नर्मदापुरम (होशंगाबाद) - 25 दिसेम्बर २०२३

सकाळी उठून घाटावर जावं, नर्मदेचं पात्र पाहावं. शांत व्हावं.

भल्याथोरल्या घाटाच्या पायऱ्यांवर उभं राहून नर्मदेला पाहावं

घाट स्वच्छ नसतोच.

नर्मदेचं पात्र, नजर ठरत नाही. डुबकी मारायची इच्छा होतेच. आपण थोडीच पापं धुवायला आलेलो असतो? आपण आलेलो असतो नर्मदेच्या गोष्टी ऐकायला.

आपल्याच विचारात चालत जावं , घाटावरच्या नर्मदेच्या मंदिरात. नर्मदासूक्त लिहिलेलं असतं तिथे. प्रयत्नपूर्वक वाचावं ते. "त्वदीय पाद पंकज , नममि देवी नर्मदे"

पुजाऱ्याच्या पुढ्यातल्या ताटात पैसे टाकले की पुजारी बोलता होतो.

तो सांगतो, नर्मदा मैया पवित्र. साक्षात भगवान शंकराच्या घामापासून तयार झालेली. ,"बात ये है की पाप धोने के लिये गंगा जी में डुबकी लगानी पडती हैं , लेकीन नर्मदा जी के तो दर्शन ही काफी हैं"

आपण आपला पाप पुण्याचा हिशोब मांडायला लागतो आणि वाटतं, इतरांचं नुसत्या दर्शनाने काम होईल पण आपल्याला मात्र पाप धुण्यासाठी इथेही डुबकीच मारायला लागेल.

मग घाटाच्या पायऱ्या उतरताना मग एक बाबा दिसतो. त्याच्या बाजूला बसून नुसतं "नर्मदे हर" म्हणायचं अवकाश की गप्पाच सुरू होतात.

तो सांगतो, ही इतकी शांत, निवांत नर्मदा इथली होशंगाबाद (आता नर्मदापुरम) ची. खरी नर्मदा अवखळ, एखादी टीनऐजर मुलगी जशी असते ना , उत्साहाने खळखळणारी, अल्लड, अवखळ अगदी एखाद्या प्रेमकथेत शोभेल अशी. अमरकंटक च्या पहाडांमधली. नुसती खळखळणारी , आपला मार्ग शोधणारी आणि उपजतच आवेगाने वाहणारी, सतत प्रवाही. म्हणून तिला म्हणायचं रेवा. आणि मग तिचा जीव जडतो सोनभद्र वर. लोक म्हणतात अल्लड वयात झालेलं प्रेम थिल्लर असतं पण आमच्या नर्मदेचं, लाडक्या रेवाचं तसं नाही. तिचं प्रेम अगदी खरं. म्हणून तर सोनभद्र मिलन नावाचं ठिकाण आहे अमरकंटक जवळ. तर ही रेवाची गोष्ट. रेवाच्या सोनभद्र वरच्या प्रेमाची. पण हे प्रेम स्वीकारता आलं नाही सोनभद्र ला. रेवाशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या पण सोनभद्रचा जीव जडलेला जोहीला वर (ही सुद्धा एक नदीच बरं का). आणि मग एक दिवस रेवाला कळलं ना हे सगळंच. ती तशीच वळली, मागे फिरली वेगाने धावू लागली, दूर दूर उलट्या दिशेने, सोनभद्र पासून दूर, अमरकंटक पासून दूर, भेडाघाटातून मार्ग काढत , मागे वळून पाहिलंच नाही तिने. वाहत वाहत तिची नदी झाली, ती नर्मदा झाली. आज तिच्या आजूबाजूच्या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पण आमची रेवा, प्रेमात खाल्लेल्या धोक्याने जी मागे वळली, मार्गच बदलला तिने. ती थेट अरबी समुद्रालाच जाऊन मिळाली. ती एकटीच अशी.

ही अशी नर्मदेची गोष्ट. ती गोष्ट ऐकून मग नर्मदा अजून जवळची वाटायला लागते. बाबा तर निघून जातो आपल्याला घाटावर एकटं सोडून.

आयुष्यात धोके, धक्के आपण खाल्लेलेच असतात की सगळ्यांनी. असं वाटतं रेवाच्या पाण्यात आता खरंच उतरावं. पाप धुवायला म्हणून नाही तर तिला सांगावं, मला तुझी गोष्ट कळते, समजते आणि म्हणून तू मला जवळची वाटतेस.

अशा या घाटावरच्या गोष्टी.. नदी, तिच्या गोष्टी, तिच्या गप्पा आणि तिच्याभोवती नकळत विणली जाणारी संस्कृती.

आता जायलाच हवं पाण्यात असं म्हणत निग्रहाने पाण्यात पाय ठेवला की लक्षात येतं प्रचंड थंड आहे पाणी. तरीही दोन डुबक्या घेतोच. मग प्रचंड भूक लागते. पुढे चालत आलात की एका ठिकाणी रस्त्याच्या चौकात गर्दी असते तिथे नक्की कचोरी आणि समोसा मिळतो.

कचोरी खावी छोले आणि चटणी मिक्स करून

चवीचा कल्लोळ होतो जिभेवर

समोसा खावा. अजून विचारावं ," भैयाजी और क्या खिलाओगे"

तो म्हणतो ," हाव गुलाबजाम में रबडी मिला के खावो"

मग ते घ्यावं, पहिल्याच घासात तृप्त व्हावं.

दिवसाची सुरुवात छान आहे. नर्मदापुरम छान आहे.

असं वाटतं नदीकिनारीच राहावं, नदीच्या गोष्टी ऐकत राहाव्यात . पण मग लक्षात येतं अरे पुढचा प्रवास करायचाय. आता निघायला हवं. नर्मदेचं पाणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवत पुढचा प्रवास सुरु होतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

- अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हूं.

मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचूनही निवांत वाटलं.
सुंदर लिहीलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0