अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात

उपोद्धात

मराठी भाषा आणि लोकजीवनाचा विचार करू जाता म्हांइभट, महदंबा, ज्ञानेश्वर, मुकुंदराज, केसोबास, नामदेव अशी लोकभाषिक साहित्याची परंपरा पुढे तुकारामांच्या कवितेत उत्कर्ष पावलेली आहे. ह्या कवितेची लोकभाषा पुढे आधुनिक मराठीत उत्क्रांत हो‌ऊन जनजनांची संवाद वाहिनी झालेली दिसून येते. तुकारामांची शब्दकळा, वाक्यप्रयोग आणि प्रतिमा/रूपकांचा आवाका प्रचंड आहे. तत्कालीन जनजीवनातल्या प्रतिमा आणि रोजच्या व्यवहारातले शब्द तुकारामांनी सढळ हाताने वापरले आहेत. ह्यातले अनेक शब्द आता भाषेच्या वळणाबाहेर गेल्याने बऱ्याच कवितांचा समाधानकारक अर्थ लावणे कठीण हो‌ऊन बसलेले आहे. हा खरेतर एक मोठाच विरोधाभास आहे; एकीकडे लोकोक्ती बनून बसलेल्या तुकारामांच्या सुलभ-सरस कवनांची संख्या मोठी असली, तरी एक युगद्रष्टा कवी म्हणून असलेलं तुकारामांचं कर्तृत्व ह्या पलिकडचं आहे. त्याला केवळ कवितेचेच नव्हे तर भाषेचे देखील आयाम आहेत. मोठा कवी केवळ कविता लिहीत नसतो, तो भाषाही घडवत असतो - प्रचलित भाषेला ठाशीव, रेखीव आकार देत असतो; आणि हे करत असताना भवतालच्या सामूहिक सुखदुःखांचे बखान देखील करीत असतो. ऐतिहासिक दृष्ट्या सुंदोपसुंदीने भरलेल्या सतराव्या शतकात, एकीकडे आधीच्यांची शब्दवेल्हाळ, दृष्टांतकी कविता आणि दुसरीकडे धगधणारे सामाजिक वास्तव, ह्या सांदणदऱ्याच्या मधोमध पाय रोवून ठामपणे उभे असलेल्या तुकारामांच्या लेखन व्यवहाराचा व्याप मोठा आहे. गाथेवरील ह्या आधीच्या व्याख्याकारांनी तुकारामांच्या अर्थनिर्णयात मौलिक काम करून ठेवलेले असले, तरी ढोबळ आध्यात्मिक अर्थांच्या बाहेर पडून कवितेच्या मानुषी रंगात तुकारामांचे कवित्व बघितले जाण्याची नितांत आवश्यकता होती. सदर ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाने ही निकड बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहे असे वाटते. तुकारामांचे लेखन एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. ह्या पसाऱ्यातून बहुस्तर रचना निवडून त्यांचा सखोल परामर्श घेणे सोपे नाही. हे प्रचंड आवाक्याचे आणि अनेक नव्या वाटांकडे निर्देश करणारे काम मराठी साहित्यासाठी एक ठाशीव उपलब्धी बनून उतरले आहे.

कुठल्याही भाषेतलं, कुठल्याही कालखंडातलं मोठं साहित्य सामाजिक अथवा भौगोलिक पोकळ्यांमधून बनत नाही. जाणता कवी जागा असतो, डोळस असतो. जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी बहुस्तरीय आणि लोकोन्मुख असते. त्याचे बह्वंशी काम एकांतात होत असले तरी जगण्याच्या, भाषेच्या आणि सामाजिक संकेतांच्या पलीकडे जा‌ऊन त्याचे सततावलोकन सुरू असते. तुकारामांच्या कवितेचा विचार महाराष्ट्री भूगोल आणि लोकजीवनापुरता मर्यादित न ठेवता हिन्दुस्तानी काव्यजीवनाच्या पटलावर करून चव्हाण यांनी अभ्यासक तसेच वाचकांना एक नवा दृष्टीकोन दिला आहे. कधी मीर, गालिब, कबीर ह्या हिंदुस्तानी किमयागारांच्या काव्यप्रतिभेच्या, तर कधी प्राचीन दर्शनांच्या मनोहारी तत्वचिंतनाच्या उजेडात तुकोबांची कविता आकळू बघणारे हे चिंतन अभिनंदनास पात्र आहे.

