प्राचीन मराठीतील 'पसारा'.

काय तो पसारा ! पसारा आवरून जीव अगदी मेटाकुटीला आला ! ही वाक्ये आपण रोजच्या व्यस्त जीवनामध्ये कित्येकदा ऐकत असतो. पसारा हा शब्द आज लौकिकार्थाने जरी अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, फैलाव, विस्तार, व्याप यांसाठी वापरला जात असला तरी प्राचीन मराठी भाषेत या शब्दाचे प्रयोजन फार वेगळे आहे.

महानुभाव पंथाचे प्रणेते श्री चक्रधर स्वामींचा कालखंड (इ.स. ११९४ ते १२८२) हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे त्यामुळे मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत. श्री चक्रधर व श्री गोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र (गोविंदप्रभूचरित्र) हे चरित्रग्रंथ तयार केले.

लीळाचरित्र या आद्य मराठी ग्रंथामध्ये बाजारपेठा, आठवडे बाजार, फिरते व्यापारी यांची विस्तृत वर्णने तर मिळतात शिवाय कळाळहाट (मद्याचे दुकान), कांसारहाट (काशाच्या भांड्यांचे दुकान), गाडेहाट (कुंभारी मडक्यांचे दुकान), माळिहाट (माळ्याचे, फुलांचे दुकान), वानासिक (वाण्याचे दुकान), सिंपेहाट (शिंप्याचे दुकान), सोवनहाट (सराफा), कपड्यांच्या व्यापाऱ्यांचे 'संते' (कापडी तंबू), लोहारांचे कामठा (कामचलाऊ दुकान) यांचीही वर्णने ही मिळतात.

पसारा
चित्रसौजन्य - श्रद्धा कुंभोजकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

'पसारा' या माल पसरून मांडलेल्या दुकानांचा उल्लेख लीळाचरित्रात अनेकदा येतो. मराठी 'पसारा' [संस्कृत: प्र √स्र] हा शब्द मूळ संस्कृत 'प्रसर' (विस्तारणे, पसरणे) यावरून रूढ झाला असावा. चक्रधर एका गावातील हातवटीत (हाटात) फिरत असता, तेथे काही तेलिणी तेल विकत बसल्या होत्या. त्यापैकी एका तेलिणीने चक्रधरांचे बरवे रूप पाहून 'एइ गा बरवेया देवा : माझेया घरा जावो' असे म्हणोन अवघा पसारा माथां घेतला आणि घरी पतीसह त्यांचे चरण-प्रक्षालन केले (लीळाचरित्र पूर्वार्ध - लीळा ३४). अमरावती जवळील वडनेर (भैरव) येथे असता चक्रधरांनी तेथील गोपाळांबरोबर 'दूसीचा' खेळ मांडला. त्यांनी आपल्या जवळील 'त्रीवडि' (तीनपदरी वस्त्र) वस्त्र फाडले आणि गोसावी 'दूसी' (कापड व्यापारी) झाले त्यांनी पसारा (दुकान) घातला आणि चिंचोक्यांचे 'आसू' (सोन्याची नाणी) आणि बाभळीच्या शेंगांचे 'दाम' (द्रम्म नाणी) केले आणि दूसीचा खेळ खेळला (लीळाचरित्र पूर्वार्ध - लीळा ७८). चक्रधरांना भेटलेल्या जोगनायकाने आपले सर्व द्रव्य चोरीला गेल्यावर अंगावरील गांठी, मुदी हे दागिने विकून आपल्या वडील पुत्रास 'पसारां बैसविले' (लीळाचरित्र पूर्वार्ध - लीळा ३००). सर्वज्ञ (चक्रधर) निवासे (नेवासा, जि. अहमदनगर) येथे असता एके दिवशी त्यांनी आंगी-टोपरे घातले आणि 'ग्राहकवेखू' घेतला, त्यांनी हाटवटीमध्ये (बाजारात) कापूर, कस्तुरी, वस्त्राचे गोंडे, मोती, रेशमी वस्त्रे यांच्या पसाऱ्यांना भेटी दिल्या (लीळाचरित्र उत्तरार्ध - लीळा २३३). गोसावी (गुंडम राऊळ) हे खाटिकांचेया ‘पसारां बैसेति’ असा उल्लेख गोविंदप्रभु चरित्रात येतो, याशिवाय गोविंदप्रभुंची ‘सोवनीपसारां क्रीडा’ प्रसिद्ध आहे. (गोविंदप्रभु चरित्र ४९, ३०६).

मराठी वारकरी संतवाङ्मयामध्ये, विशेषतः ज्ञानेश्वरीमध्ये ' घातलेयां धर्माचा पसारा' (ज्ञानेश्वरी १६.२२१), नामदेवांच्या गाथेत ' वाणी गांधीपण, पाठी पसारा । घेवोनि संसारा आलों असे' (गाथा १६९९), चोखामेळ्यांच्या अभंगात 'मांडिले दुकान,घातला पसारा' असेही उल्लेख येतात. मराठी साहित्याखेरीज कानडी शिलालेखांमध्येही 'पसारा' हा शब्दप्रयोग आढळतो. सोलापूर जिल्ह्यातील दारफळ (ता. उत्तर सोलापूर), कामती (ता. मोहोळ) येथील कानडी शिलालेखांमध्ये 'अडकेया पसारा' , 'बच्चर पसारा' अशा दुकानांच्या नावांचा उल्लेख येतो. दारफळ येथील लेखात प्रत्येक 'पसाऱ्यामागे' ठराविक सुपाऱ्या, विड्याची पाने, तेल इत्यादी जिन्नस तेथील गोपाळेश्वर, विजपाळेश्वर व कांचपाळेश्वर ही तीन शिवलिंगे असणाऱ्या शिवमंदिरास देण्याची तरतूद करण्यात आल्याचे नोंदवले आहे.

एकूणच पसारा हा शब्दप्रयोग १३व्या शतकापर्यंत पेठेतील व्यापाऱ्यांचे, आठवडे बाजारातील तंबूत मांडलेले किंवा अनेक प्रकारच्या ज्ञात-अज्ञात स्वरूपांच्या दुकांनांच्या संदर्भात येतो. मोल्सवर्थच्या १८५७च्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात 'पसारा' हा शब्द 'Spread out, scattered, extended state, things lying scattered about' या अर्थी येतो. एकूणच मधल्या पाच-सहा शतकांमध्ये या शब्दप्रयोगाचे स्वरूप कमालीचे बदलले आहे.

संदर्भ ग्रंथ :
१) कोलते, वि. भि. 'लीळाचरित्र’, १९८२, मुंबई.
२) कोलते, वि. भि. 'गोविंदप्रभुचरित्र’, १९६०, मलकापूर.
३) Ritti and Kumbhar, ‘Inscriptions from Solapur District’, 1988, Dharwad.
४) Tulpule and Feldhaus, ‘ A Dictionary of Old Marathi’, 2000, New York.

[टीप: मला चौदाव्या शतकापासून १७-१८व्या शतकापर्यंतच्या साधनांमध्ये हा शब्द आढळला नाही, मला सापडलं नाही म्हणजे वापर नव्हता असं म्हणता येणार नाही]

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

आवडला लेख.
अलिबाग,नागाव, पुढचे बाजारचे गाव हाटाळे आहे. नागावच्याच ज्याचौकात बाजार भरतो ते हाटाळे झाले.
कानडी शब्द सन्ते म्हणजे बाजार. किंवा पेट्टे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंजाबीतील 'हट्टी'सुद्धा याच जातकुळीतील असावे. (चूभूद्याघ्या.)

...........

जुन्या दिल्लीतील 'नई सड़क'नामक रस्त्यावर पूर्वी 'उस्तादन दी हट्टी' (अर्थ: शिक्षकांचे दुकान) नावाचे एक प्रसिद्ध असे अप्पा-बळवंत-चौक-छाप पुस्तकांचे दुकान-कम-प्रकाशनगृह होते. (कदाचित अजूनही असेल.) कॉलेजोपयोगी पुस्तके तथा स्पर्धापरीक्षोपयोगी गाइडे यांचे प्रकाशक तथा व्यापारी होते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख सुंदर झाला आहे. 'पसारा'चे विवेचन तर झालेच, परंतु एकंदर मांडणी आणि वर्णने त्या <x, y, z, t>मध्ये जाऊन राहावेसे वाटायला लावतात. एकंदरीत परिणामकारक लेखनशैली.

इतक्या सुंदर लेखास फारसे प्रतिसाद येऊ नयेत, त्याची विशेष दखलसुद्धा घेतली जाऊ नये, याचे वैषम्य वाटले.

परंतु, O tempora o mores, त्यामुळे, चालायचेच.

----------

हॅविंग सेड दॅट, आता आमचा (नित्याचा) टारगटपणा सुरू करावयास प्रत्यवाय नसावा.

----------

अमरावती जवळील वडनेर (भैरव) येथे असता चक्रधरांनी तेथील गोपाळांबरोबर 'दूसीचा' खेळ मांडला.

म्हणजे, लहानपणी आम्ही बिल्डिंगीतल्या पोरींबरोबर घर-घर, शाळा-शाळा खेळायचो, तसे??? दुकान-दुकान???

नाही म्हणजे, आमचे एक वेळ ठीक होते हो, आम्ही लहान होतो तेव्हा. (आणि त्या पोरीसुद्धा तेव्हा लहान होत्या.) पण चक्रधरस्वामीसुद्धा??? शोभते का या वयात?

गोसावी (गुंडम राऊळ) हे खाटिकांचेया ‘पसारां ’ असा उल्लेख गोविंदप्रभु चरित्रात येतो

आँ!!! खाटकाच्या दुकानात गोसावी??? बराच लिबरल होता म्हणायचा की तो जमाना!

(बाकी, त्या काळच्या विशेषेकरून खाटिकांचेया पसारां नि कळाळहाटीं तळ ठोकायला आवडले असते, असे वाटते. कळाळहाटीं जे काही पियावयास देंत, ते कांसारहाटातून विकत आणलेल्या पात्रांतून, की गाडेहाटातून विकत आणलेल्या घटांतून?)

त्यापैकी एका तेलिणीने चक्रधरांचे बरवे रूप पाहून 'एइ गा बरवेया देवा : माझेया घरा जावो' असे म्हणोन...

आँ! तिचा व्यवसाय नक्की काय होता? ती नक्की तेलीण होती, की आणखी काही होती? आजवर दुकानांतून तेल विकत आणण्याचा प्रसंग आमच्यावर अनेकदा आला असेल, परंतु त्यापैकी एकाही वेळी दुकानदारीण 'ए, आता है क्या?' म्हणून मागे लागण्याचा अनुभव नाही. (अर्थात, आमचे रूप 'बरवे' - व्हॉटेवर दॅट मे मीन - किंवा त्याच्या जवळपाससुद्धा जाणारे नाही म्हणा - थँक गॉड! - परंतु तरीही.) एकंदरीत, भलताच मोकळा जमाना होता, म्हणायचा.

(अवांतर: 'तेली' हे नामाभिधान कोकणात ज्यू लोकांकरितासुद्धा वापरले जाते, असे ऐकून आहे. म्हणजे, ही बाई तेल विकायची, म्हणून तेलीण, की ज्यू होती, म्हणून तेलीण? आणि, म्हणजे चक्रधरस्वामी कोकणात गेले होते काय?)

...अवघा पसारा माथां घेतला आणि घरी पतीसह त्यांचे चरण-प्रक्षालन केले

'चरण-प्रक्षालन' हे यूफीमिज़म असावे काय?

(आणि, पतीसह??? Ménage à trois??? हा लिबरलपणाचा कळस म्हणावा, की कसे?)

मराठी वारकरी संतवाङ्मयामध्ये, विशेषतः ज्ञानेश्वरीमध्ये ' घातलेयां धर्माचा पसारा'

अच्छा! म्हणजे धर्माचा बाजार मांडलेला आहे, हे ज्ञानेश्वरांना मान्य होते तर. उत्तम!

सोवनहाट (सराफा)

अच्छा! म्हणजे, 'सोवनी' म्हणजे सोनार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक शब्द घेऊन त्याचा इतका सखोल वेध घेणे त्याच्याशी निगडीत संदर्भांची उकल करुन देणे मोठे अवघड व तितकेच आनंददायी काम आहे.
हा लेख आणि मिसळपाव वर कुमार यांचा शब्दकोशावरील लेख एकापाठोपाठ वाचले व मोठा आनंद झाला. मलाही शब्द मग ते कुठल्याही माहीत असलेल्या भाषातील असतील फार आवडतात. त्यांचा असा वेध घ्यायला त्यांचे प्रचलित पेक्षा निराळे अर्थ माहीत करुन घ्यायला ते वापरायला बोलायला चर्चा करायला फार फार आवडत. दुर्देवाने असे धागे फारसे आढळत नाहीत्
एक शब्दवेध नावाचा धागा काढण्याचा विचार तुमच्या या लेखामुळे सुचतोय त्यात मग ज्यांना आवड आहे ते भर घालतील व निरनिराळ्या भाषांमधील वैशिष्ट्यपुर्ण शब्द चर्चायला जाणुन घ्यायला मिळतील्
धन्यवाद या धाग्यासाठी !

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

एक शब्दवेध नावाचा धागा काढण्याचा विचार तुमच्या या लेखामुळे सुचतोय त्यात मग ज्यांना आवड आहे ते भर घालतील व निरनिराळ्या भाषांमधील वैशिष्ट्यपुर्ण शब्द चर्चायला जाणुन घ्यायला मिळतील्

छान कल्पना - होऊन जाऊ दे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ज्ञानेश्वरीमध्ये ' घातलेयां धर्माचा पसारा'

मोबाईल अक्सेसरीजच्या दुकानात निरनिराळे हेडफोन्स, ब्लुटुथ स्पीकर्स याचा पसारा असतो तसे ज्ञानेश्वरांना वाटते की या सारथी कृष्णाने भयभीत अर्जुनासमोर रणांगणातच 'माझ्याकडे येण्याचे निराळे योग मार्गांचा 'पसारा मांडला आहे. असा अर्थ घेतला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रोचक लेख.

पैसा हा शब्द किती जुना आहे?

पसा, पैसा या शब्दाचा पसारा या शब्दाशी (आर्थिक व्यवहाराचं ठिकाण उर्फ दुकान) काही संबंध असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पैसा येण्याअगोदर पशुधन होतं. किती पशु आहेत तेवढा तो श्रीमंत.
पशु >पसु>पेसु>पैसा ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...स्पॅनिशमधील पेसो, पेसेता का?

असेल बुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुनी भाषा तमिळमध्ये पसु = गुरं/गाई वाचल्याचं आठवत आहे पण गूगल ट्रान्सलेट वेगळा शब्द दाखवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मृगेन्द्र सर, लै भारी लेख. एंट्रीच मस्त घेतलीय, आता असेच अजून लेखन अपेक्षित!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकूणच पसारा हा शब्दप्रयोग १३व्या शतकापर्यंत पेठेतील व्यापाऱ्यांचे, आठवडे बाजारातील तंबूत मांडलेले किंवा अनेक प्रकारच्या ज्ञात-अज्ञात स्वरूपांच्या दुकांनांच्या संदर्भात येतो. मोल्सवर्थच्या १८५७च्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात 'पसारा' हा शब्द 'Spread out, scattered, extended state, things lying scattered about' या अर्थी येतो. एकूणच मधल्या पाच-सहा शतकांमध्ये या शब्दप्रयोगाचे स्वरूप कमालीचे बदलले आहे.

असेच म्हणता येईल, याबद्दल साशंक आहे.

म्हणजे, spread, sprawl असा एक नवीनच अर्थ मध्यंतरीच्या काळात या शब्दास प्राप्त झाला असावा, हे मानता येण्यासारखे आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, दुकान, बाजार असा जो जुना अर्थ होता, तो गेला बाजार विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तरी पूर्णतः लुप्त झाला नसावा, कदाचित concurrently प्रचलित असावा, किंवा, नाहीच झाले तर, निदान तशा अर्थाने वापरला असता लोकांना तो समजून येत असावा, असे suggest करणारे किमान एक तरी उदाहरण दृग्गोचर होते.

पाहा:

जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा|

(cf. दुनिया वेड्यांचा बाजार| झांजीबार, झांजीबार, झांजीबार|)

येथे, पहिल्या उदाहरणातील 'वेड्यांचा पसारा' हे दुसऱ्या उदाहरणातील (कदाचित त्या काळी अधिक प्रचलित असलेल्या - चूभूद्याघ्या.) 'वेड्यांचा बाजार' अशा अर्थाने वापरले असावे, हे गृहीतक सतर्क वाटते. 'वेड्यांचा बाजार' (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, 'मासळीबाजार'१) या वाक्प्रचारात अभिप्रेत असलेली bedlam ही अर्थच्छटा 'वेड्यांचा पसारा'मधून हुबेहूब प्रतीत होते.

अर्थात, आजमितीस 'पसारा' या शब्दाच्या दुकान, बाजार अशा अर्थाने वापराची उदाहरणे (असलीच तर) चटकन लक्षात येत नाहीत, हे मान्य होण्यासारखे आहे. मात्र, तो जुना अर्थ फार फार तर इतक्यातच लोप पावला असावा, आणि परवापरवापर्यंत - गेला बाजार आमच्या आजोबांच्या पिढीपर्यंत - निदान समजला तरी जात असावा, असे मानता येण्यास कारण आहे, एवढेच मांडायचे आहे.

(तसेही,

[टीप: मला चौदाव्या शतकापासून १७-१८व्या शतकापर्यंतच्या साधनांमध्ये हा शब्द आढळला नाही, मला सापडलं नाही म्हणजे वापर नव्हता असं म्हणता येणार नाही]

असा डिस्क्लेमर आपण ठोकून ठेवलेला आहेच, त्यामुळे या मुद्द्यावर आपल्याशी वाद असा नाही. केवळ, आपल्या नजरेतून सुटलेल्या उदाहरणाकडे आपले लक्ष वेधण्यातून आमचा आपल्या परीने स्वल्पसेवेचा प्रयत्न, इतकेच.)

----------

अतिअवांतर: 'मासळीबाजार' हे मराठीतील द्विरुक्ती अथवा tautologyचे उदाहरण मानता यावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्यामची आई पुस्तकात एका ठिकाणी अमुक एक जण पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला वगैरे असा उल्लेख आहे. मी तो परसाकडे अशा अर्थाने घेत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://mr.m.wikisource.org/wiki/श्यामची_आई/रात्र_पस्तिसावी

पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला,

येथे "बाजारात साप काय करतोय?" हा "पोष्टात पोलीस काय करतोय?" या चालीवरचा प्रश्न उदभवू शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाजारात साप असू नयेत???

(आपण फ्रेडरिक फोर्साइथचा 'नो कमबॅक्स' हा कथासंग्रह वाचला आहेत काय? त्या संग्रहात 'देअर आर नो स्नेक्स इन आयर्लंड' नावाची एक कथा आहे. त्या कथेत, मुंबईत ग्रँट रोडच्या पुलाखाली चटर्जी नावाच्या एका गुजराती गृहस्थाच्या दुकानात साप विकत मिळतात, असा स्पष्ट उल्लेख आहे.)

..........

होय, तोच तो. 'द डे ऑफ द जॅकल'वाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबईत ग्रँट रोडच्या पुलाखाली चटर्जी नावाच्या एका गुजराती गृहस्थाच्या दुकानात साप विकत मिळतात,
कुछ तो गडबड है दया

मी अंधुक वाचलेलं आठवतय फ्रेडरीक ची स्वत:ची एक रीसर्च टीम असायची इतर संदर्भ पुरवायला तो मेन ड्राफ्ट आयडीया वर काम करायचा
बहुधा टीम मेंबरांचे पगार कमी असावेत्
किंवा साधने अपुरी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

मुंबईत ग्रँट रोडच्या पुलाखाली चटर्जी नावाच्या एका गुजराती गृहस्थाच्या दुकानात साप विकत मिळतात,

तुम्ही दोनच शब्द अधोरेखित केलेत. मी आख्खे वाक्य अधोरेखित केले असते.

मुळात मुंबईत ग्रँट रोडच्या पुलाखाली जेथे सर्रास साप फॉर द आस्किंग विकत मिळतात अशा दुकानाची तुम्ही कल्पना करू शकता काय? (जेथून साप विकत घेण्यासाठी आयर्लंडमध्ये काम करणाऱ्या एखाद्या गरीब पंजाबी हिंदू शेतमजुराने पैसे उधार घेऊन, विमानाचे तिकीट विकत घेऊन मुंबईस खेप मारावी? का, तर म्हणे तेथून खिशात मावेल असा साप विकत घ्यायचा, तो खिशात घालून आयर्लंडला आणायचा, नि आपल्याला अल्पमोबदल्यावर मरेस्तोवर राबवून घेणाऱ्या आणि छळणाऱ्या हलकट आयरिश शेतमालकाच्या कोटाच्या खिशात रात्रीच्या वेळी हळूच सोडून द्यायचा, जेणेकरून शेतमालक जेव्हा सकाळी उठून कोटाच्या खिशात हात घालेल, तेव्हा त्याला साप चावून तो मरेल, परंतु कोणालाही तो कसा मेला, ते कळणार नाही. कारण, आयर्लंडमध्ये साप नाहीत. पण असो; हे कथेचे तपशील झाले.)

च्या**, मुंबईत, त्यातही ग्रँट रोडच्या पुलाखाली, साप विकणारे स्पेशलाइझ्ड दुकान??? त्यापुढे त्या गल्ल्यावर बसणाऱ्या मालकाचे आडनाव, त्याचा प्रांतिक उद्गम, आणि या दोहोंमधली विसंगती, या फार पुढच्या नि तुलनेने दुय्यम बाबी झाल्या.

पण मी म्हणतो, तुम्ही ती कथा वाचाच. अशाच गमतीजमती आहेत. (मी जेव्हा ती कथा वाचली - कॉलेजात होतो तेव्हा मी - तेव्हा ही खरोखरच फ्रेडरिक फोरसाइथने लिहिलेली कथा (आणि/किंवा कथासंग्रह) आहे, की डुप्लिकेट पुस्तक आहे, अशा संभ्रमात पडलो होतो. पण नाही. जेन्युइन माल आहे.)

बहुधा टीम मेंबरांचे पगार कमी असावेत्
किंवा साधने अपुरी

किंवा, पुरेसा रिसर्च करण्याची अनिच्छा. किंवा, ठोकून दिले, तर कोणाला पत्ता लागणार आहे, अशी विचारसरणी.

मी अंधुक वाचलेलं आठवतय फ्रेडरीक ची स्वत:ची एक रीसर्च टीम असायची इतर संदर्भ पुरवायला तो मेन ड्राफ्ट आयडीया वर काम करायचा

युरोपीय संदर्भांसाठी कदाचित तितका काटेकोरपणा पाळत असेलही. इंडियन संदर्भांना कोण विचारतो? द्या ठोकून!

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ग्रॅन्ट रोडचा पूल म्हणजे लॅमिंग्टन रोडवरून् नाना चौकात उतरणारा फ्रियर ब्रिज? त्याच्या उत्तरेकडील भागात स्लेटर रोड उर्फ भाजी गल्ली आणि अलिकडे मन्सूर बिल्डिंग नामक चाळ उर्फ माझे आजोळ!

लहानपणी खूप काळ घालवला असेल त्या परिसरात पण कधी सापाचे दुकान नाही दिसले!!

असो, त्या भागाची डेमोग्राफी पाहता, दुकान मालकाचे नाव चटर्जीऐवजी पेस्तनजी असते, तर थोडे अधिक ऑथेन्टिक वाटले असते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्राफर्ड मार्केटपर्यंत आल्यास बाजूला साप,पोपट,असे जिवंत प्राणी पक्षी मिळतात. असा थोडासा संदर्भ चुकला असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी खूप काळ घालवला असेल त्या परिसरात पण कधी सापाचे दुकान नाही दिसले!!

शास्त्री हॉलमध्ये माझी मावशी राहायची, त्यामुळे लहानपणी सुट्टीचा मुंबईस आलो, की माझेसुद्धा त्या भागात अनेकदा जाणेयेणे असायचे. परंतु मलासुद्धा कधी दिसले नाही. एवढेच कशाला, तेथल्या माझ्या कझिनावळीपैकी कोणी मला कधी त्याबद्दल सांगितलेसुद्धा नाही. (दाखवणे तर दूरच राहिले.) लपवून ठेवतात साले!

(किंवा कदाचित असेही असेल, की त्यांच्यासाठी ते दुकान ही अत्यंत रूटीन बाब असेल; इतकी, की "हॅः! यात काय सांगायचे?" असेही त्यांना वाटू शकत असेल. कोणास ठाऊक!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कढी शिळीच आहे. (नि आमचीच आहे.)

तपशील येथे वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्यामची आई पुस्तकात एका ठिकाणी अमुक एक जण पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला वगैरे असा उल्लेख आहे.

रोचक + माहितीपूर्ण.

मी तो परसाकडे अशा अर्थाने घेत असे.

रोचक + माहितीपूर्ण + विनोदी.

कृपया खात्यात नोंद करणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण दोन मांडून ठेवत आहे.

ता.क.

आता शब्दांच्या नेमक्या उपयोगाचा विषय असेल तर मांडून ठेवणे ही रचना जरा चुकीची आहे का? म्हणजे ज्याने उधारीचे पैसे वगैरे देणे असेल तो "मांडून" ठेवतो की घेणे असेल तो?

जनरली दुकानदार उधार देतो आणि कष्टम्बर त्यालाच मांडून ठेवा / लिहून ठेवा म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुकानदारीत आपण म्हणता, ते खरे आहे. परंतु, आपसातील व्यवहारात कोणीही (कोणताही एक अथवा दोन्ही पक्ष) मांडून ठेवू शकावे/शकावेत. (चूभूद्याघ्या.)

शेवटी विश्वासाचा प्रश्न आहे.

.........‌.

सवांतर: 'आपण' या शब्दाचा अर्थ एके काळी 'दुकान' असासुद्धा होत असे, असे वाचून आहे. अर्थात, तो अर्थ येथे लागू नाही, हे सांगणे न लगे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण

कृपया दोन नंबरची एण्ट्री पाहावी.

आगाऊ आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घेणे असणारा मांडून ठेवणार. फक्त तारीख आणि रक्कम.
वाणी एक छोटी वही गिऱ्हाइकास देतात त्यात काय सामान नेले ती यादी आणि एकूण किती रुपये असतात ते लिहिलेले असते. पैसे भरणा केल्यावर तिथे मिळाल्याचा शिक्का मारतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गंमत शब्दांची' हे माझं एक आवडतं पुस्तक. त्यात परफेक्ट बसेल असा हा १ नंबर सुंदर लेख आहे. खूप दिवसांनी असा रिफ्रेशिंग लेख वाचला.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यासाठी नवीन माहिती .मला हा शब्द ''पसरणे '' या क्रियापदावरून आलेला एवढंच वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पसारा'वरून 'फापटपसारा' ह्या शब्दाची आठवण झाली.

ह्यामधील 'फापट' म्हणजे 'फापटी' नावाची जमिनीलगत पसरणारी एक रानटी वनस्पति. हिलाच आयुर्वेदामध्ये 'परिपाठ' असेहि ओळखतात. हिचे पाश्चात्य नाव Oldenlandia corymbosa आणि ह्या विकिपानावर तिचे चित्र दिसेल.

ह्या वनस्पतीच्या नावावरून अस्ताव्यस्त पसाऱ्याला 'फापटपसारा' असे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण5
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे, ही व्युत्पत्ती माहितीच नव्हती! खरेच काहीही मूळ असू शकते शब्दांचे. अतिरोचक!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय सुंदर लेख. आणखी लिहा, मृ कुं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.