पुरोगाम्यांचा भयाण इतिहास

इस्लामबाबत पुरोगामी बोटचेपी भूमिका घेतात हा गंभीर आरोप असून त्यात तथ्य आहे असे आमचे मत होतेच. पण आता त्यात केवळ तथ्य नसून भयानक, दिल को दहला देनेवाल्या स्वरूपाचे तथ्य आहे याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका नाही. हे प्रकरण वाटते तितके साधे सरळ नाही. अमेरिकेवरील हल्ल्यापूर्वी ओसामा बिन लादेन स्वतः पुण्यात येऊन गेल्याचे पुरावे अलिकडेच आढळले आहेत. इस्लामचे लांगूलचालन करणाऱ्या पुरोगाम्यांच्या मदतीनेच त्याने अमेरिकेवरील हल्ल्याची योजना आखली हे लवकरच सिद्ध होईल. (आणि झाले नाही तरी तसे मानायला काहीच हरकत नाही.) याबाबत राष्ट्र सेवा दल, एसेम जोशी फाउंडेशन, साधना साप्ताहिकाचे कार्यालय याठिकाणी लवकरच धाडी पडणार आहेत. शिवाय हे हितसंबंध फार जुने आहेत. रियाधमध्ये रहात असल्यापासून ओसामाकडे साधना आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे अंक येत असत. ते वाचून त्याच्या मनात अंनिसविषयी आपुलकी निर्माण झाली होती. हे लोक इस्लामप्रेमी आहेत अशी त्याची खात्री पटली आणि मग त्याने प्रत्यक्ष पुण्यात यायचे ठरवले. पहिल्यांदा पुण्यात आला तेव्हा तो साधनेच्याच कार्यालयात आला होता. मग शनवारातील एक लॉजवर त्याची सोय केली गेली. पुढे तो वरचेवर पुण्यात येऊ लागला. इस्लामप्रेमी असले म्हणून काय झाले? किती दिवस यांची मदत घ्यायची या भावनेतून त्याने कोथरूडमध्ये एक फ्लॅटही घेऊन ठेवला होता. तिथूनच तो ऑपरेट करत असे. गणपतीच्या काळात तो कुटुंबीयांनाही पुण्यात बोलवत असे. बेडेकर मिसळ हे त्याचे आवडीचे ठिकाण. कारण पुण्यात याहून तिखट मिसळ कुठेच मिळत नाही. मराठीची अडचण आली नाही कारण मराठीशिवाय इतर भाषेत कुणीच बोलत नसल्याने तो मराठी आपोआपच शिकला. एवढंच नव्हे तर कोथरुडात राहात असल्याने त्याला मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचीही गोडी लागली होती. पुण्यात येताना तो दाढी करून येई. त्यामुळे दिवाळी पहाट पासून ते पंचम मॅजिकपर्यंत सर्व कार्यक्रम त्याला आनंदाने बघता येत. कुणीही ओळखत नसे. एकदा पंचम मॅजिक बघताना 'मेहबूबा मेहबूबा' गाणं सुरू झाल्यावर तो काहीसा एक्साइट झाला आणि उठून नाचू लागला तेव्हा जर लोकांना शंका आली असेल तरच. पुण्यातील काही होतकरू कवींकडून त्याने इस्लामिक क्रांतीच्या कविता व गीतेही लिहून घेतली होती. म्हणजे मराठी कवी मराठीत लिहीत आणि मग मराठी गझलकार त्याचा उर्दू अनुवाद करून देत. आधी त्याने ज्याच्याकडून लिहून घेतले त्यालाच अनुवाद करायला दिला होता. कारण आपल्याला उर्दू येतं असं तो कवी म्हणाला होता. पण अनुवाद पाहिल्यावर आपली क्रांतीची इच्छा मरू लागली आहे असे वाटल्याने ओसामाने बेत बदलला आणि उर्दूचे जाणकार व गझलकार हुडकायला सुरूवात केली. त्याला ते अर्थातच सापडले. मग त्याने ही जबाबदारी त्यांच्याकडे सुपूर्त केली आणि निश्चिन्तपणे नमाज पढू लागला. (मराठी कवी आणि गझलकार यांना जवळ आणण्यात ओसामाचा हात आहे हे विसरून चालणार नाही एरवी हे दोघे छंदोबद्ध व्हर्सेस मुक्तछंद व्हर्सेस गझल अशा भांडणातच अडकले असते. ओसामाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी कवी आणि गझलकार दोघे मिळून 'अगर तुम ना होते' नावाचा एक कार्यक्रमही करणार होते. पण गाणी निवडण्यावरून वाद झाले आणि पुरेसं फंडिंगही नव्हतं.)

या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती अशी की अल कायदा या संघटनेचे नावदेखील पुरोगाम्यांनीच ठेवले आहे. प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर यांनी याबाबत ओसामाला मदत केल्याचे समजते. आधी केळकर त्यांच्या ऋजू स्वभावानुसार 'अल सबूर' असं नाव ठेवावे असं ओसामाला सुचवत होते, पण ओसामा पडला हट्टी. केळकर काकूंनी ताजा खरवस पुढे केला तरी ऐकेना. शेवटी केळकरांनाच नमते घ्यावे लागले. शिवाय नावाची चर्चा सुरू असताना ओसामा समोरच्या बशीतल्या बाकरवड्या वेगाने संपवत होता. त्यामुळे केळकरांनी प्रकरण फार न ताणता अल कायदा या नावाला मंजुरी देऊन टाकली.

पुण्यात बस्तान बसवल्यावर मग हळूहळू ओसामाने इस्लामिक दहशतवाद भारतातील इतर भागात रुजवायला सुरूवात केली. त्याविषयीची माहितीही हळूहळू प्रकाशात येईलच.

हा सर्व भयाण इतिहास म्हणजे केवळ 'टिप ऑफ द आइसबर्ग' आहे. पुरोगाम्यांच्या कारवाया इतक्या भयानक आहेत की हिटलर, स्टॅलिन, पॉल पॉट वगैरे मंडळींनी शरमेने मान खाली घालावी. ओसामाबाबत पुरोगाम्यांनी जे केलं आणि भारतात अल कायदा जशी बळकट केली तसंच अमेरिकेतल्या पुरोगाम्यांनी इस्लामिक दहशतवादाला स्वहस्ते खतपाणी घातल्याने आणि अमेरिकन सरकारने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर इस्लामिक दहशतवादाला रोखण्यासाठी कुठलेही प्रयत्न न केल्याने आज तिथे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही.

पुरोगाम्यांच्या इस्लामप्रेमाच्या या सर्व षड्यंत्राची पाळेमुळे भारतात आणि जगात फार खोलवर गेली आहेत. त्यामुळे याबाबत आम्हाला जे जे कळत जाईल ते ते आम्ही वाचकांपुढे ठेवणारच आहोत. आमचा यापुढील लेख अंटार्क्टिकावरील बर्फ वितळण्यामागे आणि सहारा वाळवंटाचा विस्तार वाढण्यामागे पुरोगाम्यांचा कसा हात आहे याची सांगोपांग चर्चा करणारा असेल. वाचकांनी तयारीत असावे!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.2
Your rating: None Average: 3.2 (5 votes)

प्रतिक्रिया

हा इसम थोर आहे. 'ट्रंप जिंकला तर विनोदी लेखकांचे अच्छे दिन येणार' ही माझी भविष्यवाणी - दिवाळी अंकाचं काम करताना रात्री दोन वाजता, सहा का चार पेग झाल्यावर, मी असं वत्सप गुर्जींना केलं होतं - खरी ठरणार असं दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकाश घाटपांडे यांनीच ११ सप्टेंबरचा मुहूर्त काढून दिल्याचेही कळते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बापरे ! नवीनच माहिती ! आमच्यासारख्या अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला शंका होतीच ग्लोबल वॉर्मिंग पासून - अतिरेकी कारवाया - तसेच पुण्यातील वाहतूक समस्या इतकेच काय कालपरवा अति धान्य खाऊन आमचा सोसायटीतील सीगलला लागलेला ढंढाळा या सर्वांमागे फुरोगाम्यांचाच हात आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्लोबल वार्मिंगमुळे (तेच ते, जे होतंय अशी वावडी पुरोगाम्यांनी उठवलेली आहे) हा आइसबर्गचा गर्मागरम टिप नर्म विनोदावर झालेल्या हास्यफवार्यांमुळे लवकरच वितळून गेला. (खोटं का बोलू, आमच्या ग्लासातदेखील थोडा टाकला.) तेव्हा आता लवकरच उरलेला बर्ग पाठवून देण्याचे मनावर घ्यावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0