विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

पृथ्वीचा जन्म साडेचार अ-ब्ज वर्षांपूर्वी झाला. या नुकत्याच जन्मलेल्या ग्रहाचे रूपडे गोंडस गोजिरवाणे बिलकुल नव्हते. प्रचंड उष्णता, सतत होणारे ज्वालामुखीचे स्फोट, अजूनही जवळपास द्रव असलेल्या 'जमिनी'तून बाहेर पडणारे उष्ण वायू आणि वाफा यामुळे सजीव तग धरू शकतील अशी शक्यताच नव्हती. पहिल्या शंभरेक कोटी वर्षांमध्ये वरचे थर थंड होऊन घट्ट व्हायला लागले. वाफेचे बाष्पीभवन होऊन समुद्र तयार व्हायला लागले. त्याच काळात पृथ्वीचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र तयार झाल्याने वातावरणाचे शक्तीमान सौरवाऱ्यांपासून रक्षण झाले. प्लेट टेक्टॉनिक्समुळे लाव्हावर तरंगणारी जमीन एकत्र गोळा झाली, खंडांमध्ये तुटली, पुन्हा गोळा झाली.

हे चित्र डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला मान्य करावे लागते की सजीव त्यानंतरच उद्भवले असणार. पण कसे? कोणीतरी अचानक नोहाच्या नौकेत प्रत्येक प्राण्याची जोडी भरून पृथ्वीवर आणून सोडली का? तसे झाले असले तरी त्या प्राण्यांचा जन्म कसा झाला हा प्रश्न सुटत नाहीच. पण मुद्दा असा आहे की पृथ्वीवरची जीवसृष्टी काही आयात झालेली नाही. तिची मुळे इथेच आहेत याचे पुरावे भूगर्भशास्त्रज्ञांना आणि जीवशास्त्रज्ञांना मिळालेले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या लाव्हांमध्ये सापडणारे जीवाष्म पाहिले तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे प्राणी राहात होते हे दिसून आलेले आहे. तेव्हा जीवसृष्टी पृथ्वीवरच तयार झाली, परिस्थितीनुसार बदलली, उत्क्रांत झाली हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे. तेव्हा प्रश्न असा येतो की आपल्याला एक काळ निश्चित माहीत आहे, जेव्हा पृथ्वीवर जीव नव्हते. आणि आता तर जागोजागी सजीव सृष्टीच्या खुणा दिसतात. त्यावरून एक उघड आहे की पृथ्वीवरच्या भौतिक पदार्थांतूनच जीवसृष्टी निर्माण झाली. पण कशी?

प्राणी उत्क्रांत होतात, बदलतात, परिस्थितीशी मिळतेजुळते घेणारे टिकून राहातात हे आपल्याला पटते. पण परत प्रश्न येतो 'समजा घटकाभर मान्य केले की अगदी साध्या एकपेशीय जीवांपासून सुधारणा होत, बदल होत आजचे प्राणी आपल्याला दिसतात. पण हा पहिला एकपेशीय प्राणी कसा तयार झाला?'

हे समजून घेण्यासाठी आपल्याला 'पहिला प्राणी' म्हणजे काय हे तपासून पाहावे लागेल. गेल्या लेखात आपण पाहिले की सजीव आणि निर्जीव यांच्यात काळा-पांढरा फरक नाही. किंबहुना सजीवांची व्याख्या करायची झाली तर 'जे पुनरुत्पादन करून आपल्यासारखेच इतर निर्माण करतात ते सजीव' हीच व्याख्या सर्व सजीवांना लागू पडते. त्यामुळे रेणूंपासून सजीव कसे बनले हे पाहाण्यासाठी पुनरुत्पादनाची पद्धत अगदी साध्या रेणूंमध्ये कशी आली आणि त्यातून बदल होत होत त्यांना पेशींचे स्वरूप कसे प्राप्त झाले हे पाहावे लागेल. त्यासाठी 'पहिला सजीव' ही संकल्पना आपल्याला बाजूला ठेवावी लागेल. कारण उत्क्रांती ही क्रांती नाही. एका झटक्यात, एका उडीत कुठच्यातरी रेणूपासून पेशीपर्यंत पोचलो किंवा निर्जीवांपासून सजीवांपर्यंत पोचलो असे होत नाही. हा प्रवास टप्प्याटप्प्यांनी होतो. आणि यातल्याच कुठच्यातरी टप्प्याला म्हणावे लागते की हे, यापुढचे जे आहेत त्यांना आपण सजीव म्हणू, याआधीच्यांना निर्जीव म्हणू. ही रेषा कुठे काढू हे सुनिश्चित नाही, त्यासाठी काही विशिष्ट निकष नाहीत. निव्वळ सोयीसाठी ती कुठेतरी आखावी लागते. उदाहरणार्थ, दारिद्र्यरेषा आखताना असेच काही निकष तयार करून लावावे लागतात. त्या रेषेच्या अलिकडचे गरीब आणि पलिकडचे श्रीमंत नसतात. तसंच काहीसे सजीवतेचे आणि निर्जीवतेचे असते.

जेव्हा या प्रक्रियेला सुरूवात झाली तेव्हा आपल्यापैकी कोणीच तिथे नव्हते. किंबहुना त्याकाळची स्थिती इतकी उत्पाताची होती की तेव्हाचे पुरावेही हाती लागणे मुष्कील ठरते. पण आपल्यासाठी नक्की काय झाले, यापेक्षा कुठच्या मार्गांनी रेणूंपासून पेशींपर्यंतचा प्रवास होऊ शकेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही कथा आहे ती एका संभाव्य प्रवासाची.

त्याकाळचे वातावरण ज्वलंत, अस्थिर होते. ज्वालामुखीचे स्फोट, पृथ्वीचे तापमान, कोसळणाऱ्या विजा यामुळे मुबलक ऊर्जा होती. अनेक रासायनिक अभिक्रिया होत होत्या. अनेक नवीन रेणू बनत होते, तुटत होते. परस्परांशी प्रक्रिया करत होते. आणि उर्जा मुबलक असल्या मुळे नवीन अधिकाधिक क्लिष्ट रेणू आपली हजेरी लावत होते. पण "मी इथे होतो" असे लिहिण्याची कोणताच शक्ती नव्हती. कारण चिरंतन स्थैर्य कोणालाच नव्हते. "अणू असशी अणूंत मिळशी" हा न्याय सर्वच रेणूंना लागू होता.

पण या सर्व कोट्यावधी वर्षे चाललेल्या उलाढालीत एक नवीन प्रकारचा रेणू बनला. तो सर्वात मोठा नव्हता की सर्वात क्लिष्टही नव्हता. पण त्यात एक विशेष गुण होता. तो म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करण्याचा. या गुणामुळे त्याला आपण स्वजनक म्हणू. स्वजननात खरे तर तितके आश्चर्यकारक काही नाही. अगदी साध्या पद्धतीचे स्वजनन आपण मिठासारख्या साध्यासुध्या पदार्थातही पाहातो. संपृक्त द्रावणाला उष्णता दिली की कुठच्यातरी एका कणाभोवती सोडियम आणि क्लोराइडचे आयन गोळा होतात आणि मिठाचा स्फटिक मोठा होतो. त्या एकाच रेणूच्या प्रती असतात. एकत्र चिकटलेल्या असतात इतकंच. आता तुम्ही म्हणाल की असलेलाच मीठ पुन्हा बनते व विरघळत. नवीन मीठ होत नाही. पण सजीव सृष्टीचे एरवी काय होते? असलेलेच जीव पुन्हा मातीत मिळून पुन्हा त्या मातीतून जन्म घेतात. मिठाच्या बाबतीत ही फारच सोपी प्रक्रिया आहे. पण पुनरुत्पादनाची सुरुवात ही अशाच सामान्य पातळीवर झाली.

हा स्वजनक रेणू मात्र मिठापेक्षा थोडा क्लिष्ट होता. त्याचा गुणधर्म असा की स्वतःच्या घटक अणूंसारखे अणू आकर्षित करून स्वतःची दुसरी प्रत बनवली की ती नवीन प्रत वेगळी होत असे. या प्रक्रियेला जरी प्रचंड वेळ लागत असेल तरीही दुप्पट, चौपट करत संपूर्ण मोकळे घटक अणू-रेणू 'खाऊन' टाकून संपून जातील. आता जरी उष्णतेने, रासायनिक प्रक्रियांनी यातले काही मोडले आणि घटक रेणू मोकळे झाले, तरी इतर स्वजनक त्यांना वापरून नवीन स्वजनक तयार करतील. या स्वजननामुळे एक नवीन प्रकारचे स्थैर्य निर्माण झाले. म्हणजे एक विशिष्ट वस्तु केव्हाही निसर्गाच्या माऱ्याने मोडू शकते, पण तिच्या प्रतिकृतींमधून तो गट शिल्लक राहातो. यातच 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'चे - 'सर्वात लायक तग धरतात' या तत्त्वाचे मूळ आहे. एक विशिष्ट प्राणी काही वर्षच जगेल, पण ती प्रजाती टिकून राहाते.

स्वजनक तयार झाला, मान्य. पण त्यापासून पेशी कशी तयार होईल? त्यासाठी पुनरुत्पादनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचा विचार करावा लागतो. ते म्हणजे प्रतिकृती काढताना अनेक वेगवेगळ्या कारणाने काही चुका किंवा बदल घडतात. कुठचीच प्रतिकृती काढण्याची प्रक्रिया १००% अचूक नसते. म्हणजे समजा आपला स्वजनक अ-ब-क अशा तीन प्रकारच्या रेणूसंचांनी बनलेला असेल, तर कधीकधी त्याची प्रतिकृती अ-ब-ड बनू शकेल. (अ, ब, क, ड हे उदाहरणासाठी घेतलेले आहेत. ते कदाचित कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे मुबलक अणूंचे बनलेले वेगवेगळे रेणू असू शकतात) आता नवीन, चुकून झालेला रेणू एकतर स्वजनक असेल किंवा नसेल. तो जर स्वजनक नसला तर प्रश्नच मिटतो. काळाच्या उदरात तो कधीतरी गडप होतो, त्याच्यासारखे इतर तयार होत नाहीत. पण तो जर स्वजनक असेल तर तो आपल्या प्रतिकृती बनवू लागेल. म्हणजे आता अ-ब-क आणि अ-ब-ड तयार होत राहात आहेत. मूलभूत अणूरेणूंसाठी आता त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. जर काही कारणाने अ-ब-ड तयार व्हायला सोपा किंवा अधिक काळ टिकून राहाणारा असेल, तर त्या विश्वात त्या अ-ब-ड ची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि अ-ब-क ची संख्या तुलनेने कमी होत जाईल. एकवेळ अशी येईल की अ-ब-क ची संख्या इतकी कमी होईल, की सगळे अ आणि ब रेणूगट अ-ब-ड मध्येच अडकलेले राहातील. त्यानंतर अ-ब-क नष्ट होऊन जातील, आणि केवळ अ-ब-ड शिल्लक राहातील.

या कडे बघताना आपल्याला अ-ब-क आणि अ-ब-ड मध्ये असलेली स्पर्धा म्हणून पाहाता येते. मात्र या दोन्ही रेणूंना ती 'जाणीव' नाही. ते काही अ रेणूगट आपल्यावर येऊन चिकटावा म्हणून युद्ध करत नाहीत. कारण त्यांना तशी इच्छाच नाही. कदाचित अ-ब-ड रेणूत त्यांना आकर्षित करण्याची शक्ती काही रासायनिक कारणांमुळे जास्त असेल. कशामुळे का होईना, त्या लोकसंख्येकडे आपण काळानुरुप बघत गेलो तर अ-ब-क घटताना आणि अ-ब-ड वाढताना दिसतील. ही स्पर्धा आपोआप घडते, आणि त्यात अ-ब-ड विजयी ठरतो. त्या रेणूत असे काही गुणधर्म आहेत ज्यांमुळे टिकून राहाण्यात, स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करण्यात तो अधिक लायक अधिक सरस आहे. तो टिकतो, आणि हाच 'जिंकण्या'चा निकष आहे.

प्रत्येक रेणूचे काही रासायनिक गुणधर्म असतात. अनेक रेणू असे असतात की ज्यांमुळे आसपासच्या विशिष्ट रसायनांच्या अभिक्रिया वेगाने होऊन त्यांची जोडणी होते. आणि नवीन रसायन तयार होते. आता पुन्हा आपण काल्पनिक अ-ब-ड आणि नवीन अ-ब-ई प्रकारचे रेणू पाहू. समजा अ-ब-ईचा गुणधर्म असा आहे की त्यामुळे एक नवीन रसायन तयार होते. आणि या रसायनामुळे अ-ब आणि ड मधला बंध मोडून पडतो, पण अ-ब आणि ई मधला बंध तुटत नाही (किंवा अगदी कमी प्रमाणात तुटतो). आता अ-ब-ई काही इच्छा करत नाही, की आपण अ-ब-ड ला तोडू आणि त्यातले अ-ब खाऊन टाकू. पण त्याच्या अस्तित्वामुळे, रासायनिक गुणधर्मामुळे हेच घडते. एका अर्थाने हा पहिलावहिला भक्षक रेणू म्हणता येईल. असा रेणू तयार झाला तर लवकरच त्या भागातले अ-ब-ड संपून जातील आणि फक्त अ-ब-ई शिल्लक राहील.

यापुढच्याही पायरीची कल्पना करता येते. म्हणजे अ-ब-फ आणि अ-ब-ग हे एकमेकांना 'खाणारे' रेणू आहेत. मात्र अ-ब-ग मध्ये असे काही रासायनिक गुणधर्म आहेत की त्यामुळे इतर काही प्रतिरोधक रेणू त्याच्या आसपास जमतात. म्हणजे एक प्रकारचे कवच तयार होते. आता अशा कवचामुळे अ-ब-फने टाकलेले 'विष' कमी परिणामकारक होईल. आणि कवच नसलेले रेणू नष्ट होतील. आता जे नवीन तयार होतील ते टिकायचे तर कवच निर्माण करणारे हवे. आणि यापुढे जी स्पर्धा होईल ती कवच 'सुधारण्याची' स्पर्धा होईल. अशा कवचात बंद असलेला स्वजनक म्हणजे पहिल्या पेशी.

आता हे पहिलेवहिले स्वजनक कुठे आहेत? माहीत नाही. या कवचांबरोबरच स्वजनकांतही स्पर्धा चालूच होती. सध्याचे स्वजनक पेशीच्या आत, केंद्रकात राहातात. अजूनही ते आपल्या आसपासच्या पदार्थांच्या रासायनिक अभिक्रिया नियंत्रित करून वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करतात. आता या पेशी म्हणजे विशिष्ट उत्पादने तयार करणाऱ्या फॅक्टरी बनल्या आहेत. इतकंच नाही, तर त्या पेशींचे समूह होऊन अवयव बनतात, अवयवांपासून प्राणी बनतो. आणि तो प्राणी अन्न मिळवतो, आपल्या पेशी जास्तीत जास्त काळ टिकवतो, लैंगिक पुनरोत्पादन करून त्या स्वजनकांची निर्मिती नवीन पेशींच्या गोळ्यात करतो. तो आपला पोटचा गोळा म्हणून वाढवतो, आणि हे चक्र चालू राहाते.

आपल्याही शरीराच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात आजचे स्वजनक लपून आहेत. आपले शरीर आणि काही प्रमाणात आपली प्रवृत्ती काय आहे यावर त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. हे स्वजनक म्हणजे आपले डी. एन. ए.

(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही या वेळेला जो 'स्वजनक' हा शब्द वापरलात आणि अ-ब-फ, अ-ब-ड वगैरे त्याची उदाहरणं दिलीत त्यामुळे स्वजनक आणि मिठातला फरक ओ़़ळखायला मदत झाली!


"मिठाचा स्फटीक वाढू शकतो, त्याचे तुकडे होउन संपृक्त द्रावणात पडले तर अजून स्फटीक तयार होउ शकतात त्यामुळे मीठ आणि डीएनए सारखेच आहेत, दोन्ही सचेतन आहेत" या मागच्या भागातल्या लिखाणावर मी प्रतिवाद केला होता. या वरच्या लिखाणात तुम्ही अ-ब-़क हा रेणू तयार होतो, तो आपल्या प्रतिकृती तयार करू शकतो म्हंटलंय. पण त्यात आणि मीठाचा स्फटीक वाढण्यात मोठ्ठा फरक आहे म्हणजे;
- मीठाचा स्फटीक मीठाचे तयार रेणू एकमेकाना चिकटून तयार होतो. ("सोडीयम आणि क्लोराईडचे आयन एकत्र होउन" नाही. NaCl चे रेणू तयार असतातच संपृक्त द्रावणात.) आणि
- अ-ब-क रेणू अ + ब -> अ-ब आणि नंतर अ-ब + क -> अ-ब-क या रासायनिक प्रक्रियानी तयार होतो. (क्रम ब-़क्+अ असू शकेल पण you get the point)


आता अ-ब-ड, अ-ब-य्य, मीठ, अ-ब-क, ट-ट-ट-ट-ट, ब-ज-क-र-उ वगैरे सतराशे साठ प्रकारचे रेणू तयार होतात पण त्यातले फक्त अ-ब-क आणि अ-ब-ड वगैरेच 'स्वजनक' असतात. हे सगळे रेणू रासायनिक प्रक्रीयानीच तयार होतात. अ-ब-क स्वजनक आहे यात कोणाचीही कर्तबगारी नाही - it was just a probability. त्याने "मी स्वजनक होणारे" असं ठरवलं नव्हतं, तो स्वजनक आहे याचं त्याला भान नव्हतं. पण तो स्वजनक आहे आणि मीठ नाही - तो 'सचेतन' आहे आणि मीठ 'अचेतन' आहे.


ता.क. - एक मुद्दा अद्ध्याऋत धरला होता पण स्पष्ट करतो - माझ्या प्रतिवादाचा हेतू "तुमचं चुकलंय, हे मी सांगतोय ते बरोबर आहे" हे ठसवायचा नाहीये Smile "अचेतन ते सचेतन ही पायरी नाहीये तर चढ आहे" ही तुमची थिअरी चॅलेंज करतोय - just some regular scientific method at work here! (अवांतर - कधीकधी मराठीचा हात सोडलेला बरा असतो. "थिअरी चॅलेंज करतोय" ऐवजी "थिअरीला / थिअरीच्या शक्यतेला आव्हान देतोय" म्हणता आलं असतं. पण मग ते म्हणजे लंगोट कसून प्रतिस्पर्ध्याला रिंगणात खेचल्यासारखं वाटतं; त्यामुळे रांगड्या मराठीपेक्षा सायबाची विंग्रजी बरी म्हनलं Blum 3

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

. "थिअरी चॅलेंज करतोय" ऐवजी "थिअरीला / थिअरीच्या शक्यतेला आव्हान देतोय" म्हणता आलं असतं. पण मग ते म्हणजे लंगोट कसून प्रतिस्पर्ध्याला रिंगणात खेचल्यासारखं वाटतं;

ROFL ROFL

च्यायला आम्ही एव्हढी गहन चर्चा करतोय, या सृष्टीच्या निर्मितीची रहस्यं उलगडायचा प्रयत्न करतोय आणि शुचिमामीने माझ्या अभ्यासू प्रतिसादातलं काय टिपलं बघा....छ्या माझा हिरमोड झाला अगदि....मोड मोड मोडला !!!

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

राजिवड्यावर घट्ट असलेल्या विश्वेश्वराची (रिष्टवॉच फेम) सारी निर्मिती आणि सत्ता आहे हे साधं तत्व विसरुन डार्विन वगैरे परकीयांच्या मुक्ताफळांवर तुम्ही चर्चा करणार, तर मग असलेच भाषेचे मुद्दे पकडणार आम्ही. काय म्हणता शुचिताई..

हाहाहा फक्त या वाक्यावर हसण्याकरता लॉगिन झाले आहे. जाते Wink
परत येणारे ... जाये तो जाये कहां ROFL

रिष्टवॉच फेम हे श्री. विश्वेश्वर नसून श्री. ब्रह्मदेव आहेत अशी किंचित दुरुस्ती सुचवून खाली बसतो.

ओह, विश्वकर्मा म्हणजे कोण मग? (तोच ना तो, सुतारांचा देव?) मला असं अंधुक आठवतं की विश्वकर्मा आणि ब्रह्मदेव एकच. की गंडलं आहे या समजुतीत काही? बाकी प्रत्यय 'श्वर' असला की बहुतकरून देव शंकर निघतो, असे निरीक्षण. तेही चूक आहे का?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता शास्त्रीय संशोधन करणं आलं.

विश्वेश्वर वायला नि विश्मकर्मा वायला! विश्वेश्वर शंकराचे नाव

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"पण काकाजी, आत्मा अमर आहे, - सांगून ठेवतो" च्या चालीवर म्हणायचं तर "पण एकतर विश्वेश्वर असतो कींवा विश्वकर्मा, अधलं-मधलं काही नसतं सांगून ठेवतो" Blum 3

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

विश्वकर्मा = देवांचा वास्तुस्थापज्ञत्यशास्त्रविशारद Smile ... आर्किटेक्ट

या प्रतिसादाकरता पुन्हा लॉगीन झालात का? Blum 3

संदर्भ : http://www.aisiakshare.com/node/4632#comment-117444

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Smile

त्यामुळे मीठ आणि डीएनए सारखेच आहेत, दोन्ही सचेतन आहेत

हे विधान थोडं दुरुस्त करायला हवं. मागच्या लेखातला महत्त्वाचा मुद्दा असा होता की 'सचेतन' असणं नसणं हे काळपांढरं नाही. पायऱ्यापायऱ्यांनी वाढणारा हा गुणधर्म आहे. जे आपल्याला सजीव प्राण्यांत दिसतं त्याला आपण पुनरुत्पादन म्हणतो. पण त्याचीच सोपी, रासायनिक आवृत्ती आपल्या निर्जीव विश्वातही दिसते. त्यातही काही स्वजनक यात अधिक एफिशियंट असतात तर काही कमी. कमी एफिशियंट म्हणून मिठाचं उदाहरण दिलं होतं.

पण तो स्वजनक आहे आणि मीठ नाही - तो 'सचेतन' आहे आणि मीठ 'अचेतन' आहे.

स्वजनक असणं म्हणजे सचेतन असणं नाही. ती खूप वरची पायरी आहे. सचेतन असणं हे आपण माणूस, कुत्रा, मांजर वगैरे नेहमी दिसणाऱ्या प्राण्यांबद्दलच वापरतो खरं तर. सूक्ष्मदर्शकाखालीच दिसणाऱ्या जीवांसाठी तो वापरण्याची वेळच येत नाही. त्यामुळे या मधल्या पायऱ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करता येतं. सर्वसाधारण लोकांच्या मनात असलेले सचेतनपणाचे निकष खालीलप्रमाणे -

१. हालचाल
२. श्वासोच्छ्वास
३. पाणी पिणं, अन्न खाणं
४. पुनरुत्पादन
५. इत्यादी...

