थोडक्यात चुकले! - गी द मोपासां

र धों कर्वे

थोडक्यात चुकले! - गी द मोपासां

मूळ लेखक - गी द मोपासां

अनुवाद - र. धों. कर्वे

मी आफ्रिकेत जायला निघालो, तेव्हा तू माझी चेष्टा करीत होतास आणि मी परत येताना एखादी रंगीबेरंगी कपडे घातलेली शिद्दीण बरोबर आणीन की काय अशी तुला भीतीही वाटत होती. गेल्या पत्रात तू मला लिहिलेस, 'एखाद्या देशातील लोकांची प्रेम करण्याची पद्धत मला कळली की तो देश माझ्या ओळखीचा होतो. तेव्हा तू आफ्रिकेसंबंधी अशा प्रकारची माहिती दे.' प्रेमाच्या बाबतीत मी जरा हळवा आहे हे तुला माहीतच आहे आणि माझे प्रेम एखाद्या कृष्णवर्ण रमणीवर बसेल ही तुझी कल्पना काही अगदीच अशक्य कोटीतली नाही, कारण प्रेम हे नुसत्या रंगावर नसते.

आता येथल्या लोकांबद्दल म्हणतोस तर ज्याला सात्त्विक, निर्विकार प्रेम म्हणतात, ते त्यांना कितपत शक्य आहे याची मला बरीच शंका आहे. पण ज्याला विषयी प्रेम म्हणून नाक मुरडणे हा शिष्टाचार आहे, पण बहुतेक लोकांना जे मनापासून आवडते, ते मात्र येथे भरपूर आहे. कदाचित येथल्या भयंकर उष्णतेचा हा परिणाम असेल, पण असे आहे खरे.

आता जास्त पाल्हाळ न लावता माझीच हकीकत तुला सांगतो. म्हणजे तुला समजेल. शहरात मी एक लहानसे घर भाड्याने घेतले आहे. येथल्या घरांना बाहेरच्या बाजूला खिडक्या नसतात आणि मधल्या चौकातून सगळ्या घराला उजेड मिळतो. सारा दिवस एका मोठ्या दिवाणखान्यात काढायचा आणि रात्री गच्चीवर निजायचे. उष्णतेमुळे येथल्या लोकांप्रमाणे मीही जेवल्यानंतर दुपारी एक झोप ताणून देऊ लागलो. पण झोप येणार कशी? कोच सुंदर मऊ होते आणि वर एक गुलगुलीत गालिचा होता, पण मी पॅरिसहून निघून बरेच दिवस झाले होते आणि, तुला कदाचित खरे वाटणार नाही, पण निघाल्यापासून मी ब्रह्मचारी होतो.

तुला कदाचित कल्पना होणार नाही, पण जगात दोन अडचणी अशा आहेत की त्यात तू कधी सापडू नये अशी मनापासून इच्छा आहे. एक पाण्याची टंचाई आणि स्त्रियांची टंचाई. यातले अधिक भयंकर कोणते हे मला सांगता येणार नाही. येथल्या रुक्ष प्रदेशात एक पेलाभर पाण्याकरता मनुष्य खूनदेखील करील, आणि स्त्रियांकरता खून पडतात हे तुला माहीतच आहे. येथे स्त्रिया नाहीत असे मात्र नाही. आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यात सर्व प्रकारचा धोका असतो असे म्हणतात.

अशा स्थितीत दुपारी झोप येईना म्हणून मी एकदा हिंडायला निघालो. रस्ते तापलेले होते. खमीस भिजून अंगाला चिकटत होता, तेव्हा मी समुद्राकडेच गेलो. समुद्रकाठाला सर्व शांत होते. मनुष्य नाही, पशू नाही, एखादा पक्षीदेखील नाही. इतक्यात माझ्या मागे काहीतरी आवाज झाला. आणि वळून पाहतो तो एका खडकापलीकडे एक बाई स्नान करीत होती. कोणी पाहत नाही अशा कल्पनेने तिने सर्व कपडे काढून ठेवले होते. तिचे स्तनांपर्यंत शरीर समुद्रात बुडले होते आणि मला न पाहिल्यामुळे ती त्या काचेसारख्या पारदर्शक पाण्यात बिनघोर वर-खाली होत होती. उन्हाने डोळे दिपत होते तरीही मी हा सुंदर देखावा अनिमिष पाहत होतो. इतक्यात ती एकदम वळली आणि मला पाहून एक बारीकशी किंचाळी फोडून, अर्धवट चालत आणि अर्धवट पोहत, खडकामागे लपली. तिला बाहेर आलेच पाहिजे हे जाणून मीही तिची वाट पाहत किनार्‍यावर स्वस्थ बसलो. काही वेळाने तिचे उंच बांधलेले केस दिसू लागले आणि तिने सबंध डोके वर काढले. तिचे तोंड रुंद व डोळे धीट आणि टपोरे होते आणि अंगकांती मूळची गोरी असून उन्हामुळे जुन्या हस्तिदंतासारखी झाली होती.

ती म्हणाली, "जा ना येथून."

पण मी हलतो कशाला! ती पुन्हा म्हणाली, "हे काही बरे नाही, येथे बसून राहणे!"

तरीही मी न ऐकलेसे करून दगडासारखा बसून राहिलो. तिचे डोके दिसत नाहीसे झाले. दहा मिनिटे गेली. नंतर पुन्हा केस, डोके, कपाळ, अगदी सावकाश, जपून वर येऊ लागले, या वेळी मात्र ती संतापलेली दिसली.

ती म्हणाली, "अशाने मी पाण्यात राहून आजारी पडेन! तुम्ही येथे आहात तोपर्यंत मी बाहेर येणार नाही."

मग मी उठलो आणि चालू लागलो. अर्थात मधून मधून मागे वळून पाहतच होतो. मी पुरेसा लांब गेलो असे तिला वाटल्यावर ती माझ्याकडे पाठ करून बाहेर निघाली आणि कपडे घालण्याकरिता एका खडकामागे गेली.

मी दुसर्‍या दिवशी त्याच वेळी तेथे आलो, तो तिचे स्नान चाललेच होते. पण आज तिच्या अंगात पोहण्याचा पोशाख होता. मी येताच ती आपले शुभ्र दात दाखवून हसू लागली. आठ दिवसांत आमची चांगली ओळख झाली आणि आणखी आठ दिवसांत तर ओळखीला सीमाच राहिली नाही. तिचे नाव मॅरोका, अर्थात हे टोपणनाव होते, तिचे आईबाप स्पेनमधले आणि नवरा फ्रेंच होता. त्याला काहीतरी सरकारी नोकरी होती. ती काय होती याची मी चौकशी केली नाही, पण त्याला काम पुष्कळ असे हे मात्र खरे.

नंतर तिने आपल्या स्नानाची वेळ बदलली आणि दुपारच्या वामकुक्षीला ती माझ्याकडेच येऊ लागली. बाकी ती आली म्हणजे वामकुक्षी मात्र फारशी होत नसे! तिचे एकंदर शरीर जणूकाय शारीरिक सुखाच्या दृष्टीनेच घडवले होते आणि तिच्या मनाचा कलही विषयसुखाकडेच जास्त होता. कामुक डोळे, तीक्ष्ण दात, चमत्कारिक आकाराचे, तोतापुरी आंब्यासारखे आणि जणू काय आत एखादी स्प्रिंग असलेले स्तन या सर्वांमुळे ती कामुक विचारांस सर्वथैव पोषक होती आणि तिची तृप्ती करणे जवळजवळ अशक्य होते. तिचे मन म्हणजे दोन आणि दोन चार इतके सरळ होते आणि तिचे खणखणीत हास्य म्हणजे तिचा सर्वांत गहन विचार. तिला आपल्या शरीरसौंदर्याबद्दल स्वाभाविक अभिमान इतका होता की त्यावर कोणतेही आच्छादन तिला खपत नसे. ती घरात आल्याबरोबर तिचे कपडे गळून पडलेच, आणि ती तशीच इकडेतिकडे हिंडत असे आणि चांगली थकली की तशीच निजत असे. तिचा नवरा कामावर असला म्हणजे संध्याकाळीही येत असे आणि मग आम्ही गच्चीवर बसत असू. तेथेही ती नग्नच असे आणि कितीही चांदणे असले तरी कोणी आपल्याला पाहील अशी भीती तिच्या मनाला शिवली नाही. ती कधीकधी विनाकारण किंचाळ्या फोडीत असे आणि त्या ऐकून कुत्रे भुंकायला लागत असत.

एकदा मी अर्धवट झोपेत स्वस्थ पडलो होतो, तो ती अगदी माझ्या तोंडाजवळ तोंड आणून म्हणाली, "तू एकदा माझ्या घरी निजायला ये ना!"

मी म्हणालो, "तुझ्या घरी, आणि ते कसे जमणार?"

ती म्हणाली, "न जमायला काय झाले? माझा नवरा कामावर गेला की त्याच्या जाग्यावर तू येऊन नीज."

मला हसूच येऊ लागले. "पण तू येथे येतेसच. मीच कशाला तेथे आले पाहिजे?"

ती म्हणाली, "म्हणजे मला आपली एक आठवण होईल."

मला काही समजेना असे पाहून ती माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली, "म्हणजे असे की माझ्या घरी आलास म्हणजे तू येथून गेलास तरी मला तुझी आठवण होईल आणि नवरा जवळ असला तरी तूच आहेस असे मी समजेन."

मी म्हणालो, "तुला लागले आहे वेड. मी येथे आहे तो ठीक आहे."

अशा तर्‍हेने वाघाच्या तोंडात मान द्यायची मला मुळीच इच्छा नव्हती, पण तिने माझी अतिशय विनवणी केली, शेवटी रडलीदेखील. तिचा इतका आग्रह का, हे मला काही केल्या उलगडेना. एकदा मला वाटले ती मनातून नवर्‍याचा द्वेष करीत असेल आणि त्याच्याच घरात त्याच्यावर सूड उगवण्याकरता म्हणून ती असे म्हणत असावी. मी विचारले, "तुझा नवरा तुला फार जाच करतो का?"

ती म्हणाली, "छे, तो कित्ती चांगला आहे."

मी म्हणालो, "पण तुझे त्याच्यावर प्रेम नाही."

ती म्हणाली, "वा! माझे त्याच्यावर कित्ती प्रेम आहे! पण तुझ्यावर त्यापेक्षा जास्त आहे."

मी आणखी काही बोलणार तो ती आपल्या तोंडाने माझे तोंड बंद करून म्हणाली, "ये ना, इतके काय अगदी!"

मी येत नाही असे पाहून ती रागावून ताबडतोब निघून गेली.

तिने आठ दिवस तोंड दाखवले नाही. नवव्या दिवशी दारात उभी राहून मला विचारते, "आज माझ्याकडे निजायला येशील का? नाहीतर मी चालले."

तिला भेटून आठ दिवस झाले होते आणि नाही म्हटले तर ती जाते, तेव्हा मी कबूल केले आणि ती राहिली. रात्री ती जवळच्या रस्त्यात माझी वाट पाहत होती आणि मी आल्याबरोबर मला आपल्या घरी घेऊन गेली. ती बंदराजवळच्या एका लहानशा घरात राहत होती. दारात शिरल्याबरोबर स्वयंपाकघर होते, तेथेच ती जेवीत असत. नंतर स्वच्छ पांढर्‍या भिंतींची एक खोली, सर्वभर फोटो लावलेली. ती आनंदाने नाचू लागली आणि म्हणाली, "हे तुझेच घर आहे, समजले?"

मला थोडे चमत्कारिकच वाटत होते आणि सापडलो तर काय होईल या भीतीने कपडे काढायची माझी बिलकूल तयारी नव्हती, पण तिने माझे काही चालू दिले नाही आणि माझे सर्व कपडे तिने शेजारच्या खोलीत नेऊन ठेवले. नंतर माझी भीती कमी झाली आणि आम्ही काही काळ मजेत घालवला. अशा रीतीने दोन तास गेले असतील तो कोणी तरी दारावर धक्के दिले आणि ओरडले, "दार उघड, मी आहे."

ती घाबरून म्हणाली, "माझा नवरा. पलंगाखाली लप."

मी आपली विजार शोधू लागलो. पण तिने मला वेळच दिला नाही. तसेच पलंगाखाली ढकलले. मी मुकाट्याने सरपटत खाली गेलो. नंतर ती स्वयंपाकघरात गेली. एक कपाट उघडल्याचा आवाज आला, नंतर ती काहीतरी घेऊन परत निजायच्या खोलीत आली आणि काय आणले होते ते कोठेतरी ठेवले. तिचा नवरा मोठमोठ्याने ओरडत होता.

त्याला ती म्हणाली, "मला काड्यांची पेटी सापडत नाही… हां, ही पाहा सापडली." असे म्हणून तिने दार उघडले.

तो आत आला, पण मला त्याचे पायच दिसत होते. त्या पायांच्या मानाने जर त्याचे एकंदर शरीर असले तर तो राक्षसच असला पाहिजे. चुंबनाचा आवाज झाला, जघनावर एक थाप मारलेली ऐकू आली. नंतर तो म्हणाला, "पैशाचे पाकीट विसरलो, काय करणार, परत यावे लागले. तुला चांगलीच गाढ झोप लागली होती." त्याने कपाटाचे खण उघडले आणि काहीतरी शोधू लागला. नंतर बायको अंथरुणावर पसरली होती तिच्याशी लाडीगोडी करू लागला. पण तिने त्रासून त्याला घालवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचे पाय माझ्या इतके जवळ आले होते की, ते पकडले तर काय होईल, अशी एक वेडी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. ती त्रासलेली पाहून तो एक सशब्द चुंबन घेऊन गेला आणि एकदाचा दार लावल्याचा आवाज आला. माझी स्थिती अगदी केविलवाणी झाली होती आणि मॅरोका जरी पोट धरून हसत आणि नाचत-बागडत होती तरी तिच्याकडे लक्ष्य न देता मी एका खुर्चीवर धाडकन अंग टाकले, आणि लगेच मी तेथून उडी मारली, कारण मला खुर्चीवर काहीतरी गार लागले. वळून पाहतो तो लाकडे फोडायची एक लहानशी कुर्‍हाड खुर्चीवर! ती तेथे कशी आली? मी आलो तेव्हा तर मला दिसली नाही. आता तर मॅरोकाला जास्तच हसू येऊ लागले, पण मला मात्र खूप राग आला होता. हे नसते संकट अंगावर ओढवून घेऊन वर आणखी तिने हसावे हे मला कसेसेच वाटले.

"आणि तुझ्या नवर्‍याने मला पाहिले असते तर?" मी विचारले.

"त्याची काही भीती नव्हती." ती म्हणाली.

"कशी नव्हती भीती? तो जरा खाली वाकला असता की मी दिसलो असतो," मी म्हणालो.

ती माझ्याकडे टक लावून म्हणते, "पण तो खाली वाकलाच नसता."

"त्यात कठीण काय होते? समज त्याची टोपी खाली पडली असती, तर उचलायला वाकला असता की नाही? म्हणजे मी सापडलो असतो, आणि या वेषात! चांगले आहे!" मी म्हणालो.

तिने गंभीर मुद्रा करून माझ्या खांद्यांवर हात ठेवले आणि म्हणाली, "तो वाकला असता तर पुन्हा उठलाच नसता."

"म्हणजे काय?" मी म्हणालो. वाकलेल्या माणसाचे कुर्‍हाडीने डोके उडवण्याचा जेव्हा तिने आविर्भाव केला, तेव्हा मी तिचे इंगित समजलो.

एकंदरीत या गोष्टीवरून येथील पातिव्रत्य, प्रेम, अतिथिसत्कार वगैरेबद्दल तुला पूर्ण कल्पना आलीच असेल!

***

मजकुरासाठी आभार : 'रधों', खंड १-८, पद्मगंधा प्रकाशन, संपादक डॉ. अनंत देशमुख

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एकंदरीत या गोष्टीवरून येथील पातिव्रत्य, प्रेम, अतिथिसत्कार वगैरेबद्दल तुला पूर्ण कल्पना आलीच असेल!

अरे बाप रे!! खाली वाकून चोरी पकडल्यावरती नवर्‍याने तिला मारली असती. तेव्हा चालायचेच. जीवापुढे कसले आले पातिव्रत्य नि संस्कार Wink
____
कथा फुलवण्यात मोपासा चा हात कोण धरु शकणार असे मला पूर्वी वाटे? आता आबा हे उत्तर मिळाले आहेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0