कागजी़ है पैरहन

पूर्वपीठिका : प्रस्तुत लेख याआधी प्रसिद्ध झालेला आहे. लेख लिहून होईस्तोवर मी फक्त पहिली दोन पुस्तके वाचलेली होती. तिसरं पुस्तक वाचलेलं नव्हतं; त्यामुळे त्या पुस्तकाचा संदर्भ लेखामधे आलेला नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"घटना घडतात.पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.घडायचं ते घडून जातं..पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले. तडफडण्याचे.. हसण्याचे.. रडण्याचे.. हरण्याचे..जिंकण्याचे..क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे.त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो !पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो !"

वरील उतारा आहे मराठी कथालेखिका मेघना पेठे यांच्या एका कथेतील. नव्वदीच्या दशकात पेठे यांच्या कथा प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. दोन कथासंग्रह आणि एका कादंबरीनंतर "मराठीतील अग्रगण्य लेखिका" म्हणून त्या आता गणल्या जाऊ लागल्या आहेत. माणसामाणसांमधील संबंधांची , नात्यांची चित्रणें , त्या नातेसंबंधांतील निरर्थकतेची (किंवा अतार्किक , गूढ वाटेल अशा अर्थांची) दर्शने, आणि या साऱ्यातून आपल्या समग्र अस्तित्वाकडे पहाण्याची काव्यात्म, चिंतनगर्भ संवेदनशीलता हा जणू प्रत्येक हाडाच्या, सच्च्या लेखकाचा स्थायिभाव असतो. पेठे यांच्या लिखाणाला या सर्वांवर नक्की दावा सांगता येईल.

कसे आहे हे लेखिकेच्या कथांमधील जग? बहुतांश कथा आजच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडतात. पेठे यांना अतिशय परिचयाचा हा शहरी भाग त्यांच्या कथेचा एक अविभाज्य भाग आहे. हे शहर,त्याचे युध्यमान दैनंदिन आयुष्य, त्याचा बिनचेहेऱ्याचा, गिळंकृत करणारा निर्मम बकालपणा हा या कथेतील बोधस्वर आहे. कधीकधी तर कथांचे हे पर्यावरण जणू एक पात्र बनून येते : कथेचे ते पर्यावरण नसते; तर त्या पर्यावरणातच ती कथा घडते. आशयामध्ये वातावरणाला बेमालूम मिसळण्याच्या लेखिकेच्या कौशल्याची तुलना जी. ए. कुलकर्णींशी करायचा मोह इथे होतो...

कुणाकुणाच्या कहाण्या लेखिका सांगते? औरंगाबादेतून आलेला, प्रायोगिक नाटकांमधील एक हाडाचा, हिऱ्यासारखी गुणवत्ता असलेला "स्ट्रगलर" , ज्याने या वेडापोटी, या मृगजळापाठी आयुष्य पणाला लावलेले आहे...त्याचे वेड , त्याची मजबूरी...या निर्दय शहराने त्याची केलेली धूळधाण; त्याची कहाणी. या शहराच्या बकालपणात रोजचा झगडा करणाऱ्या, संसाराच्या ओढगस्तीत पिचून गेलेल्या, मोलकरणीचे काम करणाऱ्या मंजुळाबाई - या रखरखाटात , एका सड्या , फ्लॅटमधील तरुणाशी घडलेला संग, त्या संगातही कळत-नकळत त्यांनी दिलेले वात्सल्याचे दान - त्या दानाची कहाणी. लग्नाचे वय उलटून गेलेल्या , शारीर सुखाच्या अनुभवानंतर , आशा-निराशेचा पूल ओलांडून झाल्यावर आपल्या साथीदाराच्या निवडीकडे शहाणपणाने बघणाऱ्या पस्तीशीच्या मुलीला आलेल्या शहाणपणाची कहाणी. आणि अशा कितीतरी.

आणि ही दर्शने घडविताना मग अनेक संकेतांचे बांध त्यांच्या लिखाणात मोडलेले दिसून येतात. पण "स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांचे धीट चित्रण करणारी लेखिका" किंवा "स्त्रीवादी लेखिका" हे सर्व शिक्के त्यांच्याबाबतीत अपुरे, एकांगी आणि म्हणूनच अन्यायकारक आहेत. मायक्रोस्कोपखाली दिसणाऱ्या जंतुंकडे पहाताना ज्याप्रमाणे एखाद्या शास्त्रज्ञाकडे एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या सोसाट्याकडे, महापूरामध्ये साचून आलेल्या लव्हाळ्यांकडे पहाण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन आहे. त्या दर्शनामध्ये ना फाजील गळेकाढूपणा , ना शारीर वासनांना कुरवाळणे. निसर्गाच्या न-नैतिकतेइतकेइतकीच लेखिकेच्या आविष्काराची न-नैतिकता. इथे इमान दिसते ते केवळ संकेतांना चिरत जाणाऱ्या सत्यान्वेषणाला.

सत्याच्या शोधाची , त्याच्या दर्शनाची बंदिश घडते प्रतिमा-प्रतिकांनी, काव्यात्म संदर्भांनी. या लिखाणात ठायीठायी दिसणाऱ्या मराठी , इंग्रजी , उर्दू काव्याचे संदर्भ लिहिणाऱ्याच्या रसिकतेची खात्री देतात; सगळ्या आशयाला संपन्नता देतात. म्हणूनच , या लिखाणाला सलाम करताना गालिबच्या दोन ओळींनी समारोप करणे योग्य होईल : "नक्श फरीयादी है किसकी शोखी-ए-तेहेरीर का काग़झी है पैरहन हर पैकरे तस्वीर का"
(आपला जन्म हेच जणू गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे घेऊन जन्माला आलेले आपण सगळे कुणाच्या (परमेश्वराच्या ? नियतीच्या?) हातची खेळणी आहोत ? शेवटी काय , सगळ्या चित्रांना रूप घ्यावे लागते कागदी कपट्यांचेच !)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

थोडक्यात पण मार्मिकपणे लेखिकेची आणि तिच्या निर्मितीची ओळख करून देणारी प्रस्तावना लिहिल्याबद्दल धन्यवाद! पुस्तके जरूर वाचून काढणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचय आवडला.

सशक्त लेखिका फक्त स्त्री आहे म्हणून स्त्रीवादी लेखिका म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल असं मेघना पेठेंच्या बाबतीत वाटतं. 'हंस अकेला' वाचलं आहे; 'आंधळ्यांच्या गायी' हा कथासंग्रहही माहित आहे. मेघना पेठेंचं इतर कथासंग्रह आहेत का? त्यांची कादंबरी तितकीशी आवडली नव्हती, (खरंतर वाचताना कंटाळाच आला).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'चेकॉव्हशी माझी जो तुलना करेल त्याला माझा भीषण असा शाप आहे' असे जीएंनी लिहून ठेवले आहे. नशीब त्यांच्या काळात पेठे नव्हत्या. नाहीतर जीएंनी लेखन फार पूर्वीच थांबवले असते. आयुष्य नावाच्या जनावराला भिडणारे, त्याच्या शिंगांना धरुन त्याला मागेमागे ढकलणारे, कधी त्याच्याबरोबर त्याच्या खुरांनी उडवलेल्या धुरळ्यात फरपटत जाणारे, रक्तबंबाळ होणारे आणि वाचकालाही रक्तबंबाळ करणारे जीएंचे लेखन आणि इन्क्युबेटरमध्ये अंडी उबवावीत तसे पेठेंचे लेखन याची तुलना करण्याचा मोह प्रस्तुत लेखकाला झाला हे वाचून मलाच माझी सगळी मते तपासावीशी वाटू लागली आहेत. 'काग़झी है पैरहन..' याला (इराणमधील?) गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा संदर्भ आहे. गुन्हेगाराला शिक्षा सुनावताना त्याला कागदाचा सदरा घालून न्यायालयासमोर आणले जात असे. व्यासंगी आणि मार्मिक लेखनाबाबत प्रसिद्ध असलेल्या प्रस्तुत लेखकाने केलेली ही तुलना वाचून सगळेच सदरे कागदी वाटू लागले आहेत. ईश्वरेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काही डिस्क्लेमर्स राहून गेले असावेत असा माझा अंदाज आहे. चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"नाहीतर जीएंनी लेखन फार पूर्वीच थांबवले असते. आयुष्य नावाच्या जनावराला भिडणारे, त्याच्या शिंगांना धरुन त्याला मागेमागे ढकलणारे, कधी त्याच्याबरोबर त्याच्या खुरांनी उडवलेल्या धुरळ्यात फरपटत जाणारे, रक्तबंबाळ होणारे आणि वाचकालाही रक्तबंबाळ करणारे जीएंचे लेखन आणि इन्क्युबेटरमध्ये अंडी उबवावीत तसे पेठेंचे लेखन याची तुलना करण्याचा मोह प्रस्तुत लेखकाला झाला हे वाचून मलाच माझी सगळी मते तपासावीशी वाटू लागली आहेत"

कलाबिलांच्या क्षेत्रात सगळीच मते सापेक्ष आहे हे जरी खरे मानले, तरी 'हंस अकेला' ('नातिचरामि' आणि अतीच ताणायचे तर 'आंधळ्याच्या गायी' बाजूला ठेवू, त्याबद्दल मतभेद संभवणे सहजशक्य आहे) या कथासंग्रहाला कुणी 'इन्क्युबेटरमध्ये अंडी उबवावीत' तसल्या लेखनाची उपमा दिलेली पाहून मलाही माझी सगळी मते तपासावीशी वाटू लागली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>

अशा तुलनाकारास चेकॉव्हने देखील शाप दिला असता...

