अनुवाद करताना

मूळ पुस्तक- द लॉर्ड ऑफ द रिंग्ज
लेखक- जे.आर, आर. टॉल्कीन
अनुवाद ‘स्वामी मुद्रिकांचा’
अनुवादक- मुग्धा कर्णिक

जागतिक कीर्तीच्या भव्य अदुभुतरम्य कांदबरीचा मराठी अनुवाद
लॉर्ड ऑफ द रिंग्ज- स्वामी मुद्रिकांचा...
कशाबद्दल आहे ही पंधराशे पानांची कादंबरी?
यातील कथानकाचा सारांश शेवट न सांगता पुढीलप्रमाणे सांगता येईल. हा ब्लर्ब कादंबरीसाठी मीच लिहिलेला आहे, त्यामुळे तोच इथे देत आहे.

जे आर आर टॉल्कीन्सच्या दंतकथा साम्राज्यातील हा सर्वात गाजलेला भाग...
मध्य वसुंधरेतील अनेकविध वंशांच्या सुखासमाधानाने चाललेल्या जीवनांत दुरात्मा, सर्वसत्ताकांक्षी सॉरॉन याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे दुःखाची काळी सावली येत चालली आहे.
फार प्रदीर्घकाळापासून त्याच्याशी सर्व सुजन संघर्ष करीत आले आहेत. तो कधी जिंकला, कधी हरला. पण तो नष्ट मात्र झालेला नाही. त्याने सत्तेसाठी स्वतःचे बळ वाढवायला शक्तीमान अशा मुद्रिकांची निर्मिती करवून घेतली. या मुद्रिकांच्या शक्तीच्या प्रभावाने तो साऱ्या जगावर आपले अधिराज्य गाजवू शकतो. त्यातील एक मुद्रिका त्याच्या ताकदीचा जणू कणा आहे. पण तीच मुद्रिका त्याच्याकडून एका प्राचीन युध्दात त्याचे बोट कापून काढून घेण्यात आली होती. त्याचे वर्चस्व पुन्हा वाढत जात असताना केवळ त्याच एका शक्तीमान मुद्रिकेची कमतरता आहे...
ही मुद्रिका जी बिल्बो बॅगिन्स या धाडसी हॉबिटच्या हाती योगायोगाने पडली होती. आणि आता बिल्बो निवृत्त होत असताना ही कथा घडू लागते.
शायर नावाच्या सुस्त गावात बिल्बो बॅगिन्सचा पुतण्या- तरुण हॉबिट, फ्रोडो बॅगिन्स अचानक या साऱ्या नाट्यात ओढला जातो. ती शक्तीमान मुद्रिका त्याच्या हाती आली आहे. सॉरॉनला कायमचे नष्ट करण्यासाठी या मुद्रिकेचा तो वापर करणार की दुसरे काही?
एक लहानसा जीव सुजनत्वावरील निष्ठेपोटी आपलं घर, आपलं गाव सोडून त्याला मध्य वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून, विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत, अंतपर्वताच्या टोकावरल्या अग्निरसाच्या खाईपर्यंत जायला निघाला आहे... जगाच्या दुःखांवर मात करण्यासाठी स्वतःच्या गळ्यात दुःखाचे ओझे घेऊन तो चालणार आहे...
त्याच्यासोबत आहेत त्याचे जिवाला जीव देणारे साथीदार... आणि विविध वंशांचे, विविध क्षमतांचे सुजन...
त्याच्या विरुध्द आहेत विविध वंशांचे दुर्जन...
या लहानशा हॉबिटला हे आव्हान झेपेल का... त्या संघर्षाची ही कहाणी... स्वामी मुद्रिकांचा...

आय़न रँडच्या अॅटलस श्रग्ड या कादंबरीचा अनुवाद करून झाला तेव्हा त्या कादंबरीवरच्या टिप्पण्या वाचत असताना जॉन रॉजर्स नावाच्या एका हॉलिवुडच्या विनोदी फिल्मनिर्मात्या, आणि कुंग फू मंकी हा ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकाचे एक उद्धृत वाचनात आले.
“There are two novels that can change a bookish fourteen-year-old’s life: The Lord of the Rings and Atlas Shrugged. One is a childish fantasy that often engenders a lifelong obsession with its unbelievable heroes, leading to an emotionally stunted, socially crippled adulthood, unable to deal with the real world. The other, of course, involves orcs.”
“पुस्तकांत रमणाऱ्या एखाद्या चौदा वर्षांच्या पोराचे आयुष्य बदलून टाकू शकतील अशा दोन कादंबऱ्या आहेत: द लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि अॅटलस श्रग्ड. यातली एक आहे अगदी बालिश अशी कल्पनारम्य कथा, जिच्यामुळे अगदी अविश्वसनीय अशा नायकांचे आय़ुष्यभराचे वेड लागू शकते, ज्यामुळे भावविश्व खुरटलेले, सामाजिकदृष्ट्या पांगळे झालेले, वास्तवाशी फारकत असलेले प्रौढ तयार होतात. आणि दुसरीत तर काय- ऑर्क्स आहेत.”
हे वाक्य रॉजरबाबाने अर्थातच मुख्यत्वे अॅटलस श्रग्डवर वार करण्यासाठीच लिहिले होते. द लॉर्ड ऑफ द रिंग्जला त्याने तसे कमीच फटकारले. या अतिशय खुज्या आणि कळकट वृत्तीने लिहिलेल्या वाक्याचा आधार बरेच आयन रॅन्डच्या लिखाणाचे द्वेष्टे घेतात. पण तरीही त्यातील पहिले वाक्य खरेच आहे. चौदाव्या वर्षीच काय कुठल्याही वयात वाचल्या तरीही या दोन्ही कादंबऱ्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतात. या वाक्याचा मला फायदा झाला तो असा, की त्यामुळे माझ्या मनात अॅटलस श्रग्डच्या जोडीला ही दुसरीही कादंबरी अनुवादित करायच्या कल्पनेचं बीज रुजलं. पण त्या वेळी मी द फाउंटनहेड या आय़न रॅन्डच्या दुसऱ्या कादंबरीचा अनुवाद करण्यात गुंतले होते. २०१२मध्ये फाउंटनहेडचा अनुवाद प्रकाशित झाला आणि त्याच सुमारास माझ्या टॉल्कीन्सच्या लेखनाची अत्यंत चाहतीपंखा असलेल्या कन्येने माझा या अनुवादासाठी पिच्छाच पुरवला. अनुवाद करायला सुरुवात केली की स्वतःचं वाचन बरंच मागे पडतं, त्यामुळे मी काही काळ त्या आग्रहाला दाद दिली नाही. अखेर स्वतःचाच मोह आणि तिचा आग्रह यापुढे शरणागती पत्करून २०१३च्या एप्रिलमध्ये मी लॉर्ड ऑफ द रिंग्जचे दुसरे वाचन पूर्ण करून अनुवाद करायला घेतला. अॅटलस श्रग्डचे वाचन मी अनुवादाला हात लावण्यापूर्वी सुमारे सोळावेळा केले होते. द फाउंटनहेडचेही वाचन दहापेक्षा अधिक वेळा केले होते. पण लॉर्ड ऑफ द रिंग्जचा अनुवाद करण्यासाठी दोन वाचने पुरेशी वाटली. भाषेच्या गंमतीजमतीशिवाय त्यात फार गांभीर्याने विचार करण्यासारखे काहीच नव्हते. टॉल्कीन्स हा एक ख्यातकीर्त भाषाशास्त्री होता आणि त्याचे भाषेचे खेळ, प्रयोग हे एक आव्हान होते. त्याने त्याच्या या विस्तीर्णशा दंतकथासाम्राज्यासाठी एल्वन भाषा जन्माला घातली होती. त्या भाषेच्या व्याकरणासकट त्याने सारे नवे शब्द निर्माण केले होते. अनुवादकाला हे सारे करण्याची गरज नव्हती. कारण त्या नव्या वेगळ्या भाषेचा इंग्रजी अनुवादही टॉल्कीन्सनेही कादंबरीतच देऊन ठेवला आहे. त्यामुळे ती भाषा जशी आहे तशीच ठेवूनही चालण्यासारखे होते. खरे आव्हान होते ते त्या आनंदमय, रहस्यमय कथनातील गंमत कायम ठेवण्याचे. मराठी भाषा आणि शिवाय माझी भाषेवरील पकड त्यात कुठे अपुरी पडेल की काय एवढाच प्रश्न होता. आकारामुळे घाबरून हात न घालण्याचा प्रश्न अॅटलस श्रग्ड आणि फाउंटनहेड या दोन अवजड ठोकळ्याच्या अनुवादानंतर निकाली निघालेला. आता प्रश्न फक्त सौंदर्यवाही भाषेचाच होता. तीन खंडांतील लॉर्ड ऑफ द रिंग्जचा अनुवाद ‘स्वामी मुद्रिकांचा’ एका खळाळत्या आनंदानुभवासारखा केवळ दीड वर्षात पूर्ण झाला.
टॉल्कीन्सची वर्णनशैली वैशिष्ट्यपूर्ण आहेच. पण त्यात कुठे अडायला झाले नाही. सुष्टदुष्ट व्यक्तिरेखा, पराक्रमाचे प्रसंग, चमत्कृतीपूर्ण घटना असे सारे मराठीसारख्या जुनावलेल्या भाषेत चांगल्या प्रकारे सांगता येते यात नवल नाही. पण त्याच्या कवितांनी, बडबडगीतांच्या जवळच्या लिमेरिक्स या काव्यप्रकाराने मात्र थोडे कष्ट पडले. त्यातल्या काही कवितांत मी कमी पडले आहे. शिवाय मुद्रितशोधकांना चारचारवेळा सूचना लिहून देऊनही कविता डावीकडल्या बाजूला सरळ मार्जिन ठेवून न छापता सेंटरिंग करून छापल्यानेही रसभंगही होतो आहे. आनंदी, खट्याळ भावनेतील कविता चांगल्या प्रकारे अनुवादित झाल्या आहेत, पण कादंबरीच्या संदर्भातल्या प्राचीन गोष्टी सांगणाऱ्या कविता करताना मला थोडा कंटाळाही आला आणि कष्टही पडले. अर्थात लेखकानेच कथेच्या ओघात लिहून ठेवल्याप्रमाणे त्यातल्या बहुतेक कविता एल्वन भाषेतून सामान्य(म्हणजे इंग्रजी) भाषेत बिल्बो किंवा अॅरगॉर्न या पात्रांनी करून घेतल्या आहेत- आणि त्या थोड्या ओबडधोबड झाल्याची कबुली ती पात्रेच देतात. त्यामुळे वापरायचा ठरवलाच तर तोच बहाणा मलाही वापरता येऊ शकतो. पण त्यातल्या काही कवितांच्या अनुवादांनी मला समाधान दिले नाही हे खरे.
टॉल्कीनने सामान्य भाषेच्या काही वेगवेगळ्या छटा पात्रांनुरूप वापरल्या आहेत. बोली भाषांत असावा तसा फरक ऑर्क्स बोलताना दाखवला आहे. गॉल्लम या त्यातील सर्वात महत्त्वाच्या खलनायक. त्याचं बोलणं अनुवादित करणं हा यातील सर्वात मोठा आव्हानाचा भाग होता. मूळ कादंबरी वाचलेल्या अनेकांना “प्रेशियस्स!” चा अनुवाद कसा केला याचीच खूप उत्सुकता होती. यापूर्वी झालेल्या टॉल्कीनच्या हॉबिट कादंबरीत केलेला प्रेशियसचा अनुवाद खूपच निराशाजनक होता, त्यामुळे माझ्या अनुवादात काय वापरलं असेल याचे कुतूहल असणे स्वाभाविक होते. प्रेशियस्स या इंग्रजी शब्दांत येणारा जोर आणि भाव त्याचा प्रतिशब्द असलेल्या अनमोल किंवा अमोलमध्ये येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तो भाव अधोरेखित होण्यासाठी शब्दांची जोडगोळी वापरावी लागली. एका शब्दाला एकच प्रतिशब्द असा आग्रह धरून चालले नसते. त्यातला भाव उतरणे अधिक महत्त्वाचे होते, कारण गॉल्लम आणि त्या मुद्रिकेचे नाते, त्याला तिचा वियोग जराही सहन न होणे त्या शब्दांतून स्पष्ट होणे आवश्यक होते. म्हणून प्रेशियसची झाली सोनुली- माझी अनमोल सोनुली- किंवा कधीकधी स्सोनुली...
लॉर्ड ऑफ द रिंग्जमधे भरगच्च पात्रयोजना आहे. त्यातली प्रमुख पात्रे हलकेहलके संथ लयीत वाचकाच्या मनात स्थिरावू लागतात. त्या प्रत्येकाला चित्रित करताना वापरलेल्या बारीक रंगछटा भाषेतूनच याव्या लागतात. त्यांच्या संवादांतून, बोलण्याच्या लकबींतून याव्या लागतात. आणि हेच मराठीतूनही साध्य करायचं होतं. एखाद्या दृश्य कादंबरीप्रमाणे या वर्णनाचा बाज आहे. आणि तो तसाच्या तसा मराठीतून जपणं आवश्यक होतं. कुठेही शॉर्टकट्स न मारता, संक्षिप्तीकरण न करता टॉल्कीनच्या शैलीतच संथपणे मराठीत प्रत्येक पात्राला उभे केले आहे.
या कादंबरीचा हा केविलवाणा पण दुष्ट खलनायक गॉल्लम मराठीतून जसाच्यातसा डोळ्यासमोर उभा करणे हे एक आव्हान होते. कितीही केविलवाणा भासला आणि दुर्दैवी वाटला तरीही गॉल्लम हा एकसंधपणे खलवृत्तीचाच आहे. त्याला सावरून घेणारे काहीही नाही. त्याची उपासमार झालेली दुबळी आकृतीही त्याला सहानुभूतीजनक बनवू शकत नाही. डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करणे हे आता तसे कालबाह्य ठरले आहे, कारण वाचकांनी लॉर्ड ऑफ द रिंग्जवरचा भव्य आणि नितांतसुंदर हॉलिवूड चित्रपट पाहिला असल्याची खूपच शक्यता आहे. तरीही भाषेचा विचार करताना लेखकाप्रमाणेच अनुवादकानेही त्याच्या शब्दचित्रात पूर्ण निष्ठेने रंग भरणे आवश्यक होते. सॉरॉन हा खरा खलनायक कुणाच्या डोळ्यासमोर येऊच शकत नाही अशी काहीशी मेख लेखकानेच मारून ठेवली आहे. एक निराकार अमूर्त दुष्टावा असे त्याचे स्वरूप ठेवले आहे. पण गॉल्लमच्या बाबत लेखकाने शब्दरेखनाचा बारीक विचार केला आहे.
“आम्माला मारू नका! सोनुली... त्यांना आमाला मारू देऊ नको! आमाला काई करणार नाईत ते, होय ना... किती चांगली हॉबिट्स आहेत ही? आमि काय त्यांना त्रास देणार नव्हतो. पण त्येंनी आमच्या अंगावर उडी घेतली. उंदरांवर मांजरांनी झेप घ्यावी तशी उडी मारली, हो सोनुले, तसं केलं त्यानी. आमि किती एकटे आहोत, गॉल्लम. आमि त्येंच्याशी छान वागू, चांगलं वागू... ते आमच्याशी चांगले वागले तर- होय ना... हो. होयच्च्.” या थाटात गॉल्लमचं बरंचसं बोलणं आहे. तो जेव्हा जरा बऱ्या मनःस्थितीत असतो तेव्हा जरा प्रमाण भाषेत आणि स्वतःचा प्रथपुरुषी एकवचनी उल्लेख करतो. नाही तर तो स्वतःचा उल्लेख प्रथमपुरुषी बहुवचनी करतो.
