ढा) या तरूण मुलीचं. आणि दुसरं आहे ते याच बनारसच्या घाटावर राहणार्‍या डोंब समाजातल्या दीपक चौधरी ( विकी कौशल) या सिविल इंजिनियरींग शिकणार्‍या तरूणाचं. हिंदू समाजाच्या उतरंडीत सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्‍या या ‘तरूण भारता’चा आपापल्या आयुष्याशी चाललेला संघर्ष ‘मसान’ अतिशय संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो.

प्रथम देवी पाठकची गोष्ट आपल्यापुढे उलगडायला सुरूवात होते. आपल्या प्रियकरासोबत एका नाजूक क्षणी , नको त्या अवस्थेत पोलिसांच्या हाती सापडल्यावर या धक्क्याने तिच्या प्रियकराचा झालेला मृत्यू; त्यातच भ्रष्ट पोलिस अधिकार्‍यांकडून त्यांचा ‘तो’ व्हीडीओ ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन करण्यात येणारी आर्थिक पिळवणूक; परिस्थितिने आधीच गांजलेल्या बापाशी होणारी सततची चिडचिड, कटकट; छोट्या शहरातील कोत्या मनोवृत्तीने आणलेला उबग आणि या सगळ्या गुंताड्यातून पाय मोकळा करून घेऊन सुटका करून घेण्याची, ‘फ्लाय अवे’ करण्याची देवीची धडपड इत्यादी रिचा चढ्ढा ही गुणी अभिनेत्री दिग्दर्शक नीरज घेवनच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिणामकारकतेने आपल्यासमोर सादर करते. आणि त्याला माध्यम ठरते ते अविनाश अरूण (‘किल्ला’चा दिग्दर्शक) याचे अप्रतिम कॅमेराकाम. दिग्दर्शकाने रिचाच्या चेहर्‍यावर मुळातच असलेल्या एक नैसर्गिक अ-सुंदरतेचा, नॉन-गुडी अशा थोडयाश्या ‘आगाऊ’ लूकचा चतुर वापर करून घेतलेला आहे. संजय मिश्रा याने साकारलेला एक सर्वसामान्य ,पापभीरू , कुटुंबवत्सल बाप लक्षात राहतो. अत्यंत गुंतागुंतीची, अनेक छटांची आणि बदलत्या मनोवृत्तीची ही भूमिका समर्थरित्या साकारून संजय मिश्राने अभिनयाचं एक अजून शिखर सर केलं आहे.

अविनाशचाच कॅमेरा आपल्याला दीपकची दुसरी गोष्टही दाखवतो. स्मशानातला परंपरागत व्यवसाय सोडण्याची मनोमन इच्छा असलेला दीपक विकी कौशलने अगदी नैसर्गिकपणे उभा केला आहे. व्यवसायाने डोंब असला , अशिक्षित असला तरी मुलाच्या आकांक्षा जाणणारा दीपकचा ‘पुरोगामी’ पिता विनीत कुमार या कसलेल्या नटाने मोठ्या ताकदीने साकारला आहे. त्यानंतर मग अमोल पालेकरांच्या मध्यमवर्गपटातल्या प्रेमकथांची आठवण करून देणारी दीपक व शालू गुप्ता( श्वेता त्रिपाठी) यांची ठराविक वळणं घेत जाणारी उत्फुल्ल, रोमॅण्टीक प्रेमकहाणी हळुहळू प्रेक्षकाचा ताबा घेऊ लागते. दुसरीकडे समांतर चाललेल्या देवी आणि तिच्या गोष्टीतला तणाव हलका करण्यास दीपक- शालूची प्रेमकथा मदत करते.

शालूचा तथाकथित उच्चवर्णीयपणा आणि दीपकचा तथाकथित मागासवर्गीयपणा या दोघांच्या प्रेमाआड येतो का अशी धाकधूक आपल्याला वाटत राहते. कारण अशा प्रकरणात खराखुरा समाज आणि सिनेमातला समाज कसा वागतो हे आपण अनेकवेळा पडद्यावर आणि पडदयाबाहेरही अनुभवलेलं असतं. चित्रपटातील पात्रांबद्दल अशी भावना होणं हीच चित्रपटाच्या यशाची पावती आहे. त्यामानाने देवीच्या कथेतील ‘पुढे काय?’ हा फॅक्टर तितकासा परिणामकारित्या उतरलेला नाही. तरीही इतकी बांधेसूद, संवेदनशील पटकथा लिहिल्याबद्दल लेखक- पटकथाकार आणि ती तेवढ्याच तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी संकलक- दिग्दर्शक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.

