औदुंबर

औदुंबर दर्शन :

लौकिकार्थाने सत्तरच्या दशकात
प्रायमॉर्डियल अवस्थेत गर्भाच्या विशाल
कंपनसमुद्रात निवांत पडून असताना
बाहेरच्या जगातली कंपने आत घुसायची
त्यातली काही खोलवर रुतून बसली आहेत...

गर्भातून बाहेर येतानाचा क्रिटिकल प्रवास
या कंपनांनाच पकडून केला
अन बाहेर येताच त्या चित्रहीन , निराकार कंपनांना
आकार असल्याचा मोठा धक्का पचवणं
अनावर होऊन रडू फुटलं....
त्याची नदी झाली आणि दिवेलागणीच्या धूसर वेळेतही
त्या नदीचे ऐलतट, पैलतट स्पष्ट दिसू लागले
अन जळात मुळं सोडून निश्चिन्त असलेला
प्रायमॉर्डियल औदुंबर ही !

अवतीभवतीच्या नवीन कंपनविश्वाची ओळख होत होत
काही कंपनांना अर्थ , आकार मिळू लागले आणि ते आपसूक
बेमालूम रेकॉर्ड झाले , जगरहाटीनुसार !

होता होता कधीतरी शाळेत पुन्हा हा औदुंबर भेटला..
त्याचा आयडी ओळखीचा वाटला, पण तरीही तटस्थ ,
मायेच्या झिरझिरीत पडद्यामागे आऊट ऑफ रीच असल्यासारखा

तसाही एक औदुंबर होताच घराच्या मागल्या गल्लीतल्या गॅरेजमध्ये
त्याच्या पोटात कोणीतरी दत्ताची तसबीर ठोकून दिली होती
त्यावरून मुंग्या , मुंगळे विचरण करीत असत अविरतपणे
औदुंबराच्या लुसलुशीत उंबरांचं सिझेरियन करत
त्यातील किडेमुंग्या शोधत
गॅरेजमधल्या काही कायमच नादुरुस्त असलेल्या रिक्षांमध्ये
ठिय्या देऊन बालपणातला पुष्कळ वेळ घालवला असला तरी
फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या पानांचा हा औदुंबर किंचित अनोळखीच राहिला

आजूबाजूचे बहुतेक सारे औदुंबर दत्ताच्या तसबिरीने, अशक्त हारांनी
आणि केवडा, चंपा , मोगरा अशा देशी उदबत्त्यांचा वासांनी सजलेले
औदुंबराचा म्हणून काही वास असतो हे आजही माझ्या गावी नाही

औदुंबराची चाल:

अवघ्या विश्वात अनंत लय-ताल असताना
अणुरेणूत हरतऱ्हेची चाल असताना
शाळेतल्या बहुतेक सर्व कविता एकाच चालीत कोंबण्याची
चाल का पडली असेल हो ठोंबरे ?
ती एकच चाल शेलारमामाच्या चालीनं बाकीच्या
चालींच्या सुरावटींवर चाल करून गेली
आणि गच्च अडवून ठेवलं त्यांना आजपर्यंत

शाळेच्या छतावरून, कबुतरांनी शिटलेल्या सज्जांवरून,
शाळेच्या व्हरांड्यामधून फिरल्याही असतील या चाली
औदुंबराला शोधत
कुणास ठाऊक !
आमच्यापैकी कोणीही नवीन चाली शोधत नव्हतं ... ठोंबरे !
अवतीभवतीच्या लोकगीतांच्या , भावगीतांच्या
डिस्को-दांडियाच्या चालींच्या भुलभुलैय्यात अडकल्यावर
औदुंबराची चाल शोधणार कोण ?

मधल्या अनेक वांझ घालवलेल्या डिजिटली वर्षांत
अदृश्य झालेला औदुंबर पुन्हा प्रकटला
अचानक
कुठल्याशा झाडाच्या मुळाची वेणी निरखत असताना
बदलत्या मोसमाचा विचार करत असताना...
आता तो दत्ताचा गुरुवार होता, की ग्रेटाचा शुक्रवार ते आठवत नाही

तसाच तटस्थ, स्वस्थ , मायेच्या सॅटिनी पडद्यामागे

मुळांना पकडून खोल उतरू जाताच येतं चित्रहीन
कंपनांचं निरंजनी जग
इथं फिरतात अनंत अज्ञात चाली, अद्भुत सुरावटी
त्या खिशात भरून आणता येत नाहीत या जगात....

पेटी घेऊन , व्हायोलिनच्या तारा जुळवून, सतारीच्या खुंट्या पिळून
औदुंबराची चाल शोधत बसलो
सरळसोट बिलावल, नक्षीदार हमीर, केदार
पॉप्युलर यमन , काफी , खमाज
कशाकशात सापडत नाही तुमचा औदुंबर... ठोंबरे !
कव्वालीच्या , गझलांच्या, भावगीतांच्या
सुरावटींचे उरलेसुरले तुकडे निघतात कधी हातातून , गळ्यातून
तीव्र मध्यमाच्या, कोमल रिषभाच्या आणि कोमल धैवताच्या
कमर्शियल जागा कशा फटाफट येतात
पण चार घरांच्या चिमुकल्या गावाचा नाद
आणि त्या आडव्या तिडव्या जाणाऱ्या पांढऱ्या पायवाटेची मुरकी
आऊट ऑफ रीच !

तुमच्या फिंगरप्रिंट्स घ्यायला हव्यात ठोंबरे !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमची कविता 'टुकडा टुकडा मिलती है .... टुकडा टुकडा जीने दो ...' तशी कळते. आवडली. राघा काही प्रकाश टाकू शकले असते. पण ...
औदुंबर म्हणजे स्वत:ची ओळख असे काही असूही शकते.
खूप आवडली मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सामो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed