पुणें भोजनगृह

संकीर्ण

पुणें भोजनगृह

- चिन्मय दामले

१८८०च्या सप्टेंबर महिन्यात पितृपक्षातल्या श्राद्धाच्या निमित्तानं वामनराव आपट्यांच्या [१] घरी विष्णुशास्त्री चिपळूणकर [२], गोपाळ गणेश आगरकर, बळवंतराव टिळक, महादेवराव नामजोशी [३] आणि न्यू इंग्लिश शाळेतले सर्व शिक्षक जमले होते. गप्पा सुरू असताना आपण इंग्रजी आणि मराठी अशी दोन साप्ताहिकं काढावीत, असं विष्णुशास्त्र्यांनी सुचवलं. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा एकाच वर्तमानपत्रांमध्ये वापरण्यापेक्षा दोन स्वतंत्र वर्तमानपत्रं चालवण्याची ही कल्पना टिळक आणि आगरकर या दोघांनीही उचलून धरली. श्री. हरीभाऊ दामले या शिक्षकांनी मराठी वर्तमानपत्रासाठी 'केसरी' हे नाव सुचवलं [४] आणि ते सर्वांना पसंत पडलं. इंग्रजी वर्तमानपत्रासाठी टिळकांनी 'मराठा' हे नाव सुचवलं. 'केसरी' आणि 'मराठा' ही वर्तमानपत्रं सुरू होण्यापूर्वी १८८०च्या ऑक्टोबर महिन्यात 'नेटिव्ह ओपिनियन' या वर्तमानपत्रात विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, वामनराव आपटे, नामजोशी, डॉ. गणेश कृष्ण गर्दे या सहाजणांच्या सह्यांनिशी एक प्रसिद्धिपत्रक छापलं गेलं. 'लोकांमध्ये ज्ञान, देशाभिमान आणि देशप्रीति यांचा प्रसार होण्यासाठी' 'केसरी' हे वर्तमानपत्र दर मंगळवारी प्रसिद्ध होईल आणि तोंडपुजेपणा न करता देशाची स्थिती, देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या तीन विषयांचं त्यात नि:पक्षपातीपणे विवेचन केलं जाईल', असं त्यात जाहीर करण्यात आलं. २ जानेवारी, १८८१ रोजी 'मराठा' साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. या साप्ताहिकाचे संपादक होते टिळक. 'केसरी'चा पहिला अंक ४ जानेवारीला निघाला. 'केसरी'चे संपादक होते आगरकर. केसरी-मराठ्याचे संपादक तरुण, तडफदार आणि देशभक्तीनं भारावलेले होते. सुरुवातीला 'केसरी'चा खप 'मराठा'पेक्षा कमी होता. पण लवकरच 'केसरी' महाराष्ट्रभरातल्या वाचकांच्या पसंतीस उतरला. पहिल्या वर्षातच 'केसरी'च्या दोन हजार प्रती खपू लागल्या आणि देशी भाषेतलं सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र म्हणून सरकारनं 'केसरी'ची दखल घेतली. केसरीच्या जन्मकाळी पुण्यात ज्ञानप्रकाश, ज्ञानचक्षू, पुणेवैभव, शिवाजी ही वृत्तपत्रं होती. पण 'केसरी'मधले ज्वलंत विषय आणि कमी किंमत यांमुळे 'केसरी' वाचकांच्या पसंतीस उतरला. राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल लिहून आगरकरांच्या 'केसरी'नं आधुनिक मराठी वर्तमानपत्रांपुढे एक आदर्श निर्माण केला [५].

केसरी अग्रलेख

अशा या 'केसरी'त १० जानेवारी, १८८२ रोजी 'भोजनगृह' या नावाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला.
(शुद्धलेखन मुळाबरहुकूम)

वरील नांवाचा एक कारखाना आज सहा महिन्यांवर या शहरांत निघालेला आहे हें आमच्या येथील वाचकांस व कित्येक बाहेरच्यांस ही माहीत असेलच. आजच्या अंकांत प्रस्तुत गृहासारख्या लोकोपयोगी गोष्टीच्या संबंधाने काहीं मजकूर लिहिण्यासारखा आहे तो वाचकांस सादर करतों.

भोजनगृह ही वस्तुतः पाहतां पाश्चात्यांच्यापैकीं एक सुधारणा होय. हा प्रचार आमच्या देशांत आजपर्यंत कधींच नव्हता. येथील पूर्व-परंपरागत रीती ह्मटली ह्मणजे अतिथि अभ्यागताचा सत्कार करणें हा होय. गार्हस्थ्याचा धर्म ह्मटला ह्मणजे प्रतिदिवशीं दोन प्रहरीं बलिहरोत्तर चतुष्पथावर मुहूर्तमात्र उभें राहून अतिथीची प्रतीक्षा करावी आणि कोणी पथिक आल्यास त्यास घेऊन भोजन करावें हा होय. ही पद्धति अद्याप ही या देशांत कित्येक प्रांतीं आढळते, व अभ्यागत किती ही आले तरी त्यांस पाहुणचार मिळतो, हें प्रसिद्धच आहे. पण आलीकडे लक्ष्मी व अन्नपूर्णा या दोन्हीं देवतानीं या देशास सोडल्यामुळें वरील प्राचीन पद्धति ही अर्थांतच सामान्यत: पाहतां लुप्त होत चालली आहे. शिवाय अर्थशास्त्र (पोलिटिकल एकॉनिमी) ही थोडकेंसें इकडे डोकावूं लागल्याबरोबर आमचे ठायीं ही समजूत बिंबत चाललेली आढळते कीं, कोणाला ही फुकट जेवूं घालणें ह्मणजे निवळ आळस वाढवणें होय, यास्तव मोठा स्नेही जरी चार दिवस घरीं येऊन उतरला तरी त्याच्या हातांत जातांना बेलाशक बिल हजर करावें! असो, तर येणेंप्रमाणें पुर्वींच्या व आतांच्या काळांत भेद पडला आहे.

तेव्हां भोजनगृह हें प्रस्तुतच्या कालमानानें पाहतां मोठी आवश्यक गोष्ट होऊन बसलें आहे. मोठमोठ्या शहरांतून तर असल्या कारखान्यांची अतिशयित आवश्यकता असते. पुणें किंवा मुंबई यांसारख्या ठिकाणीं लोकांची नेहमीं रहदारी असते; प्रत्यहीं शेकडों हजारो माणसें वरील शहरीं हरएक कामानिमित्त येत असतात व जात असतात. आता वरील गृहाच्या अभावीं वरील फिरस्ती मंडळी काय करतात याचा जर विचार केला, तर त्यांस अर्थातच बहुश: स्नेही मंडळीसच अडचणींत घालावे लागतें. घरचें जेवणखाण आटपून जों स्वस्थपणें अंमळ वामकुक्षि घ्यावयाला आरंभ करावा, तों कोणी आप्त किंवा स्नेही अगर बादरायणसंबंधी अचानक येऊन दत्त ह्मणून उभा राहतो व खुंटीस गोवाळें अडकवितो. हा प्रसंग उभयपक्षीं ही किती अवघड बरें! घरच्या यजमानास येवढा थकून भागून व भुकेलेला जो पाहुणा दारीं आला त्याच्यावर अर्द्धचंद्रप्रयोग करणें ह्मणजे केवढी खडतर गोष्ट; बरें दुसर्‍या पक्षीं पाहतां अतिथिव्रत चालविण्याची तरी केवढी पंचाईत! जो बिचारा निरुपायास्तव मुंबापुरीची नेभळी हवा पतकरून इवल्याशा जागेंत संकोचवृत्तीने राहिलेला, आणि या महिन्याची त्या महिन्याला ही ज्याची जेमतेम गांठ, त्याला प्राघूर्णिकाची स्वारी अल्लक ह्मणून येऊन उभी राहिली असतां केवढा संतोष होत असेल बरें! मोठ्या शुक योगिंद्राचें घरीं उच्छिष्ट पडलें, व स्वर्गींच्या घंटांचा घणघणाट त्याच्या कानीं येऊन पडला तरी नित्याच्या नकारघंटेचा रव त्याच्यानें लोपला जाईल काय? इंग्रेजी खराटा चार हजार कोसांवरून इकडे धांवत येऊन या सुवर्णभूमीवर फिरूं लागल्याच्या पूर्वीं येथें अशी स्थिति होती कीं, अन्नाला मोताद असा कोणीच नव्हता. खेरीज 'पोलिटिकल एकॉनिमी'ने उपदेशिलेला जो शास्त्रोक्त अदत्तपणा त्याची ही फारकरून कोणास ओळख नव्हती. आमच्या पुणेंशहरीं श्रावणमासीं लाख दोन लाख मंडळींचा महापूर लोटें, पण इतक्यांची ही सरबराई येथें होत असे. तेथेंच आतां इंग्रेजीं सुधारणा पूर्णपणें प्रतिबिंबित होऊन इंग्रेजी औदार्य सुरू झालें आहे; तें कसें? तर तोंडानें नाही म्हणून सांगायाचें नाहीं; अन्नार्थी याचकानें बोर्डाकडे नजर फेंकावी, आणि त्यावरील वळणदार ढोबळीं अक्षरें पाहून समाधान करून घ्यावें; एकीकडे 'अवकाश आहे' व दुसरीकडे 'झाली'!

तर ज्या पक्षीं हल्लींची स्थिति अशी चमत्कारीक झालेली आहे त्या अर्थीं आतां पूर्वींचे वैभव विसरून आपलें कालानुरूप वर्तन झालें पाहिजे हें उघड आहे. मागले लक्ष भोजनाचें दिवस आतां गेले; आता त्यांच्या जागीं लक्षोपवासाचे व लक्षमरणाचे दिवस येऊन ठेपले आहेत. मेघराजानें कृपा केली तर हीं भरतभूमीचीं लेकरें आणखी एक वर्षभर जगणार. नाहींतर एकदम शंभर वर्षांची निश्चिंती! मागले खुळें राजे कोठें अन्नछत्रें घालीत कोठें सदावर्तें ठेंवीत; असा अशास्त्र वागणुकीचा प्रकार असे; हल्लींच्या सुधारलेल्या अमदानींत असा पैशाचा अपव्यय कालत्रयींही व्हावयाचा नाहीं. अन्नछत्राची किंवा खिचडीची तर गोष्टच राहूं द्या; पण कोणी भोजनगृह सुरू केलें कीं लागली त्याच्यामागें उदीमपट्टी! सुमारें दहा वर्षांपूर्वीं तर आमच्या स्थानिक सरकारच्या कौंसलांत मेजवान्यांवर कर बसवावा असें ही घाटत होतें. हा बहारीचा कर आणखी ही केव्हां येईंल याचा काय नेम आहे? तो आला असतां केवढी मौज होईल बरें? - कीं द्वादशीचे बारा ब्राह्मण घालायाचे, तर एका हातांत जेव्हां पास घ्यावा तेव्हा दुस‍र्‍या हातानें उदक सोडावें! तर असली चोख पाश्चात्य सुधारणा येथें जारीनें चालू असल्यावर राजरोस भोजनगृहें चालू झालीं पाहिजेत हें उघड आहे. अशा ठिकाणीं अर्थांतच यजमानासही संकोच नको, व पाहुण्यासही नको! पाहुण्यानें पाहिजे तेव्हां यावे, पाहिजे तितके दिवस राहावें, व पाहिजे तितकी मंडळी आणावी; आणि पुन: उभयपक्षींही काडी इतकाही संकोच बाळगण्याची जरूर नाहीं. पैसे टाकले कीं हवी तेवढी सोय होते अहे. युरोपियन लोकांच्या हॉटेलांतून वरील सोई किती उत्तम प्रकारच्या असतात हे पुष्कळांस ठाऊक असेलच. त्यांत कित्येक गृहस्थ सहकुटुंब सहपरिवारसुद्धां हवे तितके दिवस राहूं शकतात. नाहींतर आमच्या येथील मौज! पाहुण्यानें खाली पडशी ठेवावी तों घरांत तांब्या उपडा पडावा; ह्मणजे मग यजमानांनी भाकरी थोपटावी आणि पाहुण्यानें वर चढवावी!

फिरस्त्या लोकांखेरीज विद्यार्थ्यांची ही भोजनगृहाने मोठी सोय होणार आहे हें उघड आहे. हल्लींच्या खाणावळींतून तरूण विद्यार्थ्यांचा बंदोबस्त हवा तसा न राहून त्यांची कुमार्गाकडे प्रवृत्ती होण्यास व छचोरपणा माजण्यास किती कारण होतें हें सर्वप्रसिद्धच आहे; तर लोकनीतीच्या व विद्यावृद्धीच्या दृष्टीनें पाहतां ही वरील विषयाकडे आमच्या देशबंधूंनीं लक्ष पुरविणें हें किती अगत्याचे आहे हे उघड आहे. सदरील कारखाना हा याच शहरांत प्रथम निघून तो हल्लीं ही ब‍र्‍याच रीतीनें चालला आहे हें त्यास भूषणमद होय. तर त्याची अभिवृद्धी करण्याविषयीं आमच्या पुण्यजनवृंदास सूचना करून इतर ठिकाणीं ही त्याचा नमुना उचलण्याविषयीं आह्मी आपल्या आर्यबंधूंस सूचना करतों, आणि आटपतों.

तर, पुण्यात नुकतंच सुरू झालेलं पहिलं भोजनगृह हा या अग्रलेखाचा विषय होता, हे उघड आहे. पण या लेखात भोजनगृह लेख छापून आल्याच्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालं, याशिवाय इतर काहीही माहिती नाही. या लेखात 'केसरी'कारांनी भोजनगृह या संस्थेची उपयुक्तता, गरज यांवरच भर दिला आहे. ते कुठे होतं, त्याचे संचालक कोण, यांबद्दल अवाक्षरही लिहिलेलं नाही. हे भोजनगृह कोणी व कधी सुरू केलं, ते किती काळ सुरू राहिलं, याविषयीची माहिती दुर्दैवानं इतरत्रही आजवर प्रकाशात आलेली नाही. एकोणिसाव्या शतकात व नंतर पुण्याबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक सर्वच पुस्तकांनी या आद्य भोजनगृहाबद्दल व नंतरच्या खाद्यगृहांबद्दल मौन पाळलं आहे. पुण्याच्या स्थानिक इतिहासाचा शोध घेणारी अनेक पुस्तकं, लेख प्रसिद्ध होऊनही हा विषय मात्र दुर्लक्षितच राहिला आहे [६]. पुण्याची-महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती व खाद्येतिहास, मध्यमवर्गाचा उदय, अर्थकारण असे अनेक विषय या भोजनगृहाशी निगडीत असल्यानं पुण्यातल्या पहिल्या भोजनगृहाचा हा शोध महत्त्वाचा ठरतो.

या भोजनगृहाची माहिती शोधण्यासाठी 'केसरी'तला अग्रलेख हा महत्त्वाचा आधार आहे. या संपादकीयाच्या इतर तपशिलांचा विचार करण्यापूर्वी आपण हे संपादकीय कोणी आणि का लिहिलं, याबद्दल विचार करायला हवा. कोल्हापूरच्या समन्वय प्रकाशनासारख्या काही प्रकाशनसंस्थांनी गेल्या काही वर्षांत प्रकाशित केलेल्या 'केसरीतील निवडक निबंध'मध्ये हा अग्रलेख आगरकरांच्या खात्यात टाकला आहे. किंबहुना या संकलनातल्या सर्वच निबंधांचे लेखक आगरकर आहेत, असा उल्लेख या पुस्तकांवर आहे. १९७३ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने 'आगरकर निबंध-नाम-विषय-सूचि' प्रकाशित केली. सौ. प्रतिभा ठिपसे यांनी हे संकलन केलं होतं. या सूचित 'भोजनगृह' हा अग्रलेख आगरकरांनी लिहिल्याचा उल्लेख आहे. त्यांनीही 'केसरीतील निवडक निबंधा'मधले सगळे लेख आगरकरांचे असल्याचं म्हटलं आहे. विष्णुशास्त्र्यांच्या बंधूंनी, म्हणजे श्री. लक्ष्मण कृष्ण चिपळूणकरांनी आणि श्री. खंडेराव भिकाजी बेलसरे यांनी लिहिलेल्या विष्णुशास्त्र्यांच्या चरित्रांत मात्र 'भोजनगृह' हा अग्रलेख विष्णुशास्त्र्यांनी लिहिल्याचे उल्लेख आहेत. साहित्य अकादमीनं १९६२ साली 'चिपळूणकर लेखसंग्रह' प्रकाशित केला. श्री. मा. ग. बुद्धिसागर यांनी या संग्रहाचं संपादन केलं होतं. या संग्रहात मात्र 'भोजनगृह' या लेखाचा उल्लेख नाही. मग प्रश्न पडतो, 'भोजनगृहा'चे लेखक नेमके कोण?

वर्तमानपत्रातले संपादकीय लेख फक्त संपादकच लिहितो असं नाही. संपादकाव्यतिरिक्त इतर कोणी संपादकीय लिहू शकतं. कोणता अग्रलेख कोणी लिहिला याचा नामनिर्देश करणं हे वर्तमानपत्रांच्या कार्यपद्धतीत बसत नाही. 'केसरी'ही याला अपवाद नव्हता. 'केसरी' सुरू झाला तेव्हा त्यात तीन लेख, स्फुट सूचना, वर्तमानसार, पत्रव्यवहार, इहवृत्त इत्यादी मजकूर असे. पत्रव्यवहार वगळता इतर लेखन सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वावर केलं जाई. 'केसरी'च्या घोषणापत्रावर सही केलेल्या सर्वांना मान्य होईल, असाच मजकूर 'केसरी'त प्रकाशित होत असे. संपादकीयही संपादकांखेरिज, म्हणजे आगरकरांखेरिज इतर काही व्यक्ती लिहीत असत. त्यामुळे कुठला लेख कोणी लिहिला, हे सांगणं अवघड होऊन बसतं. आगरकरांशिवाय विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आपटे, नामजोशी, वासुदेवराव केळकर, माधवराव गोळे, सीतारामपंत देवधर 'केसरी'त लिहीत असत.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी त्यांच्या टिळकचरित्रात आगरकर सामाजिक विषयांवर, टिळक आर्थिक विषयांवर आणि विष्णुशास्त्री साहित्यिक विषयांवर लिहीत अशी ढोबळ आणि चुकीची विभागणी केली आहे. आगरकर 'केसरी'चे संपादक असेपर्यंत टिळकांनी क्वचितच 'केसरी'मध्ये लिहिलं. लिखाणाचा कंटाळा असल्यानं 'मराठा'तही ते फारसं लिहीत नसत. 'केसरी' सुरू झाल्यानंतर विष्णुशास्त्री जेमतेम सव्वा वर्ष हयात होते. त्या काळात त्यांनी 'केसरी'च्या प्रत्येक अंकात लिहिलं. कोल्हापूर खटल्यानंतर आपट्यांनी 'केसरी'त लिहिलं नाही, कारण त्यांना कायदेशीर कटकटी नको होत्या [७]. केळकर आणि नामजोशी मुख्यत: 'मराठा'मध्ये लिहीत होते. सीतारामपंत देवधर हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. आगरकरांच्या मतांशी त्यांची मतं जुळत असल्यानं आगरकरांनी त्यांना 'केसरी'मध्ये लिहायला लावलं. 'धर्माच्या आज्ञा व त्या पाळण्याच्या मर्यादा', 'सासुरवास', 'तंबाखू', 'आमचे वेश्यागमन सुटेल काय?', 'सास्वांस नोटिस', 'मनुष्याचें सामाजिक कर्तव्य' हे काही महत्त्वाचे लेख त्यांनी 'केसरी'त लिहिले. १९१६ साली 'मनोरंजन'ने आगरकरांवर एक विशेषांक काढला होता. या अंकात सीतारामपंतांनी हे लेख आपण लिहिल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या आत्मचरित्रातही तशी नोंद आहे. यांपैकी काही लेख हे आगरकरांनी लिहिल्याचं त्यांच्या चरित्रकारांनी आणि त्यांच्या लेखसंग्रहांच्या संपादकांनी नमूद केलं असलं, तरी त्यात तथ्य नाही. सामाजिक सुधारणेशी संबंधित सर्व लेख आगरकरांचेच, अशा समजातून देवधरांचे लेख आगरकरांच्या खात्यात टाकले जातात. असं असलं तरी १८८७ सालच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत 'केसरी'तलं अतिशय महत्त्वाचं असं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक विषयांवरचं बहुतेक सर्व लेखन आगरकरांनी एकहाती केलं. मात्र 'केसरी'तल्या लेखांखाली लेखकांची नावं नसल्यामुळे लेख आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या जुळवणं हे अनेकदा किचकट काम होऊन बसतं. म्हणूनच वरदा प्रकाशनाच्या श्री. ह. अ. भाव्यांनी 'समग्र आगरकर' प्रकाशित करताना आगरकरांच्या 'सुधारक'मधल्या लेखांचीच फक्त दखल घेतली. आगरकरांच्या लेखनाचं संपादन करणार्‍या श्री. ग. प्र. प्रधान, श्री. अळतेकर यांनीही हाच मार्ग चोखाळला आहे. 'इंडियन लिंग्विस्टिक्स्‌' या नियतकालिकाच्या डिसेंबर १९४०च्या अंकात ए. पी. गोरे, एम. के. गोखले आणि एस. बी. जोशी यांनी 'केसरी'तल्या लेखांचे जनक लिंग्विस्टिक्स्‌च्या आधारे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शब्दांची व वाक्यांची लांबी, स्वल्पविरामांची संख्या इत्यादीचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करूनही या संशोधकांना ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता लेख व लेखक यांचा योग्य तो मेळ बसवण्यासाठी उपयोगास येतात त्या त्या लेखकाची लेखनपद्धती किंवा त्या लेखांविषयीच्या ऐतिहासिक नोंदी किंवा त्या लेखातली विशिष्ट मतं अथवा विचारसरणी. पण लेखनपद्धतीवर पूर्णपणे विसंबून राहणं धोकादायक असतं कारण एखाद्याच्या लेखनशैलीशी साधर्म्य राखणं फारसं कठीण नसतं. आगरकरांची शैली ही चिपळूणकरांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. या उलट टिळकांचं लेखन हे महात्मा फुल्यांच्या लेखनशैलीशी नातं सांगणारं आहे.

विष्णुशास्त्र्यांच्या मृत्यूनंतर मुंबईकर भिक्षुक ब्राह्मणानं 'केसरी'च्या संपादकांना पत्र लिहिलं होतं. 'चिपळूणकरांनंतर 'केसरी'च्या ढासळत्या दर्जाबद्दल' या पत्रात तक्रार केली होती. १३ जून, १८८२ रोजी 'पत्रें पाठविणारांस सूचना' या सदरात या पत्राला संपादकांनी, म्हणजे आगरकरांनी उत्तर दिलं -
'मुंबईकर भिक्षुक ब्राह्मण हा 'मराठमोळा', 'मन आणि मेंदू', व 'सृष्टपदार्थविचार' वगैरे केसरींतील विषय नापसंत करून असा उद्गार काढतो कीं, शास्त्रीबोवाबरोबर 'विषययोजना' देखील परलोकवासी झाली कीं काय! भिक्षूच्या नजरेला जो प्रकार येईल तो खरा! पण त्याला येवढेंच सांगून ठेंवायचें आहे कीं, शास्त्रीबोवा जिवंत असतां 'अथपासून इति' पर्यंत केसरी त्यांच्याच लेखणीनें भरून निघे असें नव्हतें. शास्त्रीबोवांच्या हातचा केसरींत एक निबंध असे, आणि तो बहुश: पहिला. तिन्हीहि निबंध प्रत्येक वर्गणीदारांच्या पसंतीस नेहमीं उतरतीलच असें आमच्यानें ह्मणवत नाहीं. तथापि श्राद्धान्नोपहारी भिक्षूला 'मराठमोळा' किंवा 'मन आणि मेंदू' असल्या विषयांची गोडी कशी समजणार?' विष्णुशास्त्र्यांचे लेख शक्यतो अंकात पहिले असत, हे या पत्रोत्तरावरून सिद्ध होतं.

विष्णुशास्त्र्यांना वर्तमानपत्रामध्ये लिहिण्याचा मनस्वी कंटाळा येई. त्यांना सवय निबंधमालेसाठी लिहायची. वर्तमानपत्रांचा कॉलम आणि शब्द यांचा हिशेब त्यांना जाचक वाटे. शिवाय त्यांना वर्तमानपत्रं वाचण्याचा कंटाळा असे. त्यामुळे राजकीय विषयांवर त्यांनी कधी फारसं लिहिलंच नाही. शिक्षण, साहित्य, संस्कृती, समाजव्यवस्था हे त्यांचे लेखनाचे विषय होते. हे लेख वर्तमानपत्रांपेक्षा मासिकांमध्ये शोभण्यासारखे होते. शब्दमर्यादेचं भान न ठेवल्यानं त्यांचे केसरीतले बहुतेक सर्व लेख एकापेक्षा अधिक भागांत प्रकाशित झाले आहेत. 'केसरी'च्या पहिल्या अंकातलं ४ जानेवारी, १८८१ रोजी प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धीपत्रक आणि पुढच्या आठवड्यातला उपोद्घात हे दोन्ही विष्णुशास्त्र्यांच्या हातचे होते. 'नवनीताची पहिली आवृत्ती', 'लार्ड बेकन', 'ज्याचा त्याचा ब्राह्मणांवर कटाक्ष', 'आमच्या देशातील सभा व मंडळ्या', 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी', 'परभाषेंतील शब्दांची योजना', 'अनुकरण', 'देशभाषीय ग्रंथसंग्रहाची आवश्यकता', 'नाटकें करावीं कीं करूं नयेत?', 'सिंहावलोकन', 'मुद्रणस्वातंत्र्य', 'देशोन्नति' आणि 'गतवर्ष' हे लेखही विष्णुशास्त्र्यांनी लिहिलेले आहेत, हे विष्णुशास्त्र्यांच्या पत्रव्यवहारावरून आणि त्यांच्या चरित्रावरून सिद्ध करता येतं. यांपैकी 'लार्ड बेकन' हा लेख विष्णुशास्त्र्यांनी लिहिला असला तरी अंकात तो पहिला नव्हता. १० जानेवारी, १८८२च्या अंकात 'भोजनगृहा'बरोबर 'गतवर्ष' आणि 'आह्मी आमच्या दारिद्र्यांतून कसे सुटूं?' हे दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. 'भोजनगृह' हा १० जानेवारी, १८८२च्या अंकातला पहिला लेख आहे. त्यानंतर असलेला 'गतवर्ष' हा लेख विष्णुशास्त्र्यांचा आहे.

'भोजनगृह' या लेखात भोजनगृह या संस्थेची आवश्यकता, ही नवी संस्था सुरू झाल्याची माहिती यांबरोबरच गतकाळाच्या आठवणीही आहेत. भारतात इंग्रज येण्यापूर्वी इथे संपन्नता नांदत होती, हे या लेखात सूचित केलं आहे. गतकाळाच्या संपन्नतेचे दाखले, हे विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचं व्यवच्छेदक लक्षण होतं. गतकाळ हा रम्य होता आणि परकीयांमुळेच भारतीय त्यांच्या उज्ज्वल भूतकाळास पारखे झाले, हे विष्णुशास्त्र्यांनी वारंवार लिहिलं. 'भोजनगृहा'तही याचा पुनरुच्चार केला आहे. पेशव्यांच्या वैभवाच्या, पराक्रमाच्या गोष्टी वृद्ध व्यक्तींच्या तोंडून ऐकण्याची विष्णुशास्त्र्यांना विलक्षण आवड होती. सातारचे हरिशास्त्री पुण्यास दक्षिणेसाठी येत. त्यांच्या कथा तर विष्णुशास्त्र्यांना अतिप्रिय होत्या. त्यांच्या पुनरुज्जीवनवादाचं मूळ त्यांच्या या आवडीत होतं. पुण्याच्या गतवैभवाच्या कथांनी विष्णुशास्त्र्यांच्या अंत:करणात स्वदेशाभिमान जागृत केला, असं त्यांचे बंधू लिहितात. या गतवैभवाचा अभिमान आणि हे गतवैभव पुण्याला पुन्हा प्राप्त व्हावं ही इच्छा, हे दोन्ही इतके प्रखर होते की त्यांतून त्यांचं कार्य उभं राहिलं. विष्णुशास्त्र्यांच्या आयुष्यातली एक घटना त्यांच्या अनेक चरित्रकारांनी नोंदवून ठेवली आहे. एके वर्षी विष्णुशास्त्र्यांनी कोजागिरी साजरी करण्याचं ठरवलं. अनेक स्नेह्यांकडे आमंत्रणं गेली. दूध आणलं गेलं. घरातल्या स्त्रियांनी साटोर्‍या, करंज्या केल्या. समानशील मित्रांबरोबर रात्र जागवण्याची सगळी तयारी झाली होती. इतक्यात बातमी आली - ग्वाल्हेरला शेवटच्या बाजीरावाच्या दत्तक पुत्रांना, म्हणजे नानासाहेबांना, शिंदे सरकारने पकडलं होतं. नानासाहेब गोसाव्याच्या रूपात लपून बसले होते. शिंद्यांनी नानासाहेबांना कैद केलं आणि इंग्रजांच्या हवाली केलं. ही बातमी ऐकून विष्णुशास्त्री निरतिशय खिन्न झाले. कोजागिरीचा कार्यक्रम ताबडतोब रद्द केला गेला.

'भोजनगृहा'चं जनकत्व आगरकरांना देण्यास अडचण येते ती या पुनरुज्जीवनवादाची. पुनरुज्जीवनवाद हा विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा कणा होता, आगरकरांचा नव्हे. दोघांच्या लेखनशैलीत साम्य असलं, तरी त्यांच्या लेखांमध्ये हा मूलभूत आणि महत्त्वाचा फरक होता. 'भोजनगृह' हा लेख आगरकरांनी लिहिला असता, तर त्यांनी या लेखात सुरम्य भूतकाळाचे दाखले दिले नसते. आजच्या काळात भोजनगृह या संस्थेचं सामाजिक आणि आर्थिक महत्त्व, एवढंच त्यांनी लेखात मांडलं असतं. त्यामुळे लेखाच्या आशयाचा विचार करता हा लेख विष्णुशास्त्र्यांनी लिहिला असल्याचं मान्य करावं लागतं. विष्णुशास्त्र्यांच्या बंधूंनी आणि बेलसर्‍यांनी 'भोजनगृहा'चे लेखक विष्णुशास्त्री होते, असं जे लिहिलं आहे, ते स्वीकारावं लागतं. 'भोजनगृहा'चं जनकत्व आगरकरांना बहाल करण्यास काही प्रकाशकांचा गलथानपणा कारणीभूत आहे. १८८८ साली आर्यभूषण छापखान्यानं दोन भागांत 'केसरीतील निवडक निबंध' छापले. त्यांतल्या पहिल्या भागात 'भोजनगृह'चा समावेश केला आहे. दोन्ही पुस्तकांमध्ये कुठला लेख कोणी लिहिला याचा उल्लेख नाही. मात्र संपादक म्हणून आगरकरांचं नाव मुखपृष्ठावर छापलं आहे. या निबंधसंग्रहांच्या आवृत्त्या काढणार्‍या प्रकाशकांनी संपादक आगरकर हेच लेखक आगरकर असं समजून 'संपादक' हा शब्द काढून टाकला आणि सर्वच्या सर्व लेख आगरकरांच्या नावे छापले आणि म्हणून केसरीच्या संपादकीयांविषयी, मालक-संपादकांविषयी माहिती नसणार्‍या अनेकांचे गैरसमज झाले. दुर्दैवानं प्रतिभा ठिपसे, निरंजन घाटे (लोकसत्ता, १७ जून, २००६) यांनी 'केसरीतील निवडक निबंध' आगरकरांच्या नावावर खपवून गोंधळात भर घातली.

'भोजनगृह' या लेखात पहिल्या भोजनगृहाबद्दल लिहिताना अशा संस्था भारतात पूर्वापार नव्हत्या, किंबहुना भारताच्या समाजजीवनात अशा संस्थाची आवश्यकताही नव्हती, असं विष्णुशास्त्री सुचवतात. दारात आलेल्या अतिथीचा आदरसत्कार करणं, त्याला आश्रय देणं, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं ही भारतीयांची खरी पद्धत असल्याचं विष्णुशास्त्री सांगतात आणि ते खरंही आहे. आज आपण जशी आधुनिक उपाहारगृहं बघतो, तशी उपाहारगृहं भारतात सुरू झाल्याला फारतर दीड शतक झालं असेल. युरोपातही अशी उपाहारगृहं सुरू होऊन जेमतेम दोन शतकं उलटली आहेत. त्यामुळे पुण्यात नव्यानं सुरू झालेल्या भोजनगृहाची माहिती वाचकांना व्हावी, भोजनगृहास लोकाश्रय मिळावा, या हेतूनं विष्णुशास्त्र्यांनी हा लेख लिहिला. पण हे भोजनगृह पुण्यात कुठे आहे, ते कोणी सुरू केलं, तिथे कुठले खाद्यपदार्थ मिळतात, नवं सुरू झालेलं भोजनगृह अस्तित्वात असलेल्या खाणावळींपेक्षा वेगळं कसं, यांविषयी त्यांनी लेखात एक अक्षरही लिहिलेलं नाही. या प्रश्नांची उत्तरं आपल्या वाचकांना ठाऊक आहेत, हे ते गृहीत धरतात. त्यांचा सगळा रोख भोजनगृह या अपरिचित संस्थेची महती वाचकांना पटवून देण्यावर आहे. त्यामुळे भोजनगृह पुण्यात नेमकं कुठे होतं, त्याचे संचालक कोण होते, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'केसरी' व इतर वर्तमानपत्रांच्या जुन्या अंकांचा आधार घ्यावा लागतो. १० जानेवारी, १८८२ रोजी 'भोजनगृह' प्रकाशित झाला, तेव्हा ही संस्था सुरू होऊन सहा महिने झाल्याचं विष्णुशास्त्र्यांनी लिहिलं होतं. म्हणजे १८८१ सालच्या जून महिन्यात भोजनगृहाची स्थापना झाली. या महिन्यातले 'केसरी'चे अंक बघितल्यास भोजनगृहाच्या काही जाहिराती सापडतात. त्यांपैकी पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली १४ जून, १८८१ रोजी.

केसरीतली जाहिरात

'पुणें भोजनगृह ब्राह्मणज्ञातीय विद्यार्थि, प्रवासी, नौकर वगैरे लोकांकरितां.' हे या जाहिरातीचं शीर्षक आहे. जाहिरातीत म्हटलं आहे - 'आम्ही खालीं सही करणार सर्व ब्राह्मण ज्ञातीय विद्यार्थि, प्रवासी, नौकर वगैरे लोकांस विनयपूर्वक असें कळवितों कीं, वरील नांवाचें गृह ता. १ जून १८८१ इसवी पासून पुणें पेठ बुधवार ढमढेरे यांचे वाड्यासमोर तुकाराम किसनदास पटवेकरी यांचे वाड्यांत आम्ही स्थापिले आहे. निरुपायामुळें खाणावळींत जेवणारे गृहस्थांस जे तेथील विलक्षण त्रास सोसावे लागतात ते सर्व त्रास येथील जेवणारे गृहस्थांस बिलकुल होऊं नयेत, अशाविषयीं वरील गृहाचे उत्पादकांनीं चांगली खबरदारी ठेविली आहे, हें अनुभवाअंती कळून येईलच. अशा प्रकारच्या गृहाची या पुणें शहरांत किती आवश्यकता आहे हें सर्व सूज्ञ लोकांच्या लक्षांत आलेंच असेल. हें कृत्य लोकाश्रयावर अवलंबून आहें हें उघड आहे. तरी यास सर्व ब्राह्मणज्ञातीय लोक आश्रय देतील अशी या मंडळीच्या अंत:करणांत पूर्ण खात्री आहे. यासंबंधानें हरएक खुलासेवार माहिती विचारणें ती सदरील भोजनगृहांत येऊन व्यवस्थापक यांस विचारली असतां ते सांगतील. बाहेरगांवचें लोकांस यासंबंधानें माहिती विचारणें असल्यास त्यांनीं वरील पत्त्यावर पत्र लिहावें व परत उत्तराकरितां अर्धआण्याचें तिकिट पाठवावें, कळावें. पुणें, ता. १३ जून १८८१ इसवी. जाहिरातीखाली 'नारायण रामचंद्र आणि मंडळी' अशी सही आहे. 'केसरी' त्यावेळी दर मंगळवारी प्रकाशित होत असे. १४ जून, १८८१च्या मंगळवारी ही जाहिरात पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत ही जाहिरात दर आठवड्याला छापून आलेली दिसते. ही जाहिरात त्या सुमारास प्रकाशित झालेल्या इतर कुठल्याच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली दिसत नाही. या जाहिरातीतली भाषा बघता ती एखाद्या सुशिक्षित व्यक्तीनं लिहिल्यासारखी वाटते. किंबहुना पुणेकरांसाठी भोजनगृहाची उपयुक्ततता आणि लोकाश्रय हे दोन्ही मुद्दे जाहिरातीत आणि विष्णुशास्त्र्यांच्या लेखात समान आहेतच, पण दोन्हींमधली भाषाही समान धाटणीची आहे. ही जाहिरात प्रकाशित झाली, त्या आधी ३१ मे, १८८१च्या अंकात इहवृत्तामध्ये 'भोजनगृह' सुरू होणार असल्याची वार्ता 'केसरी'कारांनी पुणेकरांना दिली होती - 'ब्राह्मणजातीय विद्यार्थी, प्रवासी वगैरे लोकांच्या सोईसाठी बुधवार ता. एक माहे जून सन १८८१ पासून मि. नारायण रामचंद्र आणि मंडळी हे एक भोजन गृह घालणार आहेत. ५ - ६- ७ असे येथील नेमस्त दर आहेत. व्यवस्था उत्तम प्रकारची ठेवली जाणार आहे.' या भोजनगृहात खाणावळीप्रमाणे ५ - ६ - ७ रुपये देऊन माहवारी जेवता येतं असे, हे या जाहिरातीवरून कळतं.

भोजनगृहाच्या जाहिराती 'केसरी'त येणं थांबल्यानंतर एक महत्त्वाचा उल्लेख सापडतो. 'भोजनगृह' सुरू होऊन तीनचार महिने उलटल्यावर 'शोधक' या टोपणनावाच्या कोणा वाचकानं भोजनगृहातील अव्यवस्थेविषयी 'केसरी'कडे पत्र पाठवून तक्रार केली होती [८]. या तक्रारीचं स्वरूप काय होतं, नक्की काय अव्यवस्था तिथे होती, हे सांगता येणं अशक्य आहे, कारण मूळ पत्र उपलब्ध नाही. वाचकाचं एखादंच महत्त्वाचं पत्र छापण्याची 'केसरी'ची सुरुवातीस पद्धत होती. इतर किरकोळ पत्रांचा आशय एखाद्या ओळीत सांगून संपादक आगरकर त्या पत्रांना उत्तरं देत असत. १५ नोव्हेंबर, १८८१च्या 'केसरी'मध्ये 'पत्रे पाठविणारांस सूचना' या सदरात 'शोधका'च्या पत्रास आगरकरांनी उत्तर दिलं आहे - 'शोधका'च्या पत्रावरून 'भोजन गृहा'विषयी आह्मी चौकशी केली, पण तो ह्मणतों त्या प्रकारची अव्यवस्था तिथें दिसत नाहीं. खाणावळीं, किंवा भोजनगृह यांच्याविषयीं साद्यंत पत्रें छापण्यांस जागा नाहीं.' म्हणजे खुद्द आगरकर भोजनगृहात जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी करून आले होते. भोजनगृहात अव्यवस्था आहे, अशी बातमी जर पुण्यात पसरली असेल, तर ते निश्चितच नव्यानं सुरू झालेल्या या व्यवसायासाठी चांगलं नसणार. सोवळ्याओवळ्याचं प्रस्थ, बाहेर खाण्याविषयीची अढी अशा कारणांमुळे भोजनगृहाला प्रतिसाद मिळत नसेल आणि हा व्यवसाय अकाली बंद पडू नये, असं विष्णुशास्त्र्यांना वाटलं असावं.

मात्र विष्णुशास्त्र्यांनी भोजनगृहाच्या नव्या उद्योगाच्या प्रसारार्थ लेख लिहिणं हे त्यांच्या लेखनप्रकृतीशी अगदीच विसंगत आहे. 'व्यापाराशिवाय तरणोपाय नाही' असं सातत्यानं म्हणणार्‍या 'केसरी'नं मराठी प्रांतातल्या प्रत्येक लहानमोठ्या उद्योगाची दखल घेतली. साबणापासून सुईपर्यंत, कापडापासून सायकलीपर्यंत, जिथे आणि जेव्हा स्वदेशी उद्योग निघाले, 'केसरी'नं त्याबद्दल आवर्जून लिहिलं. पण स्वदेशी उद्योगधंद्यांच्या प्रसारासाठी 'केसरी'कारांनी कायमच प्रयत्न केले असले, या विषयावर अनेक लेख 'केसरी'त अगदी सुरुवातीपासून वारंवार छापून आले असले, तरी हे लेख विष्णुशास्त्र्यांनी लिहिले नव्हते [९]. शिक्षण, साहित्य, संस्कृती, समाजव्यवस्था, क्वचित राजकारण हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. एका नव्या उद्योगाची माहिती देणारा 'भोजनगृह' हा अशाप्रकारचा एकमेव लेख विष्णुशास्त्र्यांनी लिहिला आहे. शिवाय त्यांचे 'केसरी'तले बहुतेक सर्व लेख एकापेक्षा अधिक भागांत प्रकाशित झाले आहेत. 'भोजनगृह' हा लेख मात्र एकाच भागात प्रकाशित झाला. या लेखाचा विषयही विष्णुशास्त्र्यांच्या इतर लेखांच्या विषयांपेक्षा अर्थातच वेगळा आहे. त्यामुळे विष्णुशास्त्र्यांनी 'भोजनगृह' हा लेख लिहिण्यामागे काही सबळ कारण नक्की होतं. त्यांची 'भोजनगृहा'त आर्थिक गुंतवणूक असावी, असा एक कयास बांधता येतो. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यावर विष्णुशास्त्र्यांनी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं. मग आर्यभूषण छापखाना व 'केसरी-'मराठा' ही वर्तमानपत्रं आली. 'किताबखाना' हे पुस्तकांचं दुकानही सुरू केलं. न्यू इंग्लिश स्कूल काढण्यामागे विष्णुशास्त्र्यांचं आर्थिक गणित नसलं, तरी किताबखाना त्यांनी अर्थार्जनासाठीच काढला होता. गणेश वासुदेव जोशी, म्हणजे सार्वजनिक काका, यांच्या स्वदेशी वस्तूंच्या दुकानात त्यांनी दोनशे रुपये घातले होते. त्यामुळे विष्णुशास्त्र्यांचा भोजनगृहाच्या उद्योगात अप्रत्यक्ष का होईना, पण सहभाग नक्की असावा. भोजनगृहाचे संचालक असलेल्या 'नारायण रामचंद्र आणि मंडळी' यांतला 'मंडळी' हा शब्द आर्थिक भागीदारी दाखवतोच. शिवाय नारायण रामचंद्र यांचे विष्णुशास्त्र्यांशी घनिष्ठ संबंध असावेत. पुण्यात नव्यानं सुरू झालेल्या कुठल्याश्या उद्योगाबद्दल लिहिणं, एवढा एकच हेतू असता तर विष्णुशास्त्री भोजनगृहाबद्दल लिहिते ना, कारण तशाप्रकारचं लेखन त्यांनी त्यापूर्वी व नंतरही कधीच केलं नाही. तसा लेख लिहायला 'केसरी'चे इतर लेखक होते. विष्णुशास्त्र्यांची लोकप्रियता त्या काळात अक्षरश: गगनास भिडली होती. सगळेच त्यांच्या लेखणीचे चाहते होते. खुद्द टिळक आणि आगरकरही त्यांच्या लेखनानं भारावले होते. या लोकप्रियतेमुळे मराठी असंतोषाचं जनकत्व विष्णुशास्त्र्यांकडे आलं होतं. अशा परिस्थितीत विष्णुशास्त्र्यांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा होता. तो त्यांनी 'पुणें भोजनगृहा'साठी वापरला, हे उल्लेखनीय आहे.

