स्वतःची मुलाखत!

संकल्पना

स्वतःची मुलाखत!

- ज्युनियर ब्रह्मे

तर एक दिवस ऐ. अ. मधून फोन आला- "ज्युनियर ब्रह्मे, आमचा येता अंक विनोद विशेषांक आहे. तर -"
"मग माझं काय काम?" मी नेहमीच्या आगाऊ सुरात बोललो.
"विनोद इथं करू नको. लिहिताना कर." संपादकांनी दम दिला, "आणि -"
"आणि काय?"
"आणि लोकांना कळेल असं -"
"लिहू म्हणता?"
"त्याची काही गरज नाही. तुझं नाव वाचल्यावर दोनच शक्यता असतात. एकतर वाचक पान उलटून पुढं जातात किंवा वाचून आपल्याला आवडलं. अशी समजूत करून घेतात. आपण यातल्या तिसऱ्या वर्गासाठी लिहितोय, हे लक्षात ठेव."
"तो कोणता?"
"मी विनोद केला रे. इतकंपण कळत नाही का? वेडा कुठला!" संपादकांनी मला कदाचित वेडावूनही दाखवलं असावं, पण ते फोनवर दिसत नाही हे एक बरं. फोन ठेवल्यावर मी विचारात पडलो. विनोदी विशेषांकासाठी लिहायचं? म्हणजे या वर्षी 'दिवाळी खूनखराबा'साठी लिहिलेली जिवंत मुडदा ही रहस्यकथा यांना द्यायची का? माझ्या मनातले विचार संपादकांना कळले असावेत, कारण तितक्यात फोन पुन्हा घणघणला.
"अरे हो, लिहिताना विनोदी लिखाणाचा उगम किंवा परिशीलन असं काहीसं लिही हं."
हे संपादक आहेत की समीक्षक? एक समीक्षकानं माझं काहीतरी वाचून 'अतार्किकतेचा सम्यक दीर्घछेद करणारं प्रहसन' असं म्हटलं होतं. कदाचित त्याला ‘अगतिकांचा दीर्घ संयम पाहणारं प्रहसन’ म्हणायचं असावं. तेव्हापासून मी समीक्षक आणि संपादकांपासून चार हात लांबच राहतो.
"परिशीलन म्हणजे विनोदाचं सिंहावलोकन करायचं का?" है शाब्बास! मला वेळीच शब्द आठवला.
"करेक्ट! स्वतःच्या विनोदाचं मूल्यमापन कर. दुसरं कोण करणार रे?"
"बोंबला! अहो, लेखक स्वतःचं मूल्यमापन करू लागला की त्यानं रिटायर व्हायचं असतं म्हणे..." मी घाबरून म्हणालो.
"वाटलं होतं त्यापेक्षा हुशार आहेस हं तू." संपादकांनी फोन ठेवला.

---

सकाळी मंडईत छत्री हरवली, दुपारी पानवाल्याला शंभराची नोट देऊन सुट्टे घ्यायचे विसरलो, आणि आता हे! आजचा दिवस भलताच बेकार चाललाय या विचारांनीच काही सुचेनासं झालं. प्रेरणा मिळावी म्हणून उत्तेजक पेय घेऊन पाहिलं, टुकारातले टुकार सिनेमे पाहिले, टीव्हीवरच्या चर्चा पाहिल्या, गणितं सोडवून पाहिली, पण छ्या! डोक्याला काही चालना मिळेना. अमुक एक लिही, असं सांगितलं की मला तसं हुकमी कधीही लिहिता येत नाही.

'लिहिणं हे लहान बाळानं शी करण्यासारखं असतं. कर म्हटली की येत नाही आणि नको म्हटली की येते.'
-अज्ञात

माझंही असं काहीसं झालं होतं. इतर वेळेस स्वतःची अखंड पिपाणी वाजवत असतो, पण आता स्वतःबद्दल लिहायचं म्हटलं तर लिहवत नव्हतं. नक्की कुठून सुरुवात करायची याबाबत गोंधळ होत असावा. यापेक्षा मुलाखतीत बरं असतं. ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्याबद्दल मुलाखतकाराला काही माहीत नसलं पाहिजे, असा नियम पत्रकारितेत आल्यापासून प्रश्न आणि त्याला टॅंजंट जाणारी उत्तरं, असा खो-खोचा खेळ छान रंगतो. पण माझी मुलाखत घ्यायला कोण येणार?

