१५ व्या गिरिमित्र संमेलनात महिला गिर्यारोहकांचा सन्मान

नमस्कार,

महाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष ! संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार असून ते यंदा एका नव्या स्वरुपात साजरे होणार आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे - 'गिर्यारोहण आणि महिला'.

गिर्यारोहणात सुरुवातीच्या टप्प्यात महिलांची संख्या मर्यादित होती, पण आज प्रस्तरारोहण आणि हिमशिखरांवरील आरोहणात देखील महिला हिरिरीने सहभागी होताना दिसतात. या प्रवासातील, वेगळी वाट धरणा-या स्थानिक तसेच जागतिक स्तरावर आपल्या कार्याची मोहोर उमटवणा-या गिर्यारोहक महिलांच्या कार्याचा आढावा आणि सन्मान संमेलनात होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे आयोजन देखील प्रामुख्याने महिला गिर्यारोहकच करत आहेत.

देशात महिला गिर्यारोहणाचा पाया ज्यांनी रचला त्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. तर संमेलनाच्या उद्घाटक असतील एव्हरेस्टवर दोन वेळा आरोहण करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव. पोलीस दलात आपल्या कार्यकर्तुत्त्वाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाºया ठाणे पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. रश्मी कंरदीकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अंशु जामसेनपा, सुमन कुटीयाल आणि मालवथ पूर्णा या तिनही एव्हरेस्टवीर महिला विशेष अतिथी असतील. आजवर तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलेल्या अंशु जामसेनपा यांनी त्यापैकी दोन आरोहणं तर एकाच मोसमात, केवळ दहा दिवसांच्या कालावधीत केली आहेत. पूर्णा मालवथ हीने वयाच्या तेराव्या वर्षीच एव्हरेस्टवर आरोहण करुन सर्वात कमी वयात एव्हरेस्टवीर होण्याचा विक्रम केला आहे. या सर्वांची संमेलनातील उपस्थित महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राच्या अनुषंगाने नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

पाहुण्या गिर्यारोहकांच्या मोहिमांचे अनुभव हे त्यांच्या सादरीकरणातून, तसेच थेट संवादातून उलगडणार आहेत. पण त्याचबरोबर राज्य आणि देशपातळीवरील महिलांच्या गिर्यारोहण कर्तुत्त्वाचा आढवा देखील आपण घेणार आहोत. महाराष्ट्रात या खेळाचा विकास झाला तो संस्थांच्या पातळीवर. ९० च्या दशकातील अनेक संस्थांमधील महिला आजदेखील कार्यरत आहेत. केवळ एव्हरेस्टचा ध्यास न घेता गेली तीसचाळीस वर्षे या महिलांचं संस्थात्मक योगदान महत्त्वाचं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा संमेलनात घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने महिलांचा गिर्यारोहणातील सहभाग, त्यांची वाटचाल आणि सद्यास्थिती असा सर्वांगीण आढावा घेतला जाईल. एकूणच आजच्या काळातील महिलांचा या क्रिडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि भविष्यातील वाटचालींवर यानिमित्ताने प्रकाश तर टाकता येईलच, पण त्याचबरोबर या विषयाचे दस्तावेजीकरणदेखील त्यातून घडणार आहे. दिनांक ९ व १० जुलै रोजी होणाऱ्या या दिड दिवसाच्या कार्यक्रमात महिला गिर्यारोहकांच्या अनुभवाचा आनंद दृकश्राव्य सादरीकरणातून मिळणार आहेच, पण त्यांच्याशी खुला संवाददेखील साधता येईल.

कार्यक्रमाची सर्वसाधारण रुपरेषा

दिनांक ०९ जुलै २०१६ - सायं ५.०० ते रात्रौ ९.०० वा

  • दृक्श्राव्य सादरीकरणीतील निवडक सादरीकरणे
  • महिला गिर्यारोहकांशी संवाद व त्यांच्या विक्रमी मोहिमांचे सादरीकरण

दिनांक १० जुलै २०१६ - सकाळी ९.०० ते सायं ६.०० वा

  • गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा
  • महिला आणि गिर्यारोहण विशेष सादरीकरण
  • मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रम
  • दृक्श्राव्य सादरीकरणातील पारितोषकप्राप्त सादरीकरणे
  • प्रश्न मंजूषा
  • अभ्यासपूर्ण दृकश्राव्य सादरीकरण
  • छायाचित्र स्पर्धा निवडक कलाकृती प्रदर्शन
  • ट्रेकर्स ब्लॉगर्स, छायाचित्रण, पोस्टर स्पर्धा पारितोषक वितरण

संमेलन प्रवेशिका देणगी मुल्य रु.६००/- फक्त (दि.९जुलै चहा, भोजन व दि.१०जुलै चहा, नाष्टा, भोजन)

संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलनस्थळी केवळ ५०० डोंगरभटक्यांना सामावून घेऊ शकतो. संमेलन प्रवेशिका वितरणात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. यावर्षीपासून आपण प्रथमच ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका वितरीत करत आहोत. त्याची सुविधा आणि माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

अथवा आपण संमेलन प्रवेशिका 'महाराष्ट्र सेवा संघा'च्या कार्यालयातून मिळवू शकता.
पत्ता : जवाहरलाल नेहरू मार्ग अपना बाजारच्यावर मुलुंड (प) मुंबई ४०० ०८०
वेळ : सोम ते बुध, शुक्र ते शनि - स.१०.३० ते सायं ७.३० वा, रवि-स. १०.३० ते दु. १२.३० वा
दूरध्वनी :०२२ -२५६८ १६३१

नोंदणी अधिक माहितीकरिता संपर्क: नयना आगरकर-९१६७७ ०२००५, गुंजन चौगुले-९९६९१ ८८९६६

याव्यतिरिक्त छायाचित्रण, पोस्टर, ट्रेकर्स ब्लॉग, दृक- श्राव्य सादरीकरण या स्पर्धाही घोषित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांची सविस्तर माहिती girimitra.org या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

बातमी प्रसिद्धी सम्पर्कः-
स्वप्नाली धाबुगडे ९८२०७ ८९७४९
सुहास जोशी - ९८३३० ६८१४०