चार कविता

१. रेघोट्या

टेकवला कुंचला कॅनव्हास वर
आणि उतरू दे तो रंग,
पांढऱ्याशुभ्र अवकाशावर
ने त्या कुंचल्यासी सरकवत
त्या अवकाशावर
कमनीय वळणे घेऊन इंद्रधनुष्यासम
अन कधी नागमोडी
घेऊ दे त्या कुंचल्यासी
चुंबन धवल वस्त्राचे
ती कमान संपेपर्यंत

२. मृदगंध

बरसू दे त्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांना
भिजू दे तुझं अंग नि अंग त्या तुषारांमध्ये शहारून
आणि सामावून दे
त्या तुषारांनी मुक्त केलेल्या सुगंधाला
तुझ्या मनात अत्तराच्या रूपाने
वाहू दे तो गार वारा
भिडू दे तुझ्या अंगाला
आणि मनालादेखील
वाहू दे त्यासी घेऊन तो सुगंध
आणि मुक्त करू दे त्या सुवासाप्रमाणे
तुला
तुझ्याच कैदेतुन

३. प्रश्न

उभा आहे तो
नजारा रोखून, हात फैलावून
विचारतो आहे
दुर्दैवी पानगळ तो विसरला होता
ओरखडलेला
सोनसळी किरणांची तिरीप कि घरंगळलेले अश्रू
नात्याची रेशीमगाठ आणि प्रश्नांचा गुंता
हातातली लेखणी उतरवत होती
त्याच्या मानाचं प्रतिबिंब
आणखी कुणाला विचारावेत
गुलाबाला कि बाभळीला?
दोघांच्या नशिबी काटे
पण
पाकळ्यांचा गंध आणि खारट वारं
तरीही रुतणारा काटा अलगद
का स्वीकारावं त्याला मोठ्या मानाने
अन का द्यावा त्यासी भावनांचा ओलावा

४. खडकांची माती

रणरणतं ऊन, उष्ण वारा
धूळ, खडकांची माती
दूर दूर पर्यंत ओसाड माळ
कच्चा रस्ता
कुठेतरी एखादं दगड मातीचं घर
त्याशेजारी सुकलेली, कोरडी पडलेली विहीर
गारेगारवाल्याची घंटी ऐकून
त्याकडे धावणारी लहान सहान मुले
त्यांच्याकडे दारातूनच पाहत
डोळ्यांत पाणी आणणारी त्यांची अशक्त आई
सुकलेल्या झाडांच्या काटक्या, आणि एकीकडे आशेचा मोहोर

field_vote: 
0
No votes yet