शिवचरित्राचा महाराष्ट्राबाहेरील प्रसार: एक आढावा

संकीर्ण

शिवचरित्राचा महाराष्ट्राबाहेरील प्रसार: एक आढावा

- बॅटमॅन (निखिल बेल्लारीकर)

छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी मनाचा नुसता मानबिंदूच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा, इतिहासविषयक जाणिवेचा आणि एकूणच आत्मभानाचाही एक मोठा आधारबिंदू आहे. महाराष्ट्रात शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन ही ऐतिहासिक जाणिवेची विभागणी स्वयंस्पष्ट आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन सुरू होऊन जवळपास दोन शतके उजाडली तरी शिवचरित्र आणि त्याचे असंख्य लहानमोठे पैलू यांबद्दल संशोधक आणि जनसामान्य या दोन्ही पातळ्यांवर अजूनही तितक्याच तपशीलवार चर्चा होते. विशेषत: व्हॉट्सॅप आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा प्रसार झाल्यानंतर इतर अनेक गोष्टींबद्दलच्या चर्चेप्रमाणेच शिवचरित्रविषयक चर्चेलाही उधाण आले आहे. या चर्चेच्या गदारोळात काही मुद्दे वारंवार चर्चिले जातात. त्यांपैकी मराठीजनांच्या विशेष जिव्हाळ्याचा असलेला एक मुद्दा म्हणजे महाराष्ट्राबाहेर मराठ्यांच्या इतिहासाला म्हणावे तितके स्थान दिले जात नाही. सध्यापुरते पाहिले तर महाराष्ट्राबाहेरील सार्वजनिक चर्चाविश्वात इ.स. अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या विस्ताराबद्दल तुलनेने अज्ञान व अनास्था आहे. मराठेशाहीचे संस्थापक असलेल्या शिवछत्रपतींबद्दल मात्र तूर्त राष्ट्रीय पातळीवर आदर आहे. अमराठी माणसालाही आज साधारणपणे शिवाजी महाराजांबद्दल प्राथमिक का होईना माहिती असते. शिवचरित्रातील काही घटनांबद्दल आश्चर्ययुक्त आदरही असतो. पण ही स्थिती नेहमीच अशी नव्हती. महाराष्ट्राबाहेरील जनमानसापर्यंत शिवचरित्र पोचण्याची प्रक्रिया अनेक वर्षे चालू राहिली. अनेकांनी शिवचरित्राचा आपापल्या परीने अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. कुणी संशोधनाचा मार्ग निवडला, तर कुणी कथाकादंबऱ्यांचा. शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिशकालीन पारतंत्र्याशी अनेकांनी लढाही दिला. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून, तिचा इतिहासही तितकाच रोचक आहे.

इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रात सध्या अशा अनेक प्रक्रियांच्या समाजात झिरपत जाण्याचा अभ्यासावरही भर दिला जातो. इतिहासाची पारंपरिक भारतीय व्याख्या पाहिली तर "इति ह आस" अर्थात "असे असे घडले". पण राजतरंगिणी, प्रबंधचिंतामणी इत्यादींसारखे अपवाद वगळता मुस्लिमपूर्वकालीन भारतात फक्त इतिहासाला वाहिलेले, कालानुक्रमाचे स्पष्ट भान असलेले ग्रंथ बहुश: आढळत नाहीत. इस्लामी आक्रमणांपासून मात्र पूर्वग्रहदूषित असूनही शुद्ध राजकीय विषयाला वाहिलेले अनेक चरित्रात्मक इतिहासग्रंथ वाचायला मिळतात. युरोपीय इतिहासलेखन पाहिले तर ग्रीकोरोमन परंपरेतील काही सन्माननीय अपवाद वगळता सुरुवातीच्या कालखंडात तिथेही इस्लामी तवारिखांसारख्याच ग्रंथांची निर्मिती केली जात असे. परंतु रेनेसाँ कालखंडापासून यात बदल घडून आला. विशेषत: इ.स. १८व्या शतकातील "एन्लायटनमेंट" कालखंडापासून इतिहासलेखन हे हळूहळू जास्त शिस्तबद्ध, जास्त समावेशक आणि जास्त "मॉडर्न" होऊ लागले. हे लिखाण पूर्वग्रहांपासून मुक्त नसूनही, या नव्या साच्याने भारतीयांची इतिहासविषयक दृष्टी आमूलाग्र बदलून टाकली.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जर्मन इतिहासकार लिओपोल्ड फॉन रांकं (Leopold von Ranke) याच्या "अस्सल कागदपत्रांवर आधारित" इतिहाससंशोधनपद्धतीचा आजही खूप प्रभाव आहे. अस्सल कागदपत्रे वापरण्याबद्दल अर्थातच कोणीही संशोधक आक्षेप घेणार नाही. परंतु कोणती कागदपत्रे वापरावीत, आणि कशा प्रकारे वापरावीत हे खूप सूक्ष्म प्रश्न आहेत. त्यामुळेच रांकं-राजवाडेप्रणीत 'पॉझिटिव्हिस्ट' परंपरेला अनुसरणाऱ्यांना 'स्मरण-धारणांचा इतिहास' विचित्र वाटू शकतो, कारण या प्रकारच्या इतिहासात साधनांची प्रतवारी करून, उपलब्ध पुराव्यांमधील सर्वोत्तम साधनांच्या आधारे एखाद्या घटनेचा इतिहास सांगितला जात नाही. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा परामर्श घेऊन, प्रत्येक साधनाची निर्मिती कुणाकडून, कशा परिस्थितीत झाली याचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे त्या प्रक्रियेचे शक्य तितके सर्व आयाम आकळण्यात मदत होते. वर्ण्य विषयाइतकेच, वर्णन करणाऱ्याला, त्याच्या सामाजिक स्थानाला आणि अन्य समाजघटकांशी असलेल्या परस्परसंबंधांनाही महत्त्व देणारा हा एक नवा विचार आहे. याच्या आधारे मराठेशाहीच्या महाराष्ट्रीय जनमानसातील प्रसाराबद्दल संशोधनपर लिखाण पुष्कळ झालेले असूनही 'पॉप्युलर' पातळीवर मात्र अशा लेखनाची वानवा आहे.

शिवचरित्राचा प्रसार - वसाहतपूर्व काळ.

ब्रिटिशपूर्व काळातही शिवचरित्राचा भारतात आणि भारताबाहेर युरोपातही चांगलाच प्रसार झाला. तत्कालीन मराठी सत्तेचा अन्य भारतीय सत्तांशी व युरोपीय सत्तांशीही जवळून संबंध येत असल्याने या सत्तांशी शासकीय आणि वैयक्तिक पातळीवर संबंधित असलेल्यांनी अनेक प्रकारचे वाङ्मय निर्माण केले. त्यांमध्ये शिवाजी महाराजांचा कमीअधिक तपशिलात वारंवार उल्लेख सापडतो. महाराष्ट्राबाहेर पाहिले तर सर्वांत उल्लेखनीय म्हणजे भूषण या हिंदी कवीची काव्ये. शिवबावनी या ग्रंथात, अनेक आलंकारिक पद्यांद्वारे शिवाजी महाराजांचे लष्करी सामर्थ्य, कौशल्य, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन, इत्यादी अनेक गोष्टींची चर्चा आढळते. विशेषत: "अगर सिवाजी न होतो तो सुनति होत सबकी" या त्याच्या पद्यातील उल्लेखातला आशय इतका थेट आहे की त्या भावनेची तीव्रता वाचकाला भिडल्याशिवाय राहत नाही. भूषण कवीचे काव्य आजही हिंदी साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याखेरीज मुहम्मद नुसरतीसारखा आदिलशाही मुलखातील दखनीभाषी कवी शिवछत्रपतींची निंदा करत असला तरी त्या निंदेतूनही त्यांच्या लष्करी सामर्थ्याची घेतलेली दखल जाणवते. हाच पैलू समकालीन आसामी 'बुरंजी' अर्थात बखरींमधूनही दृग्गोचर होतो. शायिस्तेखानाची बोटे तोडल्यावर तो बंगालचा सुभेदार म्हणून रवाना झाला. तेव्हा त्या घटनेबद्दल लिहिताना तत्कालीन आसाममधील आहोम राजवटीच्या बखरकारांनी शिवाजी महाराजांचा त्रोटक उल्लेख केलेला आहे. याखेरीज अनेक तेलुगु व कन्नड काव्यांमध्येही त्यांचा त्रोटक उल्लेख येतो. याखेरीज समकालीन फारसी साधनेही शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात, परंतु मुख्यत: तो टीकात्मक असतो. काही ठिकाणी धर्माधारित निंदाव्यंजक विशेषणेही त्यांना वापरली गेली आहेत. अशी भाषा वापरण्यामागे धर्माधारित पूर्वग्रह, राजकीय शत्रुत्व यांसोबतच त्यांच्या लष्करी ताकदीची अस्फुट कबुलीच दिसून येते.

समकालीन साधनांत नुसता उल्लेख नव्हे तर प्रत्यक्ष प्रेरणा घेऊन छत्रसालही खास शिवाजी महाराजांना भेटायला आला होता ही घटना प्रसिद्धच आहे. छत्रप्रकाश नामक काव्यात हा उल्लेख येतो. याखेरीजही गढवालचा राजा फतेशाह यानेही शिवछत्रपतींपासून काही प्रेरणा घेतल्याचा एक अतिशय रोचक पुरावा आहे. आहोम, मराठे, बुंदेले यांप्रमाणेच गढवाली राज्यही फतेशाहच्या शौर्यामुळे मुघलांना तोंड देण्यात यशस्वी ठरले. याच राजाच्या कारकीर्दीत गढवाली चित्रशैलीचाही पाया घातला गेला. इ.स. १७००-०१ च्या सुमारास त्याने एक चांदीचे अष्टकोनी नाणे पाडले. त्या नाण्यावरचा संस्कृत भाषेतला मजकूर होता
"मेदिनीशाह सूनो श्री फतेशाहावनीपते: ३५
बदरीनाथकृपया मुद्रा जगति राजते १७५७"

a
गढवालचा राजा फतेशाह याने शिवाजी महाराजांच्या मुद्रेच्या धर्तीवर पाडलेले अष्टकोनी नाणे. (शैलेंद्र भांडारे यांच्या सौजन्याने)
हा मजकूर वाचून शिवछत्रपतींच्या
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥| "
या मुद्रेची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. दोन्हींच्या संस्कृत मजकुरातले साम्य, आणि शिवछत्रपतींच्या शिक्क्याचा अष्टकोनी आकार आणि या नाण्याचाही अष्टकोनी आकार पाहिला तर फतेशाहने समकालीन परंतु वयाने वरिष्ठ असलेल्या शिवछत्रपतींपासून प्रेरणा घेतली असावी. दोन्ही प्रांतांमधील अंतर पाहता ह्यामागे कुणा दरबाऱ्याचाच हात असावा हे उघड आहे. फतेशाहच्या पदरी असलेला 'मतिराम' नामक कवी यामागे असावा, कारण तो भूषणाचा भाऊ होता! तत्कालीन भारतात संकल्पनांचे अभिसरण कसे होत असे याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे.

a
२७ जून १६७१ रोजीच्या Oprechte Haerlemse Courant नामक डच वृत्तपत्रातील शिवाजी महाराजांचा उल्लेख.

निव्वळ महाराष्ट्राबाहेरील भारतातच नव्हे तर खुद्द इ.स. सतराव्या शतकातच जाँ द थेवनो आणि कॉस्मा दा गार्दा या अनुक्रमे फ्रेंच व पोर्तुगीज व्यक्तींनी आपापल्या मातृभाषांत शिवाजी महाराजांची चरित्रे लिहिली. शिवछत्रपतींनी इ.स. १६६४ व इ.स. १६७० साली अशी दोनदा सुरत लुटली, याचे पडसाद दूरवर युरोपमध्येही उमटले. ब्रिटिश, डच, फ्रेंच, इत्यादी व्यापारकेंद्री सत्तांसाठी या घटनांचे महत्त्व खूप होते. त्यामुळे तत्कालीन इंग्रजी, डच आणि फ्रेंच भाषक वृत्तपत्रांत शिवाजी महाराजांचा उल्लेख सापडतो. यांमध्ये त्यांना बंडखोर ही संज्ञा वापरली असली तरी त्यासोबतच त्यांच्या धाडसाचेही कौतुक केले आहे. एका डच वृत्तपत्रातील बातमीत तर शिवछत्रपतींना प्रख्यात कार्थेजियन सेनापती हॅनिबल याची उपमा दिलेली आहे! प्राचीन रोमन इतिहासात रोम आणि कार्थेज या दोन सत्तांची एकमेकांशी अनेक युद्धे झालेली नमूद आहेत. त्यांपैकी कार्थेजकडचा सर्वांत यशस्वी आणि रोमन सत्तेची झोप उडवणारा सेनापती होता हॅनिबल. भारताच्या परिप्रेक्ष्यात पाहिले तर मुघल साम्राज्याला रोमन साम्राज्याच्या जागी कल्पून मग शिवछत्रपतींना हॅनिबलचा दर्जा दिलेला आहे. काही इंग्लिश कागदपत्रांत त्यांची तुलना अलेक्झांडर आणि ज्यूलियस सीझर या प्राचीन पाश्चिमात्य इतिहासातील सर्वोत्तम सेनापतींशीही केलेली सापडते. त्यामुळे त्यांचे लष्करी कौशल्य, त्यांचे सेनापतित्व हा तत्कालीन युरोपसाठी एक अतिशय उल्लेखनीय पैलू होता असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

हा झाला समकालीन युरोपीय वाङ्मयामधील उल्लेख. पुढे इ.स. अठराव्या शतकात जशी मराठी सत्ता प्रबळ होत गेली तसतसे मराठेशाहीबद्दलचे उल्लेख युरोपीय पुस्तकांमध्ये येऊ लागले. प्रवासवर्णनांसोबतच भारताचा मध्ययुगीन इतिहास कथन करणारी अनेक पुस्तके युरोपात लिहिली गेली, विशेषत: इंग्लिश, फ्रेंच, डच, जर्मन इत्यादी भाषांत. युरोपच्या विशिष्ट भौगोलिक व सांस्कृतिक रचनेमुळे अशा पुस्तकांची वर्षभरात अन्य भाषांमध्ये भाषांतरेही होत. परिणामी ती माहिती लवकरच युरोपभर पसरत असे. तेव्हाच्या युरोपमध्ये हळूहळू मध्यमवर्गाची संख्या वाढत चालल्यामुळे या वर्गाची सांस्कृतिक भूकही दिवसेंदिवस वाढतच होती. परिणामी अशी माहितीपर पुस्तके छापणे हा तत्कालीन युरोपमध्ये एक किफायतशीर धंदा होता. अशा प्रकारे अनेक पुस्तके छापली गेली. पैकी उत्तरपेशवाई कालखंडात छापली गेलेली काही पुस्तके, उदा. रॉबर्ट ऑर्म आणि जॉन केर यांची इंग्रजीतील पुस्तके उल्लेखनीय आहेत. ऑर्मच्या पुस्तकात मुघल आणि मराठे या दोघांचा इतिहास असून, केरचे पुस्तक म्हणजे इंग्रजीत लिहिलेला मराठ्यांचा पहिला इतिहास होय. मराठ्यांबद्दलची उत्सुकता तेव्हा फक्त ब्रिटिशांपुरती मर्यादित नव्हती याचे प्रत्यंतर इ.स. १७८६ साली प्रकाशित झालेल्या माथिआस क्रिस्टिआन स्प्रेंगेलकृत मराठ्यांच्या जर्मन इतिहासावरूनही येते. या सर्व पुस्तकांमध्ये लष्करी कौशल्यासोबतच शिवाजी महाराज कसे हिंदू धर्माचे त्राते होते हाही पैलू विशेषत्वाने येतो. निकोलाय मानुचीच्या सतराव्या शतकातील इतालिअन प्रवासवर्णनातही याचे वर्णन येतेच.

इ.स. सतराव्या शतकातील युरोपीयांना शिवाजी महाराजांबद्दल वाटत असलेले कुतूहल त्यांच्या समकालीन चित्रांवरून दिसून येते. त्यांची सर्वांत जुनी चित्रे एकजात सर्वच आज युरोपीय दफ्तरखान्यांमध्ये आहेत. विशेषत: इंग्लंड, नेदरलँड्स आणि फ्रान्स या तीन देशांतच मिळून किमान आठदहा तरी चित्रे आहेत. याखेरीज जर्मनी आणि रशियामधील चित्रे वेगळीच. यांची आधारभूत चित्रे मुळात दोनतीनच असून, बाकी नकला आहेत. बहुतेक चित्रे दख्खनमधील चित्रकारांनी काढलेली असून, पुढे युरोपीय 'चोरबाजारां'मार्फत अनेक ठिकाणी पसरली. एक चित्र एका डच पुस्तकातही आलेले असून, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत चित्रामागची प्रेरणाही तीच आहे. दुसऱ्या एका चित्राखाली, जमिनीवर मुघलांशी आणि समुद्रावर पोर्तुगीजांशी उभा दावा मांडणारा वीर असा डच भाषेतील मजकूरही आहे. चित्रासारख्या माध्यमातही युरोपीयांना आवर्जून हा उल्लेख करावा वाटला यातच त्यांना शिवाजी महाराजांचे वाटणारे महत्त्व दिसून येते.

या
शिवाजी महाराजांचे हॉलंडमधील राईक्सम्युझियम येथील चित्र

वसाहतकाळ आणि शिवचरित्र

वसाहतपूर्व काळापेक्षा वसाहतकाळाचे चर्चाविश्व अनेक कारणांमुळे आमूलाग्र वेगळे आहे. इ.स. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. मांडलिकत्वाच्या करारावर इतर मराठी राज्ये इंग्रजांनी चालू ठेवली. पेशव्यांच्या अंमलाखालील सध्याच्या महाराष्ट्र व गुजरातमधील प्रदेश इंग्रजी अंमलात "बाँबे प्रेसिडेन्सी" मध्ये मोडत असे. या भूभागाचा पहिला इंग्रजी गव्हर्नर होता माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्याने मराठेशाहीचा इतिहास स्वतंत्रपणे नसला तरी लिहिला होता. तेव्हा नव्यानेच तयार केलेल्या साताऱ्याच्या राज्यात ब्रिटिश रेसिडेंटचे काम पाहणारा कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याने शिवकाळ ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठ्यांचा समग्र तपशीलवार इतिहास प्रथमच लिहिला. तो इ.स. १८२३ साली प्रकाशित झाला. त्याचेच संक्षिप्त मराठी भाषांतर पुढची कैक वर्षे मुंबई विद्यापीठात क्रमिक पुस्तक म्हणून होते. डफच्या इतिहासातील काही उणीवा नीळकंठराव कीर्तने यांनी इ.स. १८६७ साली एका छोट्याशा लेखात दाखवून दिल्या. त्यानंतर काही वर्षांतच चिपळूणकरांच्या काव्येतिहाससंग्रहाचे प्रकाशन चालू झाले. अनेक कागदपत्रे, बखरी, इत्यादींचे प्रकाशन धडाक्यात होऊ लागले. महाराष्ट्रात ऐतिहासिक जाणीव नव्याने मूळ धरू लागली. यासोबतच लोकहितवादी आणि महात्मा फुले यांच्या लिखाणातूनही शिवचरित्राची विशिष्ट अंगाने मांडणी येत होतीच. पुढे राजवाड्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक मोठा इतिहासाचार्य लाभला. त्यांनी हजारो-लाखो कागदपत्रे गोळा करून ती प्रकाशित करण्याचा घाट घातला. त्याद्वारे आणि त्यांच्या लेखनाद्वारे मराठेशाहीची, आणि पर्यायाने शिवचरित्राची मांडणी हळूहळू आकार घेत होती. शिवशाहीचे चित्र अस्सल कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होत होते. ग्रँट डफ सांगतो त्यापलीकडेही बरेच काही आहे आणि ते अस्सल कागदपत्रांत आहे, ही जाणीव अल्प प्रमाणात का होईना लोकांत मूळ धरू लागली. या संशोधनाखेरीज अनेक कथाकादंबऱ्यांद्वारे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मराठेशाही लोकांसमोर येत होतीच. दोन उदाहरणांद्वारे हे स्पष्ट होईल.

पहिलं उदाहरण : इ.स. १८३६ साली मिसेस टी.एफ. स्टीवर्ड या ब्रिटिश लेखिकेने "The Mascarenhas- a legend of Portuguese India" नामक कादंबरी लिहिली. इ.स. सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे भारतातील क्षीण होत जाणारे व इंग्रजांचे वाढत जाणारे सामर्थ्य, मुघलांची अफाट ताकद आणि शिवाजी महाराजांनी मुघली सत्तेला दिलेली कडवी झुंज या सर्वांचे त्यात वर्णन आलेले आहे. शिवछत्रपतींचा उल्लेख असलेली ती बहुधा पहिली ऐतिहासिक कादंबरी असेल. दुसरं उदाहरण म्हणजे याखेरीज बंगाली भाषेतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचा विषयही शिवाजी महाराजांशी निगडित आहे. इ.स. १८५७ साली भूदेव मुखोपाध्याय यांनी 'अंगुरीय विनिमय' नामक कादंबरी लिहिली. यात शिवाजी-औरंगजेब संघर्षासोबतच, आपल्या बुद्धिचातुर्याने शिवछत्रपती मुघलांवर कशी मात करतात याचे वर्णन त्यात आले आहे. एकुणातच या दोन्ही कादंबऱ्या शिवाजी महाराजांच्या स्तुतीने भरलेल्या आहेत. त्यांचे बुद्धिचातुर्य, हिंदू धर्म आणि भारतभूमीवरचे प्रेम, मुघली वर्चस्वाचा तिटकारा, शौर्य, लष्करी सामर्थ्य अशा अनेक पैलूंचे वर्णन त्यांत येते.

शिवस्मारकाची चळवळ

जेम्स डग्लसच्या लेखनानंतर इ.स. १८८५ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील ब्रिटिश वनअधिकारी सिंक्लेअर याने स्वत: काही रक्कम शिवस्मारकासाठी दिल्याचे जाहीर झाले. त्यानंतर जवळपास दशकभराने इ.स. १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमधून शिवस्मारकासाठी फंडाची घोषणा केली. एका वर्षभरात बरीच रक्कम जमवण्यात त्यांना यशही आले. संस्थानिकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच यात यथाशक्ती यथामती योगदान दिले होते. पुढे शिवजयंतीउत्सवाला मिळणाऱ्या जास्त प्रतिसादात शिवस्मारकाची चळवळ दुर्लक्षित राहिली. जमवलेल्या फंडातील रक्कम वापरण्यात अनेक अडचणी येत होत्या. कधी शासनाकडून आडकाठी, कधी मर्यादित सहकार्य, अशांमुळे रायगडावरील शिवसमाधी आणि शिवनेरीवरील जन्मस्थानाची डागडुजी दुर्लक्षित राहिली. अखेरीस इ.स. १९२५ साली रायगडावरील काम सुरू झाले आणि लवकरच पूर्णही झाले.

याखेरीज अजून एका स्मारकाचा उल्लेखही इथे करणे अवश्य आहे. शिवाजी महाराज म्हटले की त्यांचा अश्वारूढ पुतळा हे समीकरण आज पक्के झाले आहे. महाराष्ट्रातल्या गावोगावीच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अनेक शहरांत असे अश्वारूढ पुतळे आज बघावयास मिळतात. विशेषत: आदिलशाहीची राजधानी विजापूर, कुत्बशाही आणि निजामाची राजधानी हैदराबाद तसेच प्रत्यक्ष मुघल राजधानी आग्रा इथेही आज शिवछत्रपतींचे अश्वारूढ पुतळे आहेत. त्यातही आग्र्यातील पुतळा हा आग्रा किल्ल्याच्या बरोबर समोर आहे. या अश्वारूढ पुतळ्यांची प्रथा कुणी पाडली, आणि सर्वांत पहिला पुतळा कुठे व कसा उभारला, ती कथाही तितकीच रोचक आहे.

इ.स. १९२८ च्या सुमारास सर्वप्रथम शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात बसवण्यात आला. आज श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात हा पुतळा असून, पुतळ्याखाली चार पॅनेल्समध्ये शिवचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग कोरले आहेत. हा पूर्ण पुतळा ओतीव असून, याची धाटणी युरोपातील राजेमहाराजांच्या पुतळ्यांप्रमाणे आहे. यासंबंधी सखोल अभ्यास करून प्रसिद्ध शिल्पकार श्री. विनायक पांडुरंग करमरकर यांनी हा पुतळा तयार केला. मुंबईतील एका कारखान्यात याचे ओतकाम करण्यात आले. पुतळ्याची उंची जास्त असल्याने, बोगद्यातून रेल्वेमार्गे तो पुण्याला वाहून आणताना थडकू नये याकरिता तात्पुरती वाकवता येणारी वॅगनही त्यासाठी तयार करण्यात आली. अथक परिश्रमांनी हा पुतळा अखेर तिथे स्थानापन्न झाल्यावर त्याची खूप वाहवा करण्यात आली. आजमितीस भारताबाहेरही काही शिवछत्रपतींचे अश्वारूढ पुतळे आहेत, उदा. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथील एका उद्यानात एक अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला आहे.

a

शिवजयंतीउत्सव आणि सार्वजनिक चर्चाविश्व

लोकमान्य टिळकांनी लोकसंघटन आणि राजकीय जागृती यांकरिता गणेशोत्सव आणि शिवजयंतीउत्सव या सणांचे माध्यम वापरून पाहिले. अर्थात या सणांचा प्रसार करण्यामागे संस्कृती व धर्माबद्दलचा रास्त अभिमानही वृद्धिंगत व्हावा ही भावना होतीच. इ.स. १८९६ साली रायगडावर एक मोठा कार्यक्रम करण्यात आला. शिवचरित्राशी निगडित प्रसंगांवर कीर्तन, स्वदेशी मालापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, टिळक व अन्य नेत्यांची शिवाजी महाराजांच्या महतीबद्दलची भाषणे इत्यादी अनेक प्रसंगांनी हा कार्यक्रम गाजला. समाजाच्या सर्व स्तरांमधील तब्बल सहा हजार लोकांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे एक मोठेच वैशिष्ट्य होते. याची पुष्कळ चर्चा वर्तमानपत्रांत होऊ लागली. मराठी वृत्तपत्रांनी शिवजयंतीउत्सवाची मुक्तकंठाने प्रशंसा केली तर अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी बहुतांशी विरोधी व तुच्छतेची भूमिका घेतली. या उत्सवाच्या माध्यमातून राजकीय चळवळ चालवण्याचा व त्याद्वारे ब्रिटिश सरकारविरुद्ध राजद्रोहाचा प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यापायी त्यांना दीड वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. त्यांच्या सुटकेसाठी उत्स्फूर्तपणे चाळीस हजार रुपये अल्पावधीतच जमा झाले. या मोठ्या रकमेतील तब्बल सोळा हजार रुपये बंगालमधून पाठवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर टिळकांच्या सुटकेसाठी बंगालहूनच दोघे ब्रिटिश आणि एक बंगाली असे तीन वकीलही पाठवण्यात आले. रवींद्रनाथ टागोरांसारख्यांनी टिळकांच्या सुटकेसाठी फंड गोळा केला. बंगालच्या या अनपेक्षित मदतीमागे टिळकांबद्दलचा आदर तर होताच, परंतु यासोबतच शिवचरित्र आणि राष्ट्रप्रेम व परकीय सत्तेला विरोध यांची सांगड महाराष्ट्राप्रमाणेच बंगालनेही घातली होती. महाराष्ट्राबाहेर शिवचरित्राचा परिचय आणि त्याबद्दल आदर बंगालमध्ये सर्वांत जास्त होता. बंगाल-मराठे संबंधांचा पूर्वेतिहास पाहता ही घटनाही अश्रुतपूर्व होती.

इ.स. १७४० पासून साधारण पुढची पंधराएक वर्षे नागपूरकर भोसल्यांच्या आधिपत्याखाली मराठ्यांनी बंगाल व ओडिशावर सतत स्वाऱ्या केल्या. यांपैकी ओडिशा प्रांत मराठ्यांकडे आला आणि त्यांनी त्याची शासनव्यवस्था नीट लावली, परंतु बंगालवर मात्र मराठ्यांना कधीच पूर्ण प्रभुत्व प्रस्थापित करता आले नाही. त्यामुळे बंगाली जनमानसात मराठ्यांची अगोदरची प्रतिमा ही क्रूर लुटारू अशीच होती. 'बोर्गी' या नावाने मराठे तिथे ओळखले जात. मराठ्यांबद्दलचे एक छोटेसे बंगाली लोकगीत आजही प्रसिद्ध आहे:
"खोका घुमोलो, पाडा जुडोलो, बोर्गी एलो देशे
बुलबुली तो धान खेयेछे, खाजना देबो किशे?
धान फुरालो पान फुरालो खाजना देबो की?
आर कोटा दिन सोबूर कोरबो, रोशुन बुनेछि"

याचा भावार्थ असा, की एक बंगाली खेडूत म्हणतो आहे, "मुलेबाळे झोपली, सारे गाव झोपले, आणि अचानकपणे हे बोर्गी लोक आले. आमचे धान्य तर बुलबुल पक्षी खाऊन गेला, आता खजिना कसला देऊ? अन्नधान्य, दाणापाणी सगळं तर संपलं, धन देऊ तरी कसं? अजून काही दिवस थांबू, लसूण पेरलेत. (जे काही द्यायचे ते त्यातूनच देऊ)." महाराष्ट्रपुराण आणि आनंदमंगल या तत्कालीन काव्यांमधूनही हेच चित्र दिसते.

एकोणिसाव्या शतकात मात्र हे चित्र हळूहळू पालटू लागले. प्लासी व बक्सारच्या लढाईनंतर बंगाल प्रांतावर ब्रिटिशांनी कब्जा केला. तिथे हळूहळू ब्रिटिश शासनव्यवस्था राबवली जाऊ लागली. शिक्षणासाठी विद्यापीठे व शाळाकॉलेजे निर्मिली गेली. त्यांमध्ये मिळणारे नवीन शिक्षण घेऊन जी नवशिक्षित बंगाल्यांची पिढी तयार झाली तिने इतिहासाचे पुनरवलोकन करावयास सुरुवात केली. यात राजनिष्ठांसोबतच देशाभिमानीही खूप होते. विशेषत: बंगाली हिंदूंमध्ये ब्रिटिश प्रचारामुळे एक सांस्कृतिक न्यूनगंड जो आला होता त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांनी मराठेशाहीच्या इतिहासाचा वापर केला! तत्कालीन ब्रिटिशांनी केलेले भारतीयांविषयीचे लेखन हे कैकवेळेस खूप पूर्वग्रहदूषित आणि अज्ञानमूलक असे. बंगाली लोकांबद्दल, विशेषत: पुरुषांना उद्देशून स्त्रैण, कमकुवत, भेकड, इत्यादी विशेषणे सर्रास लावली जात. हिंदूंपेक्षा मुसलमानांची तळीही कैकदा या निकषांवर उचलली जात असे. या सततच्य अपप्रचाराला कंटाळून काही हिंदूंनी शेवटी हिंदू आदरस्थानांचा शोध घेण्यास सुरुवात केली, आणि मराठ्यांच्या रूपाने त्यांना चिकार आदरस्थाने मिळाली. नजीकच्या इतिहासात मुस्लिम व ब्रिटिश या दोघांशीही मोठ्या प्रमाणावर यशस्वी लढा दिलेल्या मराठ्यांचा इतिहास त्यामुळेच बंगाल्यांना आकर्षक वाटला. परिणामी पूर्वीची भययुक्त द्वेषभावना जाऊन त्याची जागा अतीव आदरयुक्त आत्मीयतेने घेतली. इथवर की वर उल्लेख केलेली बंगाली भाषेतील 'अंगुरीय विनिमय' (অঙ্গুরীয় বিনিময়) ही इ.स. १८५७ साली प्रकाशित झालेली पहिली ऐतिहासिक कादंबरीही शिवाजी-औरंगजेब संघर्षावर आधारित आहे ! विशेष म्हणजे मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी 'कांचनगडची मोहना' लिहायला मात्र अजून तेरा वर्षे उजाडावी लागली. याखेरीज इतिहाससंशोधकांपैकी जदुनाथ सरकार आणि सुरेंद्रनाथ सेनांनीही शिवचरित्राबद्दल सखोल संशोधन करून अखिल भारतापुढे शिवचरित्र व मराठेशाहीचा इतिहास इंग्रजीतून मांडला.

अशा पार्श्वभूमीवर टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीउत्सवाला बंगालमधून तगडा प्रतिसाद मिळाला तर त्यात आश्चर्य ते काय? इ.स. १८९५ साली शरच्चंद्र शास्त्री यांनी 'छत्रपती महाराज शिवाजीर जीबन चरित' (ছত্রপতি মহারাজ শিবাজীর জীবন চরিত) नामक बंगाली भाषेतील पहिले शिवचरित्रही लिहिले. त्याच वर्षी विष्णू बळवंत बोपर्डीकर नामक टिळकांच्या अनुयायांनी कलकत्त्यातील नेत्यांसोबत चर्चा केली व तिथे शिवस्मारक बनवण्याचा ठरावही पास केला. पण बंगालमध्ये शिवचरित्र आणि शिवजयंतीउत्सवाचा प्रसार करण्याचा सिंहाचा वाटा होता तो सखाराम गणेश देऊस्कर यांचा. त्यांची पूर्ण हयात बंगालमध्ये गेल्याने त्यांना बंगाली भाषा उत्तम अवगत होती. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे शिवचरित्राचा खूप प्रचार केला. खुद्द रवींद्रनाथ टागोरांनीही 'जयतु शिवाजी' ही कविता देऊस्करांमुळे रचल्याचे त्यांच्याच एका पत्रात नमूद आहे. अनेक क्रांतिकारकांशी देऊस्कर संबंधित होते. इ.स. १९०५ साली वंगभंग आंदोलनाच्या वेळी टिळक स्वत: कलकत्त्यात गेले तेव्हा तिथे शिवजयंतीउत्सव मोठ्या जोमाने साजरा करण्यात आला. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रीयांचे आदरस्थान नसून अखिल भारतवर्षाचे आदरस्थान असल्याच्या मुद्द्यावर यावेळी भर देण्यात आला. मौलवी लियाकत हुसेन खान यांनी शिवछत्रपती हे हिंदू व मुसलमान या दोघांसाठीही सारखेच आदरणीय असल्याचे प्रतिपादन आग्रहाने केले, आणि शिवजयंतीउत्सव हा धार्मिक सलोख्याला बाधक असल्याचा ब्रिटिश प्रचार खोटा असल्याचे अनेकांनी दाखवून दिले. बंगालमधील शिवजयंतीउत्सवाचा जोर महाराष्ट्राच्या तोडीस तोड होता. महाराष्ट्राखेरीज अन्य कुठल्याही प्रांतात इतक्या जोमाने शिवजयंतीउत्सव साजरा झाला नाही.

जहाल आणि मवाळ अशा दोन्हीही पक्षांनी शिवचरित्र उचलून धरले हे विशेष. जहालांना शिवचरित्रातील लढायांची वर्णने आकर्षक वाटत हे तर झालेच, परंतु मवाळांनीही शिवाजी महाराजांची तितकीच स्तुती केली. त्यांची तुलना राष्ट्र उभे करणाऱ्या नेपोलिअन इत्यादींशी केली गेली. राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिश सरकारकडून छळ होऊ नये यासाठी तोलूनमापून, समन्वय साधत लिहावे लागे तरीही अनेकजण लिहीत. योगी अरविंदांसारख्यांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही शिवाजी महाराजांचे महत्त्व विशद केले.

अन्य प्रांतांत, विशेषत: उत्तर भारतातही शिवचरित्राचा प्रसार हळूहळू चांगलाच झाला. कवी भूषणाच्या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यानंतर हिंदीभाषी पट्ट्यातही शिवचरित्राबद्दल उत्सुकता वाढीस लागली. इ.स. १९०० साली टिळकांनी बनारसला भेट दिली. त्यानंतर तिथे एका मराठी माणसाकडून 'कालिदास' नामक अल्पजीवी वृत्तपत्र सुरू करण्यात आले. त्या वृत्तपत्राद्वारे शिवचरित्रातले अनेक प्रसंग हिंदीत वर्णिले जात. त्यामुळे हळूहळू हिंदीभाषी कवी, लेखकांनी शिवचरित्रे, नाटके, काव्ये, इत्यादींची रचना करणे सुरू केले. पहिले उर्दू शिवचरित्रही इ.स. १९१३ साली लाला लजपतरायांनी लिहिले. आर्य समाजाच्या लिखाणातूनही शिवाजी महाराजांचे आदर्श व आर्य समाजाचे आदर्श एकच आहेत, असे अनेकवेळेस प्रतिपादन करण्यात येत असे.

तुलनेने दक्षिण भारतात मात्र हा प्रभाव कमी होता. तरी तमिळनाडूमध्ये मराठ्यांबद्दल अनुकूल मत होते. प्रख्यात तमिळ कवी व विचारवंत सुब्रह्मण्यम भारती यांच्या एका राष्ट्रीय ऐक्यासंबंधीच्या कवितेत मराठ्यांचा सिंह म्हणून उल्लेख येतो तो खालीलप्रमाणे:
गंगै नदीपुरत्तु गोदुमै पंडम
काविरी वेट्रिलैक्कु मारुकोल्वोम
सिंग मराटीयर्तम कविदै कोन्डु
सेरत्तु तंदंगल परिसलिप्पोम
(अर्थ: कावेरीच्या किनारी उगवल्या पानांच्या बदली गंगेकाठचे गहू घेऊ, चेर अर्थात केरळातील हस्तिदंतही विकून आपण सिंह-मराठ्यांच्या कविता गाऊया.)
शिवाजी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीतले एक प्रख्यात नाव. त्यांनी 'सिवाजी कांडा हिंदू राज्यम' या नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका इतक्या प्रभावीपणे केली की मूळच्या गणेशन यांना सर्वांनी शिवाजी हे बिरुद बहाल केले!

शिवचरित्र आणि क्रांतिकारक साहित्य

स्वातंत्र्यपूर्व काळात जहालमतवादी राजकारणाचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेस केलेला सशस्त्र विरोध, हे होय. भारतभर अशा क्रांतिकारकांच्या अनेक भूमिगत संस्था कार्यरत असून, त्यांमध्ये अनेक प्रकारच्या साहित्याचा प्रसार होत असे. प्रामुख्याने जहाल राष्ट्रवादाचा पुरस्कार, परकीय सत्तेचा कट्टर विरोध हे या साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण होते. यात अनेक प्रकारे शिवचरित्राची सांगड राष्ट्रवादाशी घालून ब्रिटिश सत्तेला घालवून देण्याचे आवाहन केले जाई. अनेक पुस्तके, पत्रके, मासिके, इ. काढली जात. लिखित माध्यमांवर ब्रिटिशांची करडी नजर असे. कोणत्याही वाङ्मयात जराही 'राष्ट्रद्रोही' उल्लेख आला तरी त्यावर तात्काळ बंदी घालून लेखक व प्रकाशकांना शिक्षा ठोठावली जात असे.

यात महाराष्ट्रातील कैकांना शिक्षा झाली. महाराष्ट्राबाहेर जर कोणा एका पुस्तकाने सर्वांत जास्त खळबळ उडवली असेल, तर ती सखाराम गणेश देऊस्करांच्या 'देशेर कथा' (দেশের কথা) नामक बंगाली पुस्तकाने. यात त्यांनी ब्रिटिश अंमलाखाली झालेल्या भारताच्या दुर्दशेचे साध्यासोप्या भाषेत तपशीलवारपणे आणि परिणामकारकपणे चित्रण केले होते. सोबतच शिवाजी महाराजांचीही मुक्तकंठाने स्तुती केली होती. 'देशेर कथा'च्या तब्बल दहा हजारापेक्षाही जास्त प्रती खपल्यावर त्यावर बंदी लादण्यात आली. त्याचे हिंदी भाषांतरही लगेच करण्यात येऊन त्याच्याही खूप आवृत्त्या निघाल्या. याखेरीज त्यांनी 'शिवाजीर महातत्त्व' (শিবাজীর মহাতত্ত্ব) नामक एक शिवचरित्रही लिहिले. ते इ.स. १९०३ सालच्या शिवजयंतीउत्सवात बंगालमध्ये मोफत वाटण्यात आले. त्याचाही खूप प्रसार झाला. अनुशीलन समितीसारख्या क्रांतिकारक संघटनेने 'हर हर महादेव' हा घोषही तिथून उचलला. परकीय सत्तेविरुद्ध हिंसेचा वापर करण्यात काहीही चूक नसून ते आपले कर्तव्यच आहे, असा प्रचार त्यात हिरीरीने करण्यात आला. त्यावरही बंदी आणली गेली. त्यावरून प्रेरित होऊन नाटककार गिरीश घोष यांनी इ.स. १९०७ च्या सुमारास 'छत्रपती शिवाजी' नामक एक नाटक लिहिले. ते खूप गाजले; सर्व बंगाली वृत्तपत्रांनी त्याची प्रशंसा केली. विशेषत: राष्ट्रीय एकता, जातिभेदांपलीकडे पाहण्याचे आवाहन आणि अर्थातच स्वातंत्र्याची भलामण हे पैलू खूप भावले.

a
'देशेर कथा' या सखाराम गणेश देऊस्करकृत पुस्तकाचे मुखपृष्ठ

बंगालमध्ये गुप्तपणे छापल्या जाणाऱ्या पत्रकवजा प्रकाशनांमध्येही शिवचरित्राचा खूप उल्लेख आढळतो. विशेषत: 'जुगांतर' (युगांतर) आणि 'स्वाधीन भारत' यांमधील मुख्य होत. इ.स. १९११ साली ढाक्यात प्रकाशित झालेल्या स्वाधीन भारतमध्ये शिवचरित्राचा हवाला देऊन शासनाविरुद्ध उठाव करण्याची चिथावणी दिली होती. तात्काळ त्याच्या प्रती जप्त करण्यात आल्या. तरुण विद्यार्थीवर्गात यांचे प्राबल्य फार असे.

इतरही प्रांतांत असे खूप वाङ्मय निर्माण झाले. त्यात ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र हिंसेला उत्तेजन देण्याकरिता, राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांचे आदरपूर्वक वर्णन आढळते. स्वातंत्र्यपूर्व भूमिगत वाङ्मयातील हा एक लक्षणीय प्रवाह होय.

