Skip to main content

आणखी एक जागतिक मराठी दिन – आला न गेला

आणखी एक जागतिक मराठी दिन – आला न गेला

जागतिक मराठीदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणजे नक्की काय करायचे हे माहित नसल्यामुळे तसे करत नाही.

मराठीच्या नावाने काही तरी करायचे, म्हणून एक दिवस निवडलेला आहे, एवढेच माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. किंवा खरे म्हणजे महत्त्व नाहीच.

गेल्या दशकापासून इंग्रजी भाषेचे महत्त्व इतके अवास्तवपणे वाढले आहे की मराठी हा केवळ एक जोडविषय राहिलेला आहे हे वास्तव आहे. अगदी ठरवून मुलांना मराठी माध्यमाच्याच शाळेत घालण्याचे प्रमाण अगदी नगण्य राहिलेले आहे. यापुढे ते आणखी कमी होत जाणार आहे. हे वास्तव आहे. तेव्हा मराठीबद्दलची कळकळ व अभिमान हा केवळ ती अजूनही बोलीभाषा आहे एवढ्यापुरता संकुचित असणार असला तर हरकत नाही.

मराठी माध्यमात शिकतानाही इंग्रजीचा भाषा म्हणून अभ्यास करणे, व इच्छा असल्यास अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही त्यात प्राविण्य मिळवणे अगदी शक्य आहे. मागच्या पिढीत हेच स्वेच्छेने होत आलेले आहे. आताच्या जागतिकीकरणामुळे या परिस्थितीत बदल झालेला आहे असा कोणाचा दावा आहे का? दुसरीकडे इंग्रजी माध्यमातून शिकताना भाषा म्हणून मुलांना इंग्रजीवर हवे तेवढे प्रभुत्व मिळालेले दिसते का? एकीकडे तेही होत नाही आणि दुसरीकडे त्यांची मराठी भाषेशी असलेली उरलीसुरली नाळही तुटते. शिवाय बहुतेकांच्या घरात इंग्रजीला पोषक वातावरण नसल्यामुळे या मुलांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होते. ही स्थिती थोड्याफार प्रमाणात शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात सर्वत्र सारखीच आहे.

सध्या मी वर म्हणले तसे, ठरवून आपल्या मुलांना मराठी माध्यमांमधून शिकवणा-यांशिवाय ज्यांचा केवळ नाईलाज आहे म्हणून तेथे शिकणारेच आज उरलेले आहेत व तेच मराठीचा ध्वज उद्या खांद्यावर वाहणार आहेत. व आपल्या व मराठीच्या नशिबात असेल तर तेच मराठी वर्तमानपत्रे, ललित, कादंब-या, पुस्तके वाचणार आहेत. मराठी संस्कृतीची खरी जोपासना तेच करणार आहेत.

मराठीचे भवितव्य हे असे असताना जागतिक दिन असो, साहित्य संमलने असोत, यादृष्टीने काहीही भरीव होताना दिसत नाही. भाषेसाठी हा एवढा मोठा दिवस आहे तर तिच्या संवर्धनासाठी काही शाश्वतपणे प्रभावी राहणारे उपक्रम होताना दिसत नाहीत. केवळ दिखाऊपणाच दिसतो.

समाजशास्त्राचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक मराठीचा भाषा म्हणून विकास पूर्णपणे थांबण्यास किती वर्षे देतात? तो विकास कोणत्या दिशेने होईल असे त्यांना वाटते? आजापसून वीस वर्षांनी जे मराठीतील नवोदित लेखक असतील, ते कोणत्या वर्गासाठी लिहितील असा त्यांचा कयास आह? गद्याची अशी वाईट अवस्था अपेक्षित असेल, तर कवितेचे काय हाल होतील असे वाटते?

नुसत्याच मराठी अमर आहे वगैरे वल्गना नकोत.

गौरी दाभोळकर Sun, 28/02/2016 - 11:42

माझी मुंबईतील मराठी शाळा आणि त्यातील सेमी इंग्लिश विभागसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एके काळी ही एक चांगली शाळा होती.
सध्या असे दिसते की पुस्तके, डाळ-तांदूळ, दप्तर मोफत देऊनसुद्धा गरीब पालक आपली मुले त्या शाळेत पाठवत नाहीत. यासाठी काय करता येईल?

राही Mon, 29/02/2016 - 11:42

In reply to by गौरी दाभोळकर

मला वाटतं की होतंय ते काळानुसार होतंय. ते कृत्रिमपणे थोपवण्याची गरज नाही. एकीकडे सरकारी पातळीवरून घोषणा-योजनांच्या संस्कृतनिष्ठ नामकरणाचा मारा तर दुसरीकडे सामान्य लोकांचा रोजीरोटी देईल अशी आशा दाखवणार्‍या भाषेकडे ओढा. होऊदे की असा संघर्ष. ज्याची गरज आणि उपयुक्तता जास्त, तो टिकेल. तसेही मराठी काही मरत नाही. रोजीरोटी मिळाल्यावर मस्त तंदुरुस्त खुशहाल होऊन लोक पुन्हा वळतातच आपापल्या संस्कृत्यांकडे आणि भाषांकडे. भविष्यात इथले दहा-अकरा कोटी लोक जी भाषा बोलत असतील, ती शुद्ध इंग्लिश तर नसेलच ना. ती मराठीच असेल, बदललेली. समस्त लोकव्यवहारांना सशक्तपणे अभिव्यक्त होऊ देणारी.
आणि बदलू दे भाषेला, संस्कृतीला. तरच कुंठितावस्था जाऊन गतिमानता येते/येईल.
अपने शौच के समापन के लिए शौचालय की उपलब्धि का प्रयोग करें. (किंवा तत्सम)

आदूबाळ Mon, 29/02/2016 - 10:10

भाषेसाठी हा एवढा मोठा दिवस आहे तर तिच्या संवर्धनासाठी काही शाश्वतपणे प्रभावी राहणारे उपक्रम होताना दिसत नाहीत. केवळ दिखाऊपणाच दिसतो.

मिसळपावने मराठी भाषा दिनानिमित्त मराठी बोली भाषांमधले लेख प्रकाशित केले. जवळजवळ दहा तरी बोलीभाषा या निमित्ताने वाचण्यात आल्या.

राकु - तुम्ही काय केलं?

राजेश कुलकर्णी Mon, 29/02/2016 - 10:37

In reply to by आदूबाळ

असे लेख प्रकाशित करण्यामुळे तुमचे समाधान होत असेल तर माझी काय हरकत असणार? खाली गौरी दाभोळकरांनी उल्लेख केलेले वास्तव आहे.
मी स्वत: मराठीतून लिहू,वाचू, बोलू शकतो. तेव्हा प्रश्न तुमचा माझा आहे की येणा-या पिढीचा?
तुमच्या प्रतिक्रियेने खरे तर निराशा झाली.

अनु राव Mon, 29/02/2016 - 10:44

In reply to by राजेश कुलकर्णी

माझ्या मुलीच्या मी कधीपासुन मागे लागलीय की चायनिज भाषा शिक म्हणुन पण ऐकतच नाही.

आदूबाळ Mon, 29/02/2016 - 11:15

In reply to by राजेश कुलकर्णी

हो, पण येणाऱ्या पिढीसाठी "पद्ये" नावाची बोली होती हे कुठेतरी नोंदवलेलं असायला पाहिजे ना? त्या पिढीपैकी ज्याला रस असेल त्याच्यासाठी हे पाऊल उचलणं तरी आपल्या हातात आहे ना?

मराठी भाषेच्या कथित अपमृत्यूच्या उमाळ्याने गदगदून जाऊन लेख लिहिण्यापेक्षा छोटं का होईना बाळपाऊल उचललेलं कधीही जास्त मौल्यवान.