---

आणि नेमका ज्युनियर ब्रह्मे माझ्यासमोर आला-
ज्युब्र : नमस्कार मित्रहो, आज आपल्यासमोर आले आहेत ज्युनियर ब्रह्मे या पात्राचे जनक आणि लेखक. यांचं ज्युनियर ब्रह्मे हे नाव अर्थातच खोटं असून खरं नाव आहे -
मी : (गडबडीनं) ते सध्या अज्ञातच राहू देत.
ज्युब्र : मला एक सांगा, तुम्ही विनोदी लिखाणाला सुरुवात कशी केलीत?
मी : (वैचारिक लेखकासारखा गंभीर चेहरा करून) सांगायचं झालं तर, मला विनोदी लेखक अजिबात व्हायचं नव्हतं. मुळात मला लेखकच व्हायचं नव्हतं -
ज्युब्र : ओ, तुम्ही लेखक नाहीच आहात. फेसबुकवर पोस्टी लिहिल्या म्हणजे लेखक झालात, असं समजू नका स्वतःला. विनोदी लेखनाची सुरुवात कशी झाली आणि त्यातून माझा जन्म कसा झाला ते सांगा मुकाट.
मी : (मनात: मुकाट्यानं कसं सांगू रे गधड्या? प्रकट:) मग, तसं सांगायचं झालं लहानपणापासूनच कुठल्याही गोष्टीतली विसंगती मला भारून टाकायची. विरोधाभास नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचा. पण सुदैवानं मला याचं हसू कधी आलं नाही.
ज्युब्र : म्हणजे? एखादं उदाहरण सांगाल?
मी : मी पोहायला शिकलो तेव्हा आमच्या बॅचला एक चाळिशीचा माणूस यायचा. डोक्याच्या मध्यभागी टक्कल असल्यानं एका बाजूचे केस प्रयत्नपूर्वक आणून त्यानं कसंबसं टक्कल झाकलेलं असे. जय्यत तयारीनिशी कमरेला टायर बांधून तो तीन फूट पाण्यात उतरायचा आणि जवळपास पूर्णवेळ ताठ उभं राहून फ्रीस्टाईलच्या स्ट्रोकप्रमाणं हवेत हात मारायचा. तास संपेपर्यंत तो या श्रमानं चांगलाच घामाघूम व्हायचा. पाण्यात उभं राहून हवेत हात फिरवणं म्हणजे चेष्टा वाटली काय?
ज्युब्र : मग? तुम्ही त्याची टिंगल केली का?
मी : केली असती. पण त्याआधीच माझे मित्र मला चिडवू लागले. मीही दोन दिवस पैसे भरून भीतीपोटी पाण्याच्या काठावर बसून राहिलेलो.
ज्युब्र : याचा तुमच्या विनोदाशी काय संबंध आहे देव जाणे. पण हा विनोद कोणत्या प्रकारात मोडतो असं तुम्हांला वाटतं?
मी : म्हणजे असं बघा, मधली बरीच वर्षं 'विनोदी लेखकानं निर्विषच लिहिलं पाहिजे' असा हट्ट वाचक करत असल्यानं विनोदी लेखकांना फक्त चिमटे काढता यायचे. काहीजण त्यापुढं जात फक्त चिमटे काढल्याचा अभिनय करत. एखाद्या लेखकाचा पदर थोडा जरी ढळला तर बाकीचे लेखक त्याला 'अबे, स्वतःला ऑस्कर वाईल्ड समजून राहिला का बे?' असं दरडावत. गांगरलेला बिचारा विनोदी लेखक पुन्हा लठ्ठ बायका, गंजीफ्रॉकवर फिरणारे बगूनाना, बावळट कारकून या प्राचीन विषयांकडं वळे. लठ्ठ बायकांवरून आठवलं, या लठ्ठ बायका आणि लंपट बगूनाना चराचरांत वसणाऱ्या परमेश्वराप्रमाणे मराठी विनोदाच्या पानापानांत आढळायचे. आणि बावळट कारकून हे तमाम मराठी लोकांच्या अनुभवविश्वाचा भाग असल्यानं तर हटकून असायचे. कधीमधी कुठल्याश्या व्याख्यानमालेत 'आता मराठी विनोदात नव्या वाटा चोखाळल्या जाणं ही काळाची गरज आहे.' असं प्रतिपादन केलं जायचं.
ज्युब्र : हा काय परिसंवाद वाटला का तुम्हाला? स्वतःपुरतं बोला. तुमचा विनोद हा कोणत्या प्रकारात मोडतो ते सांगा.
मी : (जीभ चावून) मी लिहितो तो बहुदा स्वनिंदात्मक विनोद म्हणता येईल -
ज्युब्र : असं कसं म्हणता येईल? तुम्ही लिहिता ही माझी निंदा असते. त्यात तुमचं काय जातं हो? तुमचा विनोद होतो आणि आमचा खेळ होतो.
मी : चिडू नको ज्युनियर. सेल्फ डेप्रिकेटिंग ह्युमर हा विनोदातला सगळ्यात अवघड प्रकार असतो.
ज्युब्र : उगाच इंग्लिश नावं वापरून माझ्यावर वजन पाडू नका. तुम्ही लिहिताय म्हणून तुम्हांला तो अवघड प्रकार वाटतो. वडापाव विकत असतात तर वडापाव हा जगातला सर्वात स्वादिष्ट आणि बनवायला कठीण प्रकार आहे, असं म्हणाला असतात. तुमचा प्रकार कोणता ते सांगा आधी.
मी : नक्की कोणता प्रकार याबाबत माझ्या मनात गोंधळ आहे. मी नेहमीच गोंधळलेला असतो. हे गोंधळलेलं असणं आवडतं मला.
ज्युब्र : याचा विनोदाशी काय संबंध?
मी : यामुळं होतं असं, की मी साधारण आऊटलाईन डोक्यात ठेवून गोंधळलेल्या अवस्थेत लिहायला सुरुवात करतो. आणि लिहिताना तिसरीकडंच कुठंतरी भरकटत जातो. प्रत्येक वाक्य लिहिताना मला मी ते कसं लिहिणार आहे याबद्दल अजिबात कल्पना नसते. एखाद्या चौकात उभं राहून त्यातल्या कुठल्याही रस्त्यानं रमतगमत जावं आणि मग पुन्हा चौकात येऊन पुन्हा हव्या त्या रस्त्यानं वाटचाल करावी तसं हे लिखाण असतं. लिहिणं हे माझ्यासाठी एका नवीन अवेन्यूतून फेरफटका मारण्यासारखं असतं. यामुळं, यातून काहीदा अनपेक्षितरीत्या विनोद निर्माण होतो.
ज्युब्र : अर्थात, विनोद हा अनपेक्षित असला तरच भावतो.
मी : तसं नाही रे, काहीदा विनोद झालाय हे मलाच कळलेलं नसतं. वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यावर मला कळतं की अमुक ठिकाणी काहीतरी सटल विनोद झालाय. आणि मग मी स्वतःची पाठ थोपटून घेतो.
ज्युब्र : हे कळल्यावर लोक तुम्हांला धोपटतील असं वाटत नाही? असो, तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणं तुमचा विनोद हा गोंधळलेला, अनपेक्षित आणि स्वनिंदा करणारा असतो.
मी : - हं, असं माझं मत आहे.
ज्युब्र : मग, आपण यापेक्षा चांगलं काही लिहावं असं कधी वाटलं नाही कधी? किमान नवे प्रयोग करायची इच्छा झाली नाही कधी?
मी : नवे प्रयोग काय करावेत हा प्रश्नच आहे. खरंतर जुन्या लोकांनी नव्या प्रयोगांच्या कृती लिहून ठेवल्या असत्या तर आमच्या पिढीचं काम सोपं (किंवा अवघड) झालं असतं. पण तरीही, प्रयोगांबद्दल बोलायचं तर फेसबुकसारख्या माध्यमात प्रयोग करणं जमून जातं. प्रिंट मीडियात नवे प्रयोग करणं जरा अवघड असतं.
ज्युब्र : हे तुम्ही अनुभवांतून बोलताय तर -
मी : अजिबात नाही! प्रिंट मीडियात मला कुणी हिंग लावून विचारत नसल्यानं ते लोक प्रयोगशील लोकांचे पाय ओढतात, हे सांगणं इथं अगत्याचं ठरतं.
ज्युब्र : ऑनलाईन मीडियावरचे बरेच लोक प्रिंट मीडियातही लोकप्रिय आहेत. तुम्ही कसे काय उपेक्षित राहिलात?
मी : चार कारणं. पहिलं म्हणजे ज्युनियर ब्रह्मे या टोपणनावामुळं लोकांना माझ्यापर्यंत पोचायला अवघड वाटतं. दुसरं कारण म्हणजे हेच पण आपण वेगळ्या सुरात -
ज्युब्र : वेगळा सूर म्हणजे उपरोधाचा का?
मी : नाही, वेगळा सूर म्हणजे आशा पारेखसारखं किरट्या आवाजात बोलायचं! तिसरं कारण आपल्याकडं एकुणातच टोपणनावाकडं संशयानं पाहिलं जात असल्यानं कुणी माझ्या वाटेला गेलं नाही. आणि चौथं कारण म्हणजे मी बऱ्यापैकी बरं लिहीत नसावा.
ज्युब्र : नसावा काय, नाहीच्च! असं म्हटलं जातं की ज्युनियर ब्रह्मेंचं लेखन एकतर फालतू असतं किंवा अतिभिकार.
मी : हळू बोल गाढवा. वाचकांना कळलं तर वाचणं इथंच थांबवतील.
ज्युब्र : एक सांगा, माझा जन्म नक्की कसा झाला? म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधल्या ब्रह्मेंच्या लेखावरून प्रेरणा घेत तुम्ही माझा अवतार निर्माण केलात. हे कसं सुचलं?
मी : सुचलं वगैरे काही नाही. मला अशा प्रकारचे लोक नेहमीच भेटत आलेत. अगदी कॉलेजमध्ये असतानाही असे लोक मला भेटत आलेत. ह्या लोकांना मीच कसा भेटतो कुणास ठाऊक!
ज्युब्र : कदाचित तुमच्या टॉवरखाली त्यांना बावळटपणाची रेंज फुल मिळत असावी.
मी : किंवा, चुंबकाची विरुद्ध टोकं आकर्षित होतात तसंही असेल. अशा लोकांच्या असंख्य अचाट कथा मी आजवर ऐकल्यात, पाहिल्यात. मी जी स्फुटं वगैरे लिहितो ती पूर्ण काल्पनिक नसून या घटनांचं अतिशयोक्त रूप असतं. ज्युनियरचा बावळटपणा माझ्या राजू नावाच्या कॉलेजमित्रावर बेतलाय.
ज्युब्र : अच्छा. पण हा राजू तरी खरा आहे का?
मी : शंभर टक्के खरा. त्याच्या लोकोत्तर कथा हा वेगळाच विषय आहे. त्याच्या बऱ्याच कृती सर्वसामान्य लोकांना अतर्क्य वाटायच्या.
ज्युब्र : म्हणजे?
मी : राजूचं खोट्या सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होतं. त्या दुकानात सिगारेटची सोय होत असल्यानं आम्ही तिथं जातयेत असायचो. राजू भलताच शिस्तीचा भोक्ता असावा. सकाळी साडेदहाच्या आधी आणि दुपारी बारानंतर दुकान उघडं न ठेवण्याचा त्याचा शिरस्ता होता. दुपारची झोप आटपून चहाबिहा झाला की निवांत साडेसहाला दुकान उघडायचं आणि आठ वाजेपर्यंत कशीतरी कळ काढायचा. अशानं दुकानात कुणी गिऱ्हाईक दिसणं हे दिवसाउजेडी शुक्राची चांदणी दिसण्याइतकं दुर्मीळ होतं.
एकदा त्याच्या दुकानात एक बाई आली. तिनं राजूला चेन दाखवायला सांगितली. राजूच्या दुकानात नेमकी एकच चेन होती. त्याच्याकडं सगळं एकेकच असायचं. राजूनं ती चेन दाखवली. तिला ती पसंत पडली असावी. कारण एक पैचीही घासाघीस न करता तिनं चेन पॅक करायला सांगितली. यावर राजूनं स्पष्ट नकार दिला. राजूचा नकार ऐकून ती बाई हतबुद्ध झाली. गिऱ्हाईकाचा कधी पदस्पर्श न होणाऱ्या या दुकानाच्या मालकानं आपल्याला बाणेदारपणे नाही का म्हणावं, हे तिला कळत नव्हतं. तिनं कारण विचारलं तसं राजू वैतागत हातवारे करून म्हणाला - "समजा, जर तुम्हांला मी ही चेन विकली आणि उद्या कुणी गिऱ्हाईक आलं तर त्याला काय दाखवू?" ती बाई कपाळावर हात मारून परत गेली.
