झण्ण
एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात.
तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही.
तो ग्लानी तुटू देत नाही.
आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो.
लिखित शब्द, चित्रित कथा
कशातही अडकू देत नाही.
'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?'
ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो.
मी कशातच अडकू शकत नाही.
मी कशातच थांबू शकत नाही.
मी थांबून काहीच करू शकत नाही.
मी गुंगीतच असते.
डोळ्यासमोर चालू असतात
माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या,
अविरत दळले जाणारे विनोद,
याच्या त्याच्या नावाची अवतरणे,
गुंगी तुटत नाही.
माझ्या आत काही झिरपत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने
उन्मळून, कोसळून पडू देत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या आनंदाने
भरभरून फुलू देत नाही.
झण्ण विस्तारत चाललाय.
हा प्रखर प्रकाश, हे मेलेले वारे
झण्णला पोसतायत.
भविष्य, भविष्याचे बेत वगैरे अफवा झाल्या आहेत.
नजिकचा भूतकाळ झण्णच्या अस्तित्वाचे दाखले आहेत.
फक्त झण्ण असणारे.
माझा गाभा, माझे शरीर, मी व्यापलेली जागा
सगळं झण्ण होणार!
मी नाहीच उरणार.
- नी
अय्या!
तुम्हाला 'गाभा' आहे??? :P
----------
राहता राहिली गोष्ट 'झण्ण'ची. हा शब्द मी पूर्वी कधी ऐकलेला नाही, परंतु, 'जण'चा अपभ्रंश (किंवा शुद्धलेखनाची चूक) असावा, असा अंदाज केला. आणि, त्या दृष्टीने पाहता - 'एक जण आहे माझ्या गाभ्यात - पक्षी, गर्भात' - अतिशय सामान्य कल्पना वाटली. (शिवाय, खाजगी बाब; मला काय त्याचे! बारश्याला मला थोडेच बोलावणार आहेत?)
----------
(नाही म्हणायला, कवयित्रीला कदाचित 'जिन्न' म्हणायचे असावे, अशी एक शंका मनाला क्षणभर चाटून गेली खरी, परंतु ती फारफेच्ड म्हणून लगेच झटकून टाकली. नाही म्हणजे, 'जिन्न'सारखा शब्द अस्तित्वात तथा हयात असताना, उगाच कोण वाकडी वाट करून 'झण्ण'सारखा अप्रचलित तथा चमत्कारिक शब्द जन्मास चालेल?)
(आणि हो. कदाचित माझेच काही चुकत तर नाही ना, म्हणून मोल्सवर्थात पडताळून पाहिले. 'झण्ण' असा काही शब्द आढळला नाही. 'जिन्न'सुद्धा आढळला नाही, परंतु ते सोडा - तूर्तास तो प्रश्न नाही.)
असो चालायचेच.
माझ्या
माझ्या मनात/गाभ्यातही आहे ते. फक्त त्याला झण्ण म्हणतात हे आज कळलं!
कविता आवडली, पूर्ण कळली असं म्हणण्याचं मात्र धाडस नाही.
बोरकरांच्या कवितेला उगाचच, 'झण्ण झण्ण वाजे बण्ण, असं म्हणून बघितलं!