समांतर चालणार्‍या एकापेक्षा अधिक कथानकप्रवाह असलेल्या चित्रपटाचं संकलन हे आव्हानात्मक आणि जोखमीचं काम आहे आणि ते नितीन बैद याने पेललं आहे. असली समांतर कथानक पडद्यावर दाखवताना समतोल सांभाळणं ही खरोखरंच तारेवरची कसरत असते. लंबक कुठल्याही एकाच बाजूला वाजवीपेक्षा जास्त वेळ झुकलेला राहिला तर चित्रपट अयशस्वी होऊ शकतो.

तसं पाहिलं तर हे भारतात कुठेही घडू शकणारं कथानक. परंतु बनारसच निवडण्यामागे इतर काही कारण असावीत असं वाटतं. लेखक- दिग्दर्शकाचा त्यांच्या ‘अप ब्रिंगिंग’च्या दृष्टीने असलेला एक ‘कम्फर्ट झोन’ हे एक कारण असतंच. हा काही कमीपणा नसून एक क्रिएटीव्ह आणि प्रॅक्टिकल सोय असते. उदा. यूपीत वाढलेल्या दिग्दर्शकाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातली गोष्ट सांगणारा वास्तववादी चित्रपट बनवणे कठीणच जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मसान हा भारत आणि फ्रान्स यांची संयुक्त निर्मिती आहे आणि त्याचा मुख्य संभाव्य प्रेक्षकही जागतिक, स्थानिक बुद्धिजीवी आणि फिल्म फेस्टीव्हलला जाणारा अशा प्रकारचा असावा. जागतिक स्तरावर मार्केटींग करताना भारतीय सिनेमाला स्थानिक परंपरा, संस्कृती, गरिबी, सामाजिक भेद वगैरे दाखवणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे बनारस, गंगा, साधू, गंगेचे घाट, तिथे चालणारं अंतिम क्रियाकर्म वगैरे दाखवलं की तिहेरी फायदा होतो; एक म्हणजे जागतिक स्तरावर मार्केटिंग करायची सोय तर होतेच. दुसरं म्हणजे थोडी आध्यात्मिकता, तत्वज्ञानाची फोडणीही देता येते आणि तिसरं म्हणजे जाताजाता भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवल्यामुळे संस्कृतीप्रेमींकडून स्तुती मिळण्याची शक्यता राहते. अर्थात हा आक्षेप नसून एक निरीक्षण आहे. असो.

कथेत मुळातच अंगभूत नाट्य असलं तरी अतिरंजितता, मेलोड्रामा टाळून आधुनिक आणि समकालीन भारताचं इतकं नेमकं चित्रण इतक्याततरी कुठल्या चित्रपटात पाहिल्याचं स्मरत नाही. सामाजिक प्रश्न याआधी हिंदी चित्रपटात दाखवले गेले नाही असं नाही. पण हिंदी सिनेमात असणारी नेहमीची मेलोड्रॅमेटीक हाताळणी, स्मशान आणि तदअनुषंगिक बाबी दाखवताना येऊ शकणारा बीभत्सपणा टाळला आहे. आणि मुख्य म्हणजे सरसकटीकरण टाळलं आहे. आपलं आंतरजातीय प्रेमप्रकरण , त्याचे नेमके संभाव्य परिणाम माहीत असलेला आणि त्यामुळे व्यथित असलेला, निराश झालेला हळवा नायक बरेच दिवसांनी मोठ्या पडद्याने पाहिला आहे. नाहीतर मुख्यधारेतल्या हिंदी सिनेमातल्या नायकाचा हळवेपणा बाप-मुलगी, आई-मुलगा आणि प्रेयसीविरह याच्यापुढे कधी गेला नाही. तीच गोष्ट स्त्रीव्यक्तिरेखांची.

स्वत:च्या अटींवर जगू इच्छिणारी आधुनिक स्त्री (देवी), तिची महत्वाकांक्षा समजू शकणारा परंतु परिस्थितीने अखडलेला तिचा बाप, तथाकथित खालच्या जातीच्या किळसवाण्या आयुष्यातून मुक्त व्हावयाला आतुर तरूण (दीपक), त्याच्या या स्वप्नाला जाणणारा त्याला पाठिंबा देणारा त्याचा बाप , प्रियकराच्या खालच्या जातीचं वास्तव जाणल्यावर हादरलेली पण नंतर विचारपूर्वक आपल्या प्रेमासाठी घरून पळून जाण्याची देखील तयारी दाखवणारी खंबीर तरुणी (शालू) अशी अनेक समजूतदार पात्र कदाचित अ-वास्तव वाटण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह, हॉनर किलिंग, स्त्रियांवरचे अत्याचार असे विषय आले की काहीतरी बटबटीत मांडणी, भाषणबाज पात्रे, हिंसाचार, अतिआदर्शवाद वगैरे पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. आपापल्या परिस्थितीत अत्यंत प्रॅक्टीकल वागणार्‍या व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटात विरळच दिसतात. याबाबतीत मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती पाहिल्याचं समाधान देणारा आहे.