तो अस्वस्थ होऊन दुष्ट विचार करू लागला की-
“म्मास्स्से, मस्स्त मास्से. पांढऱ्या थोबाडाचा तो ग्येला, माज्या सोन्या, ग्येला तो... हो. आता आमि शांतपणे मासे खाऊ. नाई नाई, शांतपणे नाही, स्सोन्या, कारण माजी अनमोल स्सोनुली हरवलीय. होय. हरवली. घाणेरडे हॉबिट्स, बदमाष हॉबिट्स, गेले ते, आमाला सोडून गेले. गॉल्लम्. आणि सोनुली हरवली आमची. फक्त बिच्चारा श्मीगल... एकटाच राहिला. त्याच्याकडे सोनुली नाई. बदमाष माणसं, ती घेऊन टाकतील तिला. माज्या अनमोल सोनुलीला चोरतील. चोर. आमि द्वेष करतंय त्येंचा. मास्से... मस्स्त मास्से. आमाला ताकद द्येतील, डोळ्यात तेज घालतील, बोटांची पकड वाढवतील, होय. गळा पकडू त्यांचा, सोनुले, सर्वांचे गळे आवळू, संधी मिळताच... होय, संधी मिळायला पायजे. मस्स्त मास्से. मस्त मास्से!”
या धाटणीत बोलतो. केवळ त्याच्या शब्दोच्चारांतून त्याची व्यक्तिरेखा रंगवण्याची करामत होती ही.

यातील गॅलाड्रिएल, मुद्रिकेचे सारे साथीदार, आणि मग गॉन्डॉर रोहॅन या राज्यांमधील पात्रे, फॅनगॉर्नमधील वृक्षपात्रे ही सारीच पात्रे अनुवादातून तशीच्या तशी उभी करताना, त्यांचे विदेशीपण शाबूत ठेवून ती शब्दकवेत आणतानाचा मराठीचा अनुभव फार सुखद वाटला. कुठे काही शब्द कमीच पडत नाही ही जाण स्वभाषेबद्दलचा अभिमान वाढवणारी होती.
या कादंबरीत आलेले एक पात्र टॉम बॉम्बाडिल आणि त्याची प्रिय नदीकन्या गोल्डबेरी यांच्या सहवासातले नायकाचे काही दिवस हा एक अतिशय मनोरम असा हिस्सा आहे कथनाचा. त्या प्राचीन अरण्याचे वर्णन जणू आपल्या भाषेच्या सौंदर्यालाच आवाहन करते. मराठीतील काव्यात्म लिहिणाऱ्या लेखकांची, आणि अर्थातच कवींची पदोपदी आठवण येते.
फ्रोडो आणि सॅम मंत्रमुग्ध होऊन उभेच राहिले. वारा थांबला होता. ताठरलेल्या स्तब्ध फांद्यांवर पाने चुपचाप राहिली. पुन्हा एकदा स्वरांना जणू धुमारा फुटला, गाणे सुरू झाले आणि रस्त्यावरून नाचऱ्या पावलांचा आवाज येऊ लागला. लव्हाळ्यांच्या डोक्यांवरून दिसू लागली एक जुनाट फाटकीतुटकी उंच हॅट, तिच्या पट्टीला लांबसडक निळंशार पीस खोवलेलं. आणखी एक पदन्यास आणि उडी टाकताच तो दिसू लागला- माणूस असावासं वाटत होतं. हॉबिट म्हणण्याइतका लहानखुरा नव्हताच तो- जाडजूड आणि वजनदारही होता... माणसांइतका मोठाड नव्हता खरं तर- पण आवाज तसाच करीत होता. त्याच्या दणकट पायांवर चढवलेले पिवळे बूट आपटत होता, गवताच्या माळावरून एखादं गायगूर पाण्यावर धावत सुटावं तसा धावत होता. त्याने निळा कोट चढवलेला आणि त्याची तपकिरी दाढी लांबलचक होती. त्याचे डोळेही चमकदार निळे होते, आणि चेहरा पिकलेल्या सफरचंदासारखा लालबुंद होता. त्यावर खदखदत्या हास्याच्या शेकडो सुरकुत्या पडलेल्या. त्याच्या हाती एका मोठ्या पानाच्या द्रोणात शुभ्र कमळांचा एक छोटासा ढीग होता.
