उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट
(चित्रपट पाहताना रसभंग होईल असे कोणतेही तपशील ह्यात उघड केलेले नाहीत. त्यामुळे ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांनीही हा आस्वादात्मक परिचय वाचायला हरकत नाही.)
सध्याचं जगणं खूप गुंतागुंतीचं झालं आहे असं अनेकदा म्हटलं जातं. भारतासारख्या देशात तर एकाच वेळी अनेक आर्थिक-सामाजिक स्तरांतली माणसं वेगवेगळ्या काळातल्या मूल्यव्यवस्थांत अडकून राहिलेली आपली मानसिकता, आपल्या रुची-अरुची आणि आपले स्वभाव घेऊन एकविसाव्या शतकात दाटीवाटीनं जगत असतात. त्यामुळे माणसाच्या अंगी थोडी जरी संवेदनक्षमता आणि निरीक्षणक्षमता असेल तर ही गुंतागुंत आणि त्यातून जन्मलेले संघर्ष ह्या सगळ्याची जाणीव आजच्या काळात जगताना अधिकच तीव्र होत जाते. ती जाणीव फारशी सुखद नसणं हे आजच्या काळाचं व्यवच्छेदक लक्षणच आहे. आणि तरीही, त्या सगळ्या गुंतागुंतीसकट जगताना काही माणसं आनंदात दिसतात, तर काही दु:खात. अज्ञानात सुख असतं म्हणून कदाचित काही जण आनंदात असतील, तर काहींना परिस्थितीच्या रेट्यापुढे तितकीशी मान तुकवावी लागत नसेल म्हणून ते आपल्या स्वकेंद्री आनंदाच्या बुडबुड्यात आत्ममग्न असतील. असा संशयाचा फायदा काही जणांना मिळाला तरीही अनेक लोकांना जगण्याच्या तीव्र संघर्षाला रोजच्यारोज तोंड द्यावं लागतं आणि तरीही त्यांच्यापैकी काही माणसंदेखील आनंदी दिसतात. भारतात राहून आणि डोळे उघडे ठेवून हे काही नाकारता येत नाही. ही माणसं जगण्याची उर्जा कुठून आणतात असा प्रश्न अशा वेळी साहजिकच पडतो. अठरापगड भारतीय समाजाला असं एकत्र एखाद्या मोठ्या पटावर मांडून त्यांना आकळून घेण्याचे काही प्रयोग भारतीय साहित्यात झाले, पण चित्रपटात तसं क्वचितच झालेलं दिसतं. एखाद्या सामाजिक समस्येची किंवा ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी घेऊन माणुसकीचा संदेश देणारे काही चित्रपट दिसतात, पण वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांचा मोठा पट मांडून त्याद्वारे माणूसपणाबद्दल व्यापक काही मांडू पाहणारे चित्रपट विरळाच, आणि मराठीत तर अगदीच दुर्मीळ. ह्या पार्श्वभूमीवर उमेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि गिरीश कुलकर्णी लिखित ‘हायवे’ एक फार महत्त्वाचा चित्रपट ठरतो.
जगण्याचा व्यापक पट मांडता यावा ह्यासाठी चित्रपटात अनेक व्यक्तिरेखांची योजना आहे. त्या माणसांच्या व्यक्तिगत सुखदु:खांच्या गोष्टी एकमेकांत गुंफत गुंतवत आताच्या जगण्याविषयी, समाजाविषयी आणि संवेदनांविषयी ‘हायवे’ काही भाष्य करतो. ह्या भाष्याला वैश्विकता येण्यासाठी ह्या व्यक्तिरेखांना कमालीचं वैविध्य आणि अनेक कंगोरे पटकथेनं दिले आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकावर स्वतंत्र चित्रपट होऊ शकेल अशी जाणीव चित्रपट पाहताना होत राहते. आणि तरीही त्यांना असं एका चित्रपटापुरतं एकत्र आणणं आणि त्या माणसांच्या आयुष्यांच्या बहुपेडी गोष्टींची केवळ एक चाहूल देणं हा पटकथाकारानं आणि दिग्दर्शकानं हेतुपुरस्सर घेतलेला निर्णय आहे. निवडक व्यक्तिरेखांभोवती फिरणारं एक सलग मुख्य कथानक आणि आजूबाजूच्या इतर व्यक्तिरेखांमुळे त्यात केवळ काही पूरक तपशील आणि रंग भरणं ही रुळलेली वाट सोडणारा हा निर्णय मराठी चित्रपटाचा इतिहास पाहता अतिशय धाडसीच म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरातून पुण्याच्या दिशेनं निघालेले हे लोक एकाच वेळी एक्सप्रेसवेवर आहेत एवढाच खरं तर वरवर पाहता त्यांच्यातला समान दुवा आहे. मात्र, चित्रपट संपेस्तोवर त्यांचं माणूस असणं हाच खरं तर त्यांच्यातला समान दुवा आहे हा साक्षात्कार प्रेक्षकाला होईल ह्यासाठी त्या पटकथेची अतिशय कौशल्यपूर्ण रचना केलेली आहे.
उमेश कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून चालू असलेला प्रवास ह्या चित्रपटात पुढच्या टप्प्यावर गेलेला जाणवतो. ‘वळू’ किंवा ‘देऊळ’मध्येही खूप व्यक्तिरेखा होत्या, पण गोष्ट म्हणून तुलनेनं अधिक बांधीव आकार त्यांना होता. ‘विहीर’ची जातकुळीच आत्मचिंतनात्मक, शांत आणि म्हणून पारंपरिक मराठी चित्रपटांहून भिन्न आणि मूलत: काव्यात्म होती. इथे मात्र व्यक्तिरेखांचा मोठा पट आणि तरीही बंदिस्त अवकाशात त्यांना बांधून ठेवण्याची कथानकाची गरज असे दोन परस्परविरोधी घटक आहेत. त्याप्रमाणे, बांधीव कथानकाला मुद्दाम टाळून काही तरी आत्मचिंतनात्मक आणि काव्यात्म म्हणण्याची इच्छा दिसते, आणि तीदेखील आधुनिक जगण्यातल्या केऑसला कवळून घेत घेत. अशा विरोधाभासांना एकत्र आणून काही तरी सघन म्हणता येणं ही अतिशय महत्त्वाकांक्षी कसरत आहे आणि ती दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णीला आणि पटकथालेखक म्हणून गिरीश कुलकर्णीलाही चांगली पेलली आहे. मराठी सिनेमासाठी एक वेगळा मापदंड त्यामुळे निर्माण झाला आहे.
अभिजात पाश्चात्य संगीतपरंपरेत एका मोठ्या वाद्यमेळातून सुसंगती, लय आणि सौंदर्य निर्माण केलं जातं. ‘हायवे’ची रचना तशी काहीशी आहे. सुरुवातीला प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकासमोर येते तेव्हा तिच्याविषयीचे अनेक तपशील माहीत नसतात, पण अगदी थोडक्या तपशीलांतून प्रेक्षकाला गरजेपुरती काही कल्पना दिली जाते. उदाहरणार्थ, चाळीतून बाहेर पडलेला मुलगा दिसतो तेव्हा चाळीतले आवाज आणि मागे बांधकाम चालू असलेल्या पॉश इमारतीतले बांधकामाचे आवाज ऐकू येतात. चाळीला खाऊन टाकेल अशा आवेशात ती अवाढव्य इमारत पडद्यावर दिसते आणि ऐकूही येते. ध्वनी संरचना आणि दृश्य संरचना अशा चित्रपटाच्या दोन कळीच्या अंगांवर घेतलेली मेहनत तेव्हापासूनच जाणवू लागते. ‘मेट्रोसेक्शुअल’ वाटावेत असे कपडे घालून तो मुलगा निघालेला असतो. वरचा एक साधासा शर्ट किंवा जॅकेटसारखं काही तरी तो नंतर जेव्हा काढतो तेव्हा आणि त्याला पिकअप करणाऱ्या कारची वाट पाहत ज्या आविर्भावात उभा राहतो, तो पाहता त्याचं हे मेट्रोसेक्शुअल असणं - म्हणजे त्याचं बाह्यरूप - आणि त्याची सामाजिक पार्श्वभूमी ह्यांच्यात असलेला विरोधाभास अधिक नीटपणे लक्षात येतो. कोणत्याही संवादाशिवाय हे जे दिसतं आणि ऐकू येतं ते अतिशय काळजीपूर्वक घडवलेलं आहे. चित्रपट माध्यमाविषयीची दिग्दर्शकाची जाण अशा छोट्याछोट्या गोष्टींमधून दिसत राहते. मात्र, त्याचे पडसाद मनात नीट उमटण्यासाठी प्रेक्षकानं लक्ष देऊन ते पाहण्या-ऐकण्याची गरज आहे. आजचा महानगरी प्रेक्षक हे कितपत करू शकेल ह्याविषयी शंकाच आहे. पण ह्यात कुणाचा दोष असलाच, तर तो दिग्दर्शकाचा नाही. खरं तर, ज्या समकालीन परिस्थितीविषयी चित्रपट काही भाष्य करू पाहतो आहे त्या वास्तवाचा एक अविभाज्य भाग असा आत्ममग्न आणि असंवेदनशील प्रेक्षकदेखील आहे. चित्रपटात इतरत्रही हे जाणवतं. कथानकाचा एक धागा तर (धीरेश जोशी आणि त्याचा जोडीदार) दुसऱ्याच्या सुखदु:खाविषयी असलेल्या बेपर्वाईमुळे आणि संवेदनशीलतेच्या अभावामुळे क्रूर वाटेल अशा पद्धतीनं कुणालाही हसणाऱ्या आणि एक्सप्लॉइट करणाऱ्या उथळ लोकांविषयीच आहे. कलाकृतीची सुसंगती, लय आणि सौंदर्य अशा सगळ्यासकट आहे; त्यांना वगळून नव्हे. हे चित्रपटाचं खरं यश आहे.
