कोरोना लस (भाग ३) - वाहक व प्रोटीन आधारित लशी
कोरोना लस - भाग ३
कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण विषाणू वाहक आणि प्रोटीन आधारित लशींचा परिचय करून घेऊ.
विषाणू वाहक (व्हेक्टर) लशी
मानवाला निरुपद्रवी असलेल्या इतर विषाणूंमध्ये कोरोना विषाणूची विशिष्ट जनुके जेनेटिक इंजिनियरिंग करून ठेवली जातात व हे निरुपद्रवी विषाणू लस म्हणून दिले जातात. हे असे निरुपद्रवी विषाणू म्हणजे विषाणू व्हेक्टर (वाहक). यातील काही वाहक विषाणू पेशींमध्ये प्रवेश करून त्या पेशींना कोरोना विषाणूचे प्रोटीन बनविण्यास उद्युक्त करतात (ज्यायोगे शरीराला कोरोनाचे इन्फेक्शन न होता प्रोटीनची आपल्या शरीराला ओळख होऊन त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते) तर काही लशींच्या बाबतीत हे वाहक विषाणू स्वतःच हळूहळू वाढतात, ज्यामुळे यातील कोरोना विषाणूच्या प्रोटीनची शरीराला ओळख होते, व त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
फेज ३ मधील वाहक विषाणू लशी
१. Can Sino BIO : यांच्या लशीला चीन सरकारने मर्यदित मान्यता दिली आहे.
वाहक विषाणूचे नाव : Ad5-nCoV
लशीची परिणामकारकता : माहिती उपलब्ध नाही
डोस : सिंगल डोस लस
प्रकार : स्नायूत इंजेक्शन
साठवण : रेफ्रिजिरेशन
चिनी कंपनी कॅन सिनो बायोलॉजिक्स या कंपनीने अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस यांच्याबरोबर Ad ५ नावाच्या अडिनोव्हायरसचा वापर करून ही लस विकसित केली. मे महिन्यात त्यांनी फेज १ म्हणजे सुरक्षितता चाचणीचे निकाल प्रकाशित केले. फेज २ मध्ये लशीमुळे उत्तम प्रतिकार-प्रतिसाद येत आहे असे त्यांनी जुलै महिन्यात जाहीर केले. जून महिन्यात चीनच्या लष्कराने "सद्यस्थितीत खास उपयुक्त औषध" असे म्हणून लसीकरणास मान्यता दिली. हे असे करणे अभूतपूर्व व धक्कादायक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीने हे लसीकरण सैनिकांना अनिवार्य आहे की ऐच्छिक याबद्दल काही माहिती दिलेली नाही. ऑगस्ट महिन्यापासून या लशीची फेज ३ चाचणी सौदी अरेबिया, पाकिस्तान, रशिया सारख्या अनेक देशांमध्ये सुरू आहे.
२. Gamaleya Research Institute
लशीचे नाव : स्पुटनिक ५ (आधीचे नाव Gam-Covid -Vac)
परिणामकारकता : ९२%
डोस : २ डोस, तीन आठवड्यांच्या अंतराने
प्रकार : स्नायूत इंजेक्शन
साठवण : सध्या डीप फ्रिज (कंपनी साध्या फ्रिजमध्ये साठवण करता येईल अशी लस तयार करण्याच्या प्रयत्नात)
रशिया सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचा भाग असलेल्या Gamaleya Research Instituteने ही लस तयार केली आहे. दोन प्रकारच्या अडिनो विषाणूंचा वापर करून ही लस बनलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलेल्या प्राथमिक माहितीनुसार फेज ३ चाचण्यांमध्ये या लशीची परिणामकारकता उच्च प्रतीची आहे अशी माहिती मिळाली आहे.
Ad5 and Ad26 या दोन अडिनो विषाणूंचा वापर केलेल्या या लशीचे आधीचे नाव Gam-Covid -Vac असे होते. हे दोन्ही विषाणू लशीच्या निर्मितीकरिता पूर्वी वापरले गेले आहेत. या दोन्ही विषाणूंचा वापर लशीकरिता करण्याचे कारण असे होते की यातील कुणी एक "घुसखोर, परका" असे शरीराने चुकून ओळखून त्याला नष्ट केले तरी लशीचा प्रभाव कमी होऊ नये.
