कल्ला

मुंबईतनं आलेलो इथे. सगळे बोललेले की लहान गावात कशाला जाताय तुम्ही म्हणून. पण हे काय लहान गाव नाही, आणि मोठं शहरपण नाय वाटत. मालाडला स्टेशनजवळ घर होतं आपलं मस्त. पोरं जास्तकरुन गुजराती. मेहुल, राजेश, निलेश अशी. थोडी आपल्यासारखी. मराठी. परब, कांबळी, करमरकर वगैरे. पण इथे सगळेच मराठी. आणि बोलायला भेंडी एका वाक्यात १-२ शिव्या तर येणार म्हणजे येणारच! शिवाय इथलं घर मोठं आहे. ४ खोल्या आहेत. मस्त एरिया आहे, झाडीबिडी आहे आजुबाजुला. शाळा आहे जरा लांब पण काय फरक पडत नाही.

इथे कोणाला क्रिकेटमधलं काय माहितीच नाही. रिचर्डसनी लिलीची धुलाई केली म्हटलं तर विचारतात त्यो कोण? भेंडी यांना रिचर्डस माहित नाही तर सोबर्स, वेस्ली हॉल, विक्स, लॉईड काय माहिती असणार यांना? ओवरमध्ये सहा सिक्सर मारले कोणी, कॉन्ट्रॅक्टरची कवटी फुटली तो बॉल कोणी टाकला, सोलकर कुठल्या पोझिशनला फिल्डिंग करायचा, गावस्कर हेल्मेट का घालत नाही हे असले टॉपिक म्हणजे आपला एकदम असली इंटरेस्ट. पण इथे च्यायला कोणाला काय माहितच नाय. प्रश्न विचारला तर भूत बघितल्यासारखं बघून, मुंबईचा पोरगा लऽय श्याना हाईस म्हणतात. तेवढं एक मुंबईचं भारी असतं. भेंडी क्रिकेट म्हणजे नुस्ता कल्ला असतो जिकडे बघाल तिकडे. सकाळी डबा टाकायला रांगेत उभे असलेले पण कालच्या मॅचची अनॅलिसिस करत असतात!

शाळेत जाताना वाटेत गोठा लागतो, तिथे आमच्या वर्गातला गजा कधीकधी शेण पाटीत भरून देताना दिसतो. त्याच्या घराच्या भिंतीवर शेण्या सुकायला लावलेल्या असतात. समोर सुक्या शेण्यांची थप्पी मांडलेली असते. आजुबाजुचे बरेच लोक शेण्या घ्यायला येतात आणि पेलाभर गोमुत्र पण घेऊन जातात सकाळी सकाळी. कसलं बेक्कार वाटतं ना ते बघून! च्याऽयला, गाय म्हणजे काय मशिन आहे का हात लावला की मुतायला? असंच पुढे गेलं शाळेकडे की बंगल्यातली रुपी रहाते. तिच्या घराच्या बाहेर कुत्र्याची पाटी लावलेली आहे आणि आपण तर एकदा तिला विचारलं वर्गाबाहेर का कोणता कुत्रा आहे तुझ्याकडे? ती तर काय बोललीच नाही आणि वर्गातले पोरं पण जाम हसले मला, पोरींशी बोलतो म्हणून. त्यात काय येवढं? आपण तर बोलतो, आणि इथे सगळंच उलटं. आपण आपट्याला सांगितलं, आपट्या आपला नवीन दोस्त इथला, का पोरी म्हणजे आपल्या सारख्याच असतात, बोलायला काय प्रॉब्लेम? पण तो म्हणला इथे बोलत नाहीत शाळेत मुलींशी. दुसऱ्या दिवशी आपट्याच मला चिडवायला लागला 'काय रे कुत्र्याची लाईन हाय का?' म्हणून. त्याचं ऐकून दुसरे पण तेच बोलायला लागले. उगाच बोललो झालं.

वर्ग म्हणजे एक प्रकरणच आहे. बाकडी इतकी छोटी आहेत की बसलं की गुडघे तोंडाजवळ येतात. आणि विसुकुल्कर्णी बाई काय पट्टा चालवतात! इतिहास, मराठी, गणित, काहीच कळत नाही! काळ-काम-वेग काय, चंपाच्या-आज्जीचे-भाऊ-त्यांचा-नातू-त्याची-बायको-चंपाच्या-भावाची-कोण काय, कडकडा-कडाडे-बिजली-शत्रुंची-लष्करे-थिजली काय, सगळी विमानं डोक्यावरून जातात. एकतर त्या थोड्या चकण्या आहेत आणि बोलताना त्यांच्या जिभेवरचा डाग मधुनमधून दिसतो. आपण काली जबान म्हणून पोरांमध्ये जोक मारला पण कोणालाच काहीच कळलं नाही. जाऊं दे साला. मधली सुट्टी म्हणजे एकदम घाईचं काम असतं राव. एकदम सगळे दारातुन बाहेर पळतो आणि गल्लीत जागा पकडून शाळेच्याच भिंतीवर धार मारतो. रोज नवी नक्षी. मग डबा खाल्ला की तिथून थेट खेळायला समोरच्या रस्त्यावर. कधी कब्बडी, कधी लंगडीपळती असे खेळ. कब्बडी काय रस्त्यात खेळायचा खेळ आहे? रोज ढोपरं, गुढगे फुटतात कोणाचे तरी. आणि फुटली की रक्त थांबवायला त्याच्यावर थुकायचं, लगेच शाळेत जाऊन लाल बाटलीत कांडी बुडवून हाताला लावलं की हातभर ओघळ लालेलाल! रडायचं अज्जिबात नाही.

ऑइलमिलला कडीची बरणी घेऊन मी जात असतो तेंव्हा वाटेत म्हशी उभारलेल्या असतात. तिथल्या तिथे पिळून कोमट गरम दूध. तिथे रस्त्यात उभं राहून आपण गंमत बघत असतो. जवळच्या तालमीतले पैलवान संध्याकाळी घोळक्यानी येतात आणि केळ्याच्या गाडीभोवती उभारतात. खाल्लं केळं की सालटी फेकली गाडीच्या टपावर, खाल्लं केळं की.. असं चालू असतं एकेकाचं. हाऽ ढीग लागतो सालींचा गाडीवर. मग ते सगळे घोळक्याने रमत गमत म्हशींकडे येतात. म्हैस मस्त बसलेली असते, कडबा चघळत चघळत, ढिम्म. तिला हल्या-हल्या करून उठवतात की ती आधी पुढच्या दोन पायांवर येते मग आरामात मागच्या पायांवर उभी होते. की लागले कामाला गवळी. एकेकजण तांब्यातांब्या दूध एका दमात प्यायला की मग तो थवा निघतो पुढे. मस्त येते मज्जा पहायला. की मग पुढे जाऊन ऑइलमिलमधून शेंगतेल उचललं की होमिओपथीच्या गोळ्या घेणे की मग फेरा मारून गोठ्यावरून घराकडे परत!

आई म्हणते का आता इथेच रहायचं, तर इथेच सही! आपण कुठेपण गेलं तरी मजा घेणारच भेंडी. इथे नाहीतर तिथे, आपले दोस्त सगळीकडे होणार नाहीतर काय? कुत्र्याची लाईन तर कुत्र्याची लाईन, पण आता आपल्याला ओळखतात का नाय शाळेत! आणि क्रिकेटमध्ये हे लोक कितीपण पुढे गेले तरी आपण सगळ्यांना जिकेमध्ये हरवणारच ना भेंडी!

आपट्या, गजा सगळे बघत राहातील आणि आपण सिक्सर मारणार म्हणजे मारणार!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ढुंगणास लंपन चावला काय?

(लंपन शिव्या देत नाही, ती बाब अलाहिदा. पण लंपन बेळगाव-साइडला जाण्याऐवजी मुंबईस गेला असता, तर असाच शिवराळ झाला असता.)

(बादवे, मुंबईकडे 'भेंडी' ही जी एक प्रचलित शिवी आहे, तिचा उगम पंजाबी आहे. 'भॅऽऽऽऽऽऽण दी!')

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

तिचा उगम पंजाबी आहे

असेलही. कल्पना नाही. परंतु, पूर्वी 'भेंडी-गवारी" अशी जोड शिवी असे. त्यातून गवारी गळली आणि फक्त भेंडी राहिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

स्वगत (तुकडा) आवडला- क्रमश: असं शेवटी असेल असं फार वाटतंय- तसं आहे का?
शंका- नायकाचं नक्की वय कळत नाहीये, माझा अंदाज आहे ८वी ते १०वी. "भेंडी/सही/यार" वगैरे क्याच फ्रेझेस आणि पोरींशी बोलताना होणारी धाकधूक ह्यावरून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0