शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी

ललित

शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी -
फुलसुंदरीआख्यान अर्थात सांस्कृतिक संम्मीलनाचे शीघ्रदर्शन

- पंकज भोसले

लोकमान्य आळी आणि काबाडआळीच्या मधल्या रस्त्यात असलेल्या एव्हरेस्ट सोसायटीतून फुलसुंदरी दररोज सकाळी बाहेर पडताना दिसते; त्या प्रसंगाला रांगड्या गिटारवर वाजवलं जाणारं कण्ट्री म्युझिकच समर्पक ठरू शकतं. शेरील क्रोच्या 'एव्हरी डे इज अ वायंडिंग रोड'मधल्या सुरुवातीच्या काँगो-बाँगोपासूनची प्रत्येक बीट तिच्याकडून टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाला मॅच होण्यासाठीच बनलेली वाटते. एव्हरेस्ट सोसायटीच्या समोर तिची वाट पाहत बसलेले वस्तीतले दोन तरी रोडरोमियो वेगवेगळ्या टोकांवर तिला दिसतात. त्यामुळे ती वर्तकआळीसाठीचा शॉर्टकट घेते आणि त्या रोमियोंना चुकवते. तेव्हा शेरील क्रोच्या या गाण्याचा मुखडाच सुरू झाल्यासारखा तिचा चेहरा अंमळ हसरा बनतो. वर्तक आळीच्या खबदाडी रस्त्यातही आळीतलं कुणीतरी असतंच. मिस्टर बामणे किंवा पिनाक, विन्या ती समोरून जाईस्तोवर लाळ गाळत उभे राहिलेले दिसतात. त्यांच्याकडे न पाहिल्यासारखं करून ती पुढे जात असताना शिटी वाजतेच. मिस्टर बामणे घरी परतण्यापूर्वी हा डोळ्यांचा आणि शिटी वाजविण्यासाठी ओठांचा वार्मअप करतात. त्यांच्यासोबत पिनाक आणि विन्या चुत्यासारखे डोळे लख्ख उघडे ठेवून आणि दातांचा अर्धा भाग आ वासून उभे असतात. मागे कधीतरी विन्यावर तिने चप्पल फेकून मारली होती. तेव्हापासून विन्याकडे नुसतं डोळे वटारून पाहिलं तरी तो पळून जातो. पिनाक दररोज त्यांच्यात नसतो. तिला एकदा पाहिले की पाहत बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नेमाडे काकांसारख्या म्हाताऱ्यांपासून ते आत्ता कुठे उठायला लागलेल्या सहावी-सातवीतल्या पोरांपर्यंत सगळेच जण तिला डोळ्यांनी शोषून घेण्याचा प्रयत्न करतात. पण गेल्या काही वर्षांत पुरुषांची चोदक नजर आणि निरमा सुपर या दोघांपैकी तिच्या आयुष्यात काही बदललेलं नसल्यानं ती या प्रकाराला पुरती सरावलेली आहे. वर्तकआळीच्या विहिरीपाशी आणखी एखादा वस्तीतला किंवा सोसायटीतला रोमियो 'हो बोल, नायतर विहीरीत उडी मारून जीव देण्याच्या पवित्र्यात' उभा असतो. त्याला 'भोसड्यात जा' अर्थाचा लुक देऊन फुलसुंदरी ब्लू बर्डच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करते. तेव्हा आजूबाजूच्या लॉन आणि त्यांजवळ बसलेल्या म्हातारा क्लबचे मेंबर्स आपला योगा, ब्रह्मविद्याा, हास्यव्यायाम विसरून चक्षुमोदन अवस्थेचा आनंद घेऊ पाहतात. ब्लू बर्ड ते ब्लॅक स्मिथ टॉवरच्या लांबलचक परिसरातील तिचं चालणं '...वायंडिंग रोड'च्या अंतऱ्यापाशी आलेलं असतं. तिथे टांगलेल्या एका झोपाळ्यावर दोन झोके घेऊन ती तरंगू लागते. पसाभर हसू तिच्या चेहऱ्यावर उमलू लागतं. त्यावेळी ब्लॅकस्मिथ टॉवरमधला तुकाराम वॉचमन लाल लाल डोळ्यांतून तिला पिऊ पाहतो. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या फुलसुंदरीचा दिवसातला हा सर्वात आनंदाचा आणि मला शेरील क्रोसमान भासणारा क्षण संपायची वेळ आलेली असते. मिस्टर बामणेंच्या घरातलं काम तिचं दिवसातलं दुसरं काम असतं. एव्हरेस्ट सोसायटीमधल्या जेवण करण्याच्या कामानंतरचं. पण इथल्या कामानंतर संध्याकाळच्या सहा-सात वाजेपर्यंत ती ब्लॅकस्मिथ टॉवरमध्येच नऊ घरांची धुणी-भांडी-लादी, दोन लहान मुलींना शाळा-क्लासमधून आणण्या-नेण्याचं काम करत असताना, तिचा बाहेर थोड्या क्षणापूर्वी असलेला सकारात्मक अवतार नष्ट होतो, बामणे काकांच्या घरात शिरल्यानंतर त्यांच्या गलेलठ्ठ बायकोच्या ओझ्याखाली तिची दबून जाण्याची सुरुवात होते. पुढच्या घरांमध्ये बुजरेपण हळूहळू वाढत जाते. शेरील क्रोचं 'फर्स्ट कट इज द डीपेस्ट' हे गाणं आणखी सॅड टोनमध्ये वाजत असल्यासारखी तिची अवस्था होते.

तिचे केस भुरे असते, तर ती शंभर टक्के शेरील क्रो दिसली असती. पण नाल्याशेजारी कधीकाळी उगवून आलेल्या अनधिकृत वस्तीत खोलीवर वन प्लस वन चढवून ड्युप्लेक्सची मौज घेणाऱ्या सुंदरलाल पटवाच्या आणि त्याच्या बायकोच्याही घरच्यांपैकी कुणाचे केस भुरे नव्हते. परिणामी हिरवे-घारे डोळे असूनही फुलसुंदरी पटवा काळे केस घेऊन जन्मली, त्याला कुणी दोष देऊ शकत नाही. मला आळीत ती जेव्हा-जेव्हा दिसली तेव्हा डिट्टो शेरील क्रोच वाटली. खप्पड गालांचा तंतोतंत तोच हसरा चेहरा, चालीमध्ये तीच उभ्या जगाला फाट्यावर मारणारी धडाडी, नजरेमध्ये तोच कॉन्फिडन्स, सारी देहबोली त्याच शिडशिडीत उत्साही अवस्थेतली. टीशर्ट, जीन्स पोशाखासोबत हातात गिटार दिली आणि डोळ्यावर गॉगल चढविला तर ओरिजनल शेरील क्रो झक मारेल. कॅनन फाय डी ३५ एमएममधून तिचे पोट्रेड अ‍ॅनी लिबोविट्झ, रिचर्ड अ‍ॅव्हेडॉन किंवा स्टीव्ह मकरी यांच्या तोडीच्या दिग्गजांनीच काढावेत, इतका तिचा चेहरा पाहणाऱ्याला जखडून ठेवतो.

मी तिला पहिल्यांदा पाहिली बऱ्यापैकी फॅशनवाल्या, तरी जुनाट वाटणाऱ्या भारतीय पोशाखामध्ये. पुढे कळालं की डॉली गाला आणि नक्षी नेमाडेचे जुने झालेले भारतीय कपडे तिला मिळत. ते आणखी जुने होईस्तोवर फुलसुंदरीच्या शरीरकाठीवर चढत. पण त्या पोशाखातही फुलसुंदरी अतिसुंदर भासत असे. तेव्हा एव्हरेस्ट ते ब्लॅकस्मिथ टॉवर तिच्या मागे पोरांची फौजच लागलेली दिसायची. त्या प्रत्येकाला उडवून टेचात जाण्याचं प्रशिक्षण तिनं स्वत:ला घालून दिलं होतं. 'स्टीव्ह मॅक्‌क्वीन' या गाण्यातल्या शेरील क्रोच्या रांगड्या अवतारासारखं तिचं चालणं वाटलं होतं तेव्हा मला. मग मी जेवढा जास्त विचार करायला लागलो, तेव्हा मला तिला शेरील क्रोसारख्या पोशाखात पाहायची आणि तिचे फोटोग्राफ्स काढायची इच्छा व्हायला लागली. एकदा तर ती चक्क स्वप्नात मला शेरील क्रोसारख्या पोशाखात प्रोफेशनल फोटोशूटच्या तयारीत दिसली आणि मग त्या स्वप्नपूर्तीचा ध्यास मला लागला. माझ्यात अ‍ॅनी लिबोविट्झ किंवा अ‍ॅव्हेडॉन यांच्यापासून प्रकाशवर्षे दूर असणारेही कौशल्य नसले, तरी मला तिची पोर्टेड्स काढायची होती. तिच्या चेहऱ्याच्या पोताचे, तिच्या डोळ्यांचे, धारदार नाकाचे आणि खळीचे क्लोजअप्स घ्यायचे होते. माझ्या घरांच्या भिंतींवर ती पोट्रेड्स डकवायची होती. शेरील क्रोचं डिट्टो सौंदर्य मला माझ्या कॅमेराद्वारे उपभोगायचं होतं.

म्युनिसिपाल्टीच्या सात नंबर शाळेत सातवीत असतानापासून म्हणे तिला भरपूर प्रपोज यायला लागले. म्हणून सुंदरलाल पटवा यांनी तिची शहराच्या टोकाला असलेल्या कन्याशाळेत रवानगी केली. पण तरी काही फरक पडला नाही. वाटेत बसमधून पाठलाग करीत घरापर्यंत येणारे रोमियो चिकार असत. नाल्यालगत असलेल्या वस्तीतही तिच्या पाठी लागलेल्यांमध्ये सर्व वयाचे होते. सार्वजनिक शौचालयासाठी जाताना सकाळी तिच्या पाठीमागून धावत जाऊन तिला धक्का देण्याचा प्लान करणारे महाभाग होते. पण तो प्रकार कुणाला यशस्वीरीत्या पार पाडता आला नाही. एकाच्या तोंडावरच तिने म्हणे टमरेलातलं पाणी ओतलं होतं. मग पुन्हा घरी येऊन दोन्ही हातात पाण्याने भरलेली दोन टमरेल घेतली होती. हा दोन टमरेल नेण्याचा शिरस्ता तिने पुढे अनेक दिवस कायम ठेवला होता. एक अंगावर येणाऱ्यांसाठी आणि एक स्वत:साठी. मग पुढे त्या दोन टमरेलांबाबत वस्तीतच गमतीशीर प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर तिने एकाच टमरेलाचाच वापर करणं पुन्हा सुरू केलं.

शेरिल क्रो

आता तुम्ही म्हणाल की फुलसुंदरीच्या टमरेल अवस्थेपर्यंतची मला माहिती कशी, तर तो एक वेगळाच किस्सा आहे. फुलसुंदरीचे लाल विटांचे ड्युप्लेक्स, ज्यावर सिमेंटचा मुलामा देण्यात आलेला नाही आणि वर एव्हरेस्ट पत्रे लावले आहेत, ते ज्या नाल्याला लागून आहे, त्याच्या अलिकडच्या भागात आमची सोसायटी आहे. अन् तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या गॅलरीतून तिचं विटांचं ड्युप्लेक्स थोडं का होईना, पण दिसतं. त्या गॅलरीतून मी कधीच नाल्यापलीकडच्या घरात डोकावलो नव्हतो. पण ती शेरील क्रोसारखी दिसते, वर आपल्या समोरच्या घरातच मोठी झाली आहे, याचा छडा लागल्यानंतर मात्र मी गॅलरीतच सर्वाधिक राहायला लागलो होतो. शिवाय त्या वस्तीत राहणारा कैलास कबुतरवाला कधीतरी जिममध्ये आम्ही पार्टनर असल्यामुळे माझा चांगला परिचित आहे. आता आम्ही व्यायामशाळेत जात नसलो, तरी त्याच्याकडून फुलसुंदरीच्या घराचे वस्तीमधील स्थान आणि फुलसुंदरीची इत्थंभूत माहिती मी करून घेतली आहे. याशिवाय माझ्या फुलसुंदरीचा फोटो काढण्याच्या स्वारस्यातून एका फोटोग्राफर मैत्रिणीला मी यात आणले. ते नंतर येईलच. पण त्यातून मला फुलसुंदरी जास्तच कळत गेली, हे नक्की.

आळीला लागून असलेली ही लेनिन नगर नाव असलेली वस्ती शहरातील एका राजकारण्याच्या आशीर्वादामुळे १९८०च्या आसपास कधीतरी उभी राहिली. सुरुवातीला फारच थोड्या पत्र्याच्या खोल्या होत्या. नाल्यातून येणारा उग्र दर्प, पाणसाप आणि खेकडे-उंदीर-घुशींचा सामना तिथे राहणाऱ्यांना करावा लागे. पावसाळ्यात नाल्याला तीन ते चार वेळा पूर येई. त्यात अनेकांचा संसार खिळ्याला अडकविलेल्या टमरेलासकट वाहून जाई. पण पावसाळ्यानंतर पुन्हा नव्यानं संसारउभारणी सुरू होई. यात अनेक जण इथला भाग सोडत तेवढेच नव्याने लोक दाखल होत. १९९५नंतर पावसाचा मारा कमी झाला. पुराचं प्रमाण कमी झालं. नाल्याला मजबूत भिंती बांधण्यात आल्या आणि झोपडीसदृश वस्तीमध्ये विटांची का होईना एक मजली घरं तयार होऊ लागली.

वस्ती आणि सोसायटीमध्ये मूलभूत फरक आर्थिक होता. वस्तीतल्या बऱ्याच बायका आमच्या परिसरातल्या सोसायटीत कामाला होत्या. पोळ्या लाटणं, जेवण बनवणं यांपासून ते धुणी-भांडी-लादी करण्यासाठी त्यांच्या इतक्या स्वस्तात काम करायला कुणी तयार झालं नसतं. त्यांचे कपडे जुनेर असत. ते औषधासाठी सिव्हील किंवा वाडिया या सरकारी रुग्णालयात जात. ते छोटे सणही मोठ्या उत्साहामध्ये साजरे करीत. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात भांडण वाजे. सोसायटीत राहणाऱ्यांना कधी तरी आपली चाळ आठवून मग तो भांडणाचा न कळणारा सोहळा अनुभवासा वाटे. अधूनमधून कुणी नवरा आपल्या बायकोला एखाद्या सोहळ्यासारखा बडवी. तो सोसायटीतल्या पुरुषांसाठी अवलोकनाचा भाग असे, कारण त्यांच्यासाठी ती अप्राप्य गोष्ट होती. वस्तीतल्या प्रत्येकाची दारे सताड उघडी असत. असलाच तर कुणालाही सारता येणारा पडदा काही घरांच्या दारावर लागे. वाढत्या महागाईमध्ये अल्प उत्पन्नात वस्तीतल्या बायका कशा संसार करीत असतील, हे सोसायटीतल्या बायकांना कधीही न उमजलेलं कोडं होतं. वस्ती आणि सोसायटीमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक फरक होता. आळीतले लोक आणि वस्तीतले लोक लगेचच कळायचे. पण १९९३नंतर वस्ती बदलली नसली, तरी वस्ती आणि सोसायटीतला फरक हळूहळू नष्ट व्हायला लागला. काहींच्या घरी फ्रिज आले, फिलिप्सचे डबल कॅसेट प्लेअर आले. रंगीत टीव्ही आणि केबलदेखील आल्या. आता सोसायटीतल्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातला भेद पुढे कमी होत गेला असला, तरी सांस्कृतिकदृष्ट्या मात्र वस्ती आणि सोसायटी एकाच पातळीवर आली. वस्ती आणि सोसायटीमध्ये सारखीच चॅनल पाहिली जात होती. सारख्याच टीव्ही मालिका येत होत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सारख्याच ऑडिओ कॅसेट लावल्या जात होतया. व्हिनसची टॉप टेन, टिप्सची टॉप फोर्टी विथ झंकार बिट्स, प्लस म्युझिकची नवी गाणी वस्ती किंवा सोसायटीच्याही घरात लागत होती. कुमार सानू-अल्का याज्ञिक, उदीत नारायण-अनुराधा पौडवाल, जतीन-ललित, नदीम-श्रवण यांची प्यार-इश्कची गाणी, परदेशी गाण्यांची आवृत्ती असलेली सुपरहिट गाणी यांच्या चर्चा आता दोन्ही ठिकाणी घडू शकत होत्या. नायिकांची वक्षउडवी गाणी, कुल्ल्यांवर बेचकीने फुले मारण्याच्या प्रकारांत काट्याचा भाग कुल्ल्यावर अडकला तर काय, याचा विचार न करणारे चित्रिकरण दाखविणारी गाणी लोक मोठ्या आनंदाने अनुभवत होते. 'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'हम दिल दे चुके सनम' अशी मोठ्या नावांच्या चित्रपटांना वस्ती आणि सोसायटीमधील लोक सारख्याच प्रमाणात पाहत होते. उर्मिला मार्तोंडकरच्या उघड्या मांड्या पाहून अख्या भारतीय तरुणांच्या वीर्यहननाची गणना कशाशीच करता येऊ शकत नाही. तेव्हा आळीतल्या आणि सोसायटीतील पौगंडावस्थेतील मुले टीव्हीवर दिसणाऱ्या एकाच नग्न दृश्यामुळे हस्तमैथुन करण्याची कला आत्मसात करू लागली होती.

या काळात आणखी एक सांस्कृतिक त्सुनामी आली जिच्यामुळे एकप्रकारे आळीत वावरणाऱ्या या दोन संस्कृतींमधला भेद द्रुतगतीने संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली. सुरुवातीला रेडिओ प्रोग्राममध्ये मिणमिणीचं 'दिल है छोटासा' हे गाणं ऐकू आलं. त्याचे वेगळे ऱ्हिदम आणि तिचा वरच्या पट्टीतला आवाज यांनी सोसायटी आणि वस्तीतल्या लोकांच्या कानांना पहिल्यांदाच आपण काहीतरी दैवी ऐकत असल्याचं वाटू लागलं. त्या काळात सुरू असलेल्या प्यार-इश्कच्या गाण्यांची कल्हई करणाऱ्या रोझातलं दुसरं गाणं 'रुक्मिणी-रुक्मिणी' सामूहिकरीत्या सर्वांनी लावलं असतं, तर आख्ख्या शहराला आवाज ऐकू गेला असता, इतकं वाजवलं जात होतं. सेंटीमेंटल रोमॅण्टिक लोकांसाठीही 'रोझा'मध्ये गाणं होतं. 'ये हसी वादियाँ' हे गाणं ऐकत-पाहत अनेकांनी आपल्या मनातला काश्मीर प्रवास केला म्हणे. सोसायटीतल्या लोकांनी पहिल्याच आठवड्यात थिएटरमध्ये जाऊन 'रोझा' पाहिला. वस्तीतल्या सगळ्या लोकांनी तो टॅक्स-फ्री झाल्यानंतर दोन-दोनदा पाहिला आणि त्याचा अंमल सरेपर्यंत दक्षिणेतला मोझार्ट सिनेसंगीताची एकामागून एक आक्रमणे करीत होता. पहिले 'मुकाबला', मग 'बॉम्बे', मग 'प्रियांका', 'द जंटलमॅन', 'तू ही मेरा दिल' अशा एकामागून एक दक्षिणी सिनेमांच्या आवृत्त्यांनी मुंबई आणि उत्तरेकडच्या संगीत बाजाराला आव्हान दिलं. रेहमानी आक्रमणापुढे ती जुनाट ऱ्हिदमची गाणीच लोकांनी बाद करून टाकली. दक्षिणेकडून येणाऱ्या एम. एम. करिम आणि कार्तिक राजा यांच्या गाण्यांनाही उठाव मिळाला. 'इस रात की सुबह नही'मधली 'चुप तुम रहो', 'मेरे तेरे नाम नये है' आणि 'जीवन क्या है' रेहमानचीच आहेत, अशा समजुतीतून ऐकली गेली.

हे सारं विस्तारानं सांगितलं अशासाठी की, या काळातल्या ए. आर. रेहमान इफेक्टमुळे वस्तीतले सगळेच आमिर खान फुलसुंदरीच्या घराजवळ 'क्या करे की ना करे ये कैसी मुश्किल हाय' हे रंगीलातले गाणं गुणगुणू किंवा शिटीवर वाजवू लागले होते. अर्थात फुलसुंदरीची आई मनसुंदरीसाठी. सुंदरलाल पटवा जेव्हा तिला गावातून घेऊन आला, तेव्हा फुलसुंदरी जेमतेम सात-आठ वर्षांची होती. आख्ख्या लेनिन नगरात इतकी सुंदर बाई यापूर्वी कधीही कुणी पाहिली नव्हती. त्यामुळे आता आलीच आहे, तर तिला पाहण्यासाठी आळीतले सारे बाप्ये पटवाच्या घरा-परिसरात उभे राहण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधत. कुणाच्या सायकलची चैन पटवाच्या घराजवळ निखळे आणि ती दुरुस्त करायला दहा जण तरी सायकलभोवती गर्दी करत. आयुष्यात सायकलची चैन निखळताना पहिल्यांदाच पाहिल्यासारखे सगळ्यांचे चेहरे असत. क्रिकेट खेळणाऱ्यांचा बॉल आपोआप त्या परिसरामध्ये टाकला जाई आणि तो आणून देण्यासाठी स्वयंसेवकांचा जत्था त्यामागे जाई. हे सारं सुंदरलाल पटवाला माहिती झालं, तेव्हा त्याची बायको बुरखासदृश घुंगटमध्येच चोवीस तास राहू लागली. अगदी सार्वजनिक संडासातदेखील ती घुंगटातच जाई. अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण मनसुंदरीचं घुंघटबाह्य रूप चार-पाच वर्षं कुणी पाहिलं नाही. त्यानंतर तिनं जेव्हा घुंगटाची कात टाकली, तेव्हा त्यातून अचानक आलेला जाडाभरडा-गोल चेहरा पाहण्यात कुणालाच स्वारस्य नव्हतं. एके काळी हिचं रूप पाहून आपण ए. आर. रेहमानची गाणी गायचो, यावर कुणाचाच विश्वास बसला नसता, इतका तिचा चेहरा मधल्या वर्षांत घुंगटाच्या आत बिघडून गेला होता.

तेव्हा नाल्याच्या वस्तीच्या अलीकडल्या बाजूला ए. आर. रेहमानचे सर्वसामान्य फॅन्स होते. वर्तक आळीमध्ये सच्च्या ए. आर. रेहमान भक्तांची स्पर्धा घ्यावी इतके येडझवाडे रेहमानी किडे तयार झाले होते. आमच्याकडे फिलिप्सचे डीआरएटटू एट हे डबल कॅसेट प्लेअर मॉडेल होतं आणि त्यात 'मुकाबला' आणि 'बॉम्बे'तली सर्वच नृत्यगाणी वाजायची. माझा लहान भाऊ 'हम्मा हम्मा' किंवा 'मुकाबला' ही गाणी आख्ख्या सोसायटीला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात लावायचा. तिसऱ्या माळ्यावर कुणाल ओक 'रूप सुहाना लगता है' किंवा 'सुन ले ओ जानम' त्याहून मोठ्या आवाजात लावायचा. आळीत एक वर्मा नावाचे काका होते. ते रोझामधलं 'भारत हमको जान से प्यारा है' किट आल्यागत लावत. पिनाककडे हजार वॉटचा सोनीचा टू इन वन कम डबल कॅसेट प्लेअर होता. त्यानं आपलं रेहमान प्रेम सिद्ध करण्यासाठी माटुंग्यावरून ए. आर. रेहमानच्या 'तिरूडा तिरूडा'ची तमिळ व्हर्जनच आणून लावायला सुरुवात केली. पिनाकच्या हजार वॉट्सच्या अट्टाहासानं त्याच्या शेजारचे एक जण आजारी पडले म्हणे. पण आख्ख्या आळीला 'चंद्रलेखा' या गाण्याचे तमिळ व्हर्जन डोकं फुटेस्तोवर ऐकायला मिळालं होतं. पुढे हा चित्रपट आणि ही गाणी हिंदीमध्ये डब झाली, तेव्हा आळीत कुणालाच त्या गाण्याविषयी कुतूहल राहिलं नव्हतं. त्या चित्रपटातलं 'दिल है सनम दिल' हे गाणं अनेकांच्या आवडीचं होतं. रेहमानची सगळीच गाणी तेव्हाच्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे हिंदी चित्रपटांतील पारंपरिक ठेक्याची गाणी ऐकायला तेव्हा सगळेच विसरायला लागले. सगळे लोक एकतर रेहमान ऐकत होते, नाही तर पॉप म्युझिक ऐकत होते आणि त्याच्या पुढच्या लेव्हलचे लोक एमटीव्हीमुळे माहिती झालेली इंग्रजी गाणीच एमपीथ्रीवर मिळवत होते. मी त्या लेव्हलवर फार लवकर पोहोचलो. मला शेरील क्रोचं गाणं ऐकायला-पाहायला मिळालं. त्यानंतर वर्षभर मी ते गाणे मी वेड्यासारखे ऐकत होतो. या एकट्या गाण्यामुळे मी शेरील क्रोचा भक्त झालो. पण नंतर ऐकलेलं किंवा पाहिलेलं तिचं प्रत्येक गाणं माझ्या आयुष्याचा भाग बनून गेलं. आमच्या भिंतींनाही शेरील क्रो पाठ झाली. पुढे आपल्याकडे परदेशी गाणी आणि व्हिडीओज सहज उपलब्ध झाल्यानंतर फोटो जर्नलिझम आणि इव्हेण्ट फोटोग्राफी करताना शेरील क्रोचं रांगडं रूप माझ्या डोक्यात गोंदलं गेलं. पुढे दहा वर्षं मी कित्येक पोर्टफोलिओ आणि प्रोफाईल पिक्चर्स काढली, पण शेरील क्रोच्या चेहऱ्यासारखा मादक चेहरा कुठेच सापडला नाही. एका मोठ्या पेपरात उमेदवारी, नॅशनल वाईल्ड लाईफ पिक्चर्स पुरविणाऱ्या मासिकातल्या फोटोंना पारितोषिकं, आंतरराष्ट्रीय मेन-वुमेन मासिकांसाठी फिल्म्स आणि बिझनेस सेलिब्रेटींची भरपूर फोटोग्राफी करतानाही मला शेरील क्रोसारख्या सौंदर्याचा फोटो काढायचे समाधान कधी लाभलं नाही. खरं तर, शेरील क्रोचा चेहरा प्रत्येकाला आवडेल का नाही, हे मला नाही सांगता येणार. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. त्यानुसार ज्याला-त्याला सौेदर्य वेगवेगळंच दिसतं किंवा भावतं. एखाद्याला जे सुंदर वाटेल, ते दुसऱ्याला कदाचित तसं दिसणार नाही. शेरील क्रोचा आवाज ऐकून माझ्या तयार झालेल्या सौंदर्याच्या व्याख्येत तिचा चेहरा तंतोतंत बसला असेल. किंवा माझ्या मेंदूत तयार झालेल्या सौंदर्य जाणीवा शेरील क्रोबाबत जास्तीच संवेदनशील असतील, म्हणून मी तिच्यासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याच्या शोधात कित्येक वर्षांचा उपाशी होतो. मग फुलसुंदरीला चुकून आळीत पाहिलं, तेव्हा तिथल्या तिथे तिचा फोटो काढावा अशी हुक्की मला आली होती. पण जेव्हा आळीतल्या नाक्यावर एकेका पोराकडून तिच्याविषयी आणि तिच्यापाठी चड्डीतला गुढीपाढवा घेऊन जाणाऱ्या मुलांविषयी कळले, तेव्हा तिला थेट गाठण्याची भीती वाटायला लागली. आपण देखील तिला तिच्या पाठीमागे जाणारे रोमिओ वाटू नये यासाठी तिच्यापर्यंत सभ्य म्हणून पोहोचण्याचा मार्ग मी शोधू लागलो. शेरील क्रोसारख्या दिसणाऱ्या या मुलीचा टीशर्ट-जीन्स आणि गिटारसोबत फोटो काढण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. शेरील क्रो माझ्या आयुष्यात जितकी महत्त्वाची होती, तितकंच फुलसुंदरीच्या फोटोंचं माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान निर्माण झालं होतं.

शेरील क्रो भक्ताख्यान अर्थात गरीबांचा विकीकोश

शेरील क्रोची सारी हगली-पादली माहिती तुम्हाला तिच्या विकीपिडीया पेजवरही उपलब्ध होईल. तिच्या खपलेल्या अल्बमची गलेलठ्ठ आकडेवारी तुम्हाला कळेल किंवा तिने कुणासोबत कसं गायलं हेदेखील माहिती होईल. तिच्यावरच्या लिखित प्रोफाईल्स आणि आर्टिकल्सच्या लिंक्सही तुम्हाला खोऱ्यानं मिळतील. तिची लफडी, तिचे ब्रेकअप्स, तिचा ब्रेस्ट कॅन्सर, तिचे दोन अडॉप्शन, तिच्यावरच्या रोलिंग स्टोनच्या कव्हरस्टोऱ्याही पीडीएफ स्वरूपात वाचायला मिळतील. ग्रॅमीची ३२ नॉमिनेशनं आणि ९ पारितोषिकं मिळविणाऱ्या या ललनेच्या चेहऱ्याला मनसून मुंबईतील एका उपनगरातल्या एका भागात दररोज न चुकता हस्तमैथुन करणाऱ्या मुलाची माहिती मात्र कोणत्याही ऑनलाइन ज्ञानकोशात शोधून सापडणार नाही.

इंग्रजी वाहिन्या आणि सिनेमा-मालिकांमुळे त्या काळात बॉलीवूड अभिनेत्रींइतकेच परदेशी नायिकांचे चेहरे सर्वसामान्य लोकांना माहिती व्हायचे ते दिवस होते. केबल आल्यानंतर तर दरएकाचा प्रत्येक दिवस काहीतरी नवी नावं जाणून घ्यायचा आणि नवीन पाहण्याचा होता. मॅडोना, शॅरन स्टोन, सामंथा फॉक्स, पामेला अ‍ॅण्डरसन, अँजेलिना जोली, केट विन्स्लेट ही नावे सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व वयाच्या लोकांना माहिती होतीच होती. ते जाणून घेण्यासाठी इंग्रजी आलं नाही, तरी चालून जाणारं होतं. व्हीसीआर-व्हीसीपीचा रिमोट फॉरवर्ड-बॅकवर्ड करता येणं मात्र महत्त्वाचं होतं. मॅडोनाच्या 'बॉडी ऑफ इव्हिडन्स'चा मेणबत्ती सीन एका गणपती उत्सवात नेमाडे काकांनी व्हीसीआरवर विषद करून दाखविला होता. तो सीन झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणे, सावला जनरल स्टोअरमध्ये मेणबत्त्यांचा भीषण तुटवडा झाला होता. वापर कुणी कसा केला असेल, त्याचा इव्हिडन्स मिळाला नसला, तरी बामणेकाकांची मच्छरदाणी म्हणे दुसऱ्या दिवशीच जळालेल्या अवस्थेत त्यांच्या कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला ठेवण्यात आल्याची चर्चा नेमाडेकाकांनीच सुरू केली होती.

'बेसिक इन्स्टिंक्ट'मधला शॅरन स्टोनच्या विश्वादर्शनाचा कालावधी फक्त ३१ सेकंद आहे. आज यू ट्युबवर हा अचूक कालावधी कळत असला, तरी इंग्रजीचा गंध नसलेल्या आळीतील एका काकांनी या ३१ सेकंदांसाठी भिंग घेऊन शेकडोवेळा ही फिल्म व्हिएचएसवर पाहिली होती. इतकी की शेरॉन स्टोनलाही तिच्या शरीराच्या त्या भागाची माहिती नव्हती, तेवढी या आळीतल्या काकांना झाली होती. पुढे कम्प्युटर आल्यानंतर याच काकांनी डिम्पल कपाडियाच्या एका चित्रपटामधील सिन स्टॉप करून पाहिला आणि त्यांना मिळालेले संशोधन जगभरातील लोकांनी आनंदाने बेभान होत पाहिले होते. सामंथा फॉक्स ही गायिका आणि अभिनेत्री होती हे तेव्हाही कुणाच्या गावी नव्हते. पण तिच्या अगदीच ओंगळवाण्या क्लिप्स माझ्या माहितीतल्या सर्वच लोकांकडे होत्या. पुढे टायटॅनिक आळीतल्या सर्वांनी दोनदोनदा पाहून झाल्यानंतर सगळ्यांना बेडरूममधले चित्रकार बनायची इच्छा झाली. आपापल्या बायकांना केट विन्स्लेट करून हे लिओनार्डो डी कॅपरिओ अमूर्त शैलीतील चित्र काढण्यासाठी सज्ज झाले होते. टायटॅनिकची सीडी आल्याआल्या आळीत सर्वांकडे होती. इतके टायटॅनिकप्रेम दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनला माहिती झाले असते, तर तो चक्क रडला असता. पण आळीतील लोक टायटॅनिक परत परत का पाहतात, याचे खरे कारण त्याला कळाले असते, तर त्याचा आनंदाचा अवतार वाईट झाला असता. माझ्यासाठी टायटॅनिकचे 'माय हार्ट विल गो ऑन' हे गाणं महत्त्वाचं होतं. पण शेरील क्रोच्या 'एव्हरी डे इज अ वायंडिंग रोड'इतकं नक्कीच नाही. सिलिन डियॉनने नंतर काही चांगली गाणी दिली, पण शेरील क्रोसारखी ती मास्टरपीस कधीच नव्हती. तर मुद्दा हा की या काळात विविध कारणांनी आळीतल्या प्रत्येकाचे कुणी ना कुणी परदेशी आदर्श होते. नावं माहिती होत होती. वृत्तपत्रांमधल्या चकचकीत पुरवण्यांमध्ये त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी आणि गॉसिप्स बातम्या येऊ लागल्या होत्या. ब्रिटनी स्पीअर्स, जेनिफर लोपॅझ, शकीरा, मॅण्डी मूर अशा हजारो मैल लांब असलेल्या ललनांवर मरणाऱ्या, म्हणजेच बाथरूममध्ये त्यांच्यावर मनोवीर्योत्सव करणारी पिढीच तयार झाली होती. त्या काळामध्ये मी शेरील क्रोचा सच्चा भक्त झालो होतो. म्हणजे माझा मनोवीर्योत्सवाचा विक्रमी आकडा बारा असला, तरी त्यातील तीन हे निव्वळ बाराचा विक्रमी आकडा गाठण्यासाठी केलेला आत्मप्रेमाचा नमुना होता.

वृत्तपत्रामध्ये एखाद्याावर व्यक्तिवेध किंवा अल्पचरित्र लिहिला जातो, त्या थाटात शेरील क्रोबद्दल सांगायचे झाले तर अमेरिकेच्या मिसुरी प्रांतातल्या केनेट भागात शेरील क्रोचा जन्म झाला. वडिल ट्रम्पेट प्लेअर आणि आई पिआनो वादक. लहानपणी ती खेळामध्येही चमकली होती. त्याशिवाय सौंदर्यस्पर्धेत पहिलं बक्षिसही पटकावलं होतं. मिसुरी विद्याापीठात संगीतामध्ये पदवी घेऊन तिनं घरातल्या संगीताचा वारसा पुढे नेला. मग लहान मुलांच्या शाळेत संगीत शिक्षिका बनून ती आठवड्याच्या शेवटी क्लब्समध्ये गाऊ लागली. सोबत छोट्या-छोट्या जाहिरातींसाठी गाणी तयार करायला लागली. स्थानिक संगीतकारांच्या गोटातच तिला घरात रेकॉर्डिंग स्टुडिओ असलेला एक मित्र मिळाला. तिची जाहिरातगाणी जोरदार तयार होऊ लागली. त्यात तिनं इतकं बस्तान बसविलं की मॅक्डोनल्ड रेस्तराँची आणि टोयाटो गाडीची जाहिरातच तिला गायला मिळाली. मायकेल जॅक्सनचं गारूड जगावर असताना, त्याच्या कार्यक्रमांत मागे गाणाऱ्या मुलींच्या समूहात तिची वर्णी लागली. त्यानंतर अनेक लोकप्रिय कलाकारांच्या पाठीमागे गाणाऱ्या मुलींच्या ताफ्यात ती दाखल झाली. पण तिला ताफ्यातली गायिका म्हणूनच आपली ओळख ठेवायची नव्हती. तिला आपल्याभोवती गायकांचा ताफा करायचा होता आणि तिची ती इच्छा लवकरच पूर्ण व्हायच्या मार्गावर गेली. फिल कॉलिन्ससोबत १९९२ साली तिनं एक अल्बम तयार केला. तो फसला, पण ती गप्प राहिली नाही. एका म्युझिक क्लबमध्ये ती आत्मसुखासाठी गाणी लिहिण्याचा, वाजविण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचा धडाका लावत होती. त्यातून 'ऑल आय वॉना डू' आणि 'लिव्हिंग लास वेगास' तयार झाली. मग 'स्ट्राँग इनफ' आणि 'काण्ट क्राय एनिमोअर' आली. त्यासाठी तिला तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले. मग लोकप्रियेतेचं शिखरही तिनं केव्हाच मागे टाकलं. अमेरिकी समाजकारण आणि राजकारण कोळून प्यायलेल्या शेरील क्रोनं तिचं सर्वोत्तम गाणं 'एव्हरी डे इज अ वायंडिंग रोड' ग्रॅमीनंतरच्या लोकप्रियतेच्या काळात बनविलं. तेव्हा आपल्याकडे एमटीव्ही नुकताच लागला होता आणि ते अचाट गाणं पाहून माझा शेरील क्रोवर जीव जडला होता. गाण्याचं पिक्चरायझेशन मला जास्त भावलं होतं, शेरील क्रोचा मोकळा वावर आणि गाण्यातली गिटार डोक्यातून निघतच नव्हती. तेव्हा हे गाणे लागावं म्हणून झाडून एमटीव्हीसमोर कित्येक तासांचं ठाण मांडून बसणं व्हायचं. मिक जॅगरपासून सिक्स पेन्स नन द रिचर बँडची गाणी कळली, ती शेरील क्रोच्या गाण्याची वाट पाहण्यातून. तेव्हा तातडीनं इंग्रजी अल्बम्सच्या कॅसेट मिळत नसत. मला एमपीथ्री मिळाली तीही तिला ऐकल्या-पाहिल्यानंतर भरपूर दिवसांनी. आपल्याकडे डेकस्टॉप असणं घरा-घरात कॉमन झालं तेव्हा. शेरील क्रो तेव्हा एमटीव्ही, एफएमवर हिट झाली होती आणि तिची गाणी एकामागून एक येतच होती. 'ऑल आय वॉना डू' हे गाणं एमटीव्ही क्लासिक्सवर भरपूर वेळा लागायचे. 'सोकअप द सन' या गाण्यात तिचा मादक अवतार पाहून माझी वाईट अवस्था होई. नंतर माझ्याकडच्या वॉकमनवर ऐकायला तिच्या साऱ्या कॅसेट्स मिळवल्या. सीडी एकत्रित केल्या. नंतर आलेल्या आयपॉडवर मी शेरील क्रो तासन्‌तास ऐकली. पण माझं पूर्ण समाधान कधीच झालं नाही, इतकी शेरील क्रो माझ्यासाठी नशेसारखी बनली. तिच्या गाण्यातला अर्थ लागायला लागला तेव्हा तर ती फारच मोठी कलाकार वाटायला लागली. तिच्या प्रत्येक गाण्याला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत. इंटरनेटमुळे जग सर्वच पातळीवर समान येण्याच्या काळात तिची गाणी किती द्रष्टी आहेत ते पाहायला मिळाली. खास करून गॅसोलिन, डिटोरस.

तिची सगळी गाणी मी ऐकलेली असली, तरी सुरुवातीपासून इथे सारखे उल्लेख होणाऱ्या 'एव्हरी डे इज अ वायंडिंग रोड'बाबत मला खूप काही सांगावंसं वाटतं. खळी दाखवणारी ही शेरील क्रो या गाण्यात खरेच दैवी सौंदर्य घेऊन आली आहे. तुम्हाला तिची गालफडं आत गेल्यासारखी वाटत असली तरी तसं नाही. तिच्या ओठांजवळ एक बारीक चामखीळ आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यातील मादकतेला आणखी धार चढते. तिच्या मुलाखती आणि तिच्या गाण्यांचे व्हिडिओ दिवसाची चांगली सुरुवात करण्याचं उत्तम साधन आहे माझ्यासाठी. दररोज सकाळी उठावं आणि शौच-अंघोळीच्या क्रियेनंतर शेरील क्रोच्या गाण्यांचं दर्शन घ्यावं. गाणं अर्थातच 'एव्हरी डे इज अ वायंडिंग रोड'.

तर या गाण्याला १९९६ सालाचं ग्रॅमीचं 'रेकॉर्ड ऑफ द इयर' नॉमिनेशन मिळालं होतं. ते गाणं अनेक चित्रपटांमध्येही वापरलं गेलं. त्या वर्षी सर्वाधिक चर्चेतलं आणि ऐकण्यातलं गाणं शेरील क्रोचं होतं पण त्यावर्षी शॉन कॉलव्हिन या गायिकेच्या 'सनी केम होम' या गाण्याला पारितोषिक मिळालं. 'सनी केम होम' हे गाणं चांगलं असलं, तरी कुठल्याही अर्थानं 'एव्हरीडे'शी तुलनाही करता न येण्यासारखं आहे. शॉन कॉलविन आज लोकांच्या लक्षातही नाही. पण शेरील क्रो आजही मुख्य धारेतली गायिका आहे.

वैयक्तिक आयुष्यात ओवेन विल्सन या हॉलीवूडच्या दुसऱ्या धारेतील अभिनेत्यासोबतचे अफेअर. सायकलस्वार लान्स आर्मस्ट्राँग प्रसिद्धीच्या झोतात असताना त्याच्याशी लग्न करण्याचे जाहीर करून ते न करताच काडीमोड. ब्रेस्ट कॅन्सरशी युद्ध जिंकल्यानंतर दोन दत्तक मुलांचं संगोपन करत तिनं ब्रेन ट्युमरशी लढा दिला. एकूणच अमेरिकीच काय तर जगातल्या कोणत्याच पॉपस्टारने पाहिले नसतील इतके चढ-उतार या गायिकेनं पाहिले आहेत आणि त्यातून सावरत तिनं तिचं ठेवणीतलं खास संगीत कायम राखलं आहे.

शेरील क्रोनं माझे जीवन समृद्ध केले. तिच्या गाण्यांनी माझ्या अंगात रक्तपुरवठा सुरळीत असल्याचं जाणवतं. तिचा चेहरा पाहिला की माझ्यातल्या पुरुषत्वाची जाणीव तीव्र होते. हजारो मैल लांब असलेल्या शेरील क्रोच्या गाण्याचे जगभरात लाखो फॅन्स असतील. पण तिच्यावर कित्येक वर्षं अखंड प्रेम करणारा मी तिचा भक्त आहे. फुलसुंदरी जर लेनिन नगराऐवजी आमच्या सोसायटीतल्या घरात राहत असती, तर तिला शेरील क्रोसारख्या वेशात फोटो काढण्यासाठी स्पष्ट विचारता आलं असतं. पण तिच्या मागे लागलेल्या पोरांना त्यांच्या स्पर्धेत एकाची भर पडल्याची जाणीव मला द्याायची नव्हती. एकदा तिला वाटेत थेट अडवलेल्या पोराला चपलेने मारताना मी फुलसुंदरीच्या तोंडात आंड-गांड-झाट शब्दांनी परिपूर्ण शिव्या ऐकल्यामुळे तिच्याशी थेट जाऊन बोलणं मला थोडं अवघड वाटायला लागलं होतं. फुलसुंदरीला अगदी डिट्टो शेरील क्रोसारखे सजवून तिच्या पोट्रेड्सची एक फोटोमालिका काढायचा माझा विचार होता. त्यासाठी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मूर्खपणा मी केला. सबा चौधरी या माझ्यासोबत फोटोजर्नलिझमच्या वर्गात असणाऱ्या मुलीला मी मध्यस्थ करायचं ठरविलं. आमचं असं ठरलं होतं की, फुलसुंदरीला तिनं गाठून मला काय हवं ते सांगायचं. तिचे शेरील क्रोच्या अवतारात फोटोग्राफ्स काढून झाले की योग्य ते मानधन द्यायचं. सबा यामध्ये तिला गाठून मोठ्या मॉडलिंगसाठी फोटोग्राफ काढत असल्याचे तिच्या आई-वडिलांना पटवून देणार होती. पण सबाने तिच्या छायाचित्र-पत्रकारितेला जागत माझ्या साऱ्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. वर स्वत:चेच मनसुबे पुढे आणले. पण ते सांगण्याआधी सबाविषयी जाणून घेणे महत्त्वाचं आहे.

शाब्बास सबा अर्थात डॅशिंग फोटोग्राफर

संपूर्ण फोटोजर्नलिझमच्या एक वर्षाच्या कालावधीत सबा ही माझी एकुलती एक चांगली मैत्रिण होती. पण सबाला चांगले मित्र, तसेच बॉयफ्रेण्ड चिक्कार होते. एकाच कालावधीत तिचे दोन-तीन बॉयफ्रेण्डही असत. सबा त्या प्रत्येक बॉयफ्रेण्डला असा पिळून काढी की बिचारा ठार वेडा होण्याआधी तिच्यापासून लांब पळून जाई. मी मात्र तिचा मित्रच होतो. तिला 'एव्हरीडे इज अ वायंडिंग रोड' हे गाणं माहिती होतं, हा एकच गुण माझ्या दृष्टीनं तिच्याशी मैत्रीसाठी महत्त्वाचा होता. बाकी मादक असली तरी तिच्यात गुणांहून अधिक अवगुणच भरपूर होते. लाडाकोडात वाढलेली श्रीमंत बापाची आणि महागड्या कॅमेरात वाटेल तितक्या महागड्या लेन्स सहज वापरणारी सबा बरीच विचित्र होती. एकतर तिचा अवतार प्रचंड मॉड असायचा. वर स्कर्ट, टीशर्ट, स्लीव्ह्ज, टाइट जीन्स घालून सार्वजनिक ठिकाणी कशी उठबस करू नये, याचे प्रात्याक्षिक ती जगाला करून दाखवे.

जर्नलिझमच्या त्या वर्षात बाथरूमच्या भिंती सबाविषयी घाणेरड्या मजकुराने रंगलेल्या होत्या. 'सबा को दबा' हे त्यांतलं लक्षात राहिलेलं. सबा दिसायला धिप्पाड-देखणी होती. तिच्या अंगात सदैव उत्साहाचा संचार असे. सगळ्या इव्हेण्ट्समध्ये पुढे असल्यानं सर्व शिक्षकांच्या कौतुकात 'शाब्बास सबा' हे वाक्य हमखास असे. सबाच्या पाठी लागणाऱ्या कित्येक मुलांना ती सरळ होच सांगून टाके. 'कशाला कुणाला दुखवा.' या अ‍ॅटिट्यूडमुळे विद्याापीठापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत चालताना तिच्याभोवती मुंगळ्यांची रांग असे. त्यातले अनेक मुंगळे तिच्याकडून न मिळणाऱ्या पुरेशा प्रेमानं हताश-निराश होऊन तिला बदनाम करायचा विडा उचलत. काही जणांनी रेल्वेच्या डब्यात, सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये सबाचा फोन नंबर लिहून 'मोफत शॉट के लिए तुरंत कॉल करे' हे भीषण लिहून ठेवलं होतं. सबाला आपला फोन बंद करावा लागला इतके घाण फोन काही दिवस येत होते. मोबाईल आगमनाच्या काळातही सबाचे बॉयफ्रेण्ड बरेच होते. जर्नलिझमनंतर फोटोग्राफीचा उपयोग तिनं फक्त चार-दोन वृत्तपत्रांमध्ये फ्रीलान्सिंगसाठी केला. या वृत्तपत्रांच्या संपादकांपासून बातमीदार-उपसंपादकांना तिनं घुमव-घुमव घुमवलं. साध्या इव्हेण्ट्स आणि सणांचे फोटोग्राफदेखील ती कारण नसताना कधी ५० एमएम आणि कधी १०० एमएमनं शूट करी. अत्यंत बेफिकरी आणि बिनधास्त असलेली सबा बोलायलाही डॅशिंगच होती. मला तिचं मोकळे बोलणे एका विशिष्ट काळापर्यंत आवडायचं. पण नंतर ती रंगात आली, तर काहीही बोलून ऑकवर्ड परिस्थिती तयार करण्यात पटाईत होती. लोकल ट्रेनच्या डब्यात एकदा ती माझ्यासोबत डब्यात चढली. सोबत दोन मुंगळे होतेच. तर तिकडे तिनं मोठ्या आवाजात त्या मुलांच्या हस्तमैथुनाचं शेड्यूल आणि मनात काय पाहत हस्तमैथुन करता, याविषयी चर्चा घडविली. सगळा डबा ती चर्चा ऐकताना कान सुपायेवढे करण्याचा प्रयत्न करत होता.

तिनं गंभीरपणे फोटोग्राफीला जास्त वेळ द्यावा, असं अनेकदा सांगून पाहिलं. पण ती पक्की बॉयफ्रेण्ड अ‍ॅडिक्ट झाली होती. प्रत्येकाला थोडा-थोडा वेळ देणे, एकासोबत दुसऱ्यानं पाहिल्यानंतर निर्माण होणारा वाद सोडवत तिसऱ्याला वेळ देणं, यात तिचं फोटोग्राफीचं काम नीट घडत नव्हतं. म्हणजे पेपरांत ऑफ-बीट फोटो काढून देण्यात ती रमली. त्या फोटोंतून मिळणाऱ्या पैशांव्यतिरिक्त त्या फोटोखाली येणाऱ्या बायलाइन्समध्ये तिला रस होता. मला पहिल्या काही वर्षांतच पेपरांना फोटो द्याायचा प्रचंड कंटाळा आला. दहा फोटो पाठवा, पन्नास फोन करा त्यानंतर उपसंपादक मेहरबान असला, तर त्या फोटोला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असलेल्या मोकळ्या पानात जागा मिळणार. म्हणजे दोनशे फोटो महिन्याला पाठविले, तर जेमतेम दहा-पंधरा लागणार आणि त्याचे एकत्रित तुटपुंजे व्हाऊचर कित्येक महिन्यांनी येणार. फोटो कितीही चांगला काढला असला, तरी उपसंपादक आणि आर्टिस्टच्या वकुबानुसार तो पानात लागणार.

सबा फोटोजर्नलिझमबाबत फारच सिरीयस होती, पूर्वीपासून. पण फोटोजर्नलिझमसोबत इतरही ठिकाणी कामं केली, तर अनुभव वाढतो यावर तिचा विश्वाास नाही. मुळात तिला बॉयफ्रेण्ड्सना द्याायला पुरेसा वेळ उरत नसल्यामुळे तिच्याकडून फोटोग्राफीत फार काही होण्याची मला शक्यता वाटत नव्हती. या शेरील क्रोसारख्या तंतोतंत दिसणाऱ्या मुलीचा फोटो काढणं हे माझं जसं पॅशन होतं, तसं तिला कोणत्याही पॅशननं ग्रस्त झाल्याचं मी आजवर पाहिलेलं नाही. तिला आधी फुलसुंदरीबद्दल सांगितले तेव्हा तिने माझी बरीच खिल्ली उडविली. पण नंतर तिला आळीत आणून लांबून फुलसुंदरी दाखविली तेव्हा ती हरखूनच गेली एकदम.

'आयला केदार, ये तो फुल टू शेरील क्रो है. शादी कर इससे. सारी लेन्सही घुसा दे फिर इसपर. अब कितने साल हिलाएगा?'

'तुला काय सांगितले आहे ते कर. हिला फक्त फोटो काढायसाठी पटवायचं आहे. लग्नाबिग्नासाठी नाही. तिला मॅगझिनसाठी फोटो काढतोय असं तुला सांगायचंय,'

'मॅगझिन कोणतं? प्लेबॉय?' मला ऑकवर्ड करण्याची हुक्की सबाला आली होती.

'नंगा नही करना है. कपडेमे फोटो खिंचना है. कोणतं तरी वुमन मॅगझिन सांग. रद्दीच्या दुकानात ढिगांनी लटकलेली असतात. सॅव्ही-बिव्ही.'

'और नही बोली तो फोटो निकालने को?'

'मग तुला कशाला आणलं आहे? तुझी कन्व्हिन्सिंग पॉवर माहिती आहे मला.'

'मेरे को चढा रहा है क्या?'

'नही. टूट जाएगा.'

'क्या?'

'जोक क्या तू ही मार सकती है क्या?

'ओके. हरकत नाय. पण तुझं शेरील क्रो प्रेम इतकी वर्षं कसं टिकून राहिलं? आता एमटीव्हीवर गाणीही नसतात चोवीस तास. शेरील क्रो त्यावर किंवा कुठेही फारशी दिसतही नाही पूर्वीइतकी. या फुलसुंदरीला शेरील क्रोसारखी शूट करून तुला काय मिळणार पण?'

'मला काय मिळणार ते महत्त्वाचं नाही. ती शेरील क्रोसारखी दिसते का नाय? मग तिला जीन्स आणि टीशर्टमघ्ये फोटोसाठी तयार करायचं काम तुझं. शेरील क्रो नाही, तर तिच्यासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा फोटो काढल्यानंतरच मला या फिल्डमध्ये असल्याचे समाधान मिळेल. मै ये मेरे सुकूनके लिए कर रहा हूं.'

भरपूर हसून आणि माझी खिल्ली उडवून तिनं हे मिशन स्वीकारलं. तेव्हा माझ्याही तोंडी कॉलेजकाळातले शिक्षकांच्या तोंडी कायम असणारं 'शाब्बास सबा' आलं. पण हे सारं तडीस नेताना सोसायटी किंवा लेनिन नगरमधली पोरं सबापासून सुरक्षित राहिली तर बरं, असाही एक विचार माझ्या डोक्यात होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी सबानं फुलसुंदरीला गाठलं. एव्हरेस्ट सोसायटीमधून बाहेर पडून मिस्टर बामणेंकडे कामाला जाण्याच्या मधल्या प्रवासात दोघी खिदळत जाताना दिसल्या. त्यानंतर पार्काजवळच्या बाकड्यावर सबाशी गप्पा मारताना फुलसुंदरी गंभीर झाल्यासारखी दिसत होती.

'उस का एक प्रॉब्लम उस ने मुझे बताया है. उस से पहले निपटना पडेगा.' सबा लेनिन नगरच्या मुलीला पहिल्यांदाच भेटून भलतीच समाजसेविका झाली होती.

'तुला इथे तिचा प्रॉब्लम सोडवायचाय का माझा? तुला पहिल्याच भेटीत प्रॉब्लम सांगितला तिनं?'

'वो तू नही समझेगा, लेकिन वो फोटो निकालने देगी. सिर्फ एक प्रॉब्लम है. तुझे बाद मे बताऊंगी. मुझे असायनमेंट है.'

'क्या प्रॉब्लम है?'

'बाद मे. वो प्रॉब्लम सॉल्व्ह करने के बाद ही अच्छे फोटो मिलेंगे.'

'लेकिन कब?'

'जल्दीही. और हां. शेरील क्रो कौन है उसे पता भी नही.'

त्यानंतर तब्बल चार दिवस रोज सकाळी सबा फुलसुंदरीला गाठू लागली. पार्कवर तिच्या अर्धा तास तरी गप्पा सुरू असत. त्यातला कोणताही तपशील सुरुवातीला तिनं मला दिला नाही, तेव्हा मला सबाचा प्रचंड राग आला. सबा माझं काम जराही करत नव्हती. वर फुलसुंदरीला कसली मदत करत आहे, ते मला सांगत नव्हती. फुलसुंदरीचा प्रॉब्लेम काय आहे ते मला कळू देत नव्हती. झक मारली आणि यात सबाला आणली अशी माझी अवस्था झाली. तब्बल आठवड्यानंतर सबा मला भेटली आणि तिने विस्तारामध्ये मला फुलसुंदरीची अडचण विशद केली. जी सोसायटीतल्या कोणत्याही घरासाठी अडचण ठरू शकली नसती. पण लेनिन नगरातील घरात दहावीही न झालेल्या फुलसुंदरीच्याबाबतीत तिची व्याप्ती मोठी असू शकत होती.

सबाशी ओळख झाल्यानंतर सुरुवातीलाच सबानं काय उंची उंची फेकून तिला विश्वासात घेतलं हे माहिती नाही. पण फुलसुंदरीविषयी मला माहिती नसलेला बराच माहितीऐवज मला सबानं पुरविला. अगदी आळीतल्या तिच्या पाठीमागे लागलेल्या एकूणेक मुलांपासून ते म्हाताऱ्यांचे चाळे, घराघरांमधल्या नमुनेदार बायका आणि त्यांचे चेकाळलेले नवरे, घरकाम करावं लागण्यातील अडचण आणि या सगळ्याला सोडून कुठेतरी दूर पळून जाण्याची इच्छा. पण त्याहूनही सबाच्या हाती फुलसुंदरीविषयीचे स्कूपच हाती लागले होते. सबाने काढलेली सर्वोत्तम बातमी म्हणजे लेनिन नगरातल्या एका किराणा दुकानाचा मालक बाबूराम साबूराम काणा याचा मुलगा राहुल याच्यासोबत तीन-चार वर्षांपूर्वीपासून म्हणे तिचे अफेअर होते, ती.

