"एकटा जीव"
अलिकडे - म्हणजे अगदी काल परवाच - दादा कोंडकेंचं, अनिता पाध्ये यांनी शब्दांकित केलेलं आत्मचरित्र वाचायला मिळालं. पुस्तक un-put-downable वाटलं. एका बैठकीत संपवावं असं. योगायोग असा की दादांचा जन्म ८ ऑगस्ट '२८ चा. म्हणजे नेमका आज त्यांचा जन्मदिवस. ९० वी जयंती.
नायगावसारख्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्वकाळात गिरणीकामगाराच्या - पण त्यातल्या त्यात सुखवस्तु कुटुंबातला जन्म, एकंदर व्रात्यपणा, हूडपणा पण तरी पंचवीशीपर्यंतचं अतिसामान्य आयुष्य, मग सेवादल आणि अन्य सोशालिस्ट सर्कलमधला वावर, मग संयुक्त महाराष्ट्र आणि मग "विच्छा" नावाचं प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारं वादळ आणि त्यानंतर चित्रपटांमधून घडवलेला इतिहास. तो तसा बर्यापैकी सर्वज्ञात आहे.
आत्मचरित्रांमधले ढोबळ धोके म्हणजे आत्मसमर्थन, आत्मगौरव. इतरांची नैतिक भूमिका तपासताना नि त्यावर टीकाटिप्पणी करत असताना स्वतःच्या कुठल्याही प्रकारच्या नैतिक शृंगापत्तींचा कुठेही उल्लेख येऊ न देणं. (हे, माझ्यामते आत्मचरित्रांमधल्या खोटपणाचं मूलभूत असं तत्त्व होय. बाकी आत्मसमर्थन हे ठीकच आहे. नाहीतरी दुसर्याचा दृष्टीकोन आपल्याला कळतो तरी किती नि कधी? आणि आत्मगौरवही यायचाच. तो ठीक आहे.)
हे सर्व धोके याही आत्मचरित्रामधे अगदी यथास्थित आहेत. जागोजागी आहेत. आणि एवढं करून पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. रसरशीत आयुष्य जगणार्याने दोन देत दोन घेत पुढे जात राहात असताना केलेलं चित्रण. लहानपणापासून जगण्यातल्या टिपलेल्या गमतीजमती, इतर व्यक्ती आणि संस्था यातल्याच नव्हे तर स्वतःमधल्या विसंगती, दोष - तेही आले. पुस्तकात अनेक व्यक्तींबद्द्ल आडपडदा न ठेवता लिहिलेला मजकूर - जो वादग्रस्त कसा ठरला नाही याचंच आश्चर्य वाटतं - जो त्याच्या गॉसिपव्हॅल्युमुळे अर्थातच वाचनीय ठरतो. हयात असलेल्या अनेक स्त्रियांबद्दल मोकळेपणाने , त्यांचे आपले संबंध असल्याचं , गोष्टी लग्नापर्यंत येऊन शेवटी विविध कारणांमुळे लग्न न होऊ शकल्याचं लिहिलेलं आहे. मंगेशकरांपासून अनेक मान्यवर लोकांच्या क्षुद्रत्वाबद्दल हात न आखडतां लिहिलं आहे. पुतण्याने कोट्यावधी रुपयांना फसवल्याचं तपशीलवार लिहिलं आहे. (हे पुतणे अजूनही कार्यरत आहेत.) हाजी मस्तान सारख्याशी असलेल्या मैत्रीसंबंधाबद्दल मोकळेपणाने लिहिलं आहे. वसंतदादा पाटील यांच्याकडे मोजता येणार नाही इतका भरभरून पैसा दररोज येत कसा होता इथपासून सर्व उल्लेख आहेत. बाळासाहेब ठाकरेंना जवळून बघताना घडलेल्या दर्शनाची चित्रणं आहेत. गॉसिपचा प्याला काठोकाठ भरलेला आहे.
कुठेही ते स्वतःच्या नैतिक पातळीवर केलेल्या निवडींबद्दल कुठे कानकोंडले होत नाहीत. १९७५ मधे वसंतदादांनी त्यांना इंदिरागांधीची भलावण करण्याकरता उद्युक्त केलं म्हणून "गंगाराम वीसकलमे" अशा नावाच्या नायकाचा चित्रपट बनवला. तो रिलीज करेपर्यंत आणिबाणी उठली तर त्यातला बहुसंख्य मजकूर बदलला आणि इंदिरागांधीवर बेदम विनोद करणारा आशय कोंबला. आणि हे सर्व "सच्चा शिवसैनिक" असताना. ही केवळ एक झलक. अशा भरपूर गमतीजमती आहेत.
पण त्याचबरोबर आपण गबाळे, रूपविहिन, घोगर्या आवाजाचे आणि खरं म्हणजे कसलीही स्टार क्वॉलिटी नसलेले आहोत याची पूर्ण जाणीव ठेवून त्याबद्दल मोकळेपणाने लिहिणंं, एकूण एक चित्रपट नफ्यात जाऊनही आणि ग्रामीण जनतेची नस सापडूनही त्याबद्दल "जितं मया" असा आवेश नाही. (हां, इतर लोकांच्या कामाबद्दल काही प्रमाणात व्यक्त केलेला प्रच्छन्न छद्मीपणा क्वचित येतो.)
सतत एकच एक फॉर्म्युला वापरून, जणू एकच एक चित्रपट सुमारे २६ २७ वर्ष काढत बसण्याबद्दल - आणि मग त्यात क्रमाक्रमाने लैंगिक स्वरूपाचे डबल मिनिंग संवाद नि गाणी वाढवत नेण्याबद्दल, एकंदर विनोद, संगीत, यातली ग्रामीण निरागसता क्रमाक्रमाने कुजवून टाकत त्यातल्या टारगट, आंबट, सडत गेलेल्या गोष्टींना प्राधान्य देण्याबद्दल यत्किंचितही - एका पैशाचाही - पश्चात्ताप सोडा साधी त्याची जाणीवही कुठे नाही.
एकंदरीत "पिंजरा"सारख्या चित्रपटांत किंवा रामनगरीसारख्या पुस्तकात निम्न आर्थिक स्तरातल्या लोकांची जी चित्रणं आलेली आहेत तशा शैलीचं आयुष्य दादा कोंडके (बक्कळ पैसे कमवूनही) जगले असं गमतीशीर फीलिंग मला वाचताना येत होतं.
आत्मगौरव, आत्मसमर्थन यांना टाळण्याचा विशेष कसला प्रयत्न न करणार्या, self-absorbed ,self righteous अशा या एकंदर पुस्तकात व्यक्तींचे किस्से, कहाण्या - ते सर्वकाही रंजक आहे. जगण्याचा एकंदर दृष्टीकोन निरोगी आहे. प्रचंड आणि (क्वचित एखादा अपवाद वगळतां) सातत्याने आर्थिक यश कमावताना स्वतःच्या मर्दुमकीची जाणीव आहे पण त्याचा दर्प कुठे येत नाही. तो भाग निरोगी खरा.
मात्र , इतका सगळा इतिहास केवळ पाहून नव्हे तर स्वतः तो घडवून झाल्यावर गाडी शेवटाच्या प्रकरणाकडे येते तिथे मात्र पुस्तक अगदी खरंखरं होतं. प्रकरणाचं शीर्षक आहे "एकटा जीव". तेच या पुस्तकाचंही शीर्षक. "आपण अगदी सर्वस्वी, सर्व अर्थांनी एकाकी आहोत. आपल्याला कुणीही जवळचं नाही. शेकड्यांनी ओळखी नि मित्र नि स्नेही आहेत. पण कुणीच - अगदी कुणीच आपलं नाही." ते मात्र खरं आहे. "मला रडारडीचं काहीच आवडत नाही, मी केवळ आणि केवळ विनोदी नि मनोरंजनाचंच देत राहीन" असं म्हणणारा हा माणूस आयुष्यातल्या या बाबत मात्र कुठलाच मेकप न लावता, कसली झिलई न चढवता बोलतो. पुस्तक तिथे संपतं.
या पुस्तकाचं झालं असं की त्याचं स्वरूप दादा सांगणार नि पाध्येबाई ते रेकॉर्ड करून मग शब्दांकित करणार असं होतं. पुस्तक छपाईला गेलं नि अचानक दादा कोंडक्यांचं निधन झालं. पुस्तक बाहेर आलं. त्यातल्या गॉसिपी भागामुळे वादग्रस्त झालं. ते गॉसिपमुळेच प्रचंड खपलंही आणि गॉसिपमुळेच नवी आवृत्ती काढणंही मुश्किल झालं असावं, मग जेव्हा वादंग लोक विसरले तेव्हा नंतर त्याच्या ७-८ आवृत्त्या निघाल्या - निघतील.
एक गोष्ट खरी. पुस्तकातले किस्से वाचताना हसायला येतं, मनोरंजन होतं. गॉसिप वाचताना कुठल्या तरी गॉसिपच्या ग्रंथीचं शमन होत असणार ते होतं. एकंदर प्रवास स्तिमित करणारा होतो. पण त्यातल्या खोटेपणाची किंवा विसंगतीची जाणीव होत असताना "घाणेरडं, मलिन" फीलिंग येत नाही. हा माणूस इरसाल, स्वार्थी, अगदी खोटेपणानं न जगणारा पण टोचणार्या खर्या भागांना टाळत पुढे गेलेला आहे असं वाटलं. आणि तिथेच विसंगती येते. "दादा कोंडकेंचा विनोद म्हणजे जितके म्हणून लैंगिक संदर्भ असतील त्याचं विकृतीकरण" हे माझं मत - त्यातल्या चावट जोक्सची मजा पौगंडावस्थेपासून पंचविशीपर्यंत यथेच्छ घेऊन - अजूनही कायम आहे. पण पुस्तक वाचून कुठेही हा माणूस ढोंगी किंवा बरबटलेला वाटला नाही. इथे त्यांनी जिंकली असं वाटतं. आणि "एकटा जीव" या शेवटाच्या प्रकरणाशी आल्यावर तर -
"कोसला" कादंबरीच्या सुरवातीला एक तिबेटी प्रार्थनेचं हे भाषांतर नेमाडेंनी दिलंय.
"भटकते भूत कोठे हिंडते?
पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्याकोपर्यांत विखुरले आहे आणि तुला
ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस
ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू
मार्गस्थ होशील."
ते आठवतं. इतकंच.
प्रतिक्रिया
उत्तम
अतिशय उत्तम परीक्षण लिहिले आहे. या पुस्तकावरुन खूपच गदारोळ झाला होता. किश्श्यांतल्या संबंधित व्यक्तिंनी , अनिता पाध्यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली होती. पण पाध्येबाईंकडे सर्व मुलाखतीचे ऑडियो रेकॉर्डिंग होते. ते कोर्टात चालते की नाही, पुढे काय झाले , ते आता आठवत नाही. पण अजूनपर्यंत, पाध्येबाईंना कुठलीही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.
दादांनी बाकी सर्व केले, पण दारुचा त्यांना तिटकारा होता.
त्यावेळेस, 'विच्छा' पाहून मी फारच प्रभावित झालो होतो. घरांत देखील, 'अजाबात' वगैरे बोलायला लागलो होतो. पण आईकडून तंबी मिळाल्यावर ते बंद झालं.
एकला जीव हे 'आत्मचरित्र' नसून
एकला जीव हे 'आत्मचरित्र' नसून अनिता पाध्ये नामक पत्रकारांगनेने दादांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडून वदवून घेतलेली स्कँडॅल शीट आहे. आधीच गावरान आणि त्यात वृद्धावस्थेमुळे 'डू नॉट गिव्ह अ फक' अशा अवस्थेत असलेल्या माणसाच्या गोष्टींना 'प्रामाणिक आणि निर्व्याज आत्मकथन' वगैरे उच्च दृष्टीने पाहण्यात काही अर्थ नाही. आपण स्टेजवर घाणेरडे विनोद करून स्त्री कलाकारांना लाज आणण्याचे किस्से आणि नट्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल अत्यंत बाजारू गावगप्पा असलेलं हे 'आत्मकथन' वाचून दादा कोंडके हा कलाकार माणूस म्हणून किती स्वस्त होता एवढंच लक्षात आलं.
Liberalism is a mental disorder
पत्रकारांगना...
...हा प्रेस्टिट्यूटचा संस्कृतीकृत मराठी अवतार काय?
वारांगणा की विरांगणा
संस्कृतात वारांगणा असतात तश्या विरांगणा पण असतात ना ? नक्की काय घ्यायचे.
गर्दीतला दर्दी
यात पत्रकार अनिता पाध्ये याना
यात पत्रकार अनिता पाध्ये याना दोष देण्याचे काहीच कारण दिसत नाहीये..
दादा कोंडके जे बोलले त्याचे त्यांनी शब्दांकन केले आहे..
बुरखे नसणारे ...
गोविंदा, चंकी पांडे, जावेद जाफरी अशा लोकांनीही असंच आत्मचरित्र किंवा आत्मकथन लिहावं, असं फार वाटतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे परीक्षण वाचून हे पुस्तक
हे परीक्षण वाचून हे पुस्तक वाचावंसं वाटत आहे. पण फिल्मी लोकांची आत्मचरित्र फारच फिल्मी (कृत्रिम) असतात असा काही पुस्तकं वाचून अनुभव आहे. कोणाकडे हे पुस्तक मिळालं आणि टाइम्पास करायला दुसरं काहीच नसलं तर वाचेन
'सांगत्ये ऐका' हा एकमेव अपवाद
'सांगत्ये ऐका' हा एकमेव अपवाद मला करावा वाटतो. बाकी, मी वाचलेली नटनट्यांची आत्मचरित्रे कचकड्याचीच होती.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मी मागवलय ऍमेझॉन वरून ... आज
मी मागवलय ऍमेझॉन वरून ... आज येईल . पुण्यात असलात तरवाचून झाल्यावर देऊ शकेन
थँक्स फॉर द ऑफर. पुण्यात असलो
थँक्स फॉर द ऑफर. पुण्यात असलो कि सांगतो.
मी हे वाचलय फार पूर्वीच. मला
मी हे वाचलय फार पूर्वीच. मला आवडलं.
ज्यांचे वाइट किस्से उघड झालेत त्यांनी कोर्टात जाण्यापेक्षा आपल्या आत्मचरित्रात त्यांची बाजू लिहावी.
मराठी चित्रपटाचा प्रेक्षक शहरातला वेगळा आणि गावाकडचा वेगळा. गावच्या लोकांना हवी असलेली निखळ बोली करमणूक त्यांनी दिली. एकूण चित्रपट व्यवसाय गाजवणाऱ्या कलाकाराकडून उत्तम शेवट.
राम नगरकरांची रामनगरीही आवडलं होतं.
श्रीराम लागुंचंही पुस्तक वाचलं.
-
मी वाचलंय नुकतंच. राबांच्या
मी वाचलंय नुकतंच. राबांच्या परीक्षणाशी बरीचशी सहमती आहे.
पहिल्या आवृतीनंतर कोर्ट केस झाली होती. काही मजकूर वगळून मग पुस्तकावरची बंदी उठली. बऱ्याच आवृत्ती निघाल्यात त्यानंतर.
अनिता पाध्येंना भेटलेय मी. त्यांच्याकडे लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा असलेल्या टेप्स आहेत दादांच्या आवाजातल्या.
अनेक स्फोटक गोष्टी त्यांनी गाळलेल्याही आहेत. पुस्तकाइतकाच ऐवज या गाळलेल्या गोष्टींचा आहे.
मला दोनतीन गोष्टी फार प्रकर्षाने जाणवल्या या पुस्तकातल्या त्या अश्या
१. मासेसपर्यंत पोचणे, मास एंटरटेनमेंट याच्या बाजूचे असण्याचा एक धागा अगदी सुरूवातीपासून दादांच्या व्यक्तिमत्वात दिसतो.
२. तसाच धागा एकटेपणाचाही सुरूवातीपासून जाणवतोच.
३. अनिता पाध्यांना हॅटस ऑफ आहेत. दादा जे काही बोलले असतील ते भरपूर पसरट असणार. मधे मधे ट्रॅक सोडूनही असणार. ते सगळे जास्तीचा पसारा काढून योग्य प्रकारे मांडणे. परत त्या निवेदनात दादाच सांगत असावेत हा सेन्स कायम ठेवणे, कुठेही स्वत:चा व्हॉइस येऊ न देणे इत्यादी गोष्टी फार छानपणे पेलल्या आहेत.
- नी
पुस्तकाची अगदी नेमकी ओळख करून
पुस्तकाची अगदी नेमकी ओळख करून दिली आहे.
मी पुस्तक तुकड्या तुकड्यांनी वाचले आहे. इतका अधिक प्रांजल पणा, अंम्मळ न झेपणारा आहे. त्यांचे चित्रपट मी पाहिलेले नाहीत. पण पुस्तक वाचताना ते कसे असतील याची कल्पना येते.
ते एक हरहुन्नरी आणि प्रेक्षकांना नक्की काय आवडेल यांची जाणीव असणारे कलाकार होते यात शंकाच नाही. वर्षानुवर्षे त्यांच्या चित्रपटांना जी अलोट गर्दी होत असे, यातच सारे काही आहे.
अनेक प्रथितयश लोकांबद्दल, अनेक मसालेवाईक गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्या जरा गाळून घेऊनच वाचाव्यात असे मला वाटले.
एकटा जीव हे पुस्तकाचे नाव देखिल सार्थ आहे.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
किंचित दुरुस्ती
मसालेवाईक नव्हे हो! मासलेवाईक.
('मासला' बोले तो, नमुना.)
(अर्थात, 'मसालेवाईक' असा शब्दप्रयोग जाणूनबुजून केला असल्यास आपला पास.)
'मासला' शब्द माहिती आहे, पण
'मासला' शब्द माहिती आहे, पण 'मासलेवाईक' नव्हता माहिती.
मी 'तऱ्हेवाईक' च्या चालीवर ''मसालेवाईक' लिहिला. आणि खरं म्हणजे मला तोच अर्थ अभिप्रेत आहे.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
मसालेदार असे म्हणायचे आहे का?
मसालेदार असे म्हणायचे आहे का?
- नी
अगदी तेच ..
मसालेदार, चमचमीत ... इ.
सनसनाटी सुद्धा म्हणता येईल.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
एकटा जीव
मी सुद्धा एरोली , नवी मुंबई, येथील वाचनालयात दोन भागात ( वाचनालयाच्या वेळेनुसार )बसून पुस्तक पुर्ण वाचून काढले आहे. परिक्षणातील मतांशी सहमत आहे.,पण संग्रही ठेवावे असे वाटले नाही.
कंटाळवाणं पुस्तक आहे...
कंटाळवाणं पुस्तक आहे... म्हातारचळ लागलेल्यांसाठी ठिकठाक.
एकटा जीव
हे पुस्तक सध्या मी ऐकते आहे स्टोरीटेलवर. मी दादांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही, विच्छा पाहायला आवडलं असतं पण त्याचे प्रयोग माझ्या जन्माआधी थांब्लो असावेत. विच्छा वाचलं आहे, पण प्रत्यक्ष प्रयोगात अॅडिशन्सच अधिक असत असं दादाच पुस्तकात म्हणतात.
पुस्तक ऐकताना काही गोष्टी फार खटकतात, उदा. शिकारीचे उल्लेख. म्हणजे एकतर त्यांना शिकारीत काही गैर वाटत नसावं, किंवा आहे हे असं आहे, असा खाक्या असावा. लग्नाबिग्नाबद्दल ऐकताना तर अतिशयोक्तीच वाटते. पण बापट यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांचं बालपण, पार्श्वभूमी, वगैरे फार इंटरेस्टिंग आहे.
This too shall pass!