चौकातली फाशी

"भर चौकात टांगायला पाह्यजे या सगळ्या साल्यांना!"

असं भर चौकात टांगायच्या जमान्यात मी जन्माला आले नाही. पण मला संधी मिळाली तर निश्चितच माझ्या वर्तनाने मी चारचौघांत लाज आणणार नाही.

ऑफीसमध्ये कधीपासून बतावणी करायला सुरुवात केली आहे, हल्ली जरा जास्त बायकी त्रास व्हायला लागला आहे, अशी. फाशीच्या दिवशी सुट्टी का घेतली असं कोणी विचारणार नाही. त्रास नक्की होतोय का नाही हे शोधायचं मशीन अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे फाशीच्या ठिकाणी सहज जाता येईल. त्रासदायक दिवसांत ऑफिसात गेले नाही म्हणून कोणाला दुःख होणार नाही याची मला खात्री आहे.

त्या दिवशी मी नेहमीचा कोणताच मेकप करणार नाही. मी माझ्या सवयीप्रमाणे तिथे वेळेच्या आधी जाऊन पोहोचेन. तेव्हा तिथे फार गर्दी नसेल. एकट्या आलेल्या तरुण मुलीने मेकप केला आहे म्हणून लगेच 'ही आपल्याला गटणारच' असा कोणाचा गैरसमज होऊ नये.

एरवी ऑफिसात जाताना मी फक्त 'हिमालया काजळ' लावते. त्या दिवशी मी काजळ लावणार नाही. अर्थात. 'आपल्यात' फक्त काजळ घालत नाहीत. त्या दिवशी टिकली लावून जाता येईल, पण गर्दीत ती पडली तर गैरसमज वाढतील. अशा गैरसमजांना मी किमान त्या दिवशी बढावा देणार नाही.

त्याला फाशीच्या ठिकाणी खेचून आणतील, तेव्हा सगळेच त्याच्या नावाने शंख करतील. तेव्हा मी माझी कल्पनाशक्ती पणाला लावीन; 'जळ्ळं मेलं तुझं लक्षण; तळपट होवो तुझं' यापेक्षा अधिक काहीतरी निषेध नोंदवेन; पण माझ्या निषेधापुढे इतरांचा निषेध फिका पडावा एवढा आरडाओरडा मी करणार नाही.

त्याला मारण्यासाठी तिथेच अंडी आणि सडके टोमॅटो विकायला ठेवलेले असतील. सध्याच्या दुष्काळाची काळजी आहे हे दाखवण्यासाठी मी तिथले अंडी आणि टोमॅटो विकत घेणार नाहीत. माझा एक मित्र अमेरिकेहून सहपरिवार येत आहे. त्याच्याकरवी टोमॅटो मागवेन. माझ्याकडचा टोमॅटो बाकीच्यांपेक्षा आकाराने मोठा आहे ह्याचा माज मी तिथे करणार नाही.

मी फाशी बघायला जाणार म्हटल्यावर मला घरचे लोक विरोध करतील. "काय करायच्येत ही थेरं?" इथपासून सुरुवात होईल. पण सगळ्यांशी प्रेमाने बोलून, मला खरोखरच फाशी का बघायची आहे ते पटवून देऊन, त्यांचं मनःपरिवर्तन करून, नंतरच मी फाशीच्या दिवशी घराबाहेर पडेन. 'मुन्नाभाई' बघितल्यापासून माझा मनःपरिवर्तनावर विश्वास बसला आहे. घरचेही "तुझी एवढी इच्छा असेल तर तू जा." असं म्हणतील. "आमच्यासाठी फोटोही काढून आण," असं कोणीतरी म्हणेल. मी माझा मोबाईल पूर्ण चार्ज करूनच फाशीला जाईन. रस्त्यात फोनसाठी एका दिवसापुरता डेटापॅकही अपडेट करेन.

धाकट्या भाचीसाठी अभ्यासाचं खेळणं म्हणून मी फाशीच्या सेटपचं टू-स्केल मॉडेल विकत आणेन. मुलींना अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहिजे.

माझ्या ऑफिसमधल्या, फेसबुकवरच्या आणि व्हॉट्सअॅपवरच्या सगळ्या लोकांना फाशीला येता येणार नाही. त्यांना काम करावं लागत आहे; ते खूप लांब राहतात आणि मी भर चौकातच राहते या गोष्टी मी सत्राशेसाठ वेळा उगाळून दाखवणार नाही. त्याला फासावर लटकताना बघण्यात या सगळ्यांना इंटरेस्ट आहे याची मी बूज राखेन.