संशोधकांनी याच्या चाचण्या जूनमध्ये सुरू केल्या. परंतु रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी ११ ऑगस्टला, फेज ३ चाचण्या सुरू होण्यापूर्वीच "या लशीला नियामक संस्थेने मान्यता दिली आहे व लशीचे नाव आता स्पुटनिक ५ आहे" असे जाहीर करून टाकले. लस विषयातील जागतिक तज्ज्ञांनी असे करणे घातक, धोकादायक आहे असे सांगितले. यानंतर रशियाने या घोषणेबद्दल घुमजाव करून ही मान्यता म्हणजे तिसऱ्या फेजमधील चाचण्यांचा चांगला निष्कर्ष आल्या तरच "सशर्त दिलेले नोंदणी सर्टिफिकेट आहे" असा पवित्रा घेतला. आधी केवळ २,००० स्वयंसेवकांवर फेज ३ चाचणी ठरली होती, मग अर्थातच तो आकडा ४०,००० पर्यंत वाढविण्यात आला. रशिया व्यतिरिक्त बेलारूस, यु ए इ आणि व्हेनेझुएलामधील स्वयंसेवकांवर ही चाचणी सुरू केली. १७ ऑक्टोबरला भारतात फेज २ व ३ च्या एकत्रित चाचण्या सुरू झाल्या.
४ सप्टेंबरला, म्हणजे पुतीन यांची घोषणा झाल्यानंतर तीन आठवड्यांनी फेज १ आणि २ चा डेटा जाहीर केला. त्यानुसार स्पुटनिक लशीमुळे चांगला प्रतिकार प्रतिसाद व सौम्य साईड इफेक्टस होतात असा दावा केला गेला.
दरम्यानच्या काळात रशियाने अर्जेंटिना, भारत, ब्राझील,, मेक्सिको, व्हेनेझुएला इत्यादी देशांबरोबर लस पुरवठ्याबाबत वाटाघाटी केल्या.
११ नोव्हेंबरला रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फ़ंडने जाहीर केले की लस परिणामकारक आहे असा फेज ३ चा प्राथमिक डेटा सांगतो. चाचणीमधील कोरोना संसर्ग झालेल्या २० स्वयंसेवकांवरून रशियन संशोधकांनी "लस ९२ टक्के परिणामकारक आहे" असा निष्कर्ष जाहीर केला. २४ नोव्हेंबरला ३९ केसचा अभ्यास करून तोच निष्कर्ष पुन्हा जाहीर केला. त्यांनी असाही दावा केला की जास्त काळ लसीकरण केलेल्या स्वयंसेवकांमध्ये ९५ टक्के परिणामकारकता दिसून येते. उर्वरित जगातील संशोधकांनी या निष्कर्षांबद्दल शंका उपस्थित केली आहे. Moderna आणि फायझरप्रमाणेच Gamaleya Research Institute यांचाही सखोल अभ्यासाचा डेटा व निष्कर्ष पिअर-रिव्युड जर्नलमध्ये अजून प्रकाशित झालेला नाही.
जॉन्सन अँड जॉन्सन
लशीचे नाव : Ad २६.COV २. S
लशीची परिणामकारकता : माहिती उपलब्ध नाही
डोस : सिंगल डोस लस
प्रकार : स्नायूत इंजेक्शन
साठवण : रेफ्रिजिरेशन
एक दशकापूर्वी बोस्टनस्थित Beth Israel Deaconess Medical Center यांनी अडिनोव्हायरस २६ (Ad.२६) या विषाणूचा वापर करून लसनिर्मिती करण्याचे तंत्र विकसित केले होते. (यापासून) यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने इबोला आणि इतर काही आजारांकरिता लस विकसित केली होती. आता त्यांनी याच तंत्राचा वापर करून कोरोना विषाणुरोधक लस निर्माण केली आहे. मार्च महिन्यामध्ये USA सरकारने या लशीच्या उत्पादनासाठी ४५.६ लाख डॉलर्स त्यांना दिले. प्राथमिक प्राण्यांमधील (माकडांमध्ये केलेल्या) चाचण्यांमध्ये उपयुक्त प्रतिकार-प्रतिसाद येतो आहे हे सिद्ध झाले. यानंतर जुलै महिन्यात फेज १ आणि २ची एकत्रित चाचणी केली गेली. सप्टेंबर महिन्यात ६०,००० स्वयंसेवकांमध्ये फेज ३ चाचणी सुरू झाली.
ऑगस्ट महिन्यात USA सरकारने लशीला मान्यता मिळाल्यास १ अब्ज डॉलर्स किमतीच्या १० कोटी डोसची मागणी २०२१ करिता नोंदवली आहे. १२ ऑक्टोबरला चाचणीतील एका स्वयंसेवकाला काही दुष्परिणाम झाले असे दिसून आल्याने चाचणी थांबवण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतर अकरा दिवसानी चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली. जरी यामुळे विलंब झाला असला तरीही वर्षाअखेरपर्यंत चाचणीचे निष्कर्ष हातात येतील अशी कंपनीला आशा आहे. कंपनी अजून एका दोन डोस लशीची फेज ३ चाचणी सुरू करणार आहे अशी त्यांनी १६ नोव्हेंबरला घोषणा केली.
Astra Zeneca, University of Oxford
लशीचे नाव : AZD1222
परिणामकारकता : ९०%
डोस प्रकार : २ डोस, दोन डोसमध्ये ४ आठवड्यांचे अंतर
साठवण : सामान्य फ्रिजमध्ये ६ महिन्यांपर्यंत सुरक्षित, स्टेबल
८ डिसेंबरला ब्रिटिश स्वीडिश कंपनी Astra Zeneca व University of Oxford ने त्यांच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लशीचा फेज ३ चाचण्यांच्या डेटावर आधारित पहिला शोधनिबंध प्रकाशित केला. या चाचणीतून हे सिद्ध झाले की ही लस कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून संरक्षण नक्की करते. परंतु या अभ्यासातून अनेक नवीन प्रश्न उपस्थित झाले.
महासाथीच्या सुरुवातीसच ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी चिंपांझीला बाधा करणाऱ्या एका अडिनो विषाणूमध्ये जनुकीय तंत्रज्ञान वापरून लस विकसित केली. प्राण्यांमध्ये (माकडांमध्ये) केल्या गेलेल्या चाचण्यांमध्ये ही लस दिल्यावर प्राण्यांना कोरोना विषाणूबाधेपासून संरक्षण मिळते हे नक्की झाले. एप्रिल महिन्यात त्यांनी मानवामध्ये फेज १ व २ चाचण्या सुरू केल्या. या टप्प्यामध्ये लशीमुळे माणसामध्ये कुठलेही गंभीर परिणाम होत नाहीत ही माहिती पुढे आली. त्याबरोबरच कोरोना विषाणूविरोधी अँटीबॉडी तर तयार होतातच पण इतर प्रतिकारक्षमता निर्माण होते असेही कळले. यानंतर ब्रिटन व भारतात फेज २ व ३ चाचण्या सुरू केल्या. (भारतात या लशीचे नाव कोव्हीशिल्ड असे ठेवण्यात आले आहे) तसेच फेज ३ चाचण्या दक्षिण आफ्रिका, ब्राझील व USA मध्ये सुरू झाल्या.
६ सप्टेंबरला चाचणीतील एका स्वयंसेवकाला 'ट्रान्स्व्हर्स मायेलायटिस'ची चिन्हे दिसू लागली त्यामुळे जगात सगळीकडे चाचणी थांबवण्यात आली. (सखोल तपासणी केल्यानंतर याचा लशीशी काही संबंध नाही हे सिद्ध झाल्यावर) USA व्यतिरिक्त इतर ठिकाणी चाचणी एका आठवड्याने पुन्हा सुरू झाली. २१ ऑक्टोबरला ब्राझीलमधील एका वृत्तपत्रात चाचणीतील एका स्वयंसेवकांचा कोरोनाने मृत्यू झाला अशी बातमी आली. अर्थात ब्राझीलमध्ये चाचण्या थांबवण्यात आल्या नाहीत, कारण त्या स्वयंसेवकाला लस नव्हे तर प्लासिबो देण्यात आला होता. २३ ऑक्टोबरला USFDA ने चाचण्या पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.
