Skip to main content

|| "ऐसी" हुच्चभ्रूंची लक्षणे ||

हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे
समानांशीच कंपूनी जाणे | कैसे असे ||

दुर्बोधत्वाचे परम-आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू।
चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||

उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |
गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैसी ||

यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |
शष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||

हुच्चभ्रू तितुके मेळवावे । नीचभ्रू झोडावे/इग्नोरावे ।
निरागसतेचे देखावे | परी करावे चातुर्ये ।।

अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।।
अभिजाततेची लगबग । येरू म्हणतो करावी ||

shantadurga Mon, 04/12/2017 - 10:46

अनेकांच्या (माझ्याही ) मनातले लिहिलेत :)

अबापट Mon, 04/12/2017 - 11:37

झकास आहे
पण मला बिलकुल पसंत नाहीये हे .
शिवाय गूगल परिपुष्ट हे निचभ्रू लक्षण हे तर अजिबात पसंत नाही .
नोंद घेतली जाईल .
(आता आमच्या नेत्यानी काय करावं ?)

घाटावरचे भट Mon, 04/12/2017 - 12:35

यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |
शष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||

हे कहर आहे.

बॅटमॅन Mon, 04/12/2017 - 13:18

स्वप्नी जे तर्किले रात्री | ते ते तैसेचि लीहिले |
हिंडता हिंडता आलो | 'ऐसि' या वनभूवनी ||
सकलांआड जी विघ्ने | हुच्चभ्रूरूप सर्वही |
लाटिली बहु "अनंते" | दापिली कापिली बहू ||

भांबड Mon, 04/12/2017 - 15:58

जबरी टोला. लै असुरी आनंद जाहला वाचून. इग्नोरुन निरागस राहणे...सही पकडे है

तिरशिंगराव Wed, 10/01/2018 - 06:15

यादी करायला घेतलीये ऐसीवरची. नीचभ्रू मधे मी पैला,
कं हानलाय कं हानलाय!

बऱ्याच वर्षांनी 'येरु' शब्द ऐकून भरुन आले, जसे

येरु बोले पाहीन पिता माझा
नको जाऊ मारील राजभाजा
ही उत्तानपाद राजावरची कविता आठवली.