तुम्ही जर अतिआशावादी मनोवृत्तीचे असाल; जग फारच छान आहे; आयुष्य फारच सुंदर आहे; अंतिमत: सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही सोशल मीडीयावर फिरणारे ‘गुडी गुडी’ संदेश ‘संपूर्ण’ वाचून फॉरवर्ड करणारे असाल तर कदाचित ‘मसान’ हा चित्रपट तुम्हाला न आवडण्याची शक्यता आहे. ‘मसान’ ही तुमच्याआमच्या आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्‍या दु:खाची वास्तववादी कहाणी आहे. चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही.

मात्र तरीही एक दु;खाची किनार मात्र चित्रपटभर दिसणार्‍या गंगेच्या संथ अस्तित्वासारखी सतत आपली सोबत करते. या दु:खाच्या महानदीत न बुडता किनार्‍याकिनार्‍याने पोहतच आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे असं तर चित्रपटाला सांगायचं नाही ना ?

ब्लॉग लिंक: मसान: एक आधुनिक शोकात्मिका

समीक्षेचा विषय निवडा

मेघना भुस्कुटे Mon, 17/08/2015 - 17:40

In reply to by नगरीनिरंजन

कम्माल आहे. सिनेमा चांगला नाही झाला तर अडचण. झाला तरी अडचण... माफ करा, पण मला प्रतिसाद उगाच खवचट वाटला. आहे का तसा? की माझा गैरसमज होतो आहे?

नगरीनिरंजन Mon, 17/08/2015 - 18:18

In reply to by मेघना भुस्कुटे

विचारल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनात यत्किंचितही खवचटपणा नव्हता. असा भेदक वगैरे म्हणतात ते वास्तव असलेला, डिप्रेसिंग, अनेकांना झोंबेल असा आणि शेवटी पुसटसाच आशेचा किरण दाखवलेला चित्रपट बॉक्स ऑफिससाठी बनवलाय असा कोणाचा समज होईल?
तसे असते तर अग्ली सुपरहिट व्हायला हवा होता. शिवाय बनारसची फिरंग्यांच्या दृष्टीने फॅन्टास्टिक ब्याकग्राऊन्ड घेणे वगैरे त्यासाठी पोषकच आहे.
चित्रपट चांगलाच असेल यात वाद नाही आणि ऑस्कर मिळवायचेच या ईर्ष्येने बनवणे यात काहीही वाईट नाही. पैशासाठी बनवण्यापेक्षा ते चांगले.

अनु राव Tue, 18/08/2015 - 13:57

In reply to by नगरीनिरंजन

पैशासाठी बनवण्यापेक्षा ते चांगले.

ह्या विधानाला जोरदार आक्षेप. कारणे अनेक, ती लिहायची गरज आहे असे पण वाटत नाही.

नगरीनिरंजन Fri, 21/08/2015 - 14:01

In reply to by .शुचि.

ओके. पैशासाठी बनवण्यापेक्षा ऑस्करसाठी बनवणे मला चांगले वाटते असे वाचा. ते माझे वैयक्तिक मत असल्याने त्यावरचे आक्षेप निरर्थक आहेत.
पैसा किंवा कोणतीही गोष्ट डोपॅमाईनसाठी मिळवायची तर ऑस्कर मिळाल्यास जास्त डोपॅमाईन मिळते ही त्यामागची कारणमीमांसा. पैसे काय कसेही कमवता येतात.
बहुतेक वेळा मी खुलासे करत बसत नाही; पण आज मूड बरा आहे.

अनु राव Fri, 21/08/2015 - 14:19

In reply to by नगरीनिरंजन

पैसे काय कसेही कमवता येतात.

आमच्या सारखी पैसे मिळवण्यासाठी गपचुप काम करणारी लोक मूर्ख च असणार!!!

आणि हे पैसे मिळवण्याचे सहज सोप्पे उपाय भारतातल्या ५०-६० कोटी गरीबांना शिकवा ननि, बिचारे अर्धपोटी रहातात.

अनुप ढेरे Fri, 21/08/2015 - 14:22

In reply to by अनु राव

पैसे मिळवण्याचे सहज सोप्पे उपाय भारतातल्या ५०-६० कोटी गरीबांना शिकवा ननि, बिचारे अर्धपोटी रहातात.