चित्रपटाच्या रचनेतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तिरेखांच्या गोष्टी आपल्याला खूप बारकाव्यांनिशी दिसतात त्यांच्या आयुष्याला चित्रपटादरम्यान काही कलाटणी जरी मिळाली, तरीही त्यांच्या गोष्टींना पूर्णविराम काही मिळणार नसतो. उदा : सुनील बर्वेचा कॉर्पोरेट अधिकारी आणि त्याची गरोदर बायको (वृषाली कुलकर्णी) ह्यांचं कथासूत्र, किंवा गिरीश कुलकर्णीच्या ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ प्रकल्पावर काम करणाऱ्या तंत्रज्ञाचं कथासूत्र. ह्याउलट, काही लोकांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काही तपशील कळत नसूनही कथानकाच्या एका टप्प्यापुरतं त्यांचं अस्तित्व उठावदार होतं. उदाहरणार्थ, अमराठी ट्रक ड्रायव्हरला चित्रपटादरम्यान नाईलाजानं आणि अनपेक्षितरीत्या वठवावी लागणारी एक तात्पुरती पण कळीची भूमिका. :-) कथानकाच्या ह्या गुंतागुंतीच्या सांगीतिक रचनेमुळे वर्तमानपत्रात परीक्षण लिहिणाऱ्या काही लोकांचं समाधान झालं नाही असं दिसतं, पण ती चित्रपटाच्या आशयसूत्राची गरज आहे : माणूसपणाचा जो धावता प्रवाह दिग्दर्शकाला दाखवायचा आहे तो हायवेवरच्या ट्रॅफिक जॅममध्येही थांबणारा नाही आणि चित्रपट संपल्यावरही तो चालूच राहणार आहे असंच त्यातून लेखकाला आणि दिग्दर्शकाला सुचवायचं आहे. पात्रांच्या आयुष्यातल्या काही क्षणांचा हा केवळ एक सेल्फी आहे. मात्र, कोणत्याही उत्तम व्यक्तिचित्रात ज्याप्रमाणे व्यक्तीला भेदत तिच्या आरपार जाऊन समोरच्यापर्यंत त्या व्यक्तीविषयी काही तरी मार्मिक पोहोचवण्याची ताकद असते त्याप्रमाणेच इथे कथानकात ती ताकद आहे. असा परिणाम साधता येण्यासाठी विविध पार्श्वभूमीच्या व्यक्तिरेखांच्या संवादांवरही त्यामुळे प्रचंड कष्ट घेतलेले जाणवतात. प्रेक्षकाला हसवत, रडवत, कोपरखळ्या मारत, चिडवत पण हात धरून चित्रपट पुढे वाहात राहतो आणि त्याला अंतर्मुखही करतो. प्रेक्षकातल्या प्रत्येकाला ज्यात आपलं काही तरी गवसेल असा हा सेल्फी आहे. काही वर्षांपूर्वी पॉल हॅगिसच्या ऑस्करविजेत्या ‘क्रॅश’मध्ये जशी एका अपघाताच्या निमित्तानं लॉस अॅन्जेलिस शहरातल्या विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र बांधत मानवतेविषयी काही एक टिप्पणी करण्यात आली होती, तसा काहीसा हा प्रयत्न आहे. चित्रपटामागची प्रेरणा ती असू शकेल; तरीही हा खास आपल्या आजच्या जगण्यातून आलेला सिनेमा आहे, आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं समकालीन आहे.
पाश्चात्य संगीतरचनेप्रमाणे चित्रपटातल्या प्रत्येक छोट्या व्यक्तिरेखेला आणि कथासूत्राला त्याची म्हणून एक कमीअधिक महत्त्वाची जागा आहे. ती अपुरी किंवा तात्पुरती वाटली, तर त्याचा अर्थ त्या सांगीतिक रचनेतला तो पैलू त्या प्रेक्षकापुरता अभेद्य राहिला आहे एवढंच. पण पटकथेतली, संकलनातली आणि पर्यायानं चित्रपटातली लय आणि तिचे चढउतार ह्या बारकाव्यांमुळेच निर्माण होतात ह्याकडे लक्ष वेधून घेणं त्यामुळेच महत्त्वाचं ठरतं. ज्यांना चित्रपटाची काव्यात्मता केवळ त्याच्या शेवटात जाणवते त्यांनाही हे सांगीतिक सूत्र लक्षात येत नाही असं म्हणावं लागतं. कारण, चित्रपट सुरुवातीपासून अखेरपर्यंत लयबद्ध आणि काव्यात्म आहे. नवकाव्याप्रमाणे, आधुनिक चित्राप्रमाणे किंवा एखाद्या भव्य सिंफनीप्रमाणे ह्या चित्रपटाची लय आणि तिच्यात अंतर्भूत गुंतागुंतीची रचना लक्षात न येण्याची शक्यता मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत मोठी आहे. त्यात त्यांना दोषही देता येणार नाही, कारण मराठी चित्रपटांनी तसा पायंडाच पाडलेला नाही, आणि प्रेक्षकांच्या दृष्टीची तशी मशागतच केलेली नाही. त्यामुळे चित्रपटाला गल्ल्यावर फारसं यश मिळेल असं वाटत नाही. मात्र, ज्यांना एकविसाव्या शतकात पदार्पण करणारा मराठी सिनेमा पाहायचा आहे त्यांनी हा ‘हायवे’ अजिबात चुकवू नये. कारण अखेर माणसाच्या सगळ्या गुणदोषांसकटच साजरा केलेला हा माणूसपणाचा उत्सव आहे. तो आशादायी आहे. सध्याच्या काळात वास्तवापासून पलायनवादी भूमिका न घेता, माणसांच्या प्रसंगी अनैतिक वागण्याचा धिक्कार न करता, त्यांच्या स्खलनशीलतेला समजून घेत अतिशय संयमानं पण ठामपणानं माणूसपणाविषयीची अशी आशा तेवत ठेवणं गरजेचं आहे. मात्र ते तितकंच कठीणही आहे. उमेश आणि गिरीश कुलकर्णी ह्या द्वयीनं समर्थपणे हे आव्हान पेललं आहे ह्यासाठी मराठी प्रेक्षकानं खरं तर त्यांचे आभारच मानायला हवेत.
इतरत्र आलेलं परिचयात्मक लिखाण :
महाराष्ट्र टाइम्स
सकाळ
लोकप्रभा
प्रहार
लोकसत्ता
अपडेट :
खाली प्रतिसादांमध्ये उल्लेख आले म्हणून विषयाशी निगडित माझ्या काही इतर लिखाणाचे दुवे -
उमेश कुलकर्णी यांची विहीर - काही प्रश्न, काही उत्तरे
'पुणे ५२' - अस्वस्थ वर्तमानावरचं टोकदार भाष्य
रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा (भाग १)
रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा (भाग २)
समीक्षेचा विषय निवडा
उत्तम
परीक्षण आवडले. निव्वळ कथानकापेक्षाही चित्रपटाच्या सिंफनी/लयीकडे अधिक लक्ष वेधण्याचा हेतू साध्य करणारे.
काही मामुली शंका:
१. चित्रपटाचं धेडगुजरी शीर्षक किंचित खटकलं. त्यात अधिक साटल्य दाखवता आलं असतं का?
२. 'रोड मूव्ही' ह्या प्रकारातला हा पहिला उल्लेखनीय मराठी चित्रपट म्हणता येईल का?
अवांतरः
सध्याच्या काळात वास्तवापासून पलायनवादी भूमिका न घेता, माणसांच्या प्रसंगी अनैतिक वागण्याचा धिक्कार न करता, त्यांच्या स्खलनशीलतेला समजून घेत अतिशय संयमानं पण ठामपणानं माणूसपणाविषयीची अशी आशा तेवत ठेवणं गरजेचं आहे. मात्र ते तितकंच कठीणही आहे.
जालचर्चांत बव्हंशी 'माय वे' ऑर 'हाय वे' अशी भूमिका पहायला मिळत असल्याने, ही वाक्यं त्या संदर्भातही पटून गेली.
सिनेमा आवडला, तसंच परीक्षण /
सिनेमा आवडला, तसंच परीक्षण / रसास्वादही आवडला.
पण सिनेमात खटकणार्या बाबीही आहेत. सिनेमाचा शेवट (किंवा अधिक नेमकेपणानं सांगायचं तर शेवटाकडच्या चित्रचौकटी) बराच प्रेडिक्टेबल, गोडगोड आणि बाळबोध आहे. काही कथासूत्रांकडे गरजेहून जास्त लक्ष दिल्यासारखंही वाटतं. (ही दिग्दर्शकाची निवड असू शकेल हे मला कळतं. पण ती निवड सिनेमाला अधिक पसरट करते असं माझं मत झालं.) मराठीत हा जॉनर् (किंवा जॉन्र किंवा जॉन्री जे काही असेल ते लावून घ्या) नवीन आहे आणि अतिशय सुरेख, नेमक्या तपशिलांसह हाताळला आहे, त्याचं कौतुक करताना या (किंवा इतर. मतभेद असू शकतातच.) दोषांकडे लक्ष वेधायचं राहून गेलं आहे असं वाटलं.
अवांतर म्हणजे लेखातल्या एका वाक्याला आक्षेप आहे. "आजचा महानगरी प्रेक्षक हे कितपत करू शकेल ह्याविषयी शंकाच आहे." हे ते वाक्य.
महानगरी प्रेक्षकांत जसे बेजबाबदार, उच्छृंखल, असंवेदनशील प्रेक्षक असतात; तसेच काही अॅकेडमिक ज्ञान नसलेले पण सिनेमाकडे डोळसपणे पाहू बघणारे प्रेक्षकही असतात. मग हे असं जनरलायझेशन कशासाठी? त्यातून उगाच तुच्छता दाखवण्यापलीकडे नक्की काय साध्य होतं? एकदा मुख्यधारेत सिनेमा प्रदर्शित केला म्हणताना प्रेक्षकांचा हा बहुरंगी पट स्वीकारण्यावाचून पर्याय काय आहे? आणि या प्रेक्षकांचं शिक्षण (!) करण्यासाठी मुख्यधारेतल्या चित्रपटांवाचून दुसरं माध्यम तरी कोणतं आहे? असो. हा काहीसा टॅन्जण्ट मुद्दा आहे.
अभिनय
खरं तर पात्रांसाठी जे चेहरे निवडले आहेत (पक्षी : कास्टिंग) ते मला अतिशय चपखल वाटले. अभिनय खटकला असं तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही एका वास्तववादी गोष्ट सांगणाऱ्या नाट्यमय चित्रपटातले अभिनयशैलीचे निकष लावून पाहत असावात असं मला वाटतं. माझ्या मते मुळात हा चित्रपट वास्तववादी नाट्याच्या रुळलेल्या चाकोरीतला नाही; त्यामुळे त्या चष्म्यातून तो मी पाहातच नाही आहे. निवडक प्रमुख नटांनी आपल्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर काही कळीच्या प्रसंगांमधून किंवा चित्रपटभर प्रेक्षकांना ज्यामध्ये प्रभावित करायचं असतं त्या जातकुळीचा हा चित्रपट नाही. एकदोन प्रसंगांचा अपवाद वगळता त्यात तसं हृदय हेलावून टाकू पाहणारं नाट्यही नाही. त्यामुळे किरकोळ तपशील वगळता त्यातल्या अभिनयात मला फार काही खटकलं नाही.
अभिनय खटकला असं तुम्ही म्हणता
अभिनय खटकला असं तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही एका वास्तववादी गोष्ट सांगणाऱ्या नाट्यमय चित्रपटातले अभिनयशैलीचे निकष लावून पाहत असावात असं मला वाटतं.
अजिबातच नाही. हे इतर प्रेक्षकांना खूपच अध्याहृत धरणं झालं (बहुदा याचकडे मेघनाचा निर्देश असावा). हेच गृहितक चुकीच असल्याने तुमचं पुढिल स्पष्टीकरण गैरलागू ठरतं.
मी कोणत्याही अभिनयात संवाद असल्यास संवादाची फेक (त्यासाठी नाट्यपूर्ण संवादांची अजिबातच गरज नाही), शब्दांचे केले उच्चार (ते भुमिकेला साजेसे हवेत, त्यावर मेहनत घेतलेली हवी), लावलेल्या आवाजाचा पोत व ढब (ही अशी वाचिक अभिनयाची अंगे),शिवाय सर्व प्रकारचा कायिक अभिनय यालाही चेहर्यांवरील हावभावांइतकेच महत्त्व देतो.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी व मुक्ता बर्वे या बाबतीत थोडे किंवा किरकोळ तपशीलात नाही तर चांगले भरपूरच तोकडे पडलेले आहे.
सुनील बर्वे, रेणुका शहाणे किंवा मुक्ता बर्वेंसोबत असलेल्या त्या कलाकार (दुर्दैवाने नाव विसरलो) समोर तर त्यांचे हे उणेपण चांगलेच खटकते.
काही कळीच्या प्रसंगांमधून किंवा चित्रपटभर प्रेक्षकांना ज्यामध्ये प्रभावित करायचं असतं त्या जातकुळीचा हा चित्रपट नाही.
अर्थातच! हा तसा चित्रपट आहे असे एखाद्याला का वाटावे? मात्र वरील अतिशय प्राथमिक दर्जाची पथ्येही या दोन कलाकारांच्या अभिनयात दिसली नाहीत. (किंबहूना इतर तुलनेने कमी परिचित कलाकार यांच्याहून कितीतरी सरस काम करून गेलेत).
तुमचं सिंफनीचं रुपकच वापरायचं या अख्या वाद्यमेळातील दोन वाद्यांची पट्टी वरखाली लागावी नी लगेच त्यांचं कच्चेपण लगेच लक्षात यावं तसं काहीसं झालं. ते कलाकार एकेकटे असताना काही बाबी तितक्याशा जाणवत नाहीत जितक्या या अनेक कलाकारांच्या वारीत तुलना होताच जाणवल्या
त्यातल्या अभिनयात मला फार काही खटकलं नाही.
हे होऊ शकतंच, प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक पात्राच्या प्रत्येक अंगाकडे प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष जाईलच असं नाही.
तेव्हा तुम्हाला ते दोष जाणवलेच नाहीत/तुम्हाला त्या दोषांचं आकलन झाले नाही म्हणून परिक्षणाला त्याबद्द्ल उल्लेख नाही इतके मला समजले नी हे कारण पटले!
हे इतर प्रेक्षकांना खूपच
हे इतर प्रेक्षकांना खूपच अध्याहृत धरणं झालं (बहुदा याचकडे मेघनाचा निर्देश असावा).
होय. याकडेच निर्देश होता. पण हेही नोंदायला हवं, की अभिनयाबाबत मी ऋशी सहमत नाही. मला गिकुचा अभिनय आवडला. इतरही अनेकांचा अभिनय आवडला. मुक्ता बर्वेबाबत मात्र अडचण एवढीच की तिला एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेत बघण्याची सवय / अपेक्षा तयार झाली आहे. (हल्ली हे काही प्रमाणात वंदना गुप्तेंच्या बाबतीतही होतं. याचं आत्यंतिक ढोबळ उदाहरण म्हणजे 'मुन्नाभाई'नंतर आलेल्या 'लक्ष्य'मध्ये बोमन इराणीची एन्ट्री होताक्षणी, तसं काहीही कारण नसताना, खिदळलेले प्रेक्षक.) तिची भूमिका फार निराळी नव्हती / तिला त्यातले निराळे कंगोरे उठावदार करता आले नाहीत. परिणामी पास होण्याइतपत काम करूनही तिच्याबद्दल 'तेच ते करते बा' अशी प्रतिक्रिया होऊ शकते.
एकूणच प्रेक्षकांच्या क्षमतेबद्दल विधान करण्याबद्दल मला आक्षेप होता. असं विधान शंभर टक्के कधीही अचूक असणार नाही हे एक. त्याची आवश्यकता नाही, हे दुसरं. कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे, कोणत्या गोष्टी सहजी निसटून जाऊ शकतात, कोणत्या गोष्टी सवयीनं जुन्या पद्धतीनुसार अपेक्षू नयेत - असं काही सांगणं वेगळं. आणि प्रेक्षकांच्या आकलनक्षमतेबद्दल शंका व्यक्त करणं निराळं.
अभिनय आवडणं आणि तो परिपूर्ण
अभिनय आवडणं आणि तो परिपूर्ण असणं या बाबी भिन्न हे एक.
दुसरं गिकुच्या अभिनय:
बराच काळ देशाबाहेर राहिलेल्या एनाराय व्यक्तींना मराठी शब्द सापडायला त्रास होतो, त्याची अनेक बाबतीत - विशेषतः जगण्याच्या सोयींच्या अभावाने/उणीवांनी होणारी - चिडचिड होते हे त्याने व्यवस्थित दाखवलंय. मात्र त्यांचं इंग्रजी अगदी "देसी" आहे. त्याच्या कित्येक लकबी, अभिवादन करायची पद्धत, अनुमोदन वगैरे देताना मान हलवायची पद्धतही अगदीच देसी राहिली आहे. नुसता गॉगल, कपडे वा सुयोग्य संवादाची डिलिव्हरी इतकं एरवी पुरेसंही झालं असतं पण जेव्हा इतक्या क्लोजापमध्ये चित्रीकरण आहे, त्याच चित्रपटात कितीतरी कलाकार उत्तमोत्तम कामे करत आहेत अशावेळी हे खुजं आहे हे दिसून येतं. राहिला असेल तो तसाच किंवा शास्त्रज्ञ नसताच इतके 'इंग्रजाळलेले' वगैरे नंतर सुचणारी स्पष्टीकरणं झाली. जर इतर पात्रे त्या त्या प्रवृत्तीचं (त्या त्या व्यक्तीविशेषाचं नव्हे) काहीसं ढोबळ मात्र मार्मिक प्रतिनिधित्त्व करताहेत मात्र गिकु हा 'ते विवक्षित पात्र' याच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही
मुक्ता बर्वेविषयीचा तु म्हणालीस तो आक्षेप तर आहेच, शिवाय तिच्या सोबतीणीच्या अफाट नैसर्गिक वागण्यापुढे हीचा अभिनय अगदीच "नाटकी" वाटतो.
बराच काळ देशाबाहेर राहिलेल्या
बराच काळ देशाबाहेर राहिलेल्या एनाराय व्यक्तींना मराठी शब्द सापडायला त्रास होतो,
स्वताच्या आणि बघितलेल्या इतरांच्या अनुभवानुसार. भारताबाहेर रहाणारे मराठी लोक अगदी स्वच्छ आणि कमीत कमी इंग्लिश शब्दांचा वापर करुन बोलतात. रादर जी लोक आयटीच्या महापुरापूर्वी भारताबाहेर गेली आहेत ( ८० च्या दशकात ) ती तर फारच शुद्ध मराठी बोलतात.
हे अवांतर आहे पण सांगावसे वाटले.
गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शकुंतला नगरकर
माझ्या बाजूनं गिरीशच्या एनाराय व्यक्तिरेखेतला महत्त्वाचा भाग हा होता :
- एका विशिष्ट प्रकारच्या व्यावसायिकतेचा काटेकोर आग्रह धरणं
- अवघडलेपण (कुठलाही मोकळाढाकळापणा स्वतःत नसणं; इतरांमध्ये न खपणं)
- मानसिक-शारीरिक कुचंबणा
- भावनिक रिप्रेशन
- त्या सगळ्यातून आलेली कुचंबित देहबोली
- सभ्यपणा, किंचित वरवरच्या उदारमतवादासहित
- सुरुवातीला प्रेक्षकाला तो विनोदी वाटायला हवा; पण अखेर त्यातलं कारुण्य जाणवायला हवं.
हे त्याला व्यवस्थित दाखवता आलं. बाकी देशी अॅक्सेंट, देहबोली वगैरेच्या इतक्या एनाराय प्रती मी पाहिल्या आहेत, की त्याविषयी सरसकट हेच योग्य आणि ते अयोग्यच असा आग्रह धरण्याची गरज भासली नाही; त्यामुळे चित्रपटाच्या आस्वादात तर काहीच फरक पडला नाही.
मुक्ता बर्वे - 'चेपतोय' प्रसंग मला आवडला ;-) बाकी शकुंतला नगरकर कसलेल्या व्यावसायिक तमासगीर आहेत आणि अनेक वर्षं त्या व्यवसायात आहेत. त्यांच्या झकास आणि इरसाल लावण्या मी प्रत्यक्षच पाहिल्या आहेत. इतरांनीही पाहाव्यात अशी शिफारस करेन. त्यांना ह्या भूमिकेसाठी वेगळं काहीच करायला लागत नाही. त्यांच्यापुढे मुक्ता बर्वे अपुरीच वाटणार. ते साहजिक आहे.
बाकी देशी अॅक्सेंट, देहबोली
बाकी देशी अॅक्सेंट, देहबोली वगैरेच्या इतक्या एनाराय प्रती मी पाहिल्या आहेत, की त्याविषयी सरसकट हेच योग्य आणि ते अयोग्यच असा आग्रह धरण्याची गरज भासली नाही
बहुतांश प्रेक्षकांच्या माहितीत असणार्या प्रति या ठराविकच असतात. जर चित्रपट प्रेक्षकांना पटायला/पोचायला हवा असेल तर एखाद्या व्यक्तीच्या माहितीतला एक एनाराय असे न रहाता, बहुसंख्य लोकांच्या मनातील एनाराय व्यक्तीची प्रतिमा गिकुच्या अभिनयात उतरायला हवी होती. अर्थात हा दोष तुम्हाला जाणवला असेल नसेल (किंवा कबूल करणे गैरसोयीचे असेल ;) ) माझ्या परिचयातील बहुसंख्य लोकांना त्याची भुमिका आवडली असली तरी त्याचा अभिनय 'एक एनाराय' म्हणून तोकडा वाटला
कळीचा मुद्दा
>> जर चित्रपट प्रेक्षकांना पटायला/पोचायला हवा असेल तर एखाद्या व्यक्तीच्या माहितीतला एक एनाराय असे न रहाता, बहुसंख्य लोकांच्या मनातील एनाराय व्यक्तीची प्रतिमा गिकुच्या अभिनयात उतरायला हवी होती.
>> माझ्या परिचयातील बहुसंख्य लोकांना त्याची भुमिका आवडली असली तरी त्याचा अभिनय 'एक एनाराय' म्हणून तोकडा वाटला
शक्य आहे. तो तुला आलेला अनुभव असल्यामुळे त्याविषयी बोलण्यासारखं माझ्यापाशी काही नाही. पण -
- सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये प्रेक्षक त्याच्या वागण्याला हसणं अपेक्षित आहे, आणि मी पाहिलेल्या खेळात तशी प्रतिक्रिया येत होती.
- अखेरच्या प्रसंगात गिरीश कुलकर्णीची व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःला उकलून दाखवते, तेव्हाच्या त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकावर काही भावनिक परिणाम होतो का, हे चित्रपटातल्या त्या व्यक्तिरेखेशी प्रेक्षक समरस होण्यासाठी आणि (त्या प्रसंगाचं चित्रपटातलं महत्त्वाचं स्थान पाहता) पर्यायानं चित्रपटाच्या सुयोग्य आस्वादासाठी (त्याचा अॅक्सेंट किती प्रातिनिधिक होता ह्यापेक्षा) अधिक महत्त्वाचं आहे. तिथे तो खरी बाजी मारून गेला आहे असं मला वाटतं. मी पाहिलेल्या खेळात इतर प्रेक्षक त्या प्रसंगादरम्यान इतके स्तब्ध झालेले होते, की मी वर लिहिलेला अनुभव ह्याच खेळातला आहे का, अशी शंका वाटावी. तुझं त्या प्रसंगाविषयी काय मत / निरीक्षण?
१. सहमत२. मला तो प्रसंग
१. सहमत
२. मला तो प्रसंग काहिसा बटबटीत वाटला तरी होय लोक समरस झाले असावेत. व्यावसायिक हितासाठी त्यातील साटल्यावर (अगदी त्या गाठोड्यातल्या गुपिताइतकी नाही पण तरी) किंचित तिलांजली सोडली असे समजू.
त्याचा अॅक्सेंट किती प्रातिनिधिक होता ह्यापेक्षा) अबक हे अधिक महत्त्वाचं आहे.
सहमत आहेच. मात्र मी चित्रपटाची जेव्हा ओव्हरऑल समीक्षा करतो/वाचतो तेव्हा या निसटलेल्या घटकांवरही निरपेक्ष टिपणी असावी असे वाटले. या गोष्टींवर काम झाले असते तर मला चित्रपट पूर्णपणे आवडला असता. असा किंतु मनात राहिला नसता.
बाकी चित्रपट आवडला, कदाचित थिएटरात पुन्हा बघेन इतका आवडला हे आहेच.. पण.. हा पणच नकोसा वाटतो
शकुंतला नगरकर
शकुंतला नगरकर यांची मुलाखत लोकप्रभाच्या दिवाळी अंकात (२०१०) मधे आली होती, खुमासदार व्यक्तिमत्व आहे.
मस्त
चित्रपट पाहिलेला नाही.
क्रॅशचा संदर्भ/तुलना म्हणजे एक्झिक्यूशन जमलेलं आहे, आणि म्हणूनच बर्याचशा वृत्तपत्रिय समिक्षकांना चित्रपटाची कथा सांगता आलेली नाहिये, कुलकर्णींनी समिक्षकांची विकेट घेतली आहे असं दिसतं आहे.
नुआन्सेस किती सटल आहेत यावर ते सामान्य प्रेक्षकाला समजणार आणि त्याहिपेक्षा तो कितपत एंजॉय करू शकणार हे ठरेल, पुणे५२ मधला झीप/फ्लायचा आवाज असलेला सीन किंवा देवूळमधला केश्याला दृष्टांतानंतर ताप आल्याची तक्रार करण्याचा सीन हे दुवे लक्षात यायला महानगरी प्रेक्षकाला किमान २-३ वेळा तरी चित्रपट बघावा लागतो आणि ते ठीकच आहे, सवय आहे कुठे.
पण तुमचं समिक्षण क्रॅशच्या प्रेरणेची डिग्री बरीच जास्त आहे असा संकेत देतं हे वाचून थोडी निराशा झाली.
गैरसमज
>> पण तुमचं समिक्षण क्रॅशच्या प्रेरणेची डिग्री बरीच जास्त आहे असा संकेत देतं हे वाचून थोडी निराशा झाली.
असा संकेत देण्याचा माझा हेतू नाही. चित्रपटाची रचना त्याची आठवण करून देते एवढाच माझा साधासा (तोही जाता जाता एका वाक्यात उल्लेख केलेला) मुद्दा आहे. रचना : एक घटना, तिच्यामुळे एकत्र आलेले अनेक प्रकारचे लोक, त्यातून मानवजातीविषयी केलेलं व्यापक भाष्य. एवढंच साम्य आहे. मला ते 'डिग्री बरीच जास्त' वाटत नाही.
ठीक
कारण अखेर माणसाच्या सगळ्या गुणदोषांसकटच साजरा केलेला हा माणूसपणाचा उत्सव आहे. तो आशादायी आहे. सध्याच्या काळात वास्तवापासून पलायनवादी भूमिका न घेता, माणसांच्या प्रसंगी अनैतिक वागण्याचा धिक्कार न करता, त्यांच्या स्खलनशीलतेला समजून घेत अतिशय संयमानं पण ठामपणानं माणूसपणाविषयीची अशी आशा तेवत ठेवणं गरजेचं आहे.
क्रॅशबद्दलही असेच बोलता येईल असे वाटते, असो. महेश बर्दापुरकरांचेही समिक्षण बरे झाले आहे.
फरक
>> क्रॅशबद्दलही असेच बोलता येईल असे वाटते
बरोबर आहे, पण हे चित्रपटाच्या जातकुळीमधलं किंवा शैलीमधलं साम्य म्हणता येईल. प्रत्यक्ष 'हायवे'मध्ये एक तर अपघातासारखी एकच घटना नाही, तर प्रवास आहे. शिवाय, 'क्रॅश'सारखं काळात मागेपुढे जाणं नाही, तर तो प्रवास बऱ्यापैकी एकरेषीय आहे - म्हणजे सगळेजण सुरुवातीला प्रवासाला निघालेले आहेत आणि यथावकाश ते घाटात एका ट्रॅफिक जॅममध्ये सापडतात. आणि सगळी पात्रं तर खास आपल्याकडची आहेत; त्यांचे प्रश्न, त्यांच्यातले संवाद वगैरे काहीच क्रॅशसारखं नाही. थोडक्यात, साम्यस्थळं असली तरी फरकही खूप आहेत.
प्रतिसाद
>> १. चित्रपटाचं धेडगुजरी शीर्षक किंचित खटकलं. त्यात अधिक साटल्य दाखवता आलं असतं का?
मला वाटतं की ते चित्रपटाच्या आशयाशी आणि एकंदर केऑटिक घाटाशी सुसंगत आहे. म्हणजे - इंग्रजी-मराठीचा काला करणं हे समकालीन परंपरेला साजेसं ठरतं; 'सेल्फी' तर खास सद्यकाळातला शब्द आहे आणि हे आरपार जाणारं समाजचित्र आहे. शिवाय, चित्रपटातल्या केऑसचं प्रतिबिंब त्या धेडगुजरीपणात पडतं. शिवाय, एक शक्यता - चित्रपटावर काही वर्षं काम चालू होतं. दरम्यान 'हायवे' नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला. त्यामुळे आणखी शब्दांची भर घातली असावी, पण सगळीकडे 'हायवे' म्हणूनच उल्लेख होतो आहे.
>>२. 'रोड मूव्ही' ह्या प्रकारातला हा पहिला उल्लेखनीय मराठी चित्रपट म्हणता येईल का?
नक्कीच.
>> सिनेमाचा शेवट (किंवा अधिक नेमकेपणानं सांगायचं तर शेवटाकडच्या चित्रचौकटी) बराच प्रेडिक्टेबल, गोडगोड आणि बाळबोध आहे.
माझ्या मते तो सद्यकालीन वास्तवाकडे आशादायी दृष्टिकोनातून पाहणाऱ्या जीवनदृष्टीतून आला आहे. जर ती तुमची जीवनदृष्टी नसली किंवा तुम्हाला तिची भावनिक गरज वाटत नसली तर तुम्हाला तो शेवट गोडगोड वाटू शकेल. ह्याउलट, ज्यांना आता जगताना त्या आशावादाची भावनिक गरज भासते आहे त्यांना तो शेवट अतिशय हेलावणारा वाटेल असा माझा अंदाज आहे.
>> काही कथासूत्रांकडे गरजेहून जास्त लक्ष दिल्यासारखंही वाटतं. (ही दिग्दर्शकाची निवड असू शकेल हे मला कळतं. पण ती निवड सिनेमाला अधिक पसरट करते असं माझं मत झालं.)
मी वर म्हटल्याप्रमाणे मला तो सिनेमाच्या लयीचा आणि रचनेचा अविभाज्य भाग वाटला. एखाद्या सिंफनीत काही सोलोज असतात आणि वृंदातली इतर वाद्यं त्या मेळात आपापला सूर लावून एकंदर थीमला पूरक पण दुय्यम भूमिका बजावतात, त्याप्रमाणे.
>> "आजचा महानगरी प्रेक्षक हे कितपत करू शकेल ह्याविषयी शंकाच आहे." हे ते वाक्य.
महानगरी प्रेक्षकांत जसे बेजबाबदार, उच्छृंखल, असंवेदनशील प्रेक्षक असतात; तसेच काही अॅकेडमिक ज्ञान नसलेले पण सिनेमाकडे डोळसपणे पाहू बघणारे प्रेक्षकही असतात. मग हे असं जनरलायझेशन कशासाठी? त्यातून उगाच तुच्छता दाखवण्यापलीकडे नक्की काय साध्य होतं? एकदा मुख्यधारेत सिनेमा प्रदर्शित केला म्हणताना प्रेक्षकांचा हा बहुरंगी पट स्वीकारण्यावाचून पर्याय काय आहे? आणि या प्रेक्षकांचं शिक्षण (!) करण्यासाठी मुख्यधारेतल्या चित्रपटांवाचून दुसरं माध्यम तरी कोणतं आहे?
हे सरसकटीकरण नव्हे. अगदी कोथरुडात सिनेमा पाहायला येणारा सुशिक्षित, सुसंस्कृत मराठी प्रेक्षक पाहिला तरी त्यातला बहुसंख्य भाग असाच आहे. त्यामुळे त्यात फक्त वास्तवाची जाणीव आहे. थोडा असाही विचार करून पाहा : तुम्हाला जो शेवट बाळबोध वाटला त्याला हा बहुसंख्य प्रेक्षक थोडा तरी भावनिक प्रतिसाद देऊ शकेल. त्यामुळे अखेर त्या प्रेक्षकाला तुच्छ न लेखता त्याचाही थोडा विचार दिग्दर्शकानं केला आहे असं माझं मत आहे. 'शेवटानं हेलावून गेलास तर थोडा आधीच्या गुंतागुंतीपर्यंत पोहोचायचाही प्रयत्न कर बाबा' असं ह्या प्रातिनिधिक प्रेक्षकाला दिग्दर्शक सांगतो आहे जणू.
चिंजं, थोडा गोंधळ होतो आहे
चिंजं, थोडा गोंधळ होतो आहे माझा, तुमचं म्हणणं काय आहे त्याबद्दल.
कोणत्याही मार्गाने का असेना (बाळबोध शेवट / छोट्या छोट्या गोष्टींतून दिसणारे पडसाद), महानगरी प्रेक्षकाला अपेक्षित आशय कळेल की नाही? जर भावनिक प्रतिसाद देऊन का होईना, प्रेक्षक अपेक्षित निष्कर्षापर्यंत पोचणार असेल / पोचायला उद्युक्त होणार असेल, तर झालं की मग. मग महानगरी प्रेक्षकाबद्दल तुम्ही ही अशी तुच्छता का दर्शवता आहात? माझी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाबद्दल अजिबात तक्रार नाहीय. जे काही गुणदोष जाणवले असतील, ते माझे माझ्यापाशी. माझी तक्रार आहे ती, अमुक एक गोष्ट महानगरी (किंवा कोणत्याही, तो तपशील महत्त्वाचा नाही) प्रेक्षकाला कितपत समजेल शंकाच आहे, या तुमच्या शेर्याबद्दल.
अशी शेरेबाजी का करावी, त्यातून काय साध्य होतं, हे उगाच एलिटिस्ट आणि अनावश्यक नाही का - असा माझा प्रश्न होता.
शेरा, तुच्छता किंवा एलिटिझम
>> मग महानगरी प्रेक्षकाबद्दल तुम्ही ही अशी तुच्छता का दर्शवता आहात? माझी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाबद्दल अजिबात तक्रार नाहीय. जे काही गुणदोष जाणवले असतील, ते माझे माझ्यापाशी. माझी तक्रार आहे ती, अमुक एक गोष्ट महानगरी (किंवा कोणत्याही, तो तपशील महत्त्वाचा नाही) प्रेक्षकाला कितपत समजेल शंकाच आहे, या तुमच्या शेर्याबद्दल.
अशी शेरेबाजी का करावी, त्यातून काय साध्य होतं, हे उगाच एलिटिस्ट आणि अनावश्यक नाही का - असा माझा प्रश्न होता.
त्यात शेरेबाजी नाही, एलिटिझम नाही किंवा तुच्छताही नाही. महानगरी प्रेक्षकाला हा चित्रपट (त्यातल्या अनेक बारकाव्यांमुळे किंवा रचनेतल्या गुंतागुंतीमुळे) समजून घ्यायला जड जाईल असं माझं मत आहे. आणि हे मत महानगरी प्रेक्षक पाहात पाहातच तयार झालेलं आहे. चित्रपट पाहताना ते कितीदा फोन तपासतात, एकमेकांशी बोलतात आणि एकंदरीत किती लक्ष देऊन सिनेमा पाहतात ह्याविषयीचं माझं निरीक्षण आणि ह्या विशिष्ट चित्रपटापर्यंत पोहोचण्यासाठी तो किती लक्ष देऊन पाहावा लागेल आणि त्याविषयी किती विचार करावा लागेल ह्याविषयीचं माझं मत असे दोन घटक एकत्र करून पाहिले तर मला माझं मत अपरिहार्य आणि तर्कशुद्ध वाटतं. शिवाय, वर्तमानपत्रांत परीक्षण लिहिणाऱ्यांपासून ते चित्रपट पाहिलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया पाहून ते मत अधोरेखितच झालेलं आहे. एवढंच. आणखी काही नाही.
तुमचं मत चूक आहे की बरोबर
तुमचं मत चूक आहे की बरोबर आहे, तर्कशुद्ध आहे की तर्कहीन आहे, हा इथे मुद्दाच नाही. पण अशी मत वाचकाला लेखापासून एका विशिष्ट अंतरावर राखतात. ती टाळता आली, तर हा तालेवार लेख अधिक वाचकांपर्यंत पोचू शकेल, असं माझं मत. आणि असे लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याची (प्रत्यक्ष पोच अशा अर्थी नव्हे, तर लेख परका न वाटणं-वाचावासा-विचार करण्याजोगा वाटणं अशा अर्थी) निकड आहे, हे तुम्हांलाही मान्य व्हावं.
असो. यावर वाद संभवत नाही.
अगदी बरोबर. तसं स्पष्ट
अगदी बरोबर. तसं स्पष्ट म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही.
मला असं वाटतं की वय, एक्स्पोजर, योग्य ते शिक्षण या गोष्टी आवश्यक तशा नसल्या; तरीही प्रेक्षकाला (अगदी बेफिकीर प्रेक्षकालाही) या प्रकारच्या चित्रपटातून काही ना काही गवसतंच. काही चित्रचौकटी लक्षात राहतात, काही प्रसंग हाताळण्याची विशिष्ट धाटणी, गोष्टीमधला एखादा भाग... दृश्यचौकटीतला प्रकाश... काही ना काही मिळतं. तुम्ही व्यक्त केलेल्या मतामुळे किंवा त्यासारख्या शेर्यामुळे "नको बा उगाच. आपल्याला नाही झेपणार, हे काहीतरी कलात्मक झेंगट दिसतंय." (भीती, किंवा उर्मटपणा, किंवा खांदे उडवणं, किंवा आळस. कोणताही दृष्टीकोन असू शकतो.) असं मत होण्याची शक्यता वाढते.
मग हे मत कितीही बरोबर असू शकत असलं, तरी व्यक्त करण्याची नेमकी आवश्यकता काय?
अनुभव
>> मग हे मत कितीही बरोबर असू शकत असलं, तरी व्यक्त करण्याची नेमकी आवश्यकता काय?
शक्य आहे. मला असं वाटतं की 'सिनेमा जरा नीट लक्ष देऊन पाहायला लागणार आहे, काही तरी वेगळा आहे' हे भावी प्रेक्षकाला सांगितलं तर तो येताना किमान तयारी तरी करून येईल. अन्यथा त्याचा अपेक्षाभंग होण्याची आणि त्यातून सिनेमाला कुप्रसिद्धी मिळण्याची शक्यता वाढते; शिवाय, इतरांचा रसभंग होतो तो वेगळाच. मी गेलो होतो त्या खेळाला (सिटी प्राईड, कोथरुड) प्रेक्षागृहातले अनेक लोक लहान मुलं घेऊन आले होते (चित्रपट 'पेरन्टल गायडन्स' आहे त्यामुळे मूलतः त्यात काही गैर नसावं). ती मुलं प्रेक्षागृहात सर्व वेळ दंगा करत होती. माझ्या मागच्या खुर्चीतलं मूल (वय सुमारे ५ वर्षं) माझ्या खुर्चीला मागून सर्व वेळ लाथा हाणत होतं. त्याला मी (माझ्या परीनं, शक्य तितक्या सभ्यपणे) दम भरला. त्याचे पालक माझ्याकडे रागानं बघू लागले. मग मी खुर्ची बदलली. आजूबाजूच्या प्रेक्षकांचे मोबाईल चाळे तर सतत चालू होतेच. माझ्या रांगेतल्या एका वृद्ध गृहस्थांना फोन येत होते. मी आक्षेप घेतल्यानंतर मोबाईल बंद करण्याची तयारी त्यांनी दाखवली, पण ती क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यांच्या विनंतीनुसार मग मी त्यांचा मोबाईल घेऊन तो बंद करून दिला; मग मध्यंतरात (विनंतीनुसारच) पुन्हा चालू करून दिला; मध्यंतरानंतर चित्रपट सुरू झाला त्यानंतर काही काळानं तो पुन्हा वाजला; तेव्हा माझ्या आक्षेपाची वाट न पाहताच त्यांनी तो माझ्याकडे सोपवला; मग मी तो पुन्हा एकदा बंद करून दिला. ह्या सगळ्यामुळे सिनेमातला काही भाग मलाही नीट पाहता आला नाही. इतर ठिकाणी फार वेगळी परिस्थिती असावी असं मला वाटत नाही. ह्या प्रकारच्या परिस्थितीमुळे 'हायवे'सारख्या सिनेमावर अन्याय होतो असं मला वाटतं. म्हणून ते म्हणण्याची आवश्यकता मला भासली.
पूर्वतयारी
>> एक तर या अडचणी सगळ्याच प्रकारच्या चित्रपटांना (आणि त्याहून बिचार्या नाटकवाल्यांना) येतात. प्रेक्षकांचं शिक्षण करण्याची गरज आहेच. पण चित्रपटाच्या रसास्वादातून 'लोकांना चित्रपटातली गुंतागुंत किती कळणार ही एक शंकाच आहे' असं म्हणून ते शिक्षण कसं साधेल?
९९% मराठी चित्रपटांत ह्यामुळे केवळ रसभंग होतो, पण चित्रपट पुरेसा ढोबळ असल्यामुळे पाहण्यातून फार काही निसटत नाही; इथे मात्र तसं होईल. त्यामुळे ही शंका व्यक्त केली. ती वाचून शिक्षण होणार म्हणून नाही, तर ती शंका खरी ठरू नये असं ज्या वाचकाला मनापासून वाटेल तो थोडी पूर्वतयारी तरी करून जाऊ शकेल म्हणून. असो.
अवांतर
खरं आहे. काही दिवसांपूर्वी 'कोर्ट' चित्रपट इथल्या चित्रपट महोत्सवात दाखविला गेला होता. तो पहायला जाताना, तिथे उपस्थित असलेल्या इतर मराठी बंधू-भगिनींबद्दल काही तुच्छतेची भावना वगैरे घेऊन गेलो नव्हतो. चित्रपट महोत्सवातले चित्रपट पहायला येणार्या प्रेक्षकांच्या जाणिवा थोड्यातरी प्रगल्भ असाव्यात अशी अपेक्षा असणे फार चुकीचे असेल असे वाटले नाही. चित्रपट संपल्यानंतर मात्र उपस्थितांच्या प्रतिक्रिया ऐकून फार वैषम्य वाटले. आपल्या सुखासीन आणि भौतिकवादी आयुष्यातल्या चढउतारांत मग्न असलेल्यांची इतरांच्या आणि मूलभूत महत्वाच्या प्रश्नांबद्दलची अनास्था, हा चित्रपटातला मुद्दा ते आपल्या प्रतिक्रियांमधून उघड करत होते हेही त्यांच्या लक्षात येत नसावं याचं ते वैषम्य होतं. विशेषतः 'झोपलेल्या माणसाला जागे करण्याचा' शेवटाचा सीन उपस्थितांना चांगलाच खटकलेला होता. असो :-)
चित्रपट महोत्सवातले चित्रपट
चित्रपट महोत्सवातले चित्रपट पहायला येणार्या प्रेक्षकांच्या जाणिवा थोड्यातरी प्रगल्भ असाव्यात अशी अपेक्षा असणे फार चुकीचे असेल असे वाटले नाही.
माझा जो हा हुच्चभुभु लोकांचा अभ्यास आहे त्यावरुन मला त्यांची चीड्चीड का होत असावी ह्याचा अंदाज आहे.
१. प्रथम म्हणजे त्यांना स्वताबद्दल काहीतरी आपण उच्च, रसिक, दर्जा, गुणवत्ता म्हणजे काय ते आपल्यालाच माहीती असा समज असतो.
२. त्याचेच कॉन्व्हर्स म्हणुन दुसर्याच्या आवडीनिवडी हीन आहेत आणि त्याचे जगणे अगदीच पशुच्या पातळीचे आहे हा ही दृढ समज असतो.
पण ह्या दोन गोष्टी त्यांची जळजळ चीड्चीड होण्याची कारणे नाहीत. कारण हे की.
ही इतकी हीन अभिरुचीची माणसे, त्यांना कशातले काही कळत नाही, ही माणसे आनंदात कशी? ती कशी आयुष्य त्यांना जमेल तसे पण मजेत जगतायत. आणि मुख्य म्हणजे मी इतका/इतकी भारी, उच्च अभिरुचीची असुन ते मला सरळसरळ इग्नोर करतायत? ह्या काय न्याय आहे का? मला सलाम मारायचा सोडुन हे पशु मला हसतायत. हे चीडचीडीचे मुळ कारण आहे.
हा हा हा
ही इतकी हीन अभिरुचीची माणसे, त्यांना कशातले काही कळत नाही, ही माणसे आनंदात कशी? ती कशी आयुष्य त्यांना जमेल तसे पण मजेत जगतायत. आणि मुख्य म्हणजे मी इतका/इतकी भारी, उच्च अभिरुचीची असुन ते मला सरळसरळ इग्नोर करतायत? ह्या काय न्याय आहे का? मला सलाम मारायचा सोडुन हे पशु मला हसतायत. हे चीडचीडीचे मुळ कारण आहे.
बलीवर्दनेत्रभञ्जक!!!!!!!! _/\_
तुम्हांस एक मस्तानी लागू मजकडून.
चिडचिड आणि आनंद, शैली आणि...
>> ही इतकी हीन अभिरुचीची माणसे, त्यांना कशातले काही कळत नाही, ही माणसे आनंदात कशी? ती कशी आयुष्य त्यांना जमेल तसे पण मजेत जगतायत. आणि मुख्य म्हणजे मी इतका/इतकी भारी, उच्च अभिरुचीची असुन ते मला सरळसरळ इग्नोर करतायत? ह्या काय न्याय आहे का? मला सलाम मारायचा सोडुन हे पशु मला हसतायत. हे चीडचीडीचे मुळ कारण आहे.
शक्य आहे. व्यक्त होण्याची तुमची शैली आणि माझी शैली ह्यामध्ये मोठा फरक आहे, पण तुमच्या ह्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर माझ्याच 'हायवे'च्या परिचयातून उचललेलं हे उद्धृत कदाचित रोचक वाटावं -
त्या सगळ्या गुंतागुंतीसकट जगताना काही माणसं आनंदात दिसतात, तर काही दु:खात. अज्ञानात सुख असतं म्हणून कदाचित काही जण आनंदात असतील, तर काहींना परिस्थितीच्या रेट्यापुढे तितकीशी मान तुकवावी लागत नसेल म्हणून ते आपल्या स्वकेंद्री आनंदाच्या बुडबुड्यात आत्ममग्न असतील. असा संशयाचा फायदा काही जणांना मिळाला तरीही अनेक लोकांना जगण्याच्या तीव्र संघर्षाला रोजच्यारोज तोंड द्यावं लागतं आणि तरीही त्यांच्यापैकी काही माणसंदेखील आनंदी दिसतात. भारतात राहून आणि डोळे उघडे ठेवून हे काही नाकारता येत नाही. ही माणसं जगण्याची उर्जा कुठून आणतात असा प्रश्न अशा वेळी साहजिकच पडतो.
