कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी
यापूर्वी जनुकीय लसी व वाहक लसींसंबंधित विस्तृत धागे लिहिले होते. (भाग ३ व त्याआधीचे धागे) याचे मुख्य कारण म्हणजे चाचण्यांचे सर्व टप्पे पूर्ण करून किमान इमर्जन्सी मान्यता मिळालेल्या सर्व लसी त्या दोन प्रकारातील होत्या. प्रथिनाधारित लस व इनॲक्टिव्हेटेड लसींबद्दल लिहिले गेले नव्हते.
आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या लसीच्या तिसऱ्या चाचणीचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत. (या लसीला भारत सरकारने इमर्जन्सी वापरासाठी परवानगी जानेवारी महिन्यातच दिली आहे.)
ही लस इनॲक्टिव्हेटेड लस आहे. (याविषयी अधिक माहिती खाली आहे.)
प्रातिनिधिक चित्र आंतरजालावरून साभार.
लसीचे नाव : कॉव्हॅक्सिन (किंवा BBV152 A, B, C)
परिणामकारकता : तिसऱ्या चाचणीचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत त्यानुसार ८०.६ टक्के.
डोस : दोन, दोन्ही डोसमधील अंतर चार आठवडे
साठवण : किमान एक आठवडा तरी सामान्य तापमानाला (रूम टेम्परेचरला) राहू शकते.
ICMR (म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, म्हणजे आपल्या देशातील जैववैद्यकीय संशोधनातील सर्वात जुनी व शिखर संस्था, स्थापना १९११), NIV (म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जी पुण्यात १९५२ साली ICMRची संस्था म्हणून सुरु झाली) या दोन्ही संस्थांच्या बरोबर भारत बायोटेक या हैदराबादस्थित लस उत्पादक संस्थेने ही लस विकसित केली आहे.
कोरोना विषाणूच्या इनॲक्टिव्हेटेड फॉर्मवर आधारित ही लस आहे. ती Whole-Virion Inactivated Vero Cell derived platform technology वापरून केली गेली आहे.
इनॲक्टिव्हेटेड लसीतील विषाणूंचे मानवी शरीरात गेल्यावर पुनरुत्पादन होऊ शकत नाही. यामुळे माणसाला हा आजार होण्याची सुतराम शक्यता नाही. या लसीमध्ये मृतप्राय विषाणू वापरला जातो, ज्यामुळे लस घेतलेल्या माणसाला हा आजार होत नाही, परंतु त्याविरोधी प्रतिकारशक्ती मात्र नक्की तयार होते.
अशा प्रकारच्या मृतप्राय किंवा निष्प्रभ केलेल्या विषाणूपासून लसनिर्मितीची पद्धत ही पूर्वीपासून वापरली गेली आहे. या पूर्वी अशीच पद्धत वापरून पोलिओ, रेबीज इत्यादी आजारांवरील लसी तयार केल्या गेल्या आहेत.
तंत्रज्ञान निर्मिती ते उत्पादन या सर्व दृष्टीने ही १०० टक्के भारतात बनलेली लस आहे. (आपल्याकडची दुसरी लस कोव्हीशील्ड या लसीचेही सर्वात जास्त उत्पादन भारतातच होते. याचे तंत्रज्ञान ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार झाले आहे. आता लस / औषध यासारख्या मानवाचे जीवन वाचवणाऱ्या गोष्टीच्या बाबतीत राष्ट्रवाद आणावा किंवा कसे हा एक वेगळा विषय आहे, पण ते एक असो.)
प्राण्यांवर म्हणजे मुख्यतः माकडांवर केलेल्या प्राथमिक अभ्यासात ही लस उत्तम प्रतिकारक्षमता निर्माण करू शकते असे लक्षात आले, यानंतर या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेजच्या चाचण्या सुरू झाल्या. या चाचण्यांचा निष्कर्ष असा होता की ही लस पूर्णपणे 'सुरक्षित', म्हणजे सेफ आहे. म्हणजे मानवाच्या शरीरात अँटीबॉडी तयार करताना, कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स होत नाहीयेत. मानवी वापरासाठी सेफ आहे. या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या फेजमधील चाचण्यांसाठी अनुक्रमे ३७५ व ३८० स्वयंसेवकांवर चाचण्या घेऊन लस ही पूर्णपणे निर्धोक असल्याचा निष्कर्ष आल्यानंतर २५,८०० स्वयंसेवकांवर फेज-३ची चाचणी घेण्यात आली.
२२ डिसेंबर : कंपनीने OCUGEN नावाच्या पेनसिल्व्हेनियास्थित कंपनीबरोबर अमेरिकेत लस विकास व निर्मितीसाठी करार केला.
३ जानेवारी २०२१ : भारतात या लसीला इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मिळाली.
ही परवानगी मिळण्याच्यावेळी या लसीची फेज-३ चाचणी सुरू होती, त्याचा अभ्यास सुरू होता व निष्कर्ष पुढे आले नव्हते. यामुळे खळबळ माजली होती (शास्त्रीय जगात असे करण्याचा प्रघात नाही. अर्थात चीन व रशिया हे देश याला अपवाद आहेत, त्यांनी अशीच फेज-२नंतर परवानगी दिली होती. आपणही त्या पंगतीत बसलो. ते एक असो.)
३ मार्चला कंपनीने फेज-३ चाचणीचे अंतरिम परिणाम जाहीर केले आणि याची परिणामकारकता ८०.६ टक्के आहे असे सांगितले. यामुळे आता लोकांच्या मनातील किंतु जायला हरकत नसावी.
फेज-३च्या अंतिम निष्कर्षांमध्ये, (जे अजून जाहीर व्हायचे आहेत) याहून काही वेगळे येईल असे मला वाटत नाही.
थोडक्यात, लसीला भारतात जानेवारीत इमर्जन्सी उपयोगासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर जो गदारोळ झाला होता, त्याचा लसीच्या परिणामकारकतेशी संबंध नव्हता. फेज-३ चाचण्या घेण्यापूर्वीच मान्यता देणे याबद्दल तो गदारोळ होता. आता फेज-तीनचे अंतरिम निष्कर्ष आल्यावर हा गदारोळ थांबायला हरकत नाही.
अशा काळात वेगळे निकष वापरावे लागतात
फेज ३ चाचण्यांबाबत ज्यांनी "गदारोळ" केला होता, त्यांच्या डोक्यात, सध्या एक घातक , जागतिक महा-साथ चालू आहे, आणि त्यात माणसे मरत आहेत , हे शिरले नसावे. अशा काळात वेगळे निकष वापरावे लागतात: ज्यात लस निर्धोक असलीच पाहिजे हा सर्वात महत्वाचा नियम असतो, जो भारत बायोने उत्तम प्रकारे सिद्ध केला होता. (आताही लसीची प्रत्येक बॅच "" साठी, उंदरांच्या मेंदूत टोचली जाते , आणि ते मरत नाहीत हे सिद्ध केले जाते!. ही रुटीन क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे!) लस -विज्ञान (आणि त्यातही भारत बायोचे हे तंत्रज्ञान) हे इतर अनेक जंतूविरुद्ध पुरेसे सिद्ध विज्ञान आहे. लस समजा ५० टक्केच परिणामकारक ठरली असती, तरी "ते" पन्नास टक्के लोक वाचलेच असते ना?
मृतप्राय विषाणू म्हणजे?
म्हणजे नक्की काय? विषाणू तसेही यजमान शरीरांच्या बाहेर जिवंत नसतातच ना?
इथे आजार होऊ शकतो, असं म्हणायचं आहे का?