मिलिन्द पद्‌की यांच्या कविता

मुखपृष्ठाविषयी.

मिलिन्द पदकी यांच्या कविता

- मिलिन्द

१. अमेरिकन पार्टीमध्ये भारतीय बाला

अमेरिकन पार्टीमध्ये भारतीय बाला
वाईन थोडी चढली, चंद्र धुंद झाला
पलीकडच्या कोपऱ्यामधला रुंद छातीवाला
सूट बूट दाढीदीक्षित गोरा नजरी आला!
"कोण ग तो?" विचारे ती प्रिय मैत्रिणीला ,
"मार्केटिंगचा नवा व्हीपी , कालच रुजू झाला,
'येल'मधला एमबीए, गोल्ड मेडलवाला
'मार्क' असे नाव त्याचे , बॉस्टनवरून आला.
लाल लाल असे त्याची नवी लोम्बार्घिनी,
हातामधले घड्याळ जणू आय-पॅड मिनी ,
भले थोरले 'डील' दिले, पर्क्स आणि मनी ,
आणि नसे गर्लफ्रेंड , गोरी किंवा चिनी"

अमेरिकन पार्टीमध्ये भारतीय बाला
बायोडेटा ऐकून चंद्र महाधुंद झाला,
"आता कमाल बघ माझी" म्हणे मैत्रिणीला
वरची दोन बटणे सोडी, शर्ट ढिला झाला.
हळूहळू सरकू लागे ती त्याच्या दिशेला,
दोन-तीन पाय, अंगठे शिव्या देती तिला,
तीन-चार वाईन पेले धक्का खाऊन पडले,
सगळे मेले दारूवाले वाटेमध्ये नडले!
अखेर जेव्हा पोचली ती आपल्या 'मार्क'वरती,
धुंद होता चंद्र तिचा , धुंद होती धरती,
"हाय मार्क, आय एम लीना !" हात पुढे केला,
"ओ हलो !" मार्क म्हणे " 'मार्क' म्हणती मला!"
"काय करता तुम्ही, कुठे आहे तुमचे गाव,
हा माझा जोडीदार, क्लार्क त्याचे नाव,
नुकतेच केले लग्न आम्ही, नव्या कायद्याखाली.
कमाल आहे, अचानक ही निघूनच का गेली?"

नव्या नव्या स्वर्गांमध्ये नव्या शोकांतिका,
तळ्यामधून 'बदक' म्हणे "दूर राहून बघा"!

(इथे पूर्वप्रकाशित)

***

२. रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका

रात्र कापीत बाहेर पडलो नव्या पहाटेकडे
कळंबोली नाक्यापाशी ट्रक आमचा अडे
वडा पाव, अंडा बुर्जी आधी खाऊन टाका
आणि मग भागवू चला बाकीच्याही भुका!
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!
शादीसाठी केव्हापन आपन तयार हुतो
टरक डायव्हरला पन पोरगी कोन देतो?
बाप म्हणे तिचा "साला बाईकडे जातो!
आणि मग भxवीच्यांना एड्ससुद्धा होतो."

आमची साली जिंदगी, रस्ता घाटामधला
जालीम रात्र सरत नाही, ट्रक पुढे ढकला
आमचीपण एक दिवस उपरवाला मारेल
एका रात्री मादरxद एड्स आम्हां गाठेल!
नवे युग, नवा यज्ञ, आहुती देऊन टाका
उद्या असेल एड्स, पण आज टाळू फाका
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!

(इथे पूर्वप्रकाशित)
***

३. एक्स्पर्ट केसाळ मनगट!

तो जेव्हा कांदा बारीक चिरतो,
योग्य आकाराची कढई निवडतो,
कांदा मोतिया रंगाचा होईपर्यंत परततो
एक्स्पर्ट,कामोत्तेजक मनगट!
वेगाने हलणारा कर्तबगार झारा
चिरलेली भाजी तो कढईत हलकेच टाकतो,
त्याच्या अंगातून झिरपत असतात
मोहक मायेचे कण.
ती मोहित होऊन पाहत
राहते त्याच्याकडे,
आणि मीठ जास्त पडलेली भाजी
कविता म्हणून खाते.

(इथे पूर्वप्रकाशित)
***

४. शेवंती

मुंबईची, रात्रीची चिकट, उष्ण हवा.
हवेत भरून राहिलेली मदन-विव्हलता ,
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून मला पलीकडच्या अंगणात
शेवंतीची पोती ट्रकने आणून टाकलेली दिसत होती
त्यांवर पोत्यासारख्याच
पहुडल्या होत्या कामकरी बायका : मरणाचा शीण.
सकाळी पाचला परत उठायची तयारी.
त्यांच्या भोवती फिरत होत्या काळ्या सावल्या
त्यांच्या यारांच्या : मधेच वाकून एखादा गडी
बाईच्या पायाला हात लावी
ती दमलेली बाई चिडून उसळून लाथ झाडे,
- गड्याच्या थोबाडीत बसे. सर्व हसत.
त्यांतलीच एक तरणीताठी उठून आपल्या जाराबरोबर
पलीकडच्या गुदामात गायब झाली तासभर.
परत आली तेव्हा मैत्रिणींनी तिची अफाट चेष्टा केली.
तीही हसून कूस बदलत होती बराच वेळ .
सकाळी पलीकडच्या देवळाबाहेर ती शेवंतीच्या फुलांच्या ढिगाऱ्यामागे
मोठ्ठे कुंकू लावून,
डोक्यावरून पदर घेऊन बसलेली दिसली सोज्ज्वळपणे .
विक्री जोरात चालली होती.
आरतीची वेळ झाली होती,
लाउडस्पीकर ओरडत होता
भक्तांची भली मोठी रांग वारंवार घड्याळाकडे बघत होती,
कामाला उशीर होण्याच्या काळजीत.
***

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

१,२,४ - आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महामिश्किल कविता. त्यातली यमकं आणि अंगभूत नाद भा-री आहे! या कवितांचे आशय अर्थातच आधुनिक आहेत. पण शैली नि भाषाही जुन्या वळणाची असल्यामुळे निराळीच खुमारी येते. 'अजून काय लिहिताय तुम्ही? ल़क्ष्य ठेवाला पायजे...' असं वाटायला लावतात या कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन