Skip to main content

तुलसी परब यांच्या कविता

संकल्पना

तुलसी परब यांच्या कविता

- तुलसी परब (हृद)

ब्रँड आहे साहेब माॅल

ब्रँड आहे साहेब
माॅल कुठला देऊ
फुल की हाफ

देसी ब्रँडमध्ये
क्वार्टर आहे
देऊ

सिग्नेचरवर
ग्लास फुकट आहे
तो दे

साहेब, समोर
माल द्ये, साहेब
ग्लास विकत
दारू फुकट

साली, आपली
देशीयता किती
घनघोर आहे

तो पावसात उतरला
आणि स्वतःशी म्हणाला.

---

खरं असल खोटं खोटं

खरं असल खोटं
खोटं असल खरं
तरी परमात्म्याच्या आत्म्याला
नाहीत पडत घरं

त्याची मांडवली चालते
खोप्यात खोक्यात
अंड्याच्या आत मादी
मादीवर नर

प्रश्न मिटला की
आधी अंडी की कोंबडीचा
नराला मारते मादी
मादीला नर

असली जीवनोजिवनी
भांडाभांडी.

---

या प्रतिमेच्या दृश्य भागावर

या प्रतिमेच्या
दृश्य भागावर
मी ठेवलाय माझा पंजा
हस्तक्षेपाचं निराकरण
करायला नको मला
मी शोधत होतो
ते सापडेल मला वस्तू वस्तूत निरपेक्ष

आणि ही तर आहे
अपेक्षित वस्तू... प्रतिमा
अंतर्गत बाहेर आहे ते
सगळं व्याकरण
अर्थ दडलाय माझ्या अस्तित्वात
तो मी भरवतोय वस्तू जाताला

वस्तू जाता आता हो तू दीर्घ.