Skip to main content

नैसर्गिक शेती - भाग ४

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे. कार्यबाहुल्यामुळे जेव्हा वेळ होईल तेव्हा छोट्या छोट्या टिपणांमधून विषय पुढे पुढे नेत राहीन.
....
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

वनस्पतींच्या वाढीत मातीची नेमकी काय भूमिका आहे, या विषयाकडे वळू या.
कृषिशास्त्रातला एक सर्वमान्य नियम आहे की मातीतल्या सूक्ष्म जीवांची संख्या जेवढी अधिक तेवढी त्या मातीची सुपीकताही अधिक असते, म्हणजेच अशा मातीत वनस्पतींची उगवण व वाढ जास्त चांगली होते. पण सुपीक म्हणजे नेमके काय?
वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायॉक्साइड व पाणी या प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक गोष्टींबरोबरच इतर काही पदार्थांचीही (नायट्रोजन, पॉटेशियम, फॉस्फरस, लोह, इ.) आवश्यकता असते. पण हे पदार्थ पाण्यात विद्राव्य स्वरूपात असतील तरच मुळांनी शोषलेल्या पाण्यावाटे वनस्पतींना ते घेता येतात. सुपीक जमिनीत या झाडांच्या योग्य पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे प्रमाण नापीक जमिनीच्या तुलनेने जास्त सापडते. आता याच्याशी मातीतल्या सूक्ष्म जीवांचा काय संबंध आहे? कृषितज्ञ याचे जे स्पष्टीकरण देतात ते असे आहे -
ज्या मातीत वनस्पती वाढतात, तिथे त्यांची गळून पडणारी फुले, फळे, पाने, काटक्या-कुटक्या, फांद्या, इ. सेंद्रिय पदार्थ सहजगत्या उपलब्ध असतात. हे अन्न उपलब्ध असल्याने मातीत सूक्ष्म जीव राहू शकतात. या बाहेरून मिळणा-या सेंद्रिय अन्नातली कर्बोदके सूक्ष्म जीवांनी ग्रहण केली की इतर घटक बाहेर पडून मातीत मिसळले जातात. अशा त-हेने मातीतल्या या घटकांचे प्रमाण वाढल्याने मातीची सुपीकता वाढते.
जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर ही कारणमीमांसा चुकीची आहे. ही पोषणद्रव्ये वनस्पतींसाठीच आवश्यक आहेत असे नाही, तर सर्वच सजीवांच्या पोषणासाठीही ती आवश्यक आहेत. वनस्पतींपासून अन्नसाखळी सुरू होते, आणि एकदा वनस्पतींमध्ये हे पदार्थ आले, की ते इतर सजीवांनाही कर्बोदकांच्या जोडीने उपलब्ध होतात. इतर सजीवांमध्येच सूक्ष्म जीवही आले. त्यामुळे मातीतले सूक्ष्म जीव जेव्हा सेंद्रिय पदार्थ खातात तेव्हा ते या पदार्थांमधील कर्बोदकांबरोबरच इतर घटकांचेही ग्रहण करतात. इतकेच नाही, तर वनस्पतींमध्ये हे पदार्थ त्यांच्या शुष्कभाराच्या केवळ पाच टक्के असतात, तर सूक्ष्म जीवांमध्ये पंधरा टक्के. म्हणजे सूक्ष्म जीव हे पदार्थ मातीत तसेच मागे ठेवत तर नाहीतच, उलट कोणत्यातरी दुसऱ्या स्रोतातून आणखी पोषक द्रव्ये मिळवतात असे दिसते. मग सूक्ष्मजीवांमुळे जमिनीची सुपीकता वाढण्याचे काय कारण असावे?
अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर डॉ. आनंद कर्वे यांना हे कोडे उलगडले.
मृद्शास्त्रानुसार पाण्यात लीलया विरघळणारी खनिजे पावसाने कधीच वाहून नेली आहेत. आता जी खनिजे मागे राहिली आहेत ती पाण्यात फारच कमी प्रमाणात विरघळतात (उदा. एक लिटर पाण्यात सुमारे पाच मिलिग्रॅम). इतक्या कमी विद्राव्यतेची खनिजे वनस्पतींना मातीतून घेता येत नाहीत. पण मातीतल्या सूक्ष्म जीवांना मात्र पाण्यात अत्यल्प प्रमाणात विरघळलेली खनिजेसुद्धा ग्रहण करता येतात, हे सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे या सूक्ष्म जीवांना जरी फक्त कार्बनचा स्रोत ठरेल असे अन्न मिळाले (उदा. शुध्द साखर – यात कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्याखेरीज दुसरे काहीच असत नाही), तरी आपल्याला लागणारी पोषणद्रव्ये ते मातीच्या कणांनी केशाकर्षणाने पकडून ठेवलेल्या पाण्यात विरघळलेल्या खनिजांवाटे मिळवू शकतात. सूक्ष्म जीवांच्या पेशिकांमध्ये कार्बन आणि या पदार्थांचा वापर करून पेशिकेतील जैवरासायनिक पदार्थ तयार केले जातात.
अर्थात पुढचा प्रश्न हा आहे, की सूक्ष्म जीवांच्या पेशींमध्ये असलेली ही पोषक द्रव्ये वनस्पतींना कशी उपलब्ध होतात?
जमिनीत एक अन्नसाखळी असते. आपण आत्ता जीवाणू किंवा बॅक्टिरियांच्या जीवनव्यवहाराची चर्चा करतो आहोत. त्यांना मातीत रहाणारे अमीबा हे एकपेशीय प्रणी खातात. काही कृमी आणि गांडुळे हे अमीबांना खातात तर जमिनीत राहणारे काही संधिपाद प्राणी (कीटक, गोम, कोळी, खेकडे इ.) या कृमी आणि गांडुळांना खातात. चिचुंद्र्या आणि काही पक्षी हे सुध्दा गांडुळांना आणि संधिपादांनाही खातात. या अन्नसाखळीतला कोणताही घटक आपले स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. पण श्वसनामुळे प्रत्येक घटकाच्या शरीरातील कार्बनचे प्रमाण सतत कमी होत असते आणि कार्बनच्या तुलनेत एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असणारे हे इतर पदार्थही मलमूत्राच्या रूपाने शरिराबाहेर टाकले जात असतात. प्राणी मेल्यावर त्यांच्या कलेवरांमधूनही कार्बनबरोबरच इतर पदार्थ मातीत मिसळले जातात. मातीतल्या खनिजांपेक्षा या जैवरासायनिक पदार्थांची पाण्यात विरघण्याची क्षमता अधिक असल्याने ते वनस्पतींना मातीतून घेता येतात. अशा त-हेने सूक्ष्म जीवांनी ग्रहण केलेली मातीतली पोषक द्रव्ये या अन्नसाखळीद्वारे वनस्पतींना उपलब्ध करून दिली जातात.
वनस्पती आणि मातीतले इतर सजीव हे असे सुंदर सहजीवन जगत असतात. वनस्पती इतर सजीवांच्या अन्नसाखळीला कार्बन पुरवतात, तर इतर सजीवांची अन्नसाखळी मातीतील पोषक द्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देण्याचे काम करते.
या साऱ्या प्रक्रियेत इतरही काही बारकावे आहेत, त्यांची चर्चा पुढे येईलच.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स