संशोधनात्मक साहित्याचे काम स्वत:च्या संकल्पना इतरांपुढे मांडणे नसून प्रस्थापित विचारसरणी आणि दृष्टीकोनांमधे मूलगामी बदल घडवून आणणे होय. तुकारामचिंतनाच्या नव्या पा‌ऊलवाटा शोधू बघणारे हे संशोधन ह्या दृष्टीतून देखील महत्वाचे ठरते.

अनंत ढवळे
हर्डंन, व्हर्जिनिया

...

समीक्षाग्रंथः अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
लेखकः समीर चव्हाण
आवृत्ती : पहिली | हार्ड बाऊंड |
खंड १: पृष्ठे ३५०, खंड २: पृष्ठे ६००
प्रकाशकः शुभानन चिंचकर, स्वयं प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठः भास्कर हांडे
छायाचित्रे: रुपेश शेवाळे
प्रकाशनः २२ जुलै, ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

या समीक्षाग्रंथाचे दोन्ही खंड प्रिन्टिंगला गेले आहेत. मूळ किंमत १४००/- तर
सवलतीत १०००/- (पोस्टेज चार्जेस सहित) मध्ये देत आहोत. प्रकाशनानंतर दोन्ही
खंड लगेच पाठवले जातील. बुकिंग साठी ९७९३४७१७५१ या क्रमांकावर पेटीएम्/गूगल
पे करून मेसेज शेअर कराल. सोबत पत्ता आणि मोबाईल क्रमांक द्याल. बुकिंग
कन्फर्म केले जाईलच.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुस्तकात काय मजकूर आहे हे या ‘उपोद्घाता’वरून नीटसं कळलं नाही. तुकारामाच्या कवितेची समीक्षा कुठल्या अंगाने केलेली आहे, ‘हिन्दुस्तानी परिवेशात’ असा शब्दप्रयोग शीर्षकात का आलेला आहे या सगळ्याबद्दल काहीतरी लिहा, जेणेकरून पुस्तकात रस घ्यायचा की नाही हे धागा वाचणाऱ्या आम्हा पामरांना ठरवता येईल.

व्हर्जीनिया राज्यातल्या त्या गावाचं नाव बहुतेक ‘हर्नडन’ आहे, ‘हर्डंन’ नाही. शिवाय ‘उपोद्घात’ लिहिणारे ‘अंनत ढवळे’ नसून ‘अनंत’ असावेत. ह्या दुरुस्त्या फालतू आणि किरकोळ आहेत हे मान्य, पण त्या करण्याचं काम ‘ऐसी’वरच्या ज्या सदस्याला तहहयात नेमून दिलेलं आहे त्याने ते न केल्यामुळे मला करावं लागतं आहे.

——

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ह्या दुरुस्त्या फालतू आणि किरकोळ आहेत हे मान्य, पण त्या करण्याचं काम ‘ऐसी’वरच्या ज्या सदस्याला तहहयात नेमून दिलेलं आहे त्याने ते न केल्यामुळे मला करावं लागतं आहे.

कळतात बरे ही बोलणी!

चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयदीप चिपलकट्टी,

धन्यवाद. खंड १ आणि २ बद्दल थोडक्यात लिहीत आहे.

खंड १

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर विस्तृत चर्चा असे या खंडाचे स्वरूप आहे. हा खंड जिज्ञासा, व्यक्तिमत्त्व, संतत्व, कवित्व आणि दर्शन या विषयांना धरून पाच अध्याय आणि शासकीय गाथेचे स्वरूप व श्री तुकारामगाथा: शब्दार्थ संदर्भकोश - परिचय या दोन परिशिष्टांसह साकारला आहे.