हेच बोल्तो.

अतिशहाणा Mon, 17/08/2015 - 18:54

परीक्षण आवडले. चित्रपट पाहण्यासारखा वाटतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 17/08/2015 - 20:57

आत्तापर्यंत मसानबद्दल काहीही वाचणं टाळलं होतं, सिनेमा बघताना डोक्यात काही राहू नये म्हणून. पण हा धागा वाचला, परीक्षण आवडलं. सिनेमाबद्दल पुरेसं सांगून पुरेसे तपशील लपवलेले आहेत. सिनेमा बघण्याचं कुतूहल आणखी चाळवलं.

ऋषिकेश Tue, 18/08/2015 - 10:10

छान परिक्षण.

पाहावे मनाचे मधील या चित्रपटाचे परिक्षणही वाचा, त्यात बनारस का निवडलं असावा याचा आणखी एक वेगळा तर्क सुचित केला आहे.
दुवा शोधुन इथेच देतो

ए ए वाघमारे Fri, 21/08/2015 - 11:59

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार!
खरं तर अजून लिहायची इच्छा होती पण हात आखडता घेतला. नाहीतर सिनेमा पाहण्यातली मजा निघून गेली असती.असो.

अस्वल Sat, 21/11/2015 - 14:58

खूपच जबरदस्त चित्रपट आहे. खरंच.
आणि परिक्षणही सुंदर. शेवटी म्हटल्याप्रमाणे "दु:खाची किनार" पूर्ण चित्रपटाला सोबत करत रहाते.
आणि चित्रपटातल्या दीपक साकारणार्‍या नटाला सॅल्यूट.
.
अजूनही जर कुणी मसान बघितला नसेल तर प्लीज बघा.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 19/12/2016 - 22:06

'मसान' अमेरिकी नेटफ्लिक्सवर दिसला. विस्थापित भारतीयांनी बघून घ्या.

मला चित्रपटातून जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, उच्चवर्णीय आणि डोंब असणारे खालच्या जातीतले यांचे संबंध छोट्या गावात - काशीत - ताणलेले आहेत. दीपक आणि शालूचं प्रेमप्रकरण असलं तरीही आपलं लग्न सुखासुखी होणार नाही याची त्यांना जाणीव आहे. मात्र शहरात आल्यावर डोंबाघरचा दीपक आणि ब्राह्मणाघरची देवी सहजच, माणूस म्हणून एकाच पातळीवर येतात; तिथे संघर्ष होत नाही.

चित्रपट बहुतांशी काशीत का घडतो, याचं मला समजलेलं कारण म्हणजे, काशी हे साचलेपणाचं प्रतीक आहे. माणूस मेल्यावर मृतदेह काशीत येतो, किंवा मृतांचं क्रियाकर्म करायला काशीत माणसं येतात. तिथे सगळं संपतं. तिथे प्रगतीला वाव नाही. म्हणून प्रगतीसाठी देवी आणि दीपकला काशी सोडावं लागतं. छोटं गाव, साचलेपण दाखवण्यासाठी काशी (महाराष्ट्रात दाखवायचं असेल तर नाशिकचा घाट) यासारखं उत्तम स्थळ नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 20/12/2016 - 04:56

In reply to by अनुप ढेरे

प्रत्यक्षात नाशिक हे सुद्धा छोटं शहर नाही. साचलेेपणा -> छोट्या जागेची खूण -> अशा प्रकारचे उद्गार देवीच्या तोंडी असणं ... अशी प्रतीकं आहेत. त्यामुळे काशी आणि नाशिकला छोटी गावं म्हणताना मी विकीपिडीयातून आकडे तपासले नाहीत.

ऋषिकेश Tue, 20/12/2016 - 09:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचं आणि पाहावेच्या दिगूचं मत बर्‍यापैकी जुळतंय (तुम्हीच वर दिलेला दुवा)
तो म्हणतो:

या कथेत पारंपरिकतेच्या बुरख्याआड लपलेले बनारस हे या दांभिकतेच्या जुनाट चिखलात लडबडलेल्या एका काळाचे - एका आचके खाणार्‍या मूल्यव्यवस्थेचा मसणवटा अश्या अर्थाचे - प्रतीक दाखवले आहे असे वाटत जाते. पुढे यातील दोन महत्त्वाची स्वतंत्र विचारांची आधुनिकतेकडे प्रवास करणारी खुल्या विचारांची पात्रे बनारस सोडून अलाहाबादच्या नव्या संगमाकडे जाणारे दाखवल्यावर तर मसान (अर्थात मसण) हे नाव अधिकच सार्थ वाटते.