Skip to main content

असच

असच उन कललं होतं
कोणी घेऊन गेलं होतं वारंवार
आपल्याला आपल्या घराशिवाय बाहेर
शहर येत होत समोर चेहऱ्या चेहऱ्यांचं
आपण होतो बसून एकाच जाग्यावर एकाच चेहऱ्याच्या घरात
मुबलक रस्ते आले होते मुबलक लोक घेऊन दारात
अश्या निरर्थक वेळी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आपल्या दारांच्या कानात
आपल्याला चालत असलेली खिडकी ठरवली गेली रद्दबातल
अशाच पडणाऱ्या रात्रीवर लावला कर दिव्यांचा
निरर्थक पावलांवर चढवले मोजे
निरर्थक हातांत दिले हात
नि झाडांना दिल्या सावल्या
निकामी होत गेले रस्ते
जेव्हा वापर केला निरर्थक पावलांनी
नुसतीच सकाळ नको होती कोणाला
नुकतेच उघडलेले डोळे होते निरर्थक
नुकतीच सुट्लेली मिठी नव्हती कोणाच्या लेखी
नुसतं निरर्थक आकाशाकडे पाहणं
नुसतं एकवीस वाजता अंधार असणं
अलगद पावसाचं रात्री न दिसणं होतं निरर्थक
आम्ही धूळ उडताना पहिली फरश्यांपर्यंत
खुर्चीवर बसून राहिलो नुसतेच
रेडीओ वाजत राहिला एका कोपऱ्यात घराच्या नुसताच
घड्याळाचे काटे निरखले
चांदण्यांच्या खाली बाहेरच्या गाड्या बघितल्या
अभाळांची दगडं ठेवत राहिलो डोंगरांवर निरर्थक
शहराच्या वाट्याला गेलो
शहरातच प्रेम केलं निरर्थक
झाडांच्या फांद्या निरखल्या
झाडांच्या फांद्यांना मानलं
तसं वाट पाहणं आमच्यासाठी होतं ठीक
म्हणून दुपारभर थांबलो चौकांच्या विहिरीत
तेवली तिन्हीसांज पानापानांवर
भरले जिने गाठोड्यात जेव्हा आला नकार निरर्थक
निरर्थक बाकांवर बसलो
मुबलक विरहाचे अवाक्षर ऐकले
दुसरा दिवस येतो असं ऐकलं
तेव्हा निरर्थक रस्ता फेसाळला होता
© निनाद पवार