ज्युब्र : थापा मारू नका. ब्रह्मेंच्या गोष्टींप्रमाणं हीसुद्धा कपोलकल्पित गोष्ट आहे!
मी : अजिबात नाही. ती बाई निघून गेल्यावर पंधरा मिनिटांनी खुद्द राजूच्या तोंडून हा किस्सा आम्ही ऐकलाय. ऐकल्यावर मी त्याला प्रश्न विचारला- 'अरे राजू, ती बाई चेन विकत घेणार होती. म्हणजे तीही एक गिऱ्हाईकच होतं ना रे?' यावर पँटची चेन तुटल्यासारखा चेहरा करून राजूनं आम्ही उशीरा आल्याबद्दल उलटा आम्हांलाच दोष दिला आणि चहासिगारेट कॅन्सल केलं.
ज्युब्र : अच्छा. म्हणजे मी मी नाहीय तर. पण हेच नाव का निवडलंत?
मी : मी सकाळमध्ये प्रतिक्रिया लिहायचो तिथून हे नाव आलं. ब्रह्मे आडनाव मला आवडलं कारण याचा पुढंमागं ब्रह्मदेवाशी संबंध जोडणं शक्य होतं. शिवाय दोन्ही अक्षरांत जोडाक्षरं होती. आणि सकाळ चाळताना कुठंतरी जॉर्ज बुश, धाकले यांचा उल्लेख एका ठिकाणी बुश ज्युनियर असा केलेला दिसला. छोटे मियाँ सुभानल्ला म्हणून मी ज्युनियर हे नाव उचललं. ब्रह्मे या बऱ्यापैकी भारदस्त आडनावाला ज्युनियर हे टारगट नाव कॉन्ट्रास्ट म्हणून शोभून दिसतं.
ज्युब्र : मग, ज्युनियर ब्रह्मे हे नाव न घेता याआधी लिहिलंय?
मी : कॉलेजात असताना लिहायचो. पण ते केवळ ठरावीक मित्रांच्या सर्कलपुरतं. अर्थात, तेव्हाच्या वयाला शोभेलसं ते व्रात्य, थोडंसं अश्लील, विडंबनात्मक असं असायचं. त्याकाळी आम्ही राजूच्या गोष्टी लिहायचो.
ज्युब्र : त्याच लिहायच्या ना मग. उगाच माझं नाव बदनाम का करताय? दुसरं एखादं कसलाही जातिधर्माचा लेप नसलेलं नाव नाही सुचलं?
मी : तशी होती- उंट आणि बदक, तिम-अल-बख्तून, बबन बावडेकर अशी दोनतीन नावं होती डोक्यात. पण हे लिहिणं अपघातानं सुरू झालं. कॉनन डॉयलनं पेशंट नसल्यानं वेळ घालवायला शेरलॉक होम्सच्या कथा लिहिल्या, तसं मी ऑफिसातलं टेन्शन घालवण्यासाठी ब्रह्मेंच्या कमेंट लिहायला सुरुवात केली. नंतर, अर्थात, हा कंटाळ्यावरचा डोस इतका पॉवरफुल ठरला की त्याचं व्यसनच लागलं. मग इ-सकाळवरून फेसबुकवर आलो आणि लिहीतच राहिलो. लिहिताना प्रसंगवशात ज्युनियर, बाबा, काका, एलिआत्या, आजोबा, चुलत-आजोबा, बंगाली काकू, कलाबाई हा गोतावळा जमत गेला.
ज्युब्र : मग, यातले तुम्ही नक्की कोण आहात?
मी : लॉरेन्स ऑलिव्हिएला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याचं उत्तर होतं- की मी मी कधीच नसतो. मी जे काही वावरतो ते कायम एक पात्र म्हणून. मला नेहमीच लोकांसमोर येताना कुठल्यातरी पात्राचा बुरखा पांघरून यायची सवय झाली असल्यानं मी स्वतः असा उरलो नाही.
ज्युब्र : हे असं तो काही म्हणाला नसणार. पण आपण किती चौफेर वाचक आहोत, हे दाखवण्यासाठी तुम्ही ही थाप मारत असणार. बरं, अज्ञात राहून लिहिण्यामागं काही कारण? म्हणजे वैतागलेले वाचक धरून बडवतील अशी भीती?
मी : अं, नाही. अज्ञात राहण्यामागं कारण इतकंच की जसा ज्युब्र रंगवला जातो तसा मी नसावा. ज्युब्र हा प्रत्यक्षाहुनि प्रतिमा आचरट असं काहीसं आहे. काहींना मी प्रगल्भ वगैरे वाटत असेन तसा तर मी अजिबातच नाहीय.
ज्युब्र : पण हे काही कारण नाही अज्ञात राहण्याचं. जेव्हा ठणठणपाळ म्हणजे दळवी हे लोकांना कळलं तेव्हा लोक गेले होते का त्यांच्या मिश्या मोजायला?
मी : माहीत नाही, मी नव्हतो तिथं. प्रत्यक्षात जे मला ओळखतात, त्यांना माझी ही ओळख कळली तर मी आचरट आणि बावळटही आहे हे पाहून त्यांना धक्का बसेल.
ज्युब्र : अच्छा! तुम्ही फक्त मूर्ख आहात अशी त्यांची समजूत आहे तर. आपण नवे प्रयोग करण्याबद्दल बोलत होतो, तेव्हा तुम्ही म्हणालात की ऑनलाईन मीडियावर नवे प्रयोग करणं शक्य आहे. नक्की कसले नवे प्रयोग?
मी : अमुक एक असं सांगता येणार नाही. मी काहीही सांगितलं तरी ऐसी अक्षरेचा कुणी वाचक जुनेपुराणे संदर्भ खोदून तो प्रयोग नवा कसा नाही, हे सिद्ध करणार. त्यापेक्षा न सांगितलेलं बरं.
ज्युब्र : केलेच नाहीत असं सांगा ना!
मी : असं कसं? लोक एखाद्या गोष्टीचं विडंबन करतात. मी यापुढं जाऊन विडंबनाचं विडंबन केलं होतं. अर्थात, लोकांना ते कळलं नाही हा भाग वेगळा. केतकरांचा ज्ञानकोश वाचल्यावर त्या धर्तीवर ब्रह्मेपीडिया हा अगोचर विश्वकोश लिहायला सुरुवात केली होती. पण नंतर एकसुरी वाटू लागला म्हणून बंद केलं. (कुणीतरी इथं रमेश मंत्रींनी विनोदाचा अमरकोश लिहिला होता याची आठवण करून द्या, प्लीज.)
ज्युब्र : हे असलं काही वेडपट लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर कोण असतो? ग्राऊचो मार्क्स?
मी : नाही. स्केचसारखं काही लिहिताना माझ्या मनात बहुदा मॉन्टी पायथन असतात. त्यांचा विक्षिप्त विनोद मला आवडतो. त्यातही महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे, एखाद्या स्केचला शेवट सुचला नाही तर पंचलाईनची वाट न पाहता मध्येच स्केच संपवणं. हे असं करणं मला ओपन एन्डेड वाटतं. म्हणजे, व्यक्तीनुसार प्रत्येकाला याचे अनंत शेवट सुचू शकतात. स्वतः विनोद करण्यापेक्षा वाचकांना विनोदाचं दार उघडून तिथपर्यंत नेऊन पोचवण्यात जास्त मजा येते.
ज्युब्र : च्यायला! आणि लोक तर उगाच इथं विनोद कुठाय हे शोधात बसतात. तुमचा आवडता लेखक कोणाय हो?
मी : खरंतर, माझं वाचन फारसं नाही -
ज्युब्र : (वाचकांकडं वळून पाहत) आजच्या मुलाखतीतलं हे एकमेव सत्यविधान असावं.
मी : वाचन फारसं नसलं तरी वूडहाऊस, ऑस्कर वाईल्ड, डोरोथी पार्कर, मिकेश, लीकॉक -
ज्युब्र : हे सगळे वाचलेत? बरंच वाचन आहे की तुमचं!
मी : नाही रे. ही नावं पाठ करून ठेवलीयत! कुणी विनोदाबद्दल बोललं तर यातली चार नावं तोंडावर फेकतो. समोरचा गप्प होतो. अगदीच कुणी तयारीचा भेटला तर मोशे गोल्डबर्ग या ज्युईश किंवा यानेक वाईचेकोवस्की या पोलिश लेखकाची सर कुण्णाकुण्णाला नाही असं बेधडक सांगून टाकतो. इम्प्रेशन चांगलं पडतं.
ज्युब्र : मराठीतला कुणी आवडत नाही का हो?
मी : अवघड प्रश्न आहे. पुलं आवडतात म्हटलं तर पुलंना झोडणारे आणि पुलंप्रेमी दोघंही मला धरून हाणतील. बाकी इतरांच्या नावावर आपण शिक्के मारून ठेवले असल्यानं कुणाचं नाव घ्यायची चोरीच आहे. अत्रे म्हणजे हाणामारा विनोद, शंकर पाटील-मिरासदार म्हणजे ग्रामीण, चिंवि म्हणजे बाळबोध, बाळकराम म्हणजे अतिशयोक्त, मंत्री म्हणजे चावट अशी मांडणी झाल्यानं कुणा एकाचं नाव घ्यायची शामतच नाही.
ज्युब्र : मग, तुम्ही कुणाचं नाव सांगता?
मी : जीए!
ज्युब्र : आं? आचरटपणा नका करू.
मी : का? जीएंनी भिंतीतून जाणारा माणूस नाही लिहिली?
ज्युब्र : तेवढ्यावरून त्यांना विनोदी लेखक ठरवाल का? यापेक्षा प्रॉपर विनोदी लेखक कुणी नाही का?
मी : आहेत ना. श्री कृ कोल्हटकर! ‘सुदाम्याचे पोहे’ हे शंभर वर्षं जुनं असलं तरी त्यातला विनोद मला काळाच्या मानानं धाडसी वाटतो. तत्कालीन रूढींच्या विरोधात जाऊन लिहिणं हे नक्कीच सोपं नसणार. अशी प्रवाहाविरुद्ध पोहणारी माणसं, माझ्यात तसं धाडस कमी असल्यानं, मला आवडतात. सुदाम, पांडूतात्या आणि बंडूनाना अशी तीन पात्रं उभी करून तिघांच्या निरनिराळ्या प्रतलावरचा विनोद घडवण्याची त्यांची हातोटी मला आवडत आलीय. त्यांची माझ्यावर छाप पडली असावी.
ज्युब्र : असावी-असेल अशी विध्यर्थरचना का करता? सरळ आहे असं सांगा ना!
मी : मी स्वतःबद्दल कधीच खात्रीपूर्वक लिहू शकत नाही. लिहिताना कायम माझ्या दोन मनांत द्वंद्व चालू असतं. मला स्वतःला आपण जे लिहितो ते पुरेसं खात्रीशीर वाटत नाही. त्यामुळं माझं लिखाण हे कधीच कन्व्हिन्सिंग नसतं.
ज्युब्र : किंवा कन्व्हिन्सिंग नसावं. मला वाटत होतं त्यापेक्षा हुशार दिसताय की तुम्ही.
मी : हे हुशार वाटणं ही ऑनलाईन मीडियाची किमया आहे. चार चमकदार वाक्यं लिहिणं, अशक्य अद्भुत असं काही लिहिणं, काहीतरी नाद-प्रास असणारी भाषा वापरणं म्हणजे बुद्धिमान असणं असा समज हल्ली रूढ होऊ लागलाय. मी याच समजाचा बळी आहे. एखादी संकल्पना व्यवस्थित मुरवून मग त्यावर लिहिणं, तारतम्य वापरून सर्व बाजू तोलून पाहत लिहिणं हे प्रकार दुर्मीळ होत चाललेत.
ज्युब्र : मी असं ऐकलंय की विनोदी लेखक हा निर्मळ मनाचा असावा लागतो.
मी : ही शुद्ध थाप आहे. उद्या कुणीतरी उत्तम कवी हा रोज अडीच लिटर दूध पिणारा आणि शंभर दंडबैठका काढणारा असतो असं म्हणेल -
ज्युब्र : खरोखर असा कुणी कवी असेल तर त्याच्या कवितांना वाईट म्हणायचं कुणाचं धाडस होणार?
मी : पण, विनोदी लेखकांबद्दलची ही गोष्ट खोटी आहे. उत्तम विनोदानं कुणाला दुखावू नये वगैरे समजुती म्हणजे विनोदच आहेत. विनोदानं टपल्या माराव्या, बोचकारावं, क्वचित ओढूनताणून विनोद करावा किंवा कमरेचं नेसूचं फेडावं - हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण अमुक काही करूच नका, अमुक गोष्ट टॅबू अशी सेन्सरशिप विनोदाला असू नये. मला व्यक्तिशः टॉयलेट ह्यूमर आवडत नाही, पण म्हणून तसं करणाऱ्या कुणाचं मी काही वाचलं-पाहिलं नाही, तर ते चुकीचंय.
