‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास' - किरण येले ह्यांच्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग...

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’

ठाणे आर्ट गिल्ड (टॅग)ने ‘नाट्यगंध’ ह्या उपक्रमाअंतर्गत सादर केलेला, नाट्यसंचित निर्मित ‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ हा नाट्यप्रयोग नुकताच बघितला. किरण येले ह्यांच्या कविता आणि कथा यांचा एकत्रित नाट्याविष्कार असलेला हा अनोखा प्रयोग आवडला. लेखक म्हणून त्यांची साहित्यकृतींतून झालेली ओळख अधिक ठळक झाली. ह्यासाठी निर्माते भूषण तेलंग, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि कलाकार परी तेलंग व संचित वर्तक यांचे आणि टॅगचे मन:पूर्वक आभार.

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ नाट्यप्रयोगातील पहिल्या अंकात ‘बाईच्या कविता’ ह्या कवितासंग्रहातील निवडक कवितांचं वाचन आणि दुसर्‍या अंकात ‘मोराची बायको’ हा कथासंग्रहातील ‘अमिबा आणि स्टील ग्लास’ ह्या कथेचं नाट्यरुपांतर.. ह्या दोन्हींतील एकजिनसीपणामुळे पुस्तकं वाचली होती त्यावेळी जे निसटलं होतं त्याची कसर नाटकामुळे भरून निघाली.

‘बाईच्या कविता’ मधली पहिलीच कविता --

‘आत अन् बाहेर
बाई म्हणजे गुंता
कधी तिचा तिनंच केलेला
कधी दुसर्‍यांनी बनवलेला

तिचा तिलाच
न सुटलेला
पुरुषाला
न कळलेला.’

ही कविता जेव्हा ८-९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचली तेव्हा ती फक्त स्त्रीविषयी आहे असं वाटलं, त्यावेळेपुरतं पटलंदेखील! पण आताच्या बदललेल्या ‘मी’ने नाटकातल्या पहिल्या अंकात जेव्हा रंगमंचावर वाचताना तीच काविता बघितली-ऐकली त्यावेळी ती स्त्री-पुरुष दोघांविषयीचीही आहे असं लक्षात आलं. दुसरा अंक बघितल्यानंतर तर खात्रीच पटली -- `माणूस हाच एकंदरीत गुंता आहे!

समाजानं स्त्री-पुरुष असा भेद करून दोघांवरही अन्याय केला आहे. आपल्या मनातील असुरक्षितता लपविण्यासाठी पुरूष स्त्रीला दुय्यम ठरवून सत्ताधारीपणाचं कवच स्वत:भोवती उभं करतो. पण सगळे पुरूष सारखे नसतात. काही पुरुषांची पंचाईत अशी होते की त्यांना त्यांच्या आत दडलेली असुरक्षितता बाहेर दाखवता येत नाही. तो स्त्रीसाठी हावी असला तरी गरजू आहे असं ‘दिसून’ चालत नाही.

नाटकातील नायक सत्ताधारी नसलेला पुरूष आहे. त्या त्या वयात वाटणारी स्त्रीची त्या त्या रुपातली गरज त्याला लपवता येत नाही. जेव्हा जेव्हा तो ती उघडपणे सांगतो तेव्हा तेव्हा त्याच्या वाट्याला नकार येत राहतात. नायकाच्या बालमैत्रीणीची आई त्यांच्यातली कोवळ्या वयातली मैत्री संपवते. शाळेतल्या लाडक्या बाईंच्या शाळा सोडून जाण्याने तो अस्वस्थ होतो आणि हे घरी सांगतो तेव्हा तर त्याची मोठी बहीण त्याला हसते. उरते फक्त आई, त्याला मायेने समजून घेणारी.
नाटकात हे बाहुल्यांच्या अनोख्या माध्यमातून आणि परी तेलंग ह्यांच्या समर्थ अभिनयातून उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे.

ह्या नायकाची एक मैत्रीण असते. त्यांचं लग्न होत नाही. आधीच्या मैत्रीत अनुभवलेले त्यांचे एकत्र क्षण तिच्या मनात कायम असतात आणि विवाहानंतरही ती त्याला भेटत रहाते. तिच्या ह्या मोकळेपणाचं त्याला आश्चर्य वाटतं. आपल्यातलं नातं नक्की काय आहे? आपण एकमेकांचे कोण आहोत? मित्र की प्रियकर-प्रेयसी? तिला मैत्रीतील शारीरिकताही मान्य आहे आणि नवर्‍याची प्रतारणा करतोय हेही डाचतंय म्हणजे नक्की कोणती बाजू खरी आहे?
त्यांच्यातील मैत्री, नातं, त्यातील शारीरिकता, प्रासंगिकता ह्याविषयी ती त्याला समजावत राहते. ती म्हणते, `अमिबा जसा आपल्यात झालेली वाढ स्वत:पासून वेगळी करून त्याला नवा जन्म देतो आणि मोकळं सोडून देतो, तसं मैत्रीत वाढलेलं नवं रूप वेगळं काढून त्याला मोकळं सोडून देता यायला हवं.' त्यांच्यात घडून गेलेल्या निरनिराळ्या प्रसंगांच्या संदर्भासहित ती त्याला त्यांचं नातं समजावून सांगते.
ती म्हणते, ‘प्रासंगिकता ही प्रासंगिकच असायला हवी. तू गुंतू नकोस त्यात.’
त्याचं म्हणणं असतं की ‘कोणतंही रिलेशन कॅज्युअल नसतं, नसावं. त्यात ऊब असायला हवी.’
ती म्हणते, ‘तू प्रत्येक संबंधात प्रेम शोधत राहतोस, ऊब शोधत राहतोस. तशी ती प्रत्येक संबंधात मिळणं शक्य नाही. धिस अक्चुअली इज युअर प्रॉब्लेम, यु हॅव टू फाईंड आऊट अ सोल्युशन.’
आणि तो सोल्युशन शोधायला लागतो.

तो एका वारांगनेकडे जातो. वारांगनाच का? एकावेळी अनेक पुरूषांसोबत केवळ व्यावसायिक गरजेपोटी शरीरसंबंध राखणार्‍या स्त्रिया स्त्री-पुरुष नात्यांचा, त्यातील प्रेमाचा-ऊबेचा विचार कसा करत असतील? तिला भेटण्याचा त्याचा हेतू `सोल्युशन' शोधणं हा असतो. तिला मात्र तो नेहमीच्या गिऱ्हाईकासारखाच आहे असं वाटतं आणि एका बंद खोलीत सवयीने ती त्याच्यासमोर साडी फेडून उभी रहाते. तरीही त्याला स्त्रीची भुरळ पडत नाही यामुळे आश्चर्यचकित होते. शारीरिक आकर्षणाचा लवलेशही नसलेल्या ह्या पुरूषाशी बोलता-बोलता तिला तो अधिक समजत राहतो. त्याच्या मनातील गोंधळ तिच्या लक्षात येतो. तिच्या परिने त्याला समजावताना स्टीलच्या ग्लासचं उदाहरण ती त्याला देते. आणि त्या ग्लासकडे बघता बघता, ती देत असलेल्या स्पष्टीकरणाने त्याच्या मनातला गोंधळ नाहीसा होतो. ‘बाई’विषयी, ती नात्यांकडे कसं बघते याविषयी त्याला अधिक स्पष्टता येते.

परी तेलंग ह्यांनी वारांगनेची भूमिका ज्या धिटाईने आणि सफाईने केली आहे त्याला तोड नाही. चित्रपटातल्या पडद्यावर असे प्रसंग बघणं आणि रंगमंचावर थेट बघणं ह्यातला फरक लख्खपणे जाणवतो, कारण नकळत आपला श्वास रोखला गेलेला असतो. संचित वर्तक ह्यांनी गोंधळलेल्या मन:स्थितीतला, तसंच वारांगनेसमोर अवघडलेल्या शरीराने वावरणारा पुरूषही उत्तम सादर केला आहे.
एक मात्र खरं की ही कथा वाचली होती तेव्हा हा भाग काहीसा पसरट झाला आहे असं वाटत होतं आणि बघतानाही तसंच वाटलं.

माणसाला अन्न-वस्त्र-निवार्‍याइतकीच मूलभूत आवश्यक असते ती नात्यांतील ऊब-सुरक्षितता. ती जर नसेल तर जगणं अवघड होतं. एकदा का त्या नात्याची, त्यातील निश्चिततेची, सुरक्षिततेची खात्री पटली की माणसांना आश्वस्त वाटतं. ह्या टप्प्यापर्यंत स्त्री-पुरूष असा भेद नाही. फरक कुठे पडतो? कोणत्या नात्यातून ती मिळू शकेल आणि कोणत्या नाही हे समजून घेण्याच्या स्त्री आणि पुरूष यांच्या पध्दतीत! ज्या वेगाने स्त्री स्वत:ला सुरक्षित करून घेते तो वेग पुरूषाला अजूनही साध्य झालेला नाही. म्हणूनच ईमरोज म्हणतात ते लगेच पटतं, ‘आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यौं नही?’

चित्रा राजेन्द्र जोशी, ठाणे
११.६.१९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

थोडीशी झलक पुढील धाग्यासारखी वाटली-

"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग ३ - शेवट)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A certain smile, a certain face
Can lead an unsuspecting heart on a merry chase
A fleeting glance can say so many lovely things
Suddenly you know why my heart sings

लेक्चरं फार आहेत का प्रयोगात ?
----
नाट्यकृतीची ओळख छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0