Dead Man's Hand - ३

आधीचे भाग - ,

रोहित आपल्या समोर असलेल्या फाईलमधलं प्रियाच्या मोबाईलचं रेकॉर्ड पाहत होता. २२ डिसेंबरला प्रिया घरातून निघाल्यापासून ते २४ तारखेच्या सकाळी तिचा मृतदेह आढळून येईपर्यंत तिला आलेला प्रत्येक फोन, मेसेज आणि त्यावेळी तिच्या फोनचं नेमकं लोकेशन त्याने काळजीपूर्वक तपासलं होतं. प्रियाचे कुटुंबिय, तिच्या मैत्रिणी, ऑफीसमधले सहकारी, धीरज आणि त्याचे मित्रं यांचे नंबर त्याच्यापाशी होते. त्यापैकी तिच्या कॉल आणि मेसेज रेकॉर्डमध्ये सापडलेल्या नंबर्स वरुन आणि मोबाईलच्या लोकेशनवरुन या दोन दिवसांतल्या तिच्या हालचालींचा अंदाज बांधण्याचा तो प्रयत्नं करत होता. परंतु प्रियाचा मोबाईल इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळला होता की तो काहीसा विचारात पडला होता. तो आपल्याच विचारत असताना कदम आणि नाईक त्याच्या केबिनमध्ये आले.

"बोला कदम" समोरच्या खुर्चीकडे निर्देश करत रोहित म्हणाला, "स्वप्नाबद्दल काही कळलं?"

"नाही सर! आम्ही तिच्या घरीही जाऊन आलो. ती बोरीवलीला एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. शनिवारी सकाळी अकराच्या सुमाराला ती बाहेर पडली होती. त्यानंतर ती अद्याप परत आलेली नाही. आम्ही तिची रुमही चेक केली, पण काहीही महत्वाचं सापडलं नाही. तिचा लॅपटॉप आणि कॅमेरा मात्रं मिसींग आहे. बहुतेक शनिवारी घरातून बाहेर पडताना ती तो घेऊन गेली असावी. तिच्या घरमालकालाही तिचा काहीही फोन किंवा मेसेज आलेला नाही."

"हं...." रोहित विचार करत म्हणाला, "धीरज आणि त्याच्या मित्रांबद्दल काय?"

धीरज दाखवतो तेवढा सरळ आणि प्रामाणिक अजिबात नाही. कॉम्प्युटर एजन्सीच्या जोडीला तो एक प्लेसमेंट कन्सल्टन्सीही चालवतो. या एजन्सीच्या माध्यमातून शेकडो होतकरु आणि गरजू तरुण-तरुणींना नोकरी मिळवून देण्याचा तो दावा करत असला तरी प्रत्यक्षात किती जणांना नोकरी मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्या एजन्सीत नोकरीसाठी नोंदणी करताना हजार रुपये भरावे लागतात आणि या डिपॉझीटवर डोळा ठेवूनच ही एजन्सी चालवली जाते. खरंतर ही एजन्सी आणि इन्स्टीट्यूट कागदोपत्री धीरजच्या नावावर असल्या तरी याचा खरा मालक आहे त्याचा मित्रं किरण चव्हाण! किरणनेच त्याला हे दोन्ही उद्योग काढून दिलेले आहेत."

"इंट्रेस्टींग! बाकीच्यांचं काय?"

"कौशल संपत हा इस्टेट एजंंट आहे. विक्रोळीला एलबीएस रोडवर त्याचं ऑफीस आहे. घरं, दुकनाचे गाळे विकून देणं किंवा भाड्याने मिळवून देणं अशी कामं तो करतो. त्याच्या जोडीला मुरबाड - कर्जत - चौक - पनवेल या पट्ट्यांतले जमिनींचे व्यवहारही तो पाहतो. या कौशलच्याही अनेक भानगडी आहेत. खासकरुन जमिनीच्या व्यवहारात त्याने अनेकांना गंडवल्म आहे, पण आजपर्यंत तो कशातही अड्कलेला नाही कारण तो किरणचा माणूस आहे! या ग्रूपमधला तिसरा म्हणजे उदय इनामदार! हा एका प्रख्यात आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहे. या पाचजणांपैकी तो सर्वात जास्तं शिकलेला आहे. किरणचा तो शाळेपासूनचा मित्रं आहे. कॉलेजमध्ये असताना त्याच्यावर पेपर फुटीमध्ये सहभागी असल्याचा संशय होता, पण कोणताही पुरावा न मिळाल्याने तो सहीसलामत सुटला. चौथा रिझवान खान.. हा एका हेल्थ क्लब आणि जिमचा मालक असला तरी प्रत्यक्षात तो एक गुंड आहे. दुकानदारांकडून आणि फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करणं, इलेक्शनच्या काळात विरुद्ध पार्टीच्या लोकांना मारहाण करणं, उमेदवारांना धमकावणं असले अनेक उद्योग तो करत असतो, परंतु त्याच्याविरुद्ध आजपर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाही कारण याच्याही डोक्यावर किरणचा वरदहस्तं आहे. त्याचे सगळे काळे धंदे हा रिझवान सांभाळतोच पण इम्पोर्टेड दारु आणि प्रसंगी ड्रग्जही हाच पुरवतो!"

"ड्रग्ज?" रोहित गंभीर झाला, "आणि किरण चव्हाण?"

"किरण चव्हाण म्हणजे बापाच्या जीवावर पोराने किती माज करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे सर! वडील राजकारणात असल्याने शाळेत असल्यापासूनच एक प्रकारची गुर्मी त्याच्या नसानसात मुरलेली आहे. वास्तविक मॅट्रीकच्या परिक्षेत तो नापासच व्हायचा, पण त्याच्या वडिलांनी काहितरी भानगडी करुन त्याला पास करुन घेतला. कॉलेजमध्ये गेल्यावरही अभ्यास सोडून दादागिरी आणि अरेरावी करण्यातच त्याचा बहुतेक वेळ जात असे. विद्यार्थी परिषदेच्या इलेक्शन्समध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारावर हल्ला केल्याची त्याच्यावर केसही झाली होती, पण ती दाबली गेली. ज्युनियर मुलांना रॅगिंग करणं, प्रसंगी मारहाण करणं, मुलींना स्टॉकींग करणं असे अनेक पराक्रम त्याच्या नावावर आहेत. युनिव्हर्सिटीचे पेपर फोडण्याच्या प्रकरणातही त्याचा हात होता, पण उदयप्रमाणे पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला. सध्या तो 'मराठा क्रांति ब्रिगेड' या नावाची एक संघटना चालवतो. प्रत्यक्षात या संघटनेच्या आड त्याची दादागिरी चालू असते. जेमतेम तीन महिन्यांत होणार्‍या बीएमसीच्या इलेक्शनला त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी त्याच्या वडीलांनी जोरदार फिल्डींग लावली आहे असंही कानावर आलं आहे! आणखीन एक महत्वाचं ...."

कदम पुढे झुकत अगदी बारीक आवाजात म्हणाले,

"कौशलच्या नावावर इस्टेट एजन्सीच्या जोडीला एक इव्हेंट मॅनेजमेंट आणि एस्कॉर्ट एजन्सी आहे. या एस्कॉर्ट एजन्सीच्या बुरख्याआड सेक्स रॅकेट चालवलं जातं आणि हाय प्रोफाईल लोकांना मुली पुरवल्या जातात असं बोललं जातं सर!"

"सेक्स रॅकेट?"

रोहित कमालीचा गंभीर झाला. त्याच्या नजरेसमोर प्रियाने इन्स्पे. देवरेंना दिलेलं स्टेटमेंट तरळलं. या सर्व प्रकरणाचा त्याला हळूहळू अंदाज येत होता. सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करुन घ्यायची, हळूहळू मैत्री वाढवत तिचा विश्वास संपादन करायचा, प्रत्यक्षं भेटल्यावर अत्यंत सभ्यपणाचं नाटक करत तिला आपल्या जाळ्यात ओढायचं आणि एका बेसावध क्षणी तिचा गैरफायदा घेऊन तिला सेक्स रॅकेटच्या दलदलीत खेचायचं... सुनेहाच्या बाबतीतही हेच झालं असावं, पण तिने विरोध केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली असावी. प्रिया तिची जवळची मैत्रिण होती आणि न्यूज रिपोर्टरही होती. रोशनीच्या स्टेटमेंटमध्ये तिने उल्लेख केलेलं आणि स्वप्ना आणि प्रिया मागोवा घेत असलेलं रॅकेट हेच तर नसेल?

"या सर्वांचे मोबाईल रेकॉर्ड्स मिळाले?"

कदमनी सर्वांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स त्याच्यासमोर ठेवले. रोहितने प्रत्येकाच्या मोबाईलचं रेकॉर्ड - खासकरुन २२ ते २५ डिसेंबरपर्यंतचं - पूर्णपणे तपासून पाहिलं. धीरज आणि स्वप्नाचं मोबाईल रेकॉर्ड त्याने प्रियाच्या रेकॉर्डशी ताडून पाहिलं. सुमारे पंधरा - वीस मिनीटांनी सर्व कागदपत्रं बाजूला ठेवत त्याने एक दीर्घ नि:श्वास सोडला.

"मल्होत्रांच्या स्टेटमेंटप्रमाणे २२ डिसेंबरच्या सकाळी आठ वाजता प्रियाने घर सोडलं आहे. सव्वाआठच्या सुमाराला तिने धीरजला फोन केला आहे आणि सुमारे दहा मिनीटं बोलणं झालं आहे. पाठोपाठ तिने साक्षीला फोन केला आहे. या दोन्ही खेपेस तिचा फोन अमर महल जंक्शनच्या परिसरात आहे. साक्षीला फोन केल्यानंतर ती बहुधा चॅनलच्या ऑफीसमध्ये गेली असावी. सकाळी अकराच्या सुमाराला तिने पुन्हा धीरजला फोन केला आहे. त्यावेळेस तिचा फोन मरोळ नाक्यावर ऑफीसच्या एरीयात आहे. स्वप्नाही तेव्हा ऑफीसमध्येच असावी, कारण तिचा फोनही त्याच वेळेस त्याच एरीयातच आहे. बहुतेक दोघीही एकत्रंच असाव्यात!"

"प्रियाने फोन केला तेव्हा धीरज कुठे होता सर?"

"२२ तारखेला सकाळभर धीरजचा मोबाईल आपल्या घरीच होता. दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान तो चर्चगेटला होता. त्यानंतर तो कर्जतला फार्महाऊसवर जाण्यासाठी निघाला असावा, कारण भायखळा, दादर टी.टी., सायन सर्कल, चेंबूर या रुटने दुपारी साडेचारच्या सुमाराला तो वाशीला पोहोचला आहे. पुढचा तासभर तो वाशी - तुर्भे या भागातच फिरत होता. मग कळंबोली, चौक करत सातच्या सुमाराला कर्जतला पोहोचला आहे. इंट्रेस्टींग म्हणजे धीरज आणि प्रिया दोघांचेही मोबाईल चर्चगेटला एकाच एरीयामध्ये आहेत. पण दुपारी तीनपासून प्रियाचा मोबाईल मात्रं बंदच आहे."

"याचा अर्थ सर, दुपारी तीननंतर प्रिया कुठे आणि कशी गेली हे आपल्याला कळणार नाही?"

"लेट्स सी! धीरजच्या मित्रांपैकी किरण आणि रिझवान २२ तारखेच्या सकाळी एकत्रंच असावेत कारण त्यांच्या मोबाईलचं लोकेशन एकच आहे. दुपारी एकच्या सुमाराला ते फार्महाऊसवर पोहोचले असावेत कारण त्यावेळेस त्यांचा फोन कर्जत स्टेशनजवळच्या टॉवरच्या रेंजमध्ये आहे. त्यांच्यापाठोपाठ कौशल आणि उदय साडेतीनला कर्जतला पोहोचले आहेत. एकदा कर्जतला पोहोचल्यावर यापैकी प्रत्येकाचा फोन सोमवारी - २५ डिसेंबरच्या संध्याकाळी पाचपर्यंत त्याच परिसरात आहे. त्यानंतर सर्वजण मुंबईमध्ये परतले आहेत."

"म्हणजे सर, २२ तारखेला संध्याकाळी सात पासून २५ तारखेला संध्याकाळी पाच पर्यंत हे सर्वजण कर्जतमध्येच होते?"

"मोबाईलच्या रेकॉर्डवरुन तरी तसं दिसतं आहे!" रोहित शांतपणे म्हणाला.

"आणि स्वप्ना? शुक्रवारी दिवसभर स्वप्ना कुठे होती?"

"स्वप्नाचा फोन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मरोळ नाक्याच्या परिसरात आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे या वेळी ती चॅनलच्या ऑफीसमध्ये असावी. त्यानंतर ती थेट बोरीवलीला आपल्या घरी गेली आहे. शुक्रवारी संध्याकाळी आणि रात्रभर ती बोरीवलीतच आहे! शनिवारी सकाळी सात वाजता तिला प्रियाचा मेसेज आला आहे आणि त्यावेळेस प्रियाच्या फोनचं लोकेशन आहे मढ आयलंड!"

"मढ आयलंड?" कदम चकीत झाले, "पण सर, प्रियाची बॉडी रविवारी - २४ तारखेला सकाळी मढ आयलंडवर मिळाली आणि मोबाईल रेकॉर्डवरुन तिने शनिवारी सकाळी स्वप्नाला मढ आयलंडवरुन मेसेज केला आहे असं सिद्धं होतं... याचा अर्थ, शनिवारचा पूर्ण दिवसभर आणि रात्रं प्रिया मढ आयलंडवरच होती? पण ती तिथे गेली कधी आणि कोणाबरोबर? आणि दुपारी तीन वाजता निघाल्यापासून शुक्रवारची संध्याकाळ आणि रात्रभर प्रिया कुठे होती?"

"शुक्रवारची रात्रं....." रोहित क्षणभर थांबून पुढे म्हणाला, "शनिवारी सकाळी स्वप्नाला मेसेज केल्यावर प्रियाचा फोन बंदच आहे, पण दुपारी अडीच वाजता पुन्हा तिने स्वप्नाला मेसेज केला आहे आणि यावेळेस तिचा फोन मुंबई अहमदाबाद हायवेवर कुडे गावाजवळ आहे! त्यानंतर सुमारे वीस मिनीटांनी तिला स्वप्नाचा मेसेज आला आहे तेव्हा तिचा फोन बोईसरकडे जाणार्‍या चिल्हार फाट्याजवळ आहे. मात्रं त्यानंतर पुन्हा प्रियाचा फोन स्विच ऑफ आहे! सर्वात इंट्रेस्टींग गोष्टं म्हणजे केवळ प्रियाच नाही कदम, प्रियाला मेसेज केला त्यावेळी स्वप्नाही चिल्हार फाट्यावर होती!"

"काय?" कदम आणि नाईक दोघंही पार गोंधळून त्याच्याकडे पाहत राहीले.

"माझ्या अंदाजाप्रमाणे चिल्हार फाट्यावर भेटण्याचा दोघींचा प्लॅन असावा आणि त्या संदर्भातच हे मेसेजेस पाठवले गेले असावेत. त्यानंतर प्रियाचा फोन बंद आहे, पण स्वप्ना मात्रं अहमदाबाद हायवेवरुन गुजरातच्या दिशेने प्रवास करत होती असं दिसून येतं आहे. त्यानंतर सुमारे तासभर तिचा फोन सुरु होता, पण तलासरी ओलांडल्यावर संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून स्वप्नाचा फोनही बंद आहे. मात्रं रात्री सव्वा दहा वाजता दोघींचाही फोन सुरु झाला आहे आणि दोघींच्याही फोनचं लोकेशन आहे एकच आहे आणि ते म्हणजे नाशिक!"

"नाशिक?" कदम आता पार चक्रावले होते, "२३ तारखेला रात्री प्रिया नाशिकमध्ये होती आणि स्वप्नाही तिच्याबरोबर होती? मग ती पहाटे मढ आयलंडला कशी आली? आणि तिचा खून नक्की कुठे झाला सर?"

"रात्री साडेदहाला प्रिया आणि स्वप्नाने नाशिक सोडलं आहे आणि त्या मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. हायवे वरच्या प्रत्येक टॉवरला दोघींचेही फोन कनेक्ट झालेले आहेत. आग्रा रोडने ठाणा तिथून घोडबंदर रोडने बोरीवलीमार्गे पहाटे तीनच्या सुमाराला त्या मढ आयलंडला पोहोचलेल्या आहेत. त्यानंतर प्रियाचा फोन बंद आहे, पण स्वप्नाचा फोन मात्रं सुरु आहे. इनफॅक्ट पहाटे साडेपाच वाजता स्वप्नाचा फोन ठाण्यात आहे. मात्रं त्यानंतर तो बंद झालेला आहे. डू यू गेट इट कदम?"

"येस सर!" कदम विचार करत म्हणाले, "मोबाईल फोनच्या लोकेशन्सचा आणि वेळेचा विचार केला तर प्रिया आणि स्वप्ना शनिवारी दुपारी बोईसरला जाणार्‍या चिल्हार फाट्याजवळ भेटल्या. तिथून दोघी तलासरीपर्यंत गेल्या आणि तिथून नाशिकला! नाशिकहून निघाल्यावर पहाटे प्रिया मढ आयलंडला आली तेव्हा स्वप्ना तिच्याबरोबर होती आणि मग प्रियाचा खून झाल्यावर तिथून ठाण्याला गेली आणि गायब झाली. याचा अर्थ प्रियाचा खून स्वप्नाने केला आहे आणि ती फरार झाली आहे! करेक्ट?"

"तुम्ही परफेक्ट ट्रॅकवर आहात कदम, पण यात एक गडबड आहे हे तुमच्या लक्षात आलं?" रोहित गंभीरपणे म्हणाला, "एक म्हणजे चिल्हार फाट्यावरुन नाशिकला जायचं तर तलासरीपर्यंत जाण्याची गरज नाही. इनफॅक्ट तलासरीवरुन परत मागे फिरुन चारोटी नाक्यावरुन जव्हारमार्गे नाशिकला जावं लागेल. पण खरंतर चिल्हार फाट्यावरुन चारोटीपर्यंत न जाता मागे येऊन मनोर विक्रमगडवरुन जव्हारमार्गे नाशिक गाठणं जास्तं कन्व्हीनियंट आहे. असं असताना तलासरीपर्यंत जाण्याचं कारण काय? सर्वात महत्वाचं म्हणजे स्वप्नाने प्रियाला नाशिकहून मढ आयलंडवर आणून तिचा खून केला हे मान्यं केलं तरीही हे सगळं ती एकटी करणं शक्यच नाही. आय अ‍ॅम हंड्रेड अ‍ॅन्ड वन पर्सेंट शुअर तिचा किमान एकतरी साथीदार यात असलाच पाहिजे!"

तो इतक्या ठामपणे म्हणाला की कदम आणि नाईक दोघंही त्याच्याकडे पाहतच राहीले.

"व्हेरी सिंपल! स्वप्ना खून करु शकेल, पण रेप करणं शक्यंच नाही!" रोहित मिस्कीलपणे म्हणाला तसे दोघेही ओशाळले.

"दुसर्‍या अँगलने विचार केला आणि स्वप्नाने प्रियाला फक्तं मढ आयलंडपर्यंत आणलं पण प्रियाच्या खुनाची तिला पूर्वकल्पना नव्हती आणि तिचा त्यात काही हात नाही असं गृहीत धरलं तर? इन दॅट केस स्वप्ना एक अत्यंत महत्वाची विटनेस ठरते! खासकरुन खुनी व्यक्तीसाठी तर अत्यंत डेंजरस कारण प्रियाच्या खुनात तीच त्याला अडकवू शकते... आणि प्रियाचा खून झाल्यापासून ती गायब आहे!"

"बापरे! म्हणजे प्रियापाठोपाठ स्वप्नाही..." कदम त्या कल्पनेनेच हादरले.

"अशक्यं नाही कदम! पण स्वप्नाच्या बाबतीत एक गोष्टं मला खटकते आहे. प्रियाची बॉडी मढ आयलंडसारख्या भरपूर वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर टाकली आहे. वर्षाभरापूर्वी सुनेहाची बॉडीही अशीच बीचवर सापडली होती. मग स्वप्नाचा खून झाला असता तर तिची बॉडी कन्सिल करण्याचं कारण काय? ज्या अर्थी प्रियाला रेप करण्यात आलं आहे त्या अर्थी या सगळ्याच्या मागे स्वप्ना एकटी नाही हे पोलिस सहज ओळखू शकतील याचा खुनी माणसालाही अंदाज असणार! अंहं... आय हॅव अ फिलींग, स्वप्नाने प्रियाचा खून केला नसला असं मानलं तरी ती या सगळ्या भानगडीत तिचा मेजर रोल आहे हे निश्चित!"

"स्वप्ना खुनाच्या कटात सामिल होती आणि नंतर ती फरार झाली...." कदम विचार करत म्हणाले, "पण प्रियाचा खून करण्याचं स्वप्नाला काय कारण असावं सर?"

"प्रोफेशनल रायव्हलरी, प्रेमप्रकरण, जेलसी... एनीथिंग इज पॉसिबल! प्रिया आणि स्वप्ना ज्या स्टोरीवर काम करत होत्या असं रोशनीने सांगितलं त्याचाही काही संबंध असू शकतो. इनफॅक्ट आय हॅव अ गट फिलींग प्रियाच्या हत्येचं मूळ त्यातच आहे! त्या संदर्भात तिला असं काहीतरी सापडलं असावं ज्यामुळे बर्‍याच जणांच्या बुडाला आग लागली असती.... एक लक्षात घ्या, या सगळ्याचे राजकीय परिणाम होतील असा प्रियाने रोशनीजवळ उल्लेख केला होता. त्या दृष्टीने विचार केला तर किरण चव्हाण आमदाराचा मुलगा आहे आणि आता तो स्वत:ही इलेक्शनला उभं राहण्याच्या तयारीत आहे. कौशलच्या नावावर जी एस्कॉर्ट एजन्सी आहे त्याच्याआड सेक्स रॅकेट चालवलं जात असावं असं बोललं जातं. ही सगळी बॅकग्राऊंड असताना ऐन इलेक्शनच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर पडलं आणि यात किरणचं नाव आलं तर.... गेम ओव्हर! किरणची पोलिटीकल करीअर तर सुरु होण्यापूर्वी आटपलीच, पण आमदार चव्हाणांनाही याचा जोरदार फटका बसणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत एकच मार्ग उरतो तो म्हणजे प्रियाचं तोंड कायमचं बंद करणं! आता प्रियाला असा नेमका कोणता शोध लागला हे केवळ स्वप्नालाच माहीत असणार, पण प्रियाच्या खुनानंतर तीच गुल झाली आहे. सगळे डॉट्स कनेक्ट केले तर एकच निष्कर्ष निघतो कदम...."

रोहित बोलता-बोलता मध्येच थांबला आणि एकेक शब्द सावकाशपणे उच्चारत म्हणाला,

"प्रिया वॉज सोल्ड डाऊन द रिव्हर! तिने मिळवलेली माहिती ज्या व्यक्तीच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकत होती, त्याने स्वप्नाच्या मार्फत परस्पर तिचा काटा काढला असावा! एकतर ती इन्फॉर्मेशन त्या माणसाला विकून तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात स्वप्नाला भरपूर पैसे मिळाले असावेत किंवा ती इन्फॉर्मेशन स्वप्नाने स्वत:जवळच जपून ठेवली असावी! त्या इन्फॉर्मेशनच्या जोरावर ती त्या माणसाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने वाकवू शकते. अ ट्रम्प कार्ड! मला हीच शक्यता जास्तं वाटते कदम! जो पर्यंत तिच्यापाशी ती माहिती आहे तोपर्यंत ती सेफ आहे, पण ज्या क्षणी त्या माणसाच्या हातात ती इन्फॉर्मेशन पडेल, त्या क्षणी हर टाईम विल बी अप! इट्स अ डबल एज्ड स्वोर्ड."

"पण सर, प्रियाने शोधून काढलेल्या माहितीमुळे गोत्यात येण्याची शक्यता असलेला आणि त्यामुळेच तिच्या मृत्यूला कारणीभूत झालेला तो माणूस कोण? किरण चव्हाण? त्याचा आणि स्वप्नाचा काय संबंध? प्रियाच्या खुनानंतर स्वप्नाला गायब होण्याचं कारण काय? उलट लपून राहिल्यामुळे ती अधिकच संशयाच्या भोवर्‍यात सापडणार नाही का?"

"तो माणूस किरण असू शकतो तसाच आणखीनही कोणीही असू शकतो." रोहित विचार करत म्हणाला, "तो नेमका कोण आहे हे केवळ स्वप्नाच सांगू शकते! कदम, आपले सगळे खबरे, सगळे पंटर्स कामाला लावा. कोणत्याही परिस्थितीत स्वप्ना सापडलीच पाहिजे! दुसरं म्हणजे किरण आणि त्याच्या मित्रांपैकी कोणाकडे काळ्या रंगाची व्हॅन आहे का याचा छडा लावा. आणखीन एक, किरणचं भोईरवाडीचं जे फार्महाऊस आहे, त्याचा जो कोणी केअरटेकर किंवा माळी असेल त्याला गाठा. शुक्रवार किंवा शनिवारी - २२ / २३ तारखेला या पाचही जणांपैकी कोणी फार्महाऊस सोडून बाहेर गेलं होतं, गेले असल्यास कोण कोण गेले होते? परत कधी आले? कारने गेले होते का रिक्षा किंवा टॅक्सी मागवली होती? डिटेल इन्क्वायरी करा. बट बी केअरफुल! त्याला फारसा संशय येऊ देवू नका. मोस्ट इम्पॉर्टंट.... शुक्रवारी - २२ डिसेंबरच्या रात्री प्रिया फार्महाऊसवर किती वाजता आली होती आणि रात्री कधी आणि कोणाबरोबर बाहेर पडली हे शोधून काढा!"

कदम आणि नाईक थक्कं होऊन त्याच्याकडे पाहत राहीले.

"२२ डिसेंबरच्या रात्री साडेदहा वाजता प्रियाचा मोबाईल जेमतेम मिनीटभरासाठी कर्जत स्टेशनजवळच्या टॉवरला कनेक्ट झाला आहे!"

******

रोहित गंभीरपणे फोनवरचं बोलणं ऐकत होता. नुकताच तो कमिशनर मेहेंदळेंना भेटून आपल्या केबिनमध्ये परतला होता. प्रिया मल्होत्रा मर्डर केसचा आतापर्यंतचा रिपोर्ट आणि पुढील तपासाची त्याने कमिशनरसाहेबांना थोडक्यात माहिती दिली होती. आमदार चव्हाणांच्या मुलाचा यात संबंध असण्याची त्याने शंका व्यक्तं केल्यावर मेहेंदळेही गंभीर झाले होते. आमदार चव्हाण हे बडं प्रस्थं होतं. गृहमंत्र्यांशी त्यांची चांगली दोस्ती होती. इतकंच नव्हे तर लवकरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने या प्रकरणाचा तपास करण्याची कमिशनर मेहेंदळेंची सूचना होती. त्यांच्या ऑफीसमधून बाहेर पडतानाच त्याला तो फोन आला होता.

"पक्की खात्री आहे? मी कोणतीही चूक खपवून घेणार नाही हे लक्षात ठेव. सरळ उचलून आत टाकेन!" आत आलेल्या कदमना खुर्चीत बसण्याची खूण करत तो म्हणाला.

"काय प्रधान साहेब, आजपर्यंत कधी चुकीची खबर दिली का मी तुम्हाला? शंभर टक्के तीच गाडी होती. गाडीत दोघंजण होते. मस्तान नाक्यावर ती पोरगी त्यांच्या गाडीत बसली आणि गाडी पुढे निघून गेली."

"गाडीचा नंबर कळला?"

"नाही साहेब, अशी काही भानगड असेल हे त्यावेळेस माहीत नव्हतं!"

"ठीक आहे." फोन कट् करुन तो कदमांकडे वळला, "येस कदम? स्वप्नाचा पत्ता लागला?"

"नाही सर!" कदम नकारार्थी मान हलवत म्हणाले, "ती जणू हवेत विरुन गेल्यासारखी गायब झाली आहे सर! मी तिचा मोबाईल नंबर फॉलो करण्याचीही सूचना दिली आहे, पण २४ डिसेंबरच्या पहाटे साडेपाचला ठाण्याला तिचा मोबाईल ऑफ झाल्यावर पुन्हा ऑन झालेला नाही. इतकंच नव्हे तर इतर वेळी रेग्युलरली फेसबुक आणि ट्वीटर वापरणारी स्वप्ना तिथूनही गायब आहे. तिचे दोन्ही बँक अकाऊंट्स मी तपासले, पण त्यापैकी एकाही अकाऊंटमध्ये खूप मोठं डिपॉझीट झालेलं नाही. शनिवारी सकाळी अकरा वाजता तिने बोरीवली स्टेशनच्या एटीएममधून वीस हजार कॅश काढली आहे, पण त्यानंतर कुठेही एक पैसा काढलेला नाही किंवा डेबिट कार्डही वापरलेलं नाही!"

"इंट्रेस्टींग! किरण आणि कंपनीबद्दल काय कळलं?"

"भोईरवाडी इथल्या फार्महाऊसची देखभाल सखाराम नावाचा माणूस करतो. हा सखाराम फार्महाऊसचा वॉचमन कम माळी आहे. तो एक चांगला ड्रायव्हरही आहे. फार्महाऊसमध्ये वेळी-अवेळी येणार्‍या पाहुण्यांची योग्य ती बडदास्तं ठेवण्याचं काम त्याच्यावरच असतं, पण स्वैपाकाची जबाबदारी मात्रं त्याची बायको मंदा सांभाळते. फार्महाऊसच्या परिसरातच असलेल्या आऊटहाऊसमध्ये हे दोघं नवरा-बायको राहतात. सखारामचे आई-वडील चव्हाणांच्याच माणगाव इथल्या वडिलोपार्जित घराचे केअरटेकर आहेत.

किरणने गुरवारी संध्याकाळी सखारामला फोन करुन आपण आपल्या मित्रांसह दोन-तीन दिवस फार्महाऊसला येत असल्याची आणि त्याप्रमाणे सर्व तयारी करण्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे सखाराम आणि मंदाने दोन दिवसांच्या स्वयंपाकासाठी लागणारं सर्व सामान आणि खासकरुन मटण आणि कोंबड्या आणून ठेवल्या होत्या. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला किरण आणि रिझवान फार्महाऊसवर पोहोचल्यावर मात्रं किरणने बेत बदलला आणि त्या रात्रीचं आणि दुसर्‍या दिवशी सकाळपुरतंच जेवण करण्याची मंदाला सूचना दिली. इतकंच नव्हे तर दोघांना गावी जाऊन येण्यासाठी दोन दिवस सुट्टीही दिली! खरंतर सखाराम गावी जाण्यास तयार नव्हता कारण किरण आणि त्याचे मित्रं फार्महाऊसला असताना आपण गावी गेलो तर मोठे साहेब आपल्यावर चिडतील अशी त्याला भीती वाटत होती, पण किरणने त्याची समजूत घातली. आपला एक मित्रं उत्कृष्टं कूक आहे आणि खास त्याच्या हातचं नॉनव्हेज बनवून खाण्याचा प्लॅन आहे असंही त्याने सखारामला सांगितलं! सखाराम आणि मंदा संध्याकाळी माणगावला निघून गेले ते रविवारी दुपारी चार वाजता परत आले. त्यावेळेस किरण आणि त्याचे मित्रं फार्महाऊसमध्येच आराम करत होते!"

"याचा अर्थ, शुक्रवारी संध्याकाळपासून रविवारी दुपारी चारपर्यंत या पाच जणांपैकी कोणीही फार्महाऊस सोडून बाहेर गेलं असलं तर काहीही कळणार नाही!" रोहित गंभीरपणे म्हणाला, "प्रियाबद्दल काय कळलं? ती किती वाजता आली होती?"

"प्रियाबद्दल सखाराम किंवा मंदाला काहीही माहीत नाही सर! ते दोघं २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता माणगावला निघून गेले तेव्हा किरण, रिझवान, कौशल आणि उदय तिथे पोहोचले होते, पण धीरज आणि प्रिया दोघांपैकी कोणीही तिथे आलेलं नव्हतं. माणगावहून परत आल्यावर घरात साफसफाई करताना मंदाला एक हेअरक्लीप सापडली होती, पण ती किरणच्या फॅमिलीपैकी कोणाची तरी असेल म्हणून फारसा विचार न करता तिने ती कचर्‍यात टाकून दिली होती."

"हेअरक्लीप...." रोहित एकदम सावध झाला, "ती हेअरक्लीप प्रियाचीही असू शकते! कदम, किरण आणि इतर सर्वजण तिथे कोणत्या गाडीने आले होते हे कळलं?"

"किरण आणि रिझवान हे दोघं किरणच्या निळ्या होंडा सिटीने आले होते. कौशल आणि उदय लोकल ट्रेनने कर्जतला आणि तिथून रिक्षाने फार्महाऊसवर पोहोचले होते. धीरज एकटाच त्याच्या पांढर्‍या रंगाच्या डिझायरने आला होता. सोमवारी संध्याकाळी किरण, रिझवान आणि उदय किरणच्या कारमधून परतले तर कौशल धीरजबरोबर त्याच्या गाडीने गेला."

"होंडा सिटी आणि डिझायर.... त्यांच्यापैकी कोणाकडेही काळ्या रंगाची व्हॅन नाही?"

"किरणकडे काळ्या रंगाची स्कोडा आहे, पण बहुतेक वेळेस ही गाडी आमदार चव्हाणांच्या ताब्यात असते. त्याच्याव्यतिरिक्त रिझवानकडे काळ्या रंगाची इनोव्हा आहे. आणखीन एक महत्वाचं सर...." कदम अर्थपूर्ण नजरेने रोहितकडे पाहत म्हणाले, "मढ आयलंडवर मढ - मार्वे रोडपासून आत आणि दाणापाणी बीचपासून सुमारे एक - दीड किमीवर आमदार चव्हाणांचा बंगला आहे!"

"व्हॉ SS ट?" रोहित दचकला, "मढ आयलंडवर चव्हाणांचा बंगला आहे? माय गॉड कदम....."

"येस सर!" त्याचा रोख ओळखून कदमनी होकारार्थी मान हलवत म्हणाले, "प्रियाची बॉडी मढ आयलंडवर सापडते जिथे आमदार चव्हाणांचा बंगला आहे. प्रियाचा मोबाईल कर्जतच्या मोबाईल टॉवरला कनेक्ट झाला आहे जिथे चव्हाणांचं फार्महाऊस आहे. इतकंच नव्हे तर किरण चव्हाण आपल्या मित्रांसह त्यावेळेस फार्महाऊसवर हजर आहे!"

"आणि.... दुसर्‍या दिवशी, २३ डिसेंबरच्या शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमाराला अहमदाबाद हायवेला मनोर गावाजवळच्या मस्तान नाक्यावर स्वप्ना एका काळ्या रंगाच्या इनोव्हामध्ये बसून गेली होती अशी आपल्या पंटरची खबर आहे!" रोहित शांतपणे म्हणाला.

"सर... ??" आता धक्का बसायची पाळी कदमांची होती.

"येस! मी कालच म्हटल्याप्रमाणे प्रियाच्या खुनाच्या कटात स्वप्ना सामिल होती हे उघड आहे. चिल्हार फाट्यावरुन प्रियाला पिकअप करुन तलासरी - नाशिक इथे भटकावून स्वप्नाने तिला मढ आयलंडवर आणलं आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. चलो कदम, जरा रिझवानमियांकी खैरीयत पूछकर आएंगे!"

******

जुहू-विलेपार्ले स्कीममध्ये एका उच्चभ्रू विभागातल्या एका शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावर रिझवानचा हेल्थ क्लब होता. पार्कींग लॉटमध्ये उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांवरुन तिथे खरेदीसाठी आणि जिममध्ये येणार्‍या लोकांच्या आर्थिक संपन्नतेची सहज कल्पना येत होती. तळमजल्यावरच दुसर्‍या टोकाला मोठं कॉफी शॉप होतं. कॉलेजच्या मुला-मुलींनी ते गच्चं भरलेलं होतं. मधूनच जिममध्ये घाम गाळून बाहेर पडलेला एकादा तरुण किंवा शॉपिंग आटपून हाततल्या पिशव्या सांभाळत बाहेर पडणार्‍या तरुणींचा ग्रूप दृष्टीस पडत होता. अशा वातावरणात पोलिसांची जीप तिथे येऊन धडकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या नसत्या तरच आश्चर्य!

रोहितने शॉपींग कॉम्प्लेक्सवरुन एकवार नजर फिरवली आणि कदम आणि नाईकांसह तो जिमच्या दिशेने निघाला. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काळ्या रंगाची इनोव्हा पार्क केलेली होती. गाडी दृष्टीस पडताच त्याने कदमांकडे एक अर्थपूर्ण कटाक्षं टाकला आणि दार ढकलून तो आत शिरला. कोणत्याही जिममध्ये असेल तसंच तिथलं वातावरण होतं. वेगवेगळ्या वयाचे स्त्री-पुरुष इन्स्ट्रक्टर्सच्या सूचनेनुसार अनेकविध साधनांच्या सहाय्याने व्यायामात मग्नं होते. रोहित आणि त्याच्यापाठोपाठ आत शिरलेल्या युनिफॉर्ममधल्या कदम आणि नाईकना पाहून सर्वजण चकीत झाले. जिमचा मॅनेजर लगबगीने त्यांच्याजवळ आला.

"रिझवान कुठे आहे?"

कदमनी अशा आवाजात विचारलं की मॅनेजरची हवा तंग झाली. एक शब्दही न बोलता त्यांच्यासह तो आतल्या भागात असलेल्या एका लहानशा खोलीत आला. रिझवान तिथे दोन माणसांशी बोलत बसला होता. मॅनेजरच्या पाठोपाठ पोलिस आत शिरलेले पाहून तो एकदम चपापला. पोलिसांना पाहताच त्याच्यासमोर बसलेले दोघं आणि मॅनेजर कधीच बाहेर सटकले होते.

"कैसे हो रिझवानमियां?" रोहितने आरामात खुर्चीत बसत विचारलं, "सब खैरीयत?"

"जी… ठीक हूं साब!" रिझवान कसाबसा सावरत म्हणाला, "अल्लाताला की मर्जी और आपकी दुवा है!"

"दुवा की तो आपको जरुरत पडेगी रिझवानमियां... शायद दवा की भी!" तो पूर्वीच्याच सहजपणे म्हणाला, पण रिझवानच्या चेहर्‍यावर काळजीची छटा उमटली.

"मै कुछ समझा नहीं साब! आप क्या कहना चाहते है?"

"समझ जाओगे.... एक बात बताईये रिझवानमियां, बाहेर जी गाडी उभी आहे, ब्लॅक इनोव्हा, ती तुझी आहे?"

"हां साब! मेरी ही है!"

"कोण चालवतं ती गाडी? तू चालवतोस का अजून कोणी?"

"जी साब, मै ही चलाता हूं! और कोई नहीं चलाता!"

"बहोत खूब! एक बात बताओ मिंया, गेल्या आठवड्यात - शुक्रवारी तू कुठे होतास?"

"पिछले हप्ते जुम्मेके दिन मै भाई और अपने दोस्तोंके साथ भाईके फार्महाऊसपर गया था साब!"

"कधी परत आलास?"

"सोमवार की शामको हम सब आए थे साब! मै भाई के साथ उनकी गाडीमेही आया था. हमारा और एक दोस्त उदय भी था!"

"शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी संध्याकाळपर्यंत तू फार्महाऊसवरच होतास?"

"बिल्कूल साब! बस दो-तीन बार हम वहां नदीमे तैरने गए थे और मार्केट गए थे!"

"तो फिर रिझवानमियां, आपकी गाडी शनिचरके दोपहरको अहमदाबाद हायवेपर मस्तान नाकेपर क्या कर रही थी?"

रिझवान एक क्षणभर दचकलाच, पण लगेच स्वत:ला सावरुन म्हणाला,

"आपको कुछ गलतफहमी हुई है साब! मै भाईके फार्महाऊसपरही था. मेरी गाडी चार दिनसे यहींपर पार्कींग में खडी थी!"

"रिझवानमियां, तुझी गाडी मस्तान नाक्यावर होती आणि त्या गाडीत बसून स्वप्ना गुजरातच्या दिशेला गेली अशी आम्हाला पक्की खबर मिळाली आहे! तेव्हा खोटं बोलून काहीही फायदा नाही! स्वप्नाला ओळखतोस ना? स्वप्ना देशमुख?"

"नहीं साब! मै किसी सपनाको नहीं जानता!""

"अच्छा? तो फिर ये बताओ रिझवानमियां, प्रिया फार्महाऊसवर कधी आली होती?"

"प्रिया...." रिझवान चाचरत म्हणाला, "कौन प्रिया साब? मै किसी प्रिया को नहीं जानता!"

"प्रिया मल्होत्रा, जिचा रेप करुन खून करण्यात आला आणि तिची बॉडी मालवणी पोलिसांना मढ आयलंडवर सापडली." रोहित त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, "ती एका चॅनलची न्यूज रिपोर्टर होती आणि शुक्रवारी रात्री कर्जतला आली होती. आठवलं?"

"माफ किजीए साब, मुझे इस बारेमें कुछ पता नहीं!" रिझवान त्याची नजर चुकवत म्हणाला, "ना तो मै किसी सपना को जानता हूं और ना किसी प्रिया को! जुम्मेरोजसे सोमवारतक मै भाई और अपने दोस्तोंके साथ भाईके फार्महाऊसपर था! आप चाहे तो उनसे पता कर लिजिए! ना तो मै कभी गुजरात गया था और ना ही मेरी गाडी वहां गई थी! आपको कुछ गलत जानकारी मिली है साब! आप बेवजह ही मुझपर शक कर रहे हो!"

"अच्छा? चल, जरा तुझी गाडी दाखव पाहू!"

रिझवान तिघांसह पार्कींग लॉटमध्ये आला आणि त्याने गाडी अनलॉक केली. आतूनबाहेरुन एकदम चकाचक असलेली आणि घासून-पुसून लख्ख केलेली गाडी पाहून आपल्या हाती काही लागणार नाही याची रोहितला त्याचक्षणी कल्पना आली. सुमारे पंधरा-वीस मिनीटं गाडी नीटपणे तपासून झाल्यावर कदमनी नकारार्थी मान हलवली.

"ठीक है रिझवानमियां!" गाडीची किल्ली त्याच्या हातात देत रोहित म्हणाला, "फिलहाल तो हम चलते है! जरुरत पडी तो दोबारा फिरसे आएंगे! अब तो मुलाकात होती रहेगी!"

"जैसा आप मुनासिब समझे साब!" रिझवान सुटकेचा नि:श्वास टाकत म्हणाला, "खुदा हाफीज!"

"त्या रिझवानला तुम्ही असाच सोडायला नको होता साहेब!" पोलिसांची जीप शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारातून बाहेर पडली तसे नाईक म्हणाले, "धडधडीत खोटं बोलत होता तो! त्याला आत घेऊन ठोकला असता तर दहा मिनीटांत सगळं कबूल केलं असतं त्याने!"

"रिझवान खोटं बोलत होता हे तर उघड आहे नाईक!" रोहित शांतपणे म्हणाला, "बट अनफॉर्च्युनेटली केवळ सस्पेक्ट म्हणून त्याला उचलण्याइतकाही पुरावा सध्यातरी आपल्या हातात नाही. आपण प्रियाला किंवा स्वप्नाला ओळखत असल्याचं त्याने सरळ सरळ नाकारलंच आहे. दुसरं म्हणजे त्याच्या गाडीचा खरा नंबर आणि आपल्या पंटरने कळवलेला नंबर हा वेगवेगळा आहे. अर्थातच त्यावेळी त्याने खोटी नंबरप्लेट लावली असणार, पण ती खोटी नंबरप्लेट सापडेपर्यंत आपण तसं सिद्ध करु शकणार नाही. सर्वात महत्वाचं आपण कर्जतला फार्महाऊसवर होतो हे सांगणारे चार साक्षीदार तो उभे करु शकतो. असं असताना त्याला अ‍ॅरेस्ट करण्यासाठी आपल्याला वॉरंटही मिळणार नाही."

"पण मग, आता काय करायचं सर?" कदमनी विचारलं.

"एक काम करा कदम, या रिझवानवर बारीक लक्षं ठेवा. तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, काय बोलतो सगळी डिटेल माहिती काढा! दुसरं म्हणजे आमदार चव्हाणांच्या चिरंजीवांचं सध्या काय सुरु आहे आणि ते कुठे भेटतील याचा पत्ता लावा! आणि सर्वात महत्वाचं.... " रोहित विचार करत म्हणाला, "स्वप्नाबद्दल स्टेटवाईड अ‍ॅलर्ट पाठवण्याची व्यवस्था करा. राज्यातल्या प्रत्येक पोलिस स्टेशनला तिचा फोटो, तिचं वर्णन आणि संपूर्ण माहिती गेली पाहिजे. काय वाट्टेल ते झालं तरी स्वप्ना सापडलीच पाहिजे!"

******

कदम आणि नाईकांसह रोहित आमदार चव्हाणांच्या संपर्क कार्यालयात पोहोचला तेव्हा किरण तिथेच हजर होता. त्याच्यासमोर पक्षाचे काही कार्यकर्ते बसलेले होते. प्रिया मल्होत्राच्या खुनाची सीआयडींतर्फे चौकशी सुरु आहे आणि त्या संदर्भात पोलिस चौकशी करुन गेल्याचं त्याला धीरज आणि रिझवानकडून कळलं होतं. परंतु आपले वडील आमदार असल्याने पोलिस आपल्याकडे चौकशीला येणार नाहीत अशी त्याची खात्री होती. पक्ष कार्यालयात पोलिसांना पाहून तो काहीसा अस्वस्थं झाला होता, परंतु बेरकीपणा रक्तातच असल्याने चेहर्‍यावरची रेषही हलू न देता पोलिस आल्याचं आपण पाहिलंच नाही अशा थाटात समोर बसलेल्या कार्यकर्त्यांचं बोलणं ऐकण्याचं आपलं नाटक त्याने सुरु ठेवलं. रोहित काहीच न बोलता शांतपणे ते कार्यकर्ते उठण्याची वाट पाहत होता, पण कदमना मात्रं ते मानवलं नाही. किरणच्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना सरळ उठवत ते म्हणाले,

"चला निघा आता! तुमच्या साहेबांना आम्हाला काही प्रश्नं विचारायचे आहेत!"

कदमांच्या या धडकेने किरण खरंतर हादरला होता, पण महत्प्रयासाने त्याने आपला चेहरा कोरा ठेवण्यात यश मिळवलं.

"साहेब हा काय प्रकार आहे? हे माझ्या पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी अशी दादागिरी करणं मला सहन होणार नाही. मी कमिशनर साहेबांकडे तुमची तक्रार करेन!" तक्रारीच्या सुरात तो म्हणाला.

"मि. चव्हाण, तुम्ही कमिशनर साहेबांकडे किंवा गृहमंत्र्यांकडेही खुशाल तक्रार करा, आमचं काही म्हणणं नाही! पण त्यापूर्वी पोलिसांच्या तपासकामात आणि ते देखिल खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात अडथळे आणल्याची तुमच्यावर केस होईल एवढं लक्षात घ्या! माझ्या मते इलेक्शनच्या वेळेला अशी केस होणं तुम्हाला परवडणार नाही, कारण तुमचे विरोधक अशा गोष्टीच्या शोधातच असतील तेव्हा हे सगळं तुम्हाला कितीला पडेल? त्यापेक्षा आमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुम्हालाही त्रास नाही आणि आमचंही काम सोपं होईल! चॉईस इज युवर्स!"

रोहित किरणवर नजर रोखत शांत परंतु धारदार स्वरात म्हणाला. किरणचा चेहरा पूर्वीप्रमाणेच कोरा होता, पण त्याच्या डोळ्यांत खळबळ माजली होती. खरंतर तो मनातून भडकला होता. खुद्दं आमदाराच्या मुलाला दम देण्याची या इन्स्पेक्टरची हिम्मत कशी झाली? ते देखिल पक्ष कार्यकर्त्यांसमोर? या इन्स्पेक्टरला चार सणसणीत शब्दं सुनावून हाकलून द्यावं अशी तीव्र इच्छा त्याला होत होती, पण निवडणूक आटपेपर्यंत 'रागावर नियंत्रण ठेव आणि कोणताही आततायीपणा करु नकोस' असं वडीलांनी बजावून सांगितल्याचंही त्याच्या ध्यानात होतं. लवकरात लवकर पोलिसांना कटवण्याचा निश्चय करुन त्याने आपल्या कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची खूण केली.

"बोला साहेब, काय सेवा करुन शकतो आपली? सॉरी हं मी जरा जास्तंच बोलून गेलो." नम्रतेचा आव आणत नाटकीपणे तो म्हणाला.

"मि. चव्हाण, तुमचं माणगावला घर आहे?"

"हो आहे!" किरण गोंधळला. माणगावच्या घराचा इथे काय संदर्भ आहे त्याला कळेना, "ते घर अण्णांनी म्हणजे माझ्या आजोबांनी बांधलं होतं. तिथे आमची बरीच मोठी वाडीही आहे. अण्णांच्या मागे ते माझ्या वडिलांना - आमदार चव्हाण - मिळालं. त्याचं काय?"

"आणि कर्जतलाही तुमचं फार्महाऊस आहे म्हणे?"

"साहेब, तुम्ही पोलिसच आहात ना? का इन्कम टॅक्सवाले? नाही प्रॉपर्टीची चौकशी करत आहात म्हणून आपलं विचारलं."

"मढ आयलंडवरही तुमचा एक बंगला आहे राईट?" रोहितने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करुन विचारलं.

किरणने काहिही न बोलता केवळ होकारार्थी मान हलवली. हे सर्व विचारण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू असावा याचा अद्यापही अंदाज येत नव्हता.

"गेल्या शुक्रवारी तुम्ही कर्जतच्या फार्महाऊसला गेला होतात?"

"हो गेलो होतो." किरण आता सावध झाला, "मी आणि माझे चार मित्रं गेलो होतो. सोमवारी संध्याकाळी परत आलो!"

"अच्छा! काय केलंत तिथे चार दिवस?"

"काही खास असं नाही साहेब! बर्‍याच दिवसांत सगळ्यांशी भेट झाली नव्हती, त्यामुळे तीन-चार दिवस रोजच्या धकाधकीपासून मित्रांबरोबर जरा आऊटींग एवढाच हेतू होता. एकदा इलेक्शन लागलं की मग प्रचाराच्या गडबडीत कोणालाच भेटायला वेळ मिळणार नाही. अनायसे चार दिवस सुट्टीही आलीच होती."

"इतर वेळेला कोण असतं तिथे फार्महाऊसवर? कोणी केअरटेकर?"

"सखाराम आणि मंदा म्हणून एक नवरा-बायको आहेत ते राहतात तिथे. सखाराम आमचा वॉचमन कम् माळी कम् अगदीच गरज लागलीच तर ड्रायव्हरही आहे. त्याची बायको मंदा कुक आहे! सखारामचे आई-वडील आमचं माणगावचं घर पाहतात."

"तुम्ही फार्महाऊसवर असताना हे दोघं होते तिथे?"

"शुक्रवारी आम्ही तिथे गेलो तेव्हा दोघं तिथेच होते. पण संध्याकाळी दोघं गावाला निघून गेले. म्हणजे मीच पाठवलं त्यांना कारण बर्‍याच दिवसांत एकतर सखाराम गावाला गेला नव्हता, दुसरं म्हणजे माझा मित्रं उदय एक चांगला कुक आहे आणि या ट्रीपच्या निमित्ताने त्याच्या हातचं नॉनव्हेज खाण्याचा आमचा प्लॅन होता, त्यामुळे तसंही आमचं काही फारसं अडणार नव्हतं!"

"अछा! स्वप्ना ठाण्याला राहते ना?"

"नाही... बोरीवलीला!" किरण बोलून गेला. मग एकदम सावरत तो म्हणाला, "कोणती स्वप्ना साहेब?"

"स्वप्ना देशमुख! बोरीवलीला राहणारी! चॅनलची रिपोर्टर आहे ना ती?"

"स्वप्ना देशमुख?" किरण गोंधळला, "नाही साहेब, ज्या स्वप्नाबद्दल मी बोलत होतो ती स्वप्ना श्रीवास्तव! ती माझी कॉलेजमधली जुनी गर्लफ्रेंड होती साहेब! गेल्या वर्षीच तिने एका ख्रिश्चन मुलाशी लव्हमॅरेज केलं. ती बोरीवलीला आयसी कॉलनीत राहते!"

रोहितने किरणकडे रोखून पाहिलं. किरणच्या एकंदर अविर्भावावरुन तो खरं बोलत असावा असा कोणाचाही ग्रह झाला असता, पण तो बेमालूम अ‍ॅक्टींग करतो आहे याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती. किरणही आता सावध झाला होता. या इन्स्पेक्टरशी बोलताना सतत सावध राहून आणि जपूनच बोललं पाहिजे अन्यथा तो आपल्याला शब्दात अडकवल्याशिवाय राहणार नाही!

"तुम्ही चारही दिवस नक्की फार्महाऊसवरच होतात?"

"चोवीस तास तर एकाच ठिकाणी पडून राहू शकत नाही साहेब! आमच्या फार्महाऊसपासून काही अंतरावर नदी आहे, दोन-तीनदा तिथे स्विमिंगला गेलो होतो. कर्जतला मार्केटमध्ये गेलो होतो. एक दिवस पेठच्या किल्ल्यावर जाण्याचा प्लान होता, पण कोणालाच त्यात इंट्रेस्ट नव्हता!"

"शनिवारी - २३ डिसेंबरला तुम्ही कुठे होतात?"

"ऑफकोर्स फार्महाऊसवर! मला कळत नाही साहेब, तुम्ही पुन्हा-पुन्हा तेच का विचारत आहात? आतापर्यंत तीन वेळा हाच प्रश्नं तुम्ही विचारुन झाला आहे!"

"तुम्ही कर्जतला कोणत्या गाडीने गेला होतात?"

"माझी होंडा सिटी नेली होती साहेब. धीरज त्याची डिझायर घेऊन आला होता."

"अच्छा? मग रिझवानची इनोव्हा कर्जतला कोणी आणली?"

"इनोव्हा? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब! रिझवान जाताना आणि येताना माझ्याच गाडीत होता. त्याची इनोव्हा त्याच्या जिमबाहेरच होती चार दिवस!"

"पण मग स्वप्ना रिझवानच्या इनोव्हातून गुजरातला कशी काय गेली?"

"शक्यंच नाही साहेब! रिझवान आपली गाडी कोणालाही चालवायला देत नाही! तो चार दिवस आमच्याबरोबर कर्जतला असताना त्याची गाडी कोणी घेऊन जाईल हे अशक्यं आहे. ती दुसरी कोणतीतरी इनोव्हा असेल!"

"प्रिया फार्महाऊसवर कधी आली?"

"कोण प्रिया साहेब?" किरण या वेळेस सावध होता.

"प्रिया मल्होत्रा! तुमचा मित्रं आहे ना धीरज सक्सेना, त्याची गर्लफ्रेंड!"

"धीरजची गर्लफ्रेंड?" किरणने आश्चर्याने विचारलं, "नाही साहेब! धीरज कधी बोलला नाही."

"आश्चर्य आहे! प्रिया शुक्रवारी - २२ डिसेंबरच्या रात्री कर्जतला आली होती. त्यावेळेस तुम्ही सर्वजणही फार्महाऊसवरच होतात ना? काय योगायोग आहे नाही? शनिवारी - २३ डिसेंबरच्या सकाळी ती मढ आयलंडला होती आणि २४ डिसेंबरच्या सकाळी मढ आयलंडलाच तिची बॉडी सापडली. ती देखिल कुठे तर मढ आयलंडवरच्या तुमच्या बंगल्यापासून जेमतेम एक - दीड किमीवर... रिअली अ स्ट्रेंज कोइन्सिडन्स!"

रोहित किरणच्या नजरेला नजर देत अशा काही सुरात म्हणाला की त्याची चांगलीच टरकली.

"तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे साहेब?" उसनं अवसान आणत त्याने विचारलं.

"असं आहे ना मि. चव्हाण.... " रोहित पुढे काही बोलण्यापूर्वीच त्याचा मोबाईल वाजला. कमिशनर मेहेंदळे!

"हॅलो सर...."

"........."

"बट सर......"

"........."

"ऑलराईट सर! असंही आटपलंच आहे सर! आम्ही निघतो!"

कदम रोहित आणि किरणच्या चेहर्‍यावरचे भाव आळीपाळीने निरखत होते. त्याचा मोबाईल वाजलेला पाहून किरणने सुटकेचा श्वास सोडल्याचं त्यांनी अचूक टिपलं होतं. पोलिस खात्यातल्या अनुभवाने साधारण काय झालं होतं याचा त्यांना अंदाज आला होता.

"काय झालं सर? कमिशनर साहेबांचा फोन?" कदमनी विचारलं.

"काही नाही कदम! चला मि. चव्हाण, आम्ही निघतो! आमदारसाहेबांना आमचा नमस्कार सांगा!"

"सॉरी साहेब, मी तुमची काही मदत करु शकलो नाही!" किरण छद्मीपणे हसत म्हणाला. त्याचा नम्रतेचा अविर्भाव गळून पडला होता, "पुन्हा कधी गरज लागली तर बिनधास्त कळवा साहेब. आम्ही इथेच आहोत, कुठेही जात नाही!"

"चालायचंच...चला कदम!" रोहित दारापर्यंत गेला आणि अचानक मागे वळला,

"किरण चव्हाण, बापाच्या जीवावर वरुन प्रेशर आणून केस दाबण्याचा प्रयत्नं जो आज तू केलास, तो पुन्हा केलास तर तुलाच नाही तर त्यांनाही महागात पडेल एवढंच लक्षात ठेव. ही तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे! यापुढे तुझ्या प्रत्येक उद्योगावर माझी नजर असेल हे विसरु नकोस!"

******

कमिशनर मेहेंदळे गंभीरपणे रोहितचं बोलणं ऐकत होते.

किरण चव्हाणला चौकशीदरम्यान नेमकं खिंडीत गाठलेलं असतानाच कमिशनर साहेबांच्या फोनमुळे तिथून बाहेर पडावं लागल्यामुळे तो मनातून भडकला होता. पक्ष कार्यालयात पोलिस चौकशीला आल्याचं आणि किरणला प्रश्नं विचारत असल्याचा एका कार्यकर्त्याने आमदार चव्हाणांच्या सेक्रेटरीला फोन केला होता. सेक्रेटरीने ही बातमी आमदार चव्हाणांच्या कानावर घातली तेव्हा नेमके ते गृहमंत्र्यांबरोबर होते. चव्हाणांनी ही बातमी त्यांच्या कानावर घालताच त्यांनी थेट कमिशनर मेहेंदळेंना फोन केला होता. खुद्दं गृहमंत्र्यांचा फोन आल्यामुळे नाईलाजानेच रोहितला फोन करुन चौकशी आवरती घेण्याचा आदेश त्यांना द्यावा लागला होता.

किरणच्या पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यावर खवळलेल्या रोहितने त्याच पावली कौशल संपत आणि उदय इनामदार यांना गाठून फैलावर घेतलं होतं, पण त्या दोघांनीही त्याला दाद दिली नव्हती. किरण, रिझवान आणि धीरज यांच्या सुरात सूर मिसळून शुक्रवारी - २२ डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते सोमवारी - २५ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत आपण इतर तिघांबरोबर फार्महाऊसवरच होतो हेच दोघंही घोकत होते. प्रिया मल्होत्रा किंवा स्वप्ना देशमुख यांच्यापैकी कोणालाही आपण ओळखत नसल्याचंही त्यांनू ठासून सांगित्लं. रोहितने कौशलला त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि एस्कॉर्ट कंपनीवरुनही बरंच छेडून पाहिलं. या कंपनीसाठी आवश्यक असलेलं भांडवल किरणने दिल्याचं कौशलने कबूल केलं, पण आपली कंपनी केवण एस्कॉर्ट्स पुरवते आणि त्यांच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारे गैरप्रकारात गुंतलेलं नसल्यावर तो ठाम होता.

स्वप्नाबद्दल राज्यभरातल्या सर्व पोलिस स्टेशन्सना पाठवलेल्या पोलिस नोटीसचा काहीही उपयोग झालेला नव्हता. एक महिना उलटून गेला तरी तिच्याबद्दल काहीही कळू शकलं नव्हतं. स्वप्नाचे आईवडील हयात नव्हते. ती मुंबईत एकटीच राहत होती, पण पुणे आणि औरंगाबादला राहणार्‍या तिच्या नातेवाईकांकडूनही काहीही माहिती मिळू शकली नव्हती. त्यांच्यापैकी कोणाशीही तिचा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नव्हता. तिच्या बँक अकाऊंटमधूनही एक नया पैशाचा व्यवहार झाल्याचं दिसून येत नव्हतं. रोहितने सायबर सेलची मदत घेऊन स्वप्नाचे सोशल नेटवर्कींगवरचे अकाऊंट्सही तपासून पाहिले, पण २४ डिसेंबरनंतर तिने एकदाही कोणत्याही सोशल नेटवर्कींग साईटवर लॉग-इन केलेलं नव्हतं असं आढळून आलं. सायबर सेलचीच मदत घेऊन सुनेहा त्रिवेदीच्या केसमधल्या तिचा मित्रं समीरचाही शोध सुरु होता. समीर पुण्याचा असल्याची बतावणी करत असला तरीही त्याचं फेसबुक अकाऊंट अंधेरीच्या सात बंगला परिसरातून ऑपरेट करण्यात येत होतं असं उघडकीस आलं होतं, पण तिथल्या एका कॉफी शॉपच्या वाय-फाय नेटवर्कचा यासाठी वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आल्यामुळे पुढे तपास खुंटला होता.

रोहितच्या सूचनेवरुन किरण, धीरज, रिझवान, उदय आणि कौशल यांच्यावर कदम आणि नाईकांनी बारीक नजर ठेवली होती. आमदार चव्हाणांनी किरणसाठी लावलेली सारी फिल्डींग निष्फळ ठरली होती. त्यांच्या पक्षाने किरणच्या ऐवजी दुसर्‍याच उमेदवाराला निवडणूकीसाठी तिकीट दिलं होतं. किरणने बंडखोरी करुन आपली उमेदवारी दाखल केली होती खरी, पण आयत्या वेळेस पक्षप्रमुखांनी डोळे वटारल्यावर त्याचा अर्ज परत घेणं चव्हाणांना भाग पडलं होतं. परंतु किरणची गुर्मी आणि मग्रूरी मात्रं तसूभरही कमी झाली नव्हती.

सुरवातीचे काही दिवस प्रियाचा खून आणि स्वप्ना गायब झाल्यावरुन तिच्या चॅनलने, खासकरुन स्टेशन डायरेक्टर फर्नांडीसनी पोलिसांवर सतत टीकेचा सूर धरला होता. अखेर सुमारे दोन महिन्यानंतर सीआयडीनी प्रियाच्या हत्येत स्वप्ना मुख्य संशयीत असल्याची आणि ती देशाबाहेर पळून गेली असल्याची शक्यता वर्तवणारी प्रेसनोट मिडीयाला पाठवल्यावर मात्रं चॅनलवरुन ही बातमी एकदम दिसेनाशी झाली!

सहा महिने उलटून गेल्यानंतरही तपास एक इंचभरही पुढे सरकलेला नव्हता. प्रिया आणि सुनेहाच्या खुनामागे किरण आणि त्याची मित्रंमंडळी आहेत तसंच कौशलच्या एस्कॉर्ट कंपनीच्या आड चालवण्यात येत असलेल्या सेक्स रॅकेटशी याचा निश्चित काहीतरी संबंध आहे याबद्दल रोहितची पक्की खात्री होती, परंतु आकाशपाताळ एक करुनही त्याच्या हाती काहीही लागत नव्हतं. आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत ही पहिलीच केस अशी ठरली होती जी अनसॉल्व्ह्ड म्हणून नोंदली गेली होती. कमिशनर मेहेंदळेंनी त्याला बाकीच्या केसेसवर लक्षं केंद्रीत करण्याची सूचना दिली, परंतु रोहित हार मानण्यास तयार नव्हता.

"व्हॉटेव्हर हॅपन्स सर, नो मॅटर व्हॉटेव्हर अमाऊंट ऑफ टाईम इट टेकस्, जोपर्यंत प्रियाचे खुनी पकडले जात नाहीत तोपर्यंत माझ्यासाठी ही केस कायमच ओपन आणि अंडर इन्व्हेस्टीगेशन राहील सर! बाकीच्या कितीही केसेस आल्या तरीही!"

******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झकास...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्कंठेने वाचतो आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मस्त. एकदम गुंगवून टाकता वाचकांना. पण एक छोटी शंका, आरोपीचे व पीडीतेचे रक्त वा केस इ. गोष्टी DNA टेस्ट करून बलात्कारानंतर आरोपीविरोधात वापरता येतात. यापैकी पोलीसांनी काहीच केले नाही. याचे जरा आश्चर्य वाटले. पुलेशु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पब्लिक वाय फाय जरी वापरलं तरी ज्या वेळी ते वापरलं त्यावेळचं काही cctv फुटेज किंवा डिव्हाईसची माहिती असा काहीतरी track राहात असावा. आताच्या दिवसांत कोणी व्यक्ति पब्लिक प्लेसला, मेट्रो सिटीत वाय फाय इ. टेक्नोलॉजी वापरुनही नंतर खरोखर हवेत विरल्यासारखा अनट्रेसेबल राहात असू शकेल ?

पण एकूण प्रकार उत्कंठा वाढवणारा आहे भरपूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

jabaradast utkantha vaadhavanari katha aahe..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************