टची गोष्ट

कथा प्रणव सखदेव

टची गोष्ट

- प्रणव सखदेव

मी अस्वस्थ झालोय. मी थांबून राहायला तयार आहे, स्वर्गाच्या दारावर प्रतीक्षा करणार्‍या त्या बुद्धासारखा. पण एकच प्रश्न मला टोचत राहतोय.

बराच वेळ दिसतोय माझ्याकडे. तेव्हा ही गोष्ट सांगण्यासाठी वातावरणनिर्मिती करायला सुरुवात करतो. त्यासाठी कोणता बरं सेट निवडावा?. ट मला भेटला मुंबईत,आणि मुंबई म्हणजे लोकल ट्रेन. लाइफलाइन. हां, मुंबईतली लोकल ट्रेन बेस्ट ठरेल. यस.

सकाळी ८:१७च्या अंबरनाथहून सीएसटीला जाणार्‍या फास्ट लोकल ट्रेनमध्ये मी कसाबसा आत शिरलो.

पहिलं वाक्य लिहिलं रे लिहिलं आणि मनात ट्रेनच्या सगळ्या आठवणींचा कल्लोळ उठतोय. आता मी फारसा ट्रेनने प्रवास करत नाही. पण आठवणी कुठे जाणारेत? तेही अर्धं आयुष्य ज्या ट्रेनमध्ये गेलं, तिथल्या ट्रेनच्या आठवणी!


गाडी खच्चून भरली होती, पण उशीर झाला असल्याने ती पकडण्यावाचून काही पर्यायही नव्हता. दरवाज्यापासून पाच-सहा पावलं आत उभं राहायला कशीबशी जागा मिळाली आणि तोच पँटच्या खिशात असलेला मोबाइल फोन वाजून व्हायब्रेट झाला.

गर्दी एवढी होती की खिशात हात घालणं शक्यच नव्हतं. म्हणून काही न करता तसाच उभा राहिलो आणि मोकळी हवा घेण्यासाठी नाकपुड्या फेंदारल्या. कपाळावर, मानेवर, काखेत, जांघेत घाम साठला होता आणि त्याची चिकचिक इरिटेटिंग होत होती. वाटलं, झपकन एक झटका आजूबाजूच्या गर्दीला द्यावा आणि रजनीकांतच्या पिक्चरसारखी सगळी गर्दी स्लो मोशनमध्ये हवेत उडून लोकलबाहेर पडावी. तोच मोबाइल फोन पुन्हा एकदा वाजल्याने माझ्या कल्पनासमाधीला तडे गेले. दुसर्‍यांदा फोन वाजल्याने मी अस्वस्थ झालो आणि चुळबुळू लागलो. त्यामुळे माझ्या खांद्याचा मध्यमसा धक्का माझ्या शेजारच्या माणसाला लागला आणि बिचार्‍याची डुलकीमोड झाली. तांबारलेल्या डोळ्यांनी त्याने मला खुन्नस दिली. मी नमतं घेत, त्याच्याकडे पाहून कसनुसं हसत 'सॉरी' म्हणून मोकळा झालो.

काही केल्या माझं मन काही स्वस्थ बसेना. कोणाचे मेसेज असतील, काय काम असेल, घरी काही झालं तर नसेल ना? किंवा नातेवाइकांपैकी कोणाचा अॅक्सिडेंट. असे विचार माझ्या डोक्यात वेडेवाकडे सरपटू लागले.

किंवा आणखीही एक शक्यता होती. ती म्हणजे, आमच्या संपादक महाशयांचा फोन किंवा मेसेज. बरेचदा मी लावून घेत असलेल्या, म्हणजे मी पाहत असलेल्या वर्तमानपत्राच्या पानावर काही चूक झालेली असेल, तर ते सकाळी सकाळी - खूप मोठी चूक असेल तर फोन करून आणि लहान चूक असेल तर मेसेज करून - झापायचे. मी विचार केला, पण काल तर अर्धा पान जाहिरातच होती, आणि त्यावर आणखी चार छोट्या-मोठ्या जाहिराती होत्या. पानावर इनमीनतीन बातम्या लागल्या होत्या. त्यामुळे चूक होण्याची शक्यता तशी कमी होती. मग कोण असेल? विचारांचा भुंगा त्या भर गर्दीत माझं डोकं पोखरत असतानाच, पुन्हा एकदा फोन वाजून व्हायब्रेट झाला!

आता मात्र फोन न पाहता, स्वस्थ उभं राहणं मला अशक्य झालं. हाताने धरायला असलेल्या डब्यातल्या वरच्या कड्यांवरून मी झटकन हात खाली आणला, तर माझं कोपर बाजूला उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्यावर दाणकन आदळलं. त्यामुळे तो कळवळून चिडला. "ठीक से खडा रह ना चुत्ये, हलता कायकू है बे? नया है क्या मुंबई मे?" त्याने कसंबसं डोकं चोळत मला विचारलं. पण डोकं चोळण्यासाठी त्याने हात खाली घेतला, तेव्हा त्याचंही कोपर त्याच्या शेजारी असलेल्या माणसाला लागलं. त्यामुळे भांडणाचा त्याचा सगळा त्वेषच ओसरून गेला, आणि "गर्दीमे तो एेसा होताहीच हे. चलता है. सॉरी हां बॉस." असं काहीतरी गुळमुळीत बोलत तो गप्प बसला.

इकडे मी माझ्या खिशात हात घालू पाहत होतो. पण माझ्या दुसर्‍या हातात बॅग होती आणि खांद्यावर डब्याची पिशवी. त्यामुळे माझी स्थिती अवघडलेली झाली होती. शेवटी नको तेच झालं, खिशाएेवजी एका पँटची झिप माझ्या हाताला लागली! मी समजून चुकलो, काय झालंय ते. मी हळूच शेजारी पाहिलं तर शेजारचा माणूस माझ्याकडे आवाहनात्मक नजरेने पाहत होता. सूचक हसत त्याने झटकन मला डोळा मारला. कसनुसं हसत "सॉरी, मी त्यातला नाहीये, चुकून हात लागला", असं म्हणत मी अखेरीस माझ्याच खिशात हात घालण्यात यशस्वी झालो! एवढं सगळं होईस्तोवर आणखी एकदा मोबाइलची रिंग वाजून तो व्हायब्रेट झाला होता.

मी फोन बाहेर काढून अनलॉक केला. पण तेव्हाही हात बाहेर काढताना तो कोणाच्यातरी पार्श्वभागाला लागून गेला. त्यामुळे त्या माणसाने सणसणीत शिवी हासडली. "अबे तेरी माँकी. चुतिया, क्या कर रहाय? खडा रह ना सिधेसे. किधर किधर से आते है!" तो माणूस माझ्यापुढे, पर्यायाने पाठमोरा, उभा असल्याने त्याला कोणी काय केलंय, हे नीट समजलं नाही. परत एवढ्या गर्दीत मागे वळून सूड घेणं, हे त्याला काही केल्या जमलंच नसतं. त्यामुळे त्याने आपला राग नुसता शब्दांमधूनच व्यक्त करण्यात समाधान मानलं.

माझ्या शेजारचा 'तो झिपवाला माणूस' अजूनही माझ्याकडे; गळ माशाकडे ज्या आशाळभूतपणे पाहील, तसा पाहत होता. त्या एवढ्या गर्दीत काही क्षणांचं सुख मिळालं तर त्याला हवंच होतं. शिवाय गर्दी एवढी होती की काही केलं तरी कोणाचे न कोणाचेतरी स्पर्श होतच होते, मग त्यांना ते हवे असोत वा नको असोत. मी नम्रपणे हसून नकार दिला. त्यावर त्याने एक गोड हास्य केलं आणि तो दरवाज्याबाहेर पाहू लागला. गाडी एका विशिष्ट खडखडाटी लयीत धावत होती, आणि ती लय ट्रेनमधल्या सगळ्या शरीरांनी अचूकपणे साधली होती.

मी मोबाइल अनलॉक केला. गाडी पारसिकच्या बोगद्यात शिरली. गाडीच्या दारांवर लटकणारे लोक 'ओSS' असं ओरडू लागले आणि बोगद्यात तो आवाज घुमला. हे नेहमीचंच होतं. त्यामुळे त्याकडे कोणी फार लक्ष दिलं नाही. गाडीत ट्यूब्सचा पांढुरका प्रकाश पसरला आणि त्यात माझ्या मोबाइल स्क्रीनचा उजळपणाही मिसळून गेला.

माझ्या लोकल ट्रेनमधील एका ग्रुपमधल्या मित्राचे, टचे, चार व्हॉट्सअॅप आले होते.

'टचा मेसेज? इतक्या दिवसांनी?' मला प्रश्न पडला. 'तेही पर्सनल?' नाही म्हणजे, आमचा रोज एकाच लोकलने जाणार्‍यांचा व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप होता. त्यावर ट कायम 'सेक्सी' मेसेज टाकायचा. पण आजवर त्याने कधी पर्सनल मेसेज केला नव्हता.. 'च्यायला उगाच एवढा तडफडाट करून, शिव्या खात मरमराट केला मोबाइल पाहण्यासाठी!' मी मनातल्या मनात टला दोन शिव्याही घातल्या. 'जाऊ दे, नंतरच पाहू. असंही आता ठाणा येईल, तेव्हा ही बरीचशी गर्दी उतरेल. मग आत जायला थोडी जागा मिळेल', असा विचार करून मी टचा विचार झटकत डब्याच्या आत, बसायच्या जागांच्या दिशेने कूच करू लागलो. तरी मला प्रश्न पडलाच, काय काम असेल टचं आपल्याकडे?

***

आता मला थोडं टबद्दल सांगायला हवं. पण टचं खरं नाव उघड करावं का नाही? मनातल्या मनात खूप खल चाल्लाय यावर. वाटतंय, कशाला पाहिजे नाव? म्हणजे 'अमोल', 'सुरेश', 'नरेश', 'आर्यन' अशी रूढ नावं? ट हे नाव होऊ शकतंच की. अबकडईसारखं. आणि त्याहीपलीकडे ही गोष्ट टची असली, तरी एकट्या टची नाहीये. ती टसारख्या बर्‍याच जणांची आहे असं आपल्याला सूचित करायचं असेल, तर मग नकोच नाव. ग्रेट लेखक शेक्सपिअरने म्हणून ठेवलेलंच आहे – नावात काय आहे? (की हेही शेक्सपिअरच्या नावावर खपवलेलं आहे?)

ट हा माझा ट्रेनमध्ये झालेला मित्र. त्याचं खरं नाव काहीतरी वेगळंच होतं. मला ते आता आठवत नाही. साधारण वर्षभरापूर्वी आमची ओळख आणि नंतर मैत्री झाली ती ट्रेनमध्ये, तेही योगायोगाने. पण मला गेल्या सहा-सात महिन्यांपासून तो भेटलेला नव्हता. म्हणजे खरंतर मीच त्याला भेटलो नव्हतो.

झालं असं की बरीच वर्षं मी सकाळी साडेदहा वाजल्यानंतरच्या ट्रेन्स पकडून आरामात ऑफिसला जायचो. कारण संध्याकाळी उशीर व्हायचा. पण नंतर काही कारणाने मला थोडं लवकर निघणं भाग झालं. म्हणून मी 9.23च्या सेमीफास्ट कल्याण-सीएसटी लोकलने कामावर जाऊ लागलो. कारण ती गाडी कल्याण असल्याने निदान उभं राहायला तरी जागा मिळायची. त्यात ती सेमिफास्ट होती. म्हणजे ठाण्यानंतर फास्ट व्हायची. डबल फास्ट गाड्यांच्या गर्दीतून रोज जायची मला मुळीच हौस नव्हती. कधीतरी ठीक होतं, पण रोज तर शक्यच नव्हतं. त्यामुळे सगळ्या दृष्टीने मला ही गाडी बरी वाटली. त्यात ती एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागत असल्याने ब्रिज ओलांडा, पळापळ करा, असल्या कटकटी नव्हत्या.

