आमचा छापखाना - भाग १

माझे पणजोबा गणेश नारायण कोल्हटकर ह्यांनी १८६७ च्या सुमारास सातारा गावात येऊन सातार्याच्या अगदी उत्तर सीमेवर असलेला एक गोसाव्यांचा मठ विकत घेतला आणि तेथे आपले राहते घर आणि निम्म्या भागात छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. ह्या छापखान्यात ते प्रामुख्याने ’महाराष्ट्रमित्र’ नावाचे साप्ताहिक काढत असत. अन्यहि किरकोळ कामे घेत असावेत पण त्याचे काही तपशील शिल्लक नाहीत. ’महाराष्ट्रमित्र’चे अतिजीर्ण अवस्थेतील जुने काही अंक मात्र आमच्या घरात शिल्लक उरले होते जे मी लहानपणी पाहिले होते.
सुमारे ३० वर्षे हा व्यवसाय केल्यानंतर पणजोबा १८९७मध्ये अचानक एका दिवसाच्या आजाराने वारले. ते वर्ष प्लेगाचे होते पण पणजोबा मात्र रक्तदाब आणि अचानक हृदयविकार ह्याने गेले असावेत. त्याच्या शेवटच्या दिवसाचे जे वर्णन माझ्यापर्यंत पोहोचले आहे त्यावरून हा तर्क मी करतो.
माझे आजोबा हरि गणेश आणि त्यांचे धाकटे बंधु चिंतामणि गणेश हे तेव्हा शाळेत जायच्या वयात होते. कालान्तराने आजोबांनी मॅट्रिकची परीक्षा पास करून उपजीविकेसाठी मुंबईत एका ब्रिटिश बांधकाम कंपनीमध्ये नोकरी मिळवली. लोणावळ्याजवळचे वलवण धरण बांधण्याचे कन्त्राट त्या कंपनीला मिळाले होते आणि त्या निमित्ताने आजोबांचा मुक्काम आलटून पालटून लोणावळा आणि मुंबई असा असे. माझे वडील नारायण हरि ह्यांचा जन्म १९१४ साली लोणावळ्याला झाला. एव्हांना चिंतामणि गणेश घरच्या विरोधाला न जुमानता त्यांच्या आवडीच्या नाट्यव्यवसायात शिरले होते आणि सुस्थिर झाले होते.
वलवणचे काम संपले आणि नवे काम न मिळाल्याने ब्रिटिश कंपनीने हिंदुस्थानातील आपला गाशा गुंडाळला. मुंबईत नवी नोकरी शोधण्याऐवजी माझ्या आजोबांनी फोर्ट भागात ’मून प्रेस’ नावाचा छापखाना सुरू केला. (ह्याच्याशी संबंधित काही काम मुंबईतील सॉलिसिटर बाळ गंगाधर खेर, जे नंतर मुंबई प्रान्ताचे पहिले मुख्यमन्त्री झाले, ह्यांनी करून दिले होते अशी आठवण माझ्या कानावर आली आहे.) ३-४ वर्षे छापखाना मुंबईतच चालविल्यावर आजोबांना पोटदुखीचा विकार जडला, जो त्यांना आयुष्यभर मागे लागला होता आणि अखेरपर्यंत त्याचे निदान होऊ शकले नाही. (त्यांचा हा निदान न झालेला विकार Helicobacter Pylori असावा असे माझ्या Microbiologist सौभाग्यवती म्हणतात. १९८२ साली हा रोग ओळखण्यात आला आणि आता श्वासाची एक छोटी टेस्ट करून त्याचे निदान होऊ शकते आणि एक आठवड्याच्या उपायांनी तो बरा होऊ शकतो. आजोबांच्या काळात हे माहीतच नसल्याने सर्व जन्म ते पोटदुखी, गॅसेस् इत्यादींशी झगडतच राहिले.) नंतरच्या काळात माझे वडील त्यांना व्यवसायात हातभार लावू लागले आणि नंतर पुढे जवळजवळ सर्व व्यवहार वडीलच बघत असत. आजोबांचा मृत्यु १९६२ साली झाल्यानंतर वडिलांनी तोच व्यवसाय त्यांचा स्वत:चा मृत्यु १९९५ साली होईपर्यंत चालवला. मी १९५८ साली शिक्षणासाठी सातारा सोडून पुण्यात आलो. जन्मापासून आयुष्याची पहिली १५-१६ वर्षे आमचा उत्तम चाललेला छापखाना घराच्या अर्ध्या भागात माझ्या डोळ्यासमोरच चालू होता. त्या आठवणींवर पुढील लेख आधारलेला आहे.

मजकुरात चित्रे, आकृत्या वा काही डिझाइन असल्यास पुण्याहून ब्लॉकमेकरकडून ब्लॉक करवून आणला जाई आणि तो योग्य जागी फ्रेममध्ये बसवला जाई. ह्याखेरीज गणपति, रामसीता, शंकर इत्यादि देवादिकांच्या चित्रांचे ब्लॉक्स, फुलाफळांच्या वित्रांचे ब्लॉक्स, वेगवेगळ्या नक्ष्यांचे ब्लॉक्स आमच्याकडे तयारहि होते आणि लग्नपत्रिकांसारख्या कामामध्ये त्यांचा उपयोग होई.

त्यानंतर पहिले प्रूफ-करेक्शन. हे काम वडील अथवा आजोबा करीत असत. बराच रनिंग मजकूर असला तर आम्ही पोरे त्यांच्या समोर बसून एकेक ओळ वाचून दाखवत असू आणि प्रूफ-करेक्शन ते करत असत. लहानसहान बिले, हॅंडबिले, लग्नपत्रिका असले प्रूफरीडिंग मीहि करीत असे. प्रूफरीडिंगची सांकेतिक चिह्ने त्यासाठी मी शिकलो होतो.
दुरुस्त केलेले प्रूफ समोर धरून कंपॉझिटर चुकीचे टाइप चिमट्याने बाहेर काढून तेथे नवे टाइप बसवत असे. त्यावरून दुसरे प्रूफ तयार होई. तेहि दुरुस्त करून झाले म्हणजे शेवटचे फायनल प्रूफ गिर्हाइकाकडे जाई. त्याने ते अखेरचे तपासून सही करून पाठविले की त्या दुरुस्त्या करून मजकूर छपाईयन्त्राकडे जायला मोकळा होई.
गिर्हाइकाकडे प्रूफ पोहोचविणे हे काम मी सातारा सोडण्याच्या पूर्वीच्या शेवटच्या ३-४ वर्षात बहुधा माझ्याकडे असे. अशी प्रुफे पोहचविण्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. सातार्याच्या छत्रपति शिवाजी कॉलेजचे काही काम आमच्याकडे केले जात होते तेव्हा प्रुफे घेऊन मी सायकलने कॉलेजचे प्रिन्सिपॉल बॅ. पी.जी.पाटील ह्यांच्याकडे गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि हवेत बराच उकाडा होता. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील हे बाहेरच्या व्हरांड्यामध्ये घोंगडी घालून पडले होते असे आठवते. प्रुफे घेऊन मी सायकलने जवळच्या कोरेगाव, रहिमतपूर अशा गावीहि जात असे. फर्ग्युसन कॉलेजातील एक निवृत्त प्राध्यापक डॉ जी.वी.परांजपे ह्यांनी रहिमतपूरमध्ये रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ नावाची शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. (आता ती संस्था चांगलीच नावारूपाला आली असून अनेक शाळा/कॉलेजे चालवते.) त्या संस्थेचे बरेचसे काम आमच्याकडे येत असे. त्यांची प्रुफे घेऊन मी चारपाच वेळा रहिमतपूरला गेलो होतो. (पुलंच्या ’पूर्वरंग’मधील चिनी भाषेचे तज्ज्ञ वसंतराव परांजपे हे जीवींचे चिरंजीव हे मला माहीत आहे.) अशाच प्रूफ न्यायच्या एका वेळी मी मोठीच मजा केली त्याची आठवण अजून माझ्या मनात ताजी आहे.
त्याचे असे झाले: शिवाजी कॉलेज सातार्यात १९५६ च्या सुमारास सुरू झाले तेव्हा रयत शिक्षण संस्थेकडे पुरेसे उच्चशिक्षित मनुष्यबळ नसावे म्हणून की काय, कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल डॉ. ए.वी.मॅथ्यू नावाचे केरळी ख्रिश्चन होते. हे फार धार्मिक असावेत कारण त्यांच्या सातारा मुक्कामात त्यांचे स्वत:चेच Jesus Christ - Leader and Lord नावाचे एक पुस्तक त्यांनी आमच्याकडे छापण्यास दिले होते आणि त्या संदर्भात ते आमच्या घरीहि अनेकदा येत असत. वडील-आजोबा आणि त्यांचे संभाषण इंग्लिशमध्ये होई आणि आम्ही तेथे श्रवणभक्ति करीत असू. आपला नातू फार हुशार आहे अशी आजोबांची खात्री असल्याने माझ्याशी मॅथ्यूसाहेबांनी इंग्रजीत बोलत जावे असे आजोबांनी त्यांना सुचविले. तदनंतर एका पावसाळ्याच्या दिवशी प्रुफे घेऊन त्यांच्या हजेरीमाळापलीकडच्या जुन्या प्रकारच्या बंगल्यात जाण्याची माझ्यावर वेळ आली. बंगल्याला मोठे आवार होते आणि त्यापलीकडे व्हरांड्यामध्ये मॅथ्यूसाहेब खुर्चीवर बसलेले होते. मला लांबूनच पाहून त्यांनी विचारले, 'How are you?' मला हा प्रश्न ऐकू आला, ’Who are you?' मी लांबूनच आजोबांनी शिकविलेल्या तर्खडकरी इंग्रजीमध्ये दणकून उत्तर दिले, ’I am a boy'. ते ऐकून मॅथ्यूसाहेबांची बोलतीच बंद झाली. आपलेच इंग्रजी खराब होईल अशी साधार भीति त्यांना वाटली असावी! नंतर तेथेच व्हरांड्यात बसून सौ.मॅथ्यूंनी दिलेला फराळ खाऊन आणि चहा पिऊन मी घरी परतलो.
आमच्या घराजवळील आयुर्वेदीय अर्कशाळेचे सर्व काम, सातार्यातीलच युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे काही काम, आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूलचे काही काम अशी आमची नेहमीची गिर्हाइके होतीच पण सर्व प्रेसवाल्यांवर गंगा वळत असे इलेक्शनच्या वेळी. इलेक्शनसाठी प्रत्येक गावाच्या मतदारांच्या याद्या छापायचे टेंडर कलेक्टर ऑफिसकडून निघत असे. प्रत्येक गावासाठी print order १००-१२५ पर्यंतचीच असावी पण अशा शेकडो गावांचे मिळून कंपोझिंगचे प्रचंड काम असे. असे काम आले की महिना-दोन महिने रात्रपाळीने प्रेस चालत असे. हे कंपोझिंगचे प्रचंड खेचकाम आमच्या तीनचार कंपॉझिटरांच्या ताकदीबाहेरचे असे. कोल्हापूरचे काही लोक हे काम आमच्याकडून कन्त्राटावर घेत. त्यांची चारपाच जणांची टीम येई आणि १५-२० दिवस रात्रंदिवस कंपोझिंगचे काम करून त्याचा ते फडशा पाडत. शेवटच्या दिवशी त्यांना त्यांचे पैसे चुकते करायचे आणि त्यांना आमच्या घरीच एक जेवण द्यायचे असा रिवाज होता.
कंपोझिटर्सचे काम कंटाळवाणे होतेच पण त्याहूनहि अधिक कंटाळवाणे काम म्हणजे छपाई पूर्ण झाली की तोच मजकूर पुन: सोडवून सर्व टाइप आपापल्या जागी पुन: टाकणे आणि कंपोझिटर्सनाच ते करायला लागायचे.
आमच्याकडे जे तीनचार कंपोझिटर्स होते त्यामध्ये एक, भगवानराव जोशी, आमच्याकडेच हे काम शिकले आणि नंतर चाळीसएक वर्षे आमच्याकडेच कामाला राहिले. आम्हाला ते घरच्यासारखेच वाटत. दुसरे देशमुखहि २५-३० वर्षे होते.
१९४८च्या जळितामध्ये आमचे घर आणि छापखाना जाळण्यासाठी काही गुंड आमच्यावर चालून आले होते. त्या दिवसाचे वर्णन मी अन्यत्र 'उपक्रम'वर लिहिले होते. त्यावेळी सुदैवाने गुंड लवकरच पळून गेल्यामुळे हानि मर्यादित झाली पण तरीहि त्यांनी जवळजवळ सर्व टाइप जमिनीवर ओतून टाकला आणि असे नुकसान केले. ही पै सोडवत बसणे शक्य नव्हते म्हणून सर्व मेटल गोळा करून पुण्याला फाउंड्रीकडे पाठवावे लागले आणि नवा टाइप भरावा लागला. हे होईपर्यंत एखादा महिना गेला आणि त्या काळात छापखाना बंदच असल्यातच जमा होता.
चला. कंपोझिंगचा हा भाग बराच लांबला. आता येथे जनगणमन म्हणून हा भाग संपवितो. पुढच्या भागात छपाई, बाइंडिंग अशा कामांकडे वळेन.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
छपाईविरुद्ध पूर्वग्रह.
खूप वर्षांपूर्वी ‘किशोर’ मासिकात एक हकिकत वाचलेली (अर्धवट) आठवते ती अशी. एकोणीसाव्या शतकात जेव्हा ‘दर्पण’ प्रकाशित होऊ लागला, तेव्हा काही ब्राह्मण तो विकत घ्यायला कचरत असत. यामागचं कारण असं की छपाईची शाई दाट करण्यासाठी तिच्यात काहीतरी संशयास्पद (म्हणजे चरबी वगैरे) मिसळतात अशी आवई उठली होती. तेव्हा ही ‘अडचण’ दूर करण्यासाठी गाईचं तूप वापरून शाई तयार केली जाऊ लागली.
अगदी हेच नाही पण अशासारखीच काही माहिती अनंत काकबा प्रियोळकरलिखित 'The Printing Press in India' ह्या पुस्तकामध्ये आहे. छपाईच्या शाईमध्ये चरबी मिसळलेली असते अशा शंकेने ब्राह्मणवर्ग छापलेले धर्मग्रंथ पूजाविधीमध्ये वापरत नसत. त्या काळचे पुढारलेले सुधारक रा.ब. वि.ना. मंडलिकहि ह्या भीतीपासून मुक्त नव्हते. दादोबा पांडुरंग आपल्या आत्मचरित्रात लिहितात की पाणिनीची अष्टाध्यायी मराठीमध्ये छापवून आणण्याचा त्यांचा विचार त्यांना सोडावा लागला कारण बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांना असा सल्ला दिला की पवित्र मानल्या गेलेल्या पुस्तकांचे मुद्रण सार्वजनिक असंतोषाचे कारण ठरेल. वि.ना. मंडलिक ह्यांनी तुकारामाची गाथा
गणपत कृष्णाजी ह्यांच्या छापखान्यात छापून घेतली पण पंढरपूरचे वारकरी ती वापरेनात कारण त्यात चरबीमिश्रित शाई असल्याची शंका.
तुपाची शाई
तूप वापरून केलेल्या शाईचाहि उल्लेख मिळाला. 'निर्णयसागरची अक्षरसाधना' असे पुस्तक निर्णयसागर छापखान्याच्या शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने लिहिण्यात आले. (लेखक पु.बा. कुलकर्णी.) महाराष्ट्रामध्ये पहिला छापखाना १८३१ साली मुंबईत काढून त्यामध्ये शिळाप्रेसवर पंचांग काढणारे गणपत कृष्णाजी ह्यांच्याविषयी त्यात जी माहिती आहे त्यात अर्मठ ब्राह्मणांनीहि पुस्तकाचा वापर करावा अशासाठी गणपत कृष्णाजी ह्यांनी चरबी न वापरता तूप वापरून शाई बनविली होती असा उल्लेख आहे.
ट्रेडल होते
ट्रेडल होते, दोन होती. पण प्रूफ काढायला आमचे हातानी प्रूफ काढण्याचे मशीन सोयीस्कर असे म्हणतो. ट्रेडल सुरू करणे, त्याच्यावर मॅटर चढविणे वगैरे सव्यापसव्ययापेक्षा हे अधिक सुटसुटीत नाही का? एक ओळीची चिठ्ठी हाताने लिहिणे आणि कंप्यूटरवर टाइप करून तिचा प्रिंटआउट घेणे ह्यासारखेच आहे हे!
अर्थात अर्थात. प्रुफ
अर्थात अर्थात. प्रुफ काढण्यासाठी अजुन एक रोलर असलेले पण छोटे टूल असायचे. नाव विसरलो त्याचे. पण हे टाईपसेटिंगमधले १२ पॉइंटचा एक पायका, सहा पायक्याचा एक इंच म्हनजे ७२ पॉइंटसाईजचा फॉन्ट स्टेम्पला १ इंचाचा असतो असले नॉलेज प्रचंड उपयोगी पडले डीटीपी मध्ये सुध्दा.
नुसते पीसीवर डीटीपीच नव्हे तर कंपोसिंगनंतर आलेले फोटोटाईपसेटिंग, ब्लॉक मेकिंग, ड्रम स्कॅनिंग, सेपरेशन्स, हॅन्डमेड ४ कलर जॉब्स, कटिंग पेस्टिंग, प्लेटमेकिंग, लेटरप्रेसची फॉन्ट कॅटलॉग्ज अशा कालबाह्य गोश्टी मला शिकायला पहायला मिळाल्या, काही करायला मिळाल्या ह्याबाबत ईश्वराचा मी प्रचंड ऋणी आहे.
खरेतर सध्याच्या डीटीपी वाल्याना हे शिकवणे खूप जरुरी आहे. लाईन स्पेसिंग, लीडिंग, ऑप्टिकल स्पेसिंग, फॉन्ट्स सिलेक्शन अशासारख्या गोश्टी बेसिकपासून शिकवल्या तर नंतर खेळत बसायची वेळ येत नाही. अर्थात आजकाल खेळत बसले ह्यालाच क्रियेटिव्हिटी समजले जाते हा भाग अलहिदा.
.
अवांतर : आजकाल जुन्या ट्रेडल मशीन्सला थोडे फेरफार करुन पंचिंग मशिन (डायकट साठी) म्हनून वापरले जाते.
मस्तच.
मस्तच. कंपोझिशन करण्यासाठी किती वेळ लागत असे?
हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे, एखादं काम करायला कंप्यूटरला फार वेळ लागण्याबद्दल आम्ही तक्रारी करायला लागलो की थोरामोठ्यांचं चिडवणं सुरू होतं, "आमच्या वेळेस पंच कार्ड्स असायची. तेव्हा आम्हाला कंप्यूटर असण्यात खूप आनंद वाटायचा." (थोडक्यात, फार तक्रारी करू नका; ही आहे ही प्रगती, सुधारणा आहे. जरा मोठे व्हा.)
कंपोझिंगला लागणारा वेळ
कंपोझिंग हे फार वेळखाऊ आणि डोळ्यावर ताण देणारे काम होते. एक एक करून टाईप समोरच्या केसेसमधून उचलायचे आणि हातातील स्टिकमध्ये जागेवर ठेवायचे हे काम हळूहळूच होणार. अनुभवी कंपॉझिटरला केस पाठ असायची त्यामुळे नवशिक्याहून त्याचे काम थोडे अधिक जलदीने होणार इतकाच काय तो फरक. कंपोझिंगचे काम कसे होते हे ह्या fast-motion video मध्ये पहा.
रोमन लिपीतील हे काम जरा सोपे असते कारण बहुतेक सर्व अक्षरांना प्रत्येकी एक टाइप असतो. जोडाक्षरे - ligatures - जवळजवळ नसतात. त्याच्या तुलनेत देवनागरी खूपच अवघड. कारण आधी भरपूर जोडाक्षरे. त्यात प्रत्येक अक्षर दुसऱ्याला जोडण्याचे अनेक प्रकार. 'त्र'मधला अर्धा त् आणि 'त्या'मधला अर्धा त् हे संपूर्ण वेगळे आहेत. अर्ध्या 'र्' चे किती प्रकार आहेत. तसेच बाराखडीमुळे एका 'क'पासून का ते कौ असे ८ प्रकार होतात. ह्यासाठीचा मार्ग असा. उदाहरणासाठी 'क' कडे पाहू. क चा टाइप एका बाजूस एक खाच असलेला असा असे. त्या खाचेत काना दाखविणारा टाइप दाबून बसविला की होतो 'का', आखूड वेलांटी बसविली की 'कि', लांब वेलांटी बसविली की 'की'. 'कं', 'कः' चे असेच.असे प्रत्येक अक्षराचे करावे लागे. साधा क - कानावेलांटीशिवायचा - असला तर त्याच खाचेत नुसता एक खास ब्लॅंक टाइप बसवायचा. अशी ही दीर्घसूत्री पद्धत होती. (हे सर्व मी आठवणीतून लिहीत आहे. मला स्वत:ला कंपोझिंगचा काहीहि अनुभव नाही. कदाचित अभ्या (अभिजित) ह्यात त्यांच्या अनुभवातून काही दुरुस्ती आवश्यक असल्यास ती सुचवू शकतील.)
जाता जाता सुचले म्हणून लिहितो. आजच्या वापरातील अक्षरांच्या upper आणि lower केस ह्या संज्ञा वरील प्रकारच्या letterpress छपाईमधून आलेल्या आहेत. तेथे कंपोझिंगमध्ये खरोखरच लहान अक्षरे खालच्या हाताला पोहोचायला अधिक सोयीस्कर केसमध्ये असत. मोठी capital अक्षरे वरच्या केसमध्ये असत. (मुख्य लेखातील चित्र पहा.) Press प्रेस ह्या शब्दाचाहि खूप विकास झाला आहे. मुळात टाइपावर कागद दाबून - Press करून - अक्षरे उमटवायची ही कल्पना. तिचा विकास प्रिंटिंग प्रेस हा व्यवसाय - प्रिंटिंग प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या वृत्तपत्राचा व्यवसाय - त्या व्यवसायाशी संबंधित पत्रकारिता - तेथून Press Act, Freedom of the Press असा होत होत अनेकानेक संकल्पना निर्माण झाल्या आहेत.
आता मूळ लेखात उल्लेखिलेल्या काही गोष्टींची चित्रे पहा.
ह्यामध्ये पहिले चित्र सुट्या रोमन टाइपांचे आहे. प्रत्येक टाइपाला एक खाच आहे. तिच्या स्पर्शाने कंपॉझिटरला अक्षर 'खाली डोके वर पाय' असे आहे का नाही हे कळते. दुसरे locked-up matter चे आणि तिसऱ्यामध्ये locked-up matter करण्यासाठी वापरलेली फ्रेम, त्यासाठीच्या एकमेकांविरुद्ध हलणार्या लांब त्रिकोणी आकाराच्या दाते असलेल्या पट्ट्या आणि शेजारी त्या दात्यांमध्ये बसवायचा स्क्रूड्रायवर दिसत आहेत.
माझे वेळ घालवण्याचे आवडते ठिकाण
तुमचा लेख वाचला आणि मन जुन्या आठवणित गेल. आमच्या चाळीत एकाजणांनी घरातच छापखाना सुरू केला होता. त्या मशीनचा येणारा एक प्रकारचा आवाज मला फार आवडायचा. शाळेत जाण्या येण्याचा रस्ता त्या छापखान्यावरूनच होता. दुपारी शाळेतुन येताना मी नेहमी त्या प्रेस जवळ थांबून त्याच काम बघायाचे. त्या पाटावरून खाली वर करणारा तो रंगाचा दट्ट्या, रंगीत पेपरवर उमटणारी ती अक्षर. हे बघताना मला खुप मजा यायची.
घराच्या पुढच्या बाजुला प्रेस आणि मागच्या बाजूला त्यांच छपाईचा पाट तयार कराची खोली. वरील चित्रातली उपकरण मी प्रत्यक्षात बघितली आहेत. माझ्य माहीती प्रमाणे अक्षरांना त्यांच्या भाषेत ते खिळे म्हणत. ह्या खिळ्यासांठी त्यांच्या कडे वेग वेगळे खाने केलेले होते. एक एक खिळा जोडुन शब्दतयार होत. ती ज्यावर तयार केली जायची ते पाट म्हणत, सगळी जोडणी झाली की तो पाट छपाईच्या मुख्य मशीनला जोडला जायचा. मग एक ट्रायल प्रिंट घेतली जायची. काही चुका असतील तर परत दुरूस्त करून पुन्हा छपाई सुरू व्हायची.
मशीन पाशी एक जण हातात एक ब्रश आणि रंगाचा डबा घेउन उभा असायचा. त्या दट्ट्याची शाई कमी झाली की लगेच रंगाचा ब्रश त्यावर फिरवला जायचा.
शाई कशापासून बनवतात
शाई कशापासून बनवतात - या चर्चेवरून मला आधुनिक चर्चा आठवली ती कंपोस्टची. काळी-पांढरी छपाई असेल तर कागद बिनधास्त कंपोस्टात टाका, पण रंगीत शाईत (देव जाणे कोणकोणती) रसायनं असतात त्यामुळे तसे कागद कंपोस्टात टाकू नका; असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं सापडतं.
(तरीही मी हातानं निळी, जांभळी गणितं-आलेख गिरमिटलेले कागद कंपोस्टात सारते.)
चरबीच्या शाईचं वावडं अस
चरबीच्या शाईचं वावडं असण्याच्या काळात तुपाच्या शाईने छापलेल्या पोथ्या बाइंडिंग केलेल्या असत की कसे? कारण बाइंडिंगसाठी वापरला जाणारा सरस सुद्धा हाडे वगैरे गोष्टी वापरून बनवत असत. आमच्या कार्यानुभवच्या तासाला शाळेत सरांनी बनवून दाखवला होता.
?
कारण बाइंडिंगसाठी वापरला जाणारा सरस सुद्धा हाडे वगैरे गोष्टी वापरून बनवत असत. आमच्या कार्यानुभवच्या तासाला शाळेत सरांनी बनवून दाखवला होता.
कोणाची हाडे घातली होती त्यात?
बाकी, सरसास आक्षेप नसावा, कारण हाडांचे वावडे नसावे. कारण त्याला ऐतिहासिक/पौराणिक प्रघात असावा; 'शास्त्राधार' असावा. ते वज्र का कायसेसे कोणाच्यातरी हाडांपासून बनवलेले होते म्हणतात. ते हाताळायला जर आक्षेप असता, तर १८५७चे बंड काही सहस्रके अगोदरच घडले नसते काय?
कोटेशन
वर मी असा उल्लेख केला आहे की कोटेशन्स वापरून घरे, बंगले बांधणे हा आमचा लहानपणचा एक विरंगुळा होता. ह्यातील 'कोटेशन्स' म्हणजे कंपोझिंगमधील Dead space भरण्यासाठी वापरायचे मेटल ब्लॉक्स. ह्यांना 'कोटेशन' का म्हणत हा विचार अनेक वेळा मनात येऊन गेला होता पण आता ६०-६५ वर्षांनंतर ती उत्सुकता शमवायचे ठरविले.
गूगलवर शोध घेतल्यावर The Printer's Dictionary of Technical Terms ह्या नावाचे १९१२ साली छापलेले असे पुस्तक मिळाले. त्यातील उल्लेखानुसार ह्या कोटेशन्सना Furniture Quotation असे तान्त्रिक नाव होते असे कळले. त्याचे अधिक वर्णन तेथेच दिलेले असे आहे:
Furniture — In printing-offce speech this term is given to all pieces of wood and metal designed to fill blank spaces between pages and around type-forms when locked in a chase. It is made in many lengths and widths, but the sizes are usually mutiples of 12-point, or pica. The largest pieces are of cherry or pine, three feet long and ten picas wide. Thin strips of wood of the width of great-primer (or 18-point) and thinner are known as reglet.
Metal furniture, cast with hollow spaces to lighten its weight, is usually not longer than one foot, and ten picas wide. It has the advantages over wood of greater accuracy in body, not warping when wet, and yielding less under the pressure of locking up. It is made in several styles, the most common being hollow frames, with bars or braces lengthwise and crosswise in the larger pieces. Quotation furniture is hollow on one side only, the top being solid, like a large quad. Reversible furniture is concaved on the top and bottom, but with a solid area, and presents both ends of each piece shaped like this; ।--।. This kind is serviceable for gutter-margins and in other places where lock-up pressure is needed only on two opposite ....
फारा वर्षांचे कुतूहल शमले आणि बरे वाटले.
उत्तम माहिती
उत्तम माहिती! पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
खूप वर्षांपूर्वी ‘किशोर’ मासिकात एक हकिकत वाचलेली (अर्धवट) आठवते ती अशी. एकोणीसाव्या शतकात जेव्हा ‘दर्पण’ प्रकाशित होऊ लागला, तेव्हा काही ब्राह्मण तो विकत घ्यायला कचरत असत. यामागचं कारण असं की छपाईची शाई दाट करण्यासाठी तिच्यात काहीतरी संशयास्पद (म्हणजे चरबी वगैरे) मिसळतात अशी आवई उठली होती. तेव्हा ही ‘अडचण’ दूर करण्यासाठी गाईचं तूप वापरून शाई तयार केली जाऊ लागली.
वर म्हटल्याप्रमाणे माझी आठवण पक्की नाही, त्यामुळे काही तपशील चुकलाही असेल. सुज्ञांनी खुलासा करावा. पण ह्या गोष्टीत तथ्य असेल तर ‘पूर्वीपेक्षा आत्ता समृद्धी आहे’ ह्या घासकडवींच्या संपूर्ण Weltanschauung ला तो शहच आहे असं मी समजतो.