जीए अगदी वाचवत नाही आणि चेकॉव्ह वाचताना खाली ठेवलं जात नाही. अशा परिस्थितीत तुलना तरी कशी करावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मी मेघना पेठे यांचे केवळ 'नातिचरामी' वाचले आहे. जीए वाचताना मला ज्याप्रकारचा शीण येतो तोच हे पुस्तकही वाचाताना आला होता. (व पुस्तक कसेबसे संपवले होते). तेव्हा तुलना अस्थानी नसावी. Wink
असो. नातिचरामी 'फार्फार' आवडले नसले तरी त्यांचे (पेठे यांचे) दुसरे एखादे पुस्तक समोर आले की नक्की उचलेन असे वाटते.

परिचय-वाचकाची भुमिका- या अंगाने मस्त उतरला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जीएंचा एक कथासंग्रह आणि 'नातिचरामि' दोन्ही वाचताना टाकून दिलं आणि पुन्हा हात लावण्याची हिंमत केली नाही. पुढे मेघना (भुस्कुटे)नेही 'हंस अकेला'ची शिफारस केली म्हणून ते वाचलं आणि चक्क कथा आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाई हल्ली लिहित नाहीत का? बरं आहे अर्थात लिहीत नसतील तर!
'हंस अकेला' हाच विराम बरा होता खरं तर... पण नातं हे असं सूत्र आहे की माणूस गोत्यात येतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जालीय विश्वाच्या साहित्यिक घडामोडीमध्ये जी.ए. आणि नेमाडे या दोघांना कोणत्याही निमित्ताने पटलावर आणायचे आणि त्याना झोडपायचे ही एक सहजसुलभ गोष्ट झाली आहे. काही झाले तरी पहिला लेखक उत्तर देण्याच्या पलिकडे गेला आहे तर दुसरा कसल्याही टीकेला केराची टोपली दाखवितो त्यामुळे कुणाच्याच कातडीवर कसलीही थरथर उमटण्याची शक्यता नाही.

राहताराहिला मेघना पेठे यांच्या साहित्याच्या दर्जाचा. तर एकदा 'नातिचरामि' चे भलावण कोल्हापुरातील काही साहित्यप्रेमी मित्रांच्यात केली तर त्यानी डोळे वटारून माझ्याकडे पाहायला सुरुवात केल्यानंतर विकतची डोकेदुखी नको म्हणून तोही विषय बंद केला. 'हंस अकेला' वाचले हेही मग कुणाला सांगणे नकोसे झाले.

आपली आवड आपल्यापुरतीच ठेवणे हेच शिकलो त्यातून. 'कागजी.....' वाचन यादीत घेतले आहे, इतकेच या लेखाच्या (...तसेच लेखकाच्या लेखनशैलीच्या) निमित्ताने म्हणेन.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीए गेले, मेघना लिहित नाही. कसे होणार? आता समीक्षा कशाची करायची? तेच जुने जुने आळवत बसायचे.
.प्रतिभा. अशी गल्लोगल्ली दिसत नाही. असो.
जीए आणि मेघना भाग्यवान म्हणायचे!
अशा तुलना करणे मला स्वतःला आवडत नाही. पण तौलानिक अभ्यास आणि दैवतांना आराधना यात फरक असतो, असावा.. ते भान राहत नाही हे मात्र खर.
त्याचा त्याचा चॉईस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

मी लेखाच्या सुरवातीलाच म्हण्टल्याप्रमाणे प्रस्तुत लेखिकेची पहिली दोन पुस्तकं वाचून त्यावर केलेलं हे मतप्रदर्शन आहे. या लेखांनंतर बाईंनी "नातिचरामि" नावाची कादंबरी लिहिली त्याबद्दलचा विचार हा लेख लिहिताना केलेला नव्हता.

प्रस्तुत कादंबरीचा माझ्या मनावरचा परिणाम कथांइतका खोलवरचा नव्हता. कादंबरीमधे साधारण "बेडरूम पॉलिटिक्स" आलेलं आहे. त्यामधे लेखिकेची अजोड शैली, प्रसंगी संदर्भसंपृक्तता आणि मुख्य म्हणजे धारदार संवेदनशीलता यांचा प्रत्यय येतोच. परंतु विवाह, प्रेमसंबंध, प्रेमसंबंधांमधल्या शक्यता, त्यात खेळले जात असलेले डावपेच, सामाजिक बाबी याभोवती फिरणार्‍या या कृतीला कादंबरीचा पैस नीटसा जमला नाही असं एक वाचक म्हणून मला वाटलं. दोन ताकदवान कथासंग्रहांनंतर आलेल्या, महत्त्वाकांक्षी म्हणता येईल अशा या प्रयत्नाची नि माझी काही मैत्री झाली नाही खरी.

असो. जीएंशी केलेली तुलना काहींना पटलेली दिसत नाही. दोन्ही लेखकांच्या लिखाणाच्या फक्त एका विशिष्ट पैलूबद्दल मी तुलना केलेली होती हे इथे (पुन्हा एकदा) नमूद करावे म्हणतो. अन्यथा अशी सरसकट तुलना चुकीची आहे याची मला जाणीव आहेच. या संदर्भातले आणखी थोडे अवांतर सांगायचे तर २००९ च्या डिसेंबर महिन्यात पेठेबाईंना "जीए कुलकर्णी स्मृतीपुरस्कार" जीएंच्या भगिनी श्रीमती पैठणकर यांच्या हस्ते देण्यात आला होता. पुरस्काराची निवड करताना प्रा. हातकणंगलेकर, श्रीमती पैठणकर आणि अन्य जीएंचे समीक्षक यांच्या मतांचा काळजीपूर्वक विचार केला गेला अशी माझी समजूत आहे. अर्थात, २००७ च्या सुमारास मी लिहिलेल्या प्रस्तुत लेखातल्या जीएंच्या उल्लेखावरून किंवा २००९ सालच्या जीए पुरस्काराच्या या निवडीतून काही सिद्ध होते असं माझं म्हणणं नाही. प्रस्तुत मुद्द्यावरून काहीशा तीव्र प्रतिक्रिया आल्यामुळे, सहज आपली माहितीची देवाणघेवाण करावी म्हणून हाही उल्लेख केला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उपसंहाराच्या सुरात, आणि त्या जागीच उपोद्घात आला हे चर्चेच्या प्रत आणि स्तराविषयीचे एक भाष्य ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपसंहार आणि उपोद्घात या शब्दांची झाली ती सरमिसळ. एकंदर प्रतवारीबद्दल जे भाष्य झालं त्याला काय म्हणावे या विचारात आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भाष्य विशेष काही नाही. हे अशा क्रमाने घडावे - अगदी शब्दांच्या सरमिसळीसकट - हे मला रोचक वाटले. "चर्चा रोचक होते आहे" आणि "चर्चा रोचक आहे" असा फरक करत येतोय, त्या (अ)-क्रमवारीमुळे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान. मला "हंस अकेला" आवडला होता.

"नक्श फरियादी..." शेराचा शाब्दिक अर्थ सुद्धा तसा बरा आहे.
(फिर्यादी कागदी पैरण घालत, गुन्हेगार नव्हत.)
रेखन कोणाच्या बेदरकार चितारण्याची फिर्याद करते?
प्रत्येक तस्विरीच्या अंगची पैरण तर कागदीच असते!

(मग ईश्वर, नियती वगैरे रूपकात्मक अर्थ निवडता येतो. पण "कागदी पैरणी"चा पहिल्या ओळीशी संदर्भ नीट जुळतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतंत्रतेचे इतके अचूक वर्णन मेघना पेठेच करु शकतात. जगण्याचे समग्र आकलन, त्यातील निरर्थकता-अगतिकता ह्या सर्वांसह माणसाचे स्वतंत्र असणे...व हे असे आश्चर्यकारक जगणे त्यांच्या कथांतून यथार्थपणे चित्रित होते.
अशा ह्या लेखिकेचा नातिचरामि हा मात्र फसलेला प्रयोग आहे. मनात आलेला प्रत्येक विचार लिहिलाच पाहिजे अशा अट्टाहासापोटी कादंबरी-लेखन झालेले आहे.
आधीच्या कथासंग्रहांप्रमाणे गाभ्याला भिडणे ह्या कादंबरीत साध्य झालेले नाही. पूर्ण वाचताच आली नाही ही कादंबरी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसा माहीत नाही पण इतका समर्थ परिचय चुकला होता. (अर्थात पुस्तक वाचलेले नाही)
धागा वर काढते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0