शिवचरित्र आणि मुसलमान

शिवचरित्राशी संबंधित अनेक गोष्टींपैकी त्यांचे मुसलमानांशी असलेले संबंध ही बहुधा सर्वांत वादग्रस्त गोष्ट असावी. आजही यावरून अतिशय तीव्र प्रतिक्रिया येतात. स्वातंत्र्यपूर्व काळही याला अपवाद नव्हता. तेव्हा शिवजयंतीउत्सव साजरा करताना त्यातील मुसलमानांचे प्रमाण बहुतांशी कमी राहिले ही वस्तुस्थिती आहे. यामागे हिंदूंची शिवचरित्रविषयक कट्टर भूमिका हे कारण असल्याचे सांगितले जाते, पण तेही अर्धसत्यच आहे. महाराष्ट्राबाहेर बंगालमध्ये पाहिले तर उच्चवर्गीय बंगाली मुसलमान बऱ्याच प्रमाणात मुघल साम्राज्याबद्दल आत्मीयता राखून होते. त्यामुळे जेव्हा हिंदू आत्मसन्मानाची अभिव्यक्ती शिवचरित्राच्या माध्यमातून होऊ लागली, तेव्हा या दोन्ही अस्मितांमध्ये संघर्ष होणे स्वाभाविक होते. काही मुस्लिम नेत्यांचा अपवाद वगळला तर अनेक बंगाली मुस्लिम लेखकांनी शिवाजी महाराजांची बंडखोर म्हणून संभावना केली आहे. उत्तर भारतातील झाकाउल्लाह खान या नेत्याने आपल्या 'तारीख-ए-हिंदुस्थान' या ग्रंथात शिवाजी महाराजांचा उल्लेख एक बंडखोर, लुटारू इतकाच केला नाही तर त्यासोबत त्यांना एक शूर शिपाई, कुशल शासक असेही संबोधले आहे. या नेत्याचा काँग्रेसच्या राजकारणाला, पर्यायाने शिवजयंतीउत्सवाला विरोध असला तरी त्याच्या मनात शिवाजी महाराजांच्या काही क्षमतांबद्दल आदर होता असे दिसते. याखेरीज दक्षिणेतूनही काही मुसलमानांनी हिंदू-मुसलमानांमधील वाढत्या वैमनस्याकरिता शिवजयंतीउत्सवाला जबाबदार धरले. या उत्सवावर शासनाने बंदी आणावी, अशी आवाहनेही उत्तर प्रदेश व पंजाबमधील काहींनी केली.

स्वातंत्र्यपूर्वकालीन उत्तर भारतीय उच्चवर्गीय मुसलमानांमधील यासंबंधीची खदखद दर्शवणारे एक एकमेवाद्वितीय पुस्तक म्हणजे सय्यिद तफझ्झुल दाऊद सयीद खान लिखित 'The real Sevaji' हे होय. इ.स. १९३५ साली या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. याचा लेखक अवध भागातील सुलतानपूर येथे वकिलीचा व्यवसाय करीत असे. त्याच्या प्रस्तावनेत तो सांगतो, की आजकाल कुणीही उठेल तो औरंगजेबासारख्या 'जिंदा पीर' असलेल्या बादशहावर टीका करतो, आणि कालपरवापर्यंत कुणालाही माहिती नसलेल्यांच्या नावाचा जप केला जातो." शिवचरित्रात कायम 'मुस्लिम धर्मवेड', 'इस्लामिक अत्याचार', इत्यादी शब्दप्रयोगांची रेलचेल पाहून सुशिक्षित मुसलमानांची मोठी कुचंबणा होते, आणि या तथाकथित 'अन्याया'ला वाचा फोडण्यासाठी आपण हे पुस्तक लिहितो आहो, असे तो स्पष्ट करतो. यात त्याने शिवचरित्रातील अनेक प्रसंगांची नैतिकदृष्ट्या छाननी करून शिवाजी महाराजांना अनेक ठिकाणी दोषी ठरवले आहे! याची सुरुवात अर्थातच अफझलखान प्रकरणाने होते. याखेरीज इतर अनेक उदाहरणांनी शिवचरित्रातून हिंदू धर्माचे प्रेम दिसत नसल्याचा निष्कर्ष काढून लेखक मोकळा होतो. या वकिली थाटाच्या पुस्तकातील कैक चुका पाहिल्या तर तथ्यपूर्णतेच्या निकषावर लेखक खरा उतरत नाहीच, शिवाय अनेक शब्दप्रयोगांमधून त्याचा पूर्वग्रह आणि शिवछत्रपतींबद्दलचा द्वेष ठायीठायी डोकावत राहतो. हे पुस्तक लिहिण्यामागे अवध व लगतच्या भागांमधील मुस्लिम लीगच्या राजकारणाचाही काहीएक सहभाग नक्कीच असावा असे दिसते. यावर लगेच बंदी आली. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण पुढे इ.स. १९८० साली पाकिस्तानातील कराचीमध्ये करण्यात आले ही गोष्टही मोठी उद्बोधक आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील मुसलमानांद्वारे मात्र बहुतांशी अशी अश्लाघ्य टीका टाळून 'सेक्युलर' अंगाने शिवचरित्राची मीमांसा करण्याकडे भर आढळतो.

महाराष्ट्रात मात्र यासंबंधी स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमानांकरवी साहित्यनिर्मिती झाल्याचे दिसत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात सांगलीचे सय्यद अमीन यांनी 'महापुरुष छत्रपती शिवाजी' नामक एक समन्वयवादी शिवचरित्र लिहिले. त्यानंतर आजही मराठी मुसलमान साहित्यात शिवचरित्राचा परामर्श बहुतांशी समन्वयवादी अंगाने घेतला जातो.

शिवचरित्राचे पैलू

सार्वजनिक चर्चाविश्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संशोधकांनी लिहिलेली शिवचरित्रे. यांमधूनही शिवचरित्राचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक असे अनेक पैलू चर्चिले गेले. एक कुशल सेनानी, हिंदू धर्माची प्रतिष्ठा पुन:स्थापित करणारा सार्वभौम छत्रपती (क्षत्रपती अर्थात क्षत्रियांचा अधिपती), आज्ञाधारक मुलगा, जिवाला जीव देणारा मित्र, स्त्रियांचा आदर करणारा पुरुष, इत्यादी शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक व राजकीय पैलूंवर भर दिला गेला. ऐतिहासिक तथ्यांइतकेच सामाजिक व राजकीय धारणांचा प्रसार हेही कळत-नकळत शिवचरित्रलेखनाचे ध्येय होते. राजवाड्यांपासूनचे कैक मराठी संशोधक हे इतिहाससंशोधनाकडे ऐतिहासिक तथ्यांच्या शोधाबरोबरच राष्ट्रकार्य म्हणूनही पहात, आणि शिवाजी महाराजांवर किंवा एकूणच मराठेशाहीवर कुणीही जराशीही टीका केली तरी ते त्यांना पचत नसे. जदुनाथ सरकारांसारख्या मराठ्यांबद्दल सहानुभूती असलेल्या इतिहासकारांशीही त्यामुळे मराठी इतिहासकारांचे कडाक्याचे वाद झाले. पण यातून निष्पन्न काही फार झाले नसले तरी एक अव्वल दर्जाचा राष्ट्रपुरुष म्हणून शिवाजी महाराजांचे जनमानसातील स्थान दृढमूल होण्यास याची मदत झालीच.

ब्रिटिश काळापासून पुढे पाहिले तर जहाल, मवाळ, भांडवलवादी, कम्युनिस्ट, स्त्रीवादी, हिंदुत्ववादी, सेक्युलरवादी इत्यादी अनेक विचार मानणाऱ्यांनी ॲकॅडमिक चौकटीबाहेर शिवचरित्राची स्वत:ला सोयीस्कर अशी मांडणी केली. स्वत:चा वैचारिक कल व सामाजिक स्थान, राजकारण-समाजकारण इत्यादींची गरज, समोरची राजकीय व सामाजिक आव्हाने, इत्यादी अनेक घटकांचा यावर परिणाम झाला. शिवाजी हे एक अतिप्रभावशाली राजकीय प्रतीक आहे अशी लोकांची खात्री झाल्यावर शिवचरित्राची आपल्या पद्धतीने मांडणी करणे ही एक राजकीय गरज होऊन बसली. परिणामी आज प्रत्येक राजकीय पक्षाची शिवचरित्रविषयक भूमिका वेगळी असली तरी शिवाजी महाराजांबद्दल आदर प्रत्येकालाच आहे. इतके की किमान महाराष्ट्रापुरते तरी कोणताही राजकीय पक्ष या विषयाला दुर्लक्षू शकत नाही. कृती कशीही असली तरीही आदरयुक्त उक्तीचा अलिखित दंडक प्रत्येक पक्ष पाळतो.

शिवचरित्राच्या प्रसाराची थोडक्यात गाथा अशी आहे. या त्रोटक आढाव्यात सर्वच बाजूंचा परामर्श घेणे शक्य नाही, हे उघडच आहे. त्यामुळे शक्य तितक्या ठळक पैलूंची चर्चा केलेली आहे. अज्ञान व अनास्थेकडून आज शिवचरित्राचा अधिकाधिक प्रसिद्धीकडे प्रवास अव्याहतपणे चालू आहे. एकविसाव्या शतकात शिवचरित्राची मांडणी कशी केली पाहिजे आणि कशी केली जाईल, हे भारतीय, विशेषत: मराठी हिंदू समाजासाठी; त्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक आत्मभानासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर अर्थातच येणारा काळच ठरवेल.

संदर्भयादी:
o. प्राची देशपांडे, Creative Pasts: Historical Memory and Identity in Western India 1700-1960. ओरिएंट ब्लॅकस्वॅन, २००७.
o. अनिल समर्थ, Shivaji and the Indian National Movement. सोमैया पब्लिकेशन्स, १९७५.
o. कारबी मित्रा, The Maratha Saga in Bengal : A Colonial Experience. इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टरी, कोलकाता, २०११.
o. शैलेंद्र भांडारे, गढवालचा राजा फतेशाह (१६६५ – १७१५) आणि शिवाजी : एक दृष्टिक्षेप. (ऑनलाईन लेख) ऐसीअक्षरे.कॉम, दिवाळी अंक, २०१८. (लिंक: http://www.aisiakshare.com/node/6911)
o. एच एस सरदेसाई, shivaji the great maratha. जेनेसिस पब्लिशिंग, २००२.
o. गजानन भास्कर मेहेंदळे, Shivaji His Life and Times. परममित्र पब्लिकेशन, २०११.
o. रिचर्ड कॅशमन, The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस, १९७५.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त लेख. आवडला! शिवाजीराजांवर इतकी बंगाली पुस्तके आहेत हे माहिती नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अतिशय उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण लेख. यातल्या काही गोष्टी इकडे तिकडे वाचून माहीत होत्या तरीही हा समग्र आढावा घेतल्याबद्दल अभिनंदन.

एक वादग्रस्त गोष्ट मात्र सुटली ती म्हणजे नेहरूंची शिवाजींबद्दलची मांडणी व मत. नेहरू महाराष्ट्राबाहेरचे (काहींच्या मते देशाबाहेरचेही) त्यामुळे त्यांचा उल्लेख औचित्याला धरून राहिला असता.

शिवाजी एक मोठे राजकीय प्रतीक म्हणून आज दिसतात हे निरीक्षण तर वास्तविक आहेच, परंतु टिळकांनतर या प्रतीकाचा आणि इतर भारतीय प्रतीकांचाही वापर गांंधींच्या अहिंसक चळवळीमध्ये फारसा केला गेलेला दिसत नाही असं वाटतं. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून शिवाजी महाराजांचं स्थान अधिक पवित्र आणि अढळ न होता नंतरच्या काळात हिंदू भावनांच्या गरम तव्यावर आपल्या पोळ्या शेकणार्‍या राजकीय पक्षांनी संंधिसाधूपणाने हे प्रतीक हायजॅक केल्याने त्याचा संकोच झाला असं माझं निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख.

फायनान्शिअली फ्री हत्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहरुंचं शिक्षण वेगळ्या पद्धतीने झालं होतं. त्यामुळे त्यांची मतं तशी उसनी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख फार आवडला. मराठ्यांबद्दल प्रतिकूल मत असणे बंगालमध्ये साहजिक म्हणावे लागेल, खुद्द जदुनाथ सरकार सहकुटुंब पुण्याला येण्यास निघाले असता त्यांची पत्नी आपण 'बारगिरांच्या देशात' निघालो आहोत या विचाराने ग्रस्त होती. अश्या बंगालमध्ये शिवचरित्राचा प्रसार झपाट्याने झाला हे रोचक वाटले. त्यामानाने दक्षिणेत ती ओळख व्हावयाला वेळ लागला असे दिसते.

नेहरू-गांधींचे महाराजांबद्दलचे मत त्यांच्या प्रादेशिक इतिहासातुन, गंगाप्रदेश आणि गुजराथ, आले असेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढेरेशास्त्री, शिवोऽहम, बापट अण्णा, आचरटबाबा, हत्तीजी आणि वाघमारे सर: अनेक धन्यवाद!

वाघमारे सर: नेहरूंची मांडणी कव्हर केली नाही हे बरोबर, पण डिस्कव्हरी ऑफ़ इंडियात तरी त्यांनी स्तुतीच केली आहे. वादग्रस्त विधान पहिल्या आवृत्तीत होते असे ऐकलेय पण ते तर बघायला मिळाले नाही. त्या पुस्तकाची स्वत: नेहरूंच्या सहीची प्रत पाहिली आणि हाताळलीही आहे, चोरून फोटोही काढलाय पण त्यातल्या कंटेंटकडे त्या दृष्टीने पाहिले नाही. शिवाय त्या पलीकडे पहायचे तर नेहरूंच्या मांडणीचा फोकस शिवचरित्रावर नव्हता, त्यांच्या मांडणीचा महाराष्ट्राबाहेर काय परिणाम झाला हे पाहिलं तर फार काही हाती लागत नाही म्हणून त्याचा परामर्श घेतला नाही.

शिवोऽहम- नेहरू-गांधींचे मत हे प्रादेशिक अस्मितेबद्दलचे प्रतिकूल मत + राष्ट्रीय दृष्टिकोन अशा दोन्हींचे मिश्रण असू शकते. भाषावार प्रांतरचना करण्यास नेहरू अनुकूल नव्हते, कारण यामुळे सेपरेटिझम वाढेल अशी त्यांना भीती वाटत होती. एकूणच त्या दोघांनाही प्रादेशिक अस्मितेचे वावडेच असावे असे वाटते तूर्तास तरी, त्याहीमुळे तसे मत असू शकेल. गांधींबद्दल माहिती नाही, नेहरू म्हणजे गंगाजमनी तहझीब का कायतरी असतंय त्यात पक्का मुरलेला माणूस असल्याने त्यांना महाराष्ट्राचे तितकेसे अपील नसावे. दोन्ही अस्मितांची मुळे, प्रकृती, इ. खूप वेगळ्या आहेत. साहजिकच एका मर्यादेपलीकडे त्यांना ते न पटणे हे साहजिकच आहे. आणि मुळात ही अस्मिता कशीही असो, ती वर्तमानात कॅरी करणारे नेते त्या तोडीचे असले तर त्या अस्मितेचे अपील जास्त राहते. टिळकोत्तर काळात अशी अस्मिता बाळगणाऱ्या मराठी नेत्यांचे महत्त्व कमी कमी होत गेले. त्यामुळेही ती अस्मिता अपीलिंग राहिली नसणार. असे मला वाटते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शोधकार्य करताना मूळ मुद्याचा/हेतूचा विसर न पाडता चाळण मारत नोंद घेत जाणे हे संभाळलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख. खूप आवडला. तुमच्या अभ्यासाला सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0