हावं सायबा पोलतीडी वेतमं...

गोवा.कोणतातरी समारंभ चाललेला.एकंदरीत आनंदाचा प्रसंग .बहुतेक शाळा काॕलेजच गॕदरींग.नवतरुणींच नटून थटून ठेक्यात नाचणं.गाणं,त्यातील शब्द म्हणजे खास गोवेकरी कोंकणी भाषेचा गोडवाच.

हाव सायबा पोलतीडी वेतम
दामूल्या लग्नाक वेतम
माका सायबा वाट दाकोइ
माका सायबा वाट कोळोना

नदीपलीकडे दामूचे लग्न असल्याने त्या लग्नात नाचायला जायला म्हणून नटलेल्या पोरी नावाड्याला विनंती करतात की आम्हाला पलीकडे सोड..आम्हाला पलीकडची वाट दाखवं..आम्हाला काय कळेना पण ऐकेल तो नावाडी कसला...त्या विनंती करतात.. नाईलाजाने त्याला लाडीगोडी लावतात..की तुला आमचं सोननाणं देतो..नाकातली नथ..पायातले पैंजण देतो..पण त्याच एकच नाका नाका गो..नाका नाका गो..म्हणजे हे नको.कारण त्याला हवे असते चुंबन..passionate kiss.

ठेका..संगीत..आवाज सगळच आवडलं..म्हणून अर्थ वगैरे शोधायला गेलो..थोडबहूत वाचलं ..आणि काळजात धस्स झालं हृदयाचं पाणी पाणी झालं.

गोवा.साल 1500-1550. हिरव्यागार निसर्गाच्या कूशीत ,किनारपट्टीला धरुन हिंदू समाज शांतपणे त्याकाळच्या गावगाड्याप्रमाणे देव आणी धर्माला प्रमाण मानून शतकानूशतके जगत होता.भरपूर जंगल ,सोन्यासारख्या जमिनी आणि मुबलक पाण्याचे झरे,ओढे.

आणि या सगळ्यावर अचानक धाड पडली पोर्तुगीज सैनिकांची.गोव्यावर सत्ता येताच त्यांनी खेळ मांडला धर्मांतराचा..ख्रिश्चन धर्म प्रसाराचा.

लहान लहान शेकडो खेडी.बावरुन गेली.पोर्तुगीज लोकांकडे होते वरवर करुणेचा संदेश देणारे पाद्री,तलवारी आणि बंदूकीचा केवळ धाकच दाखवणारे नव्हे तर साध्या साध्या गोष्टींसाठी जीव घेणारे सैनिक आणि पोपची धर्माज्ञा व या सगळ्याला पाठबळ म्हणून पोर्तुगीज राजाचे जाचक नियम.

मग झाला सुरु अन्वनित छळाचा संगर.पाद्री आपल्या सैनिक लवाजम्यासह एकेका खेडेगावात जायचे.सोबत राजाचे अंमलदार असायचेच.पुरुषांना गावठाणात गोळा करुन उघड्या पाठीवर चाबकाचे आसूड हाणायचे.जास्त विरोध करणार्यांसाठी तलवारी आणि बंदुका होत्याच.मुळातलाच देवभोळा व पापभिरु समाज घाबरुन गेला.गर्भगळीत आणि हतबल झाला.उघड्या पाठी सोलून काढून पाद्री लोकांपूढ पर्याय ठेवायचे...एकतर ख्रिश्चन धर्म स्विकारा नाहीतर इथून निघून जा नाहीतर मरा.आणि निर्णय घ्यायला वेळ एक महिना फक्त.त्यात नाही घेतला निर्णय तर गूरासारख बडवत नेउन बाप्तिस्मा करु अशी तंबी.

प्रत्येक खेड्यात वाडीत यक्षप्रश्न उभा राहीला.घशाखाली घास उतरेना.इकडे आड तिकडे विहीर.जिथे पुर्वजांपासून शतकानूशतके राहत आलो,ती घर,जमिनी,शेती,गुर,माती आणि देव सोडून जायच?आणि जायच तर कुठ?आणि इथ रहाव तर सगळ मिळेल,सरकारदरबारी मान मिळेल पण मग देव,धर्म ,चालीरिती,पूजा अर्चा,उपासतापास हे सगळ सोडायच?गावच्या ग्रामदैवताच देऊळ पाडायच?वर चर्च बांधायच?..सगळाच पेच पडला.पण तलवारीच्या धाकापूढ कुणाच चालेल? हळूहळू एकेक कूटूंब वेगवेगळी आमिष दाखवून तर बर्याच वेळा भिती दाखवून फोडण्यात आली.नवख्रिश्चनाने मुद्दामच हिंदू कूटूंबातल्या मुलाला फसवुन काही खाऊ घातले तरी तो मूलगा बाटला म्हणून त्याचे आईवडीलही त्यास घरात घेईनासे झाले..त्यास परागंदा होणे नाहीतर ख्रिश्चन होणे इतकाच पर्याय उरे..आई मुले परकी झाली..भावास भाऊ परका झाला..सतीची भयानक परंपरा आणि धर्मातील जातींची उतरंड..बाटवाबाटवी....शिवाशिवीच्या लोकविलक्षण कल्पना यांचाही हातभार लागला आणि लोक हळूहळू ख्रिश्चन होउ लागले.नात्यानात्यात तूट पडू नये म्हणून..गाव सोडून कूठ जायच म्हणून हजारो लोक बळजबरीने ख्रिश्चन झाले.ती गती वाढविण्यासाठी हजारो नियम आले की ते ऐकूनच माणूस हतबल व्हायचा.ख्रिश्चन झाला तरच गावकीची जमीन कसायला नाहीतर शंभरपट कर...अनाथ मूलाला चर्च ला द्यावे लागे..काका आजोबा..असले तरी...असे एक ना दोन..तिथल्या जमिनीवर हिंदूंची लग्न न करता दूर नदीपलीकडेच जाउन केली पाहीजेत असेही होते,(म्हणून गाण्यात दामोदरच लग्न नदीपलीकडं होते)

तसेच हजारो कूटूंब अंगावरच्या वस्त्रानिशी जमेल तितक सामान घेऊन आणि डोक्यावर देव घेउन रात्रीत पळायला लागली..वाटेतली जंगलं तुडवत..चोरांपासून आणि पोर्तुगीज अत्याचारापासून वाचत..वाटेत येणारे डोंगर पार करीत ...मजल दरमजल करीत...अगतिक होउन पोचत ते अनघाशिनी,शिरोडी नद्यांच्या तीरावर...फक्त पलिकडे जायचा ध्यास..तिथ एका हिंदू राजाच राज्य..पण तीरापर्यंत पोचण म्हणजे दिव्यच...पोर्तुगीज सैनिकांचा ससेमिरा चुकायचा नाही...परंपरागत नावाडीही नाहीसे झालेले..आता उरलेले पैशाच्या बदल्यात पलिकडे पोचवणारे समूद्रातून आलेले खलाशी नावाडी...मग जवळच असृल नसेल ते द्यायच आणि पलीकडे पोचायच..पोलतडी वेतम..crossing the river.
अर्थात पुढही कमी त्रास नसायचा पण जीव आणि देव वाचायचा...
आजही सगळीकडून आलेल्या देवांची देवळं गोव्यातल्या फोंडाभागात एकत्रितपणे आढळतात...

मुळात हे गाणं लिहिल कार्लोस फेरेरियाने..आणि आपल्या पियानिस्ट भावाबरोबर बसवलं..फ्रांसमध्ये सादर केल 1895 ला आणि गोव्यात आलं 1926ला...मुळातलं दुःखी स्वरातल हे गाण का कोण जाणे..आनंदात गायल जातय..त्या काळातल्या देवदासी मुली नावाड्याला नदीपलीकडील दामोदरच्या लग्नाला नाचायला जाण्यासाठी आर्जवं करतात.

हाव सायबा पोलतीडी वेतामं
दामूल्या लग्नाक वेतामं
माका सायबा वाट दाकोव
माका सायबा वाट कोळोना

असेही उल्लेख सापडतात की नावाड्या जाताना विनयभंग करतो म्हणून लग्नाहून येताना एकजण नावेत एकटी येते आणि नावाड्याने तिच सोननाण ठरल्याप्रमाण घेतलेल असत..शिवाय असहाय करुन चुंबन घेऊन विनयभंग केलेला असतो म्हणून ती कालीमातेच स्मरण करुन नावाड्याचा जीव घेते..

तर अस हे गाणं..कोणा पोर्तुगीजानं दुःखात लिहीलय..मूळ गाण्यात ते आर्त स्वर मनाला भिडतात... आणि त्यामागची कथा ऐकली तर पार आत्म्यापर्यंत रुतून बसतात.

https://youtu.be/F2KpWxJ4Hk8

या अनुषंगाने नुकतीच एक महाबळेश्वर सैल यांची "तांडव" नावाची मराठी कादंबरी वाचली आणि मन हेलावून गेले. मौजमजेच्या गोष्टीसाठी आपण गोव्याला ओळखतो परंतु गोव्याच्या इतिहासात हे जे तांडव घडलेलं आहे ते आपल्याला अस्वस्थ करून सोडल्याशिवाय राहत नाही. पुस्तक खाली ठेवले तरी हे तांडव संपत नाही. ते आपल्याला आत्म्या पर्यंत जाळत नेते. आणि भूतकाळातल्या, वर्तमान काळातल्या व भविष्यकाळातल्या प्रश्नांचे तांडव आपल्या मनातून उतरता उतरत नाही.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

Kokani song

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवख्रिश्चनाने मुद्दामच हिंदू कूटूंबातल्या मुलाला फसवुन काही खाऊ घातले तरी तो मूलगा बाटला म्हणून त्याचे आईवडीलही त्यास घरात घेईनासे झाले..

यात पाद्र्यांचा दोष कसा?

हिंदू आईवडील स्वतःच जर मुलगा बाटला म्हणून त्याला घराबाहेर काढत असतील, तर... सर्व्ह्ज़ देम राईट! दे डिझर्व्ड एव्हरी बिट ऑफ इट.

(आणि मग पाचशे वर्षांनंतर अशा लोकांची उपकार केल्यासारखी 'घरवापसी' करणार आपले कर्मदरिद्री हिंदू लोक! अरे, पाचशे वर्षांपूर्वी जबरदस्तीने बाटलेला हा बांधव तुमचा आहे असे जर तुम्हाला खरोखर, मनापासून वाटत असेल, तर गरज काय आहे त्या घरवापसीची नि शुद्धीची? ज्या अर्थी त्याला 'घरात' घेण्यापूर्वी त्याची घरवापसी, शुद्धी वगैरे 'संस्कार' करण्याची गरज तुम्हाला भासते आहे, त्याअर्थी सद्यस्थितीत तो तुमचा आहे असे तुम्हांस वाटत नाही, हे उघड नव्हे काय? अन्यथा, त्याला तुमचा 'करून घेण्या'ची गरज ती काय?)

(दुसरी गोष्ट. फिरंग्याने विहिरीत टाकलेला पाव अनवधानाने खाणे सोडा. स्वखुशीने विकत आणलेले गोमांस खाऊन (क्वचित्प्रसंगी घरात आणून शिजवूनसुद्धा) माझा हिंदू धर्म लोप पावला, असे मला वाटत नाही. मी स्वतःस अद्यपि हिंदूच समजतो. (आणि त्याउपर - व्हॉटेव्हर दॅट मे मीन आणि फॉर व्हॉटेव्हर दॅट मे बी वर्थ - ब्राह्मणसुद्धा समजतो.) मी हिंदू आहे की नाही, ब्राह्मण आहे की नाही, हे ठरविणारे हे कोण आले भडभुंजे?)

(तिसरी गोष्ट. फिरंग्याने विहिरीत टाकलेला पाव खाऊन जर माणूस बाटतो, तर मग फिरंग्यानेच अमेरिका खंडातून आणलेले साबूदाणे, शेंगदाणे, मिरच्या, बटाटे, झालेच तर रताळी खाऊन यांच्या एकादश्या कशा साजऱ्या व्हायच्या? या न्यायाने, एकादशीला साबूदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, उकडलेली रताळी नि शेंगदाण्याची आमटी खाणारे समस्तजन हे बाटगे किरिस्तांव आहेत! ब्लडी हिपॉक्रिट्स!)

अर्थात पुढही कमी त्रास नसायचा पण जीव आणि देव वाचायचा...

घ्या! म्हणजे, देवाला हे वाचवणार. (गंगेच्या रेट्रोग्रेड मोशनचे उत्तम उदाहरण!) यांचा देव काय लेचापेचा होता काय, की माणसाने त्याला वाचवावे लागावे? (म्हणजे, नक्की कोण कोणाचे रक्षण करतो म्हणे?) आणि, त्यापेक्षासुद्धा, देवाला वाचवणारे म्हणजे हे स्वतःला समजतात तरी कोण? देवाहून श्रेष्ठ? आणि, यांची देवासंबंधीची कल्पना तरी काय आहे? कोणीतरी बुळचट, आणि केला दुष्टाने हल्ला की मोडून पडेल असे काहीतरी?

बौद्धांची एक गोष्ट सांगतात. थंडीचे दिवस होते. कुडकुडणारा एक बौद्ध भिक्षू लाकडाची बुद्धाची मूर्ती जाळून स्वतःसाठी ऊब निर्माण करीत होता. येणारेजाणारे बघे स्टन्ड! सॅक्रिलिज, वगैरे. पैकी एकाने न राहवून त्याला शेवटी हटकलेच.

'अरे मूर्खा! हे काय करतोयस!'

'काही नाही, मूर्तीत अडकलेल्या बुद्धाला लाकडाच्या राखेतून मुक्त करतो आहे.'

'गाढवा, बुद्ध काय त्या लाकडाच्या मूर्तीत आहे असे वाटते काय तुला?'

'नसेल, तर मग तर ती मूर्ती मी जाळल्याने काहीच बिघडू नये, नाही का?'

बौद्ध भिक्षूला जी अक्कल आहे, ती हिंदूंस का नसावी?

मंदिरे (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, मशिदी) तोडल्याने हिंदू धर्म (किंवा इस्लाम) असा नष्ट होत असतो काय? (टीप: मंदिरे किंवा मशिदी तोडण्याचे हे समर्थन नव्हे. किंबहुना, मंदिरे, मशिदी वा अन्य कोणतीही धर्मस्थळे तोडण्यास आमचा पाठिंबा नाही. मात्र, तशी ती तोडण्यास आमचे जे आक्षेप आहेत, ते अन्य कारणांकरिता आहेत; त्यातून संबंधित धर्माचे नुकसान होते वा त्यास धोका पोहोचतो, हे आम्हांस पटत नाही.)

पोर्तुगीजांचे हे जे आक्रमण/अत्याचार होते, हे धार्मिकपेक्षा सांस्कृतिक स्वरूपाचे मानता यावेत. म्हणजे, स्थानिकांची जी धर्मासंबंधीची प्रतीके, आचरणपद्धती वगैरे होत्या, त्यांच्यावर त्यांनी घाला घातला. आणि, स्थानिकांनीसुद्धा नदी ओलांडून केवळ आपल्या प्रतीकांना नि आचारपद्धतींना वाचविले; देवाला वगैरे नव्हे.

यावरून आणखी एक गोष्ट आठवली. फारा वर्षांपूर्वी दक्षिण मेक्सिकोत पर्यटनाकरिता गेलो होतो. तेथे चिचेन-इत्झा नामक स्थळी माया आदिवासी लोकांच्या कुकुल्कान-बाप्पाचे एक पुरातन मंदिर आहे. (आता हे स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. एका पायऱ्यापायऱ्यांच्या पिरॅमिडच्या टपावर मंदिर आहे. पूर्वी पायऱ्या चढू द्यायचे म्हणे. आता चढू देत नाहीत. (एक बाई वरून खाली पडून मेली, असे अधिकृत कारण देतात. मात्र, त्यापेक्षासुद्धा संवर्धन हे खरे कारण असावेसे वाटते; चूभूद्याघ्या.) त्यामुळे, दुर्दैवाने बाप्पाचे दर्शन घेता आले नाही; खालच्याखाली पिरॅमिडलाच प्रदक्षिणा घालून नमस्कार करून समाधान मानावे लागले. तर ते एक असो.) तर आमचा गाईड सांगत होता. (तो स्वतः मायावंशी होता. हे लोक घरात/स्थानिक व्यवहारात त्यांची पारंपरिक भाषा बोलतात; इतर मेक्सिकनांशी बोलताना किंवा अधिकृत/सरकारी व्यवहारांकरिता स्पॅनिश वापरतात, नि आमच्यासारख्या विदेशी टूरिष्टांशी बोलताना इंग्रजीतून बोलतात. लेखी व्यवहारांत यांची पारंपरिक भाषा आता रोमी लिपीतून लिहिली जाते. तर तेही असो.) तर तेथेसुद्धा स्पॅनिश लोकांनी साधारणतः गोव्यात पोर्तुगीजांनी केले तशाच प्रकारचे अत्याचार केले. सर्वांना जबरदस्तीने बाटवून ख्रिस्ती काय केले, त्यांचे जुने धर्मग्रंथ काय जाळले, वगैरे वगैरे. त्यामुळे, त्या लोकांचे प्रचंड सांस्कृतिक नुकसान झाले, हे तर खरेच. परंतु, (तो सांगत होता) आम्ही म्हणे नावापुरते ख्रिस्ती झालो. बोले तो, रविवारी चर्चमध्ये जायची सक्ती होती ना, तर म्हणे रविवारी चर्चमध्ये हजेरी लावू लागलो. नि मग उरलेला आठवडाभर आम्हाला हवे तेच करत राहिलो; आमच्या पारंपरिक पद्धती पाळत राहिलो.

आता, हे वर्णन कदाचित अति-सिंप्लिष्टिक असेलही. परंतु, यामागील स्पिरिट वाखाणण्यासारखे आहे. कोणीही कितीही अत्याचार करो, तुमच्या मूलभूत अंतर्गत श्रद्धा सक्तीने बदलू शकत नाही. जोवर तुम्ही स्वतः त्या स्वखुशीने सरेंडर करत नाही, तोवर. भले बाहेर, वरकरणी तुम्ही काहीही दाखविले, तरीही. इथे हिंदू लोकच हिंदूंना एवढ्यातेवढ्या कारणावरून धर्माबाहेर हाकलायला आतुर, नव्हे उतावीळ झालेले. त्यात पुन्हा ख्रिस्ती होण्याकरिता आमिषे. मग वेगळे काय होणार?

तेव्हा, कृपा करून गोवेकर हिंदूंची (नि त्यांनी सोसलेल्या अत्याचारांची नि तरीही 'देवांना वाचविण्या'ची) कौतुके इतःपर सांगू नका. आगाऊ आभार.

तर अस हे गाणं..कोणा पोर्तुगीजानं दुःखात लिहीलय..

हा मनुष्य अर्थाअर्थी 'पोर्तुगीज' (ॲज़ इन, युरोपातल्या पोर्तुगीज मुख्यभूमीचा - मेट्रोपॉलिटन पोर्तुगालचा - रहिवासी) होता, नि गोव्यातला कोंकणी किरिस्तांव रहिवासी नव्हता, याबद्दल काही खात्रीलायक माहिती आपणांस आहे काय? अन्यथा, (कोंकणी किरिस्तांव असल्यास - जी शक्यता, का, कोण जाणे, परंतु, अधिक वाटते) उगाच त्याला 'पोर्तुगीज' म्हणून हिणविण्यात काय हशील आहे?

(नाही म्हणायला, पोर्तुगीज अमदानीत गोव्यातले सर्वच रहिवासी - ख्रिस्ती, हिंदू नि मुसलमान अलाइक - हे तत्त्वतः पोर्तुगीज प्रजाजन नि नंतरनंतर पोर्तुगीज नागरिकसुद्धा होते. पण म्हणून उगाच काय? या न्यायाने उद्या 'बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्रिटिश पुढाऱ्याने' वगैरेसुद्धा म्हणाल! नाही म्हणजे, तत्त्वतः ते चूक म्हणता येणार नाहीसुद्धा कदाचित, परंतु म्हणून काहीही?)