एकदा मी ९:२३मध्ये चढलो. गाडी दीडेक मिनिटं आधीच आली असल्याने बसायला जागा मिळणं शक्यच नव्हतं. म्हणून मग मी एका डब्यात शिरलो आणि दोन समोरासमोरच्या बाकड्यांमधल्या जागेत आधीच उभ्या असलेल्या एका माणसाच्या मागे जाऊन उभा राहिलो. तोच कोणीतरी हाक मारली. मी मागे वळून पाहिलं, तर दुसर्‍या बाजूला अमेय बसला होता. तो माझ्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. तो मला म्हणाला, "इकडे ये, आमच्या इथे. आमचाच ग्रुप आहे सगळा." मीपण लगेच तयार झालो. अमेयमुळे प्रवासात तेवढाच टाइमपास झाला असता आणि बसायलाही जागा मिळाली असती. नंतर त्याच्या बोलण्यावरून मला समजलं की तो रोज त्याच गाडीने जायचा. त्यामुळे त्यांचा तिथे एक ग्रुप झाला होता. त्यातले बरेचसे कल्याण-डोंबिवलीचे होते, काही ठाकुर्लीचे आणि काही ठाणावालेही होते.

मला अमेयने लगेचच बसायला आपली जागा दिली. मी म्हणालो, "अरे, बस तू. मी राहतो उभा."

अमेय म्हणाला, "अरे, बस रे. मी बराच वेळ बसूनच आहे. शिवाय ऑफिसमध्येही बसूनच काम असतं. ठाण्याला दे मला जागा. त्यात काय एवढं." मीही पडत्या फळाची आज्ञा झेलत बसून घेतलं!

अमेय मला म्हणाला, "तू रोज याच गाडीनं जातोस का?"

मी म्हटलं, "हो, सध्यातरी जातोय. याआधी बरेचदा १०:४६नं जायचो. त्याला गर्दी कमी असते जरा."

अमेय म्हणाला, "हां, असंही तुम्हा पत्रकारांचा आमच्यासारखा - फिक्स्ड १० ते ६ असा जॉब नसतो म्हणा. तुम्हांला कधी, कुठे कशासाठी जावं लागेल ते सांगता येत नाही, नाही का? त्यामुळे फिक्स्ड गाडी नसेलच तुझी, बरोबरे."

मी अमेयला फार खोलात जाऊन सांगितलं नाही की मी डेस्कवरचं काम करणारा, उपसंपादक आहे ते. माझं काम बातम्या, लेख गोळा करणं नसून; त्या वाचून, त्या संपादित करून, त्या पानावर लावून घेणं असं असतं. माझ्याकडे दैनिकाच्या एक-दोन पानांची जबाबदारी असते. कारण पत्रकारांचं काम 'हटके' असतं, ऑफिसवर्क करणार्‍यांसारखं मोनोटोनस नसतं, त्यात एक प्रकारचं थ्रिल असतं, असा अमेयचा भ्रम मला मोडायचा नव्हता. कारण त्या भ्रमामुळे आपोआपच मला त्याच्या नजरेत थोडी प्रतिष्ठा मिळाली होती. तो माझ्याकडे, हा कोणीतरी 'वेगळा' आहे, या दृष्टीने पाहत होता. मला ते हवंहवंसं वाटत होतं.

मी म्हणालो, "हो, हो. कधी मुलाखती घेण्यासाठी जावं लागतं, तर कधी राजकारण्यांची रॅलीबिली असते. कधी आतंकवादी हल्लेबिल्ले होतात. मागे ते ताजवर झाले तसे. तेव्हा तर आणखीनच वाट लागते. मग तिथूनच बातम्या पाठवाव्या लागतात, लगेच टाइप करून. खरंतर याआधी आमच्या ऑफिसात फिक्स्ड वेळबिळ असलं काही नव्हतं; म्हणजे कार्ड स्वाइप करायचो, पण ते कोणी एवढं पाहायचं नाही. पण आता एचआर बदलल्याने नसती झेंगाटं आलीएत गळ्यात. वेळेत या वगैरे. म्हणजे मान मोडेस्तोवर जास्त वेळ काम करायचंच आणि वेळेतही यायचं. तेही पत्रकाराचा प्रोफाइल असलेल्यांनी. म्हणून मी असं लवकरच्या गाडीनं जाणं सुरू केलंय."

अमेय म्हणाला, "ते काय सगळीकडेच असतं रे. एचआरवाले तर आपली मारायलाच बसलेले असतात. बरं, आता जर तू याच गाडीनं जाणार असशील, तर रोज इथेच येत जा. आमचा हा डबा ठरलेला असतो – मधल्या फर्स्टक्लासच्या शेजारचा डबा. थांब, ओळख करून देतो – हे मदनकाका, ते डोंबिवलीला राहतात. आम्ही त्यांना 'काका' असंच म्हणतो. ते डोंबिवलीहूनच जागा पकडून बसून येतात. हा नीतेश म्हणजे 'नित्या'. हा कल्याणलाच राहतो. खडकपाड्याला. हा सोनावणे, तो कोनहून येतो. आणि हा ट. हापण डोंबिवलीला राहतो."

टची ओळख करून दिल्यावर सगळे जण हसायला लागले. टचा चेहरा कसातरीच झाला. अमेय म्हणाला, "म्हणजे याचं खरं नाव ट नाहीये बरं का! पण त्याला आम्ही ट असं म्हणतो. कारण हा सतत टची मूडमध्ये असतो. म्हणजे जरासं जरी चिडवलं ना की लगेच मनाला लावून घेतो. म्हणून हा ट."

मी सगळ्यांकडे पाहून हसलो. शेकहँडबिकहँड केलं. मग अमेयने मला हळूच कानात सांगितलं, "आणि हा डोक्यानेपण जरा ट दर्जाचा आहे, बरं का! म्हणजे अ, ब, क, डपेक्षाही खालचा दर्जा ट!" मग अमेय टच्या पुढे टाळीसाठी हात पुढे करत मोठ्याने म्हणाला, "बरोबर की नाई, ट!" आणि हसायला लागला. टला मात्र सगळ्यांसमोर त्याची अशी खेचल्याने, त्यातही माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीपुढे अशी खेचल्याने कसंतरी, अवघडल्यागत होत होतं. त्याच्या हालचालींवरूनही ते जाणवत होतं. पण काही क्षणांत तो नॉर्मल झाला. पुन्हा त्यांच्यात हसू-खेळू लागला. जणू काही त्याच्यासाठी हे सवयीचं, नेहमीचंच असावं.

मग अमेयने माझी ओळख करून दिली, "आणि हा मित्र"

आता इथे निवेदकाचं नाव काय बरं देऊ या? का यालाही नकोच द्यायला नाव काही? देऊया सोडून हा माझा मित्र म्हणून?. पण नको, देऊया इथे काहीतरी रूढ नाव. ट असं रूढ नाव नसलेल्या पात्राचा रूढ नाव असलेला (निवेदक) मित्र. हां, हे चांगलंय – नरेश बावीस्कर. नाव दिल्याने एक आयडेंटिटी आपोआपच तयार होईल त्याची. ट असं रूढ नसलेलं नाव आणि नरेश बावीस्कर असं रूढ असलेलं नाव, यामुळे कॉन्ट्रास्टही चांगला होईल.

"नरेश बावीस्कर. पत्रकार आहे बरं का! माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतो." 'पत्रकार आहे' म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरेत माझ्याविषयी एक वेगळाच आदर होता. त्यामुळे माझीही छाती जरा फुलून गेली. मी जरा ताठ बसलो. मग उत्साहाच्या भरात मी बोलून गेलो, "हां, पत्रकारितेशिवाय मी कथा म्हणजे गोष्टीबिष्टीपण लिहितो. साहित्यिक मासिकांत छापून येत असतात माझ्या कथा."

सगळ्यांनी नुसतीच मान हलवत, 'वा, व्वा, छान!' असं केलं. पण माझ्या लक्षात आलं की ते काही मनापासूनचं – 'पत्रकार आहे' म्हटल्यावर वाटलेल्या आदरासारखं - नव्हतं. साहजिकच होतं ते म्हणा. रोजच्या एवढ्या व्यापात कथाबिथा कोण वाचणार? आणि त्याही अशा साहित्यिक मासिकांमधल्या. त्याचा काय उपयोग? त्यापेक्षा पुरवणीतला एखादा लेख, त्यातही प्रवासवर्णनं किंवा विनोदी किस्से किंवा रेसिपी वाचण्याने काहीतरी फायदा तरी होतो, मनोरंजन तरी होतं किंवा खायचे पदार्थ तरी कळतात नवेनवे. असा विचार करणं काही चूक नाही, पण माझ्यासमोर बसलेल्या टने मात्र माझा हात हातात धरला. उत्साहित होऊन तो म्हणाला, "बावीस्कर! ओ, म्हायतेय मला तुमी. तुमची त्या अक्शरच्या दिवाळी अंकात गोश्ट आल्ती ना. मला म्हायतेय. च्यायला भारी भेटलात की राव! बरं झालं, एक तरी लेखक पाहायला मिळाला. नायतर आपण इथं नुसते छापछाप छापतो पानं. पन जो ते लिहतो त्याचं थोबाडही नाई पायला मिळत. बरं झालं."

एक वाचक, तेही या गर्दीभरल्या ट्रेनमध्ये असा अचानक भेटल्याने मलाही आनंद झाला. त्यामुळे मीही त्याचा हात घट्ट धरून दाबून दिलखुलास हसलो. ट पुढे म्हणाला, "तुमची ती गोश्ट वाचून आमच्या प्रेसमधली ती राधिकामॅडम रडली म्हायतेय. म्हन्ली, काय इमोश्नल गोश्टय! तुमाला सांगतो, तुमी लिहलेलं सगळ्या पब्लिकच्या आधी आपन पाहतो, वाचतो; म्हायतेय! मंग! हाय का नाय गंमत." त्याचा चेहरा अभिमानाने खुलला होता."

तेवढ्यात ग्रुपमधला एक - बहुतेक सोनावणे खिडकीजवळ जाऊन म्हणाला, "ए ट, ती बघ चालली तुझी ती आयटेम धावत. तिला नेहमी कसा काय उशीर होतो रे? केवढ्या हील्स घालते, काय हलतात भाऊ.!"

"अरे पोरांनो, कितीदा सांगितलंय असं बोलू नये." काका नाटकी स्वरात म्हणाले. पण त्यांची नजर धावत जाणार्‍या 'टच्या आयटम'वर खिळून राहिली होती.

सोनावणे झटकन बोलला, "ओ काका, तुमचं आता ठीके. वय झालं तुमचं. तुम्हांला आता 'उठवत' नसेल, पण आमचं वय आता 'लवकर उठण्याचं'य. तुम्हीही तेच करत असाल त्या वयात. पण गपचूप, गपचूप. तुमच्या वेळच्या पिक्चरमध्ये कसं, बागेत हिरोहिरॉइनचा किस झाला असं दाखवायचं असेल की फुलाला फूल भिडवायचं तसं! आडून आडून."

काका आता डिवचले गेले होते. "ए बाबा, उठण्याबद्दल मला नको सांगूस. मी रोज सकाळी नियमित 'उठतो' आणि 'घालतो'ही. कळलं!"

आता सगळ्या ग्रुपला चेव चढला होता. लगेच ट म्हणाला, "एवढ्या सक्काळी सक्काळी घालता?"

"बागेत घालतो रे, सूर्यनमस्कार! पन्नाशी उलटली म्हणून काय झालं, सगळे मसल्स फिट्ट आणि घट्ट असायला हवेत!" काकांनी डोळा मारला.

ट म्हणाला, "बागेत! आपल्याला वाटलं सक्काळी उटल्या उटल्या तोंडात घालता. ब्रश हो! तोंड धुआयला!" यावर एकच हशा पिकला. एकमेकांना टाळ्या दिल्या-घेतल्या गेल्या. ग्रुपमध्ये नसलेले आजूबाजूचे लोकही हसू लागले.

त्या हील्सवालीच्या निमित्ताने ट आणि माझ्यातलं संभाषण तुटलं. कारण माझ्या कथांपेक्षा जास्त आकर्षक 'सब्‍जेक्ट' त्याला दिसला होता. मला मात्र या टबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली. याचं कारण साधं होतं. एकेकाळी साहित्य वाचणारे लोक बरेच होते. पण आताचा काळ हा टेक्नॉलॉजीचा, मोबाइलचा, व्हिडिओजचा आणि टीव्ही सिरीअल्सचा होता. त्यामुळे कोणालातरी – त्यातही टसारख्या माणसाला, माझ्या कथांमुळे मी माहीत होतो; ही माझ्यासाठी मोठी आणि कुतूहलाची गोष्ट होती. शिवाय अमेयने सांगितल्याप्रमाणे ट हा तसा डोक्याने कमी असलेला असला, तरी त्याला लेखकांबद्दल माहिती होती, जे विशेष होतं. त्यामुळेच मला त्याच्याशी बोलायचं होतं. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. पण 'आत्ता नको, कधी असेलच योग आणि वाटलंच त्याला, तर तोच सांगेल आपल्याला याबद्दल, पाहू या', असं मनातल्या मनात म्हणून मी गप्प बसून राहिलो.

इतका वेळ, माझ्या भीडेखातर अमेयने त्या संभाषणात भाग घेतलेला नसावा. म्हणून त्याची उभ्या उभ्या सारखी चुळबुळ चालू होती. तो आतून खदखदला असावा, त्याला हसू येत असावं. पण मी काय म्हणेन, काय विचार करेन, या भीतीपोटी त्याला बोलता येत नसावं. अस्वस्थ झाल्याचं दाखवत तो म्हणाला, "अरे, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. त्यांचं हे नेहमीचंच आहे."

मी म्हणालो, "अरे, मला सवय आहे याची. लोकलमधल्या ग्रुपमध्ये तर हे चालतंच." मग त्याला दिलासा देत मी हळूच म्हणालो, "आणि हो, तुलाही सामील व्हायचं असेल, तर बिनधास्त हो. नाहीतर तुला वाटायचं की माझ्यासमोर कसं असलं काय काय बोलायचं. बट डोन्ट वरी. 'असल्या' गप्पागोष्टी आपल्यासारख्या समाजात होणं हे साहजिकच आहे. सो, जस्ट चिल अँड एन्जॉय."

हे एेकून अमेयच्या आत जमलेली सगळी वाफ अचानक मोकळी झाली आणि मग तोही गप्पाष्टकांत सहभागी झाला.

अमेय म्हणाला, "ए टकाचोर ट, एकदा गाठून बोल तरी तिच्याशी. नुसताच काय पाहत असतोस, साल्या कायतरी कर की."

ट म्हणाला, "भावड्या, तिचे कपडे बग. आपनच्या वर्षभराच्या पँटी-शर्टांच्या किमतीच्या तिच्या चपलांच्या पेनसिली असतील यड्या. आपनला नाई झेपणार हा माल. असलं फर्निचर नुस्तं पाहायलाच ठीके. अन् तिलाही आपला भार सोसला पायजे ना बाबा. कचकड्याची बाहुली. तुटायची झटकन!" मग तो पुढे बोलू लागला. त्याच्या आवाजात आधीसारखा जोर नव्हता. "अन् मला माहितेय या 'हायक्लास' पोरींचं. त्या कुटं आपल्याला टच करनारेत. जसं काई आपला रापलेला रंग लागून त्या काळकुंद्र्याच होतील. ही जातच." टने ते वाक्य मध्येच सोडून दिलं.

इतरांना फार काही समजलं नसावं, किंवा त्यांच्या सवयीचं झालं असावं; पण मला मात्र त्यात एक सल जाणवला. जणू काही एखादी जखम उघडी पडली असावी, असं वाटलं.

नित्या म्हणाला, "झालास ना टची! टवड्या, पण असंच करत राहिलास तर लग्न होणार तरी कधी तुझं? का आयुष्यभर आपला हात जगन्नाथ! आँ.?" असं म्हणून सगळे जण खिदळायला लागले आणि त्याची खेचू लागले. आता आपलं आणि टचं फार काही बोलणं होणं शक्य नसल्याचा विचार करून मी डोळे मिटले आणि मला झोप लागली. पण माझ्या डोक्यात त्याने अर्धवट सोडलेलं ते वाक्य वाजत राहिलं.

"बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठSSल, श्री ज्ञानदेव..."

एकाएकी मला जाग आली. ट मोठ्याने ओरडला होता.

मी बाहेर पाहिलं, तर गाडीने ठाणा स्टेशन ओलांडलं होतं आणि आता ती फास्ट झाल्याने, तिने वेग घेतला होता.

कोणीतरी टची पट्टी बरोब्बर पकडत म्हटलं, "तुकाऽराम."

टने आरोळी ठोकली, "पंढरीनाथ महाराज की जय!"

कोणीतरी म्हणालं, "गणपती बाप्पा मोरया.."

ट किंचाळला, "उंदीरमामा की जय!"

***

टच्या आणि निवेदकाच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. आता मघाशी वर सोडलेला व्हॉट्सअॅपचा धागा पुरा करायला हवा. एवढं ताणून नको धरायला आता. पण हे करतानाही एक प्रश्न पडलाचे - व्हॉट्सअॅपचे मेसेज चॅटिंगसारखेच द्यावेत की सरळ मराठीत त्याचा मथितार्थ लिहावा? मन म्हणतंय, तसेच चॅटिंगसारखे द्यावेत. म्हणजे ते खरे वाटतील, खोटे असले तरी! हां, म्हणजे टने हे मेसेज काही असेच्या असे केले नाहीत बरं का, तर मी ते मला हवे तसे करून घेतले. त्याचा आशय तसाच ठेवून. शिवाय आज व्हॉट्सअॅपसारखं एवढं संवादमाध्यम असताना, उगाच पत्रापत्री करून किंवा प्रत्यक्ष भेट घडवून आणून पुढच्या भेटीचं सूतोवाच करण्यात तरी कशाला वेळ घालवायचा?, असंही वाटत होतंच. मग म्हटलं ठीके, देऊ या चॅटिंगचाच फॉरमॅट.

T : lekhak, tula bhetaychay
Kame. Mala ek gost havie lihun
Ashi gost jyane bayka muli aplya premat padtil
Mhaje mag maja marta yeil – inglishmadhe kay mhantat te
Tya saral palangat yetil apalya Smile

मी टचे मेसेज वाचले.

ठाणे स्टेशनवर बरीचशी गर्दी उतरून गेल्याने, मला थोडं आत शिरून उभं राहायला जागा मिळाली. मी माझ्याकडच्या बॅगा रॅकवर ठेवून दिल्या. ठाण्याला रिकामी झालेली गाडी काही सेकंदांत जवळजवळ दुप्पट माणसांनी भरून गेली. पण मी आता बर्‍यापैकी कम्फर्टेबल पोजिशनला होतो.

मेसेज वाचून मला त्याचा थोडा रागच आला. 'ही कसली विचित्र मागणी, अशी कथा कधी लिहिता येते का?', असा विचार करून मी झटक्यात उत्तर दिलं : ? Ashi kashi lihita yeil gosht bhau

त्याचं लगेचच उत्तर आलं : Ka nai yenar

माझा पारा थोडा चढला. पण मग मी स्वत:लाच म्हटलं की, 'थोडं शांतपणे घेऊया. त्याला नेमकं काय हवंय, हे समजून घेण्याआधी उगाच निष्कर्ष काढायला नकोत.' शिवाय असं चॅटिंग करून बोलण्यातही काही हशील नव्हतं. त्याने गैरसमज आणखीनच वाढले असते. म्हणून मी त्याला म्हटलं : ase karuya bhetu boluya . Pan 9.23 train nako. Baher bhetu.

T : Thike shanvar. Sandyakali

मी : Ho. Chalel.

असंही त्या आठवड्यात माझा शनिवारी वीकली ऑफ होता. त्यामुळे मला भेटणं शक्य होतं.

T : 7 va. dombivali. Mayur bar.

'OK', असं म्हणून मी टचा व्हॉट्सअॅपचा प्रोफाइल पिक पाहिला. त्यात तो हसत होता. त्याचं वय पंचेचाळीसच्या आसपास असावं. डोक्यावर टक्कल पडायला सुरुवात झाली होती. वर्ण काळा होता. ओठ जाड होते. लहान वयात शेताबितात कामं करून शरीर पीळदार झालेलं होतं. तो कायम शर्टपँट घालायचा. शर्ट कधीच इन केलेला नसायचा.

***

आता अखेरच्या प्रसंगाकडे जाण्याआधी टची आणि निवेदकाची भेट घडवून आणणं गरजेचं आहे आणि त्यात अखेरच्या प्रसंगाचं बीज पेरणंही आवश्यक आहे. पण हे सगळं मघाचसारखं व्हॉट्सअॅपवरून करायला नको, असंही वाटतंय. कारण त्यामुळे टच्या व्यक्तिमत्त्वाचे तपशील – म्हणजे हावभाव, त्याचं बोलणं, गोष्टीवेल्हाळपणा, त्याची मानसिकता, सेक्सबद्दलच्या गप्पा आदी गोष्टी मला व्हॉट्सअॅपवरून नीट सांगता आल्या नसत्या. म्हणून मग प्रत्यक्ष भेट घडवणं गरजेचं आहे वाटलं. काहीतरी शक्कल लढवायला हवीय. हां, हे बेस्ट होईल, त्यांची भेट व्हिडिओ कोच डब्यात घडवायची!

तेव्हा मी ९:२३च्या गाडीने जाऊ लागल्याने माझी रोजच टशी भेट व्हायची. तरी आम्ही फार कधी बोलायचो नाही. कारण मला त्यांच्या सेक्सबद्दलच्या बोलण्यामध्ये भाग घेण्यापेक्षा; ते सेक्सबद्दल काय बोलतात यामध्ये, त्यांचे जोक कसे असतात यामध्ये जास्त रस असायचा. त्यामुळे मी डोळे मिटून शांतपणे एेकत राहायचो.

त्याने एकदोनदा माझ्या लेखनाबाबतचा विषय काढला होता खरा, पण त्या ग्रुपमध्ये मला त्याच्याशी फार खोलात जाऊन बोलता आलं नव्हतं. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बरेच दिवस शमली नव्हती, याची चुटपुट लागून राहिली. पण असंही एरवी प्रवासात, जाता-येताना, कामानिमित्त कितीतरी लोक आपल्याला भेटत असतात. आपल्याला ते इंट्रेस्टिंगही वाटतात. पण सगळ्यांशी कुठे आपल्याला संवाद साधता येतो, त्यांच्याबद्दल जाणून घेता येतं. बरीचशी माणसं तशीच राहतात, मिटलेल्या पुस्तकासारखी. मुखपृष्ठ पाहिल्यावर उत्सुकता निर्माण होते, पण पुस्तक उघडून वाचेपर्यंत ती आपापल्या वाटेने निघून जातात. कदाचित टचंही तसंच होईल, असं मी स्वत:ला समजावलं. पण तरी मनाच्या एका कोपर्‍यात, कुठेतरी असं सारखं वाटत होतं की टचं सगळं पुस्तक नाही, तरी त्यातलं एखादं प्रकरण तरी आपल्याला वाचायला मिळणार कधीतरी. नक्कीच.

आणि एके दिवशी तो योग जुळून आला.

एकदा माझ्या पानावर फुलपेज जाहिरात पडली होती. त्यामुळे त्या दिवशी मी एरवीपेक्षा लवकर निघालो होतो. नाहीतर रोजच रात्री मला ऑफिसातून निघायला कमीत कमी साडेनऊ तरी व्हायचेच, आणि घरी पोचेस्तोवर अकरा. पण त्या दिवशी मला आठ वाजायच्या थोडं आधीच निघता आलं.

सीएसटी स्टेशनजवळ बस पोचली तेव्हा मी घड्याळात पाहिलं. सव्वाआठ वाजले होते. सबवेतून शिरल्या-शिरल्या माझ्या डोक्यात मुंबईकर चाकरमान्याप्रमाणे कोणती गाडी मिळेल, याचा विचार सुरू झाला. '८:२१ची सेमीफास्ट कल्याण लोकल मिळेल, नव्हे तीच धरू या. असंही आत्ता तीच एक फास्ट ट्रेन आहे. बाकी सगळ्या स्लोच आहेत. तेव्हा लवकर घरी पोचू', असा विचार करत मी झपाझप चालू लागलो.

प्लॅटफॉर्मवर पोचलो तेव्हा गाडीने निघण्यासाठीचा हॉर्न दिला होता. म्हणून फार काही विचार न करता दिसेल त्या डब्यात चढलो आणि डोक्यावरला हात मारून घेतला.

कारण तो डबा 'व्हिडिओ कोच' होता! प्रत्येक लोकलमध्ये हा कटबोगी असतो. म्हणजे या डब्यातला अर्धा भाग लेडीज डब्यासाठी दिलेला असतो. दोन भागांची विभागणी एका लोखंडी पत्र्याने केलेली असते, ज्याचा वरचा भाग हा जाळीचा असतो. या जाळीला लागूनच असतो जेन्ट्सचा चिंचोळा डबा. चिंचोळा असल्याने त्यात भयंकर उकडतं आणि घुसमटल्यासारखंही वाटतं. त्यात भर पडते ती गर्दीची! कारण सगळे 'शौकीन' या डब्यात चढतात. या डब्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भले भले सीट उबवत बसून राहणारेही या डब्यात उभं राहणं पसंत करतात, जाळीतून समोरचा 'व्हिडिओ' पाहण्यासाठी! समोरच्या मुली-बायका न्याहाळण्यासाठी!

तर म्हणून अशा या सर्वात जास्त गर्दी होणार्‍या चिंचोळ्या डब्यात, मी कधीही चढायचो नाही. पण त्या दिवशी चढलो, आणि 'अडला हरी' असं मनातल्या मनात म्हणत मी, सतत उन्हाकडे तोंड करून असलेल्या सूर्यफुलांप्रमाणे समोरच्या जाळीतून पलीकडे पाहत उभ्या असलेल्या माणसांच्या गर्दीत, एकटाच जाळीकडे तोंड न करता उभा राहिलो आणि खिडकीजवळच्या माणसाला माझ्या बॅग्स ठेवायची विनंती केली.

तोच मला गर्दीतून आवाज आला. "ओ, लेखक, या बसा, या!"

मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. उभ्या असलेल्या लोकांच्या पायांमधून एक चेहरा उठून उभा राहिला. तो ट होता. त्याने शर्टाचं वरचं एक बटण उघडं टाकलं होतं. त्यातून दोन-चार केस बाहेर आले होते. कॉलरच्या आत रुमाल टाकला होता.

मी म्हटलं, "अरे नको, नको. बस तू. मी बसेन नंतर."

तो म्हटला, "या डब्यात आपन कधी बसत नसतो बगा, माझा एक मित्र येनार होता या गाडीला म्हनून जागा धरून बस्लो. पन त्याला लेट झालेला दिस्तोय. बसा तुमी. असंही मी कोन्लातरी ही जागा देऊन उभाच राहनार होतो."

मी गर्दीचे पाय ओलांडत जात, बसत म्हटलं, "ठीके. आत्ता बसतो. पण थोड्या वेळाने उठेन."

"नको, नको. बसा आरामात. समोर एवढा नजारा असताना या गर्मीत काय बसायचं. गर्मी होनारच असंल, तर मग समोरच्या आगीने होऊ दे की, काय!" असं म्हणत तो हसला आणि मग इतरांप्रमाणेच एकटक समोर पाहू लागला.

मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे त्याच्याशी बोलायची. कारण आत्ता सकाळच्या गाडीतला ग्रुप नव्हता. आम्ही दोघंच होतो, तेव्हा आत्ताच जास्त चांगलं बोलता येण्याची शक्यता होती. फक्त प्रश्न होता, तो समोरचा 'नजारा' सोडून माझ्याकडे नजर देईल का नाही याचा! मग मी स्वत:ला म्हटलं, लक्ष्य दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक. असंही एरवी, सकाळी सगळेजण असताना आपण कधी बोलणार नव्हतोच, तेव्हा मग आत्ता नशीब अजमावून पाहूया.

मी विचारलं, "ट, तुला विचारेन विचारेन म्हणत होतो."

तो समोर पाहत म्हणाला, "हं. विचारा की बिन्दास्त." माशाच्या डोळ्याकडे एकाग्रपणे पाहणार्‍या अर्जुनापेक्षाही जास्त एकाग्र भासला मला तो! म्हणून मी मुद्दामच विचारलं, "नाही, म्हणजे मी बोलू ना आत्ता? कारण तू दुसर्‍या 'कामगिरी'त गुंतलेला दिसतोएस! तुला डिस्टर्ब होत असेल, तर आपण नंतर बोलू या. फार काही विशेष नाहीये."

तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "तुमी या डब्यात कधी मित्राबित्रासोबत आलेला दिसत नाहीयात?"

मी म्हणालो, "शक्यतो मी या डब्यात येतच नाही."

तो समोर पाहत म्हणाला, "तरीच! अहो, या डब्यात तुमचं लक्ष सगळीकडं असावं लागतंय. ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, मल्टिटाक्सिंग की काय ते, तसं. म्हंजे आजूबाजूलाच बघा आता – सगळे आपापली कामं करतायत, पण त्यांचं एक लक्ष समोरे. तसं."

मी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं की पत्ते खेळणार्‍यांपैकी उभ्या असलेल्यांचं एक लक्ष समोरच्या लेडीज डब्यात कोण येतंय-जातंय याकडे होतं. मध्येच एक जण म्हणाला, "ए, वो देख रानी आयी." आणि मग बसून पत्ते खेळणारे उभे राहून समोर पाहू लागले. मग आधीचा म्हणाला, "एेसी रानी मिली ना, तो मेरी तो रमी लगही जायेगी!" नंतर मला कळलं की ते पाच-पाच मिनिटांनी आलटून-पालटून उभे राहत, बसत होते.

टच्या शेजारी उभा असलेला माणूस मोबाइलवर व्हिडिओ पाहत होता, पण दर काही सेकंदांनी तो समोर पाहत होता. मग पुन्हा मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहत होता. तर त्याच्या शेजारचा माणूस त्याच्या शेजारच्या माणसाशी – कदाचित ते मित्र असावेत – संपूर्ण वेळ शेअर बाजार, कोणाचा भाव पडला, उद्या काय होईल, मोदी सरकारमुळे बाजार कसा वधारलाय असं काय काय बोलत होता. पण बोलताना त्या दोघांचं लक्ष मात्र एकमेकांकडे असण्यापेक्षा समोरच जास्त वेळ होतं.

मी म्हणालो, "हो, पाहिलं. सगळे आपापली कामं करताहेत पण त्यांचं लक्ष समोर आहे."

ट म्हणाला, "बरोबर, तसंच आपनही समोर पात असू तरी तुमचं एेकतोय हे ध्यानात ठेवा आणि बोला काय बोलायचंय ते."

मी म्हणालो, "अरे, विशेष असं काही नाही. हल्ली मराठी कथा सोडा, इंग्रजी साहित्यही फारसं कुणी वाचताना दिसत नाही. वाचलंच, तर सेल्फहेल्प किंवा प्रेरणादायी पुस्तकं वगैरे वाचतात. म्हणून मला कुतूहल होतं की तुला कथांमध्ये रस कसा काय बुवा. आणि प्लीज, मला अहो-जाहो नको करूस. मला नाही आवडत. तसा आपल्या वयातही फार फरक नसावा."

तो समोर पाहत बोलू लागला, "चालेल, चालेल. आपल्यालापन उगाच फॉर्मल राह्यला आवडत नाई. पन कसंय, तुझ्यासारख्या मान्साला माझ्यासारक्यानं एकदम अरे-तुरे केलं तर मग ते आवडत नाई ना. पन आतापास्नं मी तुला अहो-जाहो नाई करणार, ओके."

मी अंगठा दाखवला. पण तो समोर पाहत असल्याने त्याला तो दिसला नसावा.

तो बोलू लागला, "त्याचं कसंय ना लेखक, की मी ऑफिसबॉय म्हनून काम करतो एका प्रेसमध्ये. तिथे एक मॅडम आहे, ती काय काय वाचत असते आणि सांगत असते मला. म्हंजे मला वाचता येतं, पन मी वाचत बसलो तर कामं कोन करनार. लई व्याप असतो. कागदं आणा, मालकाची कामं करा, डिलिवरी द्या. एक ना दोन भानगडी. मला गोश्टी आवडतात म्हनून मॅडम मला त्या सांगते. तुला सांगतो, तुमच्या त्या दिवाळी अंकांचे, पुस्तकांचे फॉर्म छापून झाले की मॅडमकडं येतात. मग मॅडम ते बघतात नीट. ओके द्यायला. नंतर वेळ मिळेल तेव्हा वाचत बसतात. बरेच अंक, पुस्तकं आमच्याकडंच छापतात ना, त्यामुळे माहिती होतं बरंचसं त्यातलं."

मी विचारलं, "तुझ्या बोलण्यावरून तू मुंबईचा वाटत नाहीस."

"बरोबर ओळखलंस तू. ओळखनारच म्हना. लेखक ना तू. मी मूळचा पुन्याकडचा. खडकवासला माहिती असेलच तुला, तितनं बाराएक किलोमीटरवरे माझं गाव - वडपिंपळे. तर आपन बारावी पास झालो नि थेट इथं मामाकडं आलो मुंबैला. आपल्याला पुन्याला नव्हतंच जायचं, मुंबैलाच यायचं होतं आदीपास्नं. बारावी झालो नि आईबापाला सांगितलं, यापुढे आपल्याला शिकनंबिकनं झेपनार नाई. त्यापेक्षा मी कामाला लागतो, मुंबैला जातो. शेतीबितीत लई कष्ट असतात. त्यापेक्षा नोकरीधंदा बरा, म्हनून आलो इथं. सात-आठ वर्षं फुटकळ चाकर्‍या केल्या. मग मामानं मला या प्रेसमध्ये लावलं. आता बाराएक वर्षं झाली बघ इथं कामाला लागून. मालक बराय. जरा कंजूसे. पन चालायचंच. मालकाची जातच ती. ती थोडीच पैसे वाटत फिरणारे."

नंतर त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, पण तो बोलायलाच लागला. कदाचित असं झालं असेल की त्याला जे वाटतं ते एेकून घेणारी व्यक्ती त्याला माझ्यात सापडली असेल. एरवी तो सगळ्यांशीच बोलत असेल, सगळ्यांनाच काहीबाही गोष्टी सांगत असेल; पण त्याला काय वाटतं, त्याच्या आयुष्यात काय झालंय, हे कशाला कोणाला जाणून घ्यावंसं वाटणार? पण मी त्याचं बोलणं नीट एेकतोय, विचारतोय असं वाटून तो जरा सैल झाला असेल. असं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधीतरी होतंच. अशी एखादी व्यक्ती कधी ना कधीतरी अचानक, कुठेही – ट्रेनमध्ये, बसमध्ये, प्रवासात, कार्यक्रमात भेटते आणि मन मोकळं होत जातं.

तो म्हणाला, "तुला सांगतो, गाडीत ग्रुपमदे सगळे आपल्याला चिडवतात लग्न झालं नाई म्हनून. बायकांवरून. म्हनतात, तुला काय माहिती टवड्या 'त्या' गोष्टी, तू तर हातपंप मार्नारा! त्यावर आपन फार काय बोलत नाई. उगाच कशाला तोंड उघडा? पन आता तुला सांगतो, आपनला बी माहितेय काय काय असतं ते, काय काय करतात ते. आपनबी लै मजा मारलीय कॉलेजात असताना. आपलीबी गलफ्रेंड होती बरं का कॉलेजात. आणि... च्यायला काय आयटेम चढलीय बग. सेम सनी!"

"सनी म्हणजे सनी लिओनी का?"

"हो, बग बग लवकर. नायतर आत जाईल."

मी हातानेच 'नको' असं म्हटलं. तो म्हणाला, "हां, तुझं बरोबरे. तुझं लग्न झालंय. मंग त्यामुळं भूक भागत असल तुझी. तू कशाला पाशील समोर. तुझ्यासाठी तर घरी ताट वाढून तयारच असल! आओ और तूट पडो!" असं म्हणून तो जोरजोरात हसू लागला आणि त्याने मला एक टाळीही दिली.

खरंतर, मला त्याला सांगायचं होतं की बाबा रे, नेहमी असं काही नसतं. 'आपल्याला हवंय'पेक्षा, बायकांना हवंय का नकोय, हेपण पाहावं लागतं. किंबहुना तेच महत्त्वाचं असतं बरेचदा. पण उगाच उपदेशाचे डोस पाजणं मला नको होतं. त्यापेक्षा मला त्याच्याकडून त्याने कॉलेजात केलेल्या मजेबद्दल एेकून घ्यायचं होतं. म्हणून मी म्हणालो, "तू मघाशी काहीतरी मजेबद्दल सांगत होतास."

"हां, ते ना", त्याचा चेहरा उजळला आणि मग त्याला काय आठवलं कुणास ठाऊक, पण क्षणात त्या चेहर्‍यावर काळजी दाटली. स्वच्छ निरभ्र आकाशात अचानक कुठूनतरी काळे ढग यावेत तशी. तो म्हणाला, "जाऊ दे ना लेखक. फारच मागच्या गोश्टी झाल्या त्या आता."

मी त्याला बोलतं करायच्या उद्देशाने म्हटलं, "तशा फारही काही मागच्या नाहीत. बरं ठीके, तुला नसेल सांगायचं तर राहू दे."

त्यावर ट म्हणाला, "नाई, सांगायचं नाई असं काय नाई. चल, सांगतो. असंही तू लेखकेस; कुणास ठाऊक, एखादी गोश्ट लिशील त्यावर." त्याने समोर खिळलेली नजर काढून माझ्या डोळ्यात दोनेक क्षणच, पण खोलवर पाहिलं. मग पुन्हा समोर पाहून बोलू लागला, "तर बारावीचा रिझल्ट लागला. मी कसातरी चाळीस टक्के घेऊन पास झालो. तेव्हा आपली एक डाव होती कॉलेजात. डाव म्हणजे गलफ्रेंड. आमच्या शेजारच्याच गावची होती, दिवापाड्याची. पन आमच्या जातीची नवती, वरच्या जातीतली होती. पन तुला तर म्हायतेय, प्रेमाबिमात कसली आलीय जात. अन् तेव्हा तर वय असं होतं की खूळ लागल्यागत झाल्तं. कॉलेजात ती माझ्याकडं पाहून हसायची आणि मीही. एकदा-दोनदाच आमी बोल्लो असू. पन आम्ही कदीकदी चिट्ट्या-चपाट्या पाठवायचो एकमेकाला. ती हसली ना माझ्याकडं पाहून की वाटायचं, ती वाराय आन् मी भाताचं शेते झुलनारं."

"बारावीनंतर मुंबैला येन्याचं आपलं आधीच ठरलेलं होतं. माझं नि त्या डावचं लग्न बापजन्मात होनार नाई, हे तर नक्कीच होतं. समजा झालं असतंच ना, तुला सांगतो, खून पडले असते खून. पन तरी अंगात रग धुमसत होती. म्हन्लं, मुंबैला जान्याआदी तिला एकदातरी भेटायचंच. म्हनून घरी गेलो नि बापाला म्हन्लो, पास झालो आता बाइक पायजे, यामा. तुमी म्हन्ला होतात. आमच्याकडं तेवा तशी फ्याशनच होती. पास झाला किंवा काही झालं, की लगेच यामा घ्यायची. गावात यामा घेनं हे एकदम स्टेटसचं होतं. तर आपन गेलो, आणि कॅश देऊन... बरं का, कॅश देऊन, यामा घेतली. अन् डावला मैत्रिनीकडून चिट्टी पाटवली. खडकवासलाला जाऊ फिरायला. येतेस का म्हनून. शेवटी लिहलं की वाचल्यावर कागद फाडून टाक."

"मला वाटलंतं, लेखक, ती तयार होनार नाई. पन ती तयार झाली, म्हंजे तिलाही आवडायचोच ना आपन. मंग काय, गेलो ना घेऊन तिला खडकवासल्याला. म्हन्लं, आता होईल ते होईल. तिनंही कायतरी खोटंनाटं सांगितलं घरी अन् आली. आपल्यासाठी आली ती. काय मस्त वाटलं लेखक!" तो थोडासा थांबला. मग पुन्हा बोलू लागला, "यामावरनं जाताना असले कचाकचा ब्रेक दाबले ना, मजा आली! रग अजूनच वाढली. वरवरचा टच झाला तरी कानशिलं तापली. ती मांजरीसारखी मऊ असेल असं वाटलं आपनला. मग म्हन्लं तिथं एका लॉजमध्ये जाऊ या, पाहू या दगड मारून. दोन तास भाड्यानं खोल्या मिळतात तिथं असं मित्रानं सांगितलं होतं. अन् तुला सांगतो, दगड बरोबर लागला की! मला तर खरंच वाटेना. पन खरंच ती तयार झाली तिथं यायला. पिसाटल्यागत गेलो खोलीवर नि आपलीच मजा झाली. लय मजा झाली लेखक."

अचानक तो बोलायचा थांबला. का कुणास ठाऊक, पण त्याने त्याची कहाणी मध्येच सोडून दिल्यासारखं वाटलं मला. पुढे काहीतरी महत्त्वाचं होतं, असं वाटत राहिलं.

मी त्याच्याकडं पाहत म्हणालो, "मग? पुढे काय झालं? तिच्या घरच्यांना समजलं का?"

"नाय, तसलं काय झालं नाई. नंतर मग मी इथं मुंबैला आलो ना. घरी समजलं असतं तर वाटच लागली अस्ती. मजा करायला गेलो, अन् आपलीच कायमची मजा झाली. जाऊ दे. सोड तू. बोलू कदीतरी फुरसतमदे."

तो अचानक तुटक झाला. गप्प गप्प झाला. त्या दिवशी मला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा झाला होता तसाच. नुसताच एकटक समोर पाहत राहिला. मी त्याच्याकडे पाहिलं, तर त्याच्या चष्म्यावर ट्रेनमधल्या ट्यूबचा प्रकाश पडून काचा थोड्या दुधी रंगाच्या झाल्या होत्या. पण त्या दुधट रंगाच्या काचेआड असलेल्या डोळ्यांच्या कडा मला जरा ओलावल्यासारख्या वाटल्या. त्याच्या आत काहीतरी हललं असावं. कदाचित मन मोकळं करता येईल अशी व्यक्ती भेटल्याने, त्याने त्याच्या मनात दडून ठेवलेल्या कोणत्यातरी 'प्रोहिबिटेड एरिया'त त्याच्याही नकळत हात घातला असावा आणि अचानक त्याची जाणीव होऊन, तो असा अचानक गप्प बसला असावा, असं मला वाटलं.

मग काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, "लेखक, तुला सांगतो, सगळे मला लग्नावरून, बायकांवरून चिडवतात. पन ते मी हसन्यावारी नेतो. कारन आपनला माहितेय ना, आपन कोन आओत ते. मंग आपन ते हसून सोडून देतो. घ्या मजा लेको. हसा आपल्यावर. घ्या मजा."

थोडा वेळाने समोरच्या भागात एक हिजडा चढला. त्यामुळे ट जरा खुलला. म्हणाला, "लेखक, आपल्याला हे हिजडे लई आवडतात राव, कसले खुल्ले असतात!" मग त्याने मला त्या हिजड्याचं हुबेहूब वर्णन करून सांगितलं. त्याने कसा लो-कट गळा असलेला भडक लाल रंगाचा ड्रेस घातलाय, त्यातून छातीवरच्या 'गल्ल्या' (हा त्याचा शब्द) दिसताहेत, मग त्याने कशी भडक लिपस्टिक लावलीय, ओठांवरचे केस काढल्याने कसं हिरवं आवरण तयार झालंय आणि मुख्य म्हणजे तो सरळ समोर पुरुषांच्या नजरेला नजर भिडवत कसा उभाय, असं सगळं सांगितलं.

तो म्हणाला, "आमच्या इथं एक मुलगाय कॉलनीत. त्याला या असल्यांचा षौके. तो ज्याच्याबरबर जातो ना, तो 'बंदा रुपया' असला चिकनाय. बाईला विसरशील तू!" त्यानंतर तो असंच काय काय सांगत राहिला. मीही शांतपणे एेकून घेत राहिलो. पण त्या दिवशी खडकवासल्याला काय झालं, याची गोष्ट मात्र अर्धवटच राहिली.

नंतर माझी पुरवणी विभागात बदली झाल्याने माझ्या जाण्याच्या वेळा आणखीनच लवकरच्या झाल्या. कारण पुरवण्यांच्या डेडलाइन्स दुपारच्या असायच्या. त्यामुळे माझं 9.23च्या गाडीने जाणं बंद झालं. ट आणि माझी भेट केवळ व्हॉट्सअॅप ग्रुपपुरतीच उरली.

***

आणि आता शेवटचा महत्त्वाचा प्रसंग. क्लायमॅक्स म्हणू यात. इथे मला टने सांगितलेली त्याची खडकवासल्याची गोष्ट आणि माझ्या डोक्यात असलेल्या काही गोष्टींची सरमिसळ करायचीय. आणि या सरमिसळीतून या गोष्टींच्या पलीकडचं काहीतरी सांगायचंय.

बरं ही सरमिसळ अशी करायचीये की टची खरी गोष्ट कुठे संपते आणि मी घडवलेली माझी गोष्ट कुठे सुरू होते, हे समजायला नको. मला आठवतेय, शिखंडीची कथा आणि मग मी घडवलीय त्या कथेच्या आधाराने एक लोककथा. ही लोककथा कोणाच्या तोंडी घालावी? हां, टच्या आजीच्या तोंडी घालू या. जेणेकरून आपोआपच त्या कथेला एक लोककथेचा लहेजा येईल. मला आठवतेय ती गुत्तेवाली मावशी, देशी दारूच्या गुत्त्यांमधलं वातावरण. ट इथेच छान खुलेल, मन मोकळं करेल. म्हणजे आता टला आणि निवेदकाला झक मारत न्यावंच लागणार गुत्त्यात!

डोंबिवली स्टेशनबाहेरचा मयूर बार मला माहीत होता. बरेचदा मी तिथे बसलोही होतो.

शनिवारी संध्याकाळी मी ठरलेल्या वेळी पोचलो. तेव्हा ट आलेला नव्हता. सव्वासात झाले तरी तो येत नाही म्हटल्यावर वेळ घालवायला मी एक सिग्रेट ओढू लागलो. तोच त्याचा व्हॉट्सअॅप आला – pochtoy. koparla. म्हणजे आता पाच-दहा मिनिटांत येईलच.

दहाव्या मिनिटाला तो धापा टाकत माझ्यासमोर उभा राहिला. "लेखक, सॉरी बरं का. बरोब्बर निघायच्या वेळी मालकानं काम सांगितलंन. मालकाची जातच बेकार. जाऊ दे. मला सांग, हा बार चालेल ना तुला? नाई म्हंजे तुला दुसरीकडं कुटं..."

त्याला काय म्हणायचंय ते मला लक्षात आलं. माझ्या 'सामाजिक स्टेटस'चा विचार करता त्याला तो बार जरा 'लो प्रोफाइल' वाटला असावा. पण मी त्याला मोकळेपणाने सांगितलं, "मला काही प्रॉब्लेम नाही. मी कुठेही जाऊन पिऊ शकतो. तू मला एखाद्या गुत्त्यावर नेलंस तरी माझी काही हरकत नाही. उलट मला आवडेलच."

ते ऐकून त्याचा चेहरा खुलला. तो म्हणाला, "तिथं कदीतरी जाऊ नंतर. तू देशीचा शौकीन असशील तर इथं एक मावशीय. लय मस्त असते तिची दारू. जाऊ कदीतरी."

आम्ही आत गेलो. त्यानेच डीएसपीची क्वार्टर मागवली आणि पाणी. मग आम्ही गाडीबद्दल, त्यातल्या लोकांबद्दल, कामाबद्दल असं इकडचं-तिकडचं बोलू लागलो. एक-दोन पेग झाल्यावर त्यानेच विषय काढला, "हां, तर लेखक, आपल्याला एक गोश्ट लिहून दे तू. ज्यानं मुली इम्प्रेस होतील अन् थेट पलंगात शिरतील! तुला म्हन्लो तसं."

मी त्याला शांतपणे म्हणालो, "अरे, पण अशी गोष्ट नाही लिहिता येत रे. म्हणजे त्यासाठी..."

तो म्हणाला, "काय भाव खातो लेखक तू यार. तू इतक्या गोश्टी लिल्याएस की. लोकांना – बायकांना रडवतोस तू. आपनला म्हायतेय. आपल्या प्रेसच्या मॅडमला रडवलं होतं तू, तुला सांगितलंपन होतं मी. तुझ्याकडं ती जादूए. तूच मला मदत करू शकशील. तू तुझ्या दोस्ताला, तेपन लग्न न झालेल्या, हातपंप मारनार्‍या दोस्ताला मदत नाई करनार का यार?" त्याच्यावर हळूहळू दारूचा अंमल चढू लागला होता.

मी त्याला समजावून सांगू लागलो, "बाबा रे, तू म्हणतोएस ते खरंय. माझ्या कथा वाचून पुरुष-बायका रडतात, हेलावतात. मला तशी पत्रं, ईमेलही येतात कधीकधी."

तो माझं बोलणं मध्येच तोडत म्हणाला, "अंहं, आपल्याला पुरुषांशी काहीच देनंघेनं नाहीय. नो मेल. आपन त्यातले नाई. आपल्याला बायका पायजेल."

मी म्हणालो, "पुरुष आणि बाई दोन्ही जाऊ दे तेल लावत. गोष्टीत जादूचा मंत्रबिंत्र नसतो रे. किंवा पूर्वी कसं ते, हा आंबा किंवा चूर्ण त्या मुलीला द्या म्हणजे ती तुम्हाला वश होईल. असल्या ट्रिकाबिका. असलं काहीही नसतं. कथा म्हणजे माणसांच्या भावना, त्यांना काय वाटतं, त्यांचं जग – असं सगळं असतं आणि हो, त्यातल्या नुस्त्याच चांगल्या गोष्टी नाही बरं का, तर वाईट-ओंगळही गोष्टीपण."

"भारी! असं करू, आपल्या गोश्टीचं नावच असं देऊ की त्यानं बायका थेट वश होतील आपनला." आता टवर दारूचा अंमल चांगलाच चढला होता. ते त्याच्या बोलण्यावरून समजत होतं. मी थोडा सावध व्हायचा प्रयत्न केला, पण आता तीन-चार पेग झाल्याने माझंही डोकं हल्लक झालं होतं.

"आपण नाव ठेवू या गोश्टीचं." तो बोलू लागला, "गोश्ट एका दनकट पुरशाची. म्हणजे मग ते वाचताच बायका – त्यातही आंट्या – आपलाच विचार करू लागतील. काय ते तुम्ही लिहता तसं - पीळदार दंड, काळीभोर मिशी आणि सातआठ इंचाचा मोठ्ठा सोटा!" त्याने दात विचकले.

"टवड्या..." मी त्याला हात करून थोडं थांबायला सांगितलं. पण तो सुटला होता. तो म्हणाला, "हे नाव वाचून काई बायका म्हन्तील, व्वा, दनकट पुरुष. नि एक अवंढा घेतील. काई मनातल्या मनात चित्र पातील - एक शेत, शेतातला शेतकरी म्हनजे आपन आणि दुरून पिच्चरमध्ये दाखवतात तसं ती बांधाहून धावत येतेय. हाक मारते. आपन पाहतो, नजरेत आग, अंगात रग. हे मस्तंय. तू सुरुवात कर लिहायला."

त्याच्या बोलण्याने मी थोडा वैतागलो होतो, पण तरी थोडं सबुरीने घेऊन त्याच्याशी आणखी बोलावं असं मी ठरवलं. कुणास ठाऊक, त्याच्याकडून मला एखाद्या कथेचं रेडी मटेरिअलही मिळालं असतं.

मी म्हटलं, "ठीके. लिहेन मी. पण बरेच दिवस आपण भेटलेलो नाहीये. शिवाय आधी गाडीत असताना आपल्यात फार काही बोलणं व्हायचं नाही. तेव्हा मला तुझ्या आयुष्यात काय चाल्लंय, घडलंय याची काहीच माहिती नाहीये. सो, मला तुझ्या आयुष्याबद्दल सांग. म्हणजे मागे एकदा तू सांगितलं होतंस, तसं काहीतरी. गोष्ट लिहायला आणखी काहीतरी लागेल मला."

तो म्हणाला, "हां, हां आलं ध्यानात. काय म्हनता तुम्ही ते, मटरिअल, बरोबर ना? आपनपन लेखकांच्या सहवासात र्‍हातो म्हनलं. परवा आमच्याकडं एक लेखक आल्ते, ते असं काय काय सांगत होते मालकांना. आमच्या मालकांना बायकोसोबत जायचं होतं शॉपिंगला. त्यांना उशीर झालेला पाहून जीव लई सुखावला आपला. आपनला जायचं असेल तर असंच अडवतात मुद्दाम! म्हनूनच तुमची लेखकजात लय आवडते आपल्याला." असं म्हणून त्याने एकदम बिल मागवलं.

मी म्हणालो, "अरे, पण आपण बोलणार."

तो म्हणाला, "बोलू. पन इथं नको. इथं फारच परकं वाटतं. कन्जस्टेड. मावशीच्या गुत्त्यावर जाऊ या. मगाशी तुला म्हन्लो ना, तिथं." त्याने खुशीत येऊन मला डोळा मारला.

मी म्हटलं, "व्वा, चालेल." बिल आलं. पण त्याने मला ते देऊ दिलं नाही. म्हणाला, "थांब तू. मावशीचे पैसे दे तू." मी आनंदाने होकार दिला.

आम्ही ब्रिज ओलांडून डोंबिवली वेस्टला गेलो आणि तिथून रिक्षाने ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या मध्ये असलेल्या थोड्या कमी वस्तीच्या, शेताड भागात जाऊ लागलो. त्या भागाचं नाव होतं, सर्कुर्ली. तिथल्या गणेशनगर एरियात तो गुत्ता होता.

रिक्षातून जाताना त्याने मला एका गुत्तेवाल्या आक्काचीही गोष्ट सांगितली. म्हणाला, "तुला एक गोश्ट सांगतो. खरी. आपल्या आयुष्यात घडलेली. सेक्सी. ली तू. गोश्ट दारूवालीची. पन इथली नाय. गावाकडची. मी तेवा पंध्रा-सोळा वर्षांचा असेन. वयात आलेला खोंड झालेलो. तेव्हा मी दारूचा थेंबपन ओठाला लावायचो नाई. लावला असता तर धुतला अस्ता बापानं. तो मजबूत प्यायचा, पण आपनला म्हनायचा, मी पितो ती माझ्या पैशाची. तू पैशे कमव अन् पी, नायतर कायपन आय घाल."

"तेव्हा आमच्या गावात आक्काचा एक गुत्ता होता. आपन दारू पीत नसलो, तरी हररोज गुत्त्यावर जायचो संध्याकाळी. पोरांसोबत. कारन आपला इंटरेस्ट असायचा आक्काच्या पोरींमदे. तुला सांगतो, आपल्या गांडीच्या दोन वाट्या म्हन्जे त्यांच्या छातीवरचा एक गोळा यड्या! अन् पदर कायम खाली. सताड कॉइनबॉक्स. आपन त्यासाठीच जायचो. आमच्यातला बंटी आगाऊ व्हता, एकदा एका पोरीच्या छातीकडं पात म्हन्ला, दोन फुगे पायजे! ती म्हन्ली, भाड्या, गल्ल्यांमदे लपवलन् ना तुला तर समजनार बी नाय कुटं हरवलास ते! चल फुट्!"

त्याने मला हसत टाळी दिली आणि पुढे बोलू लागला, "लेखक, आपल्याला ना, हे गुत्ते जाम आवडतात. इथं एकदा कोनी दारू प्याला की गरीब-पैसेवाला, वरचा-खालचा, जातपात सारं विसरून जातो आपन. सारे सेम असतात, सारे काहीपन बोलतात, सारे एकाच ग्लासातून पितात, सारे एकच – दारुडे."

दारूच्या अमलाने म्हणा किंवा मी कथा लिहेन असं सांगितल्याने म्हणा, पण आता तो चांगलाच खुलला होता, सैल झाला होता. त्यामुळे मीही खूश झालो. मागे एकदा गाडीत त्याने सांगितलेली ती खडकवासल्याची अर्धवट गोष्ट आज पुन्हा एेकायला मिळणार, असं मला राहून राहून वाटू लागलं. त्यामुळे योग्य वेळ पाहून आपणच तो विषय काढावा, असं मी मनाशी ठरवलं.

रिक्षावाल्याला तो गुत्ता कुठेय ते माहिती होतं. त्याने आम्हांला बरोबर तिथे आणून सोडलं. रेल्वेलाइनला लागून असलेल्या एका ओसाड जागेत, एका खोपट्यात त्या फेमस मावशीचा गुत्ता होता. आम्ही एका कोपर्‍यात लाकडी बाकड्यावर जाऊन बसलो. त्याने ऑर्डर दिली. दारूसोबत मीठलिंबू होतं. त्याने खास तळलेले बोंबील खायला मागवले. शहराबाहेर आल्याने थोडं गार वाटत होतं.

तो म्हणाला, "ही गुत्तेवाली गोश्ट ली."

मी म्हणालो, "लिहेन. पण मला आणखीही एक गोष्ट लिहायला आवडेल."

जणू काही मला काय म्हणायचंय ते त्याला आधीपासून माहीत असल्यागत तो मला म्हणाला, "खडकवासल्याच्या त्या गमतीची ना? साल्या तू तर मागेच पडलास की. उगंच म्हन्लो तुला गोश्ट लिही माझ्यावर." मग तो हसला, पण त्यात कसलातरी जुना सल उघडा पडल्याचा दु:खी भाव असल्यासारखं मला पुन्हा उगाचच वाटलं.

मी म्हणालो, "हे पहा, असं काही नाही. तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. किंवा सांगितलंस आणि म्हणालास की हे तू गोष्टीत लिहायचं नाहीस, तर आईशप्पथ मी ते लिहिणार नाही कधीच."

तो म्हणाला, "अरे, एवढा सिर्यस नको हूस. सांगतो तुला नि असंही आपनच्या आयुष्यावर कोन काय लिणार. आपलं झाटू आयुष्य सालं."

तो आता थोडं बरळत, अडखळत बोलत होता. त्यामुळे मी त्याचा ग्लास मुद्दाम थोडा बाजूला सारून ठेवला आणि विचारलं, "भाऊ, काय झालं त्या दिवशी खडकवासल्याला?"

"हं, सांगतो", मग तो माझ्याकडे पाहत बोलू लागला. पहिल्यांदा त्याने ती गोष्ट सांगताना जसा ओलावा मला त्याच्या डोळ्यांत दिसला होता, अगदी तसाच आजही मला दिसला. पण आज तो थोडा जास्त होता असं वाटलं. वाटलं, जणू तो क्षणाक्षणाने वाढणार होता आणि मग भरून वाहणार होता.

"त्या दिवशी आमी लॉजमध्ये गेलो. कायतरी करायचंच ठरवलं होतं. त्यात पोरगीबी तयार झाल्ती. तसं आपल्याला काय, फक्त मजा मारायची नवती तिच्यासोबत. तिची तयारी असती तर लग्न करायला तयारोतो आपन. पन आधी सांगितलं नं, ते जातीचं झ्येंगाट होतं. आमी पळूनही आलो असतो मुंबैला, तरी आमच्या गावाकडं तिच्या घरच्यांनी आमच्या घरच्यांचे खून पाडले असते खून. खरंच, आईशप्पत खून."

"आता तुला खरं खरं सांगतो. तेव्हा आपन जोशात होतो हे खरंय, रग होती आणि आग होती हेपन खरंय. त्यात तीबी तयार असल्यानं आगीत तेलंच ओतलं गेलं. पन तेव्हा मनात कुटंतरी असंही होतं की कसं वरच्या जातीतल्या मुलीला गटवली आपन. अन् लॉजवरपन आली. अभिमान वाटत होता स्वताचा."

पुढे काही सांगण्याआधी तो थांबला. बाजूला सारलेल्या ग्लासातला एक घोट त्याने घेतला आणि बोलू लागला, "आमी लॉजवर गेल्यावर ती काय म्हन्ली म्हायतेय. तुला सांगितलं नवतं. म्हन्ली, किसबिस करायचा नाय, नि कंडोम घालायचा. अंगाला अंग नको लागायला!"

त्याचे डोळे लाल झाले होते, भरून आले होते, ते कुठल्याही क्षणी वाहू लागतील असं वाटत होतं. "असंही आपन कंडोम तर टाकनारच होतो रे. आन्लापन होता मित्रानकडून. सालीला मजा हवी आपनकडून. पन अंगाला अंग नकोतं लागायला. जात होती मनात. आपला टच नको होता. तुला सांगतो, असं वाटलं ना तेवा की मारून टाकावं तिला. पन मग वाटलं, च्यामारी, ती जसा विचार करत होती तसाच आपनबी तर करत होतोच की जातीचा. फरक एवडाच की आपन मनात ठेवला, तिच्या ओठात आला. तडक तिला घेऊन परतलो आणि दुसर्‍या दिवशी मुंबै गाठली. अशी होती आमची 'मजा' लेखका, अशी होती मजा. टची टचची मजा!" असं म्हणून त्याने मान खाली घातली.

मी विचारलं, "पण म्हणून त्यानंतर तू लग्न नाही केलंस? म्हणजे तुला तुझ्या जातीतल्या मुली मिळाल्या असत्या की नंतर."

त्याने वर पाहिलं. तो ओरडलाच, "कॉन्फिडन्सच गेला यार नंतर. ते तुमचं काय असतं ना मानसिक-बिनसिक तसं झालं. तुला सांगतो, कुनाला सांगू नकोस ग्रुपमदे. नायतर जाऊ दे, सांग – त्यानंतर उटनंच बंद झालं रे आपलं. आपल्या आतलं मेलंच काहीतरी. मी त्या हिजड्यासारखा झालो, त्या दिवशी गाडीत आल्ता ना तसा. उटत नाही म्हनून मंग मी पोरींकडं जास्त जास्त पाहू लागलो, मुद्दाम त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलू लागलो, सेक्सी जोकबिक मारू लागलो, आपल्या आत मेलेलं झाकन्यासाठी, जे मेलंय ते कसं जिवंतय हे जास्त जास्त दाखवन्यासाठी. त्या हिजड्यानं कसा मेकअप केल्ता अन् ड्रेस घात्ला होता; तसंच आपलं ते जोकबिक मारनं, सेक्सचं बोलनं. पन तो आत-बाहेर असलं करत नाई रे. खुल्ला राहतो, खुल्ला दाखवतो गल्ल्या. खुल्ला करतो त्याला पायजेल ते. पन मी! बाएर दाखवतो - बगा, बगा कसा रग असलेला पुरुषे मी बगा. पुरुष,. हाच्यायला. हड्! आतून हिजडाय मी, हिजडा!"

त्याने एका घोटात ग्लासातली सगळी दारू संपवली. मग परत बोलू लागला, "तुला एक गोष्ट सांगतो लेखक. आजी कायम सांगायची ही गोश्ट. शिखंडीची. शिखंडी आदी बाई होती. म्हन्जे पांचाल राजाला झालेली मुलगी, शिखंडिनी. पन तिला आदीच्या जन्मात म्हंजे ती अंबा असताना भीश्मानं आपल्या भावांसाटी उचलून आनलं नि भावांनी नकार दिला तेवा भीश्मानंपन तिला नाकारलं. तिला ते लई लागलं. त्याचा लई त्रास झाला नि तिने तप केला. कारन तिला भीश्माचा बदला घ्यायचा होता. तिनं देवाला प्रसन्न केलं नि देवानं तिला बाप्याचा, पुरशाचा अवतार दिला. ती शिखंडी झाली. देवानं पांचाल राजालाही सांगितलं की हिला पुरुश म्हनूनच वाढवा. योद्दा करा. हत्यारं शिकवा. सारे विसरूनच गेले की ती पुरशासारकी असली तरी बाईचे. तुला सांगतो, लग्न जाल्याच्या रात्री तिच्या बायकोला समजलं ना, हा वरून पुरुष असला, तरी आतून बाईचे. बायको तिला खूप बोलली. अपमान केला. अन् मग शिखंडी गेला निघून घरातून. दूरवर. वाटेवर त्याला भेटला एक यक्श. त्यानं यक्शाला आपलं दुक्ख सांगितलंन् अन् यक्शानं लगेचच त्याला बाप्या केलं. त्याचं बाईपन आपल्याकडं घेतलं. ही झाली अर्धी गोश्ट. तुला, सार्‍यांना माहीत असलेली."

त्याचा गळा दाटून आला होता, तरी तो बोलत होता, "अता तुला पुढची गोश्ट सांगतो. तुला ती कुटंच नाई मिल्नार एेकायला, वाचायला. ती माझ्या आजीला, तिच्या आजीला, तिच्या आजीलाच ठाऊके बग. तिनं आमाला सांगितली अन् आता आपन तुला सांगतोय. तर महाभारतात शिखंडीला सोबत घेऊन अर्जुनानं भीष्माला मारलं. पन अश्या कपटानं मारल्यानं शिखंडीला शाप दिला गेला की एका वरच्या दरजाच्या योद्द्याला असं मारल्यानं यापुढं तुला नि तुझ्या मुलांना कायमच मानसांत खालचं स्थान मिळेल. अन् आजी म्हनायची, ती मुलं म्हन्जे आपन. आपन त्यांचे वंशजोत. म्हनून असे खालच्या जातीतले. तवापास्नं हा कायमचा शाप आमच्या माथी लागलाय, कोरला गेलाय. आजी कायम सांगायची, 'पोरा, हे तवापास्नं चाल्लंय. म्हाभारतात काय कपटं कमी केली होय लोकांनी? नि त्या बीश्मानं तिचा अपमान केला तवा? तरीबी त्या शिखंडीच्या भाळी आला शाप. अन् असे भोग आले आपल्या नशिबी. हे तवापास्नंच चालत आलंय.'"

टने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, "लेखक, आपल्याला माहितेय; आपल्याला किंवा माझ्यासारक्यान्ना तो यक्शबिक्श भेटनार नाय कदी, अन् कदी उशापबिशापपन नाई येनार नशिबात, पन तरी आपल्यासारक्या खच्ची झालेल्यांची... नाई खच्ची केलं गेलेल्यांची गोश्ट तू लिही. तू लिहीच गोश्ट टची."

शर्टातून माझ्या खांद्याला ओलसरपणा जाणवू लागला. पण मी तसाच बसून राहिलो.

माझी टची गोष्ट लिहून झालीय. पण तरी मी अजूनही अस्वस्थ आहे. यातली टची गोष्ट कुठली आणि माझ्या कल्पनाशक्तीची भर कुठली? पण तसं म्हणायला गेलं तर खरं काय नि खोटं काय, हे शोधण्यात काय हशील? त्याचा काय फायदा? कारण टच्या गोष्टीनेच बेमालूमपणे आपल्या अंगावर माझ्या कल्पनाशक्तीचा पेहराव चढवून घेतला असेल, तर त्याला मी कोण विरोध करणार आणि का करावा? पण तरी... तरी मला टला यक्ष भेटवायचाय. पण कोणत्यातरी प्रचंड हातांनी मला दाबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. लोक या हातांना 'वास्तव' असं म्हणतात. या दबावाने मला टाइप करता येत नाहीये, माझी विचारशक्ती खुंटून गेलीये. मला यक्ष तर सापडलाय, पण मला यक्षाची आणि टची भेट घडवता येत नाहीये. मी काय करू? मी अस्वस्थ झालोय. मी थांबून राहायला तयार आहे शेवटच्या मानवप्राण्याला मुक्ती मिळेस्तोवर स्वर्गाच्या दारावर थांबलेल्या त्या बुद्धासारखा. मी थांबायला तयार आहे, पण एकच प्रश्न मला टोचत राहतोय – अजून किती वर्षं वाट पाहावी लागेल?

***

लेखकाचा इ-पत्ता : sakhadeopranav@gmail.com
चित्रस्रोत : जालावरून साभार

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रडवलत हो. खूप रडवलत. कमाल कथा आहे.
___
घरात उत्सवी वातावरण आहे. सकाळीसकाळी गप्पा मारत बसलो आहोत. मुलीने टी व्हीवरती जोरात गाणी लावली आहेत. आणि मला अश्रू थोपवत नाहीयेत.
___
असं ही होतं का एखाद्याचं Sad
त्या मुलीने तरी प्रेमाशिवाय संबंध ठेवायचाच कशाला Sad

सिरियसली?

ओ लोमस तुम्ही वाचली का गोष्ट? यात सिरीअसली म्हणण्याचे कारण????

माफ करा, मला तुमच्या वरील प्रतिसादाचा रोख उपरोधिक ( गोष्ट वाचली म्हणूनच ) वाटला. म्हणून खात्री केली.

नाही अज्जिबातच उपरोधिक नही. अत्यंत दुर्दैवी घटना वाटली मला. कथा इतकी सुंदर फुलवली आहे. खरच मन विषण्ण झालं. स्त्रियांना कदाचित कामाचे ठिकाणी वगैरे स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागत असेल पण पुरुषांनाही जीवनाच्या काही विभागांत स्वतःला सिद्ध करावे लागतेच. त्यात जर असा वर्मी घाव बसला असेल आणि एखादी भावुक व्यक्ती उन्मळून पडली असेल तर :(. अशा व्यक्ती असू शकतील हे वाचून फार वाईट वाटले.
.
जे न देखे रवि ते देखे लेखक-कवि.

शेवट अपेक्षित होता. फक्त एकच शंका:
त्या मुलीने कंडोम वापरायला सांगितला, स्पर्श नको म्हणाली, त्याचा काही दुसराही विचार तिच्या मनांत असेल. गर्भधारणा, काही रोग होऊ नयेत, असा सेफ दृष्टिकोनही असेल. निव्वळ जातीमुळेच असेल हे कशावरुन नक्की म्हणता येईल?
'टची' गोष्टीच्या दृष्टीने मात्र तेच अनुकूल आहे.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

कथा मस्त आवडली, छानच लिहिले आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

भारी गोष्ट. जबरदस्त लिहिलं आहे.

एक टेक्निकल शंका: "स्पर्श" नको म्हणजे लिंगाचा डायरेक्ट स्पर्श नको, बरोबर? कारण आख्ख्या होल शरीराचा कोणताच स्पर्श होऊ ना देता सेक्स करणं कसं शक्य आहे?

*********
आलं का आलं आलं?

@तिमा आणि आबा - अहो काल्पनिक गोष्ट आहे. लेखकाला जातीव्यवस्थाच सूचित करायची आहे. कदाचित वाक्यरचना तोकडी पडली असेल. त्या मुलीने एकंदर जातपात मनात ठेऊन फक्त संग केला आणि तो अतिशय मानहानी कारक, वाईट रीतीने लागला असे म्हणावयाचे आहे.

कथेचे काही तुकडे फार आवडलेत.उदा. हा संवाद फारच प्रत्ययकारकतेने दिलेला आहे. अगदी वास्तववादी असे लोक आढळतात आपल्या आसपास. जे मुळात त्यांच्यात नाही ते दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे.

तुला सांगतो, कुनाला सांगू नकोस ग्रुपमदे. नायतर जाऊ दे, सांग – त्यानंतर उटनंच बंद झालं रे आपलं. आपल्या आतलं मेलंच काहीतरी. मी त्या हिजड्यासारखा झालो, त्या दिवशी गाडीत आल्ता ना तसा. उटत नाही म्हनून मंग मी पोरींकडं जास्त जास्त पाहू लागलो, मुद्दाम त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलू लागलो, सेक्सी जोकबिक मारू लागलो, आपल्या आत मेलेलं झाकन्यासाठी, जे मेलंय ते कसं जिवंतय हे जास्त जास्त दाखवन्यासाठी. त्या हिजड्यानं कसा मेकअप केल्ता अन् ड्रेस घात्ला होता; तसंच आपलं ते जोकबिक मारनं, सेक्सचं बोलनं. पन तो आत-बाहेर असलं करत नाई रे. खुल्ला राहतो, खुल्ला दाखवतो गल्ल्या. खुल्ला करतो त्याला पायजेल ते. पन मी! बाएर दाखवतो - बगा, बगा कसा रग असलेला पुरुषे मी बगा. पुरुष,. हाच्यायला. हड्! आतून हिजडाय मी, हिजडा!"

बाकी कथा काही चांगले तुकडे वगळता व वेगळा विषय सोडुन
१- अत्यंत पसरट लांबट रटाळ झालेली आहे.
२- फार मोठा भाग फारच अनावश्यक घुसडलेला वाटतो. ही कथा मला एडिट कर मला एडिट कर माझे केस काप असे
तारस्वरात बोलतेय असे वाटते.
३- लेखक/निवेदेक कींवा जो काय आहे ते कथेत सारखा सारखा घुसतो आणि ताप देतो.
अस ५०-५० वाटत बघा कथा वाचल्यावर.

A Performance artist stood still for 6 hours to let people do what they wanted with her body. What happened next ?
https://www.elitereaders.com/performance-artist-marina-abramovic-social-...

बाकी कथा काही चांगले तुकडे वगळता व वेगळा विषय सोडुन
१- अत्यंत पसरट लांबट रटाळ झालेली आहे.
२- फार मोठा भाग फारच अनावश्यक घुसडलेला वाटतो. ही कथा मला एडिट कर मला एडिट कर माझे केस काप असे
तारस्वरात बोलतेय असे वाटते.
३- लेखक/निवेदेक कींवा जो काय आहे ते कथेत सारखा सारखा घुसतो आणि ताप देतो.

एक्झॅक्टली हेच लिहायला आलो होतो. परिच्छेदांमागे परिच्छेद वाचकाला 'आत्ता न, असं झालं' असं समजावून देण्यात घालवलेले आहेत. इतकं चमच्याने भरवत शेवटी नीटनेटका सारांश काढून देणं कंटाळवाणं होतं.

निवेदकापलिकडे लेखक हे पात्र घालण्याची गरज कळली नाही. लेखकाचं विश्व आणि निवेदकाचं कथेतलं विश्व जर वेगळं, एकमेकांना छेद देणारं असेल तर त्यातून काहीतरी साधलं जातं. इथे लेखक केवळ 'कथा रचावी कशी' यावर उपदेश करताना दिसतो. शाम मनोहरांनी 'खेकसत म्हणणे आय लव्ह यू'मध्ये असा प्रभावी प्रयोग केलेला होता. पण इथे तो पूर्णपणे अनावश्यक आणि रसभंग करणारा ठरतो.

एक्झॅक्टली हेच लिहायला आलो होतो. परिच्छेदांमागे परिच्छेद वाचकाला 'आत्ता न, असं झालं' असं समजावून देण्यात घालवलेले आहेत. इतकं चमच्याने भरवत शेवटी नीटनेटका सारांश काढून देणं कंटाळवाणं होतं.

संपादकमंडळ झोपा काढत होते काय?

बोले तो, 'ऐसी'वरील नेहमीच्या लेखांत (नि प्रतिसादांत) संपादन न करण्याचे धोरण समजू शकतो, परंतु एकदा का (कसलाही) 'विशेषांक' काढायचा म्हटले, तर मग गेला बाजार दर्जाच्या दृष्टीने अंकात काय ठेवायचे नि काय वगळायचे (अगदी आमंत्रित लेखन असले तरीसुद्धा) याचा विधीनिषेध बाळगायला नको? नि त्या दृष्टीने संपादन करायला नको?

एखादी गोष्ट वगळण्याची शक्ती हाती असताना ती अंतर्भूत तर करायची, नि मग तिच्यावर टीका करायची, यास काय मतलब आहे? (वाचकांनी / सामान्य सदस्यांनी टीका केली, तर गोष्ट वेगळी. त्यांना संपादनाचा अधिकार नसतो.)

आणि, आमंत्रित लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले, तरीसुद्धा लेखकाची गोष्ट (दर्जेदार नाही हे लक्षात येत असूनसुद्धा) अंतर्भूत करायची, नि मग त्यावर जाहीर टीकासुद्धा करायची, की बाबा (आम्ही तुझी कथा छापली खरी, पण - हे अध्याहृत) ती अप टू द मार्क नाहीये, म्हणून (आणि वर त्या लेखकाला वाचकांच्या रिडिक्यूलला एक्सपोज़ करायचे), हे त्या लेखकासाठीसुद्धा अन्याय्य नव्हे काय? त्यापेक्षा ती गोष्ट नाकारून सरळ त्यास स्पष्ट सांगणे की बाबा आम्ही तुझ्याकडून गोष्ट मागविली खरी, परंतु ती आम्हांस फॉर व्हॉटेवर रीझन छापण्यायोग्य वाटली नाही, तेव्हा प्लीज़ एक्सक्यूज़ - हे त्या आमंत्रित लेखकाकरितासुद्धा फेअर - आणि इष्ट - नव्हे काय?

पण असो, चालायचेच!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

पन आमच्या जातीची नवती, वरच्या जातीतली होती.

'वरच्या जातीतली' म्हणजे नेमक्या कोणत्या जातीतली? भट? सारस्वत? सीकेपी? शहाण्णवकुळी? की अन्य कोणी? (गुलदस्तातील तपशिलाबद्दल कुतूहल आहे.)

पन तेव्हा मनात कुटंतरी असंही होतं की कसं वरच्या जातीतल्या मुलीला गटवली आपन. अन् लॉजवरपन आली. अभिमान वाटत होता स्वताचा.

हे मात्र रोचक.

(आमचे व्हर्डिक्ट: सर्व्हड हिम रैट्ट! (इर्रेस्पेक्टिव ऑफ व्हेदर ती भट - पक्षी: 'आमच्यातली' - होती, की सारस्वत/सीकेपी/शहाण्णवकुळी/अन्य कोणी - पक्षी: 'इतर उच्चजातीयांपैकी' - होती.))
..........

(थोडक्यात, या कथेत जर काही पॉर्न असलेच, तर ते जात-पॉर्न आहे.)
..........

फूड-पॉर्नच्या धर्तीवर.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

नबा,

(१) "सर्व्हड हिम रैट्ट" याचा अर्थ त्याला जी शिक्षा मिळाली ती योग्य होती => त्याने काहीतरी गुन्हा केला होता.
(२) मग हा गुन्हा कोणता होता? वरील जातीच्या मुलीला गटवण्याचा? अधोरेखीत वाक्यावरुन तरी तसेच वाटते. => खालच्या जातीतील मुलाने वरच्या जातीतील मुलीस पटवणे हा गुन्हा आहे.
- हे इम्प्लिकेशन जातीवाचक, भेदभाववाचक होत नैय्ये का?
(३) तुम्ही म्हणाल नाही त्याने फक्त वरच्या जातीतील मुलगी गटवण्याकरता सव्यापसव्य केला जे की चूक आहे. तर तसे वाटत नाही. त्या मुलाचे तिच्यावरती मन आलेले होते ही पार्श्वभूमी पुरेशी स्पष्ट आहे.

आपण वरच्या जातीतल्या मुलीला पटवलं म्हणजे आपण कोणीतरी थोर असं त्याला वाटत होतं. 'आपण थोर' ही भावना जेवढी जास्त असेल तेवढा तिच्या नकाराचा अधिक त्रास होईल. त्यामुळे 'सर्व्ह्‌ड हिम राईट'पेक्षाही स्वतःवर ओढवून घेतलं असं मला वाटतं.

संपादनाची आवश्यकता वाटली तरीही कथा अंकात असणं अस्थानी वाटत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरुवातीची माझी प्रतिक्रिया फारशी उत्साहाची नव्हती. ही कथा बोलत होती वरवरच्या लैंगिकतेबद्दल. पण तिचा अंत:प्रवाह वंचितांच्या आवाजाबद्दल आहे. मी ती या अंकाच्या चौकटीत कुठे बसवू, असा प्रश्न मला पडला होता. पण कुठल्यातरी एका वाचनात 'ट'चा अचकटविचकट बोलतानाचा सूर मला ऐकू आला आणि त्याची ही पॉर्नोग्राफिक भाषिक अभिव्यक्ती मला इंट्रेष्टिंग वाटायला लागली.

या अंकात कुठेही शिवराळपणाबद्दल वा अचकटविचकट लैंगिक बोलण्याबद्दल वा नॉनव्हेज जोक्सच्या एका भूमिगत संस्कृतीबद्दल काहीही आलेलं नाही. ('पु पु पिठाची' फारच नंतर मिळाली.) माझ्या दृष्टीनं ते आवश्यक होतं. अशा प्रकारची भाषिक अभिव्यक्ती एका दडपणाला छुपा विरोध म्हणून येते, तिचं स्वतःचं असं एक अवतारकार्य असतं, वाफ दवडण्याचं काम ती चोख करत असते, हे माझं मत.

त्या प्रकारच्या अभिव्यक्तीमागचं एक टिपिकल भारतीय कारण ही कथा नोंदवत होती. लैंगिक प्रेरणांचं दमन याही प्रकारे आणि याही कारणांनी होत असतं, हे सांगत होती. हा धागा दिसल्यावर मला ती अधिकच आवडली.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या कथेतला "ट" आणि शं.ना.नवरे यांच्या "दिवसेंदिवस" कादंबरीतले "धारेश्वर" दोघांचीही सेम टू सेम स्टोरी आहे. कथानकही तेच आहे. त्यात 1975 आणि इकडे 2015मध्ये कथा घडते एवढा एकच बदल आहे.

जयंत जोपळे