ज्युब्र : पण मीतर असं ऐकलं होतं की -
मी : पूर्वसुरीच्या विनोदी लेखकांनी विनोद हा समाजाचा आरसा असतो, त्यानं समाजातल्या दांभिक गोष्टींवर टीका करून समाजमन शुद्ध करावं, निखळ विनोद हा निर्विष असला पाहिजे - यासारख्या आदर्शवादी गाईडलाईन्स उगाचच लोकांच्या मनावर बिंबवून ठेवल्यात. असं काही असू नये. विनोदी लेखन असल्या आदर्शांत अडकवून ठेवल्यानंच नवे प्रयोग लोकांना पचत नसावेत.
ज्युब्र : म्हणजे, प्रसंगी विनोदानं आपली पातळी सोडली तरी चालेल?
मी : च्यायला! पातळी सापेक्ष असते, शिवाय बदलतही असते. आज जी पातळी लोकांना रुचेल ती पंचवीस वर्षांपूर्वी रुचत होती किंवा दहा वर्षानंतर असेल असं नाही. उदाहरणार्थ, आम्ही कॉलेजात एक जोक सांगायचो-
"काय रे, तू मांजराचं नाव सलमान का ठेवलंस?"
"कारण ते मियाँ मियाँ करतं."
आता ह्या विनोदात काहींना याचा धार्मिक पदर रुचणार नाही. पण केवळ एक निव्वळ पीजे म्हणून पाहिलं, तर तसं वाटणार नाही.
ज्युब्र : तुमची उदाहरणं ऐकली की बोललेलं जितकं कळत असतं तेही कळायचं बंद होतं. थोडक्यात, विनोदाला कोणत्याच बाजू वर्ज्य नाहीत.
मी : असं केलं तरच नवे प्रयोग शक्य आहेत.
ज्युब्र : केव्हापासून तुम्ही प्रयोगाबद्दल बोलताय. तुमच्या कादंबरीत तुम्ही सहा शेवट लिहिले होते. असले अत्रंगी प्रकार म्हणजे प्रयोग करणं असं वाटतं का तुम्हाला?
मी : अलबत! हा वाह्यातपणातला नवा प्रयोगच म्हटला पाहिजे. माझ्यासाठी विनोदी असण्यापेक्षा आचरट असणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. पण कधीकधी आचरटपणालाही ऐहिक अडचणींमुळं मुरड घालावी लागते. पृष्ठसंख्या फारच वाढत असल्यानं प्रकाशकांनी एकच शेवट छापायचा ठरवला.
ज्युब्र : बाय द वे, काय झालं हो त्या कादंबरीचं?
मी : ही मुलाखत घेईतो तरी ती प्रकाशित झालेली नाही. कदाचित दिवाळीपर्यंत येईलही.
ज्युब्र : हे तुम्ही गेली अडीच वर्षं म्हणत आलाय.
मी : (चिडून) मग? आतापर्यंत हे ऐकायची सवय व्हायला हवी होती ना तुला?
तितक्यात कोपऱ्यातून ऐ.अ.चे संपादक डोकावतात.
ज्युब्र : किती झाले हो? अडीच हजार झाले का?
संपादक: अडीच काय, तीन हजार होत आले. तरी बरं, तुमचे पैसे शब्दांवर ठरवले नाहीत ते. नाहीतर बोलतच राहिला असतात दोघं. आवरतं घ्या रे आता.
ज्युब्र : (काही बोलणार तोच पडदा पडतो.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

काय महाबोर लेख आहे हा.
सुट्टीत दिवाळी अंकातले उरले लेख निवांत वाचावेत म्हणून हा वाचायला घेतला तर पुन्हा आंघोळ करावीशी वाटत आहे. खांद्यावर चढवलं की कानात ..

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

दादा, म्हणूनच लेख सुना होता.
ज्यु. ब्रह्मे हा प्रकारच प्रचंड ताणला आहे. ज्यु. ब्रह्मेंनी अवतार संपवावा आता.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिसहमत. पण बाकी काही असो, १०० वर्षांपूर्वीच्या मराठीत लिहिलेला ओरिगिनल ब्रह्मेंची स्टोरी सांगणाराच लेख त्यांनी मस्त लिहिला होता. त्या एका लेखासाठी आपण त्यांचे फॅन हाओत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं