लॉकडाऊनच्या नोंदी

आजच्या घटकेला पूर्ण युरोपात कोव्हीड-१९ने घेतलेल्या बळींची सर्वात जास्त संख्या ब्रिटनमध्ये आहे. एका परीने पाहिल्यास हा लौकिक देशाला साजेसा नाहीच, पण या अपयशाकडे बोट दाखवतानाच ब्रिटनची लोकसंख्या आणि तिची घनता याचाही विचार करणे आवश्यक आहे. या शृंखलेत लंडनचे अनुभव सांगणारी एक नोंद येऊन गेलेली आहेच त्यामुळे तिथे आलेल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती न करता थोडे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एका जवळच्या मित्राच्या अकस्मात निधनामुळे मला काही दिवसांसाठी मुंबई वारी करावी लागली. कोव्हीडचे संकट तेव्हा क्षितिजावर दिसू लागले होतेच. या दुःखद प्रसंगामुळे मनःस्थिती तशीही आधीच काही चांगली नव्हती. विमानतळावर गर्दी कमी होती, आणि तोंडावर मास्क्स बांधलेले काही काही प्रवासी दिसत होते. मुंबईला उतरल्यावर चीन आणि इतर काही पूर्वेकडच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी 'स्क्रिनिंग' अनिवार्य केल्याचे दिसले.

परत येताना हे सावट थोडे अधिक जाणवले पण तेव्हाही पुढे होणाऱ्या परिणामांची यथार्थ कल्पना आली होती असे म्हणवत नाही. सार्स किंवा मर्स या रोगांसारखीच ही एक साथ असणार आहे, आणि ज्या प्रमाणे या साथी येऊन गेल्या ते आपण विसरूनही गेलो, तशीच ही साथही आपण झेलू, आणि विसरून जाऊ असेच काहीसे त्या वेळेला वाटत होते. या वर्षी मी तीन परिषदांच्या कार्यात व्यस्त असणार होतो. त्यापैकी दोन परिषदांचा तर मी को-ऑर्गनायझर असणार होतो. त्यामुळे २०२० हे वर्ष बऱ्यापैकी व्यस्त असणार अशी चिन्हे होती, आणि मी त्याच विचारात होतो.

मार्च महिन्यात परिस्थिती झपाट्याने बदलली. परत आल्यावर लगेचच परिषदा आयोजित करणाऱ्या एका संस्थेची मीटिंग झाली आणि त्यात ती परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. दुसरी परिषद मार्चच्या अखेरीलाच होती, तीही रद्द झाली. तोपर्यंत इटली आणि स्पेन, आणि मागोमाग फ्रान्स इथल्या मृत्यूंचे आकडे कानावर पडू लागले होते. तिथे लॉक डाउन्स घोषित करण्यात आले होते. मार्चची परिषद आटोपून काही दिवस दक्षिण फ्रान्सला सुटीसाठी जायचा बेत होता, त्यावर यामुळे पाणी ओतावे लागले!

अखेरीस आमच्याकडेही लॉकडाऊन करायचे ठरले.
पण आमच्याकडच्या लॉकडाऊनमध्ये आणि युरोपातल्या लोकडाउन्समध्ये मुळातच फरक होता. आता मागे वळून पाहताना कदाचित असेही वाटते की आमच्याकडे हे पाऊल उचलायला सरकारने अंमळ दिरंगाईच केली. पण सरकारचे म्हणणे या बाबतीत स्पष्ट होते. ते असे की, आधीपासूनच कडक निर्बंध आणले तर जेव्हा ही साथ ऐन भरात असेल त्यावेळी लोक कंटाळून गेलेले असतील आणि त्यामुळे नियम मोडण्याकडे लोकांची प्रवृत्ती अधिक होईल. हे म्हणणे व्यक्तिशः मला पटते. दुसरे म्हणजे ब्रिटिश लोकांमध्ये काही सांस्कृतिक गुण आहेत. आजारासंबंधी विशेष वाच्यता न करणे, आपण आजारी आहोत हे 'मान्य' न करणे, त्याऐवजी एकंदरीतच मागील पानावरून पुढे काम चालू ठेवणे, एवंगुणविशिष्ट वागणुकीला इथे 'स्टिफ अपर लिप' असे गोंडस नाव आहे! म्हणजे आजाराचा बभ्रा-गवगवा करणे, आईगं-उईगं करणे, कण्हणे-कुथणे वगैरे बाबी जरा ‘नो नो’च मानल्या जातात. हा गुण तसे म्हटले तर चांगलाच - पण त्यामुळे आजारी असतानाही कामाला बाहेर पडणे, रजा न घेणे हे ब्रिटिश समाजात सहज केले जाते. नेहमीच्या विंटर फ्लू सारख्या रोगांच्या साथीही याचमुळे वेगाने पसरतात.

अशा समाजाच्या गळी "आजारी असाल तर मुकाट घरी बसून राहा" हा निर्णय उतरवणे कठीण होते! ते काम या सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊनच करणे आवश्यक होते. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य सेवेची. ब्रिटनमध्ये खाजगी आरोग्यसेवा जवळ जवळ नाहीच - म्हणजे लोकसंख्येचा खूप मोठा हिस्सा सरकारी आरोग्य सेवेवर (‘एनएचएस’ - नॅशनल हेल्थ सर्व्हिस) अवलंबून आहे. एकच रोग जेव्हा हजारो लोकांना होणार तेव्हा त्यावरची ट्रीटमेंट हीसुद्धा त्या लोकांना एकाच वेळी लागणार, आणि त्याचमुळे ही सेवा कोलमडून पडणार नाही हे पाहणे सरकारचे परम कर्तव्य होते. आजच्या परिस्थितीत एनएचएस खंबीरपणे उभी राहिलेली आहे, हे सरकारचे यशच म्हणायला पाहिजे. म्हणजे परिस्थिती अर्थातच ‘उत्तम’ नाही, पण किमान सेवा कोलमडली तरी नाही इतके निश्चित म्हणता येते.

मी लंडनसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरापासून दूर राहतो त्यामुळे अंडरग्राउंड रेल्वेसारख्या दाटीवाटीच्या वाहतुकीशी आमचा संबंध येत नाही. लॉकडाउनच्या काळात, अगदी आजही, आमच्या गावातली पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था नीट चालू आहे. आमच्याकडे दिवसातून एकदा व्यायामासाठी बाहेर पडायला परवानगीही आहे. बांधकाम उद्योग, डिलिव्हरीज, टपाल या सगळ्या ‘जीवनावश्यक सेवा’ म्हणून चालू आहेत (सायकलची दुकाने, आणि प्राणिमात्रांचे दवाखाने हेही बंद झालेले नाहीत). तरीही, सुरुवातीच्या काळात लोकांचे धाबे दणाणले होते त्याचे वेगवेगळे प्रत्यय आले.

पहिले चारेक दिवस सुपरमार्केट ओस पडली. माझ्या नेहमीच्या मार्केटमध्ये अशी परिस्थिती याआधी मी कधीही पाहिलेली किंवा अनुभवलेली नव्हती. सुमारे साताठ हजार स्क्वेअर फुटाचा ‘फ्रेश फूड’चा हॉल पूर्णपणे रिकामा - एकही फळ, भाजी, वा सॅलड उपलब्ध नाही, सगळे मीट काउंटर्स रिकामे, टिन खाद्यपदार्थ गायब, अंडी, पास्ता, पाव सगळे गुप्त! पण ही परिस्थिती चारेक दिवसच राहिली. नंतर फूड सप्लाय चेन्स पुन्हा कार्यरत झाल्या. काही पदार्थांवर आणि मालावर एका व्यक्तीला अमुक इतकेच घेता येईल असे निर्बंध घालण्यात आले होते, पण आता तेही बहुशः दूर केले गेले आहेत.

'सोशल डिस्टन्सिंग' म्हणजे काय, 'निर्जंतुकीकरण' म्हणजे काय, आयसोलेशन कसे कराल, याबद्दल सरकारकडून नीट माहिती मिळायला लागल्यामुळे आता हे लोकांच्या हळूहळू अंगवळणी पडायला लागलेले दिसते. सुपरमार्केटमध्ये लोकांना एक रांग करून प्रवेश दिला जातो. प्रत्येक ग्राहकाच्या हातात असलेल्या ट्रॉलीचा आडवा ढकलदांडा डिसइन्फेक्टन्ट द्रव्याने पुसूनच मग ती ग्राहकाच्या हाती दिली जाते. पैशांचे व्यवहार कुठेही हात न लावता, ‘फोन पे’ चे ऑप्शन्स वापरून केले जातात.

या सगळ्या क्रायसिसचा एक परिणाम म्हणजे लोकांचा एनएचएस प्रति वाढलेला प्रचंड आदर आणि विश्वास! वास्तविक पाहता सध्याचे सरकार हे मागल्या दाराने एनएचएसचे खाजगीकरण करायला उत्सुक आहे, अशी त्यांच्याबद्दल वदंता होती. पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे हाडाचे 'उजवे' टोरी - आणि नुकतीच त्यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्द्यावर मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकली. या निवडणुकीत एनएचएसच्या खाजगीकरणाचा मुद्दा तेव्हाचे विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांनी लावून धरला होता, आणि जॉन्सन हे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संगनमत करून एनएचएसचे खाजगीकरण कसे घडवून आणू पाहत आहेत याबद्दल एक मोठे कागदांचे बाडच प्रसिद्ध केले होते. पण एनएचएसचे सार्वजनिक आयुष्यातले स्थान जॉन्सन यांनी नीट ओळखले आणि आपला असा काहीही बेत नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही दिली!

आता आलेल्या आपत्तीतून एनएचएसचे डॉक्टर्स आणि नर्सेस हेच आपल्याला तारत आहेत, किंबहुना खुद्द जॉन्सन या रोगाच्या संसर्गाने ग्रस्त झाले आणि एनएचएसच्या आधारेच बरे झाले, हे पाहता या संस्थेबद्दलचे लोकांचे कौतुक, आदर आणि कृतज्ञता ही ओसंडून वाहू लागली आहे! दर गुरुवारी रात्री आठ वाजता लोक आपापल्या घराबाहेर येऊन दोन मिनिटे एनएचएसच्या 'सैनिकां'ना टाळ्यांनी मानवंदना देतात. या साथीमुळे काही काही चिन्हांचे सूचनही नव्याने घडवले जाऊ लागले आहे (संस्कृती आणि इतिहासातली ‘दृश्यमानता’ हा माझ्या अभ्यासाचा आवडीचा विषय असल्याने हे मला फारच मनोरंजक वाटते!) उदाहरणार्थ, 'इंद्रधनुष्य' हे चिन्ह या आधी केवळ क्वेकर नावाचा ख्रिस्ती पंथ आणि समलैंगिक लोक यांच्याशी जोडले जात असे. पण आता हे चिन्ह 'उद्याची आशा' अशा नवीन संदर्भासहित घरांच्या खिडक्या, दारे इत्यादींवर दिसू लागले आहे. क्वचित काही वेळा फूटपाथवरही खडूने काढलेली इंद्रधनुष्ये दिसायला लागली आहेत.

या काळातला एक दैवगत (किंवा काव्यगत म्हणा!) न्याय असा ठरला आहे की, 'लेसे फेअर' भांडवलशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या टोरी पक्षाच्या सरकारला आपली धोरणे मात्र अगदीच ‘समाजवादी’ पद्धतीची राबवावी लागत आहेत. 'राष्ट्रीयीकरण' हा शब्द न उच्चारता अनेक आघाड्यांवर सरकारने थेट हस्तक्षेप केला आहे. जे लोक कामांवर जाऊ शकत नाहीत अशांसाठी त्यांच्या रोजगाराची हमी सरकारने उचलणे हे त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणायला हवे. या योजनेअंतर्गत महिना £२५०० पर्यंत ज्यांचे वेतन आहे, त्यांचे ८०% पगार सरकार देणार आहे. लोन्सचे हप्ते, बाकीचे घरखर्च चालवायला ही खूपच मोठी मदत ठरली आहे. सुरुवातीला ही स्कीम जून महिन्याच्या अंतापर्यंत चालू राहणार होती, पण आजच अर्थमंत्री ऋषी सूनक यांनी संसदेत घोषणा करून ती ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. आजच्या तारखेला सुमारे पंचाहत्तर लाख लोक म्हणजे पूर्ण देशातील २७% वर्कफोर्स या योजनेचा लाभार्थी आहे.

लॉकडाउनचा माझ्याकरता एक मोठा परिणाम हा झाला की माझे जिमला जाणे बंद झाले! पण अर्थातच आउटडोअर व्यायाम करायला परवानगी असल्याने धावणे आणि सायकलिंग हे आम्ही करू शकत आहोत. देवाने एक दया केली आहे की, सध्या आमच्याकडे हवा अतिशय उत्तम आहे. आधीच वसंत ऋतू म्हणजे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध. ग्रीससारख्या देशांत राहून सुद्धा लॉर्ड बायरनने "नाऊ टू बी इन इंग्लंड दॅट एप्रिल इज हिअर" असे उद्गार काढले होते! त्यामुळे एक दिवसाआड संध्याकाळी सायकल घेऊन दहा-पंधरा मैलांची रपेट करणे ही निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची एक सुवर्णसंधीच ठरली आहे. कार ट्रॅफिक अगदीच कमी झाले असल्याने हवाही पुष्कळच सुधारली आहे. माझ्या घरापासून जवळ असलेल्या वेगवेगळ्या गावांत, वेगवेगळ्या वाटांनी सायकल चालवत जाणे हे कल्पनेच्या बाहेर आनंददायक आहे हा शोध मला या लॉकडाऊनमुळे लागला.

कधी शेतांतून, तर कधी कालव्याच्या काठाने जाताना अनेकदा स्थानिक वन्यजीवनाचे सुरम्य दर्शन होते. कधी हरणांचे कळप, तर कधी एखादा कुंपणात हळूच पळून जाणारा लबाड कोल्हा, फेझंटसारखे तुरेदार पक्षी, पिलांच्या फैरीला शॉपिंगला घेऊन निघाल्यासारख्या बदकबाई, मोठमोठ्या घरट्यांवर अंडी उबवत बसलेले पांढरेशुभ्र हंस असे अनेक विशेष नेहमी नजरेला पडतात. लॉकडाऊन नसता तर या वाटांचे अस्तित्वही मला उमगले असते की नाही कोण जाणे! तेव्हा ही या लॉकडाऊनची कृपाच ठरली आहे!

पण अर्थातच जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या रोगाची टांगती तलवार आपल्या डोक्यांवर राहणारच आहे. माझ्या युनिव्हर्सिटीत लस निर्मितीवर आघाडीचे संशोधन चालू आहे याचा मला अर्थातच अभिमान वाटतो. आणखी एक अभिमानास्पद बाब म्हणजे या लसनिर्मितीच्या प्रक्रियेशी लीडर म्हणून जवळून संबंधित असलेले डॉ. अँड्र्यू पोलार्ड हे माझ्याच कॉलेजचे फेलो आहेत आणि आम्ही दोघेही काही कॉलेज समितींवर आहोत. त्या समितीच्या मिटींग्स आता अर्थातच ऑनलाईन होत आहेत, पण तेव्हा डॉ. पोलार्ड यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचे योग येतात आणि या संशोधनात 'पडद्यामागे' काय काय चालले आहे, त्याची एक झलक मिळते.

ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक ही लस बनवू पाहता आहेत, ते तंत्रज्ञान सर्वार्थाने ‘कटिंग एज’ आहे! या विषाणूच्या जनुकीय रसायनांचे विलगीकरण करून, ते दुसऱ्या एका विषाणूच्या 'अंगा'त बसवणे आणि मग अशा प्रकारे रोगजन्यता मर्यादित झालेले विषाणू मानवी शरीरात टोचून शरीराद्वारे प्रतिकारात्मक जैविकांची निर्मिती सुरु करणे असा हा तांत्रिक मार्ग आहे. आता या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत आणि त्या ८०% यशस्वी होतील असे वर्तमानपत्रात छापून आले होते.

त्यासंबंधी डॉ. पोलार्ड यांना प्रश्न विचारले असता त्यांनी अगदी व्यावसायिक संशोधकासारखे - "अशी आधीच खातरजमा करता आली असती तर आम्ही मानवी चाचण्या केल्याच नसत्या!" असे चटकन उत्तर दिले. आणि यातला विरोधाभास (किंवा दैवदुर्विलास म्हणा हवे तर) असा आहे की, मानवी चाचण्या पार पडूनही लस कितपत परिणामकारक आहे हे कळायला समाजातले 'कम्युनिटी ट्रान्समिशन' आणि इन्फेक्शन रेट जास्त असायला हवा आहे. जितका हा रेट जास्त तितकी परिणामकारकता लवकर पडताळता येते. पण लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे तर हा रेट कमी कमी होत चालला आहे. सबब परिणामकारकतेचा पडताळा यायलाही वेळ लागणार आहे!

परिणामकारक लसीची निर्मिती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अर्थातच आपल्याला या विषाणूशी ‘विरोधामैत्री’ करावी लागणार आहे. निर्जंतुकीकरण आणि विलगीकरण हा त्या विषाणूला दूर ठेवायचा मार्ग आहे. त्याचबरोबर सकारात्मक विचारसरणी, निरोगी जीवनशैली, उपभोक्ततेच्या अतिरेकाचा पुनर्विचार हेही आपल्याला या विषाणूने दिलेले धडे आहेत. लस येऊन आपले जीवन निर्भर झाले तरीही जीवनशैलीत अगदी अध्याहृत म्हणून ज्या गोष्टींचा समावेश आपण करत होतो, त्या सगळ्यांकडेच आपल्याला आता पुन्हा पुन्हा पाहण्याची गरज अधोरेखित झालेली आहे. या सगळ्यांचा परिणाम अत्यंत दूरगामी होणार आहे यात नवल नाही.

'मन्वंतर' म्हणजे काय याची वर्णने आपण पुराणांतरी वाचलेली असतात, पण प्रत्यक्ष मन्वंतराचा अनुभव घेता आलेल्या मानवेतिहासात अशा काहीच पिढ्या असतील. आपण सगळेच या अशा पिढ्यांत मोडले जाऊ. हे शाप का वरदान याबद्दलचे मंथन पुढची काही वर्षे चालू राहीलच - पण जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणारे असे वर्ष म्हणून २०२० ओळखले जाईल हे निश्चित!

-- ऑक्सफर्ड, यूके.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

इथे एक करोना बखर मालिका आहे त्याय या धाग्याची लिंक द्यावी. एकत्रीत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे एक करोना बखर मालिका आहे त्याय या धाग्याची लिंक द्यावी. एकत्रीत राहील.

इथे एक करोना विशेष विभाग आहे. सर्व संबंधित धाग्यांचे दुवे तिथे एकत्रित सापडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0