दिवाळी अंक २०१९ - आवाहन

नमस्कार,

गेल्या सात वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

इथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे. काही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला आर्थिक मदत देऊ केली होती; इतरांनाही यात हातभार लावण्याची इच्छा असल्यास व्यक्तिगत निरोपातून स्वतंत्र संपर्क करूच.

दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं 'ऐसी'च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१९ ठेवलेली आहे.

दिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर(!) माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.

शब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.

आता अंकाच्या विशेष संकल्पनेबद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील काही भाग ह्या विषयाला दिला जाईल. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.

संकल्पनेबद्दल -

Indian National Flag before independence

(चित्र : 'भारतमाता', अवनींद्रनाथ टागोर, १९०५, व्हिक्टोरिया मेमोरियल, कोलकाता)

राष्ट्रवाद ही एक संकल्पना म्हणून तिच्यापुढे उभी राहिलेली प्रश्नचिन्हं , अनेक अंगांनी या संकल्पनेला आणि तिच्या आवश्यकतेबद्दल, तिच्या आहे त्या स्वरूपासमोर उभी राहिलेली आव्हाने, या संकल्पनेपायी भारतीय समाजात आणि जगाच्या अन्य भागातल्या समाजांना गेलेले तडे असा विषय आपण यंदाच्या दिवाळी अंकाकरता निवडत आहोत.

ह्या वर्षीच्या ऐसी अक्षरे दिवाळी अंकात ह्या परिस्थितीचा वेगवेगळ्या अंगानं विचार करावा अशी आमची इच्छा आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक अशा अनेकविध बाजूंनी त्याकडे पाहावं; त्याचप्रमाणे एक सामान्य नागरिक म्हणून जगताना तुम्हाला ह्याच्याशी कसं भिडावं लागतं हे जाणून घेण्यातही आम्हाला रस आहे.

दिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.

लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने किंवा aisiakshare@gmail.com या इमेलपत्त्यावर पाठवावं.

लेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.

प्रतिक्रिया

मस्त मस्त मस्त!!! रोचक विषय आहे.
ऐसीचा थिंकिंग टँक आहे तरी कोण कोण. सुचतं कसं इतकं छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंकात काही लेख इंग्लिशमधून मराठीत भाषांतरित केलेले असतील. हे लेख बरेच मोठे आहेत, त्यांचा संक्षेपही करावा लागेल. हे काम करण्यासाठी जितकी मदत मिळेल तेवढं उत्तम.

प्रमाणलेखन जमत नाही, भाषेवर फार पकड नाही, अशा कारणांमुळे कांकू करू नका. एकदा भाषांतर/संक्षेप केल्यावर ते आणखी निदान एका व्यक्तीनं वाचून सुधारणा करणं अपेक्षित आहेच. इंग्लिशमध्ये वाचलेला मजकूर, मराठीत स्वतःच्या शब्दांत सांगता येणं, हे कौशल्य अपेक्षित आहे.

मी स्वतः असं काम आधीही केलेलं आहे. त्यातून नवं काही समजायला सुरुवात होते, जे फक्त भाषांतर वाचून समजलं असतंच असं नाही; आणि ह्या शिक्षणातून आनंद मिळतो, असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. उदाहरणार्थ, उदयन वाजपेयींच्या भाषणाचं शब्दांकन -
Image of Reality and Reality of Image

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राष्ट्रवाद ही एक संकल्पना म्हणून तिच्यापुढे उभी राहिलेली प्रश्नचिन्हं , अनेक अंगांनी या संकल्पनेला आणि तिच्या आवश्यकतेबद्दल, तिच्या आहे त्या स्वरूपासमोर उभी राहिलेली आव्हाने, या संकल्पनेपायी भारतीय समाजात आणि जगाच्या अन्य भागातल्या समाजांना गेलेले तडे असा विषय ----
खलास. मस्त विषय. फक्त सगळे लेख केवळ आणि केवळ पक्षीय राजकारण, जातवास्तव एवढ्यापुरतेच राहू नये असे वाटते.
अन्न, भाषा, कपडे, घरे व इतर दैनंदिन राहणीमानाशी संबंधित गोष्टींचा तसेच स्थलांतरे, वैद्न्यानिक (सापडत नाहीये द्न्य कसा लिहायचा) प्रगती इत्यांदींचाही या प्रकाशात विचार झाला तर मजा येईल.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

ज्ञ (jY) - स्मॉल जे & कॅपिटल वाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तज्ज्ञ बरोबर का तज्ञ? तत् जानाति ईति तज्ज्ञ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0