यापैकी काहीही करत नाहीत ते अचेतन. पण या शून्यापासून आपल्याला जर टप्प्याटप्प्याने अधिकाधिक गोष्टी करणाऱ्या एंटिटी सापडल्या तर आपल्याला हा चढ दाखवता येतो. म्हणून मी सुरूवात पुनरुत्पादनापासून केली. तेव्हा स्वजनकात 'सर्वसाधारणपणे सचेतन समजल्या जाणाऱ्या एंटिटींचे जे गुणधर्म असतात त्यांपैकी १५ ते २० टक्के गुणधर्म आहेत' इतकंच म्हणता येतं. योग्य पायऱ्यांवरचे 'जीव' घेतले की ही टक्केवारी वाढताना दिसेल.

स्वजनक = सचेतन नाही बरोबर आहे. फारच मोठी उडी झाली ती. पण,

त्यातही काही स्वजनक यात अधिक एफिशियंट असतात तर काही कमी. कमी एफिशियंट म्हणून मिठाचं उदाहरण दिलं होतं.

ह्या दळणावर आपण आलो परत ! एखाद्या रेणूमधे स्वजनक असण्याची कुवत असते कींवा नसते. मीठ हे "कमी एफिशियंट स्वजनक" हे पटत नाही. (का ते वरती लिहिलंय). "अ, ब, क आणि ज हे सगळे घटक द्रावणात असताना तासाभरात अ-ब-क चे १०० रेणू तयार होतात पण अ-ब-ज चे १५च रेणू तयार होतात त्यामुळे अ-ब-क पेक्षा अ-ब-ज कमी एफिशियंट स्वजनक आहे", हे पटतं.

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हा लेखांक फारसा नाही आवडला. काही घाऊक तर काही लूजली लिहिलेली वाक्ये आहेत.

पण मुद्दा असा आहे की पृथ्वीवरची जीवसृष्टी काही आयात झालेली नाही. तिची मुळे इथेच आहेत याचे पुरावे भूगर्भशास्त्रज्ञांना आणि जीवशास्त्रज्ञांना मिळालेले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या लाव्हांमध्ये सापडणारे जीवाष्म पाहिले तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे प्राणी राहात होते हे दिसून आलेले आहे. तेव्हा जीवसृष्टी पृथ्वीवरच तयार झाली, परिस्थितीनुसार बदलली, उत्क्रांत झाली हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे.

अं? एक दोन ओळीत ते सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ कसं झालं? नि त्यावर वाचकाने विश्वास कसा ठेवायचा? एखाद्या अशनीतून पहिला एकपेशीय/बहुपेशीय जीव पृथ्वीवर आला नाही हे नक्की कसे सिद्ध केले? जमिनीत जीवाश्म आढळले म्हणजे त्यांचे पूर्वजही इथेच होते हे कसे सिद्ध केले?

त्यावरून एक उघड आहे की पृथ्वीवरच्या भौतिक पदार्थांतूनच जीवसृष्टी निर्माण झाली.

याला आधार काय? हे उघड का व कसे आहे? हे माझ्या मते गृहितक आहे.

किमान एक लेखांक केवळ वरील विधानांच्या स्पष्टतेवर खर्च करायला हवा इतके ते मोठे व महत्त्वाचे हा विषय हेत. त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण नसल्याने ही वाक्ये हवेतली वाटतात.
===

ते काही अ रेणूगट आपल्यावर येऊन चिकटावा म्हणून युद्ध करत नाहीत. कारण त्यांना तशी इच्छाच नाही.

इच्छा आहे की नाही कसे सांगायचे? इच्छाशक्ती आहे का त्या रेणूगटांना?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिले दोन आक्षेप पटले. त्यावर विधान करण्याऐवजी 'पेशी पृथ्वीवर निर्माण झाली की परग्रहावर हा मुद्दा गौण आहे. कारण कुठेही झालेला असला तरी रेणूंपासून पेशींपर्यंतचा प्रवास कसा झाला हे तपासणं महत्त्वाचं आहे.' असं काहीतरी लिहायला हवं होतं.

इच्छा आहे की नाही कसे सांगायचे? इच्छाशक्ती आहे का त्या रेणूगटांना?

रेणूगटांना इच्छाशक्ती नाही. ज्याला आपण 'विजय मिळवण्याची इच्छा' म्हणतो त्या एका रेणूत नसतात. मेंदूसारख्या कॉंप्लेक्स सिस्टिममधून त्या उद्भवतात. माझा मुद्दा असा होता की कुठचीही प्रेरणा नसताना, रासायनिक अभिक्रियांतून ज्या गोष्टी घडतात त्यातून उत्क्रांती होताना दिसते.

रेणूगटांना इच्छाशक्ती नाही. ज्याला आपण 'विजय मिळवण्याची इच्छा' म्हणतो त्या एका रेणूत नसतात. मेंदूसारख्या कॉंप्लेक्स सिस्टिममधून त्या उद्भवतात.

यात एक गंमत अशी आहे, की मेंदूसारख्या कॉम्प्लेक्स सिस्टीममधेही या, व इतरही 'इच्छा' रेणूंच्या आपापसातील रासायनिक क्रियांतूनच उद्भवतात. केमिकल लोचा, यू नो? Wink

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अं? एक दोन ओळीत ते सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ कसं झालं? नि त्यावर वाचकाने विश्वास कसा ठेवायचा?

अकरावी सायन्सला बायोलॉजीचा पहिला च्याप्टर "ओरिजिन ऑफ लाईफ" असा होता. त्यात या प्रकारावर बरीच चर्चा होती. "प्रायमॉर्डीअल सूप" मधे तयार झालेले रेणू, त्यापैकी स्वजनक रेणू, व तिथून पुढचा प्रवास वर्णन केलेला इ. (अजूनही) आठवतंय. त्याबद्दलची चर्चा फारच क्लिष्ट होईल असे लेखकास वाटलेले असावे..

रेणूंना इच्छाशक्ती असते किंवा नसते, याबद्दल : 'इच्छाशक्ती' ही फक्त 'सचेतन' असल्यास येते हे गृहितक वापरले जाते आहे असे दिसते.
HCl व NaOH च्या द्रावणात, मुक्त फिरणार्‍या H+ Cl-, Na+ व OH- या आयन्सना, NaCl va H2O बनवण्याची जी "इच्छाशक्ती" असते, तीच इथे अभिप्रेत धरता येईल का?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आम्ही व्होकेशनलवाले हो! स्वतंत्र बायोलॉजीचा सम्बन्ध संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात फक्त इयत्ता आठवीत आला (नंतर सायन्स एक व दोन झाले)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखातल्या पहिल्याच परिच्छेदात,

वाफेचे बाष्पीभवन होऊन समुद्र तयार व्हायला लागले.

कन्डेन्सेशन हवंय. मराठी प्रतिशब्द याक्षणी डोक्यात नाही.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

घनीभवन?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सांद्रीभवन?
शाळेतल्या पुस्तकातल्या जलचक्रात हा शब्द कायम असायचा. वाफेचे सांद्रीभवन होऊन ढग निर्माण होतात इ.

तुम्हाला एक चॉकलेट!

हाच तो शब्द. हीच ती (क्लिष्ट व) शुद्ध मराठी!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुमच्या लेखमालेचं टायटल जाम एंटायसिंग आहे. वेळ काढून संपूर्ण वाचायची आहे. सध्या जितका वेळ मिळाला, तसा हा भाग वाचला, अन जमतील तसे प्रतिसाद देतोय.

अवांतर : आर्ति या शब्दाचे अनेक अर्थ आहेत - आर्त चं अनेकवचन दिसतंय.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-