या अफेअरची गंधवार्ता आख्ख्या लेनिन नगरात किंवा आख्ख्या आ़ळीत कुणालाच नव्हती. आता तिचा गंध पसरायचीही शक्यता नव्हती. कारण राहुलला बाबू काणानं आपल्या दुबईच्या नातेवाईकाकडे पाठवून दिलं होतं. त्यानंतरही या प्रेमात बाधा आली नव्हती. राहुलनं जाण्यापूर्वी नोकियाचा हॅण्डसेट त्यात एमटीएनएलचं ट्रम्पकार्ड फुलसुंदरीला टाकून दिलं होतं. तो दररोज दुबईवरून तिला फोन करी आणि अंगावर येऊ पाहणाऱ्या जगाला लाथाडत फुलसुंदरी फॉरेनमध्ये असलेल्या प्रियकराची आराधना करी. आजूबाजूच्या पोरांच्या भूगोलाच्या पुस्तकात असलेल्या नकाशात दुबई कुठे आहे हे जाणून घेई. 'आजा रे परदेसी...' , 'साजन मेरा उस पार है' ही गाणी विविध भारतीवर किंवा टीव्हीवरच्या जुन्या गाण्यांच्या चॅनल्सवर लागली की व्याकूळ होई.

राहुल तिकडे तो काय काम करतो, हे कुणालाच माहिती नसले, तरी दहशतवादी संघटनेशी तो बांधला गेला असण्याची शक्यता नव्हती. तिकडे एका टेलरकडे सूट शिवण्यात तो उमेदवारी करीत होता. फुलसुंदरीशी तो दिवसातून एकदातरी फोनवर बोलत होता. दुबईमधल्या प्रचंड इमारती, श्रीमंती गाड्या, खाण्यातला थाट, चिकन-मटन, आईस्क्रीम आणि सुक्या मेव्याची चंगळ असे बरेच काही तिला ऐकायला मिळे. पहिली दोनेक वर्षं त्या हरखून जाणाऱ्या गोष्टींच्या संवादात गेली. मग तिचा आवाज ऐकायसाठी आणि तिच्याकडून 'आय लभ यू' ऐकून घेण्यासाठी तो पागलसारखा रात्री फोन करीत राही. ती त्याला दिवसभरात आळीत आणि लेनिन नगरात काय घडलं, त्याचा तपशील देई. मागे लागलेल्या मुलांपैकी एकाचा तरी किस्सा ती कातावून जाऊन सांगी. त्यावर 'उसकी माँ का लवडा' ही अशक्य कोटीतील शिवी राहुल देई. त्यावर फुलसुंदरी खिदळे. 'जाएगी नही ना मुझको छोडके?' या प्रश्नानं तो फुलसुंदरीला सतावून सोडे. रडायला लागे. मग त्याला शांत करण्यासाठी फुलसुंदरीला बाबापुता करावा लागे. तो सांगेल ते स्त्री-पुरुष शरीरविषयक ज्ञान ऐकून घ्यावे लागे. त्याने दुबईमध्ये पाहिलेल्या पॉर्न सिनेमांतल्या गोष्टी 'छी... गंदे' म्हणत कानात भरून घ्याव्या लागत.

फोनवरून त्यांचं सारंच सुरळीत चाललं होतं. राहुल भारतात परतत नव्हता आणि फुलसुंदरीसमोर फोनवरून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत होता. फोनवरून पप्प्या वगैरे ठीक होते. पण व्हिडीओ चॅटिंगची नवी मागणी तो अलिकडे करू लागला होता. त्याच्या अवतीभवती सगळे आपल्या बायका आणि मैत्रिणींशी कम्प्यूटरवरच्या स्क्रीनवर कॅमेऱ्यानी बोलतात हे तो सारखासारखा फुलसुंदरीला सांगे. नुसत्या फोनवर भागत नाही म्हणून फुलसुंदरीला तो व्हिडीओ चॅटिंग करण्यासाठी आग्रह धरीत होता. संपूर्ण अभ्यासात अडाणी असलेल्या फुलसुंदरीला कॉम्प्यूटर ज्ञान कुठून येणार? सायबर कॅफे सुरू होऊन कैक वर्षे झाली असली, तरी तिला त्यासाठी तिथे कोण नेणार हा प्रश्नच होता.

सायबर कॅफेमध्ये जाऊन व्हिडीओ चॅटिंगचा प्रकार करण्यासाठी तो तिच्या पाठीच लागला होता. पण फुलसुंदरीला याबाबत कुणाची मदत घ्यावी हा प्रश्न पडला होता. आळीत नक्षी नेमाडे किंवा डॉली गाला सायबर कॅफे सुरू झाल्यापासून तिथल्या हक्काच्या ग्राहक होत्या. नंतर त्यांच्या घरात दणकून स्पीड असलेले इंटरनेट असलं, तरी त्यांची सायबर कॅफेची सवय सुटली नव्हती. पण नक्षी किंवा डॉलीसमोर ती राहुल नावाच्या मुलासोबतचे आपले प्रेमसंबंध जाहीर करू शकत नव्हती. इतरही कुणी मदतीला नसण्याच्या अवस्थेत सबाचं अत्यंत योग्य वेळी आयुष्यात येणं फुलसुंदरीला भावलं होतं. शिवाय ती आळीमध्ये राहणारी नसल्यानं तिच्यासमोर फुलसुंदरीला व्यक्त होणंही अवघड गेले नाही.

सबा तिला सायबर कॅफेमध्ये घेऊन गेली. तिथे बंदिस्त केबिनमध्ये एकट्या फुलसुंंदरीला समोर आलेल्या राहुलशी व्हिडीओ चॅटिंग जमलं नाही. ती खूप घाबरली. मग तिला दिलासा देत, सबानं तिला आपल्या घरातल्या पीसीवर बसायसाठी नेलं. तीनेक वर्षं एकमेकांना न पाहिलेले राहुल आणि फुलसुंदरी स्क्रीनवरून एकमेकांना पाहून भरपूर रडले. त्यांचा रोमान्स बंद दाराआड बराच जमला असावा. कारण फुलसुंदरीला कॅमेऱ्यातून पाहून राहुल दुबईतनं भारतात परतायला निघाला होता. कम्प्यूटरमधूनच तो येतोय की काय या भीतीनं फुलसुंदरी जोरात किंचाळली. मग तिनं त्याला हवं ते एकदाचं दाखवत समजूत घालून बापाच्या परवानगीशिवाय तिकडून लगेच न परतण्याची आणि सगळ्यात वेगळी गिफ्ट पाठविण्याची विनंती केली. राहुल बाबूराम काणा मग आठवड्यात कधीतरी फुलसुंदरीशी संध्याकाळी किंवा रात्री सबाच्या घरामध्ये बोलू लागला. यामध्ये कॉम्प्यूटरबाबतची फुलसुंदरीची भीड चेपली. सबा आणि फुलसुंदरी चांगल्या मैत्रिणी झाल्या. फक्त ज्या गोष्टीसाठी मी सबाला फुलसुंदरीपर्यंत आणलं ती मागे पडायला लागली.

राहुल काणाची दर्यादिली अर्थात अजब प्रेमकहाणी

फुलसुंदरीचे फोटो काढण्याच्या माझ्या इच्छेचं तीव्र प्रकरण राहुल काणा नावाच्या, मी फारशा न पाहिलेल्या व्यक्तीविषयी मला नको इतक्या गरजेची माहिती करून देईल असं मला वाटलं नव्हतं. पण नेमकं फुलसुंदरी-सबानं दुबईमध्ये राहुल काणाशी चॅट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी कैलास कबुतरवाल्याला मी गाठला. त्याच्याकडून मला राहुल काणाची आणखी माहिती मिळाली. पण पुढे सबानंही फुलसुंदरीकडून तिच्या प्रेमप्रकरणाविषयी कुतूहलातून बरंच काढून घेतलं होतं. तेही मला समजलं.

परदेशात राहणारे नवरे देशात राहणाऱ्या आपल्या बायकांना अत्यंत हाय क्वालिटीचे वेबकॅम गप्पा मारण्यासाठी का देतात, याची नवी माहिती मला यातून झाली. पुढे राहुल काणानं आपण किती सच्चे आणि वेगळे प्रेमी आहोत, हे दाखविण्यासाठी दुबईहून एक भेट फुलसुंदरीला पाठवली. ती भलीमोठी भेट स्वीकारण्याचं निस्तरताना सबा आणि मी तिच्या घरापर्यंत पोहोचलो. पुढे फोटोशूटच्या मुहूर्ताला वेगळंच वळण लागलं.

बाबूराम साबुराम काणाचं दुकान म्हणजे लेनिन नगरचे मॉल आणि सुपरमार्केट असं दोन्ही होतं. डाळ-तांदळापासून जोकर गमच्या बाटलीपर्यंत आणि परकराला बांधायच्या नाडीपासून ते कपडे वाळत घालायच्या चिमट्यांपर्यंत सगळं त्याच्याकडे होतं. आंतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड, चणे-फुटाणे, वेफर्स, आईस्क्रीम, पेप्सीकोला आणि बॉबिनपर्यंत सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे मिळत. अन् जी न मिळणारी वस्तू त्याला सांगितली की संध्याकाळी नक्कीच आणून द्यायचे काम तो करी.

आपलं कारटं दहावीला चांगले मार्क मिळवून पास झालं, तेव्हा त्याला कॉलेजमध्ये घालून शिक्षणात पैसे वाया घालवायचे नाहीत, हे त्यानं ठरवलं होतं. बाबूरामचा लांबचा भाऊ भोलाराम दुबईमध्ये एका टेलरकडे कामाला होता. तिकडे भारतीय पैशांत मोठ्या रक्कमेचा पगार घेणाऱ्या भोलारामबद्दल बाबूरामला कायम असूया वाटे. त्यामुळे जेव्हा कधी भाऊ फोन करी, तेव्हा आपल्या मुलाला तिकडे काम पाहण्याचं टुमणं तो लावी. दहावी झाल्यावर एक वर्ष दुकानात मदतनीस आणि एक वर्ष टेलरिंगचा कोर्स या दरम्यान राहुलची एक्स्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी फुलसुंदरीला पटवण्याची होती. फुलसुंदरीला नववीत असताना पटवणं कठीण होतं. पण एक वर्ष दुकानात काम करताना संध्याकाळी पुड्या बांधण्याचं काम करत असताना रोज फुलसुंदरी दुकानात काही ना काही घ्यायला येई. तेव्हा पाकिस्तानी हिंदी गाण्यांनी उच्छाद मांडला होता. दर महिन्याला एक सुफी गाणं हिट होत होतं. आमिर खानच्या 'फना' या फिल्मचे 'चांद सिफारिश जो करता तुम्हारी' हे गाणं जिथे तिथे ऐकू येई. राहुलने केस फनातल्या आमिर खानसारखे केले होते, पण तो वागायचा मात्र शाहरूख खानच्या ओव्हरअ‍ॅक्टिंग सारखा. फुलसुंदरी येताच 'चांद सिफारिश'मधली शिटी तो हुबेहूब वाजवायला सुरू करायचा आणि फुलसुंदरी खोकत खोकत 'पाव किलो साबुदाना' मागायची. साबुदाण्याचे वजन पावकिलोहून अधिक भरायचं तरी राहुल पुन्हा वजनातले मूठ-दोन मूठ साबुदाणे पुन्हा काढायचा नाही. त्या 'चांद सिफारिश'मधली 'वल्ले...... वल्ले' करत त्याची डोलकाठी होऊन जाई. फुलसुंदरी पन्नासच्या दिलेल्या नोटीची मोड घेण्यासाठी ताटकळत उभी राही पण राहुल काणाची डोलकाठी थांबायलाच तयार नसे. आता हा पूर्ण गाणं गातोय की काय या भीतीनं मग फुलसुंदरी त्याला जमिनीवर आणायची.

'पचास की नोट दी थी मैने. बाकी का पैसा?' फुलसुंदरीच्या या प्रश्नावर राहुलचा गल्ल्यामध्ये हात जाई आणि मिळेल ती नोेट बाहेर येई. पन्नासाच्या नोटेच्या मोडमध्ये शंभर आणि दहाच्या नोटाही बाहेर येत. मग फुलसुंदरी राहुलला चंद्रावरून पृथ्वीवर आणून सोडी. 'चांद सिफारिश'ची शिटी वाजवत ती मग हसून घरी जाई.

राहुल काणाला वाटेल तेव्हा बापाचा मार मिळे. घोडा झाला असला तरी हिशेब चुकण्यावरून, गाणी आणि शिटी म्हणण्यावरून. दहावी झाल्यानंतर टेलरिंगचा कोर्स दिला म्हणजे केंब्रिज, हार्वर्डला शिकवायला पाठवल्याच्या थाटात बाबूराम काणा त्याची जाणीव राहुलला करून देई. दोन वेळच्या जेवणाचे, नाश्त्याचे आणि एकवेळच्या चहाचे देखील हिशेब बाबूराम रोज काढून त्याला त्रस्त करी. हगण्याच्या वेळेतदेखील माणसाने हिशेब करावा आणि धंदा कसा वाढवावा याचं ज्ञान बाबूराम आपल्या मुलाला देई. पण मुलाला केबल टीव्हीवर वाढत चाललेल्या वाहिन्यांमध्ये रस जास्त होता. टीव्हीवरच्या अ‍ॅड पाहूनदेखील त्याच्या चड्डीची अवस्था वाईट होऊन जाई.

त्या काळात टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये प्रचंड बोल्डनेस आला होता. आजच्या तुलनेत तो काहीही नसला तरी त्याला दहा वर्षं आधीच जुही चावलानं सुरुवात करून दिली होती. म्हणजे लिरिल आणि नव्यानं आलेल्या फा नावाच्या साबणांच्या जाहिरातींमध्ये, फेस अंगावर दाखवत बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या ललना होत्या. तरी लक्सनं केलेल्या माधुरी दीक्षित आणि जुही चावलाच्या अ‍ॅड अतिमादक होत्या. नाइटड्रेस उतरवून पाठीचा अर्धा भाग उघडा दाखवणाऱ्या जुही चावलाची अ‍ॅड पाहिलेल्या लोकांना मी काय म्हणतोय, ते लक्षात येईल. त्या गोऱ्या-नाजुक पाठीकडे पाहून आबालवृद्धांची जी काही भीषण अवस्था होई, त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढच्या फालतू जाहिराती कामी येत नसत. म्हणजे एकदा तुमच्या डोक्यात ते पाठ उघडी करतानाचं दृश्य गेलं, की ते तुमचा पिच्छाच सोडत नसे. पुढे बाथटबमधला फेस आणि इकडे पाहणाऱ्याला येणारा फेस यांचे एकदम छान जुळून जाई. त्या जाहिरातींवर झोड उठली नाही की तिच्या मादकतेवर बायकांनी आक्षेप घेतले नाही. पण त्या काळात जुही चावलाची पाठ ही समस्त पुरुषांच्या डोळ्यांचे अंजन बनून गेली होती. उघड्या पाठीचे दोन्ही मोकळे खांदे आणि पाठीवरचे कर्व्ह यांमुळे प्रत्येक पुरुष आपल्याला हव्या त्या मोडमध्ये तिला पाहत राही. तिचं बाथटबमधलं फेसाळलेलं रूप प्रत्येकाला आवडूनच जाई. इथे राहुल काणाला त्या जाहिरातीनं झपाटून टाकलं. तेव्हापासून लाईफबॉय प्लस हा साबण वापरायचा सोडून तो लक्स वापरायला लागला. पण त्याहूनही अधिक जुही चावलाची लक्सची अ‍ॅड पाहिल्यानंतर दिवसातल्या कोणत्याही वेळेत त्याला टमरेल घेऊन सार्वजनिक संडास गाठण्याची इच्छा होई. पुढे त्याचं संडासला जाणं वाढायला लागल्याचं बाबूराम काणाच्या नजरेतून सुटलं नाही.

'बार बार हगने लगती है या और कुुछ होता है?'

'हगने के वक्त को भी मै सोचता रेहता हू, धंदा कैसे बढाया जाय.'

'मादरचोद,जबान मत लढा. संडास मे कॅमेरा लगवाऊंगा क्या करता है देखने के लिए.'

'फिर क्या अभी इधर ही हाग दू?'

एका विशिष्ट दबावकालानंतर राहुल बंडखोरी करू लागला. त्यासाठी झाडून बॉलीवूडचे सारे चित्रपट त्याचे आदर्श होते. एक दिवस गोलमाल रिटर्न्सचं गाणं घरात लागल्याचं पाहून दुकान सोडून आत जाऊन हात विचित्र अवस्थेत नेऊन नाचत असलेल्या राहुलला बाबूरामनं कण्हेस्तोवर बदडला. नंतर कैलास कबुतरवाल्याच्या घरात गुपचूप बीपी पाहत असताना त्यात सुरू असलेला शॉट अर्ध्यावरच टाकून बाबूरामनं काठीनं बडवत राहुलची वरात काढली. बाबूरामची ती टोकाची शिक्षा राहुलसाठी मात्र उपयुक्त गोष्ट बनली. मार खाऊन सुजलेल्या अवस्थेत कण्हत तो लेनिन नगरच्या वाटेवर असलेल्या गणपती मंदिराजवळ बसला होता. तेव्हा त्याच्याजवळ जर्मनच्या था़ळीत भाजी भाकरी घेऊन फुलसुंदरी आली.

ज्यांनी 'जो जीता वही सिकंदर' पाहिला आहे त्यांच्यासाठी; अगदी बापाचा मार खाल्लेल्या आमिर खानला आयेशा झुल्का जशी भाकरी-भाजी देते तशी. पण या भाकरी-भाजीनं फुलसुंदरी-राहुलचं चित्रपटातल्यासारखं कोणतंही काल्पनिक गाणं तयार झालं नाही.

तिनं त्या भाजी-भाकरीत कसलं अमृत टाकलं होतं, याची कल्पना नाही. पण ते जेवण फस्त केल्यानंतर राहुल काणामध्ये हजार हत्तीचं बळ आलं. रात्री जेव्हा राहुल जबरदस्ती स्वत:च्याच घरात गेला तेव्हा बाबूराम काणा आणि त्याची शाब्दिक लढाई आख्ख्या आळीला ऐकू गेली. बाबूराम राहुलला त्याच्या आईवरून शिव्या देत होता. राहुल बाबूरामला आपल्याच आज्जीवरून शिव्या देत होता. अशा सगळ्या घराण्यातल्या बायकांच्या अवयवांची जाहीर पूजा सर्वांनी क्रिकेट मॅचइतक्या आनंदात आस्वादल्यानंतर थोड्याच काळात राहुलची दुबईमध्ये रवानगी पक्की झाली. शंभर शपथा घालून आणि घेऊन राहुल काणानं फुलसुंदरीचा निरोप घेतला. प्रेमाच्या फार आठवणी नव्हत्या. चार-दोन पिक्चर, ठाण्यातल्या उपवन नामक प्रेमोद्याानात घालविलेल्या काही संध्याकाळी यांपलीकडे फुलसुंदरी आणि राहुलचं प्रेम काही फार पुढे गेलं नव्हतं. पण जे होतं ते फुलसुंदरी आणि राहुलसाठी फार मोठं होतं. त्या लेनिन नगरच्या उबट-कुबट वासभरल्या वस्तीतल्या बंडखोरीचं ते प्रतीक होतं. आणखी काही काळ राहुल थांबला असता तर ते जगजाहीर होऊन लेनिन नगराच्या सांस्कृतिक घुसळणीला आणि आणखी अशाच प्रेमानुकरणाला कारणीभूतही ठरलं असतं. पण पुढे चारेक वर्षं लेनिन नगरातल्या पुढल्या पिढीतील प्रेमोच्छुक तरुण-तरुणींना कोणताही धाडसी आदर्शच मिळाला नाही. टीव्हीवर सिनेप्रोमोतल्या नायक-नायिकांची गाणी पाहत आपल्या मनातल्या मनात प्रेमाचा सागर रिचवावा लागला. पण दुबईला गेल्यानंतर पहिल्याच वर्षात राहुलकडून येणाऱ्या पैशांवर बाबुराम काणाचं दुकान पक्कं झालं. त्याच्या विटांच्या ड्युप्लेक्सवर सिमेंटचा मुलामा आला. त्याला लख्ख निळा रंग लागला. बाबूराम काणाचं घर लेनिन नगरातलं सर्वांत श्रीमंत घर दिसायला लागलं. त्यात ड्युप्लेक्सवर आणखी एक खोली बांधून बाबूराम काणानं ती भाड्यानं देऊन टाकली.

इकडे हिंदी सिनेमाताल्या हिरोइनीसारखी एकबॉयफ्रेण्डव्रता फुलसुंदरी तिला आलेल्या भल्याभल्या प्रेम प्रस्तावांना नाकारत होती. घराघरांतल्या धुण्या-भांड्यांची, लादी पुसण्याची कामं करत चांगल्या दिवसांच्या स्वप्नांवर जगत फुलसुंदरी राहुलवरच्या प्रेमाची पणती तेवत ठेवून होती. फोनवरून व्हिडीओ चॅटिंग करून फुलसुंदरीच्या भरीव दर्शनानं राहुल काणा चांगलाच पिसाळला. दुबईमधील एकेक पुरुष आपल्या बायको आणि कुटुंबासाठी काय काय भेटी देतात याचे तो तीन वर्षं अवलोकन करीत होता. फुलसुंदरीला आख्ख्या आळीतून भेटींचा वर्षाव होत होता. फुलसुंदरी त्याला ते सांगत देखील होती. पण राहुलला दुबईतून काही पाठवता आलं नव्हतं. तिनं जेव्हा वेबकॅमद्वारा गिफ्ट मागितली, तेव्हा पाहिजे ते माग, असं त्यानं म्हटलं होतं. पण फुलसुंदरीनं 'कोई भी हटकेवाला' सांगितलं होतं.

फुलसुंदरीला हटके म्हणजे, फार फार तर हजार-दोन हजार रूपयांत येणारं काहीतरी राहुल काणा पाठवेल, असं वाटलं होतं. पण सबाच्या घरी फुलसुंदरीसाठी एक भलं मोठं पार्सल आलं आणि सबा संध्याकाळी फुलसुंदरी घरात असताना गाडी करून, सोबत दोन हमालांना नाचवत ते घेऊन आळीबाहेर आली. मला तिनं ते अजस्र पार्सल दाखवलं. ते घेऊन आपण फुलसुंदरीच्या घरामध्ये जाणार असल्याचं जाहीर केलं.

'ये पार्सल हमारे मॅगझिनने फुलसुंदरीके लिए दिया है ये झुट अभी फुलसुंदरी के घरवालोंको बोलना है.'

मी पहिल्यांदाच नाल्याच्या पलीकडे असलेल्या लेनिन नगरच्या गल्लीमध्ये प्रवेश केला होता. लहान मुलांचा खेळण्याचा कलकलाट. खुराड्यासारखी छोटी घरं आणि त्याच्यावर तेवढीच खुराडी. भिंतींचे विविध रंग आणि त्यांवर लटकलेल्या माणसं-देवांच्या एकाच पंगतीतल्या तसबिरी. आम्हाला काहीतरी मोठी वस्तू घेऊन शिरताना पाहून अनेक बायकांचे, दारात तांदूळ निवडताना झालेल्या कुतूहलयुक्त चेहऱ्यांकडे पाहत मी आमच्या नाल्यापलीकडे दिसणाऱ्या भव्य आणि चकचकीत रंगाच्या सोसायटीकडे पाहत होतो.

फुलसुंदरीच्या घरामध्ये शिरताना इतर घरांहून फार वेगळं चित्र दिसलं नाही. भिंतीवर जिथे दिसेल तिथे तसबिरी आणि घरामध्ये व्हिडीओकॉनचा कलर टीव्ही, फुलसुंदरीच्या दोन छोट्या बहिणी आणि कुण्या एकेकाळी सुंदर असलेली पण आता चेहऱ्याचा चरबीने बोऱ्या वाजलेली फुलसुंंदरीची आई आणि पलंगावर बसून आजारी माणसासारख्या अवतारात टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहत बसलेला फुलसुंदरीचा बाप सुंदरलाल पटवा अशा व्यक्ती-वस्तूंंचा एकरूप झालेला समूह प्रथमदर्शनी दिसला. सबाला पाहून फुलसुंदरी खिदळतच बाहेर आली. पण तिनं आणलेल्या बंदिस्त पार्सलकडे पाहून दचकली.

'हमारे मॅगझिन की तरफ से ये फुलसुंदरीके लिए है. हम को एक फोटोशूट करना हे ना उस के वास्ते.'

'क्या है ये?' फुलसुंदरीच्या बापानं स्ट्राइकला असलेल्या सचिनवर असलेली नजर ओव्हर संपताच हटवली होती. सबाच्या एकूण रूपाकडे आणि तिच्या टाइट जीन्सकडे पाहून सुंदरलाल पटवा बिथरला होता. त्यात 'मॅगझिन के लिए फोटोशूट' हे शब्द ऐकून त्यानं फुलसुंदरीकडे पाहून डोळे वटारले होते. सबाने प्रेझेंट फोडलं तोवर त्यात काय होतं, ते मला सांगितलं नव्हतं. पण उघडताच माझ्याइतकेच फुलसुंदरीच्या घरातल्या प्रत्येकाचा चेहरा, डोळे विस्तारले होते. राहुल काणाच्या दर्यादिलीची जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी तुलना होऊ शकत नव्हती. जगातल्या कोणत्याही प्रेमिकाला हे असं किंमती भेटवस्तू देण्याचं सुचलं नसतं. फुलसुंदरीनं फक्त 'हटके कुछ तो देना', असं म्हटलं होतं. राहुलनं अतिहटकेच भेट पाठवून दिली होती. ज्या घरामध्ये आंघोळ करताना मोरीला पडदे लावावे लागत होते, त्या घरामध्ये आता बाथटब बसवला जाणार होता. आख्ख्या लेनिन नगरामध्ये फुलसुंदरीच्या बहिणींनी या बाथटबची वर्दी देऊन टाकली होती. त्यामुळे सबा आणि मी तिथे ऑकवर्ड स्थितीतच उत्तरं दत असताना तो बाथटब पाहण्यासाठी भाभ्या आणि त्यांच्या बाप्यांची, चिल्ल्या-पिल्ल्यांची झुंबडच उडाली. चित्रपट आणि साबणाच्या जाहिरातीत दिसणारा बाथटब नाल्याअलीकडच्या सोसायटीतल्या थ्री बीएचके घरांतही अप्राप्य होता. असा दुुर्मिळ बाथटब लेनिन नगरमध्ये आल्यामुळे काहींचा ऊर अभिमानाने भरला, तर काहींचा असूयेनं. अनेकांनी या बाथटबमध्ये फुलसुंदरी आणि तिची आई कशा आंघोळी करतील, याची मनोमन चित्रं रंगवली आणि कित्येकांनी हा बाथटब कितीला घेतला हे विचारून सुंदरलाल पटवाला भंडावून सोडलं. त्या गर्दीतून आम्ही पोबारा केला, पण एकूणच आयुष्यात कधीच न पाहिलेला तो विचित्र प्रकार होता. फुलसुंदरीला इतक्या जवळून पाहून आणि तिच्या गावठी हिंदीला अनुभवून माझ्या शेरील क्रोच्या आठवणी तीव्र झाल्या. फुलसुंदरीचे फोटोशूट केव्हा करतोय, असं मला झालं होतं.

पुन्हा, शाब्बास सबा अर्थात इच्छेचा एंड

मी या सगळ्याची सुरुवातच का केली, असा प्रश्न मला सबाच्या अतिअनाकलनीय वागण्यातून पडायला लागला. म्हणजे ती मला मदत करताना, स्वत:चा काही हेतू साध्य करू शकण्याइतपत तिचं डोकं असल्याची जाणीवही नव्हती. तिचं फोटोजर्नलिझम तिचे फोटो लागणाऱ्या वृत्तपत्रांतल्या एडिटर्स आणि सबएडिटर्सवर सुरू होतं. खूप उत्तम फोटोग्राफ्स म्हणावे, तर तिचा आपल्याच व्यवसायातलं कौशल्य वाढवण्यावर जराही भर नव्हता. कधीही तिची नजर फोटोग्राफीतल्या साधेपणावर नव्हती. भडक-उग्र आणि नजरेत भरतील असेच फोटो काढण्यात तिला स्वारस्य होेतं. फोटोजर्नलिझमला सुरुवात करताना तिची जी आकलनक्षमता होती, तीच अनेक वर्षं तिच्यासोबत कायम राहिलेली होती. तशात फुलसुंदरीच्या फोटोंसाठी तिला मी पाचारण केलं आणि माझ्या आयड्यांचा तिनं सढळ हस्ते स्वत:साठी वापर केला. हे उघडंनागडं उत्तरसत्य आता मलाच पचवावं लागत आहे.

फुलसुंदरीच्या घरामध्ये बाथटबवरून तमाशाच झाला. दुसऱ्या दिवशी सुंदरलाल पटवा यांनी कसलं फोटोशूट, कोणतं फोटोशूट यावरून फुलसुंदरी आणि सबाची वरात काढली. फुलसुंदरीचे नागडे फोटो काढायचा विचार आहे का, असे विचारून सबाला सुंदरलाल पटवानं एकदा हाकलूनच दिलं होतं. त्यानंतर सबानं लोचटासारखा फुलसुंदरीच्या वडलांचा पिच्छा पुरवला. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फोटोग्राफर्सची कॅलेंंडर्स आणून फुलसुंदरी मॉडेल कशी बनू शकते, हे त्यांना सांगितलं. सोमालियाच्या वाळवंटात आदिवासी जीवन जगणारी वेरिस डिरी ही इंटरनॅशनल मॉडेल होऊ शकते, तर फुलसुंदरी का नाही, असं सांगतलं. तिनं वेरिस डिरी या कृष्णवंशीय सुपर मॉडेलची रिडर्स डायजेस्टमध्ये छापून आलेली स्टोरी तिच्या घरातील सर्वांना पोपटासारखी हिंदी भाषांतर करून वाचून दाखविली. त्यानंतर सुंदरलाल पटवाला आपल्या भविष्यकाळातल्या श्रीमंतीचे वेध लागले.

पुन्हा एकदा मला घेऊन सबा फुलसुंदरीच्या घरी दाखल झाली. तेव्हा त्या घरामध्ये आमचं स्वागत झालं. सबाचा बॉस समजून तेथे बसवण्यात आलेला बाथटब मला दाखवण्यात आला. 'मॅडोना अ‍ॅकरॅलिक' अशी ठळक अक्षरं त्यावर लिहिलेली होती. मोरीच्या बाजूची किचनची आर्धी जागा बाथटबने व्यापली होती. तेथून एक मोठा पाइप मोरीमध्ये सोडण्यात आला होता. त्यावर झालेल्या खर्चावरून सुंदरलाल पटवानं आधी फुलसुंदरीला बरंच सुनावलं होतं. पण तिच्या सांगण्यानुसार सुंदरलाल पटवाही मोरीऐवजी त्या बाथटबमध्ये आंघोळ करत होता. सबाने तिच्या वडिलांसमवेत एकदा फुलसुंदरीचे सोज्ज्वळ कपड्यात फोटोशूट केल्याचं मला सांगितलं होतं. पण माझ्या फोटोशूटबाबत काहीच केलं नव्हतं. याच काळात यू ट्युब नावाच्या समाज माध्यमामध्ये शेरील क्रोचे सगळे म्युझिक व्हिडिओ दाखल झाले होते. तिचे लाइव्ह कन्सर्टचेही व्हिडिओ उपलब्ध झाले होते. त्यामुळे माझी फुलसुंदरीचे फोटो काढायची इच्छा आणखी तीव्र झाली होती. पण सबा काही माझ्यासाठी ते करत नव्हती. एका आठवड्यात मी तिच्याशी त्यावरून शिव्यांसह जोरदार भांडलो. पण तरीही तिनं माझं काम काही केलं नाही. उलट एकदा शिवी देऊन भांडल्याचा सूडच माझ्यावर उगवला.

आमच्या त्या भांडणाच्या महिन्याभराच्या आतच यच्चयावत साऱ्या पेपरांत आलेल्या एका बातमीनं मी किती बनवला गेलो याची जाणीव मला झाली. सबा चौधरी हिला इंडियन फोटोग्राफी सर्कलचं पारितोषिक मिळालं होतं. तिनं काढलेल्या 'स्लम रायझिंग' या फोटो मालिकेला आणखीही अनेक परदेशी पारितोषिकं मिळाली होती. अन् ते सारे फोटोशुट्स ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट - डिओटोन स्वरूपातल्या फुलसुंदरीचे बाथटबच्या शेजारी उभे असलेले होते. त्यात फुलसुंदरीचे सगळं कुटुंबदेखील आलं होतं. भरगच्च रकमेच्या पारितोषिकाच्या ट्रॉफीसह सबाचा फोटो आणि तिनं काढलेला फोटो 'टाइम्स ऑफ इंडिया'मधल्या एका रंगीत पानावर होते. एका फोटोमध्ये बाथटब बाजूच्या भिंतीवर शेरील क्रोचा फोटो होता आणि तिच्यासारखीच पोझ घेतलेला फुलसुंदरीचाही फोटो होता.

आमच्या मुंबई फोटो सर्कलमध्ये सबा रातोरात स्टार फोटोग्राफर बनली. तिला एका बड्या रकमेची परदेशी शिष्यवृृत्तीदेखील मिळाली म्हणे! या फोटोग्राफी कौतुकानंतर तिनं एकदाही माझा फोन घेतला नाही. माझ्या माहितीप्रमाणे फुलसुंदरीच्या घरात इतर तसबिरींसोबत आता तिच्या काढण्यात आलेल्या फोटोंचं एक भलंमोठं कॅलेण्डर आहे. माझ्या माहितीप्रमाणे तिचं आणि राहुलचं चॅटिंग वेब कॅम असलेल्या सायबर कॅफेमधून व्यवस्थित सुरू आहे. शेरील क्रोसारखी दिसणारी मुलगी शोधून काढल्याबद्दल सबाचं जगभर कौतुक सुरू आहे. मी सबाचा बॉयफ्रेण्ड नसलो, तरी त्यांच्याहून अधिक तिचा तिरस्कार करतो.

कधी माझा राग अनावर होतो, तेव्हा मी तिचा मोबाईल आणि घरातला नंबर सार्वजनिक ठिकाणी रंगवून ठेवतो. त्या खाली काय लिहितो, ते मात्र तुम्हाला सांगू इच्छित नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

च्च च्च ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दमलो वाचून वाचून. पण छानय. हलकट मेली सबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तुम्ही लिहीता सुंदरच कथा प्रचंड आवडली
फक्त लाम्हण फार लावता तुम्ही राव्
म्हणजे जरा जास्तच लांबवतात तुम्ही
तेवढ एक सोडलं तर कथा अप्रतिम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वीच्या कथा जास्त आवडल्या होत्या त्यामुळे अपेक्षा फार उंचावल्या होत्या. त्या मानाने ही कथा ओके वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली आहे कथा. बाकी सूत्रधार आणि लेखक वेगळा असलेला बरा असतो का असा भाबडा प्रश्न पडतो. एरवी रेगुलर, लेखनाशी संबंध नसलेलासा वाटणारा सूत्रधार मध्येच लेखकासारखा, लेखकांबद्दल् बोलू / विचार करू लागला की गोष्ट गोंधळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0