----------

बाकी, कोंकणी भाषा मला अवगत नाही. परंतु, त्या भाषेचे जे काही वरवरचे, ऐकीव, अर्धवट (नि म्हणूनच धोकादायक!) ज्ञान मला आहे (असे मलाच वाटते), त्यानुसार या लेखात काही धडधडीत भाषिक/औच्चारिक चुका असाव्यात, अशी शंका मला येते. (कोंकणीच्या जाणकार मंडळींनी कृपया योग्य ते खुलासे करावेत. आभार.)

हाव सायबा पोलतीडी वेतम

हे अनुक्रमे बहुधा हांव आणि वेतां असे असावेसे वाटते; चूभूद्याघ्या.

पण त्याच एकच नाका नाका गो..नाका नाका गो..म्हणजे हे नको.

हे बहुधा मांका नाका गो असे असावे; चूभूद्याघ्या. म्हणजे, बहुधा, मला नको रे बुवा!

मुळात हे गाणं लिहिल कार्लोस फेरेरियाने..

विकीवर हे नाव कार्लोस फेरैरा असे आढळले.

असो.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

हाव सायबा पोलतीडी वेतम

हे अनुक्रमे बहुधा हांव आणि वेतां असे असावेसे वाटते; चूभूद्याघ्या.

याचे वेंतां, वैतां, वतां असे अनेक स्थानिक पोटभेद होतात परंतु, 'वेतमं' नकीच नाही. वेतमं म्हणजे अगदी वेताच्या छडीने मारल्यासारखे वाटते!
शब्दाचा सानुनासिक शेवट दर्शवण्यासाठी वापरला जाणारा 'm' हा बरेचदा धडधडीत 'म' असा उच्चारला जातो. अर्थात हे माहीत नसल्यामुळे होते, तेव्हा ठीके.

बाकी राज कपूरने बॉबी या चित्रपटासाठी या गाण्यातील दोन ओळींचा उपयोग करून या गाण्याला पसिद्धी दिली. तोवर हे गाणे गोव्यापुरतेच मर्यादीत होते. (त्या नंतर शेफूताईंनी कढी उकळवली, ही गोष्ट अलाहिदा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दाचा सानुनासिक शेवट दर्शवण्यासाठी वापरला जाणारा 'm' हा बरेचदा धडधडीत 'म' असा उच्चारला जातो. अर्थात हे माहीत नसल्यामुळे होते, तेव्हा ठीके.

बोले तो, पँजिम, क्वेपेम किंवा डाबोलिम-सारखे?

रोमी कोंकणीचे संकेत हे रोमी इंग्रजीच्या संकेतांपेक्षा वेगळे आहेत, हे समजून घेण्याचे 'कक्स्ट' घेतले नाहीत, की हे असे होते! (Esvonta म्हणजे 'यशवंत', नि Ogi Ravchem म्हणजे 'उगी रावचें' अर्थात 'गप्प बसा!', हे डोक्यात क्सिरायला भरपूर वेल्ल लागला होता. नि जेव्हा क्सिरले, तेव्हा भंजाल्लायला होऊन बोलतिम बंद झालिम होतिम, असेम आठवतेम.)

(त्या नंतर शेफूताईंनी कढी उकळवली, ही गोष्ट अलाहिदा).

शेफूताई कोण? (नि कढी बोले तो 'क्सितकोड्डी' ('शीत-कढी'?) की नुसतीच सोलकढी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'बा, हल्ली लोकांचं काय चाललंय ते तुम्हांला काही माहीत नसतं. शेफूताई म्हणजे शेफाली वैद्य. ट्विटर आणि फेसबुक-साम्राज्ञी आहेत त्या! किमान पन्नासेक हजार लोक त्यांच्या विषारीपणाचेही फॅन्स आहेत. (हे ऐसीवर लिहिलेलं असलं; शेफूताई ऐसीवर फिरकतही नसल्या; ऐसी फार लोक वाचत नसले तरीही लिहिल्यामुळे आता माझ्या विरोधातही मोहोळ उठण्याची शक्यता आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदरणीय शेफालीजी वैद्य यांनी प्राचीन काळी ऐसी अक्षरेवर लेखन केलेलं होतं असं मी समजत होतो.
हे भाग्य ऐसी ला लाभले नाही का ?
अरेरे.
मराठी आंजा वर त्या नक्की होत्या असं कुणी म्हटलं होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणपतीवरचा त्यांचा लेख वाचलेला होता मी, इथेच ऐसीवरती. सापडला तर देते.
https://aisiakshare.com/node/2116

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर.

एकेकाळी कुणी आपल्या छत्रछायेखाली यायचे म्हणून ते अजूनही आपल्याच छत्रीसाठी खोळंबून राहतात, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समजतात. गेल्या सहा-आठ-बारा महिन्यांत आपल्याला भाव दिला नाही म्हणजे हे आपल्याला सोडून गेले, असं कुठलेही गणित समजणारे लोक समजतात.

किंवा देवीची लस एकेकाळी टोचून घेतलेले लोक अजूनही जगात जिवंत आहेत, म्हणून देवीचा रोग अजूनही जगात अस्तित्वात आहेत, असं समजलं जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकेकाळी छत्रछायेखाली आल्या असताना झालेले हे दुर्मिळ कौतुक!

या सगळ्या रीतीरिवाजांमधे कधीही फार काही आवडलं नाही आणि नॉस्टॅल्जिया कोशंट फार कमी आहे तरीही लेखन आवडलं. एकंदर उत्सवी, उत्साही वातावरणाचं चित्रं मस्त रंगवलं आहे.

देवी देवी ! (देवा देवा सारखं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्साकुटी विसरलात हो नबाशेट..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, विसरलो खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हा, कृपा करून गोवेकर हिंदूंची (नि त्यांनी सोसलेल्या अत्याचारांची नि तरीही 'देवांना वाचविण्या'ची) कौतुके इतःपर सांगू नका. आगाऊ आभार.

बाकी गोष्टींशी सहमत असलो, तरीही ह्या वाक्याबाबत तीव्र आक्षेप. असंवेदनशील.

एरवी प्रिव्हिलेज्ड प्रिव्हिलेज्ड म्हणून स्वत:ची उरे फुकट बडवणाऱ्यांना इथलं नसतं प्रिव्हिलेज दिसत नसावं. असो.

(बादवे, मीही गोमांस खाल्लेले आहे. खाण्यात प्रॉब्लेम नाही.)

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आता करोनाकाळात सत्ताधारी असेच वागत आहेत, नाही का?

शहरांत रोजगार नाहीत म्हणून गावी परत जावं, तर रेल्वे-बसची सोय नाही. खिशात पैसा नाही. मग ग्लूकोची बिस्किटं खाऊन लोक मैलोनमैल तंगडतोड करून, उपाशीतापाशी, उन्हात घरी जात होते. अनेकांचे जीव त्यात गेले. आणि मग गावी परत जावं तर तिथेही त्यांची कुटुंबं त्यांचा स्वीकार करत नाहीयेत. क्वारंटाईन करूनही नाही! हे तर 'आपलं' सरकार आहे, हिंदूधार्जिणं आहे - मंदिराची पायाभरणी वगैरे केली तरीही हिंदू स्थलांतरित मजुरांची परवड आहेच!

पोर्तुगीज बोलूनचालून परकेच होते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बऱ्याच जणांनी लेख वाचला आणि काहींनी प्रतिक्रिया दिल्या. सर्वांचे आभार.
परंतु काही प्रतिक्रिया नेमक्या समजल्या नाहीत. म्हणून पुन्हा हा प्रपंच.
न'वी बाजू म्हणतात त्याप्रमाणे बाटवाबाटवी मध्ये पादरी यांचा काय दोष? तर मूळ लेखामध्ये ही मी एकंदर धर्मपरिवर्तना मध्ये हिंदूंमधील जातीची उतरंड, बाटवाबाटवी आणि शिवाशिवी च्या लोकविलक्षण कल्पना यामुळे धर्मपरिवर्तनास गती मिळाली असे लिहिले आहे. हिंदू धर्मातील अंतर्गत दोषांसाठी पादरी यांना दोष दिलेला नाही. वरवर करुणेचा संदेश देऊन जुलमाने धर्म परिवर्तन करण्याचा दोष मात्र त्यांचा आहे.

स्वखुशीने गोमांस विकत घेऊन खाणे वगैरे ही मते ठीकच आहेत परंतु काळाप्रमाणे धर्मातील जाचक रूढी हळूहळू सैल होत जातात हे सर्वास माहित आहे. परंतु न'वी बाजू यांचे हे मत २०२० सालातले आहे. १५५० सालातील कल्पनांशी याची तुलना करून कसे चालेल? तो विषय त्या काळाच्या संदर्भातच तपासला पाहिजे. त्याकाळी कदाचित आपले कोणाचेच पूर्वज असे म्हणावयास धजले नसते.

नदी पार केल्यानंतर जीव आणि देव वाचायचा.... यावर नवी बाजू असे विचारतात कि देवा पेक्षा तुम्ही मोठे आहात का.. तर ते त्या अर्थाने नाही. शेवटी देवांची मंदिरे बांधली काय आणि पाडली काय ती माणसांनीच. स्वतःच्या धर्म पद्धती, देवळे वाचवली या अर्थाने म्हटले आहे.

तुम्ही बौद्धांची गोष्ट सांगितली तीही छानच आहे. देव फक्त प्रतिमेत नसतो तो सगळीकडे असतो अशा अर्थाने आहे. आपल्या उदाहरणात मात्र या प्रतिमा जुलमाने तोडल्या गेल्या त्यामुळे या गोष्टीचा दाखला देता येत नाही. तसे असते तर जगभर स्तूप आणि पॅगोडा आणि इतकेच काय मंदिर मशीद चर्च उभीच राहिली नसती. लाकडाची मूर्ती जाळून उब तयार करणाऱ्या बौद्ध भिक्षू सारखे मीही वागेन, प्रसंग आल्यास दगडाची मूर्ती अत्याचाराच्या डोक्यात घालीन. परंतु कोणी जुलमाने मूर्ती भंजन करू लागले तर देव काय फक्त मूर्तीतच असतो का असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे? तसेही देव जर सगळीकडे चराचरात असेल तर तो मूर्तीतही असेलच की.

न'वी बाजू यांनी दक्षिण मेक्सिकोच्या पर्यटनाची गोष्ट सांगितली आहे. रविवारी चर्च ला जायचे आणि आठवडाभर आपलं आपलं जुन्या धर्माप्रमाणे करायचं... यावर माझ इतकेच म्हणणे आहे की तशीही सोय १५५० साली गोव्यात नव्हती.. Goa inquisition असे गुगल सर्च केले तरी तो भ्रम दूर होईल.

भाषेच्या आणि उच्चाराचे अनुषंगाने लेखावरील आक्षेप बरोबर आहेत. मराठी शब्दात ते गाणं सापडलं नाही म्हणून ऑडिओ ऐकत ऐकत शब्द लिहिले त्यामुळे चुका झाल्या. तसेच मूळ कवी पोर्तुगीज आहे का नाही याविषयी माहिती नाही परंतु त्याला पोर्तुगीज म्हणून हिणवले नव्हते हेही तितकेच खरे.

जिज्ञासूंनी महाबळेश्वर सैल यांनी लिहिलेली तांडव नावाची कादंबरी वाचावी. लेखकाने स्वतः कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता ही गोष्ट लिहिली आहे. प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे लेखक स्वतः निधर्मी आहे.

त्या काळातील सगळा घटनाक्रम समजून घेत असताना त्या सगळ्या गोष्टींमुळे सहवेदना जाणवून मी तो लेख लिहिला तर त्यावर न'वी बाजू यांनी गोवेकरांची कौतुके आम्हाला सांगू नका असा शेरा मारला वर माझे आगाऊ आभार केले!!! यावर त्यांच्या असंवेदनशीलतेचा निषेध करून मी त्यांचे आभार नम्रपणे नाकारत आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर त्यांच्या असंवेदनशीलतेचा निषेध करून मी त्यांचे आभार नम्रपणे नाकारत आहे.

क्या सॉल्लिड मारा!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0