फाशीच्या ठिकाणी पोहोचल्यावर मी फेसबुकवर 'साईन इन' करेन. विक्षिप्त अदिती फाशीच्या ठिकाणी आहे; असा संदेश फेसबुकवर मराठीत दिसणार नाही. म्हणून मी व्हॉट्सअॅपवर सगळ्यांना ते मराठीतून कळवेन. ते कळवण्यासाठी मी हल्लीच काही ग्रूप जॉईन केले आहेत. एक 'कविता - मनातली, कविता - पावसातली' असा ग्रूपही आहे. मलाही एखादी कविता झाली तर मी ती लिहून सगळ्यांना पाठवेन.

फाशीच्या ठिकाणी गर्दी जमलेली असताना तिथे मी तरुण मुलांचं प्रोफायलिंग करणार नाही. ते मुलगे चांगल्या घरातले, चांगले मिळवते आणि चांगले दिसणारे आहेत का, याचा विचार मी करणार नाही. एरवी तो भर चौक असला तरीही त्या दिवशी ती फाशी देण्याची जागा असेल; मी तिचं पावित्र्य जपेन.

फाशीचं चांगलं रेकॉर्डिंग करण्यासाठी मी आधीच उंच जागी जाऊन थांबेन. त्या दिवशी उंच टाचांचे बूट घालून जाईन. फोटो काढण्यासाठी सेल्फी स्टिक वापरेन. पण फाशीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करून मी माझ्या कुटुंबीयांना लाज आणणार नाही. सेल्फी काढलाच तर तो फोटो फेसबुकवर टाकणार नाही. टाकलाच तर त्यात तो आणि स्वतः यांच्यापैकी कुणातरी एकालाच टॅग करेन.

त्याने तिथे भाषण केलं तर मी ते मन लावून ऐकते आहे असं दाखवण्याचा किमान प्रयत्न करेन. ते जमलं नाही तर किमान त्याचं भाषण सुरू असताना मध्येच टाळ्या वाजवणं तरी मी टाळेन, आरडाओरडा करून भाषण बंद करण्याचा प्रयत्न करणार नाही. टीव्ही कॅमेरे तेव्हा माझ्याकडे रोखलेले असल्यास मी चेहेऱ्यावर पुरेसा राग आणेन.

फाशी देण्याआधी राष्ट्रगीत वाजवलं जाईल तेव्हा मी उठून उभी राहेन. "राष्ट्रगीताचा अवमान करू नका" या सूचनेचा मी पुरेपूर आदर राखेन आणि इतरांनाही आदर राखण्यास सांगेन. सगळे या सूचनेचा आणि राष्ट्रगीताचा आदर राखत असतील तर मात्र मी मान खाली घालून उभी असेन. राष्ट्रगीत सुरू असताना इतर लोक शांतपणे उभे राहतात की नाही हे तपासल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

प्रत्यक्ष फाशी देतेवेळी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आजूबाजूचे लोक चीत्कार करत असतील, तेव्हा मी विचारमग्न चेहेरा करून ‘आखिर ये तन खाक मिलेगा’सारख्या विचारजंती ओळी पुटपुटणार नाही; माझ्या आजूबाजूच्या लोकांना ऑकवर्ड वाटेल असं काहीही मी करणार नाही.

फाशी झाल्यावर आजूबाजूचे लोक स्पीकरच्या भिंती उभारून धत्तड-तत्तड संगीतावर नाचायला लागले की मी त्यांच्याबरोबर नाचणार नाही. चांगल्या घरातल्या मुली चारचौघांत, परक्यांसमोर नाचत नाहीत. पण त्याबद्दल तक्रार करून इतरांच्या आनंदात मी माती कालवणार नाही.

फाशी झाल्यावर मी मुद्दामच साध्याशा, उडपी हॉटेलात जाऊन साधंसं इडली-वडा-सांबार आणि एक चहा घेईन. ‘सांबार अलग से’ आणलं तरीही मी तक्रार करणार नाही. ही चूक म्हणजे देशद्रोह नाही.

मी फार काही न बोलता, चेहेऱ्यावर कसलेही भाव न आणता इडली-वडा-सांबार संपवेन. चहाचा तिसरा घोट घेताना तिथे कोणी टपोरी येऊन ओरडेल, "मगाशी त्या देशद्रोह्याला टांगलं ना, आता त्याच्या वस्तू भर चौकात आणून जाळत आहेत." सगळे तिथे भर्रकन धावतील. मी माझा चहा संपवेन. मेनूकार्डात बघितल्यामुळे माझं बिल किती झालं हे मला माहीत असेलच. बिल येण्याआधीच बिलाचे आणि टीपचे पैसे ठेवून मी पुन्हा भर चौकात जायला निघेन.

प्रेरणा - http://www.newyorker.com/magazine/2015/05/04/execution-days

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मूळ लेख फारच आवडला. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. त्याचा स्वैर अनुवाद ठीक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या जातकुळीचा विनोद. जागोजागी 'याला फाशीवर लटकवा' अशा कर्कश ओरड्यावरचं हे काळं भाष्य जमून आलेलं आहे. मूळ लेखाचा अनुवाद बिलकुल वाटला नाही. त्या लेखकाने घेतलेल्या अॅटिट्यूडचं भारतीयीकरण छान जमलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखात काळा विनोद आहे असं मला वाटत नाही. काळा विनोद असेलच तर त्यासाठी काही शतकं उशीर झाला आहे असं वाटतं. मूळ लेखातला विनोद सगळ्या गोष्टींचं बातमीकरण करण्याबद्दल असावा, 'ब्लॅक मिरर'मध्ये ज्या प्रकारचं भाष्य आहे त्या प्रकारचा वाटला.

मराठीत लिहिताना काही परिच्छेद सरळच, भारतीयीकरण करून उचललेले आहेत. लोंढ्यात वाहून जाणं, स्वतःचं काही मत न उरणं, चारचौघांत वेगळं न दिसण्याचा प्रयत्न करणं, तसं करताना 'काहीतरी चुकतंय' याची पाल चुकचुकणं या गोष्टीही उचललेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमदार, खासदारांना शस्त्र प्रशिक्षण देऊन कायदेमंडळात (जसे की संसदेत) सशस्त्र वावरण्याची परवानगी असावी काय ? ह्या कौलात येणारी मते पाहिली तर फाशीस जाण्यास योग्य लोक खासदार म्हणून निवडून येऊ शकतील (?) त्यामुळे असे कदाचित झालेच तर कदाचित आदिती तैंना चौका एवजी संसदेच्या गॅलरीतून त्यांची आधिवेशने पहाण्याचेही भाग्य लाभू शकेल !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पण असहमती.

हे जे लिहिलंय तो काळा असला तरी विनोदच आहे याबद्दल मला खात्री आहे. म्हणूनच 'मला अशी संधी मिळाली तर...' अशी वाक्यरचना आहे; 'मला अशी संधी मिळाली की...' अशी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही पण जर--तरचीच वाक्य रचना वापरली + २ एक्स्ट्रा 'कदाचित' पण लावलेत. आणि मागच्या चळवळीतील (पक्ष कोणतेही असोत) मंडळी नंतरच्या २० ते ४० वर्षांच्या दरम्यान आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अशी प्रगती करतानाची भरपूर उदाहरणे आहेत, आणि ज्या पद्धतीने सर्व चालू आहे ते पाहता 'मला अशी संधी मिळाली तर...' चे 'मला अशी संधी मिळाली आणि...' होण्याचा टप्पा फार दूर नसेल कदाचित. सध्यातर अदिती केंद्रीय मंत्रि झाल्या नंतरचे ऐसिअक्षरेचे मुख्यपान असे चित्र रंगवतो आहे मी; आदिती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणत कोण कोण जाताय रे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मला वाचताना ब्लॅक मिररचीच आठवण झाली आणि खाली अदितीलाही त्याचीच आठवण झालेली बघुन विनाकारण आनंद वगैरे वाटून घेणार नाही.
लेख अतिशय आवडला असला तरी इतरांना डिवचले जाईल इतकी स्तुती करणार नाही.
अमेरिकेसारख्या थोर्थोर देशांत राहुनही असं सुचण्यासारखं तिथे नक्की काय घडत असावं? असा प्रश्न डोक्यात आला असला तरी अमेरिकनांच्या खाजगी गोष्टींवर टिपणी टाळावी म्हणून हा प्रश्न विचारणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चौकातल्या फाशीऐवजी स्मृती इराणींचं भाषण ऐकणं असा बदल करून हा लेख वाचला, आणि गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मी ही आई आहे, मलाही यातना झाला तो बच्चा गेल्याची बातमी ऐकून!"

अशी भर संसदेत इमोसनल भाषणं देण्याची संधी मला मिळालेली नाही म्हणून. पण मला संधी मिळाली तर निश्चितच माझ्या वर्तनाने मी चारचौघांत लाज आणणार नाही.

मिडीयामध्ये कधीपासून बातम्या पेरायला सुरुवात केली आहे, विरोधक भावनाहीन कोडगे आहेत, अशी. भाषणाच्या दिवशी जरा जास्त भावनाबंबाळपणा केला तर का असं कोणी विचारणार नाही. खरंच मला वेदना झाल्या का नाहीत हे शोधायला कोणी जाणार नाहीत. त्यामुळे मला सहज अशी भाषणबाजी करून लोकांना भुलवता येईल. लोकांना भुलवलं म्हणून कोणत्याच राजकारण्याला दुःख होणार नाही याची मला खात्री आहे.

त्या दिवशी मी नेहमीचा कोणताच मेकप करणार नाही. मी माझ्या सवयीप्रमाणे तिथे वेळेच्या आधी जाऊन पोहोचेन. तेव्हा तिथे फार गर्दी नसेल. माझ्या इमोसनल बतावणीमध्ये यामुळे भरच पडेल.

एरवी संसदेत जाताना मी फक्त 'हिमालया काजळ' लावते. त्या दिवशी मी काजळ लावणार नाही. अर्थात. 'आपल्यात' फक्त काजळ घालत नाहीत. त्या दिवशी टिकली लावून जाता येईल, पण त्यामुळे मी अल्पसंख्याकांपैकी कोणाशी लग्न केलंय याबद्दल शंकाकुशंका निर्माण होतील. अशा गैरसमजांना मी किमान त्या दिवशी बढावा देणार नाही.

माझ्या आधी कोणी विरोधकानेही चांगलं भाषण केलं तर मी त्याचा गौरव करेन. इथे केला आहे तसा एकेरी उल्लेख करणार नाही. पण त्याच्या बहिण-भावंडांविरोधात आरोपांची राळ उडलेली असेल तर मी त्याचा फायदा उठवेन.

माझ्या भाषणाची व्हीडीओफीत दिसली पाहिजे अशा पद्धतीने व्हीडीओ संपादित करायला सांगेन. भले मी पाच-पाच मिंटांची प्रश्नोत्तरं का केली असेनात!

मी अभिनयाचं क्षेत्र सोडून राजकारणात उतरायचं म्हटल्यावर मला घरून आणि बालाजीकडून बराच विरोध झाला. मी त्यांचं ज्या प्रकारे मनःपरिवर्तन केलं त्याच प्रकारे विरोधकांचं मनःपरिवर्तन करेन. 'मुन्नाभाई' बघितल्यापासून माझा मनःपरिवर्तनावर विश्वास बसला आहे. अश्रू आणि सात्त्विक संतापात खूप ताकद असते.
.
.
.
(मधलं बरंच काही सुचलं नाही.)

मी भाषण करताना खोटं बोलणार नाही. माझ्या सोयीची असणारी कागदपत्रंच मी वाचून दाखवेन. पण इतरांनाही तशीच सूट मी देईन. प्रत्यक्षात काय घडलं, कसं घडलं हे माहीत असण्याची माझी जबाबदारी आहे हे विसरताना, हीच सूट मी माझ्या विरोधकांनाही देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखाच्या शेवटी दिलेली मुळ लिंक बघीतली नाही. पण अगदी तुमच्या जालीय इमेजला साजेसा अनुवाद झालाय.
लिंक दिली नसती तर हे तुमचेच विचार आहेत असे वाटण्याची शक्यता १००% होती.

अर्थात आपल्या मनाला आवडण्यार्‍याच गोष्टींचा माणूस इतका सुंदर अनुवाद करु शकतो म्हणा. त्यामुळे अनुवादातील विचार संपुर्णपणे तुमचे नाहीतच असेही म्हणू शकत नाही.

प्रतिसाद जास्तच विस्कळीत झालाय कदाचित !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या वर्षी एक अफगाणिस्तानचा चानेल लागायचा त्यावर इजिप्तची साडे चार हजार वरषापुर् ीच्या काळातली सिरिअल लागायची.चौकात टांगणे मरण्यासाठी दाखवले जायचे.जमलेले लोक ,त्याचे नातेवाईकही असायचे.फाशी नव्हती तेव्हा.अर्ध्या तासात तो मरायचा अन सुटायला.टांगून त्याच्या पायांच्या पोटय्रांवर चाकूने चिरा मारायचे.रक्त हळूहळू गळणार - वरती कावळे चोचा मारणार.फार भयानक प्रकार चित्रित केलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0