रुकावट के लिये खेद नही है.

कोणे एके काळी, 'माहिती, शिक्षण आणि मनोरंजन' या त्रिसूत्राचा स्वीकार करून भारतात दूरदर्शनच्या एकछत्री साम्राज्याची सुरुवात झाली होती. कृष्ण-धवल पासून रंगीत प्रसारण सुरू होईपर्यंत, टीव्ही सेट असलेले भाग्यवंत आणि त्यांचे फुकटे लाभार्थी शेजारी, दूरदर्शनवर जे दाखवतील ते, टीव्ही ऑन केल्यावर दिसणाऱ्या मुंग्यांपासून सभा समाप्तीनंतरच्या मुंग्यांपर्यंत भान हरपून पाहू लागले. आकाशवाणीच्या बातम्यांपेक्षा टीव्हीवर, घरबसल्या आलिया कव्हरेजशी असावे सादर अशी सोय(!) झाली होती. त्याआधी देशातील घडामोडींचे प्रत्यक्ष चित्रण फक्त फिल्म्स डिव्हिजनच्या न्यूज रीलमध्ये सिनेमा थियेटरात दिसत असे.

आकाशवाणीनंतर बातम्यांना आता टीव्ही न्यूज रीडर्समुळे चेहेरा आणि ग्लॅमर मिळालं. फक्त पंधरा मिनिटांच्या बातम्यात सरकारी कार्यक्रमांशिवाय फारसे व्हिज्युअल्स नसत. बातम्यांच्या सुरुवातीला घड्याळ दाखवून आज बातम्या किती सेकंद उशिरा सुरू होताहेत याची सटल जाणीव करून देण्यात येई. सेकंदाचे आकडे हलताना पाहूनसुद्धा लवकरच काहीतरी बघायला मिळणार आहे या चिवट आशेमुळे प्रेक्षकाना धीर येई. काळा पडदा किती वेळ दिसावा याचे काही संकेत होते. कार्यक्रम बंद पडला आहे की टीव्हीमध्ये प्रॉब्लेम आहे हे तपासायला इतर काही साधन नसल्याने, तेव्हा लोकं थेट दूरदर्शन केंद्रात फोन करून चौकशी करायचे. 'व्यत्यय' आणि 'रुकावट के लिये खेद है' या अद्भुतरम्य पाट्या बघत प्रेक्षक आपोआप स्थितप्रज्ञतेची अंतिम पातळी गाठत असे. सिग्नेचर ट्यून पाठोपाठ न्यूज रीडर अवतीर्ण होत असे. प्रदीप भिडे, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर, स्मिता पाटील अशा मराठी नामवंतांनी तो काळ गाजवला होता. अनंत भावे गांभीर्याने बातम्या देऊन झाल्या की शेवटी 'कसं फसवलं तुम्हाला' असे भाव प्रकट करणारं एक लबाड हास्य करायचे.

नॅशनल टेलिकास्ट मधून हिंदी आणि इंग्लिश न्यूज रीडर्स राष्ट्रीय लोकप्रियता मिळवत होते. संत्र्याच्या फोडीसारखे ओठ असलेली सलमा सुलतान थेट कबरीतून उठून बातम्या द्यायला यायची, त्यामुळे चुकून एखादी सणसणीत बातमी असेल तर ती सुद्धा तिच्या तोंडून मरगळलेली वाटायची. ओठ आणि दात न हलवता तिच्या तोंडातून शब्द निसटून बाहेर येतात कसे याचं नवलच वाटायचं. पंधरा मिनिटे या प्रेताकडे बघून झाल्यावर मला स्मशानवैराग्य उत्पन्न होत असे. न्यूज रीडर्सच्या चेहेऱ्यावर बसणारी माशी हा एक विनोदाचा विषय झाला होता. बिचारी माशी मख्ख चेहेऱ्यावर काही हालचाल व्हावी म्हणून आटोकाट प्रयत्न करून निराश होत असे.

जाहिरात नाही, संगीत (अजूनही) नाही आणि धुमशान चर्चा नाहीत असा सपक, संथ वाहते कृष्णामाई प्रकार, दूरदर्शन बातम्यांवर सुखेनैव सुरू होता. केबल टीव्हीच्या आगमनामुळे वाहिन्यांचं पेव फुटलं. निव्वळ न्युजला २४ तास वाहून घेतलेल्या वाहिन्या आल्या आणि कल्लूळाचं पाणी तू कशाला ढवळीलं... नागोबाच्या पिलाला तू कशाला खवळीलं.... पर्व सुरू झालं.

चोवीस तास काय, कसे आणि किती दाखवायचे याचा कसलाही विवेक नसलेल्या उथळ, भडक लोकांच्या हाती वाहिन्या गेल्याने, कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार अशी परिस्थिती झालेली आहे.

तमाम न्यूज चॅनेल्सवर लाईव्ह, सर्वप्रथम आणि ब्रेकिंग (!!) न्यूजची चढाओढ सुरू झाली. पृथ्वीच्या पाठीवरच्या तमाम पाद्र्या पावट्या विषयांवर चमचमीत बातम्या, तथ्यांची शहानिशा न करता बेधडक देण्यात येऊ लागल्या. दिल्लीच्या नागरिकांना रात्रीच्या वेळी हेल्मेट घालून त्रास देणारं माकड (मंकी मॅन) असो किंवा ड्रायव्हर शिवाय चालणारी गाडी असो किंवा खड्ड्यात पडलेलं एखाद मूल असो प्रेक्षकाच्या मेंदूच्या ठिकऱ्या होईपर्यंत ती बातमी हाणायचा उपक्रम अव्याहत सुरू असतो. सन्नाटे को चिरती सनसनी... रातको चैन से सोना है तो जागो... असले भडक क्राईम रिपोर्टिंग एका वाहिनीवर लोकप्रिय होऊ लागले की त्याचे अंधानुकरण तात्काळ सुरू होते.

निवडणुका, एक्झिट पोल असले की पर्वणीच असते. विडंबनात्मक गाणी, उमेदवारांचे वाभाडे काढणे आणि डझनभर तथाकथित चर्चिल तज्ञ एकमेकांच्या झिंज्या उपटून काढेस्तोवर चर्चा रेटणे सुरू असतं.

स्टिंग ऑपरेशनची फॅशन आली आणि भंडाफोड प्रकरणांची रेलचेल झाली. त्यात येनकेन प्रकारेणवाले लोकं प्रसिद्धीच्या तात्कालीन शिखरावर जाऊन आले. काही पत्रकारांचं उखळ पांढरं झालं. नेत्यांचे पैसे खाणे, रंगेल साधूमहात्मे(!) आणि म्हाताऱ्या नेत्यांच्या अनैतिक जीवनाचे फोटो/ व्हिडीओ लिक होणे आणि फिल्म स्टार्स शाहीद कपूर-करीनाचे चुंबन दृष्य चघळणे या पातळीला ही पत्रकारिता पोचली.

एका प्रसिद्ध माणसाच्या निधनाची बातमी सांगताना न्यूज रीडर म्हणे आत्ता त्यांच्यावर अंतिम संस्कार होतो आहे. पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणून "आत्ताच त्यांची कवटी फुटली आहे आणि आमचा करस्पॉन्डंट तिथे आहे; राजदीप कवटी फुटली तेंव्हा एक्झॅक्टली किती डेसिबल आवाज आला? आणि त्याबाबत स्मशानघाटतज्ञांची मते काय आहेत?" असली २४/७ बाष्कळ चर्चा सुरू होण्याच्या आत मी शिताफीने चॅनल बदलला. मागे एका नराधम खुन्याच्या फाशीचे लाईव्ह चित्रीकरण करण्यासाठी, एका चॅनलनी, जल्लादाला लाच देऊ केली होती. त्याची सदसद्‌विवेकबुद्धी शाबूत असल्याने विकृत न्यूजमधून आपण बचावलो होतो. ब्रेकिंग न्यूज मधे आपल्याला थोडे बहुत कळते हा समज प्रथम ब्रेक होतो. लाईव काय अन किती दाखवायचे याचा अन विवेकबुद्धीचा काय संबंध ?

सायरस ब्रोचा आणि कुणाल विजयकर यांच्या "द वीक दॅट वॉजंट" या न्यूज स्पूफमधून देशातल्या घडामोडींबद्दल खुसखुशीत आणि अफाट खिल्ली उडवली असते. असा कार्यक्रम वाऱ्याच्या प्रसन्न झुळुकीसारखा अपवादात्मक आहे. बहुतेक सगळ्या वाहिन्यांचे स्क्रीन चारी बाजूने माहिती, जाहिराती, आकडेवारीने ओसंडून वाहात असतात. टीव्हीस्क्रीनवर मध्यभागी प्रमुख कार्यक्रमासाठी नाईलाजाने जागा मोकळी सोडलेली असते. त्यातही अर्नब गोस्वामी सारखे उर्मट अँकर आगीच्या ज्वालांचे ग्राफिक ओढून थैमान घालत असतात. आता अर्नबला बघितलं की यापेक्षा सलमा सुलतान परवडली असती की काय असे वाटते. स्क्रीनभर अनेक खिडक्यात तज्ञ, प्रवक्ते वगैरे मंडळी बोलण्याचा क्षीण प्रयत्न करताना आढळतात. मराठीत कल्लोळाचा वारसा, बाणेदार 'निखिल वागळे' हातवारे करून ओरडून बोलण्याची हौस पुरवून चालवत होते. करण थापर सारख्या कुजकट, उर्मटपणाने ओतप्रोत मुलाखतकर्त्याच्या कार्यक्रमात लोकं स्वतःचा अपमान करून घ्यायला का येतात याचं नवल वाटतं.

कोलाहल नसलेलं न्यूज चॅनल आज शोधूनही सापडणार नाही. मृदुभाषी, अभ्यासू, न्युट्रल आणि सक्षम अँकर ही दुर्मिळ प्रजाती आहे. पढतमुर्ख पांडित्यामुळे कर्कश, द्वेषपूर्ण, स्वतःची पोळी भाजणारी आणि विकाऊ पत्रकारिता करून समाज विस्कळीत करण्याचे समीकरण सुरू आहे. चोवीस तास तुम्ही दिलेली माहिती कोणाला हवी आहे? स्थिर बुद्धी ठेवून साकल्याने विचार मांडत, दुसऱ्याचे विचार शांतपणे ऐकून घेणे आणि घेतलेल्या विषयावर कळकळीने चर्चा घडवून आणणे जमत नसेल तर हा तमाशा बंद केलेला बरा या हताश विचारामुळे मी चर्चा पाहणे बंद केले. प्रसारणात रुकावट नसल्याने खेद व्यक्त करायची आवश्यकता पडत नाही हीच खरी दुःखाची गोष्ट आहे.

नुकतेच रविशकुमार या अँकरने टीव्हीचा पडदा काळा ठेवून या अँकर्सच्या कोलाहलाला श्रद्धांजली वाहिली असे कळले म्हणून तो कार्यक्रम पाहिला. असे संयुक्तिक, स्तिमित करणारे उदाहरण घातल्यामुळे लगेच मला गहिवरून वगैरे येऊ लागले होते. रविशकुमार मृदुभाषी आणि चांगला पत्रकार असावा असे वाटले. हा तब्बल एक्केचाळीस मिनिटांचा प्रयोग थोड्याच वेळात रिपिटेशन मुळे कंटाळवाणा झाला आणि त्यातही काहीतरी गोम असेल असा संशय आला. "क्या आप घर मे अपने पत्नीसे/पितासे ऐसेही बात करते है?" हा प्रश्न ऐकून हसू अनावर झाले. भारतात टीव्ही संच असलेल्या घरोघरी, पत्नी आणि पित्याला सन्मानाने वागवले जाते या जाणीवेने मला गदगदून आलं आणि मी नंदनवनात राहतेय याची मलाच कल्पना नसल्याबद्दल अपार खिन्नता वाटली. काळा स्क्रीन किती वेळ दाखवायचा याचे काही संकेत आहेत, इथे वेगळा प्रयोग करण्याच्या मोहात समंजस अँकरने प्रेक्षकांवर अन्याय केला. बधीर समाजाला काळ्या स्क्रीनचे औषध देण्याची आवश्यकता आहेच पण हे औषध जेवणासारखे वाढल्याने पहिल्याच डोसला अजीर्ण झाले.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख मजेशीरच आहे. विशेषतः ती कावळ्याची म्हण हहपुवा.

एकंदर काय तर एकेकाळचं सरकारी आणि म्हणून अत्यंत बेचव असं प्रक्षेपण आणि आताचं बातम्यांचं सनसनाटीकरण (ज्याला मी न्यूजमिडियाचं "अर्नबायजेशन" असं म्हणतो) त्याच्या अधेमधे रवीशकुमारसारखे लोक येतात; परंतु त्यांचेही काहीकाही प्रयोग हुकतात. चालायचंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अर्नबाय्ज़ेशन आवडलं.
(यावरून 'नबा' हे ऐसीवरचे ज्येष्ठ नाव आठवले.)
लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्नबायजेशन शब्द खास आहे ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चान्गला लेख

धन्यवाद कल्पना जी आपण ८०-९० च्या दूरदर्शन च्या सुवर्णकाळाच्या स्मॄती जाग्या केल्यात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Mandar Katre

पडद्यापुढे जे दाखवले जाते ते हिमनगाचा १ टक्का आहे. मागे जे घडते ते ९९ टक्के आहे. ऐ़कर हे फक्त प्यादी आहेत मोठ्या खेळातली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्कीच असणार पण जो दृष्य खेळ सुरु आहे तो भयावह आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रनॉय रॉय यांच्या 'द वर्ल्ड धिस वीक'चा उल्लेख राहून गेला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख लिहीत असताना डोक्यात प्रनॉय रॉय होता ,पण त्याच्या कार्यक्रमाचे शीर्षक विस्मरणात गेले होते आणि मी शोधण्याचे कष्ट घेतले नाही हा माझा दोष !
Sad तुम्हीच थोडेसे लिहावे प्रनॉय रॉय या मृदुभाषी , सुसंस्कृत निवेदकाबद्दल. Smile आणखी काही त्रुटी राहून गेल्या असतील त्या नजरेस आणून द्याव्यात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली म्हायत्ये का? दूरदर्शन एकदम संतुलित बातम्या देतो असा साक्षात्कार काही जणांना झालाय म्हणे !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खवचट ही श्रेणी देण्यात आली आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळं, सोपं होईल. संतुलित काय, संयमित काय, सौम्य काय, मृदू काय याच्या व्याख्या मुळातूनच बदलून घ्याव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन आवडलं. बऱ्याच वर्षांचा त्रागा अतिशय संयमितपणे व्यक्त केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा लेख वाचायचाच राहून गेला होता. एरवी विनोदाला दुःखाची झालर वगैरे असते. इथे ती तळतळाटाची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ कसा राहून गेला माहित नाही.
खरं तर कल्पनाने फेबुवर शेअर केलेलाही मला लख्ख आठवतोय! येकदम झकास लेख ए!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!