आत्मचरित्रांत न सापडणार्‍या रिअल लाईफ-स्टोरीज...सोशल डायरी - सई तांबे

आत्मचरित्रांत न सापडणार्‍या रिअल लाईफ-स्टोरीज....

वाचकघर - १३.८.१५

फेसबुकवरील एका मैत्रीणीने विमान उतरताना मुंबई कशी निळी दिसते असा एक फोटो टाकला होता. ही निळाई होती टर्पोलिनच्या शीट्सने आच्छादलेल्या झोपडपट्टीची!

माझा रोजचा जा-ये करण्याचा नवा बदललेला रस्ता पहिल्या दिवशी कुतूहलाने नीट बघून घेतला. दुसर्‍या दिवसापासून तिकडे नजर वळेनाशी झाली, कारण तिथे इतकी घाण आहे आणि त्या घाणीतच माणसांची घरं आहेत, अशीच आच्छादलेली, तुटक्या दारांची, खिडक्या असलेली- नसलेली. आपल्या एसी गाडीतून फिरताना नजर बंद करता येऊ शकते, पण वासाचं काय? एअर-फ्रेशनर किती मारणार? आणि त्याला मागे सारून नाकात घुसणारी घाण कशी टाळणार?

तर, सरावाने बंद केलेल्या नजरेसमोर जेव्हा सईची "सोशल डायरी" घेतली तेव्हा आश्चर्याने थक्क होण्याची पाळी आली. समाजसेवेचा अभ्यासक्रम स्वखुशीने स्वीकारून, वर वर्णन केल्याप्रमाणे असणार्‍या ‘ह्या वस्त्या माझ्या’ असे म्हणून आनंदाने कामाला लागलेल्या, ‘आपल्या’सारख्या घरातील सई तांबेला एक कडक सलामच ठोकला मी!

चक्र, सलाम बॉम्बे, स्लमडॉग मिलियेनिअर सारख्या सिनेमांतून वस्त्यांचं थेट दर्शन झालेलं असलं तरीही ते पडद्यावरचं, एसी थिएटरमध्ये वा घरी आरामखुर्चीत बसून बघितलेलं व उठल्यावर मनातून सोडून दिलेलं!

अशा ठिकाणी, वस्तीत रोज जायचं, ‘त्यांचं’ जगणं इतकं जवळून बघा-अनुभवायचं ह्यासाठीची ऊर्जा कुठून येत असेल? आपल्यापेक्षा वेगळं, गैरसोयींनी भरलेलं जगणं जाणून घेण्याविषयीचं कुतूहल, तारूण्यसुलभ सळसळता उत्साह, नवीन काही करून बघण्याची ऊर्मी यांबरोबरच इतरांविषयी वाटणारी सहानुभूती-कणव..

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना रात्री साडेनऊ वाजता गच्च गर्दीने भरलेल्या ट्रेनमधे सईला ‘ती’ भेटली. चकमकीत कपडे घातलेली, अंगा-तोंडाला कुबट वास येणारी, भेदरलेली चौदा-पंधरा वर्षांची शन्नो! इतरांच्या तुच्छतापूर्वक नजरांनी भेदरलेल्या तिला सईने सहानुभूतीने विचारपूस केल्यावर तिचा हात गच्च धरून ठेवावासा वाटला व त्या हातांच्या स्पर्शातूनच सईला जाणवलं की तिला मदतीची किती गरज आहे! त्यानंतर आपल्या स्टेशनवर उतरून तिला पोलिसांच्या ताब्यात देईपर्यंतच्या दोनेक तासांत सईला जे ‘विश्व’दर्शन झालं त्याने तिचा भाबडा विश्वास मोडला की, सामाजिक प्रश्नांबद्दल कळकळ व काहीतरी करायची इच्छाशक्ती असेल तर आपण सहज समाजकार्य करू शकतो.
सई लिहिते, ‘शन्नो’च्या ह्या पहिल्या-वहिल्या अनुभवातून गणवेश घातलेल्यांचा खरा चेहरा पाहता आला आणि जिद्दीने सोशल वर्क शिकायची इच्छा झाली.

अशी ही ऊर्जा घेऊन सई वस्त्यांमधून जाऊ लागली. तिथे भेटला शंकरू व त्याची विधवा आई. इंग्रजी शाळेतच शिक्षण देण्याची कल्पना बाळगून जगणार्‍या त्याच्या आईनेच त्याला शिक्षणाच्या आवडीपासून दूर नेलं, शाळेत जाण्यापेक्षा भंगार विकून रोजची कमाई करणारा आणि स्वत: कष्टाने कमावलेल्या त्या पैशांतून स्वत:साठी एक साधासा व्हिडिओ गेम घेतला म्हणून आई-वडिलांकडून मार खालेल्ला फारूख... असे कितीक शंकरू-फारूख नाहक बळी गेले असतील ह्या कल्पनेनेच गलबलायला झालं.

वस्तीतील शाळा-तिथली मुलं-त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यातील दरी ‘घाणेरड्या (!) गोष्टी’ वाचल्याने समजली. पहिली-दुसरीच्या वर्गात पाहुण्यांसमोर सोनाने मातीकाम करताना त्रिकोणी आकाराची, मधे एक छोटीशी भेग असलेली वस्तू बनवली. हे काय आहे असं कौतुकाने विचारल्यावर जेव्हा ‘मुत्ती करने का जगा’ असं उत्तर तिने दिलं तेव्हा शिक्षिकेला तिची किळस वाटली आणि घाईघाईने तिला पाहुण्यांपासून लांब करण्यात आलं.

बालवाडीतल्या ताईंनी ॲक्शन करून शिकवलेलं गाणं म्हणून नाच करताना एक मुलगा, प्रथम, अचानक एका मुलीला घट्ट पकडून जमिनीवर पाडून आपणही तिच्या शेजारी झोपला व नंतर तिच्या अंगावर ओणवा होऊन खालीवर करू लागला. ते बघून संतापलेल्या ताईंनी कारण विचारल्यावर म्हणाला, ‘ताई, मज्जा येते. माझे आई-बाबा पण असंच करतात सकाळी.’ हे ऐकल्यावर ताईंना जबरदस्त धक्का बसला व त्याला त्यांनी तातडीने एका कोपर्‍यात बसवलं आणि नाचात घेतलं नाही. त्याच्या आईकडे तक्रार केली तेव्हा ती म्हणाली, ‘आम्ही काय हौस म्हणून सगळं पोरांच्या पुढं करतो? आमच्यासारख्या लहान घरात संसार चालवून दाखवा आणि मग बोला म्हणावं, तुमच्या ताईंना..’ दुसर्‍या दिवसापासून तो मुलगा शाळेत जायचा बंद झाला.

शाळेची ट्रीप म्हणजे नुस्ती धम्माल-मज्जा. पण, १० ते १४ वर्षांतल्या अकाली वयात ‘बायका’ होण्याच्या टप्प्यावर आलेल्या, घरकाम करताना मळलेल्या, फाटक्या कपड्यांत संध्याकाळच्या शाळेत येणार्‍या मुली. सहलीला जाताना घालण्यासाठी चांगले कपडे नाहीत म्हणून सहल रद्द करायला निघालेल्या व सईच्या आश्वासक, धीर देणार्‍या शब्दांनी आनंदून गेलेल्या! एका दिवसापुरतंही एकटीने घराबाहेर पडण्यासाठी मोठ्या मिनतवारीने वडिलांची परवानगी मिळवून बाहेर पडून हरखून गेलेल्या सकीनासारख्या मुली... आपण कितव्या शतकात जगतो-वावरतो आहोत असं वाटायला लावतात.
शन्नो, शंकरू, सोना, प्रथम, सकीना, फारूख सारख्या मुलांचं नंतर काय झालं असेल? की ती मुलं गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली असतील? किंवा मुली ‘बायका’ म्हणूनच जगत असतील? उत्तर मिळणं अशक्य आहे.
सई म्हणते, ‘वस्तीतल्या मुलांच्या, स्रियांच्या आयुष्यात मी कितपत बदल आणू शकले, याचं निश्चित उत्तर आजही माझ्याकडे नाही. मात्र वस्तीने माझ्यात नक्कीच बदल घडवून आणला. वस्तीतला प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन शिकणं होतं, जे पदव्युत्तर अभ्यासक्रमातल्या कुठल्याच पुस्तकात मला कधी सापडलं नाही.’

वस्तीतील अनुभव तसेच समुपदेशन करताना भेटलेल्या माणसांच्या गोष्टीही लिहिल्या गेल्या आहेत. ‘धीर धरा, परिस्थिती स्वीकारा’ हे समोरच्याला सांगणं आणि त्या परिस्थितीत जणू आपण स्वत: वा आपले जिवलग आहेत असं मानून ते अनुभवणं, ह्यातूनच जाणवलेलं उपदेशातील फोलपण, सल्ला देण्याआधीच समोरच्याच्या भूमिकेत शिरून त्याला समजून घेणं किती आवश्यक असतं हा धडा पक्का करतं!
दुसरा अनुभव सरिताचा. लग्नानंतर येणारे वैवाहिक प्रश्न, एकमेकांशी न जुळणं, कौटुंबिक हिंसाचार, पती-पत्नीतले ताणतणाव यासाठी कोर्टाजवळ समुपदेशन करण्यासाठी केंद्र चालतं. संशयी व त्यामुळे मारहाण नवर्‍यापासून सुटका हवी का असं विचारल्यावर ठामपणे नाही म्हणणारी सरिता. कारण काय तर घटस्फोट घेतला तर लहान दोन मुलांना कसं वाढवणार आणि धाकट्या बहिणीचं लग्न कसं होणार....

समाजसेवा विषयाचा अभ्यास करताना, घरापासून दूर राहताना, डोळसपणे आपल्या मैत्रीणींचं जगणं पाहताना सईला काय काय दिसलं?
घरच्या बंधनांतून सुटून कॉलेजच्या हॉस्टेलवर येऊन प्रेमात पडल्यानंतर तथाकथित प्रियकराच्या पुरूषी बंधनांना प्रेम मानून स्वत:ला अडकवून घेतलेली ‘ती’, लग्न-जोडीदार-सहजीवन अशा कल्पनांना साथ देणारा जोडीदार भेटूनही, लग्नासारखी आयुष्यात एकदाच घडणारी घटना आई-वडिलांच्या मनाप्रमाणे करावी लागलेल्या मैत्रीणीची असहाय्यता (!), मास्टर इन सोशल वर्क करण्यासाठी ‘मुंबई शहरातील लोकल ट्रेनमधून किरकोळ वस्तूविक्री करणार्‍या स्त्रियांचा सामाजिक व आर्थिक अभ्यास’ हा विषय घेऊन ट्रेन्समधून केलेली भटकंती आणि त्या मुली-स्त्रियांचे अनुभव संवेदनशीलतेने ऐकल्या-अभ्यासल्यानंतर ‘समृध्द माणूसपण’ वाट्याला येणं असं बरंच काही, सजगतेने जगता-वावरताना आलेले अनुभवही ह्यात आहेत.

एक आठवण शाळेतील. बाईंनी विचारलं, मोठेपणी कोण होण्याचं ठरवलं आहे. पन्नास मुलांच्या वर्गात जेमतेम दोन हात वर आले. एकीने सांगितले, इंजिनिअर होऊन अमेरिकेला जाणार, त्यावर बाईंनी कौतुकभरल्या नजरेने तिच्याकडे बघितले. आणि सईने ‘शिक्षिका होणार’ यावर सईकडे नाराजीने बघणे हा अनुभवही समाजातील शिक्षणविषय जाणीवांविषयी पुरेसा बोलका आहे.
शिक्षक होण्यासाठी काय लागतं? विषयाचं सखोल ज्ञान, शिकवता येण्याची हातोटी, शाळकरी मुलांच्या वर्गावर पकड आणि ह्याच्याही पलिकडे जाऊन मुलांचं म्हणणं शांत व सहनशील राहून ऐकून समजून घेण्याची जाण! सईने स्वत:ला प्रयोगशील शिक्षिका मानून, वर्गातील ४०-५० मुलांना सांगितलेला एक साधा सोपा प्रयोग. पोस्ट-ऑफिसमध्ये जाऊन, तिथलं निरीक्षण करून एक पोस्टकार्ड विकत आणणे! पहिल्या आठवड्यात फक्त २ आणि वेळ वाढवून दिल्यावर पुढच्या आठवड्यात एकूण ५ मुलं फक्त ते करून येतात. तेव्हा आलेल्या संतापाला आवर घालून जेव्हा मुलांशी संवाद झाला तेव्हा घरच्यांनी एकट्याने जाऊ न देणे, ईमेल्सच्या ह्या युगात पोस्ट कुठे आहे हे माहिती नसणे हे लक्षात घेतल्यानंतर अशा वरवर साध्याशा दिसणार्‍या गोष्टीतला ‘अवघड’पणा आपल्याला प्रश्नांकित करतो आणि शिक्षक म्हणून मुलांना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हेही अधोरेखित होतं

‘सोशल डायरी’सारख्या पुस्तकांच्या वाचनाने नक्की काय घडतं? सईप्रमाणे मनाचा भाबडेपणा बाजूला सारून, प्रत्येक गोष्टीत अपार कुतूहल आणि ते भागवण्यासाठी त्याला सतर्कतेनं, सर्वांगानं, सर्वस्वाने भिडणं घडलं तर वाट्याला आलेलं माणूसपण किती समृध्द होऊ शकतं ही भावना मनाला सुखावते. ज्यांना समाजसेवा ह्या विषयात अभ्यास करायचा आहे, किंवा हाताशी असणारा पुरेसा वेळ-साधनसामुग्री सत्कारणी लावण्यासाठी समाजकार्य करायचे आहे त्यांना गाईडप्रमाणेही हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे. शिवाय, वस्त्यांसारख्या घाणीने भरलेल्या, अपुर्‍या सुविधांसह असणार्‍या परिस्थितीत आपण काम करू शकतो का याचा स्वत:च स्वत:ला अंदाज घेण्यासाठी हा ‘आंखो देखा हाल(!)’ वस्तुनिष्ठपणे विचार करण्यास भाग पाडणारा ठरेल यात शंकाच नाही. परंतु, त्याहीपलिकडे जाऊन काय?
हे वाचून ‘आपली शहरी-सुरक्षित मनं’ हेलावतात. पण म्हणजे काय घडतं? ‘त्या’ माणसांकडे बघण्याच्या नजरा बदलतात? किळस-घाण यांची जागा सहानुभूती घेते? नक्की काय घडतं आपल्या ‘आत’? या अशा परिस्थितीला आपणही जबाबदार आहोत असं आपल्याला वाटतं का? त्यामुळे आपला दृष्टीकोन बदलतो का? ही विषमता नष्ट व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करतो?

खरं तर आपण काहीच करू शकत नाही. आपलं आपल्यापुरतं जगण्यात मग्न असणारे आपण! आपल्या दैनंदिन जगण्यातल्या घर-व्यवसाय-नोकरीच्या व्यापात आपण इतके बुडालेले असतो, की हेलावणं, गलबलणं हे त्या वेळेपुरतं होतं, आपल्या संवेदनशीलतेची ग्वाही देतं. मग ह्या अपराधीपणातून बाहेर पडण्यासाठी, मनाचं समाधान करून घेत जमेल तशी आर्थिक मदत आपण करतो, शक्य असल्यास आपला वेळ देण्याची तयारी दाखवतो.

तरीही, आपण अपुरे आहोत ह्या जाणिवेने हतबलता येतेच येते. त्यापोटी आपण काहीही करत नाही हीच शक्यता जास्त असते. मुकाट्याने पुस्तक बंद करून आपण आपल्या पुढच्या कामाला लागतो. बस्स!

चित्रा --- १२.०८.२०१५

सोशल डायरी - सई तांबे (मैत्रेय प्रकाशन - प्रथमावृत्ती: मे २०१५, पृष्ठे: १२३, मूल्य: रु. १२५/-)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सी तांबे २ वर्षा पूर्वी लोकसत्तेमध्ये ( चतुरंग) नियमित सदर लिहित होत्या. मला त्यांचे अनुभव आणि शैली आवडली होती. पुस्तक रुपात परत वाचण्यास उत्सुक आहे. परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! उत्तम परिचय!

पुन्हा लिहित्या झालेल्या बघुनही बरं वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय छान परिचय करून दिलात. पुस्तकात नक्की काय आहे? हे समजलं, आणि अशी पुस्तके का वाचली पाहिजेत हेही.
आता वाचायलाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक पुरेसं रोचक वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला अशी पुस्तके वाचवत नाहीत. हे फार अभिमानाने सांगत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0