१९ नोव्हेंबरला ब्रिटनमधील फेज २ व ३ चाचणीचे निष्कर्ष व डेटा प्रकाशित करण्यात आला. यामध्ये विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये लस दिल्यावर काही वेगवेगळा प्रतिकार-प्रतिसाद येत आहे का याचाही अभ्यास करण्यात आला. १८ ते ५५ वयोगटातील १८०, ५६ ते ६९ वयोगटातील १६० व ७० वर्षावरील वयोगटातील २४० व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. या चाचणीत कुणालाही दुष्परिणाम,साईड इफेक्ट्सझाले नाहीत. आणखी एक आशादायक माहिती पुढे आली, ती म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये तरुणांइतकाच प्रतिकार-प्रतिसाद निर्माण झालेला दिसला.
२३ नोव्हेंबर रोजी ब्रिटन आणि ब्राझीलमधील पहिल्या १३१ कोरोनाबाधितांच्या चाचण्यांवरून कंपनीने असे जाहीर केले की लशीची परिणामकारकता चांगली आहे. चाचण्यांमधील सर्व स्वयंसेवकांना दोन डोस दिले गेले होते. परंतु काही स्वयंसेवकांना पहिला डोस अर्ध्या क्षमतेचा दिला गेला होता. सर्वात आश्चर्यकारक निरीक्षण असे होते की ज्या स्वयंसेवकांना पहिला डोस अर्ध्या क्षमतेचा दिला होता त्याच्यात लशीची परिणामकारकता ९० टक्के दिसली तर ज्या स्वयंसेवकांना पूर्ण डोस दिला होता त्यांच्यात ६२ टक्के परिणामकारकता दिसली. यावरून संशोधक असा अंदाज बांधू लागले की पहिला डोस अर्धाच दिल्याने शरीराची प्रतिकारव्यवस्था जास्त चांगला प्रतिसाद देत आहे काय? अर्ध्या क्षमतेचा डोस हा ठरवून दिला गेला नसून तो चुकून दिला गेला होता आणि तो फक्त ५५ वर्षाखालील वयोगटातील स्वयंसेवकांनाच दिला गेला होता. त्यामुळे त्या अर्ध्या डोसवरून निघालेले निष्कर्ष साधारण निष्कर्ष म्हणून वैध धरावेत का, असा नवीन प्रश्न उपस्थित झाला.
मे महिन्यात लस जर यशस्वी ठरली व त्याला मान्यता मिळाली या अटीवर कंपनीने विविध सरकारांबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. USA ने १.२ अब्ज डॉलर्स किमतीला ३० कोटी डोसेसची मागणी नोंदवली. युरोपियन युनियनने ऑगस्ट महिन्यात लस यशस्वी झाल्यास ४० कोटी डोसेसची मागणी नोंदवली. लशीला मान्यता मिळाल्यास २ अब्ज डोसची निर्मिती होऊ शकते असे कंपनीने जाहीर केले.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने या लशीच्या आपत्कालीन वापरासाठीच्या परवानगीचा अर्ज भारत सरकारकडे ७ डिसेंबरला केला. भारत सरकारच्या DCGI या नियामक संस्थेच्या subject matter expert समितीने सिरमला ९ डिसेंबरला अजून डेटा /माहिती द्या असे सांगितले.
भारतात सिरम इन्स्टिट्यूट ही लस "कोव्हीशिल्ड" या नावाने देणार आहे.
विषाणू वाहक लशींच्या फेज १ मधील चाचण्या इतर काही कंपन्या करत आहेत. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे -
१. इटालियन कंपनी ReiThera व Lazzaro Spallanzani National Institute for Infectious Diseases
२. सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनी Vaxart. ही कंपनी तोंडातून देणारी लस (कॅप्सूल किंवा गोळी) निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे.
३. Merck, Themis Bioscience आणि Institut Pasteur.
व इतर काही.
प्री क्लिनिकल चाचण्या नोव्हार्टीस नावाची स्विस कंपनी करीत आहे.
प्रोटीन आधारित लशी
या लशींमध्ये कुठल्याही प्रकारचे जनुकीय साहित्य नसते. यामध्ये फक्त कोरोना विषाणूचे प्रोटीन असतात. काही लशींमध्ये संपूर्ण प्रोटीन असते, तर काहींमध्ये प्रोटीनचे विवक्षित तुकडे. काही लशींमध्ये हेच प्रोटिन्स नॅनोकणांमध्ये भरलेले असतात.
फेज ३ चाचण्यांत काही अशा प्रोटीन आधारित लशी :
१. नोव्हाव्हॅक्स
लशीचे नाव : NVX-CoV2373
लशीची परिणामकारकता : अजून अज्ञात
डोस : दोन डोस, तीन आठवड्यांच्या अंतराने.
प्रकार : स्नायू
साठवण : रेफ्रिजिरेटर
मेरीलँडस्थित नोव्हाव्हॅक्स कंपनी रोगकारक विषाणूची प्रोटिन्स अतिसूक्ष्म कणांना चिकटवून लस बनवते. हेच तंत्रज्ञान वापरून त्यांनी इतर अनेक रोगांच्या विरोधी लशी बनविल्या आहेत. या कंपनीने फेज ३ चाचण्या मे महिन्यात सुरू केल्या. Coalition for Epidemic Preparedness Innovations यांनी या लशीच्या निर्मितीसाठी ३८ कोटी डॉलर्स गुंतविले आहेत. याव्यतिरिक्त US सरकारने या लशीच्या चाचण्या व निर्मितीसाठी १.६ अब्ज डॉलर्स मदत जाहीर केली आहे.
प्राथमिक चाचण्यांमध्ये यश मिळाल्यावर कंपनीने दक्षिण आफ्रिकेत फेज दोन चाचण्या २,९०० स्वयंसेवकांमध्ये ऑगस्ट महिन्यात सुरू केल्या. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये १५,००० स्वयंसेवकांमध्ये फेज ३ चाचणी सुरू केली. याचे निष्कर्ष २०२१च्या सुरुवातीस मिळतील. डिसेंबर महिन्यात USAमध्ये अजून एक मोठी फेज ३ चाचणी सुरू होणार आहे.
या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटबरोबर लस उत्पादनाचा करार सप्टेंबर महिन्यात केला. या करारानुसार कंपनी एका वर्षात २ अब्ज डोस डोस तयार करू शकेल.
सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास २०२१च्या सुरुवातीला १० कोटी डोस USAला व ऑस्ट्रेलियाला चार कोटी डोस देऊ शकेल.
या व्यतिरिक्त खालील कंपन्या फेज दोन व तीन चाचण्या करत आहेत -
१. MEDICAGO व GSK
२. Anhui Zhifei Longcom व hinese Academy of Medical Sciences
३. फिन्ले व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट (क्युबा)
४. व्हेक्टर इन्स्टिट्यूट रशिया
५. सॅनोफी व GSK
६. स्पाय बायोटेक
आणि इतर अनेक
या वर उल्लेख केलेल्या कंपन्यांच्या चाचण्या अजून प्राथमिक स्तरात आहेत. या लशी कधी येऊ शकतील हा अंदाज सध्या करणे अवघड आहे.
या एकत्रित नव्या माहितीसाठी धन्यवाद.
म्हणजे अगदी मगर्च २०२१ पर्यंत लोक रणगाड्यांसारखे मजबूत होतील असं वाटतंय.
एक प्रश्न - हेपटायटीस A,B,C असे प्रकार आहेत म्हणतात तसे करोनाचेही झाले तर लशी पण कराव्या लागतील काय?
१. मार्चपर्यंत लोकं
१. मार्चपर्यंत लोकं रणगाड्यासारखी मजबूत* होण्याची शक्यता नाही ,कारण एकतर लस ही लोकांना मजबूत करण्यासाठी नसून ती फक्त या विषाणूपासून होऊ शकणाऱ्या गंभीर आजारापासून संरक्षण देण्यासाठी आहे
२. सार्वत्रिक लसीकरण कुठेही मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे तेही इतक्या लवकर साध्य होणार नाही. ( इस्राएल सारख्या अत्यंत कमी लोकसंख्या आणि अत्यंत छोटे क्षेत्रफळ असलेल्या जागा वगळता )
३. Hepatitis A , B , C , D , E हे सगळे खरेतर वेगवेगळ्या विषाणूंच्या मुळे होणारे वेगवेगळे आजार आहेत त्यामुळे त्यातील एका विषाणूवरील लस दुसऱ्यावर चालण्याची शक्यता नाही . यातील प्रत्येक वेगळ्या विषाणूमुळे होणारा वेगळा आजार आहे., ज्या सगळ्या आजारांमध्ये यकृताला सूज येते .
त्यामुळे ही तुलना योग्य आहे असे वाटत नाही .
Hepatitis हे खरे फार स्पेसिफिक नाव नसावे. तज्ज्ञ डॉक्टर लोकांनी जास्त खुलासा करावा.
* मला हा विनोद कळला
विषाणू पुढे कधी म्यूटेट झाला
म्युटेशन ही एक सर्वसामान्य,नेहमी घडणारी प्रक्रिया असली तरी प्रत्येक म्युटेशन मुळे विषाणू जास्त घातक आणि लस निरुपयोगी होते असतील भाग नाही.
विषाणू पुढे कधी म्यूटेट झाला (ज्यामुळे आजार जास्त घातक होणे , किंवा विषाणूची संसर्गक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणे किंवा लस निरुपयोगी होणे अशा पद्धतीचे जनुकीय बदल म्हणजेच म्युटेशन एकही म्युटेशन अजून झालेले नाही . ,)
व त्याच्यातील बदल हा लस ज्यावर तयार केलेली आहे ( म्हणजे बऱ्याच लसींच्या बाबतीत या विषाणूच्या विशिष्ट स्पाईक प्रोटीन च्या आधारावर लस तंत्रज्ञान आधारित आहे) त्यातही जर मोठा बदल झाला तर असे होऊ शकते.
पण यात बरेच जरतर आहे.
Hepatitis प्रमाणे होण्याची शक्यता आजच्या घडीला शक्य वाटत नाही
(विषाणूजन्य hepatitis हे वेगवेगळ्या विषाणूंच्या मुळे होतात, एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्स मुळे होत नाहीत. या सर्व प्रकारांची कारणे, प्रसार होण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. सर्व प्रकारांच्या hepatitis वर लस उपलब्ध नाहीये , ही माहिती अवांतर म्हणून)
आता...?
आता या विषाणूचे दोन अमेरिकी, एक ब्रिटिश, एक द. आफ्रिकी म्यूटेशनं असल्याचं मला माहीत आहे. आणखीसुद्धा असतीलच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अमेरिकन आणि ब्रिटिश
अमेरिकन आणि ब्रिटिश म्युटेशन्समुळे लसीची परिणामकारकता कमी होईल असे दिसत नाहीये. दक्षिण आफ्रिकी म्युटेशनमुळे mRNA लसींची परिणामकारकता ( म्हणजे फायझर आणि Moderna यांनी निर्माण केलेल्या लसी )कमी होत आहे असे दृष्टोत्पतीस आलेले नाही.
मात्र दक्षिण आफ्रीकी सरकारने Astra Zeneca ची लस त्यांच्याकडील म्युटंट विरुद्ध कमी परिणामकारण आहे असे एका १५ दिवसीय अभ्यासाच्या आधारे जाहीर करून आपल्याला मिळालेल्या Astra Zeneca च्या लसींचे डोस आफ्रिकेतील इतर देशांना वाटून टाकण्याचा निर्णय जाहीर केला . ( व त्यावेळी इतर कुठेही मान्यता न मिळालेल्या जॉन्सन अँड जॉन्सन च्या लसीच्या वापराबद्दल सूचित केले. जॉन्सन अँड जॉन्सन ची लस ही सिंगल डोस लस असल्याने त्यामुळे सार्वत्रिक लसीकरण सुलभ आणि वेगवान होणार आहे) . ज्या वेगवान पद्धतीने हा अभ्यास व निर्णयप्रक्रिया झाली आहे ती अत्यंत रोचक आहे..
परिणामकारकता
मुळात एका देशात अथवा बहुतांशी एका वंशाच्या लोकांवर केलेल्या चाचण्यांच्या परिणामकारकतेची दुसऱ्या चाचणीशी तुलना कशी करणार? बऱ्याच लशी ९०% पेक्षा अधिक परिणामकारक म्हणत आहेत.
जॉन्सन & जॉन्सन
जॉन्सन & जॉन्सनच्या लशीच्या चाचण्या ज्या लोकांवर घेतल्या त्यांतले ४०% अमेरिकी, ४०% द. अमेरिकी आणि १५% द. आफ्रिकन लोक असल्याचं आज बातम्यांमध्ये सांगत होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद. Racial variation असायला पाहिजे चाचण्यांमध्ये. विशेषतः Covid virus आजारची लक्षणे आणि तीव्रता व्यक्तीसापेक्ष दाखवतो, त्यामुळे हे महत्वाचं आहे.
Why Does the Pandemic Seem to Be Hitting Some Countries Harder T
न्यू यॉर्करमधला हा लेख वाचलास का? मोठा आहे (न्यू यॉर्करमधला आहे!) पण माहितीपूर्ण आहे.
Why Does the Pandemic Seem to Be Hitting Some Countries Harder Than Others?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१. आत्ता पर्यंत आलेल्या
१. आत्ता पर्यंत आलेल्या कुठल्याही लसींच्या बाबतीत प्रत्येक देशात वेगळ्या चाचण्या करण्याची पद्धत प्रचलित नाही. गरज नसावी तशी.
२. यातील किमान ऑक्सफर्ड च्या लसीची चाचणी किमान चार देशामध्ये घेण्यात आली. ( याला काही वेगळी कारणे होती)
एक महत्वाचा अपडेट :
एक महत्वाचा अपडेट :
आत्तापर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व लसी दोन डोस च्या आहेत . हीच पहिली लास आलीय ज्याला एकाच डोस लागणार आहे. सार्वत्रिक लसीकरण जलद गतीने होण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो.
जॉन्सन अँड जॉन्सन
लशीचे नाव : Ad २६.COV २. S
लशीची परिणामकारकता : ७२ टक्के
डोस : सिंगल डोस लस
प्रकार : स्नायूत इंजेक्शन
साठवण : २ ते ८ डिग्री सेल्शियस . म्हणजे आपल्या नेहमीच्या फ्रिज मधे साठवण होऊ शकते.
एक दशकापूर्वी बोस्टनस्थित Beth Israel Deaconess Medical Center यांनी अडिनोव्हायरस २६ (Ad.२६) या विषाणूचा वापर करून लसनिर्मिती करण्याचे तंत्र विकसित केले होते. (यापासून) यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने इबोला आणि इतर काही आजारांकरिता लस विकसित केली होती. आता त्यांनी याच तंत्राचा वापर करून कोरोना विषाणुरोधक लस निर्माण केली आहे. मार्च महिन्यामध्ये USA सरकारने या लशीच्या उत्पादनासाठी ४५.६ लाख डॉलर्स त्यांना दिले. प्राथमिक प्राण्यांमधील (माकडांमध्ये केलेल्या) चाचण्यांमध्ये उपयुक्त प्रतिकार-प्रतिसाद येतो आहे हे सिद्ध झाले. यानंतर जुलै महिन्यात फेज १ आणि २ची एकत्रित चाचणी केली गेली. सप्टेंबर महिन्यात ६०,००० स्वयंसेवकांमध्ये फेज ३ चाचणी सुरू झाली.
ऑगस्ट महिन्यात USA सरकारने लशीला मान्यता मिळाल्यास १ अब्ज डॉलर्स किमतीच्या १० कोटी डोसची मागणी २०२१ करिता नोंदवली आहे. १२ ऑक्टोबरला चाचणीतील एका स्वयंसेवकाला काही दुष्परिणाम झाले असे दिसून आल्याने चाचणी थांबवण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतर अकरा दिवसानी चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली. जरी यामुळे विलंब झाला असला तरीही वर्षाअखेरपर्यंत चाचणीचे निष्कर्ष हातात येतील अशी कंपनीला आशा आहे. कंपनी अजून एका दोन डोस लशीची फेज ३ चाचणी सुरू करणार आहे अशी त्यांनी १६ नोव्हेंबरला घोषणा केली.
फेज ३ चाचण्या झाल्या आहेत.
२७ फेब्रुवारीला अमेरिकन सरकारच्या लस नियामक मंडळ म्हणजे FDA ने या लसीला इमर्जन्सी वापरासाठी ( म्हणजे आत्तापर्यंत आलेल्या सर्व लसींच्या प्रमाणेच ) मान्यता दिली आहे .
प्राथमिक प्राण्यांमधील
या जागी, 'वानरांवर केलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये ...'?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माकडे : र्हीसस मकाक , बॉनेट
माकडे : र्हीसस मकाक , बॉनेट मकान आणि लायन टेल्ड मकाक : ही माकडे
वानर : म्हणजे लंगूर : हनुमान लंगूर ( म्हणजेच ग्रे लंगूर ) , गोल्डन लंगूर .
लंगूर वर लसीच्या चाचण्या नक्की झालेल्या नाहीत.
माझ्या माहितीनुसार र्हीसस मकाक वर झाल्या आहेत ( किमान ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची तरी नक्की ) जे माकड आहे. वानर नाही.
आता तुम्ही शंका उपस्थित केली आहेत तर मी लस विकास का करणारे तज्ज्ञ ज्या ग्रुप मध्ये आहेत तिथे या शंकेची दवंडी पिटली आहे. उत्तर आल्यास येथे देईन . पण माझी ९९ टक्के खात्री आहे की माकडे हेच उत्तर असणारे .
आभार.
मला प्राण्यांच्या नावांतल्या तांत्रिक संज्ञा चटकन समजत नाहीत. स्पष्टीकरणाबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एप ला मराठी तांत्रिक शब्द कपि
एप ला मराठी तांत्रिक शब्द कपि असा आहे असे समजले.
मी फार विश्वकोश वगैरेंच्या भानगडीत पडत नाही.
मराठी विश्वकोशीय संपादक मंडळींना बायोलॉजीतील हे छोटे फरक कळत असतील अशी मोठी अपेक्षा मी ठेवत नाही.
अवांतर:
आमच्या एका सरांनी सर्व पक्षांची नवीन संस्कृतोद्भव नावे रचली खरी , पण...
असो.
विश्वकोश
संपादक मंडळाच्या विषयवार उपउपशाखा असतात. त्या त्या विषयात तज्ज्ञ समजले जाणारे लोक त्यावर नियुक्त असतात.
(अवांतर : मी माझ्या विषयात आहे, म्हणून खात्रीलायकरीत्या सांगू शकतो.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्ही म्हणता तसं सामान्यपणे
तुम्ही म्हणता तसं सामान्यपणे असेलही.
परंतु खालीच कुणी नरवानरगण असा एक सर्वव्यापी शब्द वाचलात ना ? तो मराठी विश्वकोषातील असावा
येतंय ना लक्षात मी काय म्हणतोय ते ?
बाकीच्यांचे काय वदावे ?
,
एप किंवा प्रायमेट याला मराठीत
एप किंवा प्रायमेट याला मराठीत काय म्हणतात?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माझ्या माहितीप्रमाणे...
एपला मराठीत वानर म्हणतात. (ॲज़ ऑपोझ्ड टू, मंकी = माकड.) (चूभूद्याघ्या.)
प्रायमेटला मराठीत काय म्हणतात, कल्पना नाही.
विश्वकोशी मराठीत प्रायमेटला
नरवानरगण म्हणतात:
https://marathivishwakosh.org/17605/
तुम्हाला एप आणि प्रायमेट ला ,
तुम्हाला एप आणि प्रायमेट ला , असं अभिप्रेत आहे का ?
प्रत्येक एप हा प्रायमेट असतोच परंतु प्रत्येक प्रायमेट हा एपच असतो असे नाही.
दोन प्रश्न
होय. म्हणजे एपला काय शब्द, प्रायमेटला काय शब्द, असे दोन प्रश्न.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एप ला शब्द कपि.
एप ला शब्द कपि.
प्रायमेट ला बघून सांगतो.
प्रश्न
परिणामकारकता ७२ टक्के असलेल्या लशीचा एक डोस चांगला की नव्वद पेक्षा जास्त टक्के परिणामकारकता असलेल्या लशीचे दोन डोस?
जर ...
जर हा निर्णय एवढा सोपा असता .... जॉन्सन & जॉन्सनची लस काही म्यूटेशनांविरोधात प्रभावी आहे, असं बातम्यांमध्ये ऐकलं. तपशील विसरले. मॉडर्ना आणि फायझरची नाही. शिवाय सध्या लस न घेण्यापेक्षा घेणं किमान ७२% जास्त परिणामकारक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.