Skip to main content

बस प्रवास

ठहराव .मौन.silence.शांतता.pause - या विषयाबद्दल लेख वाचत होते. लेख खूप आवडत होता. लेखकाचे म्हणणे होते की कोणत्याही शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या शब्दाच्या अलीकडली व त्या शब्दाच्या पलीकडली या दोन्ही शांततांना फार महत्त्व असते. या शांत जागा नसत्या तर शब्दच नसते केवळ एक सततचे आवाज एवढेच ऐकू आले असते. गदारोळात काहीही ना उमजले असते ना कशाचा अर्थ लागू शकला असता.
.
मग मनात विचार आला दिवसाच्या खरं तर आयुष्याच्या धामधुमीत , प्रत्येक क्षणी नाना विकार मन:पटलावरती उमटत असताना, अनेक भावना, भावावस्था (मूडस) एखाद्या हत्तीसारखा मनात उच्छाद मांडत असतात. मग दिवसभरात अशी कोणती जागा असते, वेळ असते जेव्हा की आपण स्वस्थ होतो. दिवसा ऑफिसमध्ये, संध्याकाळी घरी घडलेल्या घडामोडींचा, प्रसंगांचा अर्थ मूर्त किंवा अमूर्त मनात लावू लागतो. असे क्षण राजरोस येतात का? आणि मला पट्ट्कन आठवला तो रोजचा बसचा प्रवास.
.
पहाटे बस पकडून ऑफिसला जायचे. अर्धा तास लागतो. आणि संध्याकाळी त्याच बसने परत यायचे. हा प्रवास अत्यंत शांततापूर्ण सुखदायी, आरामदायी असतो. का? थोडीच बसमध्ये गाद्यागिरद्या आहेत, सुगंधी अत्तरे आहेत की संगीत आहे मग प्रवास इतका मनस्वी का आवडतो तर तो माझा वेळ असतो (Me Time ). ना नोकरीतील ताबेदारी ना घरात कोणाची ताबेदारी. मन अतिशय शांत होउन जाते. विलक्षण अनुभव असतो.. एक ठहराव.
.

वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर
चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद हैं

.
बसमधून रोज अगदी न चुकता बाहेर माझ्याकरता सूर्योदय होतो केशराने माखलेल्या आभाळात निसर्ग सढळ हस्ते रंगांची उधळण करतो. कुठे आकाशाकडे प्रार्थानेकरता हात उंचावलेले वृक्ष , हिमाच्छादित भूमी तर कुठे कबुतरांचा थवा दिसतो. मासे पकडण्याकरता तळ्यावर जमलेले सीगलस तर कुठे क्वचित हरणे दिसतात. एकदाच अतिशय देखणा एकटा तरुण नर पाहिलेला आहे बाकी कळपाने हरीणी व पाडसे च दिसतात. हे सारे विलोभनीय दृश्य पहा अथवा नका पाहू, डोळे मीटा, झोपा मनास येईल ते करा. Me Time .. माझ्याकरता निसर्गाने उघडलेले सौंदर्याचे भंडार.
.
बरं असा बसचा प्रवास बाह्य जगाताशीच नव्हे तर आतल्या घडामोडींशी देखील निगडीत असतो. इंग्रजी नंबर 8 म्हणा ना. दोन वर्तुळे एक आधिभौतिक तर एक भौतिक जिथे एकमेकांना छेदतात तो हा प्रवासाचा वेळ. बसमध्ये नमुने दिसतात. बरेचदा, एक म्हातार्‍या आफ्रिकन अमेरिकन बाई दिसतात. भडक मेक अप, हातात काठी, किंचित उसवलेला फ्रॉक, काळ्या कुळकुळीत चेहर्यावर थकवा आणि तरीही न लपणारा मनस्वीपणा आणि हातात मेकडोनाल्डचे पुडके. मनात विचार येतो - कुठे काही विकल्प चुकले तर नाहीत या स्त्रीचे म्हणून कदाचित कुटुंब नाही, पैसे नाहीत. दिसायला एके काळी सुंदर आहे हे भग्नावशेषावरुनही दिसते आहे. कोणता विकल्प चुकला? आणि मुख्य म्हणजे यातून मी काय शिकायचे? ....
एकदा एक भिकारी , बेघर मनुष्य , त्याचा पाळीव कुत्रा घेउन बसमध्ये आला होता. अगदी फाटका, जीर्ण, दुर्दैवी चेहरा व अंगयष्टी, पेहेराव. कसाबसा उभा होता. काय वाटलं माहीत नाही पण माझ्या शेजारी येउन बसला. मला सारखं वाटत होतं की त्याला काहीतरी विचारायचे आहे पण तो संकोचतो पेक्षा घाबरतो आहे. आणि ते खरेही ठरले, खूप वेळानंतर त्याने मला विचारले मला "तुला ट्रान्स्फ़र तिकीटाची गरज आहे का? मी विकायला तयार आहे. माझ्याकडे बसचा पास असूनही , १ डॉलरला मी ते तिकिट विकत घेतले. त्या दिवशी राहून राहून तो आठवत राहिला. काय विकत घेतलं त्याने १ डॉलर मध्ये? मॅकचिकन? चिटोज (चीझवाले चिप्स) की सिगारेट. का आली असेल ही वेळ त्याच्यावर. लहनापण कसं गेलं असेल, त्याच्यावर कोणी प्रेम केलंतरी असेल का? घशात एकदम कढ आला.
नंतर एकदा असाच एक भिकारी मागे एकदम मागे बसला होता. काय की, त्याचा स्टॉप जायला लागला म्हणून त्याने ड्रायव्हरला थांबायची हाक दिली पण ती हाक तरी कशी अगदी प्रिमिटिव्ह , घशातील आवाज, एकदम जोरात विचित्रच प्राण्यासारखा एकदम प्रिमिटीव्ह . बसमधले सर्वच लोक दचकून मागे वळून वळून पाहू लागले. तो उतरला खरा. पण मग मला वाटले कदाचित तो माणूस कोणाशी ही कधी बोललाच नाहीये, त्याचा जगाशी संपर्क इतका तुटला आहे की तो आवाजही modulate करणे विसरला आहे. हीच शक्यता आहे. बसच्य प्रवासात अनेक स्मार्ट बायका दिसतात. कधी चाळीशीमधील आत्मविश्वास असलेली प्रौढा तर कधी कॉलेजमध्ये जाणारी एखादी तरुण खरं तर लहान मुलगी दिसते. अतिशय कर्टियस (ओल्ड फॅशनड ) एखादा पुरुष कधी सर्व स्त्रियांना आधी बसमध्ये चढून देतो व मग स्वतः चढतो. तर कोणी हाऊडी करत हॅट काढत अनेकदा अभिवादन करतो, अनेक प्रकारचे लोक दिसतात. परत आपल्याला स्वातंत्र्य रहाते या गर्दीतच हरविलेला एक चेहरा बनून रहाण्याचे. One in Many & Many in One ही Walt Whitman कवीची कल्पना आपण जगतो. क्वचित एखाद्या दिवशी जुन्या प्रेमाची आठवण येउन मूड अगदी हळवा झालेला असतो , आपण आपल्यात खोल हरवून गेलेले असतो. आणि हे समजून सावरून, गर्दीही आपल्याला निवांतपणा देते. कसलीही अपेक्षा करत नाही, की हक्क गाजवत नाही. खरं तर हा बसचा प्रवासच माझ्या मानसिक शांतीचा कणा आहे. हा प्रवास नसता तर मला माहीत नाही मी कुठे शांती शोधली असती. कदाचित ध्यान वगैरे करायला लागले असते. बाहेरच्या जगातील , नोकरीवरील महत्त्वाकांक्षी (पर्पझ ड्रिव्हन) अस्तित्व आणि घरातील अगदी निवांत आयुष्य या दोहोंना सांधणारा दुवा आहे हा बस प्रवास.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

.शुचि. Thu, 03/03/2016 - 10:58

In reply to by अनु राव

धन्यवाद अनु.
.
अर्थात एक सांगायचे राहीले. सर्वच प्रसंग आनंदी होते असे नाही. व्हरमॉन्ट मध्ये एक बाई होती , ५० शीची, मला दिसायला आवडे. पण कुठवर जोवर तिने तों ड उघडले नव्हते तितवरच. एकदा एका गोर्‍या व्हरमॉन्टवासियाला ती अद्वातद्वा इमिग्रंटसबद्दल मुद्दाम सांगायला लागली, म्हणजे लेकी बोले सुने लागे बरं का. ते मला उद्देश्युन होत. मला खूप राग आला होता. पण मी बोलले काही नाही, कारण परक्या देशात भांडताही येत नाही त्यांच्या भाषेत आणि तिने पोलिसांना पाचारण केले असते तर रेकॉर्डवर येऊन माझं ग्रीनकार्ड. हात दाखवुन अवलक्षण नको म्हटलं.हुकलं असतं,

गवि Thu, 03/03/2016 - 12:16

In reply to by .शुचि.

अमेरिकेतल्या लोकांकडून एकीकडे सर्वांच्या श्रमांची कदर / आदर करणारं, कष्टांना समान संधी देणारं, मेल्टिंग पॉट वगैरेवगैरे प्रचंड कौतुक ऐकायला मिळतं. रादर त्याच बेसिसवर भारतापेक्षा ते चांगलं ठरवलं जातं.

सुरक्षितता, स्वातंत्र्य ही मूल्यं सर्वोच्च म्हणून सांगितली जातात.

पण त्याचवेळी त्यांपैकीच अनेकांच्या बोलण्यात "मायग्रंट्स" म्हणून कुजकट बोलणी, हेट, ग्लास सीलिंग, डावललं जाणं, संध्याकाळनंतर बाहेर एकटं न हिंडण्याच्या सूचना, लुटले गेलात तर जवळ थोडे डॉलर असू द्या..ते देऊन टाका नाहीतर चिडून त्याने ठार केलं तर? इव्हन भारतीय कॉल सेंटर्सवरही भारतीय टोन ऐकून प्रचंड राग उसळणारे अमेरिकन्स अगदी कॉमन आहेत. कोणीही गन घेऊन शाळांमधे, शॉपिंगच्या ठिकाणी, पार्टीत अंदाधुंद गोळ्या झाडतो या घटना अजिबातच रेअर नाहीत.

कुठलं चित्र खरं मानायचं?

ग्रीनकार्डसाठी रेकॉर्ड नीट रहावं म्हणून असं सहन करावंसं वाटणं केविलवाणं नाही का? हे त्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या न्युट्रलिटीचं लक्षण आहे का?

ऋषिकेश Thu, 03/03/2016 - 12:18

In reply to by गवि

+१ स्वतःच्या देशात राहून व्यवस्थेला किमान हक्काने शिव्या तरी देता येतात. आणि त्या देऊन काही बदल झालेच तर त्याचा फायदाही उपटता येतो.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 18:54

In reply to by गवि

केविलवाणं वाटत नाही कारण हा डेव्हिल की तो डेव्हिल एवढाच प्रश्न रहातो. काही अनुभवांमुळे जर देशाबद्दल अज्जिबात नाही पण एकंदर व्यवस्था व जनता यांच्याबद्दल अढी बसली असेल, तर इकडचा त्रास सहन करायचा की तिकडचा एवढाच प्रश्न उरतो. आणि तरीही म्हातारपणी परत देशात येऊनच दिवस कंठावेसे वाटतात (मिळेल की नाही माहीत नाही, कारण तेवढं ना सेव्हिंग्ज आहे, भारतात इन्श्युरन्स शिवायऔषधंदेखील महागच असतील) तीव्रतेने वाटतात. पण मुलीचे सुरक्षितता अमेरीकेत जास्त वाटल्याने, ती मार्गी लागेपर्यंत इथेच रहावे असे वाटते.
इन्श्युरन्स, स्त्रियांची सेफ्टी (आता हे म्हणू नका की डेट रेप्स/ रेप्स हे अमक्यापेक्षा परदेशात जास्त होतात.) एका साध्या डेटींगवर्/अंधारात एकाकी रस्त्यावरती न जाणार्‍या मुली सुद्धा भारतात घृणास्पद अनुभवांना सामोर्‍या जातात. मग अमेरीका काय वाईट?

अनु राव Thu, 03/03/2016 - 18:57

In reply to by .शुचि.

हाम्रीका तर बेस्ट च आहे. पण आमचे इंग्लंड सर्वात भारी आहे. सेटल होयला बेस्ट.

हाम्रीका मिसळपाव असेल तर इंग्लंड ऐसीअक्षरे आहे.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 19:55

In reply to by अनु राव

अनु/गवि/ऋ मला तरी कुठे माहीत होतं भारताबाहेरचं जग कसं असतं ते. मी यायला रिलक्टंटच होते. पण नवर्‍याला मात्र यायचं होतं कारण जहाजातून तो अनेक देश फिरला होता. सो भारताबाहेर पडण्याचा निर्णय माझा नाही. मला इथे आपलं वाटत नाही.
.
पण हेही तितकच खरं आहे की मुलीकरता इथे जास्त चांगले आहे.
___
अर्थात मला इथे तितकसं आवडत नाही याचा अर्थ ती घटना केविलवाणी नाही असे होत नाही. But you have to choose your battles.

.शुचि. Sat, 05/03/2016 - 01:31

In reply to by गवि

ग्रीनकार्डसाठी रेकॉर्ड नीट रहावं म्हणून असं सहन करावंसं वाटणं केविलवाणं नाही का?

स्पष्टीकरण देण्याच्या नादात या मार्मिक प्रश्नाचे कौतुक करायचेच राहीले. अशा चर्चा ऐसीवर घडतात म्हणून ऐसीवरती अगत्याने यावेसे वाटते. प्रश्न फारच आवडला. तसाही कोणाच्या आवडण्या न आवडण्याने फरक कोणालाच पडत नाही म्हणा. पण एक रेकॉर्ड म्हणून स्पष्ट केले.

गवि Sat, 05/03/2016 - 01:40

In reply to by .शुचि.

तसाही कोणाच्या आवडण्या न आवडण्याने फरक कोणालाच पडत नाही म्हणा

असं म्हणू नको. कधी काही आवडलं नसेल तर फरक पडतो नक्कीच. दुखावण्याचा उद्देश नसतो पण दुखावलं जातं चुकून खूपदा. असं जेव्हाकेव्हाही होत असेल ते तेव्हा कळतही नाही पण त्याबद्दल मनापासून माफी.

सामो Mon, 18/03/2019 - 20:03

In reply to by गवि

सॉरी ही कमेंट मी पूर्ण अगदी टोटली मिस केलेली होती.
माफी अजिबात नको गरजच नाही..
________
बसमधील धक्के माझ्या मुलीने लहानपणापासून खाण्यापेक्षा, न कळत्या व्हल्नरेबल वयात प्रवासात क्षणभर का होईना, अत्यंत घृणास्पद स्पर्शांना, अंगविक्षेपांना सामोरे जाण्यापेक्षा, मला परदेशी देशात भांडता न येणं सुसह्य वाटतं गवि.
आणि हा अनुभव सर्वांचा नसेलही. किंबहुना (ईश्वरकृपेने) नसावाच पण आपले अनुभव आपल्याला घडवतात. त्यांपासून सुटका नसते.
__________
आज हे आठवायचे कारण एवढेच की आज हा धागा परत वाचत होते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/03/2019 - 07:41

In reply to by .शुचि.

व्हिजा, ग्रीनकार्ड वगैरे प्रकारांसाठी मी अजिबात असलं काही ऐकून घेणार नाही. पण मूर्खांच्या तोंडी लागण्याची हौस नाही म्हणून दुर्लक्ष करेन.

माझ्या आजूबाजूला चिकार संवेदनशील लोक आहेत; त्यांचं वर्णन 'गोरे पुरुष' असं करून त्यांचा अपमान मी करू नये.
"आपलं आजचं वर्तन आणखी काही दशकांनी आपल्यालाच घृणास्पद वाटू शकतं. मात्र स्वतःला माफ करावं आणि उत्क्रांत होत राहण्याच्या आपल्या शक्तीवर विश्वास ठेवावा" असं आजच एका गोऱ्याशी बोलत होते. तो सांगत होता, "माझे आजोबा वंशद्वेष्टे होते. त्यांच्या आजोबांकडे गुलाम होते, त्यापेक्षा ते बरे. आणि आजोबांपेक्षा मी बरा."

तर मूर्खांमुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा, का शहाण्या-समजूतदार लोकांबरोबर आनंदात वेळ घालवायचा?

सामो Tue, 19/03/2019 - 08:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अमेरीकेत ह-पा कारणावरुन तुरुंगात टाकतात असे ऐकण्यात आलेले आहे. या विषयावरिल एक डॉक्युमेन्टरी देखील नेटफ्लिक्स्वर आहे/होती असे ऐकिवात आहे. तेव्हा एखाद्या मूर्ख वंशद्वेष्ट्या बाईमुळे तुरुंगात जाउन बसायचा महामूर्खपणा कोण करणार.

"आपलं आजचं वर्तन आणखी काही दशकांनी आपल्यालाच घृणास्पद वाटू शकतं. मात्र स्वतःला माफ करावं आणि उत्क्रांत होत राहण्याच्या आपल्या शक्तीवर विश्वास ठेवावा" असं आजच एका गोऱ्याशी बोलत होते. तो सांगत होता,

सत्य सत्य!!

अनुप ढेरे Thu, 03/03/2016 - 09:54

छान लेख. बस प्रवास मी देखील रोज करतो आणि तो बर्‍याचदा हवाहवासा वाटतो. लांबचा बस प्रवासदेखील. पण खूप विविध लोक दिसतात म्हणून नाही आवडत. बसमध्ये ट्रेन ऑफ थॉट्स फार छान चालू रहाते. खिडकीबाहेर बघत एका मागोमाग वेगवेगळे विचार येत रहातात ते फार आवडतं. कधीतरी उगाच चेहेर्‍यावर हसू येतं काहीतरी विनोदी आठवून. लोक विचारतात का एकटाच हसतोय म्हणून.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 10:53

In reply to by अनुप ढेरे

हां येस्स हीच ट्रेन ऑफ थॉट्स फार फार आवडते.बाहेरचं जग जरी सातत्याने बदलत असलं, ढग, झाडे, माणसे पळतात तरी त्यात एक लय असते ती लय अंगात भिनते. शिवाय मला खात्री आहे लहानपणी आईच्या पोटात असताना जी सततची हळूवार लय बाळ अनुभवतं इन फॅक्ट नंतर पाळण्यात ते झोपी जातं ते ही याच कारणामुळे, तशीच ही लय एकदम त्या आईच्या पोटातील निवांत ऐतखाऊ (;)) पणाची आनंदी आठवण करुन देत असावी.

मेघना भुस्कुटे Thu, 03/03/2016 - 11:05

In reply to by अनुप ढेरे

अगदी अगदी. फक्त खिडकी, आणि तीदेखील तोंडावर वारा घेता येईल अशी, हवी. अत्यंत भारी, निवांत आणि क्रिएटिव असा वेळ असतो तो.

मेघना भुस्कुटे Thu, 03/03/2016 - 11:56

In reply to by सुनील

संपूर्ण सहमती. किंबहुना 'देखील' या शब्दयोगी अव्ययालाच हरकत आहे.
लाल डब्बा हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याची वॉल्वोबिल्वोशी तुलनाच नाही. त्यांची अशी एक खास संस्कृती आहे. एकदा पुलं लिहून गेल्यानंतर आपण या संस्कृतीकडे पुरतं दुर्लक्षच केलं. एकूणच म०म०वर्गाचा उंचावत गेलेला अर्थस्तर आणि लाल डब्ब्याप्रती वाढत गेलेली तुच्छता यांच्यात समप्रमाण आहे असं दिसतं. पण मला आवडतो लाल डब्बा मनापासून. त्यात वर अनेकांनी वर्णिलेल्या खिडक्यांचा जितका वाटा आहे, तितकाच त्यांच्या सहनशील आणि स्टायलिश डायवरांचा आहे, एसटी क्यांटिनामधे चापलेल्या पुरी-भाजी-तर्री या मिश्रणाचा आहे (एकदा मांडगावच्या एष्टीष्ट्यांडवर आगाऊ पैसे देऊन पुर्‍या तळायची ऑर्डर दिली आणि पुढच्या पोटप्रवासाची बस आली म्हणून उपाशीच उठून गेलो. तर तिथल्या पोर्‍यानं बस सुटता सुटता हातात गरम पार्सल आणून कोंबलं होतं. मला धड गहिवरायलाही वेळ मिळाला नव्हता!), अपरात्री परत येताना एकटीनं प्रवास केला म्हणून जेन्विन काळजीनं डाफरणार्‍या आणि नंतर चक्क वाट वाकडी करून घराजवळ सोडणार्‍या कंडक्टरांचा आहे, ऐन श्रावणात कोकणच्या दिशेनं जाताना दिसणार्‍या प्रचंड मोहक हिरव्या रस्त्यांचा आहे, आवळा सुपारी आणि खारे दाणे आणि काकड्या आणि कलिंगडं यांचा आहे, पूर्वी कोकणात एष्ट्यांचा सुळसुळाट झाला नव्हता तेव्हा मुक्कामी थांबणार्‍या डायवर-कंडक्टरांच्या सुरस आणि भुताळी गोष्टींचा आहे..
छ्या, हे भलतंच वळण काढलंत ढेरेशास्त्री आणि सुनीलराव!

.शुचि. Thu, 03/03/2016 - 12:05

In reply to by सुनील

मला धड गहिवरायलाही वेळ मिळाला नव्हता!

=)) ज्जे बात!
लिही मेघना मस्त वाटतं एकेका व्यक्तीच्या चष्म्यातून जग पहायला.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 11:25

हां अजुन एक किस्सा. व्हरमाँटलाच बसमध्ये एक तरुण शिरला ते हातात उघडा स्ट्रॉबेर्यांचा बॉक्स घेऊनच. अन त्या टवटवीत स्ट्रॉबेर्‍याही कशा तर वरती थोडी पीठीसाखर बुरभुरवुन डेकोरेट केलेल्या. खूप आनंदी दिसत होता तो. आल्यानंतर त्याने त्याच्या शेजारच्या सर्व प्रवाशांना स्ट्रॉबेरी ऑफर केल्या. काहींनी घेतल्या तर बर्‍याच जणांनी "नो थॅंक्स" म्हटले. मी घेणार्‍यांमधील निघाले. ती स्ट्रॉबेरी, ही स्ट्रॉबेरी सारखीच लागली.
परंतु नंतर तो मुलगा लगेच उतरुन गेल्यावरती, मला जाम भिती वाटू लागली की ते विष असेल तर बरं निदानपक्षी हेरॉइन असेल तरी किती मोठा धोका होता. आपण "अनोळखी व्यक्तीने दिलेले काहीही खायचे नाही" ही आईबाबांची शिकवण विसरलोच कसे? तो प्रवास खूप चिंतेत गेला. सुदैवाने त्या स्ट्रॉबेर्‍या नॉर्मल निघाल्या.

adam Thu, 03/03/2016 - 11:35

शेवटचे दोन परिच्छेद नितांत सुम्दर, नितळ स्वच्छ आहेत.
त्याआधीचं वाचून चार तारका कुणी आणि का दिल्या असाव्यात हा प्रश्न पडला.
पण त्या दोन परिच्छेदात हा प्रश्न मिटला.

.शुचि. Thu, 03/03/2016 - 11:41

In reply to by adam

मनोबा मला एक ट्रिक कळली रे. जितकं पर्सनल अकाऊंट्/नॅरेशन तितकं वाचकांना चटकन अपील होतं. कृत्रिम तत्वज्ञान/ लेक्चर्/दवणियतेपेक्षा असे लिखाण आवडते. तुलाही भरघोस प्रतिसाद का मिळतो तर तू एका फ्लोमध्ये तुझे फक्त तुझे विचार लख्लख मांडतोस.

अंतराआनंद Fri, 04/03/2016 - 08:28

खूप सुंदर.

नोकरी सोडल्यावर हा बस प्रवास गमवला. सीएसटी ते बॅकबे हा बस प्रवास १७ वर्षे केलाय. पण नोकरी सोडतानाही मला हा प्रवास गमवणार याचंच वाईट वाटलेलं. एखादी खिडकी रिकामी झाली की लहान मुला सारखं उअठून तिथे जाऊन बसायला मला काही वाटत नाही. बधवार पार्कमध्ये एक चाफा आहे. एरवी त्याचं अस्तित्व जाणवत नाही. पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला एखाद्या दिवशी तो पूर्ण फुलून सामोरा येतो. रस्याकडेने असणारी पेल्टाफोरम, गुलमोहर........ आता फुलले असतील.
एकदा धुळवडीच्या दिवशी ऑफिसला चालले होते सुटीच्या दिवशी जावं लागतय याचं वाईट वाटत होतंच पण कामाचंही दडपण होतं. काही कारणाने खूप खिन्न होते. कोणी "कशी आहेस?" विचारलं असतं तरी रडू आलं असतं. पण बस कफ परेडच्या रस्त्याला वळली आणि फुललेले पेल्टाफोरम, अशोक सामोरे आले. पुढे तो चाफा ही. काय झालं माहित नाही पण मन शांत झालं.
शुची, मला त्या दिवसाची आठवण करुन दिलीस.

इंग्रजी नंबर 8 म्हणा ना. दोन वर्तुळे एक आधिभौतिक तर एक भौतिक जिथे एकमेकांना छेदतात तो हा प्रवासाचा वेळ.
One in Many & Many in One ही Walt Whitman कवीची कल्पना आपण जगतो. क्वचित एखाद्या दिवशी जुन्या प्रेमाची आठवण येउन मूड अगदी हळवा झालेला असतो , आपण आपल्यात खोल हरवून गेलेले असतो. आणि हे समजून सावरून, गर्दीही आपल्याला निवांतपणा देते. कसलीही अपेक्षा करत नाही, की हक्क गाजवत नाही. खरं तर हा बसचा प्रवासच माझ्या मानसिक शांतीचा कणा आहे. हा प्रवास नसता तर मला माहीत नाही मी कुठे शांती शोधली असती. कदाचित ध्यान वगैरे करायला लागले असते. बाहेरच्या जगातील , नोकरीवरील महत्त्वाकांक्षी (पर्पझ ड्रिव्हन) अस्तित्व आणि घरातील अगदी निवांत आयुष्य या दोहोंना सांधणारा दुवा आहे हा बस प्रवास.

हे झकास.

ट्रेन ऑफ थॉट्स . खरच.

घाटावरचे भट Fri, 04/03/2016 - 08:55

In reply to by अंतराआनंद

ट्रेन ऑफ थॉट्स . खरच.

खरं तर बस ऑफ थॉट्स म्हणायला पाहिजे. :-P

बाकी लेख छान. एकट्याने केलेला प्रवास हा कधीही भारी असतो. विचार करायला भरपूर वेळ मिळतो. गर्दीतला एकांत म्हणा हवा तर. मध्यंतरी पुणे-दिल्ली-पुणे असा रेल्वे प्रवास घडला. लोकांना प्रवासाचा शीण वगैरे येतो. मला रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं!

चार्वी Fri, 04/03/2016 - 18:37

किती छान लेख. मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखा.

मला बसप्रवास अजिबात आवडत नाही. एकतर मला मळमळते (भावे प्रयोग ☺). मी रोज बसने कामावर जायचे तेव्हा गर्दी, चिकचिक, घाम, गचके, धक्के, खांद्यावर बॅग घेऊन बराच वेळ उभे रहावे लागणे यामुळे मला बसने जाणे शिक्षा वाटे. पण लेखात म्हटलं आहे तसं बसप्रवासात जाणारा वेळ हा 'मी टाइम' होता.

एकदा सकाळी घरातून निघताना मी खूप वैतागले होते. प्रचंड ऊनही होतं. मी मुद्दाम लांबच्या रस्त्याने जाणारी (आणि त्यामुळे गर्दी नसलेली) बस पकडली. खिडकीत बसून रस्त्यावरची दृश्य बघता बघता मन निवांत झालं. थोड्या वेळाने अचानक गार वारा सुटून पाऊस बिऊस आला. माझा वैतागाचा मूड पूर्ण बदलून ऑफिसमध्ये पोचेपर्यंत मी उल्हसित बिल्हसित झाले होते. घर आणि ऑफिसच्या कटकटी एकमेकींपासून दूर ठेवण्यासाठी बस प्रवासाचा उपयोग होई. ☺

राजन बापट Sat, 05/03/2016 - 21:24

लिखाण आवडलं.

त्यातलं वर्णन हे जरी दैनंदिन बस-प्रवासाचं - म्हणजे कम्युटचं - असलं तरी इतर अनेकांप्रमाणे माझ्याही मनात बस प्रवासांचे अनेक संदर्भ उमटून गेले.

वर कुठेतरी एस्टीचा संदर्भ आलेला आहे. माझ्या एका मावशीचं लग्न होऊन ती भिवंडीजवळच्या एका गावी सासरला गेली. १९७० चं दशक. त्या काळात भिवंडीपलिकडच्या खेड्यातून मावशी मुंबईमधल्या एका उपनगरात काही वर्षं नोकरी करायची. म्हणजे सकाळी भिवंडीपर्यंत पाचला पहिली एस्टी. मग भिवंडी ते ठाणं अशी दुसरी एस्टी. मग ठाणा स्टेशनला मध्यरेल्वेची लोकलट्रेन आणि मग दादरला उतरून तिथली गर्दी क्रॉस करून ऑफिस. आणि हेच संध्याकाळी.

हे मला फार जवळून पहायला मिळालं कारण अर्थातच माझे नि मावशीचे असलेले मायेचे संबंध. तीन चार महिन्यातून एखादे वेळी मला मावशीच्या सासरी जायची संधी मिळायची. आणि मला त्याचं प्रचंड आकर्षण वाटायचं. जेमतेम दहा वर्षांच्या आतबाहेरचं वय. शनिवार दुपारी ठाणा स्टेशनवरून मावशी मला "पिक अप" करणार. तिथला "कुंजविहारी"चा वडापाव खायचा. भिवंडीची एस्टी पकडायची.

माझ्या एक गोष्ट लवकरच ध्यानात आली. ही बाई असा जीवघेणा प्रवास रोज करते हे सहप्रवाशांना नि ड्रायव्हर-कंडक्टरांच्याही लक्षांत आलेलं असल्यामुळे मावशीकरता जागा अनधिकृतरीत्या राखीव होती. इथे मला त्या एस्टी प्रवासातली ओल पहिल्यांदा जाणवली. मावशीबरोबर नित्यनेमाने येणारा भाचा हेही नंतरनंतर लोकांच्या लक्षांत येत गेलं. सूर्यास्त झाल्यांनंतरचा तो बसप्रवास. शनिवार संध्याकाळ. एकाच वेळी मजा वाटायची, एस्टी मधल्या मंद बल्बच्या उजेडातले लोकांचे हास्यविनोद. बाहेर - विशेषतः भिवंडी मागे पडल्यावर - असणारा काळामिट्ट काळोख. गावी पोचल्यावर खाली उतरल्यावर एस्टीचा थांबा ते मावशीचं घर हा पायी केलेला प्रवास. रस्त्यात अजिबात दिवे नाहीत. मावशीचं बोट घट्ट पकडून ती आणि मी मुकाटपणे ती पंधरा मिनिटं चालत आहोत. आणि मग घरी पोचल्यावर मावशीचं नि माझं होणारं स्वागत. गरम गरम जेवण जेवून, खळ्यातल्या बाजेवर लागलेली निवांत झोप.

असो. विषय बस-प्रवासाचा आहे. मावशीच्या या रूटीनमधे घडलेले काही किस्से माझ्या डोळ्यासमोर तर त्यापेक्षा कैक मी ऐकलेले. एकदा प्रचंड पाऊस चालू होता. (मुंबई-ठाणं-भिवंडी हा परिसर म्हणजे चार महिने पावसाचा धुमाकूळ.) शनिवारी मावशीच्या घरचं कुणी ना कुणी बसस्टॉपवर तिला न्यायला यायचंच. तर तसे लोक आलेच होते. पण एकंदर पावसामधल्या गोंधळामुळे का कशामुळे माहित नाही, पण मावशी एक स्टॉप आधीच उतरली. कल्पना करा. मुसळधार पाऊस. प्रकाशाचा कण नाही. आपण नक्की अलिकडे आहोत की पलिकडे उतरलो आहोत याची कल्पना नाही. मोबाईल फोन सोडा, गावात फोन कुणाकडेही नाही आणि असला तरी लावायचा कुठून ? लोक कशातूनही निभावून नेतात या माझ्या (अंध)श्रद्धेला बळ देणारा हा प्रसंग आहे असं म्हणता येईल.

असो. लेख आवडला हे पुन्हा एकदा सांगतो.

शुभांगी कुलकर्णी Wed, 27/03/2019 - 14:17

बस प्रवास आवडला. सुदैवानं पुण्यातील पीएमटीचं आणि नोकरीच्या वेळांचं गणित जमत नाही. हे यासाठी की अशी नोकरी शोधणं बस पकडण्यापेक्षा महाकठीण आणि दुर्दैव अशासाठी माणसं वाचता येत नाही....... अशा शांत प्रवासाची गरज आहे घर ते नोकरी यामधलं फक्त आपलं जग.