भोजनगृहाच्या शोधात आपण पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. 'पुणें भोजनगृह' हे पुणे शहरातलं पहिलं खाद्यगृह होतं. तसा उल्लेखही विष्णुशास्त्र्यांनी त्यांच्या लेखात केला आहे. मात्र पुण्याशेजारी असलेल्या छावणीच्या परिसरात 'पुणें भोजनगृहा'च्या स्थापनेआधी निदान दोन दशकं खाद्यगृहं अस्तित्वात होती. रॉयल फॅमिली हॉटेल रेल्वे स्टेशनाजवळ होतं. छावणी परिसरातलं हे पहिलं भोजनवसतिगृह असावं. १८६१ साली ते सुरू झालं. सीताराम रामचंद्र गाईकवाड यांनी लिहिल्यानुसार या हॉटेलात 'पाच कुटुंबे व चौदा सडे गृहस्थ राहण्यास पुरे इतकी' सोय होती. शिवाय घोडे आणि गाड्या ठेवण्यासाठी तबेले होते. हॉटेलाचा दर प्रत्येक माणसास दररोज पाच रुपये आणि पूर्ण महिन्याचे एकशे वीस रुपये असा होता [१०]. सेंट पॉल चर्चाच्या पूर्वेस पूना हॉटेल होतं. मेसर्स सोराबजी जहांगीरजी ऍण्ड सन्स यांनी १८७३ सालच्या मे महिन्यात हे हॉटेल सुरू केलं. सुरुवातीला हे हॉटेल बरंच लहान होतं, नंतर दहाबारा वर्षांत टप्प्याटप्प्यानं या हॉटेलाचा विस्तार करण्यात आला. हॉटेलाचं दर्शनीगृह ३५ x २२ फूट होतं आणि भोजनगृह होतं ४० x २२ फूट. इथली शयनगृहे प्रशस्त होती आणि चाकरमाणसांसाठी आणि गाड्याघोड्यांसाठी वेगळ्या जागा होत्या. हॉटेलाचा दर होता प्रतिमाणशी शंभर रुपये प्रतिमहिना किंवा रोजचे पाच रुपये. सोराबजी जहांगीरजी चिनॉय यांच्याकडे डेक्कन हेराल्ड या वर्तमानपत्राची मालकी होती. ही कचेरीही हॉटेलाशेजारी होती. एक मजेशीर बाब म्हणजे हे हॉटेल बांधणारे सोराबजी चिनॉय एकवीस वर्षं पुण्याचे कोतवाल होते. नेपियर हॉटेल आर्सेनल रस्त्यावर होतं. नसरवानजी नवरोजी हे या हॉटेलाचे मालक होते. पुण्यातला पहिला बर्फाचा कारखानाही त्यांनीच स्थापन केला होता. नेपियर हॉटेलाची १८६८ साली स्थापना झाली. पुण्यातलं सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून याची ख्याती होती. हॉटेलाची इमारत दुमजली होती. साठ व्यक्तींसाठी राहण्याची सोय होती. हॉटेलासमोर देखणी बाग होती. तीत चार कारंजी होती. सध्या 'कॅम्पातला भूतबंगला' म्हणून या हॉटेलाची पडकी इमारत प्रसिद्ध आहे. पुणे आणि पुणे छावणी यांच्या सीमा वेगळ्या, संस्कृती वेगळी. त्याकाळच्या पुण्यातल्या छावणीचा भाग हा पूर्णपणे इंग्रजी रंगरूप ल्यालेला होता. 'ब्रिटिश पुणे' आणि 'भारतीय पुणे' अशीच विभागणी झाली होती. या दोन्ही पुण्यांचा एकमेकांशी फारसा संपर्क येत नसे. शिवाय छावणीतल्या या खाद्यगृहांमध्ये पुण्यातल्या हिंदूंनी, किंबहुना ब्राह्मणांनी जण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे 'भोजनगृहा'बद्दल लिहिताना छावणीतल्या खाद्यगृहांचा उल्लेख न करता पुण्यातल्या भोजनगृहाला पहिलेपणाचा मान विष्णुशास्त्र्यांनी द्यावा, यात नवल नाही. किंबहुना मुंबईतही व मराठी प्रांतात इतरत्र अशाप्रकारचं भोजनगृह नाही, असं विष्णुशास्त्री अग्रलेखात सुचवतात. त्यामुळे 'भोजनगृहा'बद्दल लिहिताना छावणीतल्या खाद्यगृहांचा उल्लेख न करता पुण्यातल्या भोजनगृहाला पहिलेपणाचा मान विष्णुशास्त्र्यांनी द्यावा, यात नवल नाही. किंबहुना मुंबईतही अशाप्रकारचं भोजनगृह नाही, असं विष्णुशास्त्री अग्रलेखात सुचवतात. तसा पुरावा ९ जानेवारी, १८८१च्या 'नेटिव्ह ओपिनियन'मध्ये सापडतो. या अंकात इहवृतात 'हिंदू भोजनालय' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली - 'कांदेवाडीत स्थापन करण्याचा विचार असून आश्रयदात्यांचा शोध सुरू आहे. मुंबईत अशी सोय सांप्रत नसून आश्रयदाते मिळाल्यास भोजनालय स्थापन होऊन प्रवाश्यांची सोय होईल.' पुण्याचं भोजनगृह सुरू व्हायच्या सहा महिने आधीची ही बातमी आहे. मात्र हे भोजनालय १८८३ साली सुरू झालं. 'हिंदूलोकांकरिता भोजन व वसतिगृह' या मथळ्याची जाहिरात १८८३ सालातल्या जानेवारी 'इंदुप्रकाश'च्या महिन्यातल्या प्रत्येक अंकात सापडते - 'कांदेवाडी - शांताराम नारायण वकील यांचें चाळींत. नारायण लक्ष्मण मॅनेजर. येथे माफक दरानें जेवणाचा बेत उत्तम ठेवण्यात येऊन राहण्याची सोय उत्तम केलीं जाईल.' जानेवारी १८८३च्या आधीच्या अंकांमध्ये या भोजन-वसतिगृहाची जाहिरात नसल्यानं ते त्याच महिन्यात सुरू झालं असावं आणि तसा पुरावाही उपलब्ध आहे. ७ मे, १८८३च्या 'इंदुप्रकाश'मध्ये 'भोजनगृहसुखानुभवी' यांचं पत्र प्रसिद्ध झालं. 'कांदेवाडीत नव्याने सुरू झालेल्या भोजन-वसतिगृहाच्या जाहिरातींच्या भपक्या'बद्दल लेखकानं तक्रार करत 'जागेचा संकोच, अस्वच्छता, चिलटांच्या कीर्तनाचे जुलूम' यांबद्दल लिहिलं आहे. 'पानतंबाखु वगैरे जिन्नस आणण्याकरितां भोजनगृहाचें गड्यास बोलावणे पाठविण्यास सदरच्या पैशाने दुसरा गडी ठेवावा की काय याबद्दल विचार सुरू झाला. जेवणाच्या ताटांचा वगैरे संचय कमी असल्याने लोक जेऊन उठेपर्यंत थांबावे लागे. कंदिलाकरिता ओरडता ओरडता घशास कोरड पडे', असंही पत्रात म्हटलं आहे. पत्राच्या शेवटी लेखक लिहितात की, 'सदरील भोजन व वसतिस्थान सुरू होऊन थोडेच महिने झाले असल्याने चालक तक्रारींचा विचार करतील व उतारूंची सोय बघतील, मुंबईत हिंदू प्रवासी राहतील अशी वसतिस्थाने व भोजनगृहे नसल्याने मालकांनी तक्रारींचा विचार करावा'. पत्रलेखक भोजनगृहसुखानुभवी या भोजन-वसतिगृहासाठी 'नव्याने सुरू झालेल्या' असा शब्दप्रयोग करतात. मुंबईत हिंदू प्रवाशांना राहण्याची योग्य सोय नसल्याचंही सांगतात. तसं सांगताना तेही हे भोजन-वसतिगृह सुरू होण्याच्या अनेक दशकं आधीपासून असलेल्या पारशी व युरोपीय भोजनगृहांकडे काणाडोळा करतात. असं असलं तरी 'इंदुप्रकाशातल्या जाहिरातीवरून व पत्रावरून हे सिद्ध होतं की, पुण्यात सर्वांत आधी स्वदेशी भोजनगृह सुरू झालं, हा विष्णुशास्त्र्यांचा दावा खरा आहे.

आता पुढे प्रश्न पडतो की, हे भोजनगृह नेमकं कुठे होतं? १८८१ सालच्या 'केसरी'तल्या जाहिरातींवरून हे भोजनगृह ढमढेर्‍यांच्या वाड्यासमोर असलेल्या तुकाराम पटवेकर्‍यांच्या वाड्यात स्थापन झालं होतं, हे कळतं. ढमढेर्‍यांचा वाडा बुधवार पेठेतल्या ढमढेरे बोळात होता. हल्ली जिथे श्रीकृष्ण चित्रपटगृह आहे, तो ढमढेरे बोळ. नव्यानंच सुरू होणारं हे भोजनगृह बुधवार चौकानजीकच्या ढमढेरे वाड्यात सुरू करण्याचा संचालकांचा निर्णय अगदी अचूक होता. बुधवार चौक म्हणजे हल्लीची फरासखाना पोलिस चौकी जिथे आहे तो चौक. रतन चित्रपटगृहासमोरची बाजू. शनिवारवाड्याला जवळ असल्यानं शहराचा मुख्य व्यापार बुधवार पेठेत चालत असे. रविवार पेठेत सराफांची दुकानं होती. बुधवार चौकातून रविवार पेठेतल्या मोती चौकाकडे जाण्यासाठी थेट रस्ता होता. बुधवार चौकात उभं राहिलं की एक रस्ता नानावाडा आणि शनिवारवाडा यांच्याकडे जाई, तोच रस्ता दुसर्‍या बाजूने कोतवाल चावडीकडे जात असे. (भोजनगृह सुरू झालं तेव्हा सध्याची मंडई अस्तित्वात नव्हती.) एक रस्ता आप्पा बळवंत चौकाकडे आणि तोच पुढच्या बाजूनं मोती चौकाकडे जाई. चौकात टांगे उभे असत. त्यामुळे बुधवार चौकाला महत्त्व होतं. ढमढेरे बोळाच्या एका तोंडाला ढमढेरे वाडा होता. वाड्याच्या जागी आता तीनचार मोठ्या इमारती आहेत. दोन इमारतींची प्रवेशद्वारं ढमढेरे बोळात आहेत, तर इतर दोघींची प्रवेशद्वारं दगडुशेठ हलवाई गणपतीच्या समोरच्या रस्त्यावर आहेत. या इमारती बांधण्यापूर्वी वाड्याचं प्रवेशद्वार ढमढेरे बोळात होतं. वाड्यासमोर अनेक लहान, जुने वाडे व इमारती आहेत. तिथे बराच शोध घेऊनही पटवेकर्‍यांचा वाडा कुठे होता, हे मला सापडलं नाही. पटवेकरी हे व्यवसायामुळे मिळालेलं आडनाव आहे. त्यामुळे भोजनगृह जिथे स्थापन झालं, त्या वाड्याच्या मालकाची मूळ ओळख वेगळ्या आडनावानं असण्याचीही शक्यता आहे. श्रीकृष्ण चित्रपटगृहासमोर एक अरुंद बोळ आहे. या बोळात एक अर्धवट बांधलेली इमारत आहे. या इमारतीच्या जागी असलेल्या वाड्यात साधारण वीस वर्षांपूर्वी एक पटवेकरी कुटुंब राहत असे व त्यास पटवेकरी वाडा म्हणत, अशी माहिती तिथल्या काही रहिवाश्यांकडून मिळाली. मात्र आता ते कुटुंब कुठे आहे, तो वाडा त्या कुटुंबाच्या मालकीचा होता किंवा कसे, हे कळू शकलं नाही. त्या परिसरात राहणार्‍या सातआठ पटवेकरी कुटुंबांकडे मी चौकशी केली. मात्र तुकाराम पटवेकरी यांच्याबद्दल त्यांच्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही. पुणे महानगरपालिकेतही मी याबद्दल चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे किंवा परिसरातल्या रहिवाश्यांकडे जागेच्या इतक्या जुन्या नोंदी नाहीत. पानशेतच्या पुरात बरेच कागद नष्ट झाले.

'केसरी'मधल्या जाहिरातीनुसार पुण्यातलं पहिलं भोजनगृह ढमढेरे वाड्यासमोर पटवेकर्‍यांच्या वाड्यात सुरू झालं हे नक्की असलं, तरी ते पुढे त्याच ठिकाणी सुरू राहिलं नाही. सीताराम रामचंद्र गाईकवाडांच्या १८८६ सालच्या पुणे-वर्णनात गुरुवार पेठेतल्या चवधरीवाड्याचं वर्णन आहे. रुपराम चौधर्‍यांचा हा वाडा [११]. हा वाडा पंचहौद मिशनासमोर होता. भवताली बाजारपेठ होती. या 'चवधर्‍यांच्या वाड्यातच पूर्वी पुण्याचे बोर्डींग होते', असं गाईकवाडांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. याचा अर्थ पटवेकर्‍यांच्या वाड्यातून हे भोजनगृह गुरुवार पेठेतल्या चौधर्‍यांच्या वाड्यात गेलं. गाईकवाडांनी चौधरीवाड्याच्या संदर्भात भोजनगृहाचा उल्लेख केला आहे, भोजनगृहाचं स्वतंत्र वर्णन केलेलं नाही. त्यामुळे हे भोजनगृह अगोदर इतरत्र होतं का, किंवा त्याचे संचालक कोण, हे उल्लेख पुणे-वर्णनात नाहीत. आपल्या पुस्तकात गाईकवाडांनी 'पुणें भोजनगृहा'ला 'पुण्याचे बोर्डींग' असं संबोधणं मात्र जरा गमतीशीर आहे. मधूनच इंग्रजी शब्द वापरणं, ही त्या काळची पद्धत होतीच. पण 'पुण्याचे बोर्डींग' असा वापर करून गाईकवाड पुणें भोजनगृह हे पुण्यातलं एकमेव भोजनगृह होतं, हे सूचित करतात.

चौधरीवाडा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भाजेकर कुटुंबाच्या ताब्यात होता. भाजेकर हे मूळचे चितळे. बाळकृष्ण उर्फ आण्णा चितळे हे १८५०च्या सुमारास या वाड्यात राहण्यास आले असावेत. नारायण, महादेव उर्फ बापूसाहेब आणि रामचंद्र ही त्यांची तीन मुलं नंतर याच वाड्यात राहत होती. यांपैकी महादेव उर्फ बापूसाहेब भाजेकर हे विष्णुशास्त्र्यांचे घनिष्ठ मित्र होते. दोघंही डेक्कन कॉलेजात एकत्र होते. लक्ष्मण कृष्ण चिपळूणकर यांनी लिहिलेल्या विष्णुशास्त्र्यांच्या चरित्रात त्यांचा अनेकदा उल्लेख येतो. म्हणून भोजनगृह भाजेकरांच्या ताब्यात असलेल्या चौधर्‍यांच्या वाड्यात असणं, हे महत्त्वाचं ठरतं. विष्णुशास्त्र्यांचा 'पुणें भोजनगृहा'शी असलेला निकटचा संबंधच त्यामुळे अधोरेखित होतो. मात्र 'पुणें भोजनगृह' मुळात पटवेकर्‍यांच्या वाड्यातून भाजेकरांच्या वाड्यात का आलं, आणि तिथे ते किती काळ सुरू राहिलं, याची उत्तरं मिळत नाहीत.

गुरुवारातल्या भाजेकरांच्या वाड्यातून पुणें भोजनगृह कसब्यातल्या पेठेवाड्यात गेलं. 'पुणे-वर्णना'त गाईकवाडांनी कसबा पेठेतल्या पेठेवाड्याचं वर्णन केलं आहे. हा पेठेवाडा त्र्यंबकरावमामा पेठे यांचा होता. त्र्यंबकराव सदाशिवराभाऊंचे मामा [१२]. पेठ्यांचा वाडा तिमजली होता. आज या वाड्याची जी बाहेरची चारपाच फूट लांबीची भिंत शाबूत आहे, त्यावरून या वाड्याच्या भव्यतेची, मजबुतीची कल्पना करता येते. या वाड्याचा दिवाणखाना भव्य होता. दिवाणखान्याच्या भिंतींवर सोन्याचे पत्र ठोकले होते आणि त्या पत्र्यांवर सुरेख चित्रं रेखाटली होती. गुरुवार पेठेतून 'पुणे भोजनगृह' या पेठ्यांच्या वाड्यात कसबा पेठेत तांबट आळीत आलं. 'हल्ली ह्या वाड्याचा कांही भाग पुण्याचें बोर्डींग किंवा भोजनगृह याजकडे भाड्यानें सोंपविला आहे', असं गाईकवाडांनी पेठेवाड्याच्या वर्णनात नमूद केलं आहे. गुरुवार पेठेतून कसब्यात झालेलं हे स्थलांतर अगदीच गैरसोयीचं आणि नाइलाजानं केलेलं असावं. पेठेवाड्यात तांबटांचे कारखाने असल्याचं, गाईकवाडांनी लिहून ठेवलंय. आजही तिथे तसा एक कारखाना आहे. किंबहुना पेठेवाड्यापासूनच तांबट आळीची सुरुवात होते. या वाड्यासमोर उभं राहिल्यास ठणठणाटानं डोकं उठतं, असं गाईकवाड लिहितात. भोजनगृहासाठी अत्यंत गैरसोयीची अशी ही जागा. या जागी भोजनगृह का आलं असावं? पुरेसे ग्राहक नसणं, हे या मागचं कारण असू शकेल का? १८८२ सालच्या मे महिन्यात विष्णुशास्त्र्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भोजनगृहास उतरती कळा लागली असावी का? की अजून काही कारण असेल?

गुरुवार पेठेतला चौधरीवाडा आता अस्तित्वात नाही. वाडा शेवटपर्यंत ज्यांच्या ताब्यात होता, त्या भाजेकर कुटुंबाला भोजनगृहाविषयी काहीही माहिती नव्हती. भोजनगृहाचं त्या वाड्यातलं अस्तित्व सिद्ध करणारी कागदपत्रंही त्यांच्याकडे मला सापडली नाहीत. पेठेवाड्यात सध्या श्री. किशोर करडे राहतात. त्यांचा या वाड्यात तांब्याच्या भांड्यांचा कारखानासुद्धा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाडा १८९०-९५ या सुमारास तांबट समाजातल्या श्री. पोटफोडे, श्री. निजामपूरकर, श्री. करडे (श्री. किशोर करडे यांचे आजोबा), श्री. डाखवे आणि श्री. कडू यांनी विकत घेतला. वाडा विकत घेतला तेव्हा तो पडक्या अवस्थेत होता. त्यामुळे नव्या मालकांनी आपापल्या वाट्याला आलेल्या वाड्याची डागडुजी करून तिथे राहायला सुरुवात केली. काहींनी भाडेकरूही ठेवले. त्यांच्याकडेही 'पुणें भोजनगृहा'शी संबंधित कागदपत्रं मिळाली नाहीत. गाईकवाडांचं पुस्तक १८८६ साली प्रकाशित झालं. पुस्तकात पुण्याच्या नव्या मंडईच्या संदर्भातले १८८६ सालच्या जानेवारी महिन्यापर्यंतचे काही उल्लेख आहेत. याचा अर्थ १८८५ सालच्या अखेरपर्यंततरी पुण्यातलं आद्य भोजनगृह कसब्यातल्या पेठ्यांच्या वाड्यात सुरू होतं, असा कयास वाचक बांधू शकतात. मात्र हा कयास 'केसरी'तल्या 'भोजनगृह' या नावाच्या दुसर्‍या अग्रलेखामुळे खोटा ठरतो.

'भोजनगृह' या नावाचा एक अग्रलेख १८८२ सालच्या जानेवारीत 'केसरी'त प्रकाशित झाला, हे आपण पाहिलं आहे. याच नावाचा दुसरा अग्रलेख १० फेब्रूवारी, १८८५ला 'केसरी'त प्रसिद्ध झाला. गमतीचा भाग असा की, या लेखाची नोंद 'केसरी'च्या लेख-सूचीत नाही. दिल्लीला नेहरू मेमोरियल ऍण्ड म्यूझियम लायब्ररीत असलेल्या 'केसरी'च्या संग्रहात हा अंक नसल्याने कदाचित तसं झालं असेल. पुण्यात केसरीवाड्यात मात्र हा अंक आहे. या अंकाची काही पानं फाटल्यावर चिकटवली असल्यानं त्यांवर असलेल्या काळ्या पट्टीमुळे लेखाचा बराच मजकूर वाचता येत नाही. 'केसरी'कार या लेखात म्हणतात -
(शुद्धलेखन मुळाबरहुकूम)

मागें कांही दिवसांपूर्वी याच मथळ्याखालीं आह्मीं कांहीं मजकूर लिहिला होता व अशा गृहाची पुण्यासारख्या शहरांत किती आवश्यकता आहे हें ही दाखविलें होतें. त्याच वेळेस येथें एक छोटेखानी भोजनगृहाची स्थापना होऊन पाश्चात्य चालीप्रमाणें "भोजनगृह" अशी एक मोठी पाटी दारावर झळकत असतांना आह्मीं पाहिली होती. वरील गृह चांगल्या तर्‍हेनें चालेल अशी बरीच खात्री होती; पण काय होत असेल नकळे! ...इंग्रजी धर्तीवर सुरू झालेल्या कितीएक गोष्टीचा आजकाल मागमूससुद्धां सांपडणे कठीण! मग त्यांच्या 'आलबेल'ची वास्तपुस्त कशाला पाहिजे! वरील गृहासारख्या लहानशा कारखान्यासंबंधानेंच पाहिलें तर कित्येक गोष्टीं मनांत धरण्याजोग्या सांपडतील. प्रथमत: शंभर किंवा दोनशे रुपये भांडवल माराकुटानें जमा करून एखादा मनुष्य 'खाणावळ' घालण्याच्या फंदात पडतो. पहिल्या पहिल्यांदा बरेच लोक यावे अशी दृढतर इच्छा असते ह्मणून थोडीशी धस सोसूनही तो मनुष्य जेवणाखाणाचा बातबेत चांगल्या तर्‍हेचा ठेवूं लागतो. पण पुढें होतें काय? आमच्या लोकांच्या चमत्कारिक समजुतीमुळे ते वेळच्या वेळेला पैसे देत नाहींत. महिन्याचे अगाऊ पैसे तर राहूं द्याच. पण महिन्याच्या अखेरीससुद्धां मालकाच्या हातांत संपूर्ण पैसे जाण्याची मारामार पडते. मग पैशाच्या टंचाईमुळे खाणावळीचा मालक अर्थांतच उधारीचा मार्ग स्वीकारतो; ह्मणजे बाजारांत रोख पैसे दिले असतां चार पैशांस मिळणारा जिन्नस त्या मालकास सहा पैशांचें खातें नांवें मांडून मिळतो. असें झालें ह्मणजे ठरलेल्या दरापेक्षां ठरलेल्या अन्नास जास्त पैसे लागूं लागतात. यामुळें तो कमी दरजाचा माल आणूं लागतो, आणि अर्थांतच मग भोजनभाऊ मंडळीची तारांबळ उडून जाते. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे कीं खाणावळवाला आपल्या गिर्‍हाइकांच्या पैशांतूनच आपल्या कुटुंबाची जोगवण करितो व आपला सर्व संसार त्यांच्या माथ्यावर लादतो, यामुळें खाणारास चांगलें अन्न मिळेंनासें होतें. तिसरें असें आहे की खाणावळवाला अज्ञान असल्यामुळें व त्यास मागीलपुढील पोंच बिलकुल नसल्यामुळें आपण घातलेलें सर्व भांडवल वर्ष सहा महिन्यांच्या आंत बाहेर निघावें आणि आपला सर्व व्यवहार फुकटांत चालावा अशी इच्छा धारण करून होतां होईल तितक्या कमी पैशाचें जेवण घालण्याचा बेत करतो.

वर सांगितलेल्या कारणांशिवाय आणखीही पुष्कळ बारीकसारीक कारणें सांगतां येतील. आता ज्याप्रमाणें वरील एकच कारण विद्यमान असतां जेवणाराची गैरसोय होण्याचा संभव आहे त्याप्रमाणेच वरील सर्व कारणांचा एकदम एके वेळीं समेट झाला असून जेवणाचे वेळींच वणिक्‌जनांचा आणि दहीदूध लाकूडवाल्यांच्या शिव्यांचा वर्षाव, घरांतील पोरांचा ऐन दुपारीं भुकेनें झालेला आरडाओरडा, त्याचवेळीं बाईची झालेली तारंबळ, वरण शिजलें आहे नाहीं भातांत कधीं 'मेणवली'; कधीं 'तांदूळवाडीं' कधीं 'घुगर्‍या' असे प्रकार; बुडी मारली तरी डाळीचा रज:कण सापडणार नाहीं अशी अंबाबाई, सतरापंधरा ग्रहणांसहित विराजमान असणारी भास्करकन्या आणि प्रत्यक्ष काशीस्थ भागीरथीसही मागें सारणारें व इंद्रास दुर्लभ असे ताकाचें फुळकवणी, अशी जेवणाची व्यवस्था असल्यावर जेवणारांची केवढी दुर्दशा उडत असेल याची वाचकांनीच कल्पना करावी. या पुण्यनगरींत आह्मी कमींत कमी १० / १५ तरी खाणावळींचा परिचय घेतला असेल, पण १-२ खाणावळींशिवाय आह्मांस कोठेही जेवणाचे सुख असल्याचें स्मरत नाहीं. एका बाईस एकदा रजा दिली कीं पुन: तिचें दर्शन घ्यावे असें स्वप्नांतसुद्धां येत नाहीं. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे पश्चिमेकडील राष्ट्रांत अगर आमच्या देशांत विलायती लोकांनीं घातलेल्या 'हाटेलांत" इतकी चांगल्या तर्‍हेची सोय असते की कांहीं लोक सकुटुंबच खाणावळींत जन्माचे जन्म घालविलेले दृष्टीस पडतात. असें सांगतात कीं फ्रान्स देशांत ८००-१००० पर्यंत लोक खाणावळींत राहतात. इकडे आमच्या इलाख्यांत पाहिले तर ६० लोक झाले कीं अव्यवस्था झालीच!!

हा लेख आगरकरांच्या हातचा आहे, हे लेखाची शैलीच सांगते. १८८१ साली सुरू झालेलं भोजनगृह १८८५ सालच्या फेब्रूवारी महिन्याआधी बंद झालं होतं, हे या लेखातून कळतं. ते बंद होण्यामागची कारणंही आगरकर लेखात सांगतात. ग्राहकांनी पैसे वेळेवर न देणं, चालकांनी जेवणाचा दर्जा न राखणं अशी कारणं एकाच वेळी घडली, आणि भोजनगृह बंद पडलं. बुधवार चौकातून गुरुवार पेठ आणि गुरुवार पेठेतून तांबट आळी हा भोजनगृहाचा प्रवासही याच कारणांमुळे झाला असावा. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. पुण्यातलं पहिलं भोजनगृह हे पाश्चात्य शैलीचं होतं, हे आगरकर सांगतात. म्हणजे रूढार्थानं ती खाणावळ नव्हती. म्हणजे माहवारी मेंब्रांनाच तिथे प्रवेश होता, असं नाही. त्या काळच्या रूढीनुसार तिथला स्वयंपाक सोवळ्यात होत असणार आणि बसायलाही टेबलंखुर्च्या नसतील, पण हव्या त्या वेळी निरनिराळे पदार्थ मिळण्याची सोय तिथे असेल, हे निश्चित. आगरकर लेखात आमटी, भाकरी, ताक या पदार्थांचा उल्लेख करतात, हेही महत्त्वाचं आहे.

'भोजनगृह' नावाच्या दोन्ही लेखांवरून भोजनगृह हे खाणावळ नव्हतं, हे सहज लक्षात येतं. मात्र भोजनगृहाच्या बंद पडण्यामागच्या कारणांची मीमांसा करताना आगरकर 'खाणावळ' हा शब्द वापरतात, कारण खाणावळ ही संस्था तेव्हा मान्यता पावलेली होती आणि भोजनगृह बंद पडलं होतं. १८५०नंतर इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये सर्वसामान्यांना परवडतील, पण जिथे प्रतिष्ठित नागरिकही येतील, अशी खाद्यगृहं एका मागोमाग एक अशी सुरू झाली. या खाद्यगृहांमध्ये जाऊन जेवणं सामान्यांसाठी प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलं. भारतात मात्र युरोपीय जनता घरी किंवा क्लबामध्ये जेवत असे. खाजगी पार्ट्यांमध्ये हा समुदाय एकत्र येई. अशा पार्ट्या क्लबांमध्येच जास्तकरून साजर्‍या केल्या जात. पुढे खाद्यगृहांमधल्या डायनिंग रुमांचा वापर अशा खाजगी पार्ट्यांसाठी होऊ लागला. इंग्लंडमध्ये १८८०-९०च्या सुमारास कुटुंबासह किंवा मित्रमंडळींसह खाद्यगृहात जाऊन एखादा प्रसंग साजरा करण्याची रूढ झालेली पद्धत ब्रिटिश मुंबईत १९१०-२०नंतर पोहोचली. मात्र अशा मोठ्या, युरोपीय खाद्यगृहांमध्ये भारतीयांना सहसा प्रवेश नसे. १९०३ साली टाटांनी ताज महाल हॉटेल सुरू केल्यानंतर श्रीमंत भारतीयांना युरोपीय थाटमाटात जेवता येऊ लागलं. सामान्य भारतीय मात्र घरीच जेवत. लग्न, मुंजी, नवज्योत यांसारख्या समारंभांच्या निमित्तानं एकत्र जेवणी होत. १८६०च्या सुमारास पारशी लग्नं आणि नवज्योत समारंभांसाठी जेवण पुरवणारे केटरर मुंबईत व्यवसाय सुरू करते झाले. असे काही अपवाद वगळता एरवी मुंबईत जो तो आपापलं रांधून जेवी. तिथली कार्यालयं सकाळी साडेदहा किंवा अकराशिवाय सुरू होत नसत. भारतीय कर्मचारी घरून जेवून आणि पुन्हा दुपारसाठी डब्बे घेऊन येत.

पण मुंबईत एकटे जीव अनेक होते. कामाच्या शोधात मुंबईत आलेल्यांची कुटुंबं अनेकदा गावीच राहत. १८७२ साली झालेल्या खानेसुमारीत मुंबईत १००० पुरुषांमागे फक्त ६१२ स्त्रिया असल्याचं आढळतं. १९३१ साली हे गुणोत्तर १००० : ५५४ होतं. या एकट्या पुरुषांच्या जेवणाची सोय खाणावळींमध्ये झाली. मुंबईतली पहिली खाणावळ कधी आणि कोणी सुरू केली, हे सांगणं शक्य नाही. मोल्सवर्थाच्या शब्दकोशात खाणावळीसाठी जेवणावळ, जेवणघर असे शब्द वापरले असून अशी जेवणघरं मुंबईत एतद्देशीयांनी नुकतीच सुरू केलं असल्याचं तो लिहितो. मोल्सवर्थाच्या शब्दकोशाची पहिली आवृत्ती १८२८ साली प्रकाशित झाली आणि तीत जेवणावळ हा शब्द आहे. त्यामुळे मुंबईत एतद्देशीयांची पहिली खाणावळ १८२०-२५च्या सुमारास सुरू झाली असावी, असं अनुमान काढता येतं.

खाणावळ ही संस्था पुण्यातही एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नक्की अस्तित्वात होती. श्री. ना. वि. जोशी यांनी १८६८ साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात पुण्यातल्या खाणावळींबद्दल लिहिलं होतं - 'बहुतकरून दर पेठेस एक दोन खानावळी आहेतच. त्यांतून सर्व बेत यथास्थित असतो. त्या घालणार्‍या बायका बहुतकरून विधवा बाया असतात. या खानावळींत जर कोणी भिडस्त मनुष्य जाईल तर उपाशी परत येईल. त्या बाया पोटभर वाढींतच नाहीत. तेथून जेवून आला ह्मणजे पैशा दोन पैशांचे दाळ मुरमुरे आणून फांकावे लागतात. तेथें जेवण वाढण्याची चाल अशी आहे : प्रथम मूदभर भात व पातळशा भाकरीचा चतकोर तुकडा वाढतात. भात संपला ह्मणजे भाकरी खाण्यास लागावी तों ती संपली नाहीं इतक्यांत ती विचारते कीं, चतकोर आणूं का अर्धी आणूं? अर्धी मागितली ह्मणजे घालून ती संपते तों भात पाहिजे कीं भाकरी आणूं! भाकरी आणा ह्मटलें ह्मणजे चतकोर (ह्या चार चतकोरांत अर्ध्या भाकरीचाही ऐवज नसतो). ती संपली ह्मणजे भात लिंबायेवढा वाढला कीं, पुरे कां, पुरे कां, असें विचारूं लागतात. मग जेवणाराचा जीव कोंडा होऊन पुरें ह्मणावें लागतें. आणि पुरे ह्मटलें त्यांत जर भात हातून सुटला असला तर तो मध्यें हात घालून झेलण्यास त्या मागें पुढें पहाणार नाहींत. जे लोक नेहमी तेथेंच जेवतात त्यांची अशी स्थिती होत नाहीं, ते मागण्यास निर्भीड होतात. लश्करांत व पारशी लोकांकरितां होटेलें (खानावळ्या) आहेत; तेथें उत्कृष्ट बेतबात असून यस्थास्थित भोजन मिळतें.' १८६८ साली पुण्यातल्या पेठांची संख्या लक्षात घेतली, तर त्या सुमारास पुण्यात निदान दहापंधरा खाणावळी अस्तित्वात होत्या.

खाणावळी या पुण्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था होत्या. विद्याप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना पुण्यास यावं लागे. १८८० साली विद्याभ्यासासाठी पुण्याबाहेरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन-चार हजार आहे, अशी १८८५च्या गॅझेटियरात नोंद आहे. ही संख्या १९१० साली दहा हजार होती, असं त्या वर्षीच्या 'ज्ञानप्रकाशा'तली एक बातमी सांगते. बाहेरगावाहून पुण्यात आल्यावर जेवण्यासाठी खाणावळीत जेवणं किंवा वार लावून जेवणं, हे दोन पर्याय समोर असत. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत लिहिल्या गेलेल्या अनेक आत्मचरित्रांमध्ये पुण्यातल्या खाणावळींची वर्णनं आणि उल्लेख सापडतात. अनेक उल्लेख वाईट जेवण, कजाग खाणावळकाकू किंवा सोवळ्याओवळ्याचा त्रास यांबद्दल आहेत. धर्मानंद कोसंबी गोव्याहून पुण्यात आले आणि डॉ. भांडारकरांच्या मदतीनं त्यांचा विद्याभ्यास नगरकरांच्या वाड्यातल्या संस्कृत पाठशाळेत सुरू झाला. बुधवार पेठेतल्या एका खाणावळीत त्यांची जेवणाची व्यवस्था होती. कोसंबींनी तिथे जेवावं, हे काही त्या खाणावळवाल्याला फारसं रुचलं नाही. कारण काय? तर जमीन होती शेणानं सारवलेली. जेवणी झाल्यावर ती पुन्हा शेणानं सारवावी लागे. खाणावळीत जेवायला येणार्‍यांना स्वयंपाक किंवा शेणगोठा करायच्या कामी ब्राह्मणच हवे असत. कोसंबी होते सारस्वत. ते जिथे जेवायला बसतील, तिथली जमीन सारवायची कोणी? खाणावळवाल्यानं अगोदर त्यांना नकारच दिला. मग म्हणाला, 'तुम्ही सारस्वत आहां, तेव्हां तुम्हाला शेण स्वत: सारवावें लागेल'. मग कोसंबींनी त्यांना चार-आठ आणे जास्त द्यायचं कबूल केलं आणि त्यांना खाणावळीत प्रवेश मिळाला. पुढे या खाणावळीचा त्रास वाढत गेल्यावर भांडारकरांनी कोसंबींच्या राहण्याजेवण्याची सोय प्रार्थनासमाजातर्फे केली.

अर्थात असे अनुभव सर्वांनाच येत नसत. पुण्यात निगुतीनं स्वयंपाक करणारे, विद्यार्थ्यांना आणि इतर मेंब्रांना प्रेमानं जेवू घालणारे खाणावळचालकही होते. कोल्हापूरच्या खटल्यात टिळक व आगरकर यांनी तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी डोंगरीच्या तुरुंगात करण्यात आली. १८८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात टिळक आणि आगरकर सुटून आले. जागोजागी त्यांचे जंगी सत्कार करण्यात आले. महात्मा फुल्यांनी खटला सुरू असताना टिळक-आगरकरांना भरपूर मदत केली होती. दोघं तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांचा सत्कार फुल्यांनी केला. पुण्यात शनिवार पेठेत त्या वेळी एक काकू खाणावळ चालवीत असत. टिळक आणि आगरकर यांच्या तुरुंगवासाबद्दल त्यांनी ऐकलं होतंच. पण त्यांना काळजी होती या दोघांच्या प्रकृतीची. तुरुंगात टिळक-आगरकर यांच्या खाण्याचे भारी हाल झाले होते. 'डोंगरीच्या तुरुंगातले आमचे १०१ दिवस' या पुस्तकात आगरकरांनी त्या दिवसांचं सविस्तर वर्णन केलं आहे - 'इतर तुरुंगांत काय व्यवस्था असो ती असो; पण डोंगरीच्या तुरुंगात तरी जातीचा भेदाभेद नाही. आम्ही होतो तोपर्यंत स्वयंपाक करण्याकडे आठ नऊ हिंदू कैद्यांची नेमणूक असे. बंबाने किंवा पोहर्‍याने विहिरीचे पाणी ओढण्याचे काम एक किरिस्ताव व दुसरा मुसलमान अशा दोघांकडे होते. स्वयंपाकाला, भांडी घासण्याला व कैद्यांचे परसाकडणे, तोंड धुणे वगैरेला लागणारे सर्व पाणी त्यांना पुरवावे लागत असे. जेवायला डोंगरीच्या तुरुंगात सकाळी भात आणि डाळ (आमटी) असतात व संध्याकाळी गव्हाची रोटी किंवा बाजरीची भाकरी आणि कसली तरी भाजी असते. आठवड्यातून चार रोट्या आणि तीन भाकरी मिळतात. त्यांपैकी रविवारच्या पोळीस व गुरुवारच्या भाकरीस थोडे तूप चोपडलेले असते. सकाळी भाताबरोबर खाण्यास एक दोन कांदेही मिळतात. डाळीला व संध्याकाळच्या पातळ भाजीला लसणीची फोडणीही असते. कांदा, लसूण खाण्याची ज्यांना सवय नाही, त्यांची तुरुंगात फार उपासमार होते व त्याचमुळे १०१ दिवसांत टिळकांचे २४ पौंड आणि माझे १६ पौंड मांस नाहीसे झाले! तुरुंगात गेल्यावर पहिले काही दिवस संध्याकाळी कांदा बटाट्यांची पातळ भाजी मिळे; पण पुढे एकदा जो मुळ्याचा पाला लागला त्याने आमची बाहेर पडेपर्यंत पाठ पुरवली. ही भाजी इतकी खराब असते की, ती आम्ही कधीच तोंडात घातली नाही. सकाळच्या डाळीपैकी काही डाळ एका मडक्यात राखून ठेवून त्याबरोबर संध्याकाळच्या भाकर्‍या किंवा रोट्या खात असू. तुरुंगात गेल्याबद्दल आम्हास कधीच वाईट वाटले नाही. पण तेथले अन्न पुढे आले म्हणजे वाईट वाटे. १८७६ सालापूर्वी बिनमजुरीच्या कैद्यांस आपापले जेवण हवे असल्यास बाहेरून आणविण्याची परवानगी असे, असे सांगतात. आमच्या वेळेस असे असते तर आम्ही कदाचित वजनाने एक दोन पौंड वाढून बाहेर पडलो असतो! तुरुंगातील धान्य हलक्या दराचे असते. इतकेच नाही, तर अन्नही फार वाईट रीतीने तयार करतात. तेथे एक विशेष खप म्हणजे झाडा बंद होण्याच्या औषधाचा असतो. आम्हापैकी प्रत्येकास हागवणीची पाळी द्यावी लागली!'

तुरुंगातल्या निकृष्ट अन्नाची टिळक-आगरकर यांना अर्थातच सवय नव्हती. डेक्कन कॉलेजात असताना टिळक स्वत: तिथल्या भोजनगृहाच्या व्यवस्थेवर लक्ष देऊन असत. त्यांचा आहार भक्कम होता. आगरकरांची प्रकृती तशीही अशक्त. तुरुंगातलं हे जेवण त्यांना खाववत नसे. टिळक मग आपल्या परममित्राला आपल्या वाट्यास आलेल्या भाकरींचा मऊ भाग देत, स्वत: भाकरीच्या कडा आणि तिखट वरण असं जेवत. तुरुंगवासात दोघांचंही वजन कमी झालं. या दोन वीरांच्या प्रकृतीची चर्चा पुण्यात होतीच. खाणावळकाकूंनी मग या दोघांना जेवायला बोलावलं. त्यांच्यासाठी त्या तेवढंच करू शकत होत्या. टिळक आणि आगरकर काकूंच्या खाणावळीत पोटभर जेवले. न्यू इंग्लिश स्कूलचे अनेक शिक्षक मग काकूंच्याच खाणावळीत जेवू लागले. काकूंच्या हातचं सुग्रास जेवण आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव यांमुळे आगरकर भारावले. त्यांनी काकूंना 'केसरी'त जाहीर पदवी दिली - 'आर्यभूषण काकू'. पुढे मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर टिळक एकदा सांगलीस गेले होते. आर्यभूषण काकूंची मुलगी किंवा नात या गावातच राहते, ही बातमी त्यांना तिथे कळली. लगेच टिळकांनी तिचा पत्ता शोधून काढला आणि ते स्वत: तिच्या घरी गेले. तिचा साडीचोळी देऊन सत्कार केला. टिळकांनी भेटीस बोलावलं आहे, असा निरोप मिळताच ती व तिचे पती लगेच टिळकांना भेटायला आले असते. पण असं न करता टिळक स्वत: तिच्या घरी गेले, तिच्या हातचं जेवले. विश्राम बेडेकरांच्या 'टिळक आणि आगरकर' या नाटकात या खाणावळकाकू भेटतात.

त्या काळच्या अनेक खाणावळींचे उल्लेख चरित्रांत आणि आत्मचरित्रांत सापडतात. शुक्रवारात १८८० सालच्या सुमारास अंताजीपंत कानिटकरांची खाणावळ होती. एका विधवा स्त्रीच्या मदतीनं ते ही खाणावळ चालवत असत. ही खाणावळ बर्‍यापैकी चालत असे. बुधवारात करप्यांची खाणावळही प्रसिद्ध होती. सदाशिव पेठेत सांगलीकरांचा वाडा होता. या वाड्याच्या पश्चिमेला आठ-दहा खोल्यांची एक चाळ होती. या चाळीत द्वारकाताई नावाच्या एका विधवा स्त्रीनं खाणावळ चालवली होती. गुरुवर्य श्री. म. माटे आणि ल. र. पांगारकर असे दोघंही त्यांच्या विद्यार्थिकाळात, म्हणजे १८९०च्या सुमारास या खाणावळीत जेवत. पांगारकरांचं पाठांतर अफाट होतं. जेवायला अवकाश आहे, असं दिसलं की इकडेतिकडे फेर्‍या मारत पांगारकर मोरोपंतांच्या शे-दोनशे आर्या सहज म्हणत असत. पांगारकर द्वारकाताईंना 'अन्नपूर्णाकाकू' असं म्हणत असत. या काकूंच्या हातच्या स्वयंपाकाला अप्रतिम चव होती. वाढताना हातही सढळ असे. मात्र त्या अतिशय फटकळ होत्या. महिन्याच्या पाच तारखेच्या आत त्यांना हातात पैसे हवे असत. पांगारकरांवर मात्र त्यांनी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं. एकदा पांगारकर तीन महिने पैसे देऊ शकले नव्हते, तरी एका शब्दानं काकूंनी त्यांना जाणीव करून दिली नाही. पांगारकरांना कोणी उलटून बोललेलं त्यांना आवडत नसे. पांगारकर पुढे संगमनेरला गेले, बी.ए. झाले. पुण्यात त्यांच्या व्याख्यानांचा धडाका सुरू झाला. काकूंनी त्यांना एक दिवस निरोप पाठवून बोलवून घेतलं आणि मेजवानी दिली. चिं. वि. जोश्यांच्या लेखांमध्ये, कथांमध्ये खाणावळी चालवणार्‍या आज्या आणि काकवा भेटतात. 'फुटबॉल घ्या', असं म्हणत त्या टम्म फुगलेली पोळी आपल्याकडे जेवायला आलेल्या मेंब्राच्या पानात वाढतात. त्याच्याशी त्याच्या आणि आपल्या सुखदु:खाविषयी किंवा अलीकडच्या तरुणांच्या सवयींविषयी, नाटकांच्या चमत्कारिक नावांविषयी गप्पा मारतात. मेंब्रं फार गलका करू लागली म्हणजे त्या 'आरडर, आरडर' असं म्हणून त्या पुन्हा बोलण्याची सारी सूत्रं आपल्याकडे घेतात. 'केसरी'चं संपादकत्व भूषवलेल्या श्री. ज. स. करंदीकरांनी १८९०च्या सुमारास पुण्यात असलेल्या खाणावळींबद्दल लिहिलं आहे - 'त्या वेळच्या ब्राह्मणांच्या खाणावळींतून सोंवळ्यांनेच जेवावयास बसण्याची पद्धत होती. एखादा सुधारक ओंवळ्याने बसण्याचा हट्ट धरणारा भेटलाच तर त्याला मराठ्यांच्या पंक्तीला बसावें लागे. यावरून ब्राह्मणांची व मराठ्यांची पंगत वेगवेगळी असे हें सहजच ध्यानांत येईल. खाणावळीचा कमींत कमी दर महिना पांच रुपये असे. सात रुपयांत श्रीमंती थाटाचे तूप-पोळीचें जेवण मिळे. बहुतेक विद्यार्थी पांच रुपयांत भागवीत. कांही जण स्वत:च्या खर्चाने आपली तुपाची वाटी घेऊन येत. पण त्यापेक्षां सकाळीं गवळ्याच्या घरी जाऊन ताजें धारोष्ण दूध पिण्याचा प्रघात विशेष असे. दुधाचा भाव रुपयाला आठ शेर असल्यानें आपापल्या शक्तीप्रमाणें अर्धा आणा किंवा एक आणा टाकून पावशेर दूध किंवा अच्छेर दूध पिणारें विद्यार्थी पुष्कळ असत. उन्हाळ्यांत दुधाऐवजीं उंसाचा रस पिण्याचाहि प्रघात असे. परंतु दुधाचा जसा कायम रतीब असे तसा कांही रसाचा रतीब नसें. खाणावळवाल्यांत त्या वेळीं अद्यापि काळ्या बाजारवाल्यांची वृत्ति संचारली नव्हती. त्यामुळें खाणावळींत जेवणारांनासुद्धा घरच्याप्रमाणें सणावाराच्या दिवशी तूप-पोळीचें जेवण मिळें. आषाढी, कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्र या दिवशीं फलाहार करावाच लागे, पण दुसरे दिवशीं घरच्याप्रमाणें पारणेंहि सोडण्याची सोय असें.'

एकुणात काय, तर 'भोजनगृह' या लेखात आगरकरांनी 'खाणावळ' हा शब्द वापरण्यामागे ही संस्था 'भोजनगृह' या अकाली बंद पडलेल्या संस्थेपेक्षा वाचकांच्या अधिक ओळखीची असणं, हे कारण असावं. आगरकर आपल्या लेखात पुढे लिहितात -
(शुद्धलेखन मुळाबरहुकूम)

आमच्या लोकांची एक मोठी विलक्षण चाल काय आहे की होतां होईल तितकें करून पैशाचा संचय करावयाचा. ह्मणजे ते पैसे जमीनींत पुरून ठेवावयाचे, किंवा सोन्यारुप्याचे दागिने करून आपल्या युवतींस सुशोभित करावयाचें आणि त्या पासून उत्पन्न होणार्‍या सुखाचें क्षणभर सेवन करावयाचें. कदाचित्‌ ही चाल पेशवाईंत अगर मोगल बादशाहींत जी अंदाधुंदी चालत असें, पैशाअडक्याचे संरक्षणाची मारामार पडत असें त्यायोगानें पडली असावीं, पण ते दिवस आतां गेले. इंग्रजी राज्यात काठीस सोनें बांधून रामेश्वरापासून हिमाचलापर्यंत जाण्यास हरकत नाहीं. असे असतांही दागिन्याचा षोक तसाच कायम राहवा हें आश्चर्य नव्हे काय? हें सांगण्याचें कारण येवढेंच कीं आमच्यांमधील पुष्कळ लोक जें वाजवी देणें निघत असेल तें वेळेवर न देतां या दुष्ट दागिन्यांच्या भरीस पडतात. ही गिर्‍हाइकाच्या संबंधाची गोष्ट झाली. भोजनगृहाच्या मालकाची काय दशा असते ते आह्मी मागें सांगितलेंच आहे. याकरितां असें झालें पाहिजें कीं चांगले, समजदार आणि हुशार लोक यांच्या हातांत असल्या प्रकारचा धंदा गेला पाहिजे. आलेलें घबाड हातचें जाऊं द्यावयाचें नाहीं, होतां होईल तितकें त्याचें मुंडासे पटकावून घ्यावयाचें ही व्यापाराची तर्‍हा सुटल्याशिवाय कोणताही धंदा सुयंत्र चालणे नाहीं. याकरितां वरील व्यापारांत शिकलेले व अर्थशास्त्राची माहिती ज्यांस उत्तम असेल असेच लोक पडले पाहिजेत, आणि असे लोक तेथें आल्यास पुण्यासारख्या शहरांत एक टोलेजंग 'होटेल' उभे राहून त्यांत बाहेरगांवच्या लोकांची चांगली सोय होणारी आहे. हल्लीं पैसे असून चांगले जेवण मिळण्याची मारामार पडते. ही दुर्दशा केंव्हा नाहींशी होईल ती होवो. सध्या विद्यार्थी वगैरे लोकांचे हाल होत आहेत हे तेवढें खरे.

हा चमत्कार काय आहे कीं हा धंदा वाईट व कमी अब्रूचा अशी समजूत आमच्यांतून गेलेली दिसत नाहीं. आह्मीं बर्‍याच लोकांस विचारलें पण सर्वत्र असा जवाभ ऐकला कीं वेळ पडल्यास १२ रुपयांची कारकुनी करीन पण हा धंदा मी करणार नाहीं. या धंद्यात नीचत्व कोठें आहे हें आह्मांस समजत नाहीं. ज्याप्रमाणें 'स्टेशनरी' वगैरे दुकानांचा धंदा त्याप्रमाणें हा आहे. चांगली व्यवस्था वगैरे राहिल्यास मालकास ५०० रुपये भांडवलावर दरमहा ३० रुपये फायदा मिळण्यास हरकत नाहीं असें हिशेबांतीं आह्मीं पाहिलें आहे. अशा किफायतीचा धंदा आजपर्यंत चांगल्या माणसांच्या हातीं गेला नाहीं ही दु:खाची गोष्ट होय. ज्यापाशीं १००-५०० रुपयांचीं माया आहें व ज्यास घरबसल्या २५-३० रुपये मिळविण्याची इच्छा आहे, त्याणें हा धंदा काढून त्याचा व्यवस्थेनें व चौकसपणानें बंदोबस्त ठेविला असतां त्याचा ह्या धंद्यांत अतोनात फायदा होईल यात बिलकुल शंका नाही.

ज्ञानप्रसार आणि औद्योगिक वाढ यांच्या जोरावरच स्वातंत्र्य मिळवता येईल, हे 'केसरी'च्या सर्व मालकांनी ओळखलं होतं आणि म्हणून 'केसरी'कारांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवला. 'संतति व संपत्ती', 'व्यापाराशिवाय तरणोपाय नाही', दागिन्यांचा सोस', 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' अशा अनेक लेखांमधून 'केसरी'नं स्वदेशी व्यवसायांच्या भरभराटीसाठी व्यवहार्य व विधायक सूचना केल्या. सुशिक्षित तरुणांनी सरकारी नोकर्‍या न करता स्वतंत्र व्यवसाय करावा, असं सांगून त्यासाठी उपाय सुचवले. दागिन्यांमध्ये पैसे गुंतवून न ठेवता तोच पैसा व्यापारात किंवा शेतीत गुंतवल्यास फायद्याचं ठरेल, हे आगरकर अनेकदा लेखांमधून सांगत राहिले. व्यवसायासाठी लागणारं भांडवल भागीदारीतून जमा करून नफ्याची वाटणी त्या प्रमाणात कशी करावी, हेही त्यांनी सांगितलं. 'केसरी'नं वेळोवेळी स्वदेशी उद्योगधंद्यांची दखल घेतली, त्यांना प्रसिद्धी दिली, हे अगोदर लिहिलंच आहे. 'केसरी'नं केवळ महाराष्ट्रीय उद्योजकांबद्दलच लिहिलं असं नाही. मुंबई, पुणे इथे येऊन व्यवसाय करणार्‍या गुजराती, पंजाबी मंडळींबद्दलही आवर्जून लिहिलं. उदाहरणार्थ, ३१ ऑक्टोबर, १८८२च्या केसरीत आबाजी मगनलाल आणि कंपनीबद्दल लिहून आलं आहे. 'यूरोपियन लोकांच्या साहसी व नेकदार पद्धतीवर चालू केलेल्या अडतीच्या धंद्यास' चांगला आश्रय मिळाल्यास 'दुसर्‍या प्रकारचे साहसाचे, मेहनतीचे व नवीन हतवटीचे धंदे सुरू करण्यास दुसर्‍या लोकांस उत्तेजन येईल' असं 'केसरी'कर्त्यांनी लिहिलं आहे. १८७५ सालानंतर पुण्यात जे स्वदेशी उद्योग उभे राहिले, त्यांत 'केसरी'चे भागीदार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होते. 'भोजनगृह' हा कारखानाही पुण्यातल्या स्वदेशी उद्योगांच्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा होता. आणि म्हणूनच 'भोजनगृह' या संस्थेचं सामाजिक महत्त्व १८८५ सालच्या लेखात आगरकरांनी पुन्हा सांगितलं. भोजनगृह या संस्थेची उपयुक्तता सांगून ते थांबले नाहीत, तर पुण्यासारख्या शहरात मोठाली भोजनगृहं असण्यासाठी नक्की काय करावं लागेल, हे त्यांनी मांडलं. त्या काळी पुण्याची लोकसंख्या एक लाखाच्या घरात होती. या लोकसंख्येसाठी पुण्यात चांगलं भोजनगृह नव्हतं. पुण्यात भोजनगृहाची त्यांना जाणवणारी निकड पराकोटीची असावी, कारण १ मार्च, १८८७ रोजी 'केसरी'त पुन्हा एकदा 'भोजनगृह' या नावाचा लेख प्रकाशित करण्यात आला.

हा लेख महत्त्वाचा आहे, कारण भोजनगृह या संस्थेची आर्थिक व सामाजिक निकड, विद्यार्थ्यांच्या उत्तम भवितव्यासाठी खात्रीच्या भोजनव्यवस्थेची गरज, नोकरी करण्यापेक्षा भोजनगृह अथवा विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग-हाऊस सुरू करण्यातली उपयुक्तता अशा अनेक बाबींना हा लेख स्पर्श करतो. विष्णुशास्त्र्यांनी लिहिलेल्या लेखात भोजनगृहाची सर्वसामान्य उपयुक्तता पटवून देण्याचा प्रयत्न होता. आगरकरांनी लिहिलेल्या पहिल्या लेखात भोजनगृह बंद का पडलं, याचा ऊहापोह केला होता. या लेखात मात्र भोजनगृह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं कसं, यावरच भर दिला आहे. 'भोजनगृहासारख्या विषयाकडे मधून मधून वळण्याचा आमचा संप्रदाय आहे', असं लिहून लेखक पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येकडे आणि या विद्यार्थ्यांच्या खाणावळींत होणार्‍या आबाळीकडे लक्ष वेधतो. नोकरीसाठी सरकारपुढे हात पसरण्यापेक्षा भोजनगृहाचा व्यवसाय करावा, असं लेखक सुचवतो. एल्फिन्स्टन व डेक्कन कॉलेजांप्रमाणेच पुण्यात विद्यार्थ्यांसाठी भोजनवसतिगृह सुरू करणं कसं आवश्यक आहे, हे लिहून लेखक हा व्यवसाय अजिबात 'हलकट' नसल्याची व 'अन्नविक्रयात पाप नसण्याची' ग्वाही देतो. हा व्यवसाय सुरू केल्यानं आर्थिक उत्पन्नाचा एक नवा स्रोत मिळेलच, शिवाय विद्यार्थ्यांची सोय होऊन देशसेवेस हातभार लागेल, असं लेखक तळमळीनं सांगतो. 'भोजनगृहाची संस्था सुरू करून तीस कायमचें स्वरूप येईल अशी तजवीज लवकर करण्याची' सूचना लेखक लेखाच्या शेवटी करतो. हा लेखही आगरकरांच्या हातचा आहे, हे नक्की. लेखाची भाषा, शैली आगरकरांची आहे, हे स्पष्टपणे दिसतंच, पण आगरकरांना एलफिन्स्टन कॉलेजबद्दल असणारं आकर्षण आणि प्रेमही या लेखात पुन्हा एकदा दिसून येतं. आगरकर काही एलफिन्स्टन कॉलेजात शिकले नव्हते, मात्र त्यांच्या लेखांमध्ये आणि त्यांनी आपल्या मामांना लिहिलेल्या पत्रांमध्ये एलफिन्स्टन कॉलेजाचे उल्लेख अनेकदा सापडतात. १९ नोव्हेंबर, १८८२ रोजी दत्तोपंत भागवत या आगरकरांच्या मामांनी त्यांना पत्र लिहिलं. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कुलात एलफिन्स्टन कॉलेजात आहे तशी लायब्ररी असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. दत्तोपंतांनी मग विष्णु मोरेश्वर महाजनी यांच्या नावानं देणगी पाठवली. आगरकर आणि दत्तोपंत यांच्या पत्रव्यवहारात अनेकदा एलफिन्स्टन कॉलेजाचे उल्लेख येतात. तिथे आहेत त्या सोयी पुण्यात आपल्या शाळाकॉलेजात असाव्यात, असं त्यांना प्रकर्षानं वाटायचं. आगरकरांनी हा लेख लिहिला, तेव्हा विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगं पुण्यात सुरू झाली होती. पण आपल्या लेखात त्यांनी या बोर्डिंगांचा उल्लेख केलेला नाही. बोर्डिंगात विद्यार्थ्यानं राहणं अपेक्षित होतं. तिथे ठरलेल्या वेळीच विद्यार्थ्यांना जेवण मिळे. आगरकरांना हे अभिप्रेत नसावं. हव्या त्या वेळी भोजनगृहात जाऊन जेवता येण्याची सोय आगरकरांना हवी होती. हा लेख वाचताना आगरकरांची विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्याबद्दलची कळकळ आणि एक नवा व्यवसाय खुणावत असतानाही तो करण्यास तयार नसलेल्या सुशिक्षितांबद्दलचं त्यांचं नैराश्य सतत जाणवत राहतात.

'पुणें भोजनगृह' बंद झाल्यावर पुढे बराच काळ पुण्यात भोजनगृह नव्हतं. ज. स. करंदीकर, के. रा. कानिटकर यांनी आपल्या आठवणींत १८९०च्या सुमारास पुण्यात एकही खाद्यगृह नसल्याचं लिहून ठेवलं आहे. १८९२ साली माणकेश्वराच्या वाड्यात (म्हणजे आता जिथे वसंत टॉकिज आहे) साळवेकरांनी 'अन्नपूर्णागृह' ('सरदारगृह' हे पुण्यातलंच नंतरचं नाव) सुरू केलं. १८९७ साली प्लेगच्या साथीमुळे 'सरदारगृह' मुंबईस हललं. टिळकांचा मृत्यू या सरदारगृहात झाला. एक अत्यंत महत्त्वाची बाब इथे नोंदवाविशी वाटते. १८८५ साली प्रकाशित झालेल्या पुण्याच्या गॅझेटियरात पुणे भोजनगृहाचा उल्लेख नाही. १९३७ साली कुण्या एका पारश्यानं छावणी परिसरात भोजनगृह सुरू केलं, पण ब्रिटिशांनी त्याचा ताबा घेऊन तिथे सैनिकांसाठी मेस सुरू केली, छावणी परिसरातली भोजन-वसतिगृह, पुण्यातले भाजीविके, दूध - लोणी-विक्रेते, खाटीक, हलवाई यांची आकडेवारी (अनुक्रमे ६५२, ३१५, १३१, २३४) अशी सगळी तपशीलवार माहिती गॅझेटियरात आहे. पण भोजनगृहाच्या सुरू होण्याचे, स्थलांतराचे, ते बंद पडण्याचे उल्लेख मात्र नाहीत. असो.

नारायण रामचंद्र आणि मंडळींनी सुरू केलेलं 'पुणें भोजनगृह' बंद पडल्याचं १८८५ आणि १८८७ सालातले लेख सांगतात. मात्र या लेखांत १८८१ साली सुरू झालेल्या भोजनगृहाचे तपशील नसल्यानं ते सुरू करणारे नारायण रामचंद्र कोण, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. 'पुणें भोजनगृहा'च्या कुठल्याच जाहिरातीत नारायण रामचंद्र यांच्या आडनावाचा उल्लेख नाही. नारायण रामचंद्र आणि मंडळी या नावानंच सगळ्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. त्या काळी आडनाव न लावता फक्त स्वत:चं व वडिलांचं नाव वापरणं प्रचलित होतं. विद्यापीठांच्या स्थापनेनंतर आडनावं लावण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली. त्यामुळे या जाहिरातीत आडनाव नसणं यात वावगं काही नाही. पण मग पुण्यातलं पहिलं भोजनगृह सुरू करणारे हे नारायण रामचंद्र नेमके कोण? भोजनगृहाच्या जाहिरातीत ते ब्राह्मणांसाठी असल्याचं स्पष्टपणे लिहिलं आहे. त्याअर्थी नारायण रामचंद्र हे ब्राह्मण होते. किंबहुना ते चित्पावन असण्याचीच शक्यता जास्त, कारण गॅझेटियरमधल्या नोंदी, पुणे नगरपालिकेचे वृत्तांत आणि तत्कालीन वर्तमानपत्रं यांचा आढावा घेतला तर १८७० - १९०० या काळात चित्पावनांच्या हाती ब्राह्मणी पुण्यातलं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांच्या नाड्या एकवटल्या होत्या, हे लक्षात येतं. शिवाय विष्णुशास्त्र्यांचे बहुतेक सर्व सहकारी, मित्र हे चित्पावन ब्राह्मण होते. त्या अर्थी 'भोजनगृहा'चे संचालक असलेले नारायण रामचंद्र हे कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असण्याची दाट शक्यता आहे.

नारायण रामचंद्रांचा शोध घ्यायला मी सुरुवात केली 'केसरी', 'ज्ञानप्रकाश', 'वार्तानिधी', 'जगद्धितेच्छु', 'इंदुप्रकाश', 'नेटिव्ह ओपिनियन' अशा वर्तमानपत्रांतून आणि नारायण रामचंद्रांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या वारसांशी संपर्क साधण्याच्या कामी आले कुलवृतांत [१३]. १८८० ते १९४० या काळात प्रकाशित झालेल्या या वर्तमानपत्रांमध्ये नारायण रामचंद्र या नावाच्या काही व्यक्ती सापडतात. 'केसरी'त त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल बातम्या आहेत. काहींच्या मृत्यूच्या बातम्या आहेत. नारायण रामचंद्र केळकर यांचा सावंतवाडीला लाकडी, रंगीत मालाचा कारखाना होता. दुसर्‍या एका नारायण रामचंद्र केळकरांचा कनौजला सुगंधी मालाचा कारखाना होता. नारायण रामचंद्र गोगटे यांचा दापोलीला आरारुटाचा कारखाना होता. या तिन्ही कारखान्यांची माहिती, अर्थातच वेगवेगळ्या वेळी, 'केसरी'त छापून आली होती. नारायण रामचंद्र सोहोनी यांचा मुंबईत छापखाना व प्रकाशनव्यवसाय होता. नारायण रामचंद्र ओक मुंबईत कागदाचा व्यवसाय करीत. या दोघांच्या मृत्यूच्या बातम्या केसरीत छापून आल्या होत्या. नारायण रामचंद्र गोगट्यांची पुण्यात आरारुटाच्या कारखानदारीबद्दल दोनतीन व्याख्यानं झाली, त्याचे वृत्तांतही १८८१ - १८९० या काळातल्या केसरीत आहेत. १८८८ सालच्या 'केसरी'त नारायण रामचंद्र गोगट्यांना आरारुटाची इंग्लंडास निर्यात करण्याची परवानगी मिळाली असून मुंबईच्या श्री. रा. रा. दाजीसाहेब खरे यांनी या उद्योगात गुंतवणूक केल्याची बातमी आहे. १८८९ सालच्या 'नेटिव्ह ओपिनियन' या वर्तमानपत्रात गोगट्यांच्या आरारुटाची जाहिरात बघायला मिळते. पुढे 'सुधारका'तही या जाहिराती दिसतात. जी. के. आणि कंपनीचें हे आरारूट हलकें, पौष्टिक आणि पाचक असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे. कंपनीच्या नावातला जी म्हणजे गोगटे आणि के म्हणजे खरे असावा. या जाहिरातीतही गोगटे दापोलीचे असल्याचा उल्लेख आहे, शिवाय ही जाहिरात प्रसिद्ध झाली त्याआधी तीन वर्षं त्यांनी सरकारला आरारुटाचा पुरवठा केला असल्याचं जाहिरातीत म्हटलं आहे. नारायण रामचंद्र गोगटे यांच्या मृत्यूची बातमी ६ / २ / १९२३च्या केसरीत वाचावयास मिळते. त्यांनी दापोलीत बोर्डिंग हाऊस आणि हायस्कूल स्थापन केल्याची माहिती बातमीत आहे. दापोली बोर्डिंग हाउसाच्या अनेक जाहिराती १९१० सालापासून पुढे केसरीत वाचायला मिळतात. विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर या तिघांचाही रत्नागिरीशी निकटचा संबंध होता. शिवाय विष्णुशास्त्र्यांच्या पत्नी माहेरच्या गोगटे. नारायण रामचंद्र गोगटे दापोलीचे. आणि त्यांच्या उद्योगात पैसे गुंतवणारे दाजीसाहेब खरे हे टिळकांचे परममित्र. दोघंही डेक्कन कॉलेजात शिकायला एकत्र होते. भोजनगृहाविषयी अग्रलेख छापून येण्यामागे हे संबंध कारणीभूत असण्याची शक्यता असली, तरी 'केसरी'तल्या बातम्यांनुसार गोगट्यांचे उद्योग हे कायमच दापोलीत होते. १८८३ साली पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचं जे भाषण झालं, त्या भाषणाच्या वृत्तांतातही त्यांच्या दापोलीच्या व्यवसायाचाच उल्लेख आहे. त्यामुळे दापोलीत राहून त्या काळी पुण्यात त्यांनी भोजनगृह स्थापन केलं असेल, अशी शक्यता नाही, कारण संपर्काची साधनं अत्यंत मर्यादित असल्यानं एका गावी राहून दुसर्‍या गावातल्या व्यवसायाकडे लक्ष ठेवणं अशक्य होतं. त्या अर्थी पुणे भोजनगृहाचा नारायण रामचंद्र गोगट्यांशी संबंध नव्हता, असं समजायला हरकत नाही. तरीही नारायण रामचंद्र गोगट्यांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला. गोगटे कुलवृत्तांतात दापोलीच्या नारायण रामचंद्र गोगट्यांचा उल्लेख नाही. गोगटे कुलमंडळाकडेही त्यांच्याबद्दल माहिती नाही. या गोगट्यांचा बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. रावसाहेब गोगटे यांच्याशी काही संबंध होता का, याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. रावसाहेब गोगट्यांचा जन्म आगरकरांच्या टेंभू गावचा. पण गोगटे आणि भोजनगृह यांचा संबंध असल्याचा एकही पुरावा सापडला नाही.

नारायण रामचंद्र केळकर, सोहोनी, ओक यांच्याबाबतीतही कुलवृत्तांत, 'केसरी'तल्या बातम्या आणि जाहिराती यांच्या आधारे त्यांचा पुण्यातल्या भोजनगृहाशी काही संबंध नव्हता, हे गृहीत धरता येतं. 'केसरी'त अजून एका नारायण रामचंद्रांचा उल्लेख सापडतो. नारायण रामचंद्र उर्फ नानबा गोखले हे नट होते. लोकमान्य टिळकांचे ते परमभक्त होते. त्यांनी 'लोकमान्य नाटक मंडळी' स्थापन केली होती. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर टिळक स्मारक मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी भरघोस देणगी दिली होती. नट आणि नाटककंपनीचे संचालक म्हणून नाव कमावलेल्या नानबांनी भोजनगृह चालवण्याची शक्यता अगदीच नगण्य होती.

पुणे नगरपालिकेचे १८७९पासूनचे बहुतेक सर्व वार्षिक अहवाल गोखले इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहेत. या अहवालांमध्ये काही नावं सापडतात. १८७९ साली नारायण रामचंद्र दीक्षित यांच्या घराची काही जागा नगरपालिकेने रस्तारुंदीकरणासाठी ताब्यात घेतली. १८९५ साली नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या वेळी नारायण रामचंद्र आळवणी यांनी एका उमेदवाराचं नाव सुचवलं होतं. टेलिफोन डिरेक्टरीतून आळवणी हे आडनाव शोधून नारायण रामचंद्रांच्या सध्याच्या पिढीशी संपर्क साधल्यावर कळलं की, नारायण रामचंद्र आळवणी भि़क्षुकी करत, त्यांचा हॉटेल व्यवसायाशी संबंध नव्हता, काही काळ ते मोदी गणपतीचे पुजारी होते. नारायण रामचंद्र दीक्षित आणि नारायण रामचंद्र गोखले यांचाही कधी हॉटेल व्यवसायाशी संबंध आला नव्हता, हे त्यांच्या वंशजांकडून कळलं.

याखेरीज कुलवृत्तांतांमधली नावंही मी तपासली. नारायण आणि रामचंद्र ही नावं अतिशय प्रचलित असल्यामुळे नारायण रामचंद्र प्रत्येक कुळात अनेक होते. त्या सर्व कुळांमधल्या १८८१च्या सुमारास कार्यरत असणार्‍या, पुण्यात राहणार्‍या आणि स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या नारायण रामचंद्रांची माहिती शोधायची होती. कुलवृत्तांतांमध्ये नारायण रामचंद्र या नावाच्या अनेक व्यक्ती असल्यानं त्यांची माहिती पडताळून त्यांच्या वंशजांशी संपर्क साधणं, हे वेळखाऊ काम होतं. मात्र बहुतेक सगळे कुलवृत्तांत तपासून झाले तरी भोजनगृहाचे संचालक असलेले नारायण रामचंद्र मला सापडेनात.

पुढे जाण्याचे तमाम मार्ग बंद झालेले दिसत असताना एक दिवस अचानक 'केसरी'चे जुने अंक धुंडाळताना महत्त्वाची माहिती हाती लागली. २५ जानेवारी आणि २२ फेब्रुवारी, १८८१ रोजी 'केसरी'त त्या वर्षीची वर्गणी भरलेल्यांच्या तीन पानी याद्या प्रकाशित झाल्या होत्या. 'केसरी'चे सर्व अंक दोनदा नजरेखालून घालूनही नेमकं या याद्यांकडे माझं दुर्लक्ष झालं होतं. या यादीत वडोदर्‍याचं आणि इंदूरचं राजघराणं होतं. मुजुमदार, किबे, परांजपे, नातू असे सरदार होते. महादेव गोविंद रानडे, मोरेश्वर महादेव कुंटे असे पुण्यातले प्रतिष्ठित होते. पुण्याबाहेरची बरीच मंडळी होती. 'केसरी'ची वार्षिक वर्गणी भरणार्‍या वर्गणीदारांच्या या यादीत नारायण रामचंद्र मात्र एकच होते - नारायण रामचंद्र पोंगशे. वर्गणीदाखल त्यांनी एक रुपया केसरीच्या कार्यालयात समक्ष आणून दिला होता.

पुण्याच्या चित्पावन संघात पोंक्षे कुलवृत्तांत उपलब्ध नव्हता. भारत इतिहास संशोधन मंडळात तो मिळाला आणि त्यात १८८१ साली 'केसरी'चे वर्गणीदार असलेल्या नारायण रामचंद्र पोंक्षे यांची माहितीही मिळाली. ही माहिती अतिशय रोचक आहे - 'जन्म ज्येष्ठ शु॥ १४ सोमवार शके १७७१, मृत्यु कार्तिक शु॥ ८ शनिवार शके १८४१ ता. १/११/१९१९. वय ७०. वृद्धापकाळ व मुळव्याध यानें ५५१ सदाशिव पेठ पुणें २. शिक्षण मॅट्रिकपर्यंत, कांही दिवस सरकारी नोकरी केली. पण पारतंत्र्य नकोसें वाटून नोकरी सोडून स्वतंत्र किराणा मालाचें दुकान (बुधवार पेठ बाहुली हौदाजवळ) ३५ वर्षें इमानें चालविलें व यांचे सत्यनिष्ठेंनें उदयकाळांत ५५०/५५१ सदाशिव पेठ, (पुणें २) हें घर खरेदी करून त्यांत मुलांमंडळींसह वास्तव्य केलें. थंड पाण्यानें नेहमीं पहाटें सदाशिवपेठ हौदावर स्नान करून स्वत: बुधवार कोतवालचावडीसमोर दुकानीं झाड सारव, स्वच्छता ठेऊन दुकान चालविलें. साधीं राहणी. श्रीनारायण भक्ति. यांनीं काशी यात्रा केली होती.'

पोंक्षे कुलवृत्तांतातली नारायण रामचंद्रांची माहिती ते पुणें भोजनगृहाचे संस्थापक असावेत, हा कयास बांधण्यास मदत करते. नारायण रामचंद्र पोंक्षे यांनी सरकारी नोकरी सोडली होती. सरकारी नोकरीवर लाथ मारून स्वतंत्र व्यवसाय सुरू करा, हे 'केसरी'चे संपादक आणि संचालक वारंवार सांगत असत. खुद्द विष्णुशास्त्र्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्यानं त्यांना सरकारी नोकरी नाकारणार्‍यांबद्दल विशेष कौतुक होतं. नारायण रामचंद्र पोंक्ष्यांनीही सरकारी नोकरी सोडली होती. 'केसरी'च्या संचालकांना पोंक्ष्यांबद्दल आपुलकी वाटण्यास हे एक मोठं कारण असावं. शिवाय नारायण रामचंद्र पोंक्षे यांचा जन्म १८४९ सालचा. विष्णुशास्त्री १८५० सालचे. दोघंही समवयस्क. पोंक्षे कुटुंब अगोदर द्रविडांच्या वाड्यात राहत असे. द्रविड कुटुंब अतिशय धार्मिक आणि पुण्यात प्रतिष्ठा मिळवलेलं असं होतं. चिपळूणकर कुटुंबाचा द्रविडांशी स्नेह होता. त्यामुळे नारायण रामचंद्र पोंक्षे आणि विष्णुशास्त्री यांचा बालपणीचा परिचय असण्याचीही दाट शक्यता आहे. नारायण रामचंद्र पोंक्षे आणि विष्णुशास्त्री एकाच शाळेत शिकले का, याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. विष्णुशास्त्री आधी सदाशिव पेठेतल्या नागनाथाच्या वाड्यातल्या इंग्रजी शाळेत होते. नंतर ही शाळा विश्रामबाग वाड्याशेजारी आबासाहेब पटवर्धन यांच्या वाड्याच्या समोरच्या माडीवर भरू लागली. इथे विष्णुशास्त्री एक वर्ष होते. नंतर शुक्रवार पेठेतल्या नाना महागावकर यांच्या खाजगी शाळेत ते शिकले आणि मग पूना हायस्कुलातून ते १८६५ साली मॅट्रिक झाले. नारायण रामचंद्र पोंक्षे कुठल्या शाळेतून मॅट्रिक झाले, हे कळायला मार्ग नाही. या सगळ्या शाळा बंद होऊन किमान एक शतक उलटलं असून त्यांच्या नोंदी कुठेही उपलब्ध नाहीत. मात्र त्या काळी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी होती. त्यामुळे नारायण रामचंद्र पोंक्षे यांचं मॅट्रिक उत्तीर्ण असणं महत्त्वाचं ठरतं.

नारायण रामचंद्र पोंक्षे 'केसरी'चे सुरुवातीपासून वर्गणीदार होते. 'केसरी' सुरू झाल्यावर सहा महिन्यांनी त्यात 'पुणें भोजनगृहा'ची जाहिरात झळकली. पहिल्या वर्षीच्या 'केसरी'तल्या जाहिराती बघितल्यास त्यात बहुतांश जाहिराती या 'केसरी'च्या जाहीरनाम्यावर सही करणार्‍या डॉ. गर्द्यांच्या होत्या, हे दिसतं. 'केसरी' सुरू झाल्यावर पहिली जाहिरात झळकली ती गोपाल नारायण कंपनीच्या बुकडिपोची. २५ जानेवारी, १८८१ रोजी. याच अंकात गजानन बाळकृष्ण वैशंपायन यांच्या स्वदेशी पौडरीचीही जाहिरात होती. पुढे जून महिन्यापर्यंत याच दोन जाहिराती गर्द्यांच्या जाहिरातींसह दोनतीनदा दिसतात. अशा मोजक्या जाहिरातींमध्ये 'पुणें भोजनगृहा'ची जाहिरात आहे. ही जाहिरात देणारी व्यक्ती 'केसरी'ची वर्गणीदार असण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे.

विष्णुशास्त्र्यांनी भोजनगृहात आर्थिक गुंतवणूक केली असावी, हे अगोदर लिहिलंच आहे. नारायण रामचंद्र पोंक्षे आणि विष्णुशास्त्री यांच्या संबंधांवर अप्रत्यक्ष भाष्य करणारी एक घटना इथे नोंदवणं आवश्यक आहे. प्रसिद्ध बुधवार चौकात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी इ.स. १८१३ साली बुधवार वाडा बांधला. शनिवारवाड्यात राहायला तयार नसलेल्या पेशव्यांनी मौजमजेसाठी विश्रामबागवाडा, कचेरीसाठी बुधवारवाडा आणि राहण्यासाठी शुक्रवारवाडा असे तीन वाडे बांधले होते. बुधवारवाडा पाच चौकी दोन मजली होता. वाड्याच्या ईशान्येच्या कोपर्‍यात एक मनोरा होता. त्यावर सरदार विंचूरकरांनी भेट दिलेलं घड्याळ होतं. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांनी या वाड्यावर ताबा मिळवला आणि त्यात मॅजिस्ट्रेटांची कोर्टं, सरकारी खजिना, सरकारी बुक डेपो, कच्च्या कैद्यांचा तुरुंग, फौजदाराची आणि मामलेदाराची कचेरी, मुनसफीची कोर्टं, पोस्ट ऑफीस, सरकारी मराठी शाळा यांची स्थापना केली. याच वाड्यात लोकहितवादी आणि सर हेन्री ब्राऊन यांच्या पुढाकारानं १८४८ साली 'पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी' (म्हणजे आजचं पुणे नगर वाचन मंदिर) हे पुण्यातलं पहिलं सार्वजनिक वाचनालय सुरू झालं.

१३ मे, १८७९च्या रात्री विश्रामबागवाडा आणि बुधवारवाडा या दोन्ही वाड्यांना आग लागली. रात्री आठच्या सुमारास विश्रामबागवाड्यास आग लागल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं. विश्रामबागवाड्यात सरकारी हायस्कूल होतं आणि एज्यूकेशन इन्स्पेक्टराचं कार्यालय होतं. आग खालच्या मजल्यावर असलेल्या हायस्कुलाच्या वर्गांना लागली आणि बाहेरच्या दोन चौकांमध्ये पसरली. जेवणी आटोपून लोक झोपायच्या तयारीत असतानाच विश्रामबागवाड्याला आग लागल्याची बातमी पसरली. आग विझवण्याचं काम जोरात असतानाच बुधवारवाड्याला आग लागल्याचा ओरडा सुरू झाला. बुधवारवाड्याला लागलेली आग भलतीच पसरली. पूर्वेकडे समोर असलेला ढमढेरे वाडा, या वाड्यालगत असलेली हलवायांची दुकानं, उत्तरेकडचे वाडे आणि दुकानं हेही या आगीनं वेढली. आठ तास ही आग धुमसत होती. या आगीत संपूर्ण वाडा भस्मसात झाला. 'नेटिव्ह ओपिनियन'नं लिहिलंय - 'मनोर्‍यावरच्या घड्याळानं तीनचे ठोके दिले आणि आपली अखेरी जगास कळवली'. आगीचं हे तांडव हे संपून लोक घरी जात असतानाच सातारच्या वाड्याला आग लागल्याची बातमी आली, पण सुदैवानं ती अफवाच ठरली. त्याच रात्री शनिवारवाड्यासही आग लावण्याचा प्रयत्न कोणीतरी केला. दुसर्‍या दिवशी रविवार होता. त्या रात्री रविवार पेठेतल्या फडक्यांच्या वाड्याला आग लावली गेली, पण ती लगेच लक्षात आल्यानं विझवली गेली. नुकसान काही झालं नाही.

आगीचा आणि पुढच्या चौकशीचा वृत्तांत 'नेटिव्ह ओपिनियन'च्या तेव्हाच्या अंकांमध्ये वाचायला मिळतो. या दोन्ही आगींची चौकशी लगेच सुरू झाली. वासुदेव बळवंत फडके तेव्हा परागंदा झाले होते आणि त्यांच्या व त्यांच्या सहकार्‍यांच्या सरकारविरोधी कारवाया जोरात सुरू होत्या. आगीच्या दोन दिवसांपूर्वीच पळस्पे आणि चिखली इथे दौलतराव नाईकांनी दीड लाख रुपयांची लूट केली होती. त्यामुळे पुण्यातली आगही फडक्यांना सामील असणार्‍यांनी लावली असावी, असा पोलिसांचा संशय होता. अशातच एक साक्षीदार पुढे आला. त्याच्या म्हणण्यानुसार बुधवारवाड्याला आग लागली तेव्हा तो चौकातच होता, आग तळमजल्यावर असलेल्या सरकारी बुक डेपोतून सुरू झाली आणि त्यानं बुकडेपोकीपराच्या मुलाला वाड्यातून बाहेर पळताना पाहिलं. कृष्णाजी नारायण रानडे हे सरकारी बुकडेपोकीपर होते. त्यांच्या मुलाला, केशवला, पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याने पोलिसांना सांगितलेला वृत्तांत थोडक्यात असा - 'मी पंधरा दिवसांपूर्वी विठ्ठलवाडीजवळच्या गणपती मंदिरात जात असता मला तीन गृहस्थांनी अडवलं. त्यांपैकी एक ब्राह्मण होता, दुसरा लिंगायत व तिसरा कुणबी. या तिघांनी मला सुर्‍याचा धाक दाखवला व आमचं काम केलंस तर तुला सोन्याची दोन कडी आणि दोन अंगठ्या देऊ, असं सांगितलं. मी घाबरून त्यांचं म्हणणं मान्य केलं. माझ्या शब्दाची खात्री व्हावी, म्हणून त्यांनी बेलभंडारा उधळला. आग लागली त्या रात्री मी वडिलांकडच्या किल्ल्या त्यांच्या नकळत घेतल्या आणि मागच्या दरवाज्यानं आत गेलो. त्या तिघांना आत घेतलं. माझ्या हाती कंदील होता. त्यांनी मशाली पेटवल्या आणि बुकडेपोला आग लावली. कबूल केल्याप्रमाणे त्यांनी मला सोन्याची दोन कडी आणि दोन अंगठ्या दिल्या.' केशव रानडेनं पोलिसांना ते दागिने दिले.

पोलिसांनी केशवला वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल विचारलं. त्यानं उत्तर दिलं - 'मी फडक्यांना ओळखत नाही. ते तिघे गृहस्थ फडक्यांचे साथीदार होते किंवा कसे, हे मला ठाऊक नाही. पण मी फडक्यांना गेली चार वर्षं मुरलीधराच्या मंदिरापाशी पाहिलं आहे. ते आणि त्यांचे मित्र - मोरो बळ्वंत खरे, चिंतो भिकाजी वैद्य, विष्णु बळवंत खरे, बळवंत सखाराम घाटे, वासुदेव कृष्ण भट, गोविंद भिकाजी दाते, नारायण रामचंद्र पोंगशे, परशराम चिंतामण गोखले, गणेश कृष्ण देवधर - हे मुरलीधराच्या मंदिरात बसलेले असतात. हे सारे गृहस्थ निरुद्योगी असून त्यांना फडक्यांकडे तलवारबाजी शिकायची होती. मात्र त्यांच्याकडे द्रव्य नसल्याने फडक्यांनी त्यांना ही विद्या शिकवली नाही. हे सर्व तरुण अठरा ते तीस वयाचे असून अनेकांना इंग्रजी येते. ते आमच्या आळीतले असल्याने माझ्याही परिचयाचे आहेत.'

या जबानीनंतर पोलिसांनी बुकडेपोकीपरला, म्हणजे कृष्णाजी रानडे आणि कारकून शामराव बल्लाळ यांना पकडलं. त्यातून सत्य काय ते बाहेर आलं. कृष्णरावांनी चार वर्षं बुकडेपोचा हिशेबच ठेवला नव्हता. दुकानातून मिळणारा सारा पैसा थेट त्यांच्या घरी जात होता. चार वर्षं दुकानाचं ऑडिटच झालं नसल्यानं त्यांनी चार हजार रुपये सरकारात जमा न करता बळकावले. मात्र एक दिवस अचानक सरकारी पर्यवेक्षकाचं पत्र आलं आणि कृष्णराव घाबरले. आपला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, म्हणून त्यांनी दुकानाला आग लावली. रचलेल्या गोष्टीची सत्यता पटावी म्हणून सोन्याचे दागिने खरेदी केले. पैशाचा गैरव्यवहार आणि बुधवारवाडा व विश्रामबागवाडा यांना लावलेली आग, त्यातून झालेलं सरकारी नुकसान या गुन्ह्यांसाठी कृष्णराव व त्यांच्या मुलाला काळ्यापाण्याची शिक्षा झाली. कारकुनास सश्रम कारावास मिळाला. विष्णुपंत खरे, मोरो बळवंत खरे, बाळाजी नारायण फडके यांनाही पोलिसांनी पकडलं कारण त्यांच्याकडे आगीतल्या लुटीचे दागिने सापडले. इतरांची वासुदेव बळवंत फडक्यांबरोबरच्या संबंधांची चौकशी करण्यात आली. मात्र फडक्यांच्या बंडात त्यांचा थेट संबंध नसल्याचं लक्षात येऊन त्यांना सोडण्यात आलं.

'नेटिव्ह ओपिनियन'मधल्या आगीच्या वार्तांकनात नारायण रामचंद्र पोंक्षे एक देशभक्त म्हणून समोर येतात. वासुदेव बळवंत फडक्यांचे ते स्नेही होते. म्हणजे विष्णुशास्त्री व पोंक्षे समानधर्मी होते. दोघांचीही उद्दिष्टं समान होती. विष्णुशास्त्र्यांनी नारायण रामचंद्रांच्या उद्योगात सक्रीय सहभाग घेणं, हे त्यामुळे आश्चर्यकारक वाटत नाही. सरकारी नोकरी सोडलेल्या पोंक्ष्यांनी विष्णुशास्त्र्यांच्या मदतीनं 'पुणें भोजनगृह' स्थापन केलं असावं, आणि त्यानंतर त्यांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं असावं. कुलवृत्तांत व टेलिफोन डिरेक्टरी यांच्या मदतीनं मी पोंक्षे कुटुंबाशी संपर्क साधला. श्री. राजेंद्र व रवीन्द्र पोंक्षे हे नारायण रामचंद्र पोंक्षे यांचे पणतू. मात्र पोंक्षे कुटुंबीयांकडे भोजनगृहाबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही. त्या काळचे कुठलेही कागद आज त्यांच्याकडे नाहीत. या कुटुंबातील पुरुषांनी नोकरी न करता कायमच व्यवसाय केले, एवढीच माहिती त्यांच्याकडे मिळाली. नारायण रामचंद्र पोंक्षे यांनी भोजनगृह सुरू केलं असेल, तर तसा उल्लेख कुलवृत्तांतात का नाही, हे कळत नाही. कदाचित हे भोजनगृह नंतर बंद पडल्यानं तसा उल्लेख करणं कोणालाच महत्त्वाचं वाटलं नसावं. मात्र उपलब्ध पुराव्यांनुसार श्री. नारायण रामचंद्र पोंक्षे हेच पुण्यातल्या पहिल्या भोजनगृहाचे, म्हणजे 'पुणें भोजनगृहा'चे संस्थापक होते, अशीच शक्यता सर्वाधिक आहे.

'भोजनगृह' या लेखाचं एक दुर्दैवी महत्त्वही आहे. विष्णुशास्त्री तब्येतीने धडधाकट असताना 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झालेला हा त्यांचा शेवटचा लेख. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा एक उत्तम फोटो काढावा, अशी विष्णुशास्त्र्यांची इच्छा होती. पुरुषमंडळींचा एक आणि बायकांचा एक असे दोन फोटो काढायचं ठरलं. त्याप्रमाणे एका पोर्तुगीज फोटोग्राफराला घरी बोलावून १५ जानेवारीला बायकांचा फोटो त्याच्याकडून काढून घेतला. दुसर्‍या दिवशी पुरुषांचा फोटो काढण्यासाठी सर्व मंडळी घोडागाडीत बसून लष्करांत फोटोग्राफराच्या घरी गेली. मंडळींच्या फोटोच्या दोन प्रती घेतल्यावर विष्णुशास्त्र्यांचा एकट्याचाच एक फोटो असावा, असा विचार पुढे आला. हा फोटो काढून घ्यायला ते उभे राहिले, पण मनाजोगता फोटो काही येईना. बराच वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे असेल, विष्णुशास्त्र्यांना घेरी आली आणि ते खाली पडले. त्यांचे पुढचे दोन दात दुखावले, कानातून रक्त आलं. पाणी प्यायला त्यांना जरा हुशारी आली आणि मंडळी घरी परतली. पुढे दोन दिवसांनी त्यांना ताप चढला. हा ताप सौम्य झाला तरी पुरता उतरला नाही, आणि मार्च रोजी त्यांचं निधन झालं. या काळात ते शाळेत गेले नसले, तरी निबंधमाला आणि 'केसरी' या दोन्हींत त्यांचं लेखन प्रकाशित होत होतंच. काही लेख अगोदरच लिहून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाबद्दल बाहेर कोणालाही काही ठाऊक नव्हतं.

वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी विष्णुशास्त्र्यांचं निधन हा समस्त महाराष्ट्रीयांना मोठा धक्का होता. परंपरागत भारतीय संस्कृती आणि सनातन हिंदुधर्म यांच्याविषयी स्वत्वाची भावना जागृत करून तिच्या आधारानं देशोद्धारासाठी त्यागवृत्ती निर्माण करणं, हे विष्णुशास्त्र्यांनी आपल्या लेखनाचं ध्येय मानलं. त्यांच्या भाषेनं आणि ध्येयानं प्रभावित झालेल्या आगरकरांनी बुद्धिवादाशी कायमच इमान राखलं तरी दोघांनाही या देशासाठी स्वराज्य हवं होतं. भोजनगृह हा त्यांच्या दृष्टीनं या स्वराज्याकडे जाण्याचा एक मार्गच होता.

पुण्यात रेल्वे आली आणि मध्यमवर्गाचा उदय व्हायला सुरुवात झाली. १८७५ सालानंतर पुण्याचं रूपांतर एका आधुनिक शहरात होऊ लागलं. खडकवासल्याचं पाणी शहरात आलं. लोखंडी कचरापेट्या रस्त्याच्या कडेला बसल्या. सांडपाण्याची सोय लागावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. न्यू इंग्लिश स्कूल, हुजुरपागा, फर्ग्युसन कॉलेज अशा संस्था उभ्या राहिल्या. नव्या विचारांचा तेव्हा जेमतेम शिरकाव होऊ लागला होता. फुले, लोकहितवादी, विष्णुशास्त्री, रानडे, आगरकर, टिळक यांनी पुण्यात प्रबोधनाचं युग आणलं. या नेत्यांमुळे उद्योग-व्यवसायास चालना मिळाली. समानतेवर आधारलेली नवी मूल्यव्यवस्था इथे रुजायला सुरुवात झाली. १८८१ साली 'पुणें भोजनगृह' सुरू होणं, ही याच साखळीतली एक महत्त्वाची घटना होती. महाराष्ट्रातल्या प्रबोधनाच्या युगाचंच ते एक फलित होय. पुण्यातल्या संस्था, शाळा-कॉलेजं, वर्तमानपत्रं यांच्या जोडीनं पुण्यातल्या भोजनगृहांनीही आर्थिक आणि सामाजिक बदलांमध्ये एक मोठी भूमिका बजावली. या सगळ्याला पुण्यात सुरुवात झाली ती नारायण रामचंद्र आणि मंडळींच्या 'पुणें भोजनगृहा'मुळे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात भोजनगृहाच्या दहापंधरा टोलेजंग इमारती असाव्यात, असं आगरकरांचं स्वप्न होतं. जोगळेकर, माटेकर, गुंडी, आपटे, रानडे, मिजार, खाडीलकर, सोमण, करंदीकर (नारायण रामचंद्र पोंक्षे यांचे नातजावई), जोशी, बारणे, बारी, चव्हाण, आवारे यांची खाद्यगृहं नंतर पुण्यात उभी राहिली आणि आगरकरांची इच्छा पूर्ण झाली. पुण्यातली अनेक जुनी खाद्यगृहं आज विस्मृती गेली असली तरी नारायण रामचंद्र, विष्णुशास्त्री आणि आगरकर यांनी ज्या भोजनगृह या संस्थेनं बाळसं धरावं म्हणून प्रयत्न केले, ती संस्था आज पुण्यात जोमानं फोफावली आहे, हे समाधानाचं आहे. उपाहारगृहात खाणं हे पाप, हॉटेलवाल्याला मुलगी द्यायची नाही इथपासून फक्त सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे.

