नैसर्गिक शेती - भाग २

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

कितीही नैसर्गिक वगैरे म्हटले तरी शेती म्हणजे मुळात निसर्गाच्या व्यवहारात केलेली एक प्रचंड मोठी ढवळाढवळ आहे, हे प्रथम मान्य करायला हवे. मात्र मनुष्यजातीच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने या ढवळाढवळीला पर्याय नाही, हेही तितकेच खरे.

दहा हजार वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या साधारण पन्नास लक्ष होती. आजुबाजूच्या परिसंस्थेतून गोळा करून किंवा शिकार करून आवश्यक संसाधने मिळवून जगता येण्यासाठीची मर्यादा या लोकसंख्येने जवळजवळ गाठली गेली होती. इतर प्राण्यांच्या बाबतीत यामुळे लोकसंख्या याच्या आगेमागे स्थिरावली असती, पण माणसाने आपले डोके वापरून उपलब्ध जमिनीतून जास्त संसाधने मिळवण्याची युक्ती शेतीवाटे शोधून काढली.

दहा हजार वर्षांपूर्वी जगात शेतीसाठी सर्वात अनुकूल असलेल्या काही ठिकाणी माणसे प्रथम शेती करू लागली, आणि केवळ हजारेक वर्षांत हे लोण जगभर पसरले. त्यामुळे लोकसंख्येची ही मर्यादा ओलांडणे शक्य झाले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे आयुष्यमान वाढले, मुले जगण्याचे प्रमाण वाढले, शेतीमुळे जास्त अन्न व इतर शेतीजन्य संसाधने मुबलक मिळत होती, इ. साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून लोकसंख्या वाढत गेली. 1950 च्या दशकात लोकसंख्येने 2.5 अब्जची पातळी ओलांडली, आणि अन्नधान्याची टंचाई परत जाणवू लागली. यातून जमिनीची उत्पादकता अधिक वाढवण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराचा पर्याय पुढे आला. पण लोकसंख्या मात्र वाढतच राहिली...

लोकसंख्येच्या शास्त्रानुसार जगभरात लोकसंख्यावाढीचा दर आता कमी झालेला आहे. तरीही संख्या मात्र अजून काही काळ वाढत राहील. साधारण या शतकाच्या मध्याला जगाची लोकसंख्या 9-10 अब्जला स्थिरावेल, असे अभ्यासक म्हणतात. (अर्थात काही अभ्यासकांचे म्हणणे असेही आहे, की माणसाने निसर्गचक्रांत केलेल्या ढवळाढवळींमुळे जे उत्पात होतील त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊन या शतकाच्या उत्तरार्धात लोकसंख्या 2-3 अब्जावर येईल. यामुळे संसाधनांवरचा ताण आपोआप कमी होऊन सर्व प्रश्न आपोआप सुटतील! पण तूर्तास हा मुद्दा बाजूला ठेऊ.)

आजची समस्या ही आहे, की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे उलटा परिणाम होऊन शेतीचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. जागतिक वातावरण बदलामुळेही शेतीच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो आहे. त्यामुळे 10 अब्ज लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे.

कदाचित दहा हजार वर्षांपूर्वीही ठिकठिकाणी माणसांनी वेगवेगळे उपाय करून पाहिले असतील. पण त्यावेळी त्यांना निसर्गव्यवहारांचे शास्त्रीय ज्ञान नव्हते, निरीक्षणांतून बांधलेले काही आडाखेच फक्त त्यांच्या हाताशी होते. त्याचप्रमाणे त्यांच्या दृष्टीने ते त्यांची स्वतःची स्थानिक समस्या सोडवू पहात होते. जागतिक पातळीवर माहितीच्या देवाणघेवाणीची कोणतीही प्रभावी माध्यमे त्यांच्याकडे नव्हती. तरीही माणसांनी या समस्येवर मात केली. त्यांच्या वेगवेगळ्या धडपडीतून प्रारंभिक स्वरूपाची शेती हा पर्याय जास्त यशस्वी ठरून जगभर पसरला. आज आपण त्या वेळच्या माणसांपेक्षा अधिक सक्षम आहोत, पण आपली समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे त्यावेळपेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे.

शेतीबाबतचे जे विविध पर्याय आज आपण धुंडाळतो आहोत, त्यांच्याकडे या साऱ्या पार्श्वभूमीवर पहाणे आवश्यक आहे.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

भारतात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात धान्याची सतत टंचाई नसावी. अधून मधून तेल, तूर, तांदूळ साखर इ. गोष्टी महाग होत होत्या असाव्यात आणि गरिबीमुळे परवडेनाश्या झाल्या असाव्यात असे कधी कधी वाटते. कदाचित खते/कीटकनाशके/विजेच्या मोटरवरचे पाणी/महाग बी-बियाणे/औजारे/महाग मजुरी इ. वापरावे लागले असल्याने उत्पादनखर्च वाढून उत्पादन मुबलक आले तरी किंमती वाढत गेल्या असाव्यात. अर्थशास्त्रात गती नाही पण मुळात उत्पादनच कमी होते की झालेले पुरेसे उत्पादन सर्वांपर्यंत पोचू शकत नाही असा बालिश प्रश्न कधीकधी पडतो. शिवाय कदाचित दरडोई खप वाढला असेल म्हणून टंचाई जाणवत असेल.
हे सर्व, शेतकरी भिकेला का लागत असेल या शंकेच्या समाधानासाठी लिहिले. पावसाची अवकृपा/गारपीट हेच मुख्य कारण असावे का? रासायनिक खते गेल्या साठ सत्तर वर्षांत भारतात आली. त्याआधी शेणमूत हेच मुख्य खत असावे.
अर्थात आपल्या पुढच्या लेखात हे मुद्दे नक्कीच येतील. पण उत्तम असे काही वाचायला मिळण्याच्या अपेक्षेत तितका वेळ धीर धरवत नाहीय इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग वाचून जर गोंधळलो आहे. पुन्हा एक दोनदा आरामात वाचेन नी मग प्रश्न विचारेन. तुर्तास केवळ पोच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे मी जो मुद्दा मांडते आहे, तो गेल्या काही वर्षांतला माझा स्वतःच्या अभ्यासाचा विषय आहे. पण या लेखांच्या विषयाशी अगदी थेट संबंध नसल्यामुळे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित थोडी आकडेवारी दिली तर जास्त स्पष्ट होईल.

पृथ्वीवरच्या जमिनीचे (महासागर सोडून) एकूण क्षेत्रफळ १५,००,००,००० चौ.किमी आहे. जर भटक्या जीवनशैलीत आजुबाजूच्या निसर्गावर अनिष्ट परिणाम न होता मनुष्यजात जगायला हवी असेल, तर दर माणसामागे साधारण १० चौ. किमी इतके क्षेत्रफळ असायला हवे. म्हणजेच पृथ्वीवरची सर्व जमीन जर माणसाला आरामात रहाण्याजोगी असती, तरी फार फार तर एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतकीच भटकी माणसे एकमेकांशी स्पर्धा न करता राहू शकली असती. पण पृथ्वीवरची सारी जमीन रहाण्यायोग्य नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा लोकसंख्या पन्नास लाखाच्या जवळ पोहोचली तेव्हाच माणसाला ही स्पर्धा जाणवू लागली, भटकेपणातून सर्वांच्या गरजा सहजासहजी भागेनात. बुध्दिमत्ता वापरू न शकणारे इतर प्राणी तरीही भटकेच राहिले असते, आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांची लोकसंख्या यापेक्षा जास्त वाढू शकली नसती. पण माणसाने आपले डोके वापरून संसाधनांच्या कमतरतेच्या समस्येवर उपाय काढला - शेती.

शेतीद्वारे जमिनीची संसाधने पुरवण्याची क्षमता वाढल्याने, १० चौ किमी जागा आता पन्नास माणसांना पोसू शकू लागली. यामुळे लोकसंख्येवरचे संसाधनांच्या उपलब्धतेचे बंधन उठले, आणि लोकसंख्या वाढणे शक्य झाले. आणि जशी लोकसंख्या वाढत गेली, तशी शेतीची उत्पादनक्षमता आणखी आणखी वाढवण्याचे मार्गही माणूस शोधत गेला.

मात्र औद्योगिकरणानंतर माणसाची जीवनशैली बदलली. त्याला लागणाऱ्या गरजा आता फक्त शेतीतून पुऱ्या होत नाहीत. त्याच्या वाढलेल्या गरजांमुळे १० चौ किमी जागा आता साधारण दहा माणसांनाच पोसू शकते. अशा परिस्थितीतही जर माणसांची लोकसंख्या जास्तीत जास्त १५ कोटीच्या घरात (प्रत्यक्षात कमीच, कारण माणूस राहू शकत नाही अशा बऱ्याच जागा अजूनही पृथ्वीवर आहेत.) स्थिरावली असती, तर माणसे एकमेकांशी स्पर्धा न करता राहू शकली असती, पण दुर्देवाने तसे झालेले नाही. लोकसंख्या यापेक्षा कित्येक पटीने वाढलेली आहे. त्यामुळे आज आपण सर्वसंगपरित्याग करून अगदी किमान संसाधनांवर जगायचे म्हटले, तरीही दहा अब्ज लोकांच्या किमान गरजा भागवणेही उपलब्ध जमिनीच्या क्षेत्रफळाचा विचार करता सोपे नाही. त्यामुळे शेती कशा पध्दतीची करावी, याचा विचार करताना ही बाब दुर्लक्षित करता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

उत्क्रांतीच्या दृष्टीने पण माणसात 'शेती' या गोष्टीने फार बदल केलेत की नाही?
आज चामडीचा राठपणा, केसांचे आच्छादन, भक्ष टिपण्यासाठी किंवा रानात भक्षकापासून वाचण्यासाठी ज्ञानेंद्रियांच्या इन्पुटसवरून घडता येणार्‍या प्रतिक्षिप्त क्रीया या माणूस शेती करून , कपडे घालून, समुहाने, बंदिस्त घरात आणि सुरक्षित वातावरणात राहिल्याने पूर्ण बदलून गेल्यात.

आता रहायचे म्हटले तरी मोठ्या समुदायाला शेतीवाचून परत जंगलात जाऊन रहाणे एकदम शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ही मुद्दा बरोबरच आहे.

थोडक्यात म्हणजे पूर्वीचेच कसे चांगले होते, आणि आपण पुन्हा तसे जगण्याकडे कसे गेले पाहिजे, हा विचार फोल आहे. मागे जाणे वेगवेगळ्या कारणांमुळे आता अशक्य आहे. पण म्हणून आत्ता आपण जसे जगतो आहोत, तसेच रेटून जगत रहावे असेही नाही. आपले पूर्वज नव्वद हजार वर्षे भटके जीवन जगले. त्यात अडचणी दिसू लागल्यावर त्यांनी शेतीचा पर्याय काढला आणि ते स्थायिक झाले. या घटनेला फक्त दहा हजार वर्षेच झाली आहेत. औद्योगिक जीवनशैली तर आपण फक्त तीनेकशे वर्षेच जगतो आहोत, पण त्यातल्या मोठ्याच अडचणी आता पुढे येत आहेत. जर नव्वद हजार वर्षांची परंपरा आमूलाग्र बदलू शकते, तर केवळ तीनशे वर्षे जुनी औद्योगिक जीवनशैलीची परंपरा बदलणे फार अवघड असू नये.

तेव्हा आपण सर्व स्वतःला आणि आपल्या आजुबाजूच्या समाजाला एकच प्रश्न विचारला पाहिजे -
आत्ता जसा माणूस घडलेला आहे तसा घेऊन, आणि १० अब्ज हे संख्याबळ घेऊन या आपल्या ग्रहावर जर माणसाला यापुढे शाश्वत (म्हणजे निसर्गपूरक आणि आर्थिक-सामाजिक समानतेवर आधारलेली) जीवनशैली हवी असेल, तर त्याला काय काय करावे लागणार आहे? अन्नपुरवठ्याची कोणती पध्दत यासाठी अनुकूल ठरेल, हा याचाच एक उपप्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

आधीचा प्रतिसाद आणि साती यांच्या सार्थ प्रश्नाला वरील उपप्रतिसाद मूळ लेखनाला पूरकच आहेत. चर्चा आवडली.. अनेक मुद्द्यांत स्पष्टता आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!