हा तो टॉम बॉम्बाडिल. त्याच्या रानाचे वर्णन भीती आणि सौंदर्य अशा दोन्हींचा समागम असलेले आहे.
राम पटवर्धनांनी द इय़रलिंगचा जो पाडस या नावे अनुवाद केला, त्यातील वर्णनांमधून जसा राकट सौंदर्य टिपण्याचा अचूक शब्दवेध दिसतो तोच शब्दवेध इथे आवश्यक होता. त्या प्रयत्नांत एक छानसा शीण आला... लॉथलॉरिएन या प्रकरणातील वर्णनांत पुन्हा एकदा... आणि पुन्हा फॅनगॉर्नच्या वर्णनातही तीच अवस्था होते. या कादंबरीच्या अनुवादाचे हे काही उच्चतम बिंदू म्हणावे लागतील.
फ्रोडोच्या डोळ्यावरची पट्टी दूर झाल्यानंतर त्याने वर पाहिलं आणि त्याचा श्वास रोधला गेला. ते एका मोकळ्या जागेत उभे होते. डावीकडे एक उंचशी टेकडी होती. सुंदर हिरव्यागार गवताने नटलेली... जणू प्राचीन काळातला वसंतच तिथे अवतरलेला. तिच्या माथ्यावर भव्य वृक्षांची दोन वर्तुळे किरिटाच्या दोन रिंगणांसारखी वाढली होती. बाहेरच्या वर्तुळातील वृक्ष हिमशुभ्र खोडांचे होते आणि निष्पर्ण... पण त्यांचे आकारच इतके देखणे होते की निष्पर्ण अवस्थेतही सुंदरच दिसत होते ते वृक्ष. आतल्या वर्तुळातले वृक्ष मालर्न वृक्ष होते... अतिशय टोलेजंग उंच... आणि अजूनही त्यावरची पाने फिकट सोनेरी रंगात मिरवत होती. त्या वर्तुळाच्या मध्यावर असलेल्या सर्वात उंच वृक्षाच्या फांद्यांमधून एक धवलरंगी मचाण चमकत होतं. त्या वृक्षांच्या पायाशी, टेकडीच्या सर्व उतारांवरच्या हिरव्याकंच गवतात ताऱ्यांच्या आकाराची सोनपिवळी फुले रत्ने जडवावीत तशी तरारली होती. त्यातच उंच उभ्या नाजूक दांड्यांवर डुलणारी इतर अनेक फुलं होती... पांढरी शुभ्र, फिकी पोपटी... गवताच्या गर्द रंगछटेत ती धुक्याच्या पुंजक्यांसारखी शोभत होती. डोक्यावरचे आभाळ निळेशार होते... आणि दुपारच्या उन्हात टेकडी उजळून निघालेली. वृक्षांच्या लांबलांब हिरव्या सावल्या सर्वत्र पडल्या होत्या.
किंवा ट्रीबिअर्ड या एन्टच्या डोळ्यांचे वर्णन-
“असं वाटत होतं की त्या डोळ्यांमागे एक प्रचंड मोठी खोल विहीर असावी... युगानुयुगांच्या स्मृतींनी आणि दीर्घकाळ केलेल्या तत्वचिंतनाने भरलेली. पण त्यांच्या वरच्या पृष्ठावर मात्र वर्तमानाची बिंबे चमचमत होती. जणू एखाद्या वृक्षाचे उन्हात हालणारे पल्लव कसे चमचमत असतात, तसे... किंवा एखाद्या खोल जलाशयावरचे तरंग चमचमावेत तसे... मला नीट सांगता येत नाही, पण असं वाटून गेलं की काहीतरी भुईतून गाढ झोपेतून वर आलंय- किंवा काहीतरी मुळं आणि पानं यांच्या मधलं, किंवा खोलखोल भुई आणि उंचउंच आकाशाच्या मधलं अचानक जागृत झालंय... आणि तुमचा विचार करतंय. गेली अनेक वर्षं त्याने स्वतःचं अंतरंग ज्या संथपणे निरखलं होतं किंवा जोपासलं होतं, त्याच संथपणे, त्याच काळजीने ते आमचा विचार करीत होतं.”
हे तर अगदी लहानसे उतारे आहेत. संपूर्ण कादंबरीच भारावून केलेल्या वर्णनांनी ओथंबलेली आहे.
टॉल्कीनची आपल्या साहित्याच्या अनुवादासंबंधी एक निःसंदिग्ध भूमिका होती. लॉर्ड ऑफ द रिंग्जचा पहिला अनुवाद करणारा स्विडिश अनुवादक एके ओह्लमार्क याचा अनुवाद टॉल्कीनला बिलकूल पसंत पडला नव्हता. त्याने नको इतके स्वातंत्र्य घेऊन त्यातील कविता अनुवादल्या. अर्थाचे बदल होतील इतके शब्द घातले, शिवाय टॉल्कीनने नॉर्स (स्कॅन्डिनेवियन) दंतकथांचे संदर्भ वापरून जी विशेषनामे तयार केली होती तीसुध्दा त्याने अनुवादित केली. यामुळे कादंबरीच्या मूळ गाभ्यालाच धक्का लागल्याचे टॉल्कीनचे मत होते. त्या प्रकरणावर खडाजंगी, कोर्टकचेऱ्या वगैरे झाल्यानंतर टॉल्कीनने ‘गाईड टु द नेम्स इ द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या नावाचे पुस्तकच लिहिले. हा वाद आणि हे पुस्तक मी वाचून घेतल्यामुळे नसते मोह टाळता आले. (आणि कामही तसे सोपे झाले.)
ही कादंबरी रचण्यात लिहिण्यात टॉल्कीनने दहा वर्षांचा काळ घातला. ऑक्सफर्डमधील भाषापंडित असलेल्या या विद्वानाचा मृतप्राय भाषांचा अभ्यास होता. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण, उत्तरेकडल्या दंतकथा वाङ्मयाचा अभ्यास, कथा सांगण्याची आवड याचा मनोज्ञ संयोग त्याच्या या दंतकथासाम्राज्याच्या उभारणीत झाला. मराठीत काय किंवा भारतातील कोणत्याही आधुनिक किंवा अभिजात भाषांत याच्या तोडीचे दंतकथासाम्राज्य साहित्यात आलेले नाही. रामायण-महाभारत ही आर्ष महाकाव्ये आणि बौध्द जातककथा हे प्राचीन साहित्य सोडले तर अलिकडे एवढ्या विस्ताराने लिहिलेलं अद्भुतरम्य साहित्य भारतीय भाषांत आलेलं नाही. पण या प्राचीन साहित्यामुळे भारतीय वाचकमनाला त्या प्रकारच्या अद्भुतरम्यतेची सवय तर आहेच. त्यामुळे हे दंतकथासाम्राज्य आकार कमी करून देण्याची काही गरजच नव्हती. मराठी वाचक या भव्य-रम्य अद्भुतकथानगरीत सहज रमून जाऊ शकतात.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

धन्यवाद ! विकत घेऊन वाचणार. कधी प्रकाशित होणार ? प्रकाशक कोण ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या वर्षी जुलैमधेच प्रकाशित झालं. डायमन्ड पब्लिकेशन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ! ठाण्यात कुठे मिळतेय का ते पहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मूळ इंग्रजी वाचलं नव्हतं, सिनेमाही पाहिलेला नाही. त्यामुळे कदाचित पुस्तकात घुसायला थोडा वेळ जावा लागला. परंतु एकदा सगळं ओळखीचं वाटल्यावर वाचायला जी मजा आली, तिला तोड नाही. मराठी खरोखरीच इतकी चपखल वाटते अनेक ठिकाणी, त्याचे श्रेय मुग्धाताई तुलाच. हा मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा अनुवाद म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

भाषांतराची गोष्ट आवडली!

प्रेश्श्स्स्स चं भाषांतर सोनुली बरच प्रभावी वाटतय. गोलमचं स्वगतपण हाँटिंग!

तो जेव्हा जरा बऱ्या मनःस्थितीत असतो तेव्हा जरा प्रमाण भाषेत आणि स्वतःचा प्रथपुरुषी एकवचनी उल्लेख करतो. नाही तर तो स्वतःचा उल्लेख प्रथमपुरुषी बहुवचनी करतो.

गोलम स्प्लिट पर्सनॅलिटीची केस असतो राईट? कधी तो स्मीगल असतो, ( त्याचा रिंगा मिळण्यापूर्वीचा, मूळ अवातार) तर कधी तो गोलम असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोठं काम केलंत. हा अनुवाद एकांडा ना राहता हॉबिट वगैरे पुढच्या/मागच्या भागाचाही अनुवाद व्हावा ही इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे बाबा, हॉबिटचा अनुवाद झालाय. तो जरा- म्हणजे बराच वाईट होता म्हणून तर मी हा करायला घेतला. त्याच अनुवादिकेने याची वाट लावू नये म्हणून. माझ्या लेकीने धोशाच घेतलेला. तू कर नाहीतर परत हॉबिटसारखं होईल लॉऑरिं चं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बाबा, हॉबिटचा अनुवाद झालाय. तो जरा- म्हणजे बराच वाईट होता म्हणून तर मी हा करायला घेतला. त्याच अनुवादिकेने याची वाट लावू नये म्हणून. माझ्या लेकीने धोशाच घेतलेला. तू कर नाहीतर परत हॉबिटसारखं होईल लॉऑरिं चं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा फारच सुरेख लेख!! नेमक्या अनुवादाचा कैफ काही औरच असतो हे खरं Smile

---

पण हा अनुवाद कधी प्रकाशित झाला? एक्वढ्यात झाला असेल तर इतक्या उशीरा का असा प्रश्न पडजीभेत ढकलवत नाहीये म्हणून विचारतो. (तुम्हाला नव्हे प्रकाशकांना!) मी इंग्रजी कादंबरी वाचुनच बहुदा १०-१२ वर्षे उलटली असावीत (अर्थात मूळ कादंबरी १९५० का कायतरी आहे असे आठवते, तेव्हा इतका उशीर का या प्रश्नाला तसा फारसा अर्थ नाही. पण राहवत नाही म्हणून विचारतोय) इतक्या वर्षात याचा इतर कुणीच अनुवाद का केला नसेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सॉरी, उत्तर द्यायला बराच वेळ लावला. पण हे मलाही माहीत नाही. कदाचित् माझी वाट बघत असेल...
या अनुवादाच्या आधी तीनएक वर्षे मला वाटतं हॉबिटचा अनुवाद झाला. आणि मग मी हा केला. अादूबाळच्या प्रतिक्रियेवरचा प्रतिसाद वाचा.
मला वाटतं काही क्लासिक्सची ओळखच नसते...
आणि खूप एवढे ठोकळे खूप खपाऊ नसतात हेही कारण असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हं.. शेवटचं कारण खास पटणीय आहे खरं
आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!