डाएटगिरीचा रेड कोड

मधुराकडे असलेल्या 'चक्रम माणसांशी कसे वागावे' या पुस्तकात लिहिलेलं होतं म्हणून की काय कोण जाणे, अचानक तिने वजन कमी करण्याचा इरादा जाहीर केला. आता ती काही जाडी वगैरे बिलकुल नाही. बारीकच आहे. पण तिचा आरसा बहुतेक जत्रेतल्या आरशांसारखा आहे. त्यात बघितलं की आपण सगळीकडून फुगलेलो आहोत असं तिला वाटत राहातं. मग झटका आल्यासारखं ती व्यायाम, डाएट वगैरेच्या मागे लागते. एरवी मी त्याबद्दल काही फारसा विचार केला नसता, पण ती जेव्हा म्हणाली "परवाच्या पार्टीसाठी काकूंकडून त्यातलेच काहीतरी पदार्थ बनवून घेता येतील." तेव्हा मात्र माझ्या काळजात चर्र झालं. मी काही बोललो नाही. पण तिच्या घरून निघाल्यावर तातडीने चारुता, रोहन आणि प्रसादला फोन करून आमच्या मित्रमंडळाची सीक्रेट मीटिंग बोलवली.

"कॉय झॉलं नॉक्की?" चारुताला बोलता बोलता लिपस्टिक लावता येते हे तिने दाखवून दिलं.
"आणि मधुरा कुठाय?" प्रसादने आपली नजर चारुताच्या ओठांवर रोखत विचारलं.
"तिच्याच विषयी कोड रेड मीटिंग आहे."
"काय झालं तिला? तिचा गजर काम करत नाही म्हणून ती वेडीपिशी झालीय परवासारखी?" चारुताची लिपस्टिक लावून झालेली असल्यामुळे ती बंगाली सोडून मायमराठीकडे सरकली.
"नाही, त्यापेक्षा डेंजर..." मी म्हणालो.
"मग तिचा स्विमसूट सापडत नाहीये?" प्रसादचे डोळे हे बोलताबोलताच स्वप्नाळू झाले.
"गप्रे. स्विमसूट म्हणे. मधुराचं नाव काढलं की झाला तुझा लाळघोटेपण सुरू." चारुताने त्याला फटकारलं.
"मधुरा," मध्ये ड्रामॅटिक पॉझ घेऊन मी सर्वांकडे नजर फिरवत म्हणालो "डाएट करतेय." अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांनी आपला श्वास खेचून घेत आ वासला. मी डोळे बारीक करून पुढे वाकलो आणि आत खुपसलेला सुरा वळवल्याप्रमाणे म्हटलं,
"आणि परवाच्या पार्टीसाठी ती आपल्याला सगळ्यांना डाएट रेसिपी करून खायला घालणार आहे." हे म्हटल्यानंतर अर्थातच हाहाकार उडाला. सगळे एकदम बोलायला लागल्यामुळ कॅफेमधली इतर मेंबरंही आमच्याकडे थोड्या प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागली. पण आम्हाला त्यांची पर्वा नव्हती. आमच्यासमोरची परिस्थिती गंभीर होती.
"मी तिला सांगणारे की मला नवीन नेकलेसेस फेसबुकवर दिसले त्या आर्टिस्ट बाईकडे जाऊन मापं द्यायची आहेत." चारुता म्हणाली.
“मी तर सांगणार की, आमच्या बुवांची आणीबाणी परिषद आहे म्हणून. बुवांनी बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध मंत्र तयार केलाय. तो म्हटला की, आपल्यावर जर कोणी बलात्कार करणार असेल, तर तो आधीच गलितगात्र होतो.”
“प्रसाद, तुला रे कशाला बलात्काराची भीती?,” चारुताने विचारलं.
“मला नाही गं चारु...ता, माझ्या मैत्रिणींना मंत्राची दीक्षा देण्यासाठी. मधुराची पार्टी होती म्हणून तो बेत कॅन्सल केला होता.”
"मला अचानक लक्षात आल की ‘प्सायटेक’च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे त्याच वेळी." रोहनच्या अशा बोलण्याकडे आता आम्ही लक्षसुद्धा देत नाही. ‘प्सायटेक’ ही त्याने काढलेली कंपनी आहे. त्याचा प्रेसिडेंट, चेअरमन, सीइओ, सीएफओ पासून ते चपराशापर्यंत तोच आहे. त्याने सायकॉलॉजीचा कधी काळी अभ्यास केलेला होता असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे काहीतरी सायकॉलॉजीवर आधारित भन्नाट प्रॉडक्ट्सच्या कल्पना त्याच्या डोक्यातून निघतात. त्याची ही खेळणी तयार करण्यासाठी आमच्याकडे नेहेमी तो भांडवल मागत असतो. पैसे आणि मैत्री वाचवण्यासाठी आम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नसतो.
"मला मात्र काही कारणं सुचत नाहीयेत" मी केविलवाणेपणे म्हटलं.
"तू असं का नाही करत? माझा एक मित्र डॉक्टर आहे. तो तुझ्या हाताला प्लास्टर बांधून देईल." हिंदी सिनेमातल्या व्हिलनांच्या जासूसांप्रमाणेच चारुताचे मित्रही चारों ओर फैलावलेले असतात. कुठेही गेलं तरी तिचा नवीन किंवा जुना मित्र असतोच. नसला तरी बिघडत नाही, ती तिथे गेल्यावर त्यांना काहीतरी जुनी ओळख असल्याचं सांगते, आणि बहुतेक लोक ती नाकारत नाहीत.
"सहा आठवडे विनाकारण तो हात गळ्यात अडकवून ठेवायचा?"
"विनाकारण कशाला, मी पाहिजे तर मोडून देतो. हॅ हॅ हॅ" इति रोहन.
"हो, आणि तुमच्या ‘सायटेक’चं काहीतरी खास हात मोडून देण्यासाठी टूल असेलच प्रोटोटाइप स्टेजला?"
"सायटेक नाही, ‘प्सायटेक’" रोहन सायकॉलॉजीला प्सायकॉलॉजी म्हणतो. आम्ही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून सोडून दिलं त्यालाही काही वर्षं लोटली आहेत.

"खरं तर तू त्या पार्टीला गेलं पाहिजेस. कोणीतरी तिला तिच्या प्रयत्नांत पाठिंबा द्यायला हवा, नैका?" चारुताने इतरांना विचारलं. सगळ्यांनी आपापल्या माना सोडवून घेतल्यावर माझी मान अडकवण्याबद्दल माना डोलावल्या.

नाइलाजाने मी तिच्याकडे गेलो. छान हिरव्यागार पेयाकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"तुळशीचा काढा आहे. त्याने वजन कमी व्हायला मदत होते." चव घ्यायच्या आधीच माझं तोंड वाकडं झालं.
"त्याच्यात थोडी व्होडका टाकली तर बरं लागेल" चव घेतल्यानंतर तोंड अधिकच वाकडं झालं.
"छे छे, दारूमध्ये फार जास्त कॅलऱ्या असतात. त्यामुळे आता माझ्याकडे दारूबंदी आहे."
"ती बंदी काढा हो, आणि काढाबंदी करा..." माझा विनोद ऐकून मधुराने माझ्याहूनही वाकडं तोंड केलं.
"चखणा घे" असं म्हणून तिने एक डिश पुढे केली. तिच्यात उकडलेली गाजरं, शेपू पेरलेला मुळा, तव्यावर भाजलेली फरसबी आणि इतर काही ओळखूही न येणारे पदार्थ होते.
"मला भाज्यांची अॅलर्जी आहे"
"गब्बस. आलाय मोठा अॅलर्जीवाला. आगाऊपणा करू नकोस. मुकाट्याने खा पाहू."
आख्खी पार्टीभर तिला आमच्या मित्रांचे फोन येत गेले आणि प्रत्येकाने आपापली कारणं सांगून तिला टांग मारली. मीही कुळथाचे रोडगे खाऊन शक्य तितक्या लवकर कलटी मारली. बाहेर जाऊन चांगला मटणाचा रस्सा आणि नान हाणल्यावर जरा बरं वाटलं.

हे दर वेळी होतं. मधुरा एरवी टिपिकल बाईसारखं वागत नाही, पण वजन वाढल्याचा संशय जरी आला तरी तिच्यात डाएटचं, व्यायामाचं भूत संचारतं. आणि तिचं भूत तिचाच नाही, तर तिच्या मित्रांवरही ताबा घेण्याचा प्रयत्न करतं. मग ती आपल्या घरच्या पार्ट्यांना असा आहार देतेच. पण इतरांकडे गेलं तरी त्यांना आनंद घेऊ देत नाही. "तू एवढं सगळं आइस्क्रीम खाणार आहेस? त्यात साडेतीनशे कॅलऱ्या आहेत." असलं काहीतरी सांगून इतरांच्याही आनंदात डाएट कालवून देते. आणि त्याची परिणती मग 'कोड रेड'मध्ये होते.

मग लोक तिच्या पार्ट्यांना जात नाहीत. तिला आपल्याकडे बोलावत नाहीत. आणि तिला याचा पत्ताही लागत नाही. तिला सतत वाटत राहातं की आपण लोकांचं भलं करायला जातो, आणि लोकांना ते भलं स्वीकारण्याची मानसिक तयारी नाही, तेव्हा त्यांनी ती करून घेतली पाहिजे. अनेक आठवडे असं व्हायला लागलं की मग ती एकटी पडते. एकटेपणा आणि डाएटने येणारी भूक एकत्र आली की अर्थातच जे व्हायचं तेच होतं. विस्तवाशेजारी लोणी ठेवल्यावर ते वितळणारच. ती मग भसाभसा खायला लागते. डाएटमुळे तिचं वजन वाढतं!

वजन वाढवायचा कंटाळा आल्यानंतर ती हळूहळू मित्रमंडळींमध्ये मिसळायला लागते, डाएटचं फॅड सोडून देते. इकडेतिकडे भटकायला लागते. मग बरोबर तिचं वजन कमी होतं. अर्थात हे सांगण्याची हिंमत आम्हा मित्रांच्यात नसते. मांजराच्या गळ्यात उगाच का घंटा बांधायला जा? हे सगळं चक्र पूर्ण व्हायला काही आठवडे - महिने जातात.

यावेळी हे चक्र टाळण्यासाठी मी एक युक्ती केली. टेक्सासमध्ये असताना तिने घेतलेल्या शॉर्ट्सचा ब्रँड मी तिच्या नकळत तिचं कपाट उघडून बघितला. त्यापेक्षा एक मोठ्या साइझची, त्याच रंगाची शॉर्ट्स मागवली. ती यायला दोन आठवडे लागले खरे. आणि ती आंघोळीला गेली असताना गुपचूप त्या जागी नवीन शॉर्ट्स ठेवली. मग अर्थातच एक दिवस अचानक ती म्हणाली
"सम्या, वजन कमी झालं माझं. ही शॉर्ट्स आता पुन्हा नीट व्हायला लागली."
तिचं वजन कमी झालं या आनंदात सगळ्यांसाठी सुरमई आणि प्रसादसाठी मिसळ पार्सल घेऊन आलो. तिला यथेच्छ हादडताना पाहून 'अजून एक वरची साइझ आत्ताच मागवून ठेवायला हवी' अशी मनातल्या मनात नोंद केली.

‘चक्रम माणसांशी कसे वागावे’ या पुस्तकाची मला गरज नाही. एका पुस्तकाच्या तडाख्यातून वाचवल्याबद्दल मी माझ्या मित्रांचा ऋणी आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडी फ्रेन्ड्स मालिकेच्या धर्तीवर ही लेखमालिका चालली आहे. आवडत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! खुसखुशीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मजेदार लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय .. बादवे ..हा खराखुरा प्रसंग आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रसंग याच पद्धतीने, याच क्रमाने, लेखकांच्या* आयुष्यात घडला असेल असं नाही.

*समझदारों को एक इशारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0