बालभारती : एक नव्वदोत्तरी आकलन

विनोदी

बालभारती : एक नव्वदोत्तरी आकलन

लेखक - राहुल बनसोडे

एकदा मोटारगॅरेजवाल्याला ऑनलाईन दिवाळी अंकवाल्यांनी त्यांच्या डिजिटल दिवाळी अंकासाठी लिहायला लावले. प्रत्येक वेबसाइटचे स्वतःचे अंतर्गत राजकारण असल्याने बांबूच्या लगद्यावर प्रसवलेल्या साहित्यक्षेत्रातील राजकारणाचा आणि ऑनलाईन दिवाळी अंकाचा तसा काहीसा संबध येत नाही. ऑफर चांगली होती. याशिवाय त्याला पैसेही मिळणार होते. हे पैसे नेहमीच्या मानधनापेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त असण्याचीही शक्यता होती. मोटारगॅरेजवाला हजार रुपये मानधनात काही विशेष करीत नाही. एक गॅस सिलेंडर आणि दोन पापलेट, किंवा केबलवाल्याचे बिल आणि बायकोचा फोन रीचार्ज, किंवा हॉर्लिक्सचे दोन मोठे डबे आणि केळकरांचा वऱ्हाडी ठेचा अशी वेगवेगळी कॉंबिनेशन्स त्याच्या डोक्यात होती. पण जेव्हापासून ह्यावरच्या अडीचशे रुपयांचा विचार केला तेव्हापासून मोटारगॅरेजवाल्याची विचार करण्याची पद्धत बरीचशी बदलली होती. ह्यामुळे अर्थातच काय लिहून द्यावे ह्याबद्दलही त्याच्या मनात बऱ्याच शंका होत्या.

मोटारगॅरेजवाला बरेचदा पोस्टमॉडर्निस्ट लिखाण करीत असे. गंभीर पोस्टमॉडर्निस्ट लिखाण करण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नव्हता. ह्याचे मुख्य कारण कथा हाताने न लिहिता व्हॉइस डिक्टेशन करून अगोदर इंग्रजीत टाईप करणे आणि त्यानंतर गुगल ट्रान्सलेटर वापरून त्याचे मराठीत भाषांतर करून नंतर ते लिखाण प्रसिद्ध करणे हेच होते. ह्याशिवाय मोटारगॅरेजवाल्याच्या लिखाणाचा फ्लोदेखील काही वेगळाच होता. त्याची काही वाक्ये पटकन संपत. काही लांबण लावीत. काही वाक्ये इतकी पसरट असत की ती वाचताना वाचक दलाल स्ट्रीटवरून गेटवे ऑफ इंडियात, तिथून लिओपोल्डच्या गल्लीत, तिथून कसाऱ्याला आणि तिथून थेट मॅनहॅटनला कधी पोहोचला हे कळत नसे. त्याला दीर्घ वाक्यांत वेगवेगळ्या ठिकाणी स्वल्पविराम, अर्धविराम, कॉमा वापरायची सवय होती; किंबहुना हे असे नसते तर तो कदाचित काही लिहूच शकला नसता.

काय लिहून द्यावे ह्याचा विचार करता करता दोन चार दिवस गेले आणि मग एक दिवस भल्या दुपारी प्रेरणा होऊन मोटारगॅरेजवाला लिहायला बसला. त्याने जवळ जवळ दोन परिच्छेद लिहून काढले होते. शंभरेक शब्दतरी असावेत. ऑनलाईन माध्यमांना शब्दमर्यादेच्या अलिकडचे लिखाण लागते, पलिकडचे नाही. दुसऱ्या एका 'डिजिटल दिवाळी' अंकाने मोटारगॅरेजवाल्याला कथा लिहिायला सांगितली होती. मोटारगॅरेजवाला कथा लिहायला बसला आणि त्याच्या कथेच्या नायिकेचे साधेपण सांगता सांगता दोनेक हजार शब्द खर्ची झाले होते. त्याने दिवाळी अंकाच्या संपादकबाईंना ह्याबद्दल सांगितले तर त्यांनी कथा स्वीकारता येणार नाही हे स्पष्ट सांगितले. त्याने मग ती कथा अर्धीच ठेवून दुसऱ्या अगोदरच्या दिवाळी अंकाकडे लक्ष देण्याचे ठरविले. शिवाय इथे मानधन मिळणार होते. मानधनाची प्रेरणा अर्थातच मोठी होती. मोटारगॅरेजवाल्याने हे दोन परिच्छेद साइटच्या व्यवस्थापकाला मेसेजमध्ये पाठवून ह्या लाईनमध्ये लिहिले तर चालेल का? असे विचारले. त्यावेळी भाद्रपद महिना चालू होता.

साइटच्या व्यवस्थापकाचे उत्तर आले नाही. भाद्रपद महिना संपून अधिक भाद्रपद महिना लागला तरीही उत्तर आले नाही. मोटारगॅरेजवाल्याने दरम्यान दुसरी एक कथा पूर्ण केली आणि दुसऱ्या एका ऑनलाईन आणि ऑफलाईन दिवाळी अंकाला दिली. ही कथा स्वीकारली गेली, त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुकाही सुधारल्या गेल्या, शुद्धलेखनासंदर्भात केलेले विनोदही दुरुस्त केले गेले. कथा गंभीर कथा म्हणून स्वीकारली गेली, खूप लोकांचे त्यावर अभिप्राय आले. मराठीतल्या इतर श्रेष्ठ लेखकांच्या शैलीशी त्याची तुलना केली गेली. मोटारगॅरेजवाल्याला त्यातली कित्येक नावे नवीन होती. मराठी पुस्तकांचीही टोरंटवरून पायरसी झाली असती तर हे लेखकही त्याच्या ओळखीचे राहिले असते परंतु तशी काही शक्यता नसल्याने मोटारगॅरेजवाला फक्त सुखावून जाण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. मग विजयादशमी आली त्यानंतर कोजागिरी आली. कोजागिरी पौर्णिमेच्या उरलेल्या दुधाचं आईस्क्रीम कसं बनवावं ह्यासंबधी मराठीतून कोणी रेसिपी लिहिली आहे का, ह्याबद्दल मोटारगॅरेजवाला अश्विन कृष्ण द्वितीयेला विचार करीत असतानाच त्याला साइटच्या व्यवस्थापकांचा मेसेज आला "वेळ अजून गेलेली नाही. आमचा दिवाळी अंक डिजिटल असल्यामुळे अगदी पुढच्या दहा दिवसांत दिलात तरी चालेल."

मोटारगॅरेजवाल्याला आपल्या जुन्या दोन परिच्छेदांकडे पाहून काही सुचेल असे वाटत नव्हते. त्याने पुन्हा आपले डोके चालवायला सुरुवात केली. कुठल्याही लिखाणाच्या सुरुवातीला पडणारा प्रश्न तो पुन्हा घेऊन बसला.

'माझ्या लिखाणाची प्रेरणा काय आहे?'

'साडेबाराशे रुपये!'

अंतर्मनातून इतक्या पटकन उत्तर आल्याने त्याचा डिलेमा सॉर्ट आउट झाला. डिलेमा सॉर्ट आउट होणे म्हणजे काय? ह्यावर मराठी प्रतिशब्द शोधणे अवघड होते. त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याच्या मनात लगेचच दुसरा प्रश्न आला.

'मी कुठल्या वाचकवर्गासाठी लिहितो आहे?'

हा प्रश्न मनातल्या मनात विचारून पंधरा मिनिटे झाली होती. मोटारगॅरेजवाला जवळच्या टपरीत जाऊन चहा व सिगरेट पिऊन आला. त्याला त्याच्या प्रश्नांची असंख्य उत्तरे सापडत होती पण प्रत्येक उत्तरानंतर नवा प्रश्नही उभा रहात होता.

'शब्दमर्यादा काय असावी?'

त्यांचा फाँट छोटा आहेय. ड्रुपलमध्ये आहेय. शब्दमर्यादेचा विचार करायची गरज नाही.

'वाचकांची राजकीय भूमिका काय?'

हे लोक अडाणचोट नाहीत. नसावेत. डेमोक्रॅटिक वाटतात. माननीय डोनाल्ड ट्रंप ज्या तर्‍हेने त्यांच्या ह्या तात्पुरत्या मातृभूमीची इभ्रत घालवितात त्यामुळे त्यांना दु:ख होते. ह्या दु:खाविषयी लिहावे काय?

'लेखनाची मूळ प्रेरणा काय?'

हा प्रश्न पुन्हापुन्हा का पडावा? लेखनाची मूळ प्रेरणा मानधनच तर आहे. मानधन आर्थिक स्वरूपातच असायला हवे काय?

ह्या पुन्हा पडलेल्या प्रश्नानंतर मोटारगॅरेजवाला निरनिराळ्या अंगांनी विचार करू लागला. तो ज्या देशात राहत होता तिथले राजकीय वातावरण बदललेले होते. निदान सर्व लिबरल लोक असेच लिहीत होते. गोवंशहत्याबंदी कायदा आणला गेला होता. मोटारगॅरेजवाल्याला बीफ आवडत नसे पण दर सहाएक महिन्यात नाक्यावर जाऊन सल्ली बोटी आणि बिगरबोटी की बिर्याणी खाल्याशिवाय त्याला चैनही पडत नसे. कायदा आला त्याच्या दोन दिवस अगोदरच तो पोटभर सल्लीबोटी आणि खीरी कलेजी खाऊन आला होता. कायदा सहा महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही असा एक अंदाज त्याने बांधला होता पण तसे झाले नाही. कायदा बरेच दिवस चालला. तो रद्द होत नाही हे कळल्यानंतर त्याच्या पटाशीच्या दातांना कसलीशी हलकी हलकी वेदना होऊ लागली. त्याच्या पटाशीच्या दातात होणारी सळसळ मोटरगॅरेजवाल्याची स्थिती दयनीय करून टाकीत असे. तो बिचारा अशावेळी गप्पगप्प बसून राही. ह्या लेखाच्या निमित्ताने मात्र त्याच्यात विचित्र आशावाद जागा होऊ लागला होता. त्याला काही प्रश्न नव्याने पडायला लागले.

'फेडेक्स डीप फ्रीजिंग सोल्युशन' सेवा भारतात उपलब्ध आहे का? असल्यास त्याने बीफ स्टेक मागविता येईल काय? मागविता आल्यास कस्टम्स डिक्लेरेशन फॉर्ममध्ये काय लिहावे लागेल? मुळात कस्टमच्या तोंडावर असले पॅकेज पाहून कुठले भाव उमटतील? ह्या प्रश्नांवरतीच एक लघुकथा लिहिणे शक्य होते. म्हणजे एअरपोर्टवर एक पार्सल येते त्यात बीफ स्टेक असतो. पण ह्या कथेचा अवाका मोठा होईल. ही कथा राजकीय होईल. मॅथ्यू ग्लासच्या लिखाणासारखी. मॅथ्यू ग्लास हा मायकल क्रायटनची शैली चोरतो म्हणजे कथा खरेतर क्रायटन स्टाईलचीच होणार. ह्या कथेचा पट 'स्टेट ऑफ फिअर'सारखाच असणार. स्टेट म्हणजे अवस्था. स्टेट म्हणजे राज्य. स्टेट म्हणजे व्यवस्था. 'स्टेट ऑफ फिअर' ही फक्त महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर ठेवून लिहिली जाऊ शकते? त्या कथेला एक वेग आहेय. महाराष्ट्रात तो वेग द्यायचा झाल्यास रस्त्यात खड्डे असून भागणार नाही. एक प्रसंग राज्य महामंडळाच्या बसमध्ये घडतो असे दाखविता येईल पण अश्या बसेस कधीच वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहचत नाहीत. कथा बनने शक्य नाही, रोख मानधनाऐवजी बीफ स्टेकही भारतात मागवीने शक्य नाही. बनने शब्द कसा लिहितात? बणने की बनणे? एक नळाचा न आणि एक बाणाचा ण घातला की बरेचसे शुद्धलेखनाचे नियम पाळले जात आहेत असे भासवले जाऊ शकते. असे असले तरी स्टेक मिळणार नाही.

मग आणखी थोडा वेळ गेला. मोटारगॅरेजवाल्याच्या समोरून स्टेक काही जात नव्हता. मग अशातच त्याने दुसरा एक विचार करून पाहिला.

'बीफ जर्की' मागविता येऊ शकेल काय? मोटारगॅरेजवाला भावूक झाला. त्याच्या जिव्हेला आता बीफ जर्कीची आठवण येऊ लागली; ती अर्थात 'स्लिम जिम' ह्या ब्रँडच्याच बीफ जर्कीची होती. ह्यात थोडा वेळ गेला आणि मग त्याबरोबर त्याला 'फाईव्ह स्टार ओरिजिनल' जर्कीचीही आठवण झाली. प्रेयसी सोडून गेल्यानंतर खूप वर्षांनी संध्याकाळी कॉफीचा मग घेऊन, दिवाणखाण्यातले दिवे घालवून, डेकवर 'झुकी झुकीसी नजर' ही गजल लावल्यानंतर जसे वाटते तसे त्याला वाटू लागले. विजा सिस्टम आता लॉटरी पद्धतीने आहेत त्यामुळे विजा मिळणे तेवढे सोपे नाही पण इंटरव्ह्यूमध्ये 'मला होमर सिम्पसनला भेटायला जायचे आहे' असे सांगितल्यास कॉन्सुलेट लगेच अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप्रुव करते हे त्याला माहित होते. केवळ स्टेक खाण्यासाठी अमेरिकेला जावे का? मोटारगॅरेजवाला श्रीमंत असतांना कधीकधी दुपारी फ्लाइटने केरळला जाऊन केळीच्या पानावर जेवण करून संध्याकाळी परत मुंबईत येत असे. त्याला न राहवून ते दिवस आठवले. फक्त स्टेक खाण्यासाठी अमेरिकेला जावे का?

ह्या प्रश्नानंतर मग बरेचसे उपप्रश्न उभे राहू लागले. ते उपप्रश्न नव्हते. फक्त कीवर्डस होते.

डंकीन डोनटस, हूटर्स, चिपोटले, व्हाईट कॅसल, रॅमीन बर्गर, टेक्सन चिली, हूटर्स, मीट लोफ, सिनेमन बन, क्रीम चीज, हूटर्स...

हूटर्स शब्द बऱ्याच वेळा आला. हूटर्समध्ये साउथ एशियातल्या जास्त मुली काम करीत नाहीत पण ज्या करतात त्या खूप सुंदर असतात. त्यांना नेहमीचे काम करतांना शूट करून भारतीय हिंदी चित्रपटात दाखविले तरी इथल्या कित्येक तारकांना घरी बसायची वेळ येईल. हूटर्समधल्याच एखाद्या मुलीची कथा लिहिता यायला हवी. पण ह्याला स्त्रीवाद्यांचा प्रचंड आक्षेप राहील. किंबहुना आपण स्त्रियांचे ऑब्जेक्टीफिकेशन करीत आहोत असे आरोप होतील. कदाचित कथा संपादक मंडळातच बाद केली जाईल. हूटर्सवर काही लिहिणे शक्य नाही. त्यापेक्षा 'हॉटडॉग ऑन अ स्टिक' वर लिहिले जाऊ शकते. शिवाय ती कथा समाजवाद्यांना प्रचंड आवडेल. अमेरिकेत भारतीय वंशाचे किती समाजवादी असावेत? जर एकट्या क्षमा सावंतच असतील तर कथा लिहिण्यापेक्षा सरळ त्यांना इमेलच करता येईल. भारतातल्या समाजवाद्यांना ही कथा समजणार नाही, शिवाय ती समाजवाद्यांना उद्देशून लिहिलेली आहे असेही वाटणार नाही. 'हॉटडॉग ऑन अ स्टिक' ऐवजी 'अपना बाजार' घेतले तर? किंवा मग सेव्हन इलेव्हनही चालेल. अपू नहासापिमापीटेलॉन! अप्पू आदर्श नाही, किंचितसा ढेरपोट्या आहेय. वाचकवर्गातले कुणीही ढेरेपोटे नाहीय. ते रोज किती किलोमीटर पळाले ह्यासंबधी पोस्ट फेसबुकवर टाकीत असतात. मंजुला हॉट आहेय किंवा मग होती. आठ मुलांना एकदम जन्म देणारी स्त्री आता कितपत हॉट असू शकते? नाद्या सुलेमान हॉट नाहीये. आपल्याला ती हॉट वाटत नाही. मंजुलावर लिहिणे शक्य नाही.

दोन चांगल्या कथांची बीजे अशी उधळली गेली होती. एकूण पाच कथा विचारात घेऊन त्यातल्या एकीचे एक्स्पांशन करावे असे आता मोटारगॅरेजवाल्याला वाटू लागले, ह्याखेरीज शब्दमर्यादा हा एक परवलीचा शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात घोळावू लागला.

"मी पाच कथा घेऊन त्याचे एक्स्पांशन करण्याचा प्रयत्न करीत आहे" असे त्याने वेबसाइटच्या संपादकांना सांगितले. 'आमच्या अंकाचा मुख्य विषय नव्वदोत्तरी साहित्य आहे' असे संपादक म्हणाला. उरलेल्या तीन कथा नव्वदोत्तरी असाव्यात किंवा मग उरलेल्या लिखाणात काहीतरी नव्वद्दोत्तरी बीजे टाकली जातील असे मोटारगॅरेजवाल्याने वेबसाइटच्या संपादकांना सांगितले. ते काही 'वचन' नव्हते. संपादक परत चॅट विंडोमध्ये आलाच तर त्याच्या संवाद न साधल्यानेच लेखन अर्धे राहिले असा कांगावा मोटारगॅरेजवाल्याला करणे शक्य होते. त्याने सांगूनही मूळ लेखात एकही जास्तीची ओळ लिहिली नाही. संपादकाचाही मेसेज आला नाही. संपादकाला 'गिल्ट' देण्याचे अस्त्र मोटारगॅरेजवाल्याजवळ विनावापाराचे पडून होते. ते अस्त्र मग अचानकच फुटले आणि मोटारगॅरेजवाल्यालाच गिल्ट येऊ लागला. ह्याला मराठीत अपराधीपणाची भावना असे म्हणतात हेही त्याला आठवले. त्याला आता लेख पूर्ण करून द्यावासा वाटला. तो प्रसिद्ध होण्याची सुतराम शक्यता नव्हती पण तरीही त्याला लेखणाच्या कर्जातून मुक्त व्हायचे होते. लेख प्रसिद्ध होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असल्याने मानधन मिळण्याची शक्यताही शून्य होती.

पैसे ही लेखनाची प्रेरणा नव्हती. ह्या एका स्थितीत आल्यानंतर मोटारगॅरेजवाल्याने परत विचार करायला सुरुवात केली. जो ऑनलाईन अंक पहिल्या दिवसापासून विनामोबदला काम करण्याची अट घालतो त्याविषयी किती लोकांचे मत अनुकूल असते? अशा किती अंकाच्या डेडलाइन्स पाळल्या जात असाव्यात? आणि कुणी पहिल्या दिवसापासून यथायोग्य मोबदला दिला जाईल असे सांगूनही किती डेडलाइन्स पाळल्या जात असाव्यात?

'मुद्दा प्रसिद्धीचा आहे की मानधनाचा?'

मुद्दा नव्वदोत्तरी साहित्याचा आहे. मोटारगॅरेजवाल्याच्या अंतर्मनातून आवाज आला.

'नव्वदोत्तरी साहित्य म्हणजे काय?'

शके एकोणसीशे नव्वद नंतर लिहिले गेलेले साहित्य.

'नव्वदनंतर 'छापलेल्या' साहित्याचे काय?'

एखाद्या गरजू लेखकाचे पुस्तक छापण्यासाठी तीन तीन वर्षे वाट पहायला लावणाऱ्या प्रकाशनसंस्थांच्या ह्या कारभाराबद्दल कुणी काहीच बोललेले नाही. अशी किती पुस्तके असतील जी एकोणीसशे सत्याऐंशी साली प्रकाशकांकडे हस्तलिखित स्वरूपात गेली असतील पण ती प्रकाशित होईपर्यंत एक्क्याण्णव साल उजाडावे लागले? शिवाय ब्याण्णव साली एटीएन आणि झी टीव्ही हे चॅनेल आले. नव्वदोत्तरी साहित्यावर टीव्हीने पाडलेला मुख्य प्रभाव म्हणजे पुस्तके वाचणाऱ्यांच्या संख्येची वाढ खुरटायला लागली. हा मुद्दा अर्थात साहित्याच्या दर्जाशी संबंधित नाही. खपाशी संबंधित आहे. 'खप' असे अवतरणचिन्हात लिहिता आले असते. पण आता पुढचे टाइप करण्यात तो मग्न झाला होता. त्याला मुद्धे झरझर सुचायला लागले.

मुद्दे सुचल्यानंतर मध्ये तीन मिनिटे गेली आणि सर्व मुद्दे विसरले गेले. त्याच्या लिखाणाचा वेग मंदावला, जवळजवळ थांबला. 'पुढचे मुद्दे सुचत नसतील तर अगोदरच्या परिच्छेदांचे शुद्धलेखन तपासून पहावे' त्याचे अंतर्मन म्हणाले. शुद्धलेखण तपासल्यास शुद्धलेखणाचा एक मार्क तर मिळतो पण वेळ घालविल्याने निबंधाचे पाच मार्क हातचे जाऊ शकतात. त्याने ते टाळले.

'कुणी लिहिली असावीत पुस्तके?'

साठोत्तरीतली काही नावे इतकी जास्त परिचयाची होती की ह्या लेखकांची पुस्तके वाण्याच्या दुकानात विकायला ठेवली असती तरी खपली असती. कदाचित ती ठेवलीही गेली असतील, विकलीही गेली असतील. शिवाय त्या काळात वाण्याचे दुकाण चालवणारे लोक आणि त्या दुकानांत काम करणाऱ्या लोकांमध्येही साहित्यसाक्षरता असली पाहिजे. इतकेच काय त्यांची मुलेही साहित्यसाक्षर असली पाहिजेत. हेही असेल की २०१० नंतर पुस्तके छापून आलेले लेखक कुठल्यातरी संबंधाने वाण्याच्या दुकानांशी जोडलेली असतील. ह्याबद्दल दिनानाथ बात्रांनीच संशोधन करायला हवे. ह्या सिद्धांतानंतर २०१० नंतर छापून आलेल्या लेखकांवर पु.ल. देशपांडे यांचा प्रभाव जाणवायलाच हवा अश्या ठोकताळ्यापर्यंत तो येऊन पोहचला; पण पु.ल. देशपांडे हे नाव स्ट्राईकथ्रू करायला सांगितले तरी ते केले जाईलच का ह्याबद्दल त्याला शाश्वती नव्हती.

'नव्वदनंतर काहीतरी लिहिले गेलेच असेल!'

ह्यात अनेक अश्लील पाक्षिक आणि मासिकांचा समावेश होतो. ही मासिके सर्वाधिक लोकप्रिय होती, शिवाय आजमितीस जेष्ठ पत्रकार म्हणून मिरविणारे काही लोक ह्या पुस्तकांत टोपणनावाने लिहीत हे गुपित कुणालाच माहीत नाही. पाचशे रुपये त्या काळात फार मोठे होते. म्हणजे ह्या टोपणनावाने लिहिणाऱ्यांना ह्या पाचशे रुपयांचा इतका शौक लागला होता की मासिकाचे पाक्षिक झाल्यावरही त्यांची भूक भागत नव्हती. काही लोकांनी थेट साप्ताहिकच सुरू केले. वाचकांची भूक वाढलेली असल्याने हाही प्रकार चालून गेला. मग कुणीतरी अश्लील दैनिकच का सुरू करू नये असे प्रश्न विचारल्यानंतर मात्र ह्या लोकांची तोंडे कडू झाली. मूळ दैनिकात बातम्या आणि उपअग्रलेख लिहून कंटाळलेल्या लोकांसाठी असे लेखन विरंगुळा होते. त्याचेही दैनिकच बनणार असेल तर मग ते रात्रपाळी दिवसपाळीत काय वेगळे करीत होते? अश्लील दैनिक काढण्याची युक्ती अशा पत्रकार कम लेखक वर्गाने नाकारल्याने अश्लील साहित्य मासिक, पाक्षिक आणि साप्ताहिक ह्या स्वरूपावरच थांबले.

'ह्याने साहित्यविश्वाची हानी झाली का?'

अर्थातच. मराठी साहित्यविश्वाची वाचकसंख्या रोडावल्यानंतर २०१० साली मुख्य प्रवाहातल्या प्रकाशनसंस्थांना अश्लील लेखनाची पुस्तके छापावी लागली. तीही दोनशे ते तीनशे पानांत. एरव्ही फ्लशच्या टाकीत लपविली जाणारी पुस्तके आता हार्डकव्हरमध्ये शेल्फवर अभिमानाने मिरविली जाऊ लागली.

'मागच्या दोन परिच्छेदांचा नव्वदोत्तरी साहित्याशी काय संबंध?'

काहीच नाही. म्हणजे वर आलेले दोन मुद्दे लेखाचा भाग असू शकत नाहीत. हे कुणीही लिहायला नको. शिवाय ह्या वयात जेष्ठ पत्रकाराला का उगीच दुखवायचे?

'ठीक आहे. आता कुठले पुस्तक आठवतेय?'

कुठलेच नाही.

मोटारगॅरेजवाल्याचे वाचन यथातथाच होते. तो साहित्यसाक्षर होता पण मराठीतले त्याचे वाचन जास्त नव्हते. आपण लेख वेळेवर का देऊ शकलो नाही? ह्याचे उत्तर 'आपण नव्वदोत्तरी काही वाचलेलेच नाही' ह्या उत्तरात होते.

'काहीतरी पटकन वाचून उदाहरणार्थ संदर्भ देता येईल?'

मराठी पुस्तके टोरंटवर नसतात. कित्येकदा पुस्तकांच्या दुकानातही नसतात. पटकन काही वाचायला मिळेल अशी शक्यता कमी होती.

मोटारगॅरेजवाला आता शांत बसला. काहीच नव्वदोत्तरी न वाचता नव्वदोत्तरी साहित्यावर काय लिहिता येईल?

मोटारगॅरेजवाल्याला उगीचच मग महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची आठवण झाली. सरकारच्या एकूण एक विभागाची वेबसाइट आहे. ह्या विभागाचीही असेलच अशी आशा त्याला होती. त्याचा आशावाद खरा ठरला. तो बालभारतीच्या वेबसाइटवर गेला. तिथून त्याने अर्काईव्ह मध्ये जाऊन पहिल्या इयत्तेचे बालभारतीचे पुस्तक डाउनलोड केले. त्याने अर्थातच अभ्यासक्रम संशोधन मंडळावर असलेल्या सदस्यांची नावे सर्वात अगोदर वाचली. शाळेत असतांना 'टाले, काटे, बंड, हुजुरबाजार' ही नावे जाऊन आता बरीचशी सुसह्य नावे तिथे दिसत होती.

'ह्या कार्यकारिणीवरच का लिहू नये?'

ह्यातले अर्धे लोक आपले फेसबुक मित्र आहेत. ह्यांच्यावर लिहिणे दीर्घभविष्याच्या हिशेबाने सोयीचे नाही.

मोटारगॅरेजवाला पुढच्या पानावर गेला. तिथे त्याला 'समाजवादी' हा शब्द वाचल्यासारखा वाटला पण त्याने त्याकडे अधिक लक्ष दिले नाही. तो स्क्रॉल करून अजून पुढे गेला. तिथे प्रस्तावना होती. पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना पहिलीतले विद्यार्थी वाचू शकतात? वाचत असतील? की मुख्य पानांवरची अक्षर ओळख करून घेऊन वर्षाच्या शेवटी प्रस्तावना वाचता यायलाच हवी ही पहिली इयत्ता पास होण्याची अट असावी? त्याने प्रस्तावनेनंतरच्या तीनही पानांकडे दुर्लक्ष केले. मग त्याने त्या नव्वदोत्तरी पाठ्यपुस्तकाबद्दल काही टिपणे, निरीक्षणे आणि बरेचसे प्रश्न काढले

निरीक्षणे:

१) मुख्य पानावर पावसाची कविता आहे. पावसाच्या कवितेशिवाय बालभारतीचे पुस्तक सुरू होऊच शकत नाही काय? ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे प्रमाण घटलेय. शाळा जूनमध्ये सुरू होत असली तरी पाऊस ऑक्टोबरमध्ये सुरू होतोय. सुरुवातीलाच पावसाची कविता ही आता तितकीशी समर्पक नाही.

निष्कर्षः नव्वदोत्तरी साहित्यात 'नंदा खरे' हा लेखक सोडल्यास कुणीही ग्लोबल वॉर्मिंगवर विचारच केलेला नाही.

२) दुसरीही कविता पावसाचीच आहे. लोकभाषेत आहे. लोकभाषेत असली तरी ज्या भागात ही भाषा बोलली जाते तिथेही पाऊस वेळेवर पडतच नाही.

निष्कर्ष : मुख्य प्रवाहात जर ग्लोबल वॉर्मिंगवर काही लिहिले जात नसेल तर निदान लोकभाषेत तरी लिहिले जायला हवे. खेड्यांमध्ये दुष्काळ आणि अवकाळीच्या समस्या जास्त आहेत.

३) तिसरा धडा ससा-कासवाच्या शर्यतीसंबधात आहे पण ह्यात कासव जिंकत नाही. ससाही जिंकत नाही. शर्यतीच्या वाटेत नदी येते आणि कासव सशाला आपल्या पाठीवर बसवून पाण्यात पोहून पलिकडे जाते अशी कथा आहे. हा पोस्टमॉडर्निजम नसून वास्तवतावाद आहे. मुळात ससा काही हरणाऱ्यापैकी नव्हताच. ती अगोदरची कथा थोतांड होती. ही कथा खरी आहे. वास्तवतावाद म्हणण्यापेक्षा निदान प्रामाणिकपणे लिहिले गेले आहे असे निश्चितच म्हणता येईल.

निष्कर्षः नव्वदोत्तरी साहित्य प्रामाणिक आहे. तिथे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून दाळे कुणी खात नाहीत. रायगडावर भरून आलेल्या छातीच्या भावना शब्दांत लिहिण्यापेक्षा रायगडावर जाऊन काळा गॉगल घालून फोटो काढता येतो, फेसबुकवर टाकता येतो त्यामुळे आता छाती भरून येत नाही. ग्लोबल वॉर्मिगमुळे मात्र बऱ्याच लोकांना श्वसनाचे रोग झाले आहेत. नव्वदोत्तरी साहित्यात 'फुफ्फुसांची निगा कशी राखावी' असे माहितीपर पुस्तक लिहिले जाऊ शकते पण ते अजून कुणी लिहिलेले नाही/नसावे.

४) चौथ्या धड्यात काय म्हणायचे आहे ते कळले नाही. अ‍ॅब्सर्ड लिखाण अगदी पहिल्या इयत्तेपासून अस्तित्वात येऊ शकते ह्यावर विश्वास बसत नाही. ह्याशिवाय अ‍ॅब्सर्ड असूनही मलादेखील ह्या धड्याचा अर्थ लागत नाही म्हणजे काय? शिवाय ह्या धड्याकडे बघताना डोके दुखते. हो खरेच डोके दुखते.

निष्कर्ष : पहिल्या इयत्तेतल्या मुलाला उत्तरआधुनिक साहित्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. माणसाचे वय वाढत जाते तशी त्याची डोकेदुखी देखील वाढत जाते. लहान मुलांमध्ये ही समस्या कमी प्रमाणात असते त्यामुळे त्यांना ह्या वयातच उत्तरआधुनिक साहित्याशी परिचित केले तर काही पुस्तकांची दुकाने २०३० मध्ये सुद्धा तग धरू शकतील.

५) पाचव्या धड्यातल्या चित्रात वाणसामानाच्या दुकानात सर्व स्त्रिया एका बाजूला आणि पुरुष दुसऱ्या बाजूला आहेत. दुसऱ्या चित्रात बसमध्ये स्त्रिया आणि पुरुष एकत्र बसलेले दिसतात. ह्या चित्रांचे राजकीय अर्थ अतिगहन आहेत. ज्यांना कुणाला अभ्यासक्रमात हे पुस्तक होते त्यांच्याशी पंचवीस वर्षानंतर पुन्हा संवाद साधून ह्या धड्याचा स्त्रीवादी चळवळींवर नेमका काय चांगलावाईट परीणाम झाला हे शोधावे लागेल.

निष्कर्ष : नव्वदोत्तरी साहित्यात स्त्रीवाद्यांचे लेखन बरेच प्रसिद्ध झाले. एका ठराविक काळानंतर फक्त स्त्रीवाद्यांचीच पुस्तके बाजारात येऊ लागली. इतकी की ती वाचल्यानंतर काही पुरुष वाचकांना त्या स्त्रीलेखिकांवर फौजदारी भरण्याची निकड भासू लागली. अमुक एका जातीविषयी लिहिले तर लेखकाला कोर्टात खेचतात तसेच अमुक एका लिंगाविषयी लिहिले तर लेखिकेला कोर्टात खेचता येऊ शकते का? ह्यावर बराच ऊहापोह चाललेला आहे. इथे 'अमुक एका लिंगाविषयी' म्हणजे पुरुषांविषयी हा अर्थ घेतला जायला हवा पण 'अमुक एका लिंगाविषयी' असे म्हटले की प्रत्येक पुरुषाला त्याच्याच लिंगाविषयी कुणी काही लिहिलेय की काय अशी भीती वाटू लागते. असे म्हणतात की 'पुरुषांचे मन जिंकण्याचा मार्ग त्यांच्या पोटामधून जातो' ह्याला पूरक वाक्य 'पुरुषांचा मेंदू जिंकण्याचा मार्ग त्यांच्या लिंगामधून जातो' असे होऊ शकते. मेंदू हा सर्वात मोठा लैंगिक अवयव आहे आणि नव्वदोत्तरी साहित्यात ह्या लैंगिक अवयवाबद्दल बरेच लिखाण झाले आहे.

६) सहावा धडा कुटुंबाबद्दल आहे. त्यात आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू आणि मुलगा-मुलगी इतके सारे लोक आहेत. त्यातले काका-काकू पाहुणे आल्यासारखे वाटतात. म्हणजे आजी-आजोबा त्यांच्याकडे राहत नाही. आपण त्या काका-काकूंची विभक्त कुटुंबातली मुले आहोत की आजी-आजोबांना घरात ठेवणाऱ्या जोडप्याची मुले आहोत हे ज्याचे त्याने तपासावे. हा धडा फारच समर्पक आहे.

निष्कर्ष : नव्वदोत्तरी साहित्यातला उत्तर भाग, म्हणजे २०१० ते २०१५ साली लिहिले गेलेले साहित्य हे शक्यतो दोन ते पाच पात्रांमध्येच फिरते. ह्याला कारण विभक्त कुटुंबपद्धती. पण ह्याचा फायदा असा की कुठल्याही कादंबरीवर नाटक अथवा सिनेमा बनविला जाऊ शकतो. नव्वदोत्तरी साहित्यातली शेवटची पाच वर्षे ही सिनेमाभिमुख आहेत.

७) सातवा धडा हा धडा नसून कविता आहेय. भिंगरीविषयी आहेय. सोपी आहेय.

निष्कर्ष : नव्वदोत्तरी कविता ह्या सर्व वाचण्यास सोप्या आणि कळण्यास अवघड आहेत. इथे पोपटाकडून कार्ड काढून भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी लोकांचे उदाहरण घेता येईल. दोन कुल्फीवाले भेटले म्हणजे एकमेकांच्या कुल्फ्या एकमेकांना देऊन ते स्पर्धेच्या युगात आपल्या डेटाची देवाणघेवाण करीत असतात. हेच एक फुटाणेवाला दुसऱ्या फुटाणेवाल्याला भेटतो तेव्हाही होते. दोन पोपटवाले भविष्यवेत्ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांच्या पोपटाकडून आपले भविष्य पाहून घेतात. मुळात भविष्य खरे की खोटे अशा वादात न पडता ते दोघेही भविष्य पहाण्याची व्यवस्था स्वीकारून मग संवाद साधतात. नव्वदोत्तरी कविता समजून घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः कवी असणे अनिवार्य आहे. नव्वदोत्तरी कविता फक्त इतर कविता करणारेच वाचतात. सामान्य वाचक नाही. त्यामुळे एनर्जी काँन्स्टंटच्या नियमानुसार एकूण कवितेचा जागतिक परिणामही स्थिर आहे. ह्यालाच 'कविता स्थिरांक' असे म्हणता येईल. अर्थात हा शब्द असाच रुळविणे अवघड आहे कारण 'कविता कापरेकर' नावाच्या एक प्रथितयश कवयित्रीशी हा सिद्धांत जोडला जाऊ शकतो आणि मग दत्तात्रय रामचंद्र कापरेकर ह्यांच्या 'कविता कापरेकर' कोण लागतात? असा प्रश्न साहजिक उपस्थित होऊ शकतो. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अर्थातच काशीला जाऊन पंड्यांच्या डेटाबेसमध्ये पहावे लागेल आणि सध्या त्या डेटाबेसचे इंटिग्रेशन आधार कार्डाच्या डेटाबेसशी इंटिग्रेट होत असल्याने संदर्भ मिळणे दुरापास्त आहेय.

८) आठवा धडाही कविताच आहे. ही कविता खेळण्यांविषयी असून त्यात एक मुलगा चेंडू खेळतांना तर दुसरा एक मुलगा गाडी खेळतांना दिसतो. मुलांव्यतिरिक्त त्या चित्रात तीन मुलीही आहेत, ज्यातली एक मुलगी कागदी विमाने उडविताना तर दुसरी एक मुलगी बाहुली खेळतांना दिसते. तिसरी एक मुलगी चक्क भोवरा खेळतानाही दाखविण्यात आली आहे.

निष्कर्षः साठोत्तरी पाठ्यपुस्तकात 'आई मला छोटीशी बंदुक दे ना, आई मला छोटीशी तलवार दे ना' असा हट्ट करणारी सर्व पुरुष मुले दाखविली आहेत आणि फक्त शेवटच्या कडव्यात 'आई मला छोटीशी बाहुली दे ना' असा एक स्त्रीवाचक उल्लेख आहे. हे त्याकाळची लैंगिक विषमता आणि सर्वसाधारीकरणपणा दाखविते. किंबहुना ती कविता ही हिंसेचे समर्थन करणारी, पुरुषप्रधान आणि प्रचंड वर्णद्वेषी होती. हा पायंडा पूर्णतः मोडून काढण्यात नव्वदोत्तरी साहित्य यशस्वी झाले आहे असे म्हणता येईल. शिवाय कवितेत मुलींची संख्या तीन आणि मुलांची संख्या दोन हे गुणोत्तर वर्चस्ववादी आहे. वास्तवातल्या लिंगगुणोत्तराबद्दल इथे विस्तृत लिहिता येणार नाही पण निदान साहित्यांतल्या एकूण पात्रांत स्त्रियांचे प्रमाण ६०% तर पुरुषांचे प्रमाण ४०% झालेले आहे. फिक्शनल साहित्यातल्या ह्या गुणोत्तरात अर्थात पुरुषांचे विवाहबाह्य संबध असल्याने स्त्री पात्रांची संख्या वाढली आहे असे म्हणता येऊ शकते. स्त्रियांनी स्त्रियांसाठी बनविलेल्या मालिकांमध्ये तर ७०% स्त्रिया आणि फक्त २० टक्के पुरुष असतात. उरलेले दहा टक्के हे पुरुषांसारख्या वागणाऱ्या स्त्रिया किंवा स्त्रियांसारखे वागणारे पुरुष असतात. स्त्रीमालिकेतला पुरुष हा स्त्रियांना अपेक्षित असलेल्या पुरुषांची प्रतिमा असतो. ज्याप्रमाणे टायसन आणि स्मिथफिल्डच्या ब्रॉयलर कोंबड्या ह्या जास्त मटन देण्यासाठी खासकरून 'डिजाइन' केलेल्या असतात त्याचप्रमाणे नव्वदोत्तरी साहित्य आणि टीव्ही मालिकांतले पुरुषही डिजाइन केलेले असतात. ह्या पुरुषांना आपण 'ह्यूमन डिल्डो' म्हणू शकतो. डिल्डो ह्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द तयार करता आला नसला तरी हजारो 'ह्यूमन डिल्डो' पात्रे जन्माला घालण्याचे काम नव्वदोत्तरी साहित्याने केले आहे.

मोटारगॅरेजवाल्याने लिखाण मध्येच थांबविले. असेही त्या लेखाचे लिस्टीकल बनत असल्याने ते सरळ लिहून काढणे निरस होते. किंवा मग प्रत्येक धड्याचे निष्कर्ष आणि निरीक्षणे एकामागोमाग येत गेली तर ते कंटाळवाणे होऊ शकत होते. कंटाळवाणे होऊ शकते ही शक्यता आहे आणि ती भविष्यकालीन कृती दर्शविते. कशावरून अगोदर लिहिलेले सर्व रोचकच असेल? कशावरून त्यात लिहिलेले विनोद सगळ्यांना कळले असतील? विनोदाच्या जागा नेमक्या कोणत्या?

धडा नऊ मोजून सहा शब्दांचा आहे. त्यात बाहुली, विमान, भिंगरी, भोवरा, मोटार, फुगा ही चित्रे फक्त दाखविली आहेत. ह्यातले विमान, मोटार हे शोध अलिकडचे. बाहुली ही कालानुरुप बदलत गेलेली. भिंगरी आणि भोवरा अतिप्राचीन काळापासून तसेच आणि फुगा हा रबराच्या शोधानंतरच्या काळातला. ह्या चित्रांमध्ये लाल रंग प्रामुख्याने वापरलेला दिसतो शिवाय ह्या सगळ्या वस्तू आजकाल 'मेड इन चायना' असतात.
निष्कर्ष : नव्वदोत्तरी काळातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे साम्यवादी चीनने जगातल्या बाजारपेठांचा ताबा घेणे. पार पिनपासून पियानोपर्यंतच्या गोष्टी बाजारात विकत मिळणे. वेताचे सूप जाऊन प्लास्टिकचे आल्याने बुरुडांची संस्कृती, कला आणि वारसा नष्ट होणे. प्लास्टिकची केरसुणी, प्लास्टिकची मडकी, प्लास्टिकचे तांबे. आणि ह्या सगळ्या गोष्टी 'मेड इन चायना' असूनही संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल कुणी चकार शब्द न काढणे. ह्यात सीपीआयएमवाल्यांना काहीच वावगे वाटले नसले सीपीआयवाल्यांनी तरी काही बोलायला हवे होते. नव्वदोत्तरी काळात कम्युनिस्टांनी कुठलेही लिखाण केले नाही. कार्ल मार्क्सने धर्मग्रंथ लिहून ठेवल्यानंतर फक्त पोथ्या लिहिल्या जाऊ शकतात आणि आपल्याकडे पोथी किमान ५० वर्षे तरी जुनी असावी अशी अटच आहे. पोथी ज्या कुणाची आहेत तो महापुरुष निदान १२० वा अधिक वर्षे जुना असायला हवा पण २०० वर्षांपेक्षा जास्त जुना चालणार नाही. एकूण नव्वदोत्तरी काळात नवीन मार्क्सवादी लिखाण झाले नसले तरी जुन्या पोथ्या लोणच्याच्या बरणीजवळ अजूनही मुरतच राहिल्या.

ह्यापुढचा धडा १९९० सालच्या चौथीच्या बुद्धिमता चाचणीच्या पुस्तकातून जसाच्यातसा उचलला आहे की काय ह्याची शंका येते. ह्यात सहा बाय चारचे चौकोन करून प्रत्येक रांगेत काही चित्रे आहे आणि त्यातले विसंगत चित्र मुलांना ओळखायचे आहे. पहिल्या रांगेत चिमणी, गिधाड, पोपट, मांजर आणि कबुतर दाखविण्यात आलेले आहे. ह्यातला पाहुणा प्राणी मांजर हे लगेच ओळखू येते. बाकी पहिली चिमणी आणि शेवटचे कबुतर वगळता गिधाड, पोपट आणि कबुतर किती जणांनी पाहिले असावेत? कबुतर कदाचित पाहिलेले असावे पण गिधाड शिल्लकच नाहीत आणि पोपट फक्त भविष्यवाल्याकडेच पहायला मिळतो.

नव्वदोत्तरीत शिक्षणाचे भगवेकरण झाले का? साहित्याचे भगवेकरण झाले का? भगवेकरण म्हणजे काय? भगवेकरण की भगवीकरण?

भगवेकरण हे उपलब्ध वस्तुला भगवा रंग दिल्याने झाले असे होत नाही. मुळात भगवे साहित्य हे नेहमी समांतर अंतरावर वाहात रहाते आणि अधूनमधून मुख्यधारेत येऊन धारेला लाईट भगवे करते. समांतर वाहणारा प्रभाव अतिगडद असला तर मग ज्या ठिकाणी ते मुख्यधारेला येऊन मिळतात तिथे लाईट भगवा उरेलच असे नाही. भगवा रंग येऊन मिळतो तसा पुढे वाहात मोकळाही होतो का? नद्यांमध्ये ट्रिब्यूटरीज आहेत तशा डिस्ट्रीब्यूटरीज पण आहेत. साहित्याच्या भगवेकरणात जास्त उन्हाने नदी आटत जाईल तर मग भगवा रंग अतिगडद होईल का? हे थांबवले जाऊ शकते. म्हणजे भगवेकरण तीव्र झाल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी विपुल पाणचट साहित्य प्रसविले गेले पाहिजे. ते इतके पातळ इतके पातळ असावे की त्यात भगव्या रंगाची मुख्य धारा मिळाल्यानंतर दिसून सुद्धा येऊ नये. नव्वदोत्तरी काळात दर्जाच्या अवास्तव आग्रहामुळे आणि घटत्या वाचकसंख्येमुळे त्याचप्रमाणे टीव्ही आणि मोबाईलच्या आक्रमणामुळे होलसेल साहित्य लिहिणे जवळजवळ बंद झाले. ऐशीच्या दशकांमध्ये जितके लेखक होते त्याच्या दहा टक्केही लेखक वा साहित्य नव्याने तयार होत नाहीत.

आता वेग घेणे आवश्यक होते. पुढचे दोन धडे नुस्तेच चित्र रंगवण्याचे असल्याने मोटारगॅरेजवाला वेगाने पुढे जाऊ शकत होता. किंवा मग उरलेला सगळा लेखच त्या दोन चित्र रंगवण्याच्या धड्यांमध्ये संपवू शकत होता. ह्या दोन्हीमधले काय करावे हे त्याला सुचेना. त्याने पुढे स्क्रोल केले तेव्हा पुढच्या एका धड्यात त्याला मुलांनी प्राण्यांच्या मस्तकांचे मुखवटे लावलेले दिसले. ह्यात माश्याचा मुखवटा मात्र पूर्ण होता. पूर्ण माश्याच्या मुखवट्यावर खूप काही लिहिता येणे शक्य होते पण त्याने ते टाळले. स्क्रोल करून तो आणखी पुढच्या धड्यावर गेला जिथे वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे आणि त्यांची नावे दिली होती. त्यात हत्ती होता, ससा होता, जंगलात शिल्लक न राहिलेला पण व्हॉट्सअ‍ॅपवर रोज दिसणारा वाघ होता आणि गाय होती. गाय पाहिल्यानंतर मोटारगॅरेजवाल्याला आपल्या प्रतिभेची वाफ होऊन उडून जाईल की काय असे वाटले आणि त्याने झटकन स्क्रोल करून पुढचा धडा खोलला. दुसऱ्या धड्यातही गाय शब्द होताच. गाढव शब्दही होता. शहरात आजकाल गाढव लवकर दिसत नाही. गाढव हा खरेतर एक हुशार प्राणी आहे. त्याने पुढचा धडा खोलला. त्यातही गाय हा शब्द होता. गेले तीन धडे त्याच्यावर गाय बिंबवण्यात आली होती. त्याला आता शिक्षणाच्या भगवेकरणाबद्दल संशय यायला लागला. पुढचा धडा जेवणाच्या पदार्थांबद्दल होता ज्यात भाजी भाकरी, कांदा कैरी असे उल्लेख आलेले होते. हे जेवण बरेचसे आर्थिकदृष्ट्या सेक्युलर होते ह्या निष्कर्षाप्रत पोहोचेस्तोवर त्याचे लक्ष 'ताकभात' ह्या शब्दाकडे गेले. ताक? ताक कोण पिते? ताक हा रोजच्या जेवणातला पदार्थ खरेच आहे का?

निष्कर्ष : नव्वदोत्तरी काळात गाईला केंद्रस्थानी ठेऊन फिक्शन लिहिले गेलेले नाही. 'मी कपिला' ह्या नावाने निदान २०० पानी आत्मचरित्र येईल त्यादिवशी बरेचसे साहित्यिक प्रश्न सुटलेले असतील.

पुढचाही धडा त्याच शब्दांचा बनलेला आहे आणि त्यातही ताक आहेच. त्याच्या पुढच्या धड्यात चित्रांची नावे लिहायची असून त्यातही गाय आहेच. त्याने थेट झटपट स्क्रोल करून त्या पुस्तकातल्या सगळ्या गाईच शोधण्याचे ठरविले. वेगाने स्क्रॉल करतांना त्याला सव्विसाव्या धड्यात पुन्हा गाय दिसली. त्याने धडा वाचायला घेतला तेव्हा चित्रातले प्राणी गाय नसून बैल आहेत हे त्याच्या लक्षात आले. सत्ताविसाव्या धड्यातही बैलच असल्याचे लक्षात आले. अठ्ठाविसावा धडा मात्र माणसांचा होता. त्यात निरनिराळ्या मुलांमुलींची नावे होती. एकही नाव ख्रिश्चन नव्हते, एकही नाव मुस्लीम नव्हते. त्याने पुन्हा एकदा संशयाने झटपट स्क्रोल करायला सुरुवात केली. एकदोन गाईबैलांच्या चित्रानंतर थेट ३५ वा धडा सण आणि उत्सवाबद्दल दिसला. हा धडा पूर्णपणे धार्मिक न्याय देऊन एकतेचा संदेश देणारा असा होता. सदतिसावा धडा जंगलाच्या प्राण्यांबद्दल होता आणि त्यातही... गाय होती. त्याच्या पुढच्या धड्यात गांधीजी होते. त्याच्या पुढच्या धड्यात घोडा आणि गाढव. मग शेवटून दुसरा धडा आला ज्यात विद्यार्थ्यांच्या दिनचर्येबद्दल माहिती होती. त्यानंतर ४२ व्या धड्यात माझी ओळख हा गाळलेल्या जागा भरण्याचा स्वाध्याय होता. हा धडा सरकारी फॉर्मसारखाच होता. पुस्तकाच्या शेवटी सरकारी फॉर्मचा स्वाध्याय सांगून शिक्षणाचा उपयोग सरकारी फॉर्म भरण्यासाठी होतो असे तर सरकारला सूचवायचे नसेल?

निष्कर्ष : नव्वदोत्तरी कथात्मसाहित्यात किती नायक नायिकांची नावे ख्रिश्चन वा मुस्लिम वा जैन धर्मियांची होती? किती नायिकांची नावे मुस्लिम असूनही त्या सुखात वा मध्यमवर्गीय आहेत असा कथेचा घाट होता? त्या काळात आलेल्या मराठी मालिका वा सिनेमांमध्ये इतर धर्मियांची नावे कितपत होती? ह्याचे उत्तर बरेचसे निगेटिव्ह येते. आपण वास्तवातले सामाजिक न्याय पाळणे प्रथम सोडले आणि मग फिक्शनमध्ये सुद्धा आपल्याला ह्याकडे लक्ष द्यावे लागले नाही. मराठी म्हणजे हिंदूच का? की इतर धर्मीयही मराठी असू शकतील? भाषा जास्त जुनी आहे की धर्म? भाषा विभिन्न माणसांना एकत्र आणते की धर्म?

मोटारगॅरेजवाल्याचा लेख आता पूर्णत्वाला जाण्यासारखा वाटत होता. त्यात त्याने शेवटी केलेले भाष्य पत्रकारी स्टाईलचे होते पण त्याने पूर्णत्वाचा फील येत होता. सर्वात महत्वाचे ऑनलाईन दिवाळी अंक आणि मोटारगॅरेजवाल्यावर व्यक्तिगत टीका करणाऱ्यांसाठी त्याने उत्तम पडकी मांडणी करून दिली होती. लेख नोटपॅडमध्ये पेस्ट करून तो आता संपादकाला पाठवणार होता. कांगावेबाज टीका करणारे लोक कमेंटीतून काय काय बोलतील याची संभाव्य चाचपणी करण्यात तो मग्न झाला.

'आपण बॉबी जिंदलला पाठिंबा देणाऱ्या भारतीयांबद्दल काहीच का लिहू शकत नाही?'

'आपण चाणक्याचे प्रोफाईल पिक लावून जेपी मॉर्गनच्या ऑफीसमध्ये बसून गोमूत्राच्या औषधी गुणांची भलामण करणाऱ्यांविषयी का लिहू शकत नाही?'

'आपण मंगळसूत्राचा आग्रह धरणाऱ्या शिकागोमधल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यासंबधी का लिहू शकत नाही?'

'आपण सर्व आयडेंटी विसरून अभिमानाने स्वतःला लेस्बियन म्हणवून घेणाऱ्या भारतीय वंशाच्या स्त्रियांसबधी का लिहू शकत नाही?'

डोक्यात हजार प्रश्न घेऊन शब्दमर्यादेच्या चौकटीत मोटारगॅरेजवाला विचार करू लागला. त्याचे हात किबोर्डवर गेले आणि तो झरझर लिहायला लागला.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

Biggrin खासच. आवडला. बालभारतीची अ‍ॅडल्ट चिरफाडही मस्त. या लेखाचा इतका परीणाम झाला आहे की मस्त हा शब्द मस्ट असाही लिहीता येतो मग तो इंग्रजी बनतो. नव्वदोत्तरी किती मुलं मराठे शाळेत... वगैरे काही विचार डोक्यात घोळायला लागले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये बात! मी यांचाही फॅन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वा! झकास!मस्त एकदा कुणीतरी वापरलंय तर झकास बरं.नव्वदोत्तरी चार पाच वेळा घोकलं बालभारतीत सांगितलंय म्हणून पण शेवटी नौदोग्यारह झालं.काल ओथराइझ्ड सर्वीस सेंटरला गाडी आणायला गेलो तर तो म्हणाला व्हिल नटस तुम्ही लावले होते का ?म्हटलं हो.मागच्या महिन्यात कसारा घाटात अगोदर टायरचं काम केलं ते आठवलं.मेकॅनिक लॅपटॅाप ठेऊन आला.स्क्रूड्र्ाइवरने एका बाजूस ठोकून नट काढताना पाहिले होते."साब अपना इदर काम कियेला कस्टमर वापस इधरीच आता है." कटिंग चहाच्या घुटक्याने तोंड भाजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास मोटारगॅरेजवाले शैलीतले बारकावे असलेले तरल जोक आवडले. बनने-बणणे चा उल्लेख करून स्वतःच्या शुद्धलेखनावरही लेखकाने टिंगल केलेली आहे. उत्तरआधुनिकता आणि नव्वदोत्तरीची सांगड बालभारतीशी मस्त घातलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0