हे सगळं ठीकच आहे. तरीही -
हे सगळं ठीकच आहे. तरीही - जेव्हा प्रेक्षक सिनेमाला अनुकूल अभिरुची / धीर / जाणकारी / प्रगल्भता बाळगणारे नसतात, तेव्हा तर प्रेक्षकाला हाताला धरून सिनेमापर्यंत नेणं अधिकच महत्त्वाचं असतं. तिथे 'लोकांना किती कळेल शंकाच आहे’ हे विधान उगाच कुत्सित शेर्यात मोडतं आणि ते सिनेमासाठी मारकच. (लेखकाच्या लेखनाकडे वाचक वळण्याच्या दृष्टीनंही वाईट. पण ते ठीक. कुणाकुणाला जीएटाईप 'आपली पुस्तकं दुर्मीळ तर आपण थोर' या जातीचं काहीतरी वाटत असू शकतं. त्यातही एक अपील आहेच.)
तरीही - जेव्हा प्रेक्षक
तरीही - जेव्हा प्रेक्षक सिनेमाला अनुकूल अभिरुची / धीर / जाणकारी / प्रगल्भता बाळगणारे नसतात, तेव्हा तर प्रेक्षकाला हाताला धरून सिनेमापर्यंत नेणं अधिकच महत्त्वाचं असतं.
काहे? कोणीतरी कोणाला तरी कुठेतरी न्यायची जबाबदारी का घ्यावी? गाणी सिनेमे याची इनफ खाज उत्पन्न झाल्यावर लोक स्वतःहून समानशील लोकांचा शोध घेतात आणि अजून डेप्थमध्ये जातात असं निरिक्षण आहे.
अगदी हाच अनुभव
मलाही काल सिटीप्राईड कोथरुडला हा पिच्चर बघायला गेल्यावर हाच अनुभव आला. एकतर मला सिनेमातल फारस काही कळत नाही. म्हणुन लक्षपूर्वक पहावा अस ठरवल होत.पण या मोबाईलखोरांमुळे लक्ष विचलित होत होत. मोबाईल मॅनर्स या गोष्टीकडे अजून गांभीर्याने पाहिल जात नाही. मोबाईल तंत्रज्ञान वेगाने आल. पण त्याचे सामाजिक जीवनावरील परिणाम दुर्लक्षित राहिले.
मोबाईल मॅनर्स विषयी एक लघुप्रबोधनपट हा सातत्याने सार्वजनिक ठिकाणी दाखवला पाहिजे.
आजचा महानगरी प्रेक्षक हे
आजचा महानगरी प्रेक्षक हे कितपत करू शकेल ह्याविषयी शंकाच आहे.
नवकाव्याप्रमाणे, आधुनिक चित्राप्रमाणे किंवा एखाद्या भव्य सिंफनीप्रमाणे ह्या चित्रपटाची लय आणि तिच्यात अंतर्भूत गुंतागुंतीची रचना लक्षात न येण्याची शक्यता मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत मोठी आहे. त्यात त्यांना दोषही देता येणार नाही, कारण मराठी चित्रपटांनी तसा पायंडाच पाडलेला नाही, आणि प्रेक्षकांच्या दृष्टीची तशी मशागतच केलेली नाही.
कुठल्याही कलाकृतीचे परीक्षण फक्त त्या कलाकृती बद्दलच का असू नये. आपल्याला काय भावले आणि काय भावले नाही हे सांगावे आणि थांबावे. बाकीच्या लोकांची कलाजाणिव कीती थोटी आहे, बाकीच्यांच्या बुद्धीची मशागतच कशी झालेली नाही. हे सर्व कशाला?
हे नक्कीच टाळता येण्यासारखे आहे.
तसेही प्रत्येक जण स्वताच्या आवडीप्रमाणे आनंद उपभोगतो. कोणाचा उच्च आणि कोणाचा नीच हे कसे आणि कोण ठरवणार? दगडाला नमस्कार करणार्याला मूर्ख म्हणणारी आणि मी तुम्हाला शहाणे करुन सोडतो ( थोडक्यात माझे मोठे पण मान्य करा ) हे अश्या उच्च आसनावर बसल्याच्या मानसिकतेतुनच आले आहे.
>> नवकाव्याप्रमाणे, आधुनिक
>> नवकाव्याप्रमाणे, आधुनिक चित्राप्रमाणे किंवा एखाद्या भव्य सिंफनीप्रमाणे ह्या चित्रपटाची लय आणि तिच्यात अंतर्भूत गुंतागुंतीची रचना लक्षात न येण्याची शक्यता मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत मोठी आहे.
ती लक्षात येवो न येवो, मला तरी त्यातले काही तपशील अगदी ढोबळ वाटले. काही कॉन्ट्रास्ट्स दाखवले म्हणजे आपण काहीतरी गंभीर भाष्य करतो आहोत असा समज असलेले काही प्रसंग. ह्यात कसली बोंबलायला गुंतागुंत? दोन वेश्यांच्या शेजारी शामळू- भावगितं म्हणणारा-मळ्ळ; त्यांचं लघवीला गेल्यावर लक्ष ठेव म्हणणं; विश्वाचं बिंग उकलणार्याचा एकाकीपणा, घनतमी कवितेचा वापर आणि एका रहस्याचा(!) शेवट इत्यादी इत्यादी. त्या रहस्याला उगाच स्ट्रेचलेलं संगीत(सॉरी सोलोज की काय ते).
>>'शेवटानं हेलावून गेलास तर थोडा आधीच्या गुंतागुंतीपर्यंत पोहोचायचाही प्रयत्न कर बाबा'
हं.
अठरापगड विखंडितपणा
चित्रपट अजून पाहिलेला नाही.
अठरापगड भारतीय समाजाला असं एकत्र एखाद्या मोठ्या पटावर मांडून त्यांना आकळून घेण्याचे काही प्रयोग भारतीय साहित्यात झाले, पण चित्रपटात तसं क्वचितच झालेलं दिसतं
- भारतीय साहित्यातले असे काही संदर्भ इथं या चित्रपटाच्या निमित्तानं नोंदवण्याजोगे वाटले का? कुठले?
- 'सद्यकालीन वास्तवाचं एक विखंडित रूपच दिग्दर्शकाला' दाखवायचं आहे, असं 'हायवे'संबंधी एका ठिकाणी वाचनात आलं. तर, भारतातलं अठरापगड जातीजमातींच्या संदर्भातलं आधीपासूनचं वास्तव आणि हे आजच्या काळाचं एकूणच विखंडित असणं, यांच्यातला गुंता आणखीच खास आहे, असं वाटतं का? (चित्रपट पाहिला नसल्यामुळं, त्यामधे हा गुंता हाताळलाय का, असा प्रश्न विचारून टाकत नाही. पण त्या संदर्भात हा प्रश्न घेतला तरी चालेल).
-----
माणसांच्या प्रसंगी अनैतिक वागण्याचा धिक्कार न करता, त्यांच्या स्खलनशीलतेला समजून घेत अतिशय संयमानं पण ठामपणानं माणूसपणाविषयीची अशी आशा तेवत ठेवणं गरजेचं आहे.
हे वाक्य वाचलं आणि मग
आजचा महानगरी प्रेक्षक हे कितपत करू शकेल ह्याविषयी शंकाच आहे
हे आधीचं वाक्य थोडं निराशावादी वाटलं. ;)
आपण उल्लेख केलेल्याच महानगरात, एका मध्यम स्वरूपाच्या थिएटरमध्ये 'कोर्ट' हा चित्रपट पाहिला. त्यात आरोपीचा वकील बोलायला लागला, की एक प्रेक्षक मधेच जोरजोरात ओरडायचा, 'ए, मराठीत बोल, मराठीत बोल!' मग इंटर्व्हलनंतर बहुधा तो निघून गेला. आर्थिकदृष्ट्या वरच्या वर्गातला होता. नंतर 'किल्ला' हा चित्रपट आणखी कनिष्ठ स्वरूपाच्या थिएटरमध्ये पाहिला, चित्रपटात एक शाळकरी मुलगा आपल्या मित्राला सांगत असतो की, अपघातात त्याचे आईवडील कसे गेले वगैरे. एक ढोबळ ग्रामीण टोन त्याच्या संवादांना दिलेला होता, तर त्याचे आईवडील गेले हे तो सांगत असताना आजूबाजूचे प्रेक्षक जोरजोरात हसले. 'फँड्री' या चित्रपटाच्या वेळी, तर डुक्कर पकडण्याच्या शेवटच्या भीषण प्रसंगात हशाच हशा. (पण तरी 'महानगरी प्रेक्षका'तही आणखी अंतर्गत काही भेद असतील असं वाटतं. जात-वर्ग? त्यानुसार त्या त्या ठिकाणच्या प्रेक्षक वर्गाच्या प्रतिक्रियांबद्दल अधिक काही ठोस सांगता येईल का, असं वाटलं.)
अवधूत यांना प्रतिसाद
>> भारतीय साहित्यातले असे काही संदर्भ इथं या चित्रपटाच्या निमित्तानं नोंदवण्याजोगे वाटले का? कुठले?
मला पटकन आठवतात ते :
'राग दरबारी - श्रीलाल शुक्ल. एका गावातल्या वेगवेगळ्या तर्हेच्या लोकांना कादंबरीत एकत्र केलेलं आहे.
'सूरज का साँतवा घोडा' - धर्मवीर भारती. विषय प्रेमाच्या तर्हांभोवती फिरत असला, तरीही वेगवेगळ्या स्तरांतली माणसं त्यात आहेत.
'पर्व' - भैरप्पा. विषय महाभारत असला, तरीही युद्धाशी निगडित वेगवेगळी माणसं ज्या प्रांतांतून आणि सामाजिक स्तरांतून आलेली आहेत त्यांत वैविध्य आहे.
>> भारतातलं अठरापगड जातीजमातींच्या संदर्भातलं आधीपासूनचं वास्तव आणि हे आजच्या काळाचं एकूणच विखंडित असणं, यांच्यातला गुंता आणखीच खास आहे, असं वाटतं का?
सहमत. आधीपासूनचे तिढे अजूनही जिवंत आहेत. त्याशिवाय, सद्यकालीन वास्तवात नव्या प्रलोभनांमुळे, जीवनशैलींच्या सरमिसळींमुळे, ओळखींच्या (आयडेंटिटी) भंजाळण्यातून आणि भिन्न प्रवृत्तींच्या माणसांच्या घुसळणीतून नवे तिढे निर्माण होत आहेत.
>> चित्रपट पाहिला नसल्यामुळं, त्यामधे हा गुंता हाताळलाय का, असा प्रश्न विचारून टाकत नाही. पण त्या संदर्भात हा प्रश्न घेतला तरी चालेल
मुळात, एक्सप्रेसवेसारख्या ठिकाणी प्रवासापुरते एकत्र येण्यामुळे एरवी ज्या माणसांना सामोरं जावं लागत नाही त्यांच्यासोबत काही तास घालवावे लागणं ही गोष्ट ह्या समकालीन गुंत्याशी निगडित आहे. वर्णव्यवस्था आणि वर्गव्यवस्था जितकी घट्ट आणि काटेकोर असते तितकं हे मिसळणं टाळलं जातं. उदाहरणार्थ, युरोपियन फूटबॉलच्या सामन्यांत आणि व्हिडिओ गेम्समध्ये गुंगणारा एखादा उदारमतवादी शहरी उच्चवर्णीय तरुण कधी चार घरी धुणीभांडी करून कुटुंब चालवणार्या एखाद्या निम्नवर्गातल्या स्त्रीबरोबर एकत्र तीन तास एखाद्या बंदिस्त अवकाशात घालवेल का? वगैरे.
>>हे वाक्य वाचलं आणि मग [...] हे आधीचं वाक्य थोडं निराशावादी वाटलं.
:-) माणूसपणाविषयीचा आशावाद दुर्दम्य ठेवण्याचा प्रयत्न करणारे पुणेकर गिरीश-उमेश कुलकर्णी आणि त्याचं दमन करायला सदाउत्सुक असलेले शेरेबाज आत्ममग्न पुणेकर ह्यांच्यातला हा तिढा आहे. संख्याबळ कुणाच्या बाजूनं आहे हे उघड आहे; पण प्रवाहाविरुद्ध पोहायचं झालं, तर तो माणूस अल्पमतात असणारच हेही उघडच आहे, आणि त्यालाच पोहायचं असल्यामुळे त्याला असा आशावाद अल्पसंख्य असूनही जिवंत ठेवावा लागतोच.
>> पण तरी 'महानगरी प्रेक्षका'तही आणखी अंतर्गत काही भेद असतील असं वाटतं. जात-वर्ग? त्यानुसार त्या त्या ठिकाणच्या प्रेक्षक वर्गाच्या प्रतिक्रियांबद्दल अधिक काही ठोस सांगता येईल का, असं वाटलं.
ज्यात करमणूक फारशी होणार नाही, उलट डोक्याला त्रासच होणार आहे अशा चित्रपटाला स्वतःच्या पदरचे १००-२०० रुपये खर्च करून येणारा प्रेक्षक म्हणजे मुळातच तो काही 'बजरंगी भाईजान' किंवा 'बाहुबली'चा प्रेक्षक नव्हे. तरीही, 'कोर्ट'मध्ये प्रेक्षकाला अपरिचित आणि दूरची वाटणारी शैली होती; शिवाय, अनोळखी कलाकारही होते. म्हणजे, प्रेक्षकशरणता शून्य असल्यामुळे 'कोर्ट'चं कठीणच होतं. त्या मानानं 'फॅन्ड्री'मध्ये काळ्या-पांढर्या रंगातली, जिवाचा ठाव घेऊ शकेल अशी अवघड वयातली प्रेमकथा आणि सामाजिक जाणीव असलेल्या हृदयाला पिळवटून टाकण्याइतपत नाट्य होतं. त्याचा काही प्रमाणात फायदा चित्रपटाला झाला असावा. 'हायवे'मध्ये दोन्हींचा मध्य साधत प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचा काही प्रमाणात प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, काही लोकप्रिय कलाकार त्यात आहेत; शिवाय, चित्रपटाचा मूड सुरुवातीला हलका आहे आणि हळूहळू गडद होत जातो. वरच्या चर्चेत ऋषिकेशला जो प्रसंग बटबटीत वाटला, तो आलेल्या सरासरी प्रेक्षकाला (किमान एकाग्रता आणि समरसता ह्यासाठी त्यानं प्रयत्न केले तर) हेलावून टाकू शकतो. तरीही, नव्वदोत्तरी सौंदर्यविचारच मुळात सरासरी प्रेक्षकाच्या पचनी सहजासहजी पडत नाही हे वास्तव बर्यापैकी स्पष्ट आहे; त्यामुळे त्याचा तोटा 'हायवे'ला होणार हे मला तरी उघड वाटतं.
हायवे
चित्रपट पाहिला, आवडला, समिक्षा नेमकी झालीये, मला प्रकर्षाने आवडलेले मुद्दे म्हणजे एकमेकांशी काहीही संबंध नसताना एकमेकांना सहज स्पर्षुन जाणारी माणसं, संवादाशिवाय सांगितलेल्या गोष्टी(मुकबधिर मुलाची गोष्ट), सफाई कामगाराचा एकच जाताजाता घडणारा संवाद आणि इतर तत्सम प्रसंग, हुमाचे प्रसंग, सातर्याला जाणार्या कुटुंबाचे प्रसंग त्यातही त्यातल्या मुलीचे मोजके प्रसंग, बारिक तपशील नेमके उभं करणं हे तर गजब आहे. मला प्रकर्षाने खटकलेले मुद्दे म्हणजे, नेत्रसुखद नसलेलं चित्रीकरण, कपड्यांचा साधेपणा समजू शकतो पण हुमाच्या गाडीच्या काचा पण गचाळपणे पुसलेल्या असतात त्यावरचे फराटे लक्षात येतात हे जाणिवपूर्वक केललं आहे, गचाळ मुंबई डॅनी बोयल पण दाखवतो, पण कुलकर्णींची फ्रेम आकर्षित करून घेत नाही कदाचीत हा प्लस पॉइंट असावा पण चकचकीत चित्रपट पहाण्याची सवय झाल्याने ते थोडंसं नकोच झालं, गिरीश मराठी संस्थळावर नेमाने वावरत असल्यासारखा अस्सल मराठी बोलतो, क्लायमॅक्समधे त्याचं उलगडणं मधेच थोडं ओव्हर वाटतं, रेणुका "ऑल्मोस्ट" परफेक्ट फीट्ट आहे, तिच्याएवजी सोनालीला घेतलं नाही हे फार बरं झालं.शेवटच्या सुटकेचं मात्र कोडं मला उलगडलेलं नाही, म्हणजे शेवटी सगळ्यांची सुटका झाल्यासारखं आहे पण ह्या सुटकेचा संबंध फक्त प्रतिकात्मक आहे काय? त्याचा संबंध कुठल्याही कथानकाशी जोडायचा हट्ट करायला हवा काय असाही प्रश्न मला पडला.
कास्टिंगबद्दल वेगळंच बोलावं लागेल, थोरामोठ्यांना घेतलं की मग कसं काम सोपं होऊन जातं, दोन ओळीच्या रोलसाठी नगरकर, आळेकर, सौमित्र,निपुण, नागराज, विद्याधर ह्यांना घेतलं की परत त्यात श्रम घालावे लागणार नाहीत हे सोयीचं गणित करुन टाकलं आहे, मुक्ता कान्ट हेल्प बिंईग मुक्ता पण तिचं काम छान आहे, पुरुषोत्तम शैली काही सुटत नाही, सौमित्रच्या बायकोचा रोलही अगदी मोजुन मापून होता, लाऊड होईल असं वाटत असतानाच योग्य झाला, टिस्काचं पात्रपण योग्यच फुटेज खातं, आधी मला ते अनावश्यक वाटलं पण शेवटी मात्र टिस्का आणि कुलकर्णींचं कौतुक वाटलं.
>>चित्रपट सुरुवातीपासून अखेरपर्यंत लयबद्ध आणि काव्यात्म आहे
हे जरी खरं असलं तरी तो प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहचत नाही असं मला वाटलं, पार्श्वसंगीत मधेमधे हरवल्यासारखं वाटतं.
गणेश मतकरी म्हणतात त्याप्रमाणे everybody hurts च्या गाण्यात आणि चित्रपटाच्या प्रेरणेत साम्य वाटतं./
मला तरी हायवे "क्रॅश" पेक्षा थोडा सरसच वाटला, फक्त मला थोडं फिनिशींग का चकचकीतपणा अधिक आवडला असता.
अजिबात चुकवू नका
चित्रपट बघताना मला काही ठिकाणी ठेच लागली. पण एकुणात फारच छान चित्रपट आहे. अजिबात चुकवू नका.
मात्र परिक्षण त्रोटक वाटले. अजून काही अंगावर लिहिता आले असते.