खंड २

पहिल्या खंडात ये‌ऊ न शकलेल्या किंवा केवळ उल्लेखस्वरूपात आलेल्या जवळपास पंधराशे रचना या खंडात घेतल्या आहेत. या रचना विषयांना अनुसरून एकूण तेहतीस भागांमध्ये विभागल्या आहेत. प्रत्येक रचनेखाली सोपेकठीण, एकार्थी-अनेकार्थी व प्रचलित-अप्रचलित शब्दांचे अर्थ दिले आहेत. कधी कधी अर्थ केवळ शब्दांचे इतर पैलू पुढे आणण्याकरिता दिल्यासारखे झाले आहे पण रचना समजून घेण्यासाठी उपयुक्त हो‌ईल म्हणून समाविष्ट केले आहेत. जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही तिथे एकाहून अधिक अर्थांच्या शक्यता समोर ठेवल्या आहेत किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्थनिश्चिती करताना एकूण‌एक शब्दांचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न राहिलाय. काही ठिकाणी अर्थनिर्णयनात एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी या ग्रथांचा आधार झाला किंवा पडताळा करून पाहता आला. शब्दांच्या पुढे कंसामध्ये शब्दांचे पूर्वरूप किंवा शब्दकोशातले रूप दिले आहे. जिथे आवश्यक आहे तिथे अधिक माहितीसाठी शेरा दिला आहे. रचना शासकीय गाथेतून घेण्यात आल्या आहेत पण जिथे अर्थनिश्चिती करता आली नाही तिथे तळेगाव, देहू, पंढरपूर इत्यादी प्रतींमधले पाठभेद लक्षात घेतले आहेत.

खंड १ आणि खंड २ च्या अनुक्रमणिका इथे देत आहे:

खंड १

अनुक्रम

अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो (जिज्ञासा)
मी तो आगळा पतित (व्यक्तिमत्त्व)
कलियुगीं हरी बौद्धरूप धरी । तुकोबाशरीरीं प्रवेशला (संतत्व)
अक्षईं ते झालें (कवित्व)
देशकालवस्तु भेद मावळला (दर्शन)

परिशिष्टे
शासकीय गाथेचे स्वरूप
श्री तुकारामगाथा संदर्भ शब्दकोश - परिचय
तुकारामांच्या रचनांची सूची
इतर कवींच्या रचनांची सूची
व्यक्तिनाम सूची
पारिभाषिक शब्दांचे अर्थ
संदर्भसूची

खंड २

अनुक्रम

१. नव्हे आराणूक संवसारा हातीं (अस्वस्थता)
२. गुण गाई या देवाचे (गुणगान)
३. घ्यावी अखंडित सेवा (सेवाभाव)
४. सुंदर ते ध्यान (दृष्टिभरू)
५. कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी (सलगी)
६. भेटीलागीं जीवा लागलीसे आस (अंगसंग)
७. दासत्वें दाविलें धन्याचें भांडार (ठेवा)
८. इच्छाभोजनाचा दाता (सहभोजन)
९. तूं ठायींचा गोवळ (बाळगोपाळ)
१०. आडसोनि शुद्ध करीं वो साजणी (रूपक)
११. मैंद आला पंढरीस (तीर्थ)
१२. ठेवूं चित्त पायांपें (श्रद्धाभाव)
१३. आपुलें उचित केलें संतीं (उपकार)
१४. आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ (बळिवंत)
१५. भाव केला बळी (भावबळ)
१६. तुका ह्मणे माझी केळवते वाणी (झरवणी)
१७. बोलिलों तें कांही तुमचिया हिता (स्वहित)
१८. हा तों अनुभव रोकडा (साक्षत्व)
१९. नामसंकीर्तन साधन पैं सोपें (नामसंकीर्तन)
२०. करूं गदारोळी हरिकथा (आख्यान)
२१. शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन (आचरण)
२२. टेवां दावी थोर करूनियां (ममत्व)
२३. पाइकपणें तो सर्वत्र सरता (पाईकत्व)
२४. भेदाभेदभ्रम अमंगळ (समभाव)
२५. तेंग तें चि मूळ लटिक्याचें (फजितखोर)
२६. कुशळ हे भांड बहु जाले (वाचाळ)
२७. गाजराची पुंगी तैसे नवे जाले जोगी (भोरुपी)
२८. उभयतां नाड हित असे (तटस्थ)
२९. जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती (प्रेमसूत्रदोरी)
३०. लौकिका या बाहेरी (एकाकी)
३१. सहज लीळा मी साक्षी याचा (लीला)
३२. अनुभव सरिसा मुखा आला (क्षरा‍अक्षरावेगळा)
३३. केलें कौतुक नवल (वचने)

‘हर्नडन’ किंवा ‘हर्डंन’ या गोष्टी लिप्यंकनाला धरून आहेत. अनंत ढवळे यांनी जसे दिले तसेच घेतले आहे.

समीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘हर्नडन’ किंवा ‘हर्डंन’ या गोष्टी लिप्यंकनाला धरून आहेत. अनंत ढवळे यांनी जसे दिले तसेच घेतले आहे.

‘हर्डंन’बद्दल याच धाग्यावर ‌अन्यत्र विवेचन केलेले आहेच.

‘अनंत’ हे नाव आपण प्रथम ‘अंनत’ असे लिहिले होतेत, जे आता (कोणतीही acknowledgement न देता) आपण (परस्पर) सुधारले आहे. श्री. अनंत ढवळे यांनी आपले नाव ‘अंनत’ असे दिले असू शकेल, याबद्दल मी व्यक्तिशः साशंक आहे.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव लिहिताना चूक माझ्याकडून झाली. जयदीप यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मी ती सुधारली. त्यांच्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना धन्यवाद दिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्जित भाषेतल्या विशेष नामांच्या बाबतीत स्थानिकांच्या उच्चारांना प्राधान्य द्यावे असा माझा वैयक्तिक प्रयत्न असतो. 'Herndon' ला 'हर्नडन' असे लिहिणे केवळ चुकीचे नव्हेतर काहीसे विनोदी देखील होईल. प्रतिसादकर्त्याने एकवेळ गुगलकरून पाहिले असते तर हर्डंनच्या उच्चारासंबंधाने इतका गोंधळ नसता उडाला.

भाषेबद्दल 'एंटायटलमेंट' म्हणजे 'व्याज सांस्कृतिक हक्क/ मालकीचा गंड' बाळगणे योग्य नव्हे हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘हर्नडन’ हे चुकीचे कसे, हे समजू शकले नाही. मराठीभाषकांच्या काही उपगटांत त्या ‘र्न’ या (शब्दाच्या मध्यभागी येणाऱ्या) जोडाक्षराचा पूर्ण (स्वरयुक्त/हलन्तविरहित?) उच्चार होऊ शकतो (आणि म्हणूनच, उदाहरणादाखल, Lyngdohचे ‘लिंगडोह’ असे लिप्यंतर कोणास हास्यास्पद वाटू शकते), म्हणून?

तसेच जर असेल, तर मग ‘कलकत्ता/कोलकाता’ हेसुद्धा चुकीचे म्हणावे लागेल; ते ‘कल्कत्ता/कोल्काता’ असे लिहावयास पाहिजे, नाही काय?

(फार कशाला, तळेगाव, लंडन वगैरे गावांची नावेसुद्धा ‘तळेगाव्’, ‘लंडन्’ अशी लिहिली जात नाहीत. परंतु, शब्दाअखेरीस येणाऱ्या जोडाक्षरविरहित परंतु अकारान्त व्यंजनाचा उच्चार अध्याहृत हलन्ताप्रमाणे करण्याच्या सामान्य मराठी प्रथेस जमेस धरून, तेवढे सोडून देऊ. (अतिअवांतर: या नियमाससुद्धा अपवाद असावेत. अन्यथा, ‘लिंगडोह’चे कन्फ्यूजन निदान निम्मे तरी टळले असते. असो.))

आणि, अगदी विदेशी/इंग्रजीउद्भव शब्दांचीच गोष्ट जरी करायची झाली, तरीसुद्धा, ‘टपालवाहक’ अशा अर्थीचा जो मराठीत रुळलेला ब्रिटिशइंग्रजी शब्द आहे, तोसुद्धा मराठीत (देवनागरीतून) लिहिताना, ‘पोस्टमन’ असाच लिहिला जातो; ‘पोस्ट्मन’ असा नव्हे. आता, (इंग्रजी जरा बरे असलेले) अनेक मराठीभाषक त्या जोडाक्षराचा उच्चार व्यवस्थित (अध्याहृत हलन्तयुक्त) करतात. उलटपक्षी, काही मराठीभाषक (नित्याच्या खोडीने) त्याचा उच्चार स्वरयुक्त करतात खरा, परंतु त्यास नाइलाज आहे. (या दुसऱ्या गटात अनेकदा – पुन्हा, नित्याच्या खोडीने – त्या ‘स्ट’चा ‘ष्ट’सुद्धा होतो; परंतु, ती निराळी गंमत आहे.)

सांगण्याचा मतलब, ‘हर्नडन’ला प्रघात आहे. परंतु तरीसुद्धा, तेवढाच जर आक्षेप असेल, तर तो ‘हर्न्डन’ असे लिहून निवारता येईल.

मात्र, ‘हर्डंन’ हे निव्वळ निखालस चुकीचेच नव्हे, तर (बहुधा) अनुच्चरणीय ठरावे. (चूभूद्याघ्या.) Herndonमधील ध्वनिक्रम ह + र् + न् + ड + न् असा आहे. मात्र, ‘हर्डंन’ मधून प्रतीत होणारा ध्वनिक्रम हा ह + र् + ड + (अनुनासिक – याच्या जागी न् मानायला मी तयार आहे.) + न् (किंवा न) असा आहे, जो एक तर निखालस चुकीचा आहे; शिवाय, त्याचा उच्चार कसा करायचा, हे तुम्हीच सांगा. (कदाचित – ‘सर्वांना’चे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून – ‘हर्डन्न’?)

सारांश, Don’t defend the indefensible. (अर्थात, ‘आई तुझा आर्शिवाद’ असे (ट्रकमागे) लिहिण्याच्या सामान्य प्रथेचा दाखला देऊन ‘हर्डंन’चेसुद्धा समर्थन (कदाचित; चूभूद्याघ्या.) करता येईलच, म्हणा; परंतु, त्या समर्थनात दम नाही, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे. असो चालायचेच.)

(@जयदीप चिपलकट्टी: चावी मारल्याबद्दल अंनत – चुकलो, अनंत – आभार! आपला आजन्म ऋणी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मात्र, ‘हर्डंन’ हे निव्वळ निखालस चुकीचेच नव्हे, तर (बहुधा) अनुच्चरणीय ठरावे. 

‘हर्डंन’ हा उच्चार अशक्य नसला तरी हास्यास्पद आहे. पण भाषेत कुठेतरी त्याला जागा द्यायचीच असेल तर तूर्तास असं समजू की इंग्रजी आणि संस्कृत शब्द एकाच वाक्यात आणण्याची आपल्याला मुभा आहे. तर अशा परिस्थितीत ‘हर्डं न कुर्यात’ (अर्थ: घोळका करू नये) ह्या वाक्यात हा उच्चार शक्य आहे. पण हे ऐकून व्हर्जीनियातले (स्थानिक) लोक बुचकळ्यात पडतील याबद्दल माझी खात्री आहे.

पण ते असो. पुस्तकाचा विषय रोचक वाटतो. संधी मिळाल्यास नक्की वाचेन.

——

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लगेचच गॅंगअप करण्याची गरज काय? आणि माझ्या नावावर ह्या पांचट कोट्या करण्याची गरज का पडावी? एवढा उन्माद कुठून येतो?

सदर पुस्तकाच्या विषयवस्तूबद्दल बोलण्याइतपत अभ्यास असेल तर बोला - वाचायला आवडेल. ऊगाचच कुजकट कमेंटी टाकू नका.

आणि हो, हास्यास्पद काही असेल तर तो हर्न डन हा उच्चार आहे- आणि तुम्हा लोकांचा एंटायटल्ड गंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Try not to take yourself too seriously, एवढेच नम्रपणे सुचविण्याचा प्रमाद पत्करून आवरते घेतो.

बाकी चालू द्या. (हर्डंन तर हर्डंन. माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काय जातेय! ते काय ते हर्नडनवाले (त्यांना तेवढीच गरज असलीच, तर) पाहून घेतील.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्यापैकी शिकलेल्या पण मर्यादित बौध्दिक कुवत असणाऱ्या माणसांमध्ये काही गुण दिसून येतात :

  1. Overstating the obvious.
  2. Feigning intelligence to hide ignorance.
  3. Lack of achievement- which manifests itself as frustrated , incessant anonymous online trolling.
  4. Ganging up against perceived cultural threats.

डिक्शनरी बघितलीत तर मला काय म्हणायचय हे कदाचित लक्षात येईल. नाही आल तर इग्नोरंस इज ब्लिस !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... या अशा प्रतिक्रियासुद्धा वाचनीय असतात. (आणि कधी मूळ लेखापेक्षा प्रतिक्रियाच जास्त वाचनीय असतात!). या कुजकट वाटल्या तुम्हाला आश्चर्य आहे. आणि उन्माद? असो. तुमच्या सात्विक संतापात भर घालू ईच्छित नाही.

आता लिहितोच आहे तर अजून एक शंका पण विचारतो - "सांदणदऱ्याच्या" म्हणजे काय? हा शब्द कधी ऐकला नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सांदणदरा माहित नाही की संदर्भ कळाला नाही ? अमुक प्रतिमा का वापरली आहे असा तुमचा प्रश्न असेल तर तो अयोग्य ठरेल कारण तो लिहिणाऱ्याचा निर्णय असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वर म्हंटल्याप्रमाणे "हा शब्द कधी ऐकला नव्हता". आणि शब्दच ऐकलेला नाही त्यामुळे "अमुक प्रतिमा का वापरली आहे" हे मी विचारायचा प्रश्नच येत नाही. तुमच्या लेखनातले "मानुषी", "बखान" हे शब्द पण माहीत नाहीत त्यामुळे त्याबद्दल पण सांगू शकाल का?

समीर चव्हाण: तुम्ही अधिक माहीती दिलीत त्यात तुमच्या लिखाणात शब्दांचे अर्थ / अर्थछटा, शब्दांबद्दल संदर्भ, माहीती, स्त्रोत वगैरे पण दिल्याचं लिहिलं आहे. त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. इतक्यात तरी मी वाचीनसं वाटत नाही. पण माझ्यासारखा कोणी वाचक असेल त्याला त्याचा खूप उपयोग होईल म्हणून ही पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

शब्दांचे अर्थ सांगण्याबद्दल आठवण करायला हा निरोप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

Herndon उच्चार - याबाबत हे प्रमाण मानता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सगळ्यांचेच आभार.

लिप्यंकन हे मूळ शब्दाच्या उच्चाराचे अप्रोक्सिमेइशन असते. तेव्हा प्रश्न राहतो की कोणते अप्रोक्सिमेइशन सरस आहे. याचा निवाडा मूळ (स्थानिक) उच्चाराच्या अनुभवाशिवाय शक्य नाही.

समीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0