***

तळटिपा -

[१] संस्कृत भाषेचा शब्दकोश लिहिणारे वामन शिवराम आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते पर्यवेक्षक होते. आगरकर आणि टिळक यांच्याबरोबर ते डेक्कन कॉलेजात होते. चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केल्यावर टिळक आणि आगरकर यांच्या आग्रहामुळे ते या शाळेत रुजू झाले. आपटे हे टिळक-आगरकरांपेक्षा वयानं दोन वर्षांनी लहान. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतात पहिले आल्यानं त्यांना जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती. बी.ए.च्या परीक्षेत जिद्दीनं गणित हा विषय घेऊन त्यांनी पहिल्या वर्गात येण्याचा पराक्रम करून दाखवला होता. एम.ए.ला संस्कृतात पहिले आल्यामुळे त्यांना भगवानदास पुरुषोत्तमदास स्कॉलरशिप मिळाली होती. नियमितपणा, शिस्त यांचे ते भोक्ते होते. मोठ्या कष्टानं त्यांनी यश मिळवलं होतं आणि आपल्या विद्यार्थ्यांनीही विद्येच्या बळावर यश मिळवावं, अशी त्यांची तळमळ असे. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला होता.

[२] विष्णुशास्त्री हे महाराष्ट्रातले पहिले लोकनेते होते, असं म्हटल्यास वावगं नाही. आपल्या लेखणीनं त्यांनी समस्त मराठीजनांना वेड लावलं. आधुनिक मराठी गद्याचे ते जनक. विष्णुशास्र्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे अव्वल दर्जाचे विद्वान आणि वाक्पटु होते. संस्कृत भाषेवर त्यांचं अफाट प्रभुत्व होतं. 'अरबी भाषेंतील सुरस गोष्टीं', अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह', 'अर्थशास्त्रपरिभाषा', 'रासेलस', 'सॉक्रेटिसाचें चरित्र' वगैरे कित्येक पुस्तकं त्यांनी लिहिली होती. १८४८ साली जेव्हा बुधवारवाड्यात सरकारी इंग्रजी शाळा सुरू झाली, तेव्हा त्यांचे गुरू मोरशास्त्री साठे त्यांना म्हणाले, "याउप्पर खांद्यावर शालजोडी टाकून हिंडण्यांत प्रतिष्ठा राहणार नाहीं; तूं शहाणा असलास तर इंग्रजी शीक". गुरूचा उपदेश प्रमाण मानून कृष्णशास्त्री इंग्रजी शिकले, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी विषयांचा इंग्ग्रजीतून अभ्यास केला आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत सरकारी विद्याखात्यात नोकरी केली. ते ट्रेनिंग कॉलेजाचे प्राचार्य होते. १८६१ सालापासून शिक्ष्नखात्यानं 'मराठी-शाळा-पत्रक' सुरू केलं होतं. मराठी शिकवणार्‍या शिक्षकांचं ज्ञान अद्ययावत व्हावं, हा या नियतकालिकाचा उद्द्श होता. १८६५ सालापासून कृष्णशास्त्र्यांकडे शालापत्रक संपादण्याचं काम आलं. पुढे १८६८ साली कृष्णशास्त्र्यांनी संपादनाचं काम विष्णुशास्त्र्यांकडे सोपवलं.
विष्णुशास्त्री १८७२ साली बी.ए. झाले आणि १८७४ साली त्यांनी सरकारी हायस्कुलात शिक्षकाची नोकरी पत्करली. शाळापत्रक तोपर्यंत बंद पडलं होतं. लेखनाचा हव्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच जन्म झाला 'निबंधमाले'चा. निबंधमालेनं मराठी गद्याला वेगळं वळण लावलं. समस्त शिक्षित पांढरपेशा समाज निबंधमालेला डोक्यावर घेता झाला. १८७४-१८८२ या काळात विष्णुशास्त्र्यांनी निबंधमालेचे ८४ अंक एकहाती काढले. जवळजवळ तीन हजार पानांचा हा मजकूर होता. निबंधमालेचा प्रत्येक अंक ४०-५० पानांचा असे. त्यात निबंध, सुभाषितं, विनोद, उत्कृष्ट उतारे, म्हणी, भाषांतरं इत्यादी असत. 'ज्यांना आपल्या जन्मभूमीचा योग्य अभिमान असून ज्यांस सत्य आवडतें, ते आमचे मित्र; व स्वदेशाची टवाळी करण्यांत ज्यांस भूषण वाटतें व जे असत्यास जाणूनबुजून भजतात किंवा त्याच्या निरसनाविषयीं अनास्था प्रगट करतात, ते आमचे द्वेष्टे' असं 'निबंधमाले'त लिहिणार्‍या चिपळूणकरांना सर्वाधिक प्रिय होता तो स्वदेश. त्यांच्या ठायी असलेली स्वदेशाभिमानाची भावना अत्यंत तीव्र होती. स्वसंकृतिनिष्ठ आणि प्रखर राष्ट्रवादी विचारांची पेरणी महाराष्ट्रात निबंधमालेच्या लेखांनी केली. मनोरंजन हा या लेखांमागचा उद्देश कधीच नव्हता. प्रबोधन आणि विचारक्रांती घडवणं, लोकांमध्ये स्वदेशाबद्दल, स्वभाषेबद्दल अभिमान जागृत करणं हे त्यांच्या लेखनामागचे उद्देश होते. जहाल राष्ट्रवादी लेखन हेच फक्त निबंधमालेचं वैशिष्ट्य नव्हतं. निबंधमालेत विष्णुशास्त्र्यांनी मराठी-संस्कृत-इंग्रजी वाघ्मयावर अनेक अप्रतिम लेख लिहिले. निबंधमालेचं वाङ्मयस्वरूप अतिशय आकर्षक आहे. निबंधांची भाषा अतिशय प्रौढ, सौष्ठवपूर्ण, उपहासगर्भ आणि वक्रोक्तिपूण आहे. वेगवेगळ्या विषयांच्या रसाळ विवेचनानं आणि अनेक प्रकारच्या माहितीनं ओतप्रोत भरलेला इतका सुरेख निबंधसंग्रह मराठीत आजही कदाचित नसेल. विष्णुशास्त्र्यांच्या निबंधातल्या भरजरी भाषेनं अनेक पिढ्यांना आपलं गुलाम केलं. सरकारची हुजरेगिरी करणार्‍या बड्या असामी, इंग्रजी राजवटीचं गुणगान करणारे सुशिक्षित वडीलधारे, एतद्देशीयांना कमी लेखणारे गोरे नोकरशहा, स्वधर्म-स्वदेश-स्वभाषा यांची टर उडवणारे सुधारक कायम विष्णुशास्त्र्यांच्या निशाण्यावर असत.
विष्णुशास्त्र्यांच्या निर्भीड आणि अभ्यासपूर्ण निबंधांनी सारा महाराष्ट्र भारला असला, तरी ते लेख इंग्रजांना आवडणं शक्यच नव्हतं. कॅण्डी आणि चॅटफिल्ड यांनी कृष्णशास्त्र्यांना आणि विष्णुशास्त्र्यांना समज दिली. विष्णुशास्त्र्यांनीही काही दिवस नमतं घेतलं. भाषाशुद्धी, व्याकरण, भाषांतर, वाचन अशा निरुपद्रवी विषयांवर लिहिलं. निबंधमालेचा तिसावा अंक मात्र चांगलाच गाजला. या अंकाचा विषय 'इंग्रजी भाषा' असा असला तरी लेखात इंग्रजांची लबाडी, खोटी नीती, हिंदुस्थानाचा त्यांनी लिहिलेला चुकीचा इतिहास यांबद्दल विष्णुशास्त्र्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत लिहिलं होतं. या लेखाचे पडसाद सर्वत्र उमटले. या लेखानिमित्तानं 'ज्ञानप्रकाश'सारख्या वर्तमानपत्रात बरीच पत्रापत्री झाली आणि या सर्वांचं पर्यवसान विष्णुशास्त्र्यांची रत्नागिरीला होण्यात झालं.
एव्हाना सरकारी नोकरी त्यांना नकोशी झाली होती. पगार आणि पेन्शन यांची शाश्वती असली तरी त्यापायी ते स्वाभिमान, स्वदेशाभिमान, विचारस्वातंत्र्य सोडायला तयार नव्हते. सरकारी नोकरीत राहून निबंधमालेत आपल्याला हवं तसं, हवं ते लिहिता येणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. १८७९ सालच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत विष्णुशास्त्री पुण्याला आले, ते पुन्हा रत्नागिरीस नोकरीसाठी गेले नाहीत. सहा महिन्यांची रजा घेऊन ते पुण्यासच राहिले. एव्हाना त्यांनी खासगी शाळा काढण्याचा निर्णय घेतला होता. शाळा काढल्यास उदरनिर्वाहही चालेल आणि निबंधमालेत मनाजोगतं लिहिता येईल, असा त्यांचा विचार होता. १८३५ साली लागू झालेल्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढतं, पण स्वदेश आणि स्वभाषा यांच्याबद्दलचा अभिमान कमी होतो, म्हणून आपणच शाळा काढून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, स्व्देशाभिमान, साहस हे गुण रुजवावे, असं त्यांच्या मनात होतं. याच सुमारास टिळक आणि आगरकर विष्णुशास्त्र्यांना भेटले आणि तिघांनी नवीन शाळा सुरू करण्याचं नक्की केलं.

[३] महादेव बल्लाळ नामजोशी हे महादेव गोविंद रानडे यांचे स्नेही. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणार्‍या असंख्य संस्थांच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. नामजोश्यांचा भांड्यांचा कारखाना होता. १८८८ साली हिराबागेत न्या. रानडे आणि नामजोशी यांनी राष्ट्रीय स्तरावरचं औद्योगिक प्रदर्शन भरवलं होतं. नामजोशी अतिशय धडपडे गृहस्थ होते. या प्रदर्शनासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. वासुकाका जोश्यांनी या प्रदर्शनासाठी काशीहून आणि तंजावराहून वस्तू मागवल्या होत्या. या प्रदर्शनाला सरकारनं पैसे दिले होते. प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे नामजोशी सरकारचे सर्व पैसे परत करू शकले आणि उरलेल्या पैशातून संयोजक मंडळींनी एका औद्योगिक संस्थेची स्थापना केली, शिवाय तिच्यामार्फत एक औद्योगिक संग्रहालय सुरू केलं. 'इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' हे या संस्थेचं नाव. मंडईजवळ असलेल्या वाकड्यांच्या वाड्यात या संस्थेचं कार्यालय होतं. याच वाड्यात सर्वप्रथम दुधावरची साय काढण्यासाठी रवी हे यंत्र त्या वेळचे पुण्याचे कलेक्टर ओझॅनी यांनी आणलं होतं. या औद्योगिक संस्थेच्या स्थापनेत न्या. रानड्यांचा सहभाग असला तरी टिळकही तिचे सभासद होते. संस्थेच्या परिषदांमध्ये ते भाग घ्यायचे. नामजोशी यांचं टिळक व रानडे या दोघांशीही सख्य असल्यामुळे संस्थेच्या काम दोघांचीही मदत होत होती. नामजोश्यांनी पुढे नगरपालिकेच्या उद्योगशाळेचीही उभारणी केली. पूना सिल्क मिल्स्‌, पूना पेपर मिल, आर्ट वर्कशॉप या संस्थांमागेही 'इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' आणि नामजोशी यांचं बळ होतं. ही औद्योगिक संस्था पुढे रानड्यांच्या मृत्यूनंतर बंद पडली असली, संस्थेच्या पाठबळावर उभे राहिलेले उद्योगही फार भरभराटीस आले नसले, तरी पुढच्या पिढीसाठी एक भक्कम पृष्ठभूमी तयार करण्याचं मोठं काम रानडे, नामजोशी आणि त्यांच्या संस्थांनी केलं. नामजोश्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण छापखाना, फर्ग्युसन कॉलेज यांच्यासाठी भरघोस देणग्या गोळा केल्या.

[४] वासुदेवशास्त्री खर्‍यांनी 'केसरी' हे नाव सुचवलं असाही प्रवाद आहे. य. दि. फडके यांचं म्हणणं लेखात गृहित धरलं आहे.

[५] त्या काळी अनेक मराठी वर्तमानपत्रांमध्ये इंग्रजी मजकूर असे. तसं न करता दोन भाषांची दोन वेगळी वर्तमानपत्रं असावीत, असं ठरलं. ही दोन्ही वर्तमानपत्रं आपल्याच छापखान्यात छापली तरच ती आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरतील, असंही मत चर्चेतून पुढे आलं. नामजोश्यांच्या मालकीचा 'किरण' छापखाना केशव बाळाजी साठे यांच्याकडे गहाण पडला होता. अडीच हजार रुपयांचा सामाईक कर्जरोखा लिहून देऊन तो ताब्यात घेण्याचं ठरलं. प्रत्येक वर्षी अडीचशे रुपयांची कर्जफेड करण्याचं नक्की झालं. दोन हजार रुपये गणेश मोरेश्वर सोवनी यांच्याकडून कर्जाऊ घेण्यात आले. या सर्व व्यवहारात भागीदारी पुढीलप्रमाणे होती - विष्णुशास्त्री ३ भाग, टिळक २ भाग, आगरकर, आपटे व सोवनी प्रत्येकी १ भाग. त्याच रात्री टिळक, आगरकर, नामजोशी आणि नारायणराव धारप या चौघांनी छापखान्याचं सामान ताब्यात घेतलं. या चौघांनी ती सगळी यंत्रसामुग्री आपल्या डोक्यावरून वाहून मोरोबादादाच्या वाड्यात आणली. या नव्या छापखान्याचं नाव ठरलं 'आर्यभूषण छापखाना'. विष्णुशास्त्र्यांच्या निबंधमालेच्या छपाईनं या छापखान्याच्या काम सुरू झालं. नामजोश्यांच्या 'द स्टार' या वर्तमानपत्राची नोंदणी झाली असल्यानं 'मराठा' त्याच परवान्यावर सुरू करण्यात आला.

[६] गेल्या दीडदोनशे वर्षांत पेशवाईनंतरच्या पुणे शहराबद्दल तसं बरंच लेखन झालं आहे. भारतात येणार्‍या इंग्रजांना व इतर युरोपीयांना आपल्या अनुभवांबद्दल, प्रवासाबद्दल लिहायला आवडे. अशा काहींनी आपल्या पुस्तकांमध्ये पुण्याबद्दल लिहिलं आहे. पण यात पुणे शहराचा भूगोल फारसा नाही. शिवाय हे मोजके अनुभव पुण्यापेक्षा पुण्यातल्या छावणीचं वर्णन अधिक करतात. इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळवल्यानंतरच्या कामकाजाचा संपूर्ण वृत्तांत उपलब्ध आहे. १८१८ सालानंतरच्या पुणे शहराची सामाजिक-राजकीय-भौगोलिक माहिती देणारी काही पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांपैकी सर्वांत आद्य असलेलं ना. वि. जोशी यांचं 'पुणे शहर वर्णन' १८६८ साली प्रसिद्ध झालं. सीताराम रामचंद्र गाईकवाड यांनी पुणे शहराचं वर्णन दोन भागांत लिहिलं. पैकी पहिला भाग १८८६ साली प्रसिद्ध झाला आणि दुसरा भाग १८८८ साली. पहिल्या भागात पुणे शहराचं आणि दुसर्‍या भागात पुणे छावणीचं वर्णन आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले असे हे दोन ग्रंथ आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चिं. ग. कर्व्यांनी अतिशय कष्टानं पुणे नगर संशोधन वृत्ताचे चार भाग प्रसिद्ध केले. रघुनाथ हरी भागवत यांनी आपल्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या 'पुणें-वर्णन' या पुस्तकात विसाव्या शतकातल्या पहिल्या दोन दशकांतल्या पुण्याचा अप्रतिम परिचय करून दिला आहे. श्री. ज. जोशी यांचं 'पुणेरी', ग. वा. बेहेरे यांचं 'हरवलेले पुणे', वि. ना. नातू यांचं 'आधीच पुणे गुलजार', म. श्री. दीक्षित यांचं 'असे होते पुणे', डॉ. मा. प. मंगुडकर यांचं 'बदलते पुणे', जयमाला दिड्डी आणि संहिता गुप्ता यांचं 'पुना : द क्वीन ऑफ डेक्कन' हे पुण्याच्या इतिहासाचा, भूगोलाचा आणि समाजजीवनाचा मागोवा घेणारं भलंथोरलं पुस्तक अशी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतल्या पुण्याचा वेध घेणारी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. डॉ. अरुण टिकेकर आणि श्री. अभय टिळक यांनी पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक घडामोडीचं सुरेख संकलन 'शहर पुणे' या द्विखंडात्मक ग्रंथात केलं आहे. १८९०नंतर पुणे, छावणी आणि खडकी या परिसराची माहिती देणार्‍या काही डिरेक्टर्‍या प्रकाशित झाल्या. अशा सहा-सात डिरेक्टर्‍या आज डेक्कन कॉलेज आणि कलकत्त्याची नॅशनल लायब्ररी इथे बघता येतात. शिवाय पुण्यात भरणार्‍या संमेलनांच्या, अधिवेशनांच्या निमित्तानं काही पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. काकासाहेब गाडगीळ, धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे, सत्यभामाबाई सुखात्मे, वि. द. घाटे, श्री. म. माटे, धर्मानंद कोसंबी, नानासाहेब परुळेकर, न. चिं. केळकर अशा अनेकांच्या आत्मचरित्रांत जुनं पुणं सापडतं.
या पुस्तकांमध्ये एखाददुसरा अपवाद सोडल्यास पुण्यातल्या खाद्यगृहांबद्दल माहिती नाही. ना. वि. जोशी यांनी पुण्याच्या बाजारांबद्दल आणि खाणावळींबद्दल थोडक्यात लिहिलं आहे. सीताराम गाईकवाडांनीही पुणे छावणीतल्या खाद्यगृहांबद्दल मोजकं लिहिलं आहे. दिड्डी आणि गुप्ता यांच्या पुस्तकात पुण्यातल्या खाद्यगृहांबद्दल मोजून चार ओळी आहेत व त्यांतही तपशिलाच्या चुका आहेत. इतर पुस्तकांमध्ये एखाद्या खाद्यगृहाचा ओझरता उल्लेख येतो. वि. ना. नातू यांनी मात्र पुण्यातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल अतिशय रसाळपणे विस्तारपूर्वक लिहिलं आहे. नातूकाकांचा जन्म १९२८चा आणि त्यांच्या आठवणी १९३८नंतरच्या. तेव्हापासून जे पुणं त्यांनी पाहिलं, ते त्यांनी आपल्या पुस्तकात जिवंत केलं आहे. पुण्यातल्या पेठा, रस्ते, शिक्षणसंस्था, वृत्तपत्रं, तालमी, सण-उत्सव, सामाजिक वाद अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या पुस्तकात अत्यंत चित्रदर्शी शैलीत लिहिलं आहे. पुण्यातली उपाहारगृहं, पुणेकरांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, इथल्या खाणावळी आणि गुर्‍हाळं यांबद्दलही नातूकाकांनी विस्तारानं लिहिलं आहे. पण नातूकाकांच्या आठवणी १९३८ सालानंतरच्या, म्हणजे तशा आधुनिक आहेत. आपल्या पुस्तकात ते काही जुन्या हॉटेलांच्या नावांचा किंवा तिथे मिळणार्‍या पदार्थांचा ओझरता उल्लेख करतात, पण त्यांनी या खाद्यगृहांच्या इतिहासाबद्दल किंवा त्यांच्या संचालकांबद्दल लिहिलेलं नाही, कारण मुळात 'आधीच पुणे गुलजार' हा इतिहासग्रंथ नाही. त्यामुळे पहिलं भोजनगृह किंवा त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत पुण्यात सुरू झालेली उपाहारगृहं यांबद्दलची माहिती वर्तमानपत्रांतल्या जाहिराती, कुलवृत्तांत यांतून मिळवावी लागते. खाद्यगृहांना भारताच्या समाजजीवनात महत्त्वाचं स्थान नसणं, हे यामागचं कारण असावं.

[७] कोल्हापूरच्या राजांचा तिथले कारभारी बर्वे छळ करतात, असा आरोप काही वर्तमानपत्रांनी केला. 'केसरी' व 'मराठा' ही वर्तमानपत्रं त्यात आघाडीवर होती. बर्व्यांनी या दोन्ही वर्तमानपत्रांच्या संपादकांविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला भरला. न्यायमूर्तींनी टिळक आणि आगरकर यांना १०१ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. 'डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस' या पुस्तकात आगरकरांनी सार्‍या घटनाक्रमाचं वर्णन केलं आहे.

[८] शोधकाला 'केसरी'नं उल्लेखलेल्या स्थळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचा नाद असावा. 'आमच्या देशातील मंडळ्या व सभा' हा लेख वाचून शोधकानं क्रीडाभवनास व डेक्कन कॉलेजास भेट दिली. 'केसरी'नं तिथल्या अव्यवस्थेबद्दल लिहिलं होतं. शोधकाचं मत मात्र वेगळं होतं. त्याला क्रीडाभवनाची व डेक्कन कॉलेजातल्या क्लबांची (विद्यार्थी इथे एकत्र जेवत) व्यवस्था समाधानकारक वाटली. क्रीडाभवनाचं बांधकाम अजून सुरू होतं आणि ते पुरं झाल्यावर तक्रारीस अजिबात जागा उरणार नाही, असं शोधकाचं मत होतं. शोधकानं पत्र लिहून 'केसरी'नं निष्पक्ष राहून मत मांडावं, असं सुनावलं. 'टीका हितावहच असते' असं उत्तर 'केसरी'कारांनी दिलं. (५ मे, १८८१)

[९] 'केसरी'नं १८८१ ते १९३० या काळात विविध उद्योगांवर लिहिलेल्या लेखांची सूची उपलब्ध आहे.

[१०] हे भोजनगृह सुरू झालं तेव्हा 'आमचे समजण्यात असे आले आहे की, एका माहितगार व हुशार पारश्याने एथे बंगल्याजवळ एक नवीन भटारखाना काढण्याचा चालविला आहे. हा भटारखाना झाला असता साहेब लोकांस फार सोयीचा होईल', अशी बातमी ज्ञानप्रकाशात आली होती. (२१ मार्च, १८६१).

[११] रूपराम चौधरी रावबाजीच्या पायदळ पलटणीवर व तोफखान्यावर अधिकारी होते. त्यांच्याकडे कर्नाटकातले काही किल्ले होते. शिवाय सिंहगड व आसपासचा मुलुखही त्यांच्याकडे होता. पेशवाई बुडण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. रामचंद्र नावाच्या त्यांच्या दत्तकपुत्रास ब्रिटिशांनी १२,३०० रुपयांचं पेन्शन दिलं आणि जुन्नरजवळच्या एका खेड्यातल्या वसुलीचे अधिकार दिले. या चौधर्‍यांच्या वाड्यात कोंढव्याहून आणलेले पाण्याचे नळ होते. चौधर्‍यांनी स्वखर्चानं ही व्यवस्था केली होती. गुरुवार पेठेतल्या इतर हौदांमध्येही त्यांनी कोंढव्याच्या पाण्याचे नळ सोडले होते. हे कुटुंब एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात पुणं सोडून ग्वाल्हेरजवळ स्थायिक झालं.

[१२] त्र्यंबकराव पेठे सदाशिवराभावांचे मामा होते. १७७४ साली टिपूसुलतानाशी लढताना त्र्यंबकरावमामा कामी आले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या पेठे कुटुंबावर लक्ष्मी प्रसन्न होती. नंतर मात्र रावबाजीची मर्जी फिरली तसे पेठ्यांचे दिवसही फिरले. पेशवाई लयास गेल्यानंतर ब्रिटिशांनी या कुटुंबास आर्थिक मदत केली.

[१३] एक्कावन्न कुळांचे कुलवृत्तांत मला उपलब्ध झाले. ही कुळं पुढीलप्रमाणे - गोखले, लिमये, कोपरकर, पेंडसे, साठे, आगाशे, गोळे, देवधर, फाटक, लिमये, गोगटे, टिळक, छत्रे, केतकर, जोगळेकर, सोवनी, पटवर्धन, नामजोशी, दातार, चिपळूणकर, सोमण, अभ्यंकर, आठवले, आपटे, भानू, दाते, भिडे, कुंटे, भट, परांजपे, केळकर, वेलणकर, ठोसर, जोग, घाणेकर, गाडगीळ, घारपुरे, गणपुले, नेने, लेले, जोग, कर्वे, करंदीकर, खरे, पोंक्षे, सावे, रानडे, पेठे, रिसबुड, दांडेकर, दामले.

संदर्भ -

अ. वर्तमानपत्रे -

ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, केसरी, जगद्धितेच्छु, पुणेवैभव, इंदुप्रकाश, काळ, मुमुक्षु, नेटिव्ह ओपिनियन, वार्तानिधी, मराठा, सुधारक, द टाईम्स ऑफ इंडिया, सकाळ, वृत्तवैभव, वर्‍हाड समाचार

आ. नियतकालिके -

केरळकोकिळ, मासिक मनोरंजन, संशोधक, शालापत्रक, वर्‍हाड शालापत्रक, काव्येतिहाससंग्रह, उद्यम, आहार, धंदेशिक्षण

इ. ग्रंथ -

१. पुणेरी - श्री. ज. जोशी, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७८.
२. असे होते पुणे - म. श्री. दीक्षित, उत्कर्ष प्रकाशन गृह, पुणे, २००१.
३. आठवणीतील पुणे - वसंत शं. खानवेलकर, माधवी प्रकाशन, २००८.
४. हरवलेले पुणे - ग. वा. बेहेरे, नौबत प्रकाशन, मुंबई, १९६७.
५. पुणें शहरचे वर्णन - नारायण विष्णु जोशी, १८६८.
६. Poona Suburban Municipality : Sixty Years' History (1884 - 1944) - Published by the Poona Suburban Municipality on the occassion of it's Diamond Jubilee, March 1, 1945.
७. पुणे शहराचे वर्णन (१९०१ - १९२०) - हरि रघुनाथ भागवत, अष्तेकर कंपनी, पुणे, १९२४.
८. पुण्याचा माहितगार - लेखन व संपादन एस्. एम्. कणगली, पूना डिरेक्टरी हाऊस, पुणे, १९५२.
९. पेशवेकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे, वरदा प्रकाशन, पुणे, १९९८. (पहिली आवृत्ती - १९३५).
१०. Poona in the Eighteenth Century : An Urban History - Balkrishna Govind Gokhale, Oxford University Press, New Delhi, 1988.
११. Poona : Look and Outlook - Ed. by Prof. R. V. Oturkar, The Poona Municipal Corporation, Poona City, 1951.
१२. The Illustrated Poona Guide & Directory for 1929-30 - Published by Thos. Peters, for The Sun Publishing House, Poona, 1929
१३. असे होते पुणे - म. श्री. दीक्षित, उत्कर्ष प्रकाशन, २००१.
१४. बदलते पुणे - डॉ. मा. प. मंगुडकर, उत्कर्ष प्रकाशन, २००१.
१५. हरवलेले पुणे - अविनाश सोवनी, पूर्वा प्रकाशन, १९९८.
१६. दि डेक्कन एज्युकेशन सोसायटी : १८८५-१९६० - के. गो. पंडित, डे. ए. सोसायटी, पुणे, १९६०
१७. आगरकर - य. दि. फडके, मौज प्रकाशन, मुंबई, १९९६
१८. वासुकाका जोशी आणि त्यांचा काळ - त्र्यंबक रघुनाथ देवगिरीकर, चित्रशाळा प्रकाशन, पुणे, १९४८
१९. रानडे-प्रणीत सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा - गं. बा. सरदार, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७३
२०. संपूर्ण आगरकर (भाग १ - ३), संपादक - माधव दा. आळतेकर, मॉडर्न बुक डेपो, पुणे, १९३७-४७
२१. कैलासवासी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र - लक्ष्मण कृष्ण चिपळूणकर, चित्रशाळा प्रेस, पुणे, १९२१
२२. माझा जीवनवृत्तान्त - सी. ग. देवधर, प्रकाशक - पु. वि. बापट, सातारा, १९२७
२३. गोपाळ गणेश आगरकर - सुनन्दा देशपांडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८३
२४. केसरीतील निवडक निबंध - पहिले पुस्तक, आर्यभूषण छापखाना, पुणे, १८८७
२५. केसरीतील निवडक निबंध - दुसरे पुस्तक, आर्यभूषण छापखाना, पुणे, १८८८
२६. निवडक निबंध - भाग पहिला, (सुधारकात प्रसिद्ध झालेले सामाजिक, धार्मिक व राजकीय विषयांवर निवडक निबंध). शिराळकर आणि कंपनी, पुणे, १८९५
२७. निबंधसंग्रह - भाग पहिला, सुधारक छापखाना, पुणे, १९१७
२८. निबंधसंग्रह - भाग दुसरा, सुधारक छापखाना, पुणे, १९१८
२९. निबंधसंग्रह - भाग तिसरा, सुधारक छापखाना, पुणे, १९१९
३०. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस - गो. ग. आगरकर, आर्यभूषण छापखाना, पुणे, १८८२
३१. प्रिं. गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र - हरि बल्लाळ परचुरे, क्षीरसागर यांची उपयुक्त पुस्तकमाला, मुंबई, १८९६
३२. आगरकरांशी ओळख - पु. पां. गोखले, १९६९, कराड
३३. आगरकर लेखसंग्रह, संपा. ग. प्र. प्रधान, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, १९६०
३४. शोध : बालगोपाळांचा - डॉ. य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७७
३५. मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८६२ - १९३७) - रा. गो. कानडे, कर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९३८
३६. लो. बाळ गंगाधर टिळक यांचे पन्नास वर्षांचे चरित्र - कृ. आ. गुरुजी, पुणे, १९०६.
३७. मराठी वाङ्मयाचा इतिहास, संपा. रा. श्री. जोग, खंड ५ (भाग १ व २), महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशन, पुणे
३८. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला (१८७५ - १९२०), अ. ना. देशपांडे, व्हीनस प्रकाशन, पुणे, १९५४
३९.लोकमान्य टिळकांचे सांगाती - दत्तो वामन पोतदार, केसरी प्रकाशन, पुणे, १९७२
४०. व्यक्ती आणि विचार - डॉ. य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७९
४१. लोकमान्य - न. र. फाटक, मौज प्रकाशन, मुंबई, १९७२
४२. विष्णु कृष्ण चिपळूणकर : काळ आणि कर्तृत्व - ग. त्र्यं. माडखोलकर, विदर्भ प्रकाशन, अमरावती, १९५४
४३. यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी : एक आकलन - प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९६
४४. Poona and Kirkee Guide & Directory (1896, 1902, 1910) - Published by Thos. Peters, Poona
४५. कृष्णराव भालेकर समग्र वाङ्मय - संपा. सीताराम रायकर, पुणे, १९८३
४६. पुणे नगर संशोधन वृत्त (भाग १ - ४) - संपादन व प्रकाशन - चिं. ग. कर्वे, पुणे, १९४२
४७. सरदारगृहाने आहिलेले राजकारण - त्र्यं. वि. पर्वते, सरदारगृह प्रा. लि., मुंबई, १९७९
४८. वैभव पेशवेकालीन वाड्यांचे - डॉ. मंदा खांडगे, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९२
४९. चिपळूणकर लेखसंग्रह - संपा. मा. ग. बुद्धिसागर, साहित्य अकादमीतर्फे पॉप्युलर प्रकाशन, नवी दिल्ली, १९६२
५०. विष्णुपदी (तीन खंड) - संपा. श्री. ना. बनहट्टी, सुविचार प्रकाशन मंडळ, पुणे, १९७४
५१. विष्णुशास्त्री - प्रा. रा. श्री. पुराणिक, रविराज प्रकाशन, पुणे, १९९२
५२. 'निबंधमाला'कार विष्णुशास्त्री चिपळूणकर - छाया बकाणे, गंधर्व-वेद प्रकाशन, पुणे, २०१०
५३. गतगोष्टी अर्थात् माझी जीवन-यात्रा - न. चिं. केळकर, पुणे, १९३९
५४. लो. टिळकांचे केसरींतील लेख - (भाग १ - ६), केसरी - मराठा संस्था, पुणे, १९२२
५५. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा किरकोळ लेखांचा संग्रह (दोन भाग) - संपा. खंडेराव भिकाजी बेलसरे, प्रका. के. सी. कुळकरणी, पुणे, १९०२
५६. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्राचें व लेखांचें साधारण स्वरूप, तसबिरीसहित - खंडेराव भिकाजी बेलसरे, ज्ञानप्रभाकर ग्रंथप्रकाशक मंडळी, मुंबई, १८९१
५७. British Social Life in India, 1608 - 1937 - Dennis Kincaid, Routledge & Kegan Paul in association with Blackie, India, 1937
५८. पुणे नगर संस्थान - धोंडीबा नारायण बोराटे, पुणें नगरपालिका मुद्रणालय, १९४३
५९. शहर पुणे : एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा (खंड १ व २) - संपा. अरुण टिकेकर, निळुभाऊ लिमये फौंडेशन, पुणे, २०००
६०. आधीच पुणे गुलजार... - वि. ना. नातू, वरदा प्रकाशन, पुणे, १९९५
६१. Poona : The Peshwas' city, and its neighbourhood - A guide to places of interest with history and map - Lt. Col. H. A. Newell, Poona, 1932
६२. History of Poona and Deccan in a perspective - Arthur Crawford, Gian Publishing House, New Delhi, 1987
६३. Pune City : Its History, Growth & Development (758 to 1998 AD) : A Bibliography - Dr. S. G. Mahajan, Manasnman Prakashan, Pune, 2000
६४. Catalogue of Native Publications in Bombay Presidency upto 1864 - A. Grant, 1890
६५. Creative Pasts : Historical memory and Identity in Western India, 1700 - 1960 - Prachi Deshpande, Columbia University Press, New York, 2007
६६. Kingship and Colonialism in India's Deccan : 1850 - 1948, Benjamin B. Cohen, Palgrave Macmillan, New York, 2007
६७. Thirty - Four years in Poona City - Rev. Elain, 1911
६८. लोकमान्य टिळक यांचे चरित्र (खंड १ - ३) - नरसिंह चिंतामण केळकर, रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, २०१२
६९. केसरीतील निवड निबंध व विविध विषय संग्रह - गो. ग. आगरकर, समन्वय प्रकाशन, कोल्हापूर, २०१२
७०. गोपाळ गणेश आगरकर (चरित्र) - प्रा. माधव दामोदर अळतेकर, वरदा प्रकाशन, १९

ई. शोधनिबंध -

१. ज्ञानप्रकाश वृत्तपत्राची कामगिरी (इ.स. १८४९ ते १९०४) - सौ. अनुराधा कुलकर्णी, पुणे विद्यापीठ, २००६

उ. सूचि -

१. मराठी ग्रंथ-सूचि : १८००-१९३७ व १९३८ - १९५०, संपादक व प्रकाशक - शंकर गणेश दाते, पुणे, १९४३, १९६१
२. मराठी नियतकालिकांची सूचि : १८००-१९५०, खंड (१-३), संपादक - शंकर गणेश दाते, दिनकर विनायक काळे, शंकर नारायण बर्वे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई
३. विविध - विज्ञान-विस्तार-सूचि - पुष्पा भावे, १९६८
४. महाराष्ट्र साहित्य पत्रिका - सूचि, संपा. मराठी विभाग : पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, १९७१
५. महाराष्ट्रीय वाङ्मयसूचि (१८१० - १९१७) - संपा. य. रा. दाते व रा. त्र्यं. देशमुख, ज्ञानकोश कार्यालय, नागपूर, १९५९
६. केसरी लेखन-निबंध-सूचि
७. आगरकर निबंध-नाम-विषय-सूचि - संकलन - सौ. प्रतिभा ठिपसे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, १९७३

ए. खाजगी कागदपत्रे -

नेहरू मेमोरियल अ‍ॅण्ड म्यूझियम लायब्ररी, नवी दिल्ली, येथील गोपाळ गणेश आगरकर व बाळ गंगाधर टिळक यांची खाजगी कागदपत्रे.

स्रोत -

भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर (पुणे)
भारत इतिहास संशोधक मंडळ (पुणे)
डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (पुणे)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय (पुणे)
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकनॉमिक्स यांचे धनंजयराव गाडगीळ ग्रंथालय (पुणे)
शासकीय विभागीय ग्रंथालय (पुणे)
पुणे मराठी ग्रंथालय (पुणे)
पुणे नगर वाचन मंदिर (पुणे)
केसरी - मराठा ट्रस्ट यांचे ग्रंथालय (पुणे)
फर्गसन महाविद्यालय (पुणे)
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा (पुणे)
महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे)

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंबई)
एशियाटिक लायब्ररी (मुंबई)
मुंबई विद्यापीठ (मुंबई)

शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर)

महाराष्ट्र साहित्य सभा (इंदूर)

सेन्ट्रल लायब्ररी (वडोदरा)
द महाराजा सयाजीराव ओरिएन्टल इन्स्टिट्यूट (वडोदरा)

नेहरू मेमोरियल अ‍ॅण्ड म्यूझियम लायब्ररी, नवी दिल्ली

नॅशनल लायब्ररी, कोलकाता

कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी, चेन्नै
अण्णा सेंटेनरी लायब्ररी, चेन्नै

*
'भोजनगृह' या लेखाची व जाहिरातीची प्रतिमा नेहरू मेमोरियल अ‍ॅण्ड म्यूझियम लायब्ररी यांच्या सौजन्याने.

विशेष आभार -

डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. द. ना. धनागरे, प्रा. प्रभाकर सोवनी, डॉ. अरुण टिकेकर, श्री. चारुदत्त सरपोतदार, श्री. गोविंदराव मालशे, श्रीमती नातू, श्री. पद्माकर रा. ठोंबरे, श्रीमती इंदुमती प. ठोंबरे, श्रीमती रजनी महाजनि (अकोला)

पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड, बृहन्मुंबई महानगरपालिका, पारसी पंचायत (पुणे), बॉम्बे पारसी पंचायत (मुंबई), चित्पावन कोकणस्थ संघ (पुणे), द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड (लंडन), डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे), केसरी-मराठा ट्रस्ट (पुणे)

श्री. आनंद आगाशे (मेनका प्रकाशन), श्रीमती सुजाता देशमुख (मेनका प्रकाशन)

श्री. राजेंद्र पोंक्षे, श्री. रवीन्द्र पोंक्षे, पोंक्षे कुटुंबीय, श्री. किशोर करडे

श्री. किशोर सरपोतदार, श्री. जयंत मिजार, श्री. चिन्मय मिजार व कुटुंबीय, श्री. सुरेश आपटे, श्री. दीपक जोशी, श्री. केतन गाठाणी, श्री. आप्पा गजमल, श्री. तात्या कांबळे, श्री. श्याम जोगळेकर

डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे, डॉ. म. श्री. माटे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. राजा दीक्षित, डॉ. एन. के. भिडे, श्री. वि. ना. नातू, श्री. शेखर नातू, श्रीमती सुमित्रा भावे, श्री. सुधीर गाडगीळ, डॉ. सतीश देसाई, श्री. अभय टिळक, श्री. आनंद हर्डीकर, डॉ. अनुराधा कुलकर्णी, श्री. रवी ओक, डॉ. कमल मंडलिक, श्री. बाळासाहेब ढमाले, श्री. अजित फाटक, श्री. अविनाश भाजेकर, डॉ. नीलिमा रड्डी, श्री. वसंत टापरे, श्री. विनय कांबळे (कोल्हापूर)

अंशुमान सोवनी, वरदा खळदकर

श्री. सीताराम रा. गाईकवाड यांच्या 'पुणें शहरचे वर्णन' या पुस्तकाचा पहिला भाग मला पुण्यामुंबईत उपलब्ध होत नव्हता. हे पुस्तक इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथालयात आहे असं कळल्यावर त्यांच्याशी संपर्क साधला. संस्थेचे कार्यवाह श्री. मिलिंद देशपांडे यांनी ताबडतोब पुस्तकाची फोटोकॉपी मला स्वखर्चानं पुण्याला पाठवली. या त्यांच्या मदतीबद्दल मी ऋणी आहे.

पुण्यामुंबईतल्या जुन्या खाद्यगृहांचा शोध घेताना पोंक्षे, गोगटे, जोगळेकर, करंदीकर, अग्रवाल, बारणे, बारी अशी आडनावं लावणार्‍या महाराष्ट्रातल्या शेकडो कुटुंबांना मी वेळीअवेळी फोन केले, त्यांच्याकडे चौकश्या केल्या. या सर्वांनीच माझ्यावर न चिडता मला मदत केली. अनेकांनी माझ्या वतीनं इतरांकडे चौकश्या केल्या. 'सध्यातरी आम्हांला माहीत नाही, पण जरा नातेवाइकांना विचारून सांगतो' असं म्हणणार्‍यांनी खरोखर नंतर स्वतःहून मला फोन केले. न रागावता जमतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सर्वांचा मी ऋणी आहे.

हा लेख संक्षिप्त व अपूर्ण स्वरूपात २०१६च्या 'माहेर'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. त्या लेखातला काही भाग इथे वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख (संपादिका, 'माहेर') यांचे आभार.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

ऐतिहासिक संदर्भांसह लिहिलेला लेख फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अफाट अप्रतिम आहे. अर्थात असे म्हणणे म्हणजे लेखाला पूर्ण न्याय देणे नव्हे हे बाकी आहेच. लेखाकरिता जी आणि जितकी मेहनत घेतलीय ते पाहता लेखकास साष्टांग दंडवत घातला पाहिजे हे आमचे जुनेच मत पुनरेकवार उद्धृत करून थांबतो. _/\_ बहुत काय लिहिणे? लेख चवीचवीने पुन्हापुन्हा वाचला पाहिजे तरच त्यातल्या अनेक गोष्टी नीट अप्रीशिएट होतील....

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय सुरेख लेख. नेहमी प्रमाणेच. दिवाळी साजरी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा

जबरदस्त लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती संदर्भ! किती अवतरणे! या सगळ्याचा व्यवस्थित मेळ जमवून आणि डोक्यातला घोळ मिटवून वाचतानाच दमछाक झाली. लेखकाने ही सर्व माहिती कशी जमवली असेल, सुसंगतपणे एका धाग्यात कशी ओवली असेल याचा विचारच करवत नाही.
लेख अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे हेवेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा वाचायला सुरूवात केली की थांबवत नव्हते. फार सुंदर माहिती आहे, आणि सखोल संशोधनातून आलेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख लेख लिहिण्याचे श्रम घेतल्याबाबत लेखकाचे अनेकानेक आभार. 'नारायण रामचंद्र' हा दुवा पकडून त्यावरून भोजनगृहाचा स्थापक शोधणे ह्यावरून लेखकाची संशोधनाची चिकाटी लक्षात येते. जुन्या पुण्याची आणि तत्कालीन व्यक्तींची अन्यहि बरीच माहिती लेखामध्ये जागोजागी पसरली आहे. आर्यभूषणकाकूंचे नाव आणि माहिती पहिल्यानेच वाचनात आली.

जुन्या पुण्यातील उपहारगृहांबाबत आचार्य अत्र्यांच्या 'मी कसा झालो' ह्या आत्मचरित्रामध्ये काही माहिती आहे असे आठवते. तसेच कुलवृत्तान्तांच्या यादीमध्ये १९३६ साली प्रकाशित झालेल्या 'कोल्हटकर कुलवृत्तान्ता'चा उल्लेख निसटून गेला आहे. त्याची एक प्रत भा.इ.सं.मं. मध्ये आहे कारण त्याची xerox कॉपी मी करून घेतली होती. तिची नंतर pdf करून मी ती archive.org चढविली आहे.

लेखामध्ये दोनतीन जागी उल्लेख झालेले सीतारामपंत देवधर हे साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक. ते सुधारक असल्याने सनातन्यांचा त्यांच्यावर राग असे. माझे आजोबा हरि गणेश साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांच्या लग्नाच्या वेळी सीतारामपंत जेवणास आले होते पण स्वेच्छेने मुख्य पंक्तीपासून बाजूस बसून जेवले अशी आठवण मी आजोबांच्या तोंडून ऐकली आहे.

एक सूचना करावीशी वाटते. संदर्भग्रन्थांमध्ये अनेक परिचित आणि अपरिचित पुस्तकांचे उल्लेख आहेत. ही पुस्तके लेखकाजवळ उपलब्ध असल्यास आणि कॉपीराइटच्या बाहेर गेली असल्यास त्यांच्या pdf करून archive.org सारख्या संस्थळावर उपलब्ध करून दिल्यास अनेक ग्रन्थप्रेमींचे धन्यवाद मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0